Wednesday, June 4, 2014

रिंगण

"ओळख राहू दे. या आमच्याकडे मुद्दाम." संतोषने हातात हात घेऊन प्रेमभराने थोपटला तसं रमाकांतना हसायला आलं.
"आता कुठलं येणं होतं आहे तिकडे. आत्ता आतापर्यंत येत होतो त्यालाही झाली चार वर्ष. पण आलोच तर भेटेन नक्की." संतोषच्या पाठीवर थाप मारून ते म्हणाले आणि विमलकडे पाहिलं न पाहिल्यासारखं करत पाणी प्यायला म्हणून उठले. पाणी प्यायचं निमित्त. संतोषच्या निर्णयाने आलेला अस्वस्थपणा रमाकांतना पाण्याच्या घोटाबरोबर गिळता आला तर पाहायचा होतं.

संतोष निघून गेला तसं पाठीमागे हात बांधून उगाचच ते येरझार्‍या मारत राहिले.  थकलेल्या शरीरात अचानक जोर आल्यासारख्या त्यांच्या फे‍र्‍या चालू होत्या. विमलपुढे मनाची घालमेल व्यक्त करावीशी वाटत होती, पण शब्द जुळवता येत नव्हते. विचार सैरावरा पळत होते ते धरून कोणत्या शब्दात मांडावेत तेच रमाकांतना कळत नव्हतं. असं कधी झालं नव्हतं. रमाकांतांसारखा व्यवहारी, हिशोबी माणूस भावनेत अडकला नव्हता आणि त्याचा सार्थ अभिमान बाळगत असताना अचानक हे काय होतं आहे ते त्याचं त्यांना समजेनासं झालं होतं. विमलताई त्यांच्या येरझार्‍याकडे शून्य नजरेने पाहत होत्या. त्यांची अस्वस्थता त्यांना कळत असली तरी हृदयापर्यंत पोचत नव्हती. त्यांच्याही मनात संतोषचेच विचार घोळत होते.
"हल्ली खूप जण परत जायला लागली आहेत भारतात. संतोष बघ, पंधरा वर्षांनी चंबूगबाळं आवरून निघाला आहे. मुलांना आजी आजोबांचा सहवास लाभावा, मुलीचं शिक्षण मायदेशी व्हावं या इच्छेने." विमल ताईंनी ओळखलं, संतोषने त्या दोघांचाही आजचा ’दिवस’ व्यापून टाकला आहे.
"चौतीस वर्ष होतील आपल्याला इथे. आता जावंसं वाटतं आहे परत? कायमचं?" स्वत:च्या आवाजात नकळत ओलावा निर्माण झाल्यासारखं वाटलं विमलताईंना.
"नाही. इथे का आलो हा प्रश्न पडला आहे."
"आत्तापर्यंत परत का जायचं नाही यावर बोलत राहायचात तास न तास.  इथलंच पारडं कसं जड आहे ते पटवून द्यायचात. मग आता हा प्रश्न का पडला आहे इतक्या वर्षांनी?"
"बर्‍यांचदा येतो हा प्रश्न मनात आणि दरवेळेला उत्तर वेगळं येतं. म्हणजे आपण आपल्या सोयीने उत्तरं शोधतो, त्यालाच बरोबर समजतो. पण आजच्या उत्तराने देहाला, मनाला अस्वस्थपणाने घेरलं आहे."
"संतोषने भारतात परत कायमचं जायचं ठरवलं आहे ते ऐकून?"
"तो एक निमित्त. ओळखीचा, आवर्जून भेटायला येणारा त्यामुळे आता पुन्हा भेट होईल न होईल म्हणून वाटतंच वाईट. पण हल्ली ही तरुण मुलं परत जाण्याचा निर्णय घेतात, तो पार पाडतात तेव्हा हा प्रश्न मनाला छळत राहतो. मध्यंतरीच्या काळातही जायचं म्हणा कुणी ना कुणी असा निश्चय करून. पण बरीच जण यायची परत एक दोन वर्षात. आपण हसायचो या मुलांना पण  कौतुकही वाटायचं, निदान प्रयत्न करून तरी पाहिला त्यांनी म्हणून. आणि ते परत आले की बरं वाटायचं आपला परत न जाण्याचा निर्णयच बरोबरच याची खात्री पटायची."
"मग आताच का अस्वस्थ झाला आहात?"
"आता ही मुलं जातात ती नाही येत परत. सगळं बदललं आहे म्हणतात, ज्या साठी आपण या देशात आलो ती  सगळी सुखं भारतात मिळतात आणि इथेही पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही म्हणे. नोकरीची शाश्वती नाही, सतत प्रवास हे इथेही करायचंच तर मग भारतात निदान इथे मिळत नाही ते सुख अनुभवता येतं.  आई, वडील, भावंडांचा सहवास मिळतो. मुलांना आजी, आजोबांचा लळा लागतो. कधीतरी वर्षातून बोलावलं भेटीला, राहिले एक दोन महिने इतक्या तुटपुंज्या सहवासावर तहान नाही भागवावी लागत. नातेवाइकांच्या भेटीही लग्न, वाढदिवस अशा निमित्तानं होत राहतात. आणि मुलांना आपल्या संस्कृतीत वाढवल्याचं समाधानही मिळतं. ऐकलंस की तूही. संतोषच सांगत होता ना आपल्याला."
"संस्कृती?" विमलला एकदम हसू आलं. संस्कृती टिकवत असलो काही प्रमाणात तर आपणच टिकवतो आहोत इथे हे म्हणणं टाळलंच त्यांनी. उगाच विषयात विषय आणि डोक्याला आणखी एक भुंगा नको.
"हे पाहिलं की वाटतं गं, आता आपले तर परत जायचे मार्ग बंद झाले. आठवतंय, बाबा गेले तेव्हा अचानक सगळ्या वर्षांचा हिशोब मांडावासा वाटत होतं काही दिवस. भूतकाळ, भविष्यकाळाचं गणित सुटता सुटेना. आईने एकटंच तिकडे रहायचं ठरवलं तेव्हाही जीव तुटला होता पण आजच्यासारखं निराशेच्या गर्तेत लोटणारं उत्तर नव्हतं समोर आलं." विमलला रमाकांतच्या विचारांच्या दिशेचा प्रयत्न करूनही अंदाज येत नव्हता.
"बाबा, आई, बहिणी....एकेक करत सर्वांनी निरोप घेतला.  या देशात आयुर्मान जास्त आहे. कधी जुने फोटो काढून बसलो की वाटतं मीच खड्यासारखा उरलो आहे या सर्वांमधून. आता करायचं काय परत जाऊन? उरलंय काय तिथे? त्यामुळे  मन थांबतं ते इथे का आलो या प्रश्नावर."
रमाकांत हे वेगळंच काहीतरी बोलत होते. नेहमीचे काथ्याकूट झालेले विषय नव्हते. पण  हा विषयच कशाला हवा, आता राहिले आहेत कितीसे दिवस की अमेरिका, भारत करत राहायचं असं म्हणावंसं वाटत असूनही त्या मुकाट रमाकांतांचं मोकळं होणं झेलत राहिल्या.

"शाळेत असताना घरात परदेशात गेलेल्या नातेवाइकांचं कौतुक ऐकलेलं. सुभाषकाका कॅनडात होता. बाबांचा मामेभाऊ. कधीतरी चार पाच वर्षांनी यायचा भारतात. तो आला की घरी दारी, नातेवाइकांमध्ये तोच विषय. तिकडून आणलेल्या भेटी, त्याच्या मुलांचं अडखळत बोललेलं मराठी, फॉरेन रिटर्न म्हणून जळी स्थळी होत असलेलं कौतुक... तो आला की वाटायचं, जायला पाहिजे आपणही परदेशात. परत आलो की काय ऐट असते. त्या वेळेस कॅनडा, अमेरिका नाहीतर दक्षिण आफ्रिका नाहीच तर मग इंडोनेशिया हे देश ठरलेले."
"हो आमच्याकडेही होतं या फॉरेन रिटर्न मंडळीचं कौतुक. पण मला नाही कधी वाटलं की त्या कौतुकासाठी जावं परदेशात आपणही."
"मला ध्यासच लागलेला. आजूबाजूलाही डॉक्टरांच्या नावासमोर दिसायच्या ना परदेशातल्या पदव्या. कधी नुसतं सर्दी, खोकला झाला म्हणून तपासायला जायचं तरी बाबा म्हणायचे, एफ. आर. सी. एस. आहे. म्हणजे काय ते ठाऊक नव्हतं. पण त्यांच्या डोळ्यात जो आदर डोकावायचा ना एफ. आर. सी. एस. बद्दल तो पाहून वाटायचं, मी पण गेलो परदेशात तर काय अभिमान वाटेल बाबांना. बाबा कधी बोलले नव्हते तसं पण मी गृहीत धरलं. आलो जिद्दीने इथे. यशस्वी झालो. आणि सुभाष काकाला भाव असायचा तोच अनुभवला कितीतरी वर्ष भारतात गेलो की. येता जाता कौतुक."
"हे सगळं ठाऊक आहे मला. खूप वेळा बोललो आहोत. पण संतोषने भारतात परत जाण्याचं ठरवलं आणि इतकी अस्वस्थता आली तुम्हाला?"
"गुदमरतो जीव मला नक्की काय साध्यं करायचं  होतं याचं उत्तर शोधताना. इथे आल्यानंतर नुसतेच परत जायचे बेत करीत राहिलो मुलं मोठी होईपर्यंत. मुलं आता इथेच राहणार हे स्वीकारल्यावर परत न जाणंच कसं शहाणपणाचं होतं हे पटवत राहिलो. स्वत:ला, इतरांना. हळूहळू तर हा विषयही मागे पडत गेला. तसंही ते फार सोपं नव्हतं; निदान त्या वेळेस तरी. म्हणजे कुणी परत जायचं धाडस करायलाच धजत नव्हतं. पण संतोषसारखी परत जाणारी वाढली आहेत आता. तेव्हा वाटायला लागतं, मी का आलो इथे? तिथेच राहिलो असतो तर कदाचित परदेशात गेलो नाही ही एक खंत राहिली असती पण तेवढा एकच सल, दु:ख राहिलं असतं. आता... आणि इतकं करून प्रश्न पडतो की मी इथे आलो ते नक्की माझं स्वप्न होतं की बाबांची इच्छा मी पुरी केली? पण बाबा तर कधीही एका शब्दाने म्हणाले नव्हते मी परदेशात जावं म्हणून."

हळव्या झालेल्या रमाकांतकडे विमलताई पाहत राहिल्या.  देश सोडून जाणारा कधी ना कधी या कोड्यात गुरफटतोच. स्वत:ला शोधत राहतो, तपासत राहतो. पण हा देशच मला माझा वाटतो असं म्हणणार्‍या रमाकांतच्या मनात आजच का हे दाटून यावं ते त्यांना समजत नव्हतं. त्यांनी नाही का हा विषय मनाच्या अगदी आतल्या कोपर्‍यात हलवून अडगळीत टाकून दिला होता. कधी साफसफाई केल्यासारखी त्या त्यावरची धूळ झटकायच्या, पण मनातल्या मनात. स्वत:लाच बजावल्यासारखं त्या इथेच राहण्याच्या निर्णयाचं समर्थन करायच्या. आता इतक्या वर्षांनी तिच कारणं खरी आहेत असंही वाटायला नव्हतं का लागलं? मग आज हे का? कशासाठी. त्यांच्या नजरेतला प्रश्न कळल्यासारखं रमाकांत उत्तरले.
"मला समजत नाही ते हेच की मी माझं स्वप्न पूर्ण करत होतो की बाबाचं? का समाजाचं?"
"समाजाचं?"
"सुभाष काकाच्या कौतुकामुळे मी पाऊल टाकलं ते  न कळलेल्या वाटेवर, अज्ञाताच्या दिशेने. ती वाट कुठे संपते याचा विचारही डोकावला नाही कधी. पण मी आनंदी वाटसरू होतो, स्वप्न पाहणारा, ती पुरी करण्याचा ध्यास घेतलेला. माझं होत असलेलं कौतुक, आई, बाबांना माझा वाटणारा अभिमान, नातेवाईक, मित्र, शेजार्‍या पाजार्‍यांच्या डोळ्यातला हेवा या रिंगणात मी नकळतपणे कधीतरी फिरायला लागलो आणि पार अडकलोच. त्यातून जाग यायला इतकी वर्ष लागली. आणि आज  काहीतरी कायमचं निसटून गेल्यासारखं वाटतं आहे, कळेनासं झालं आहे की जे स्वप्न मी पुर्ण केलं ते नक्की होतं तरी कुणाचं?

बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या अंकाच्या लेखमालिकेतील हा ५ वा लेख होता : -
http://www.bmmonline.org/sites/default/files/BMM/BMM/BMM_Newsletter_June2014.pdf

Thursday, April 24, 2014

हुश्शऽऽऽ पार पडल्या एकांकिका!

हुश्शऽऽऽ पार पडल्या एकांकिका आमच्या. मस्त झाल्या. गेले ४ महिने सराव, सराव, सराव..., नेपथ्य, संगीत नियोजन, प्रेक्षागृह आरक्षण, तिकिट विक्री, जाहिरात एक ना अनेक कामांची न संपणारी यादी.... अभिनय आणि दिग्दर्शन याची हौस हेच एकमेव कारण या सगळ्या धडपडीचं. माझ्याबरोबरीने नवराही दरवर्षी शिकला आहे  यात ’उडी’ मारायला. या प्रवासात असे अनुभव येत रहातात की कधीकधी  प्रश्न पडतो का करतो हे सारं? पण रंगमंचावर गेलं, कार्यक्रम यशस्वी झाला की सारे प्रश्न, अनुभव, अडचणी यावर मात करते ही नशा आणि पुढच्या बेतांचं नियोजन सुरु होतं.

मागे वळून पहाताना जाणवतं, या निमित्ताने ’माणसं’ कळतात, अगदी खर्‍या अर्थाने. आपल्याला कळलेली ’माणसं’ अशी वागू शकतात याचे धक्के बसतात तर कधी अनपेक्षितपणे सामोरा आलेला माणसातला चांगुलपणा भारावून टाकतो.

आम्ही चार महिने सगळे शनिवार, रविवार पूर्णपणे एकांकिकेसाठी मोकळे ठेवतो. कलाकारांना वेळ, तारखा सर्व आधीच कळवून, हे सगळं जमणार असेल तरच काम करायचा विचार करा असंही सुरुवातीलाच सांगितलेलं असतं. तरीही...

कलाकारांनी स्वत:ला विसरुन व्यक्तिरेखेला न्याय द्यावा, पण तसं होतं नाही. मला हे जमणार नाही, शोभणार नाही असा ’मी’ पणा येतो तेव्हा वाटतं...लेखकाची वाक्य परस्पर बदलून टाकणं, नवीन घुसवणं हे तर इतक्या सहज करतात ना सगळी.

दिग्दर्शन करताना आमची एक अट तसं म्हटलं तर जाचक पण शिस्त पाळायची तर आवश्यक. ती म्हणजे वेळ पाळणं. ठरल्या वेळेला सराव सुरु करायचा आणि दिलेल्या वेळेला संपवायचा. एखादा कलाकार उशीरा आला तर त्याचा त्यादिवशीचा तिथपर्यतचा भाग गेला. ब‍र्‍याचदा वाईटपणा येतोच आमच्या वाट्याला या नियमाबद्दल. मजेची गोष्ट म्हणजे, लवकर येणारे उशीरा येणार्‍यांबद्दल तक्रार करतात पण ती तणतण फक्त आमच्यासमोर. उशीरा येणार्‍यांना प्रत्यक्ष सांगायला कुणी धजावत नाही, वाईटपणा नको म्हणून. तिथे आम्ही असतोच :-) . पण  वेळ पाळणं  जमायला हवं हे ’माणसांना’ कधी समजणार?

भारतात काम करताना कलावंतही खूप आणि संस्थाही खूप, कशाचीच वानवा नसते. पण परदेशात जे हाती येतं त्याच्यांबरोवर काम करावं लागतं. फार कमीजणांना खर्‍या अर्थी ’अभिनय’ करण्याचा अनुभव असतो. इथे आल्यावर अचानक त्यांना आपल्यातली ’कला’ जाणवलेली असते, अधूनमधून देवळातल्या रंगमंचावर केलेलं काम, इतक्या अनुभवावरुन, चला रंगमचांवर वावरायची तर भिती नाही ना, मग करु आपण तयार असा दृष्टीकोन ठेवून आम्ही त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात करतो. पण त्यांचा तो तेवढाही अनुभव त्यांच्यादृष्टीने ’रग्गड’ असतो, त्या आत्मविश्वासामुळे  अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागते.

तरीही दरवर्षी रंगदेवतेच्या आशीर्वादाने सारं छान पार पडलं की जो आनंद होतो तो अवर्णनीय.

खालच्या दुव्यावर फोटो पहायला विसरु नका. लवकरच व्ही. डी. ओ. क्लिप्स टाकेन.

http://marathiekankika.wordpress.com/