Tuesday, August 2, 2016

स्त्रीत्वाच्या पिढ्या!

आजी म्हणायची...
खरं तर काहीच म्हणायची नाही
तिने स्वीकारलं होतं तिचं गृहिणी असणं
वेगळं नव्हतंच तिच्या दृष्टीने
घरच्या परिघात ’स्व’ ला विरघळू देणं!

आई म्हणायची,
घरच्या जबाबदार्‍यांनी बांधून ठेवलं
असलेलं काम सोडायला लागलं!
पसर पंख, मार भरारी
लाभू दे स्वावलंबनाला
कर्तुत्वाची झळाळी!

आम्ही म्हटलं,
आजीचं पाहिलंय
आईने सांगितलंय
बदलायला हवं!
फडकवले झेंडे
स्त्रीमुक्तीचे, स्वतंत्रतेचे,
कर्तुत्वाचे, स्वावलंबनाचे!

वाटलं,
मिळालं सारं,
स्त्रीने स्वत:ला शाबित केलं
स्त्रीमुक्तीचं पेव फुटलं!
"स्व" ला उधाण आलं
कुठे थांबायचं कळेना
काय कमावलं काय गमावलं समजेना
स्त्रीत्व म्हणजे नेमकं काय ह्याचा उलगडा होईना
हातात शून्य मावेना!

आई, आजी, आमची पिढी
सर्वांकडे पाहून स्वप्नातली स्त्री हसली,
म्हणाली,
अगं मीच ती
दृष्टी असून तू अंध
स्त्रीत्व म्हणजे गंध
बकुळीच्या फुलासारखा
हळुवार पसरणारा
दरवळणारा, मोहवणारा,
आणि तरीही,
स्वतंत्र अस्तित्व जपणारा! - मोहना प्रभुदेसाई जोगळेकर

Monday, July 25, 2016

सवंगडी

कधीतरी मोठं व्हायला झालं
आणि लक्षात आलं
लहानपण पळून गेलं!
थांबवलं नाही तर हातातून जाईल
अधिकच मोठं व्हायला होईल!
धावत जाऊन बोट धरलं, आणलं त्याला परत!
जरा कुरकुरलं, दमलंही, धाप लागली म्हणालं
पण वळलं अखेर हसत हसत!

सागरगोटे खेळू, पारंब्यांना लटकू
आंब्याच्या झाडावरच्या कैर्‍या तोडू
तिखट मीठ लावून झाडावरच खाऊ!
नदीत डुंबू,  मस्ती करु, गप्पा झोडू
थापा मारु, मोठेपण विसरत  हुंदडत राहू!

बालपण घरात आलं
मुलीचंही सवंगडी बनलं!
तुझी आणि माझी जोडी
लहानपणची शर्यत खोटी
तरी पैजेची आस मोठी!
माझं लहानपण दमत होतं, थकत होतं!
मुलीचं बालपण उत्साहात होतं
माझ्यातली उमेद जागवत होतं!

बसलो एकमेकींना लगटून
लेक हसली खुदकन
गळ्यात पडली पटकन!
किती गं छान तुझं लहानपण
बोलवून आण अधूनमधून
आवडेल माझ्या बालपणाला
तुझ्या लहानपणाचं सवंगडी बनायला! - मोहना प्रभुदेसाई जोगळेकर

Sunday, July 10, 2016

आत्मा


शाळेच्या दिवसात मैत्री हेच सूत्र असतं
आमचा समाज, आपल्यातलेच असं काही नसतं!
आपल्यातले, आमच्या समाजातले
कुणास ठाऊक हे विष कुठून येतं
कळेपर्यत मनात भिनून जातं!

वाटतं,
आमचा समाज, आपल्यालेतच
हा जातीवाद राहिलाय माघारी!
तेव्हा कुठे ठाऊक होतं
वर्णभेद उभा ठाकलाय ठायीठायी!
’लेबलं’ आहेतच सर्वत्र
आधी जातीवरुन, आता वर्णावरुन
गोरे काळ्यांना मारतात!
काळे पेटून उठतात
’मायनॉरिटी’ सुन्न होतात!

माणूस नावाची जात हरवली आहे
माणूसकी नावाचा धर्म गाडला गेलाय!
आत्मा सापडत नाही म्हणून
त्यांचा  श्वास कोंडत चाललाय!

कदाचित दिसतील दोघं तुम्हाला!
हिंसेच्या प्रागंणात गोंधळलेले, घाबरलेले
विसरु नका त्यांची समजूत घालायला
 हात धरुन स्वत:च्या घरात आणायला! - मोहना

Sunday, June 19, 2016

कवितेला कवितेने उत्तर :-)

(कवी अनामिक पण त्याच्या कवितेला माझं कवितेने उत्तर  :-) आधी त्याची मग माझी कविता. )

प्राणसखी
घरी असलीस म्हणजे सारखे
"हे करा अन ते करा"
पेपर खाली पडला तरी 
"किती हो केला पसारा"
म्हणून म्हटले चार दिवस
जाऊन ये तू माहेरी
निवांत आणि सुखाने
एकटाच राहीन घरी
सोडून आलो तिला मग
आनंदाने काल
काय सांगू मित्रांनो
तुम्हा माझे हाल
सकाळीच उठल्यावर
आधी कचरा काढू
सगळे कोपरे धुंडाळले पण
सापडला नाही झाडू
ठेवला कचरा तसाच म्हटलं
दात घासू बेस्ट
ब्रश तर सापडला पण
कुठे ठेवली पेस्ट
आंघोळीला गारच पाणी
वाटेल म्हटलं छान
टॉवेल राहिला बाहेरच
कुणाला सांगू आण
चह करायला गेलो तर
सापडेना साखर
गॅस काही पटेना
बिघडलेला लायटर
वाटे कटकट तुझी राणि
तू घरी असताना
जीवन सारे सुने वाटे
तू जवळ नसताना
मी जर असेल शिव तर
तू माझी शक्ती
सदा जवळी असावीस तू
हीच आता आसक्ती
सहचारिणी हे प्राणसखे
विनवितो मी गं तुला
जेव्हा कुठेही जाशील तू
घेऊन जा गं मला... 
____________________________________________________
वरच्या कवितेबद्दल सर्व गृहीणींच्या वतीने:
सख्या,
भावल्या तुझ्या भावना
असतोस तू माझ्या मनात
मी कुठेही गेले तरी!
न सांगता जेव्हा शिकशील
तू माझा भार हलका करायला
लागशील कचरा काढायला
वस्तू जागच्या जागी ठेवायला
आपल्या वस्तू आपणच घ्यायला
त्यावेळी आवडेल मला तुझं
स्वावलंबनाच्या झुल्यावर झुलणं
माझ्या खुशीत अशी भर घालणं!
हे जेव्हा करशील
तेव्हा मलाही मिळेल थोडा वेळ
माझ्यासाठी, माझ्या छंदासाठी
आनंदाच्या झुल्यावर उंच झोका घेण्यासाठी!
पुढच्यावेळी मी गेले कुठे
तर येऊ दे कविता अशी
ज्यातून मला कळेल
जमलं तुला सारं
ते सुख असेल न्यारं! - मोहना प्रभुदेसाई जोगेळेकर

Tuesday, June 7, 2016

मराठी शाळा

शारलट, नॉर्थ कॅरोलायना येथे  माझ्या मराठी शाळेचं हे दुसरं वर्ष. दर रविवारी किलबिलाट असतो घरी. हसतखेळत शिक्षणाचा हा प्रयत्न आणि त्याची झलक. विनोदी प्रवेश, पालकांची परिक्षा, नाट्यप्रवेश, गाणं सर्व काही. तुमच्या अभिप्रायाचं, सुचनांचं स्वागत.


Saturday, May 28, 2016

तुम्ही

तुम्ही विचारलंत,
’तुमच्याकडे’ कसं असतं?
’आपल्या’ भारतात असतं तसंच
इकडे राहून ’भारत’ आमच्या मनात
तिकडे राहून ’परदेश’ तुमच्या तनामनात!

तुम्ही तिकडे इंग्रजी जोपासता
आम्ही इकडे मराठी
सांस्कृतिक कार्यक्रमांची उधळण
भारतातल्या कलाकारांना आमंत्रण
तुम्ही आम्हाला सांगता इंग्रजी सिरीयलबद्दल
आम्ही तुम्हाला मराठी मालिकांबद्दल!

तुम्हाला ’तिकडेच’ राहतो
याचा अभिमान वाटतो!
मनात आलं म्हणून
इकडे येता येत नसतं
हे सत्य दुर्लक्षित असतं!

तुमच्या दुष्टीने आम्हाला
पैशाचा, आरामाचा, सुखसोयींचा मोह!
विनाकारण सार्‍याचा उहापोह!
तुम्हाला,
 आमच्या ’एकाकी’ झालेल्या पालकांबद्दल सहानूभुती वाटते
आम्हाला,
तिथेच असून तुमच्या सहवासाला मुकलेल्या आई - वडिलांबद्दल!

परत नाही यावंसं वाटत?
तुम्ही विचारलंत,
तुम्हाला नाही ’इकडे’ यावंसं वाटत?
पलिकडे शांतता
बाजार हा भावनांचा
फसलेल्या इच्छा आकांक्षांचा! - मोहना प्रभुदेसाई जोगळेकर

Thursday, May 26, 2016

भेट

आपण सर्व कितीतरी वर्षांनी                  
काळाची पानं पुसतोय
उत्सुकता, अधीरता
हूरहूर दूरदूर
अस्वस्थ, स्वस्थ
लंबक हेलकावतोय
आज आपण सगळे भेटतोय!

मन आणि वय झालंय शाळकरी!
चेहरे ओळखीचे, बिनओळखीचे
हृदयात जपलेले
संख्येच्या भाऊगर्दीत
लक्षातही न आलेले
तरी भेटायच्या कल्पनेने
उरात धडधड वाढलेली!

त्या वेळेला भावलेला तो, ती कशी वाटेल?
कोण, कुठे ’पोचलं’ असेल?
मनातल्या मनात हिशोब सुरु झाले
काय कमावलं, काय गमावलं
उत्सुकतेचं दळण दळलं जातंय मनाच्या जात्यावर
भेटायची वेळ आली काही सेकदांवर!

छान झालं, भेट झाली
तसं पूलाखालून बरंच पाणी गेलंय
ओळखीचे चेहरे अनोळखी झालेयत
गळ्यात गळा घालून फिरलेली मनं
’कमावलेलं’ दाखवायच्या नादात
’गमावलेलं’ शोधायच्या प्रयत्नात!

हास्यविनोदात दिवस बुडाला
सगळे पांगले, माघारी निघाले
भेटीने घेतला प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव!
वास्तवाच्या दुनियेत प्रवेश करताना
मनात दाटून आला ओलाव्याचा भाव!
असंच भेटत जाऊ ’मैत्र’ जपत राहू
अशा ’थांब्यावर’ उभे आपण
जिथे ’दाखवणं’ ’गमावणं’ सारंच नगण्य
जे आहे ते जपू
मैत्रीची ज्योत पेटती ठेवू!

मोहना प्रभुदेसाई जोगळेकर

Monday, April 4, 2016

सावट

(अनुराधा दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली कथा)

प्रथमला निरोप द्यायला चित्रा दारात येऊन उभी राहिली. तो फाटकातून बाहेर पडेपर्यंत ती तिथेच थांबली.
मनात बरीच कामं घोळत होती. प्रथम आता दोन तीन दिवस
येणार नाही म्हणजे निवांतपणा होता. शांतपणे राहिलेलं काम हातात घेता येणार होतं.  दार लोटून ती आत जाणार तेवढ्यात फाटकाच्या दिशेने परत येत असलेल्या प्रथमकडे तिचं लक्ष गेलं. पटकन पायर्‍या उतरत ती पुढे झाली.
"काय रे? काही राह्यलं का?"
प्रथमने तिचे दोन्ही हात हातात घेतले. त्याच्या नजरेतल्या व्याकुळपणाने तिचाच जीव घुसमटल्यासारखा झाला.
"प्रथम?" ती पुटपुटली.
"चित्रा, शक्य झालं तर मला माफ कर." झटकन मान फिरवून तो पुन्हा वळला. ती तशीच उभी राहिली. गोठल्यासारखी. हे काय नवीन? प्रथम काय म्हणाला? माफ कर? का पण? ओढणी सावरत ती फाटकाच्या दिशेने धावली. पण उशीर झाला होता. प्रथमची गाडी धुरळा उडवीत नाहीशी झाली होती. अंगातलं त्राण गेल्यागत ती मागे वळली. प्रथमच्या शब्दांचा काही केल्या अर्थ लागत नव्हता. फोन करावा? की तो येईपर्यंत वाट पाहायची? त्याचं बाहेर काही? दुसरा संसार? मूल? तिला त्याचा रागच आला. हे काय, माफ कर म्हणे. काहीतरी तुटक बोलून डोक्याला भुंगा लावून द्यायचा.

ती वेगाने प्रथमच्या खोलीत शिरली. टेबलावरचे कागद उलट सुलट करून त्यातून काही मिळतंय का शोधत राहिली. हातात येईल तो कागद पाहून ती  भिरकावून देत होती. विचारांच्या नादात खोलीत झालेला कागदांचा पसाराही तिच्या लक्षात आला नाही.  टापटिपीच्या बाबतीत काटेकोर असणारी चित्रा उन्मळून गेल्यासारखी खोलीतल्या कागदांवर स्वत:ला झोकून देत हमसून हमसून रडत राहिली. काहीवेळाने तिची तीच स्वत:ला सावरत  उठली. खोलीचं दार बंद करुन पसारा नजरेआड टाकत  दिवाणखान्यात आली. निरर्थक इकडे तिकडे पाहात राहिली. तिचं लक्ष कोपर्‍यातल्या टेबलाकडे गेलं. तिने दागिन्यांच्या नक्षीचे नमुने ठेवले होते त्यावर व्यवस्थित ठेवलेला लिफाफा उठून दिसत होता. चित्राला हसायला आलं. चित्राच्या हातात  सहजासहजी पडावा या हेतूने त्याने तिच्या कामाच्या जागी तो लिफाफा ठेवला होता. तिने मात्र त्याच्या खोलीचा नक्षाच बदलून टाकला. तिचा अंदाज खरा होता तर. प्रथमला लेखणीचा आधार घ्यावा लागला होता. म्हणजे पुढचं सारं तिला शंका आली होती तसंच? कधी लिहिलं असेल त्याने हे पत्र? माफ कर म्हणाला म्हणजे काहीतरी अस्वस्थ करणारंच असणार.  त्याची मनोवस्था जाणवली कशी नाही? तिने घाईघाईने पत्र उघडलं. उभ्या उभ्या वाचायला सुरु केलेल्या पत्रातल्या ओळी तिच्या नजरेसमोर अंधुक व्हायला लागल्या. चित्रा खुर्चीचा आधार घेत बसली. अंदाज चुकला म्हणून आनंद मानायचा की जे घडत होतं ते थांबवायचा प्रयत्न करायचा? खरंच होतं ते तिच्या हातात? तिचं तिलाच  समजेना. पण मन मात्र घडत असलेल्या, घडून गेलेल्या घटनांचा,  प्रसंगांचा आपोआप पुन्हा धांडोळा घ्यायला लागलं.

चित्रा पुस्तकात  डोकं खुपसून बसली होती. कथेतले प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहत होते. एकदम कुणीतरी पुस्तक ओढलं तसं तिने दचकून पाहिलं. प्रथम वैतागून तिच्याकडे पाहत होता.
"किती हाका मारायच्या चित्रा?"
"लक्षातच आलं नाही." ती एकदम ओशाळून म्हणाली.
"चल ना, भटकून येऊ या कुठेतरी." रविवारची दुपारची निवांत झोप काढून तो ताजातवाना झाला होता. तिला खरं तर घेतलेली गोष्ट वाचून पूर्ण करायची होती. पण तिने मोडता घातला नाही. पुस्तक बाजूला ठेवून ती उठली. स्वत:चं आवरुन प्रथम बरोबर निघाली. बाहेर पडल्या पडल्या प्रथमला कुणी ना कुणी ओळखीचं भेटत राहिलंच. चेहर्‍यावर स्मित हास्य ठेवून चित्राही प्रत्येकाबरोबर होणार्‍या त्याच्या गप्पा ऐकत होती. प्रथम गपिष्ट तर चित्रा तशी अबोलच. त्याचं धबधब्यासारखं कोसळत राहणं तिला मनापासून भावायचं, त्याच्या लोकसंग्रहाचं कौतुक वाटायचं. ती कौतुकाने त्याच्या प्रत्येकाशी होणार्‍या गप्पा कान देऊन ऐकत होती. रहदारीचा भाग काही वेळात संपून दृष्टीक्षेपात येणारा गडनदीचा पूल गप्पागोष्टींमुळे नजरेत यायला दहा पंधरा मिनिटं लागली. तो दिसायला लागल्यावर मात्र कधी एकदा पुलाच्या कठड्याला टेकतो असं होऊन गेलं चित्राला. प्रथमच्या बरोबरीने ती चालत असली तरी आता तिला त्या पुलाचीच ओढ लागली. नदीजवळच्या पुलाजवळ येऊन दोघं उभे राहिले. पुलाखालून वाहणार्‍या गडनदीच्या पाण्याकडे चित्रा पाहात राहिली. नदीच्या पाण्याचा  आणि पाठीमागून रस्त्यावरुन जाणार्‍या एखाद्या गाडीचा आवाज इतकंच काय ते संगतीला आहे असं वाटत होतं. कितीतरी वेळ ती तशीच उभी होती. प्रथमने तिच्या तंद्रीचा भंग केला,
"उभ्या देवापर्यंत जाऊ या?" वाहणार्‍या पाण्याचा खळखळाट, डाव्या हाताला वळत गेलेल्या रस्त्यावर झाडामधून नजरेला पडणारी पण झटकन नाहीशी होणारी एखादी सायकल, आणि मध्येच संध्याकाळच्या येणार्‍या प्रकाशाची तिरीप डांबरी रस्त्यावर पडून काहीतरी चकाकल्यासारखा भास हे सारं अनुभवण्यात  ती गुंग होती. प्रथमच्या शब्दांनी ती भानावर आली.
"चालेल." ती लगेच वळून चालायला लागली. प्रथमच्या हातात हात गुंफून मावळतीचा प्रकाश अनुभवत  संथपणे चालत राहिली.
"काय काय येतं नाही नजरेच्या टप्प्यात या पुलावरुन? गडनदी, हळवलला जाणारा रस्ता, आर्यादुर्गेचं देऊळ. मला आवडतं हे दृश्य पाहायला. पण पुलावरुन भरधाव वेगाने जाणार्‍या गाड्यांची भिती वाटते. फार जोरात चालवतात." तिने नुसतीच मान हलवली. प्रथमनेही गप्पा मारण्याची इच्छा आवरली आणि शांतपणे तो तिच्याबरोबरीने चालत राहिला.

गर्द झाडीच्या रस्त्यावरुन पायवाटेवरुन थोडं आत चालत गेलं की विस्तीर्ण वृक्षांच्या सावलीतला उभा देव तिला  आजूबाजूच्या वातावरणात गूढता निर्माण करणारा वाटायचा. पायाखालच्या पानांची सळसळ, लांबवरुन ऐकू येणारी एखादी हाक, नदीच्या आसपास  कपडे धुण्याचा येणारा अस्पष्ट धपधप आवाज असं सगळं कानावर झेलत दोघं तिथल्या भल्या मोठ्या शीळेवर बसले. हाताच्या अंतरावर शांतपणे  वाहणार्‍या गडनदीच्या पाण्याकडे दोघं मूकपणे पाहत राहिले.
"तुला पश्चाताप होतोय का चित्रा?" अचानक प्रथमने विचारलं. तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं.
"कशाबद्दल?"
"या आडगावात येऊन राहिल्याचा." चित्राने हसून मानेने नकार दिला.
"नक्की?" त्याने पुन्हा विचारलं.
"नाही रे. पश्चाताप कसला. तुला आवडतंय ना मग झालं तर."
"हेच, हेच मला आवडत नाही तुझं. मला आवडतं म्हणून तू करतेस का सारं?"
"नाही, असंच काही नाही."
"तू आनंदी  दिसत नाहीस. चित्रा, मला ठाऊक आहे तुला यायचं नव्हतं रत्नागिरी सोडून. माझ्यासाठी म्हणून आलीस तू. खरं ना?"
ती काहीच बोलली नाही.
"इतका त्याग, कुढेपणा बरा नव्हे चित्रा."
"अरे, काहीतरीच काय बोलतोस?"
"मन मारुन तू काही करावंस अशी माझी इच्छा नाही. मी हे पहिल्यापासून सांगतोय. पण तुझ्या मनाचा थांगच लागत नाही कधीकधी."
काही न बोलता चित्राने त्याच्या हातात हात गुंफला.
"तुझं काहीतरीच. आणि आता आलोय इथे आडबाजूला तर बसू या नं निवांत.  डोळे मिटून इथला शांतपणा अंगात अलगद झिरपू द्यावा असं वाटतंय. आपणही ह्या शांततेचा, गूढतेचा भाग व्हावा असं काहीसं." तिने त्याच्या खांद्यावर मान टेकून डोळे मिटलेच. तो ही नाईलाज झाल्यासारखा संथ वाहणार्‍या पाण्यावर नजर खिळवून बसून राहिला. एकमेकांना चिकटून बसलेल्या त्या दोघांची मनं मात्र दोन दिशेला भरकटली होती. प्रथमच्या मनात चित्राला बोलतं कसं करायचं याचा विचार चालू होता तर चित्राच्या डोळ्यासमोर कणकवलीला कायमचं यायचं ठरायच्या आधीचे दिवस तरळत होते.

त्या दिवशी कणकवलीहून तो आला संध्याकाळी. चित्राने नुकतंच काही दागिन्यांचं काम पूर्ण केलं होतं. त्यातली रंगसंगती, आकार ती पुन्हा पुन्हा निरखून पाहत होती. दुबईतल्या व्यावसायिकाला दागिने आवडले तर वर्षभर पुरेल इतकं काम हाताशी येणार होतं. ते काम तिलाच मिळेल याची तिला खात्री होती. थोडेफार बदल सुचवले तर ते करायची तयारी तिने मनात आधीच केली होती. आता फोटो काढून पाठवून द्यायचं एवढंच राहिलं होतं. प्रथम आल्या आल्या उत्साहाने ती बांगडी आणि हाराची नक्षी दाखवणार  तितक्यात घरात शिरल्या शिरल्या तोच म्हणाला.
"चित्रा, खूप दिवसांपासून मनात काही घोळतंय. तुला केव्हा वेळ असेल तेव्हा बोलूया."
"महत्वाचं आहे? त्याच्या स्वरातला गंभीरपणा  तिला जाणवला. तिने हातातले नक्षीचे कागद आणि दागिने बाजूला ठेवले.
"अगदी तसंच नाही. पण थोडी धाकधूक, शंका आहे मनात. तुझ्याशी बोलता बोलता मलाच उत्तरं सापडत जातात."
"मग बोल की आत्ताच. आहे वेळ मला. पण निदान हात पाय धू, काहीतरी खाऊन घे. यमुनाबाईंना सांगू का काहीतरी करायला?"
"नको. निघायच्या आधी खाल्लंय."
"ठीक आहे." चित्राने यमुनाबाईंना त्याचं सामान आत नेण्याची खूण केली आणि ती बसली.
"मी कणकवलीला कायमचं जायचं ठरवतोय." एक क्षणभर चित्राला तिचे कान लाल झाल्यासारखे वाटले. पण स्वत:ला सावरुन तिने विचारलं,
"असं अचानक? म्हणजे कधी ठरलं तुझं? आणि माझं काय?" तिच्या स्वरात शांतपणा असला तरी नकळत आवाज किंचित उंचावलाच. पण तिचं तिलाच  जाणवल्यासारखं ती म्हणाली,
"नाही म्हणजे शेवटी तू विचार करुनच काय ते ठरवलं असशील म्हणा."
"आबा थकलेयत. विश्वासू माणसाच्या शोधात आहेत पण मलाच वाटायला लागलंय मीच घ्यावं आता हातात काम." तिच्या चेहर्‍यावरचे भाव निरखीत प्रथम बोलत होता,
"म्हणजे कुणाचाच तसा आग्रह नाही.  अजून एखादं वर्ष रेटतील ते कारभार सुरळितपणे. पण कामं स्वीकारुन बसले आहेत.  फक्त कणकवलीतली नाही तर आजूबाजूच्या गावातली. त्यांच्यासारखं काम कुणी करत नाही अशी ख्याती आहे ना त्यांची. आपल्या दृष्टीने साध्या नावाच्या पाट्या बनवायच्या असल्या तरी त्यात कलात्मकता पाहिजेच यावर ठाम आहेत ते. खरं सांगायचं तर हातात घेतलेलं काम झेपेल की नाही या विचाराने त्यांच्या मनावरचा ताण वाढतोय असं जाणवलं मला. तसाही मी अधूनमधून मदतीला जात असतोच. मग तिथेच बस्तान हलवलं तर? माझ्याशिवाय आहे कोण त्या दोघांना? आणि मुख्यं म्हणजे तू पण त्यांना काही कल्पना देऊ शकशील."
चित्रा काही बोलली नाही. एकदा वाटलं आपल्या कामाचं कारण पुढे करावं. पण कशाला? त्याबाबतीत काय करता येईल हे तिलाही ठाऊक होतंच की. पण त्याने हे ठरवूनच टाकलं आहे की तो विचारतोय? तिच्या मनातलं कळल्यासारखं प्रथम हसला.
"मी काही ठरवलेलं नाही. पण आज परत येताना जो अस्वस्थपणा आला त्यातून मोकळं व्हायचं होतं मला. तुझं म्हणणं ऐकायचं होतं. जो निर्णय घेऊ तो दोघांनी मिळून घेतलेला असेल. मी म्हणतोय म्हणून ते झालं पाहिजे असा माझा मुळीच अट्टाहास नाही. आणि लगेच काही ठरवायचं आहे असंही नाही. तू विचार कर. मग बोलूच आपण. जे माझ्या कामाच्या बाबतीत तेच तुझ्याही. तुझं काम सुदैवाने तिथेही करु शकतेस." त्याने तिच्या केसावर थोपटल्यासारखं केलं. आतून यमुनाबाईंची ताटं वाढल्याची हाक ऐकू आली तसं दोघंही उठलेच.

नकार द्यायचा? रत्नागिरीतलं सुरळीत आयुष्य सोडून पुन्हा घडी बसवायला जायचं कणकवलीला? तो जसा त्याच्या आई वडिलांचा विचार करतोय तसा मलाही माझ्या करायला नको का? आई तर एकटी राहतेय. कधी ना कधी आपल्याकडे येऊन राहायचा विचार तिच्या मनात डोकावला तर? येईल ती कणकवलीला? का जाईल बाबांकडे? पण नाही म्हणणं इतकं खरंच सोपं आहे? त्याच्या मनात जायचं असेलच तर मग वाद, भांडणं सुरु होतील. टोक गाठलं जाईल. म्हणजे अजून पर्यंत तसं कधी झालेलं नाही. समजूतदार आहे प्रथम. पण आई, वडिलांसाठी तो हा निर्णय घेतोय आणि आपण नाही म्हणायचं? उगाचच अडवण्यात काय अर्थ? ती एकदम लहान मुलीसारखी रडायला लागली. मुंबईच्या घरातल्या एक खणी खोलीत असल्यासारखा तिचा जीव गुदमरायला लागला. त्या खोलीत वावरणारे आई, बाबा दिसायला लागले. आसपास वावरायलाच लागले ते तिच्या.

"गेंड्याचं कातडं पांघरलंय तुम्ही. किती काही बोललं तरी आपलं तेच खरं." बाबांच्या हातातलं वर्तमानपत्र खेचत आई म्हणाली.
"उत्तर दिलं नाही म्हणजे गेंड्याचं कातडं? तेच तेच ऐकून कंटाळतो म्हणून काही बोलत नाही. "
"बोलू नका हो. करुन दाखवा."
"ते दाखवतोच आहे. तुला दिसत नाही त्याला मी काय करु?" दोघांचे आवाज वाढायला लागले तसं तिथेच अभ्यास करत बसलेल्या चित्राने वहीत  जोरजोरात काहीतरी खरडायला सुरुवात केली. आईने तिच्या पाठीत  धपाटा घातला, हातातली वहीदेखील ओढली.
"चित्रा, काय हे गिरमिट करुन टाकलं आहेस. आणि किती जोर लावायचा तो. वही फाटेल." चित्रा तिथून पळालीच.  स्वयंपाकघरात जाऊन तिने पाण्याचं भांडं तोंडाला लावलं. घशाला पडलेली कोरड गेली तरी पडद्याच्या आडून ऐकू येणार्‍या आवाजांनी तिच्या काळजाचे ठोके वाढले. ओट्याच्या बाजूला कोपर्‍यात भिंतीला टेकून ती शरीराचं मुटकुळं करुन बसली. आई इतकी का चिडते? बाबा सगळं शांतपणे ऐकत राहतात. बाबा नक्की काय चुकीचं करतात म्हणून दोघांचे सारखे वाद होतात? खरं तर नेहमी आईच त्यांच्यावर चिडते. याचा अर्थ तेच चुकत असणार. आई चिडली की  तेही वाद घालतात. आई ऐकून घेत नाही हे लक्षात आलं की  दारामागच्या खुंटीवर अडकवलेला शर्ट घालून निघून जातात. आई ते दाराबाहेर पडेपर्यंत बडबड करत राहते. आताही चित्राला माहीत होतं त्याचक्रमाने सारं पार पडलं. चित्रा आई स्वयंपाकघरात कधी येईल त्याची वाटच पाहत होती. तिने आल्याआल्या  प्रश्न विचारायला सुरुवात केली.  न चिडता, आदळआपट न करता आई तिच्याकडे पाहत राहिली. रोजच्या वागण्यापेक्षा आईचं हे वागणं वेगळं होतं. ती  चित्राच्या बाजूला येऊन बसली आणि गुडघ्यात डोकं खुपसून रडायला लागली. चित्रा बावचळली. आईला रडताना ती प्रथमच पाहत होती. ती एकदम शांत झाली. मोठं होत तिने आपल्या आईला कुशीत घेतलं.
"रडू नको ना." स्वत:चे डोळे पुसत चित्रा आईला समजावीत होती. चित्राच्या केविलवाण्या चेहर्‍याकडे पाहात आईने  अश्रू रोखले. काही न बोलता ती तशीच बसून राहिली.
"तू बाबांवर का चिडतेस? मला नाही आवडत."
"माझं चिडणं डोळ्यावर येतं. त्यांचं वागणं नाही दिसत कुणाला."
"काय करतात ते?"
"पिल्लू, तू फार लहान आहेस गं. नाही समजायचं तुला आता काही."
"सांग ना."
"तुझे बाबा कोणतीही गोष्ट गंभीरपणे घेत नाहीत म्हणून चिडते मी."
"म्हणजे?"
"हे बघ, आजोबा मदत करतात आपल्याला. त्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं. तु्झे बाबा दर दोन चार वर्षांनी वेगवेगळ्या कल्पना मनात घेऊन नवीन काहीतरी व्यवसाय करायला निघतात.  एकाचवेळी दोन तीन गोष्टी. त्यासाठी पैसे गुंतवावे लागतात. धंद्यात पैसा खेळता ठेवायला लागतो हे मान्य. पण हाताशी पैसा नसताना दुसरं काहीतरी सुरु करायचं कशाला?" चित्राला काडीचंही समजलं नाही. पण तरी तिने विचारलं.
"बाबा सांगतात आजोबांकडून पैसे आणायला?"
"नाही. जाऊ दे. तुला नाही समजायचं." आईने विषय संपवला. चित्राचा  गोंधळ आणखीनच वाढला. तिने बाबा नाहीतर आजोबांनाच आईच्या म्हणण्याचा अर्थ विचारायचं ठरवलं.

पण ठरवलं तरी तसं झालं नाही. बाबा खूप उशीराच यायचे घरी. त्यात हल्ली हल्ली आणखी उशीर व्हायला लागला होता. आले की  इतके कसल्यातरी विचारात असायचे की समोर जायलाच भिती वाटायची चित्राला.  बर्‍याचदा चित्रा झोपेतून जागी व्हायची ती दोघांच्या आवाजाने.  आजही तसंच झालं. मात्र आईच्या ऐवजी बाबांच्या आवाजाने ती दचकून उठली. आणि तशीच पलंगावर बसून राहिली. पडद्याच्या आडोशातूनही बाबा काय बोलतायत ते स्पष्ट ऐकू येत होतं.
"घरी आलो की तुझं सुरु. तुझ्या करवादण्याने सतत भेदरल्यासारखी वागत असते चित्रा. मी तिच्यासाठी गप्प बसतो. "
"खरं वाटेल कुणाला." आई खिजवल्यासारखी हसली. म्हणाली,
"माझा शब्द खाली पडू देत नाही तुम्ही."
"वाटतं ते सांगायचा प्रयत्न करतो. पण तुझं चालूच राहतं. मग गप्प बसतो. पण  सततची धुसफुस, भांडणं, वाद याचा चित्रावर परिणाम होतोय ते कसं लक्षात येत नाही तुझ्या?"
"इतकी काळजी आहे तर ही वेळच येऊ न देण्याची खबरदारी का नाही घेतलीत? सगळे धडे मला."
"मी काही केलं तरी तुला समाधान मिळायला हवं ना."
"समाधान मिळेल असं कर्तुत्व गाजवा की. कुणी नको सांगितलंय."
"अगं बाई, तुझ्या या अशा बोलण्याचं सतत दडपण असतं माझ्या मनावर. दोन तीन व्यवसाय एकावेळी मी नीट सांभाळतो तरी सतत टोचून बोलतेस. बरं आपल्याला काही कमी आहे का? नाही. पण एकहाती तू मागशील तेवढी रक्कम ताबडतोब हजर करता येत नाही या एकाच मुद्यावर सतत कटकट असते तुझी. व्यवसायात पैसा फिरता राहतो हे कितीवेळा तुला सांगायचं तेच समजत नाही."
"तो फिरता पैसा पुरवावा लागतो माझ्या वडिलांना."
"मी गेलोय कधी त्यांच्याकडे मागायला? गेलोय कधी?"
"तुम्ही नसाल गेला. पण वापरता ना त्यांनी दिलेले पैसे."
"मी वापरत नाही. तुझ्याकडे असतात ते पैसे. मी घेऊ नको सांगूनही तू घेतेस. पुन्हा सांगतोय, माझ्या अंगात संसार चालवण्याची धमक आहे."
आई काही बोलली असली तरी चित्राच्या कानापर्यंत ते पोचलं नाही. पण एकदम ओरडण्याचा आणि रडण्याचाच आवाज यायला लागला. कधी नव्हे ते बाबा तारस्वरात ओरडत होते.
चित्रा घाबरुन थरथरायला लागली. तिला बाबांच्या कुशीत शिरावंसं वाटत होतं. ती जवळ असली की बाबा एकदम शांत होतात ते ठाऊक होतं तिला. पण बाबांचा इतका चढलेला आवाज ती पहिल्यांदाच ऐकत होती. ती तशीच बसून राहिली. बाजूची चादर तिने अंगावर ओढून घेतली. भिंतीला टेकून ती कानावर आदळणारे शब्द झेलत राहिली. कितीवेळ गेला कुणास ठाऊक पण आई खासकन पडदा बाजूला करुन बाहेर आली.  कपाट उघडून तिने आतल्या साड्या बाहेर फेकायला सुरुवात केली. चित्राच्या मुसमुसण्याचा आवाज कानावर पडला तसं तिच्याकडे न पाहताच आई ओरडली,
"ऊठ लगेच. आपल्याला जायचंय इथून."
"कुठे जायचंय?"
"आजोबांकडे."
"बाबा पण येतायत?"
"नाही. एकही प्रश्न विचारु नकोस आता. कृपा कर."  चित्रा बाबांच्या दिशेने धावली. बाबा खुर्चीत मान खाली घालून बसले होते. तिने त्यांच्या गळ्याला घट्ट मिठी मारली. त्यांनीही तिला आवेगाने जवळ घेतलं.
"मला नाही जायचं आजोबांकडे." ते काही न बोलता तिला थोपटत राहिले. आई पायात चप्पल घालून दारात उभी राहिली तसं बाबांनीच चित्राला खूण केली. तेही उठले.
"जाऊ नकोस. उद्या शांतपणे बोलू आपण. इतक्या रात्री आलेलं पाहून घाबरतील घरातली." आई सरळ पायर्‍या उतरायला लागली तसं बाबाच त्या दोघींबरोबर खाली आले. रिक्षा थांबवून दोघींना बसवून देत ते तिथेच उभे राहिले.
"तुम्ही उद्या मला न्यायला या बाबा. शाळा चुकवायची नाहीये मला." रिक्षा सुरु झाली तसं तिने बाहेर डोकं काढत  रडत म्हटलं. बाबांनी मान डोलावली. आईने हाताने तिला आत ओढलं आणि ते घर कायमचं सुटलं.

बाबा न्यायला येतील या आशेवर होती चित्रा. तिला वाटलं तसं बाबा आलेही दुसर्‍यादिवशी. पण तिच्याकडे लक्ष देण्याच्या मन:स्थितीत कुणीच नव्हतं. बाबा सतत आजोबांशी काहीतरी बोलत होते. आई मध्ये पडली की आवाज चढत होते. आजी मात्र तिला तिथे फिरकूच देत नव्हती.  त्या दिवशी चार पाच तास तरी असेच गेले असावेत. निघायच्या आधी बाबा तिला भेटले ते आता ती इथेच राहील, तिची शाळा बदलेल पण ते तिला भेटत राहतील हे सांगण्यापुरतं. बाबा गेल्यानंतर कितीतरी दिवस आईने रडून काढले. चित्राचंही नवीन शाळेत लक्ष लागत नव्हतं. ती शाळेतून आली की पुस्तकात डोकं खुपसून बसे. गोष्टींमध्ये जीव रमवायचा प्रयत्न करी. मनात आई, बाबांबद्दलचा राग साठत चालला होता. तो वागण्यातही डोकावायला लागला. उलट उत्तरं, निष्काळजीपणा हे नित्याचं झालं. कधी घरकोंबड्यासारखं वागायचं तर कधी शाळेतल्या वाचनालयात जितक्या उशीरापर्यंत बसता येईल तितका वेळ  तिकडेच काढायचा. वाचनालयात झालेल्या ओळखीतून बाहेर उंडारत रहायचं. विचित्र वळणावर चित्राचं आयुष्यं खेचलं गेलं.  घरातलं वातावरणही बदललं. सुरुवातीला रडून दिवस काढणारी आई, आजोबांच्या व्यवसायात मदत करायला लागली. बराचसावेळ ती तिकडेच घालवे. चित्रामधलं लक्ष काढून घेतल्यासारखं वागत असली तरी चित्राच्या सार्‍या गरजा भागवत होती ती, मागेल ते देत होती. फक्त तिचं मन जाणून घ्यायचा प्रयत्न आईकडून होत नव्हता. लेकीसाठी वेळ देता येत नव्हता. बाबा अधूनमधून उगवत. तिला घेऊन बाहेर जात. बाहेर जेवण, आइसक्रीम ती जे मागेल ते मिळे. चित्राला आत्तापर्यंत जे मिळालं नव्हतं ते विनासायास हजर होत होतं, म्हटलं तर भौतिक सुख कधी नव्हे ते आपणहून चालून येत होतं. पण अधूनमधून मिळणारा सुखाचा घास तेवढ्यापुरता आवडला तरी आई, बाबांच्या सहवासाला ती आसुसली होती. प्रत्येकवेळी बाबा सोडायला आले की तिला वाटायचं, सगळ्यांनी मिळून पहिल्या घरी जावं. पुन्हा तिथल्या शाळेत जावं, मैत्रिणींना भेटावं. पण आई, बाबा स्वतंत्ररीत्या कितीही तिला पाहिजे ते द्यायचा प्रयत्न करत असले तरी एकत्र आले की  वाद विवादाच्या फैरी झडत. आता यात आजोबांचाही समावेश झाला होता. आजी या सगळ्याला कंटाळली आणि एक दिवस नेहमीचं नाटक सुरु झाल्या झाल्या तिने चित्राला बोलावलं.
"हिच्या समोरच ठरवा काय करणार आहात पुढे. फार झाली ओढाताण तिची. इथे येऊनही वर्ष होऊन जाईल. दोन्ही डगरीवर पाय देऊन उभं राहणं दोघांनीही थांबवा." काही वेळ कुणीच काही बोललं नाही. मग बाबाच म्हणाले,
"चित्रा, तुझ्यावर अन्याय होतोय याची कल्पना आहे. माफी तरी कुठल्या शब्दांनी मागू? पण याला अंत नाही. आतापर्यंत म्हटलं तर आम्ही दोघंही प्रयत्न करत राहिलो. पण प्रेम, तडजोड यापेक्षा अहंकार वरचढ झालाय. या क्षणी माघार कुणीही घेतली तरी ती तात्पुरतीच असेल. प्रत्येक वेळच्या यातनामरणापेक्षा एकदाच सोक्षमोक्ष लागणं उत्तम. आमचे मार्ग इतके बदलले आहेत की ते पुन्हा एकत्र येतील असं वाटत नाही." बाबांचं बोलणं समजायला कठीण जात असलं तरी त्यातला अर्थ चित्राला व्यवस्थित कळला. घटस्फोट. आई - बाबा घटस्फोट घेणार. तिला रडावंसं वाटत होतं. पण घरातल्या मोठ्यांसमोर रडण्यात अपमानही वाटत होता. ती बाबांच्या नजरेला नजर देत तशीच बसून राहिली. आईने काही न बोलता चित्राचा हात हातात धरला. चित्राने तो झिडकारलाच. धावत ती आजीच्या खोलीत शिरली. धाडकन पलंगावर अंग टाकून रडत राहिली. पाठीवर फिरत असलेल्या हातानेच आजी खोलीत आल्याचं तिला कळलं. हळूहळू ती शांत झाली.
"वेगळे होणार का गं आई बाबा?"
"तेच या परिस्थितीत योग्यं नाही का चित्रा? वर्षभर वाट पाहिली. पण काही बदलेल असं वाटत नाही. घरी तेच इथे येऊनही तेच. कुणालाच सुख नाही."
"आजी, माझ्या संसारात मी नाही असं वागणार. ही वेळच येऊ देणार नाही. का असं वागतात गं दोघं? माझं चुकलं की ओरडायचे, मला फटके मिळायचे लहान असताना. ठाऊक आहे ना?"
"हो."
"मला पण दोघांवर आरडाओरडा करावंसं वाटतंय. फटकावून काढलं पाहिजे दोघांनाही."
"चित्रा..." आजीच्या स्वरातला कठोरपणा जाणवला तशी चित्रा गप्प झाली.
"कुणाचं आणि काय चुकलं, चुकतंय ही चर्चा निरर्थक आहे. टाळी एका हाताने वाजत नाही हेच खरं. पण यातून सर्वांनाच मार्ग काढायचा आहे. तुझी आई, आजोबांना मदत करेल. तिला आता स्वत:च्या पायावर उभं राहणं जितकं गरजेचं आहे तितकीच आवश्यकता तुझं वागणं बदलण्याची आहे चित्रा."
"मी काय केलं? चुकतंय ते त्या दोघाचं."
"त्यांच्या चुकीची शिक्षा तू त्यांना भरकटल्यासारखं वागूनच द्यायला हवी असं आहे का?"
"पण मी..."
"लहान नाहीस तू आता. तुला चांगलं कळतंय मला काय म्हणायचं आहे ते." चित्रा काही न बोलता बसून राहिली. आजी उठून पुन्हा बाहेर निघून गेली. पण नाकारायचं म्हटलं तरी आजीचं बोलणं तिला पटत होतं. निदान स्वत:च्या आयुष्याचा ताबा तिने स्वत:च घ्यायला पाहिजे होता. पण म्हणजे काय करायचं? ती जास्तीत जास्त आजीच्या आसपास घालवायला प्रयत्नपूर्वक शिकली.  विस्कटलेली घडी  सुरळीत व्हायला चार पाच वर्ष लागली. प्रत्येकाची दिशा वेगळी असली तरी निदान मार्ग हाती गवसले होते. इथपर्यंत पोचेतो सर्वांनीच बरंच काही गमावलं होतं त्यामुळे आता हातातून काही निसटू न देण्याची खबरदारी मन आपोआप घ्यायला शिकलं होतं. आजीच्या पंखाखाली चित्राला सुरक्षित वाटत असतानाच अचानक आजी गेली. काहीही हासभास नसताना गेलेल्या आजीचं जाणं चित्राला पचवणं फार जड गेलं. पण जाता जाता आजीने विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवून दिली होती. चित्राही प्रयत्नांची पराकाष्ठा करुन ती घडी आता विसकटू देणार नव्हती. बाबा अधूनमधून घरी येत राहिले. आले की आजोबांशी बोलत बसायचे. आईच्या स्वतंत्र बाण्याचं कौतुक करायचे. थकल्या डोळ्यांनी आजोबाही बाबांच्या यशाचं कौतुक करायचे. आई फारशी बोलत नसली तरी बाबा आले की तिचा चेहरा खुलायचा. गुण दिसायला, कर्तुत्व पटायला खरंच लांब जावं लागतं एकमेकांपासून? चित्राच्या घराबाबतीत तरी निदान तसं झालं होतं. पाहताना चित्राला वाटायचं, आजी हवी होती. खूश झाली असती. हल्ली हल्ली तर तिला वाटायला लागलं होतं आई, बाबांनी पुन्हा एकत्र यावं. नाहीतरी आता किती छान जमतं दोघांचं. मनातला विचार ओठावर येईतो आजोबांनी आजीच्या वाटेवर पाऊल टाकलं.  आता तर चित्राला आईला बाबांच्या आधाराची खरी गरज आहे असं प्रखरतेने वाटत होतं. शेवटी एकदा धाडस करुन तिने विषय काढला.
"बाबा, आता तुम्ही इकडेच का राहत नाही? आईला मदत हवीच आहे तिच्या कामात." आईने आश्चर्याने चित्राकडे पाहिलं.
"अगं काय बोलतेयस तू चित्रा? तुझ्या बाबांना वाटेल मीच बोलले हे तुझ्याशी. कुठून हे वेड घेतलंस?"
"वेड? नाही गं. मला तीव्रपणे वाटलं तेच करतेय. आई, मला तुम्ही दोघंही हवे आहात गं. आता काही मी लहान नाही. लवकरच शिक्षणही संपेल माझं. जुने दिवस आठवते तेव्हा तुमच्या दोघांचं वागणं, माझं तुमच्याबरोबर बदलत गेलेलं नातं हे जसं लक्षात येतं तसं त्यावेळची तुमची मन:स्थिती,  तुमच्या दोघांची ओढाताण हे मला आता कळतं.  बाबांच्या मनातलं कायमचं एक अपराधीपण आणि तुझं सततचं वैतागलेपण. कोण बरोबर, कोण चुक याचा हिशोब या नात्यात नाहीच करता येत. तुम्ही वेगळं व्हायचं ठरवलंत त्याची नक्की कारणं माहीत नसली तरी अंदाज आहे मला. दोघांची बाजूही आता समजू शकते मी.  नात्याचा ताण तुम्हाला झेपला नाही हेच खरं. घटस्फोट झाल्यावर, दूर गेल्यावर कसं सगळं सुरळीत झालंय. तुमचं तुम्हालाही हे जाणवलं असेलच ना? तुमच्या दोघांच्या वागण्याची झळ मला लागत होतीच, तुम्हालाही ते समजत असणारच. बाबा, तुम्ही माझ्या वाट्टेल त्या मागण्या पूर्ण करायचात ते त्यावेळेस आवडायचं मला.  आई, तुला वेळ द्यायची इच्छा असूनही जमायचं नाही आणि त्यामुळे आणखीनच चिडचिड व्हायची तुझी. त्या त्या वेळेस राग यायचा पण आता तुम्ही एकमेकांना समजून घेताना दिसता ना, तेव्हा सगळं विसरुन जावंसं वाटतंय. आणि  आई, मी इथून गेले की तू अगदी एकटी पडशील गं." चित्रा आईकडे पाणावलेल्या डोळ्यांनी पाहात राहिली. पोटच्या मुलीमध्ये आलेलं प्रौढपण पाहता पाहता आईच्या चेहर्‍यावर हसू उमटलं,
"तुझं तू जमवलं आहेस का कुठे? ते सांगण्यासाठी हा मार्ग?" चित्रा गडबडीने म्हणाली.
"नाही गं. म्हणजे ते ही सांगायचं आहेच. पण आत्ता जे बोलले नं मी ते खरंच आतून आतून जाणवलेलं मला. आजी, आजोबा गेल्यानंतर तुमच्यातला सुसंवाद जाणवतो, आवडतो मला म्हणून मी मागे लागले आहे."
"बरं, बरं, आता मुद्यावर या." बाबा हसून म्हणाले.
" हो, प्रथमशी तुमची भेट कधी घालून देऊ ते दोघांनी सांगा मला." चित्रा पुटपुटली.
"हं, आता खरं बाहेर पडलं. चित्रा, प्रथमला भेटूच आम्ही. पण आमचं दोघाचं पुन्हा एकत्र येणं अशक्य आहे बेटा. आहे तेच चालू राहणं योग्यं. आता तुझी आई काय, मी काय पुन्हा लग्न करु असं वाटत नाही. पण तुटलेला संसार, मनं  सांधताना जी कसरत करावी लागते त्याची तयारी नाही माझी. तुझी आई आता माझी मैत्रीण आहे. ती तशीच राहू दे. त्यातच जास्त सुख आहे. हे माझं मत. तुझ्या आईला काय वाटतं ते नाही ठाऊक मला."
"अगदी तेच म्हणणं आहे माझं." दुजोरा देत आई म्हणाली.
"आता पुन्हा हा विषय नको. प्रथमला केव्हा आणते आहेस भेटायला? त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल आम्हाला." प्रथमचं नाव काढल्यानंतर चित्रा त्या दोघांची झालेली भेट, त्याच्या घरची मंडळी या बद्दल बोलण्यात रंगून गेली.

प्रथमला चित्रा घरी घेऊन आली आणि तो मग येतच राहिला. शिक्षण पूर्ण होऊन, स्वत:च्या पायावर उभं राहिल्यावर लग्न होईतो मध्ये तीन चार वर्ष गेली. लग्न झाल्यावर मुंबई सोडून रत्नागिरीला जायचं आहे हे ठाऊक असूनही प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा चित्रा थोडीशी भांबावली पण वाटलं तितकं रत्नागिरीत स्थिर होणं जड गेलं नाही. रत्नागिरीला येऊन दोन वर्ष झाली आणि प्रथमने कणकवलीला स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. अर्थात तिच्याच संमतीने. कणकवलीला येऊनही वर्ष झालं होतं. प्रथमच्या आई, बाबांनी त्या दोघांचा संसार स्वतंत्र राहिल याची काळजी घेतली होती. गावातच पण वेगळा संसार होता दोघांचा. असं सगळं सुरळीत चालू आहे असं वाटत असतानाच प्रथमने असं का करावं? लाल झालेले डोळे चोळत ती त्याने लिहिलेलं पत्र पुन्हा वाचायला लागली.

प्रिय चित्रा,
गेलं वर्षभर मी झगडतोय. नक्की काय करावं ते समजत नाही. तुझ्याशी बोलायचं धाडस नाही म्हणून हे पत्र. पत्र लेखन बरं असतं. एकतर्फी असतं. मनातलं सारं लिहिता येतं.  चेहर्‍यावरचे भाव निरखीत शब्द बदलावे लागत नाहीत. जे शब्द मी अनेकदा ओठावर येऊनही गिळून टाकले ते इथे लिहितोय. लिहिताना तुझा चेहरा समोर येतोय. तुला माझ्या शब्दांमुळे किती धक्का बसेल याची कल्पनाही करवत नाही. पण मला वाटत नाही आपलं जमेल.  मला कल्पना आहे मी किती दुखावतोय तुला. जे आपल्या दोघांच्या बाबतीत कधीही होऊ नये याची तू आपल्या संसारात दक्षता घेत आलीस त्याच परिस्थितीत मी तुला ढकलतोय. मला ठाऊक आहे, तुझ्या आई वडिलांचा घटस्फोट झाला त्या वाटेवर कधीही पाऊल टाकायचं नाही असा तुझा निर्धार आहे पण त्या निर्धाराचं सावट  आपल्या संसारावर पडतंय हे लक्षातच आलं नाही तुझ्या. खूप प्रयत्न केला मी. पण आहे या परिस्थितीत बदल होईल असं वाटत नाही. तू स्वत:ला हरवून बसली आहेस चित्रा. म्हणजे तसं सगळं छान आहे.  पण जिथे मतभिन्नतेचा प्रश्न येतो तिथे सारं बदलतं. मतभेद होताच कामा नयेत याची काळजी घेण्याचा तुझा खटाटोप असतो. विचार करतो तेव्हा वाटतं, तुझ्या आई, वडिलांच्या सततच्या वाद विवादाला कंटाळली होतीस तू. त्याचाच हा परिणाम असेल का? म्हणजे तसं तू कधी सांगितलं नाहीस त्यामुळे कदाचित ठरवून नसेलही होत तुझ्याकडून पण वाद टाळतेस तू हे अगदी स्पष्ट जाणवतं. एक दोन वेळा मी विचारलंही तुला कारणांबद्दल. पण धड उत्तर नाही देता आलं तुला. कुठल्याही निर्णय प्रक्रियेत मला तुझा सहभाग हवाय. नुसतं हो ला हो नको चित्रा.  आपण एकमेकांचे जोडीदार आहोत. तू माझी गुलाम नाहीस. लग्न झालं म्हणून प्रत्येक गोष्टीला मान तुकवलीच पाहिजे असं कुणी सांगितलं तुला? गेल्या दोन वर्षात एकही गोष्ट मला आठवत नाही ज्याला तू विरोध केलायस. तुझ्या डोळ्यात नाराजी उमटते पण ती तू शब्दात व्यक्त होऊ देत नाहीस. असं का? मी नाना तर्‍हेने हे तुझ्यापाशी खरं तर बोललोय. कितीतरी वेळा अगदी सष्टपणे. असं वागू नकोस म्हणून बजावलं आहे, समजावलं आहे. जर माझं ऐकायचं असंच ठरवलं आहेस तर मग हे का ऐकत नाहीस? भांड ना कडकडून माझ्याशी. आवडेल मला. कितीतरी वेळा तू वाद घालावास म्हणून मी निरर्थक विधानं केली पण आपल्या दोघांमध्ये वादाला जागाच द्यायची नाहीस हे तुझ्या मनात पक्कं ठसलेलं आहे. चुकीचं आहे ते. सांगून सांगून थकलो मी आता. दोन माणसं एकत्र आली की  तडजोड करावी लागतेच पण त्यालाही मर्यादा असते. अस्तित्व हरवून गेलेली कळसूत्री बाहुली नकोय मला चित्रा. हाडामांसाचं माणूस हवंय. चिडणारं, रडणारं, हट्ट करणारं, वेळ प्रसंगी कान उपटणारं. आणि नेमकं तेच या लग्नाने मी हरवून बसलोय आणि म्हणूनच चित्रा, मला वेगळं व्हायचंय. मला घटस्फोट हवाय.

चित्राने हातातल्या कागदाचा बोळा केला. रडत रडत ती ओट्याच्या बाजूला कोपर्‍यात  गुडघ्यात डोकं घालून बसली. मुंबईच्या घरातल्या एक खणी खोलीत असल्यासारखा तिचा जीव गुदमरायला लागला. चुरगळलेल्या कागदाचा बोळा तिने थरथरत्या हाताने पुन्हा उघडला. ज्या शब्दाला आयुष्यात कधीच थारा नाही असा विश्वास होता चित्राला तोच शब्द तिच्या डोळ्यासमोर पुन्हा नाचत होता, प्रथमचा पत्रातून उतरलेला आवाज पुन्हा पुन्हा कानावर आदळत होता. घटस्फोट. मला घटस्फोट हवाय!

Saturday, March 26, 2016

जग

मुलाने कागद पुढे केला. चित्र विचित्र नावं पाहून मी बुचकळ्यात पडले.
"ही तुझ्या मित्रमैत्रींणीची नावं आहेत का?" कुठली अज्ञानी आई आपल्या पदरात पडली अशा नजरेने त्याने माझ्याकडे पाहिलं आणि काय नावं ही हल्लीच्या मुलांची अशा नजरेने मी त्याच्याकडे.
"जिबुटी, पापुआ न्यू गुनिआ,  नाउरु... अरे हे सगळे मित्र मैत्रीणी येणार आहेत का तुझ्याबरोबर जग प्रवासाला?" त्याचे गरागरा फिरणारे डोळे तो थांबवेना. त्यामुळे मी विषय विसरुन म्हटलं,
"थोबाडीत देईन आता असे डोळे फिरवलेस तर." त्याने डोळे फिरवणं थांबवलं आणि गुरगुरत विचारलं.
"तुम्ही तुमच्या आई - वडिलांवर भडकलात की डोळे फिरवत नव्हता?"
"पुटपुटायचो." लगेच नवर्‍याने  तोंड खुपसलं. ह्याला बाई एक वेळेवर खोटं म्हणून बोलता येत नाही. पटकन बाजू लढवत मी म्हटलं.
"आमची नव्हती हिंमत. आणि आम्ही फिरवले असते तर त्यांनी कायमचे ते फिरवूनच ठेवले असते." त्याला फार काही कळलं नसावं.
"मग काय करायचात?"
"आम्ही तुमच्यासारखे चक्रम नव्हतो. त्यामुळे तशी वेळच आली नाही कधी."
"आम्ही म्हणजे कोण?" तो गोंधळला.
"मी."
"मग तू तुला ’आम्ही’ का म्हणतेस?" तू तर सांगितलं होतंस राजे- महाराजे, पेशवे असं करायचे.
"माझ्या अख्ख्या पिढीची बाजू मांडताना मी स्वत:ला आदरार्थी संबोधते." पुन्हा एकदा त्याच्या सगळं डोक्यावरुन गेलं असावं. पण हल्ली तो फार वेळ जातो म्हणून प्रत्येक शब्दाचा अर्थ विचारत नाही. सारांश शोधून काढतो.
"हो का?" त्याच्या त्या हो का तून तो काहीही ऐकत नव्हता हे मला कळलं. पण आता मलाही त्या विचित्र नावांच्या मुलामुलींमध्ये रस जास्त होता. पोरगा नक्की कुणाबरोबर उंडारतो हे तर कळायला हवं ना."
"ते जाऊ दे. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस." मी विषय पुन्हा योग्यं ठीकाणी वळवला. काहीतरी गौप्यस्फोट करणार असल्यासारखं त्याने घरातल्या इन मिन तीन माणसांकडे पाहिलं आणि दवंडी पिटवल्यागत ओरडला,
"ती देशांऽऽऽऽची नावं आहेत." माझा चेहरा इमोजी मधल्यासारखा भयानक, आश्चर्यचकित वगैरे  झाला.  तेवढ्यात त्याने विचारलं.
"तुला जिओग्राफी विषय नव्हता का शाळेत?" मुलगी ओरडली.
"अरे, भूगोल म्हण. नाहीतर आईचं पुन्हा सुरु होईल." नुकतीच होळी झाली होती पण दोघांच्या मानगुटीला धरुन त्यांना रंगीत पाण्यात बुचकळून काढावसं वाटलं.
"भूगोल विषय नव्हता तुला?" त्याने बहिणीचं मुकाट ऐकलं.
"शिक्षक चांगले नव्हते आमचे."
"तू पुन्हा तुझ्या अख्ख्या पिढीबद्दल बोलतेयस का? " ऐकत होता म्हणजे कार्टा आधी.
"हो. हे बघ आम्हाला त्यांनी सांगितलेले देश आम्ही पाठ केले होते. भूगोलात पहिली येत होते मी शाळेत." दोन्ही मुलं पोट धरुन हसायला लागली. त्यात इतका वेळ बर्‍यापैंकी तटस्थाची भूमिका घेतलेला नवराही शिरला.
"आईचं ना नाचता येईना अंगण वाकडं झालंय." खाऊ का गिळू नजरेने मी मुलीकडे पाहिलं. ही एक  मराठीच्या वर्गात बसते आणि मी शिकवलेल्या म्हणी माझ्यावरच वापरते.
"आणि तरी ती तू केलेल्या पोळ्यांना भूगोल झालाय असं म्हणते." तिघांनी एकमेकांना उत्स्फुर्तपणे जोरदार टाळ्या  दिल्या.  मी मात्र तिघांकडे बघून डोळे गरागरा फिरवले.

Saturday, March 19, 2016

जाडी

शाळेच्या मित्रमैत्रींणींची whatsapp वर चर्चा रंगली होती. शाळेत असताना कोण कसं जाड होतं आता कश्या शेटाण्या झाल्या आहेत अशा अर्थी. यात एकमेकींची वजनावरुन खिल्ली उडविणार्‍या मुलीच जास्त होत्या. अर्थात शाळेत अमकी तमकी कशी धष्टपुष्ट होती असं म्हणणारे मुलगेही होते. मला मात्र राहून राहून ज्यांच्या वजनावरुन ह्या गप्पा चालल्या आहेत त्यांना काय वाटत असेल असं वाटत होतं. हे आत्ता घडलेलं ताजं उदाहरण. पण आजूबाजूला सतत तेच दिसतं आणि अस्वस्थ व्हायला होतं. मध्ये  एकदा रेल्वेत आमच्यासमोर एक जोडपं बसलं होतं. पती  पत्नीची चेष्टामस्करी करत होता. त्याच्या मुलांना तो म्हणाला,
"तुमची आई म्हशीसारखी सुटली आहे." मी चमकून पाहिलं. पण त्या पुरुषाची मुलं आणि बायको सर्वांनाच ह्या शेर्‍यामध्ये विनोद जाणवला. सगळेच हास्यात बुडाले होते.

आपल्याकडे जाडीवरुन विनोद सर्रास केले जातात आणि मला ते नेहमी खटकतात. कधी कधी वाटतं असं वाटणारी मीच एकटी आहे. पण अशा विनोदामुळे
⦁ ती व्यक्ती बारीक होण्याच्या प्रयत्नात असेल तर अशा वक्तव्यांनी निराश होईल किंवा
⦁तिची/त्याची अंगकाठीच तशी असेल. बारीक असण्यापेक्षाही आरोग्यं संपन्न असणं जास्त महत्वाचं नाही का?
⦁आणि मुख्य म्हणजे तिच्या किंवा त्याच्या बारीक असण्याची तुम्हाला का चिंता? पाहून घेतील ना त्यांचं ते. अशा क्रुर विनोदातून विरंगुळा शोधणारी माणसं  संवेदना शून्य वाटतात मला. तुम्हाला काय वाटतं की तुम्हीही त्याच जातीतले?

Sunday, February 28, 2016

सुपरबोल

(सुपरबोल. दरवर्षी हा खेळ खेळाइतकाच किंबहुना खेळापेक्षा इतर कारणांनीही गाजतो. गेल्या आठवड्यात रविवारी खेळला गेलेला सुपरबोलही याला अपवाद नाही. सुपरबोलचं हे ५० वं वर्ष. मध्यांतरातील कार्यक्रमासाठी गायलेली बियॉन्से या वेळेला वादाच्या भोवर्‍यात अडकली आहे.)

फूटबॉल या खेळाच्या विजेतेपदासाठी दरवर्षी होणारी चुरस म्हणजे सुपरबोल. राष्ट्रीय फूटबॉल संघटनेत (NFL) असलेले ३२ संघ दोन गटात विभागलेले आहेत. ते राष्ट्रीय  फूटबॉल संघ (NFC) आणि अमेरिकन फूटबॉल संघ (AFC) या नावाने ओळखले जातात. दरवर्षी सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात हे संघ सुपरबोलपर्यंत पोचण्यासाठी खेळतात. आणि फ्रेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी अंतिम फेरीपर्यंत पोचलेले दोन संघ विजेतेपदासाठी लढतात.  फेब्रुवारी महिन्याचा  पहिला रविवार ’सुपरबोल सन्डे’ म्हणूनच ओळखला जातो. या ७ फेब्रुवारीला लढत होती कॅरोलायना पॅंन्थर आणि डेनवर ब्रॉन्को या दोन संघामध्ये.

हा खेळ जितका खेळासाठी प्रसिद्ध आहे तितकाच अनेक कारणांसाठी. काहींना खेळाची आवड म्हणून तर काहीजण केवळ जाहिरातीसाठी सुपरबोल पाहतात. मध्यांतरात होणार्‍या कार्यक्रमाचं आकर्षण असणारा वर्गही खूप मोठा आहे. मायकल जॅक्सन, मॅडोना, व्हीटनी ह्युस्टन अशा एकाहून एक नामवंत कलाकारांनी या वेळेला आपले कार्यक्रम सादर केले आहेत.

या वेळेला होते ब्रुनो मार्स, कोल्डप्ले आणि पॉपसिंगर बियॉन्से. बियॉन्से आणि तिच्या सहकारी नर्तिकानी घातलेल्या पोशाखावरून, गाण्यातील शब्दांवरुन सध्या हवा तापलेली आहे. आफ्रिकन - अमेरिकन नागरिकांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लढ्यातील  एक चळवळ म्हणजे ब्लॅक पॅन्थर्स चळवळ. बियॉन्से आणि सहकारी नर्तिकांचा काळ्य़ा रंगाचा पेहराव आणि टोपी या दोन्ही गोष्टी त्या चळवळीतील कार्यकर्त्यांसारख्या होत्या,  नृत्यातून मालकम एक्स या मानवी हक्कासाठी जागरुक असलेल्या आफ्रिकन - अमेरिकन नेत्याबद्दलचा आदर साकारला, तसंच नृत्यातील  मुठी वळवून उंचावलेले हात म्हणजे ’ब्लॅक पॉवर सॅल्यूट’ ची आठवण करुन देण्याचा प्रयत्न होता. १९६८ च्या ऑलिम्पिकमध्ये पदक वितरणाच्या वेळेला  अमेरिकन राष्ट्रगीत सुरु झाल्यावर आफ्रिकन - अमेरिकन विजेत्यांनी मुठी उंचावल्या होत्या तशाच या नृत्यात वापरल्या गेल्या.  बियॉन्सेने सादर केलेल्या नृत्यानंतर चालू झालेल्या या चर्चेत भर पडली ती सुपरबोलच्या आधी म्हणजे शनिवारी बियॉन्सेने तिच्या चाहत्यांसाठी उपलब्ध करुन दिलेल्या  ’फॉरमेशन’  हे शीर्षक असलेल्या गाण्याने. या गाण्यातून  आफ्रिकन - अमेरिकन लोकांवर पोलिसांकडून केले जाणारे अत्याचार थांबवावे असं सुचविण्यात आलं आहे. ते दाखविताना एक छोटा मुलगा रस्त्यावर पोलिसांच्या समोर हाताने थांबण्याची खूण करत उभा आहे असं दाखविलं आहे आणि पोलिसांच्या मागे असलेल्या भिंतीवर ’स्टॉप शूटिंग अॲट अस’ हे वाक्य दिसतं. गाण्यात, पाण्यात बुडणार्‍या पोलिसांच्या गाडीवर बियॉन्से बसलेली दिसते.  या गाण्यातून बियॉन्सेने पोलिसांची प्रतिमा  धुळीला मिळवली असा तिच्यावर आरोप होत आहे. जे पोलिस तिला, जनतेला संरक्षण देतात त्यांची बदनामी अशारितीने करुन बियॉन्सेने काय साधलं असं लोकांना वाटतं.  वर्णभेदाविरुद्ध विरोध दर्शविण्याची सुपरबोल ही योग्यं जागा नाही या मताच्या लोकांनी राष्ट्रीय फूटबॉल संघटनेच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचं निश्चित केलं आहे.

या आधी सुपरबोलच्या इतिहासात गाजलेला प्रसंग म्हणजे  जॅनेट जॅकसन आणि जस्टीन टिंम्बरलेक यांच्या गाण्याच्या वेळेला घडलेली घटना. जस्टीन टिंम्बरलेकच्या हातून ’रॉक युवर बॉडी’ गाणं म्हणताना जॅनेटने घातलेलं जॅकेट चुकून ओढलं गेलं, फाटलं आणि त्यामुळे वक्षस्थळ उघडं पडलं. लाखो लोकांनी हा प्रसंग दूरदर्शनवर पाहिला. वार्डरोब मालफंक्शन म्हणून कुप्रसिद्ध झालेला हा किस्सा कितीतरी महिने वादळ उठवणारा ठरला किंबहुना सुपरबोल म्हटलं की प्रथम या प्रसंगाचीच आठवण आज १२ वर्ष होऊन गेली तरी लोकांच्या मनात ताजी होते. या प्रसंगाची परिणिती म्हणून कोणत्याही कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण बंदच झालं. असे अनपेक्षित लाजिरवाणे प्रसंग टाळण्यासाठी  थेट प्रक्षेपण म्हणून जे आपण पाहतो ते काही क्षणानंतर दाखविलेलं दृश्य असतं. हा प्रसंग ज्यांनी दूरदर्शनवर पाहिला नाही त्यापैकी एक होते जावेद करीम. २००४ साली तो प्रसंग पुन्हा पाहण्यासाठी काही मार्गच नव्हता. आणि नक्की काय घडलं याचं कुतूहल असलेल्या जावेद आणि त्यांचे मित्र स्टीव्ह आणि चॅड यांच्या मनात लोकं स्वत:च चित्रीकरण अपलोड करु शकतील असं संकेतस्थळ निर्माण करण्याची कल्पना आली. या कल्पनेचं मूर्त्य रुप म्हणजेच यु ट्युब. एकाच प्रसंगाने प्रसारमाध्यमामध्ये घडलेले हे २ मोठे बदल!

 सुपरबोल जसा अशा घटनांनी गाजतो तितकाच तो प्रसिद्ध आहे जाहिरातींमुळे. सुपरबोल प्रक्षेपणाच्या दरम्यान  जाहीरात झळकण्यासाठी कंपन्यांना ३० सेकंदांसाठी जवळजवळ ३० लाख डॉलर्स मोजावे लागतात. ’ क्रॅश द सुपरबोल’ अशी स्पर्धाही फ्रिटो ले ही चिप्स उत्पादक कंपनी घेते. २०१६ हे या स्पर्धेचं शेवटचं वर्ष होतं. डोरीटो चिप्सच्या जाहीरात स्पर्धेत हातात कॅमेरा आणि कल्पना असलेल्या कुणालाही भाग घेता येत होता. शेवटच्या वर्षात कंपनीने विजेत्याला हॉलिवूडमध्ये प्रवेश मिळवून देण्याचीही जबाबदारी उचलली आहे. २००६ पासून सुरु झालेल्या या स्पर्धेत २०१३ पासून जभभरातून  कुणीही भाग घेऊ शकत होतं.  आलेल्या जाहिरातीतील कमीत कमी १ जाहिरात या खेळादरम्यान दाखविण्य़ाची हमी कंपनीची. त्याव्यतिरिक्त युएसए टुडे च्या सर्वेक्षणात सर्वात जास्त गुण मिळालेल्या जाहिरातीला ४ लाख ते १० लाख डॉलर्सचं बक्षीसही कंपनीकडून मिळत होतं. या अखेरच्या वर्षी ४५०० स्पर्धकांनी यात भाग घेतला. त्यातील ५० स्पर्धकांनी उपांन्त्यपूर्व फेरी गाठली. उपांन्त्यफेरीतील ३ स्पर्धकांपैकी विजेती ठरली ती ’डोरीटोज डॉग्ज’ जाहीरात. ३ कुत्र्यांना डोरिटो चिप्स खायची इच्छा असते आणि ती ते कशी पुरी करतात ते विनोदीपद्धतीने दाखवलेली ही जाहिरात. अवघ्या १००० डॉलर्समध्ये पूर्ण झालेल्या जाहीरीतीने जेकब चेसला हॉलिवूड मध्ये प्रवेश तर मिळालाच पण त्याचबरोबर १० लाख डॉलर्सही.

युएसए टुडे च्या सर्वेक्षणानुसार व्यावसायिक जाहिरातींमध्ये या वर्षी हंडे कंपनीने बाजी मारली. गाडी आणि गाडीतील अत्याधुनिक यंत्रणेची जाहिरात करणार्‍या  जाहीरातीत मुलगी तिच्या मित्राबरोबर पहिल्यांदाच बाहेर जात आहे. वडील आग्रहाने नवीन हंडे गाडीची किल्ली मुलाच्या स्वाधीन करतात. गाडीमधील ’कार फाईंडर’ मुळे गाडी कुठे आहे ते वडिलांना कळत राहतं आणि त्या त्या ठिकाणी  ते पोचतात, दोघांना ’एकांत’ मिळूच देत नाहीत अशी ही जाहिरात. मुलगा कंटाळून थोड्याच वेळात मुलीला घरी सोडतो. आणि बाबा मुलीला विचारतात, ’मग काय केलं तुम्ही आज?’ आणि जाहिरातीचा शेवट होतो - ’बिकॉज डॅड गोट  डू व्हॉट डॅड गोट टू डू’ या वाक्याने. सुपरबोल मध्ये दाखविल्या गेलेल्या जाहिरातीत विनोद, प्राणी आणि सेलिब्रेटी ह्या ३ गोष्टींचा वापर प्रामुख्याने केलेला होता.

सुपरबोल म्हटलं की जाहिराती, वादग्रस्त घटना जितक्या महत्त्वाच्या तितकेच प्राणीही. दरवर्षी प्राणीही ही स्पर्धा कोण जिंकेल याचा अंदाज वर्तवायला पुढे सरसावतात. एका प्राणी संग्रहालयातील माकडांनी म्हणे त्यांच्यासमोर ठेवलेल्या चिठ्ठ्यांतून कॅरोलायना पॅन्थर लिहिलेला कागद उचलला तर दुसर्‍या प्राणिसंग्रहालयात कासवं संथगतीने मार्गक्रमणा करत ब्रान्को पर्यंत पोचली.  टेडी बेअर नावाच्या साळूचे  फेसबुकवर ४५००० चाहते आहेत तर यु ट्यूबवर २४००० अनुयायी. साळूचे आत्तापर्यंत ४ पैकी ३ अंदाज अचूक ठरले. यावेळीही डेनवर ब्रान्को जिंकतील हा साळूचा अंदाज खरा झाला.

या सगळ्यात सर्वसामान्यांनी तरी का बरं मागे राहावं? पैजा मारण्याची चढाओढ सुपरबोलच्या वेळी खेळात रंगत भरते. कुठला संघ जिंकेल यावरच पैजा मारण्याइतके लोक अल्पसंतुष्ट नाहीत. या वर्षी सुपरबोल होता कॅलिफोर्नियामध्ये. तिथे भूकंप होईल का, बियॉन्से कार्यक्रम सादर करेल तेव्हा कोणत्या रंगाच्या चपला घालेल, खेळ दूरदर्शनवर दाखविला जात असताना शहराला अभिमान असलेला असलेला गोल्डन गेट पूल कितीवेळा दाखवला जाईल, पेटन मॅनिंग निवृत्ती जाहीर करेल का, केली तर ते सांगताना त्याच्या डोळ्यात अश्रू तरळतील का असे  प्रश्न घेऊन एकापेक्षा एक पैजा मारल्या गेल्या. या पैजांमुळे काही काही वेळा कंटाळवाणा होऊ लागलेल्या खेळातही रंगत यायला लागते. तसंही कुणाच्या मनोरंजनाची काय साधनं असतील हे ज्याचं त्यानेच तर ठरवायचं.

आता राहता राहिले खेळाडू. कोणत्याही गोष्टीत यश मिळविण्यासाठी प्रत्येकाकडे ’लाभदायक’ म्हणून काहीतरी गोष्ट असतेच. दोन्ही संघातील खेळाडू याला अपवाद नाहीत. कुणी काळ्या रंगाचे बूट घालतं तर कुणी खेळताना च्युईंगम चघळतं, ते कडक राहिलं तर आपण जिंकणार अशी त्या खेळाडूला खात्री वाटते.

एक ना अनेक... सुपरबोल आणि त्याचे हे असे भन्नाट किस्से! आता काही काळ बियॉन्से प्रकरण चघळायचं आणि नंतर वाट पाहायची ती पुढच्या वर्षीच्या सुपरबोलची. का? अर्थात या सार्‍याच कारणांकरिता...

मोहना प्रुभुदेसाई - जोगळेकर
mohanajoglekar@gmail.com


Monday, February 15, 2016

यु ट्युब

आतापर्यंत आम्ही केलेल्या एकांकिकापैंकी काहींची छोटीशी झलक -  खेळ, महाभारताचे उत्तर - रामायण, भिंत, सांगायचं राहिलंच, वेषांतर, भेषांतर.














आणि इथे एकांकिकांची माहिती

Tuesday, February 9, 2016

ट्रम्प नावाचं बेफाम वादळ

राजकारणावर तज्ञ व्यक्ती अभ्यासपूर्ण लिहितात, बोलतात तसंच  सर्वसामान्यही या विषयावर जिव्हाळ्याने,
हिरीहिरीने मत प्रदर्शित करतात. बहुतांशी सर्वांचं  राजकारणाबद्दल स्वतंत्र आणि ठाम मत असतं आणि प्रत्येकाला ते हक्काने मांडायलाही आवडतं.  अगदी हेच सध्या अमेरिकेतील निवडणुक उमेदवारांच्या बाबतीत चालू आहे.  ओबामांची ८ वर्षाची कारकीर्द आता संपणार आहे. ८ नोव्हेंबर २०१६ ला अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष निवडून येतील. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षातील अंतिम उमेदवार कोण ते फेब्रुवारी ते जून या दरम्यान  निश्चित होईल. सध्या वेगवेगळ्या राज्यातील उमेदवारांमध्ये होणार्‍या चर्चासत्रातून कोणता उमेदवार कोणत्या राज्यात पुढे आहे याची चाचपणी सुरु आहे. सुरुवातीला डेमोक्रॅटिक पक्षातून हिलरी क्लिंटन निवडणुकीला उभ्या राहणार आहेत का नाही याची प्रचंड उत्सुकता जनमानसात होती, त्यांनी तो निर्णय घेतल्यावर  इतर उमेदवारातून अंतिमत: त्यांची निवड होईल का या प्रश्नाची चर्चा व्हायला लागली आणि अचानक सर्वांचा रोख वळला तो  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉनल्ड ट्रम्प यांच्याकडे.

रिपब्लिकन पक्षांमधून जेब बुश (माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचे बंधू) यांच्यासह ११ उमेदवार या चुरसीमध्ये सामील झालेले आहेत. हिलरी क्लिंटन यांच्या विरुद्ध यातील समर्थपणे कोण उभं ठाकतं याबद्दल उलट - सुलट मतप्रदर्शन होत असतानाच डॉनल्ड ट्रम्पनी रिंगणात उडी मारली. त्यांनी ही उडी घेतली ती बहुधा मैदान गाजवण्याच्याच इराद्याने.  विरुद्ध असला तरीही डेमोक्रॅटीक पक्ष डॉनल्ड ट्रम्पवर खूश आहे. कारण? डॉनल्ड ट्रम्प तोंड उघडतात ते चौफेर फटकेबाजी करण्यासाठीच.  त्यामुळे रिपब्लिकन पक्षातील इतर उमेदवारांकडे कुणाचं लक्षच जात नाही. त्यांची मतं, योजना जनतेच्या मनात फार काळ रेंगाळत नाहीत कारण डॉनल्ड ट्रम्प सनसनाटी विधान करुन स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात. या चौफेर फटकेबाजीतील ताजं  उदाहरण म्हणजे बेकायदेशीर रित्या मेक्सिकन लोकांनी अमेरिकेत प्रवेश करु नये म्हणून सीमेवर भिंत बांधण्याची त्यांनी केलेली घोषणा. या घोषणेने अमेरिकेत खळबळ माजली. मेक्सिकन जनतेत अर्थातच असंतोष पसरला.  काहीजण खूष झाले तर काहींना डॉनल्ड ट्रम्प ’... तारे तोडतायत’ असं वाटलं. प्रत्येकाला या भिंत बांधणीबद्दल आपलं  मत व्यक्त करावंसं वाटायला लागलं.  अगदी प्राथमिक शाळेत जाणारा विद्यार्थीही या  घोषणेने पेचात पडला. या मुलाने लिहिलेला  निबंधच त्याच्या शिक्षिकेने प्रसिद्ध केला. हा छोटा मुलगा म्हणतो,
"मला स्वप्न पडलं की डॉनल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होणार नाहीत पण ते झाले तर आशियाई, मेक्सिकन आणि आफ्रिकन लोकांना त्यांच्या देशात परत जावे लागेल.  या देशात फक्त १२००० लोक राहतील. बरेच भारतीय अभियंते (इंजिनिअर) आहेत. ते इथे नसतील तर तंत्रज्ञान नसेल. आणि तंत्रज्ञान नसेल तर नेटफ्लिक्स नसेल. अशा देशात आवडेल राहायला तुम्हाला? अर्थात नाही!"  गमतीचा भाग सोडला तरी डॉनल्ड ट्रम्प ही वल्ली चर्चेचा विषय होण्यात यशस्वी झाली आहे.

कोण आहेत हे ट्रम्प? यशस्वी उद्योजक आणि करोडपती!  दूरदर्शनवरच्या त्यांच्या  ’अॲप्रेंटीस’ या कार्यक्रमामुळे ते घराघरात पोचले.  १६ ते १८ व्यावसायिक या कार्यक्रमात भाग घेतात, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी.  प्रत्येक भागाच्या शेवटी ट्रम्प त्यातील एकाला काढतात तेच  ’यू आर फायर्ड’ म्हणत. हे त्यांचं वाक्य खूप प्रसिद्ध झालं तसा त्यांचा एक घाव दोन तुकडे हा खाक्याही. निवडणुकीच्या रिंगणातही ते मांडत असलेली विधानं लोकांकरता एकाचवेळी खळबळजनक, धक्कादायक तशीच मनोरंजकही आहेत .

ट्रम्प त्यांच्या बोलण्याने लोकांची करमणूक करतात त्याचवेळी एखाद्या गटाला नाखूष. मेक्सिकन लोकांनी अमेरिकेत प्रवेश करु नये म्हणून सीमेवर भिंत बांधायचं ते जाहिर करुनच ते थांबले नाहीत तर त्याचबरोबर  मेक्सिकन अमली पदार्थ या देशात आणतात, त्यांच्यामुळे या देशातले गुन्हेगार वाढतात आणि ते बलात्कारी आहेत असं त्यांना वाटतं. काही मोजकेच सभ्य मेक्सिकन या देशात आहेत असं म्हणून त्यांनी मेक्सिकन लोकांचा रोष ओढवून घेतला आहे. मेक्सिकन जनते नंतर ते मुसलमानांवर ताशेरे झोडतात. जोपर्यंत अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अंधातरी आहे तोपर्यंत मुसलमान लोकांना अमेरिकेत येण्यासाठी बंदी घालावी या विधानाने अमेरिकेत तर खळबळ माजलीच पण ब्रिटीश सरकारला ट्रम्पना ब्रिटनमध्ये प्रवेश करण्यास बंदी आणावी की काय असं वाटून गेलं. देशाच्या भविष्याच्या बाबतीत त्यांच्या योजना ह्या अशा आहेत पण त्या पूर्णत्वाला कशा जातील या बाबत निश्चित आराखडा त्यांच्याकडे नाही त्यामुळे वास्तवापासून फारकत घेतल्यागत त्यांची योजना आणि विधानं आहेत असं मानलं जातं. हे कमी असल्यासारखं रिपब्लिकन पक्षातर्फे उभे असलेले ट्रम्प राजकारणातील व्यक्तींना वेळोवेळी आपण पैसे दिल्याचं अभिमानाने सांगतात आणि त्यांना पाहिजे ती कामं  देखील या व्यक्ती त्यामुळे करतात याचा दाखला देतात. हिलरी क्लिंटनना पैसे दिल्याचे ते मान्य करतात तेव्हा ट्रम्प यांचं कोणतं काम हिलरीनी केलं असेल असा साहजिकच प्रश्न मनात येतो. त्यावर ते सांगतात की मी हिलरीना लग्नाला हजर राहण्याचं आमंत्रण दिलं आणि विरुद्ध पक्षातील असूनही हिलरी ते नाकारु शकल्या नाहीत.

हल्लीच आयोवा येथील रिपब्लिकन पक्षाच्या वाद - विवाद सभेत सहभागी होण्याचं नाकारत त्यांनी मोठा जुगार खेळला आणि तो जिंकलाही. आयोवा येथील वाद - विवाद हा उमेदवारांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो. कारण तेथील प्राथमिक निवडणुक जिंकणारा उमेदवार राष्ट्राध्यक्ष होतो असा बर्‍याच वेळा आलेला अनुभव. पण इथे येण्याचंच त्यांनी  नाकारलं ते मेगन केली या स्त्री वार्ताहारामुळे. आधीच्या एका वाद - विवादात  मेगनने त्यांच्याशी संवाद साधताना म्हटलं, की ते राजकीय व्यक्तींप्रमाणे तोलून मापून न बोलता त्यांना जे वाटतं ते बोलतात यामुळे लोकप्रिय आहेत पण कधीकधी हे बोलणं हिनपातळीकडे झुकतं. हे स्पष्ट करताना त्यांचे स्त्रियांबद्दलचे उद्गगार मेगननी त्यांना ऐकवले. त्यांनी स्त्रियांना डुक्कर, कुत्री आणि आळशी म्हटल्याची मेगननी आठवण करुन दिली. त्याला प्रत्युत्तर देताना डॉनल्डनी प्रसारमाध्यमातील रोझी ओडानल्डबद्दलच आपण तसं म्हटलं आहे असं सांगितलं. पण ते खरं नाही आणि सर्वच स्त्रियांबद्दल त्यांचं तसं मत असल्याचं मेगन यांनी ठामपणे सांगितल्यापासून डॉनल्डनी मेगन यांच्याशी कोणत्याही पद्धतीने संपर्क येऊ न देण्याचं ठरवलं. त्याचीच परिणिती म्हणून आयोवा मध्ये पुन्हा एकदा मेगन केलीच प्रश्नकर्त्या असणार हे समजल्यावर या चर्चासत्राला हजर न राहण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांच्या अनुपस्थितीत आयोवा येथील रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा  वाद - विवाद किती लोकं पाहतील? ट्रम्पनी ते नसल्याने लोकांचा या वाद - विवादामधला रस नाहीसा होईल असं म्हटलं आणि प्रत्यक्षात तसं झालंही. गेल्या उन्हाळ्यात रिपब्लिकन पक्षातील उमेदवारांचं वाद - विवाद सत्र २४ मिलियन लोकांनी पाहिलं तर आयोवातील वाद - विवाद  सत्र फक्त १३ मिलियन लोकांनी. कहर म्हणजे आयोवातील ही वाद - विवाद सभा जिंकली कुणी या प्रश्नाचं उत्तर पाहता निवडणूक पूर्व गोष्टी किती मनोरंजक आहेत याची खात्री पटते. सर्वसामान्यांच्या मते हा वाद - विवाद खर्‍या अर्थी जिंकला तो मेगन केलींच्या कृत्रिम पापण्यांनी!

ट्रम्प हे इतकं वादग्रस्त व्यक्तिमत्व असूनही ते लोकप्रियतेच्या शिखरावर  सातत्याने का आहेत आणि खरंच ते राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात असं कितीजणांना वाटतं? ते लोकप्रिय आहेत ते त्यांच्या वक्तव्यांमुळे. लोकांची प्रचंड करमणूक त्यांच्या उद्गगारांनी होत असल्यामुळे आता ट्रम्प काय बोलणार या प्रतीक्षेत लोक असतात. राजकारणाशी काडीचाही संबंध नसताना ते राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात असंही मानणारे असंख्य आहेत. त्यांना पाठिंबा असणार्‍यांच्या मते ते उत्तम व्यावसायिक आहेत त्यामुळे व्यवस्थापनचा उत्कृष्ट अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. डॉनल्ड राष्ट्राध्यक्ष झाले तर सीमेवर नुसतीच भिंत  बांधणार नाहीत तर त्याचा खर्च मेक्सिकन सरकारकडून घेण्याचा त्यांचा मानस आहे यामुळेही जनता खूष आहे. ते व्यावसायिक असल्याने नोकर्‍या निर्माण करण्याचा दांडगा अनुभव देशाचा कारभार हाकताना नक्कीच कामी येईल, या देशात नोकर्‍यांची उपलब्धता वाढेल याची खात्री अनेकांना आहे. त्यांच्या कंपनीचं अनेकवेळ दिवाळं निघूनही त्यातून ते बाहेर आले याचाच अर्थ ते पुनर्बाधणी करु शकतात.  ते राष्ट्राध्यक्ष झाले तर व्हाईट हाऊस मधील कामात गर्क होतील आणि वेळेच्या अभावी त्यांचा आता कंटाळवाणा झालेला ’अॲप्रेंटीस’ कार्यक्रम बंद करावा लागेल अशी स्वप्न पाहणारेही काहीजण आहेत.

घोडामैदान फार लांब नाही. रिपब्लिकन पक्ष त्यांना राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी देतो की नाही ते लवकरच कळेल. ८ वर्षापूर्वी रिपब्लिकन पक्षातील सारा पेलन नावाच्या वादळाने देशात खळबळ माजवली होती. याच सारा पेलन डॉनल्ड ट्रम्पना पाठिंबा देत त्यांच्या पाठीशी नुकत्याच उभ्या राहिल्या आहेत. एका वादळाची दुसर्‍या वादळाला साथ. आता डॉनल्ड ट्रम्प नावाचं हे वादळ आणखी कोणाकोणाला झोडपतं ते पाहत राहायचं. दुसरं काय!

http://www.loksatta.com/lekha-news/popular-donald-trump-1199210/

Wednesday, January 27, 2016

लॉटरी!

अमेरिकेत गेल्या आठवड्यापासून सरकारी लॉटरीच्या आकड्यात ती अद्याप न जिंकल्याने भर पडत चालली आहे तशीच ती विकत घेणार्‍यांच्या संख्येतही. १.५ बिलियन डॉलर्स!  लागली लॉटरी तर? फक्त २ डॉलर्समध्ये मिळणार्‍या एका तिकिटाला जिंकण्याची शक्यता किती? तर २९० मिलियन तिकिटातून एक. तरी दरवर्षी जवळ जवळ ७० बिलियन लोक लॉटरी तिकिट खरेदी करतात. या वेळेलाही प्रत्येकाला आपणही जिंकू शकू असा विश्वास वाटायला लागलाय. बातम्या पाहताना आम्हीदेखील घरात लॉटरी लागली तर काय करु याचे बेत करुन टाकले. लहानपणी वडील दर महिन्याला लॉटरीचं तिकीट घ्यायचे. कधी ५० रुपयांच्या वर लॉटरी लागली नाही तरी महाराष्ट्र राज्य लॉटरीचं तिकीट घरात यायचं. रोज लॉटरीच्या बातम्या पाहून आज आपणही तिकीट आणूया असा बेत करुन टाकला. पण लॉटरी जीवनात आनंद घेऊन येते की  शेवटी आनंद हा मानण्यावर हेच खरं?

अमेरिकेत, पॉवर बॉल आणि मेगा मिलियन ही  लॉटरींची दोन मोठी नावं. १९९२ साली सुरु झालेला पॉवरबॉल कमीत कमी ४० मिलियनचा तर १९९६ सालापासून सुरु असलेली मेगा लॉटरीची  कमीत कमी रक्कम १५ मिलियन डॉलर्स  असते. पॉवर बॉलचं १ तिकिट २ डॉलर्सला तर मेगा मिलियनच्या एका तिकिटाची किंमत १ डॉलर. सध्या कुणाकडेच विजेते आकडे नसल्याने पॉवरबॉलची रक्कम वाढत चालली आहे. दर बुधवारी आणि शनिवारी निकाल जाहीर होतो. ६९ चेंडूमधले ५ आकडे जुळले तर तुमचं नशीब उजळतं. पण त्या व्यतिरिक्त असणारा आणखी १ चेंडू तुमचं आयुष्य बदलून टाकणारा ठरतो. या भाग्यशाली चेंडूवरचा आकडा आणि उरलेले ५ आकडे तंतोतंत जुळले की झालात तुम्ही मिली किंवा बिलि नअर.

देशात विकली जाणारी सगळीच्या सगळी तिकिटं विकत घेतली तरीही लॉटरीतून तुम्हाला फायदाच होऊ शकतो इतकी मिळणारी लॉटरीची रक्कम जास्त आहे. सर्व तिकिटांची किंमत आहे ५८४ मिलियन डॉलर्स आणि यावेळची लॉटरी आहे ९३० मिलियन डॉलर्सची.  अडचण इतकीच की इतकी सगळी तिकिटं विकत घेणं एखाद्या व्यक्तीला शक्यच नाही. पूर्ण देशात तिकिट विक्री होते. प्रत्येक ठीकाणाहूनची सर्व तिकिटं घेणं निव्वळ अशक्य. तरीही फेब्रुवारी १९९२ मध्ये काही  कंपन्यांनी एकत्र येऊन हे करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला ज्यात सर्वांना मिळून २.५ मिलियन डॉलर्सचीच तिकटं विकत घेता आली. पण लॉटरीसाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या गेल्याच.  अशीच एक घडली २००५ साली. पॉवरबॉलच्या लॉटरीचे ११० लोकांचे ५ आकडे तंतोतंत जुळले आणि  जवळजवळ २० मिलियन डॉलर्सही या ११० जणांना मिळाले. काहीतरी गोंधळ असल्याची शंका अधिकार्‍यांना आली. आणि लवकरच त्याचं रहस्यही उलगडलं. न्यूयॉर्क मधील वोनटोन कंपनीने त्यांच्या बिस्किटांतून (फॉरच्यून कुकीज) ६ आकडे नशीबवान म्हणून वितरित केले होते आणि प्रत्यक्षात ते खरंच तसे निघालेही. पाच आकडे तर जुळले. जर सहावा आकडाही जुळला असता तर ह्या ११० लोकांना बिलिनिअर होण्याची संधी लाभली असती. बिस्किटांतला ६ वा आकडा होता ४० आणि लॉटरीमधील आकडा होता ४२.

मात्र आत्तापर्यंत जितक्या लोकांना लॉटरी लागली त्यातील फार कमी जणांनी ती खर्‍या अर्थी उपभोगली. बाकीच्यांना लॉटरीबरोबर आलेले ताण - तणाव झेपले नाहीत. अनपेक्षित धनलाभाने आयुष्यं खर्‍या अर्थी बदलतं. कधी सुखी जीवनाच्या मार्गावर पाऊल पडतं तर कधी हा पैसा डोकेदुखी होऊन जातो. अचानक तुमचं आयुष्य प्रकाशझोतात येतं. असंख्य समाजसेवी संस्था, उपचारांसाठी आर्थिक मदतीची अपेक्षा असणार्‍या रोग्यांचे नातेवाईक, गुंतवणुकीसाठी गळ घालणार्‍या कंपन्यां असे कितीतरी फोन वेळी अवेळी घणघणायला लागतात, कधीही न पाहिलेल्या नातेवाइकांचा जीवनात अलगद शिरकाव होतो, मित्र - मैत्रीणींची जवळीक नको तितकी वाढायला लागते. अशी एक ना अनेक उदाहरणं.

२००५ साली लॉटरी जिंकल्यावर लुईसने आपली स्वप्न पूर्ण केली. नवीन घर घेतलं. दाराशी नवीन गाडी आली. लुईसच्या नवर्‍याने, किथने बेकरीतली नोकरी सोडली आणि दिवस अंगावर यायला लागला. मन रमविण्यासाठी तो दारुकडे वळला. व्यसनाधीन झाला. दारुच्या व्यसनातून तो प्रयत्नपूर्वक बाहेर तर पडला पण जेम्स नावाच्या अनोळखी गृहस्थाने  नफ्याचं आमिष दाखवीत वेगवेगळ्यात धंद्यात त्याला पैसे गुंतवायला भाग पाडलं. त्याने गुंतवलेले सगळे धंदे नामशेष झाले. हातातला पैसा संपला तसा पुन्हा तो दारुकडे वळला. आत्तापर्यंत साथ देणारी त्याची पत्नीही कंटाळून वेगळी झाली. बेकरीतील कामगाराचं साधंसुधं जीवन पैसा आल्यावर रसातळाला गेलं आणि आलेल्या ताणातून, दारुने केलेल्या शारीरिक हानीमुळे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने किथचं २०१० साली निधन झालं.

केली रॉजरने ३ मिलियन डॉलर्सची लॉटरी जिंकल्या जिंकल्या नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींवर गाडी, घर अशा महागड्या भेटवस्तूंचा वर्षाव केला. कपडे, सुंदरतेचा हव्यास बाळगत त्या पायी केलेल्या अतोनात उधळपट्टीतून  हाती आलेला पैसा केव्हा वाहून गेला  ते केलीला समजलंही नाही. मित्र - मैत्रिणींना आनंद मिळावा ही तिची इच्छा असली तरी लवकरच प्रत्येकजण तिच्या पैशावर डोळा ठेवून तिच्याशी मैत्री करत आहेत असं तिला वाटायला लागलं. आलेल्या अनुभवांनी निराश होत दोनवेळा आत्महत्येचा प्रयत्नही तिने केला आणि अखेर सर्व पैसा गमावल्यावर आता मोलकरणीची कामं करणारी केली लॉटरीपायी आलेले अनुभव विसरुन आनंदी जीवन जगण्याची इच्छा व्यक्त करते.

५५ वर्षाच्या कत्रांटदार कंपनीचे अध्यक्ष असलेल्या व्हिटेकरनी ३१५ मिलियन डॉलर्सची लॉटरी जिंकली तेव्हाच त्यातील बरीचशी रक्कम देणगी, ट्रस्ट यासाठी राखली इतकंच नाही तर जिथून त्यांनी हे तिकिट घेतलं होतं त्या दुकानातील कर्मचारी स्त्रीलाही त्यांनी घर, गाडी आणि रोख रक्कम दिली. असं असताना मग काय चुकलं? व्हिटेकर मित्र - मैत्रिणींसमवेत आनंद साजरा करायला वेगवेगळ्या क्लबमध्ये जायला लागले, दारुच्या अधीन झाले, जुगाराचा नाद लागला. मुलीला, नातीला वेळोवेळी आवश्यकता नसताना ते पैसे देत राहिले आणि त्यांच्याबरोबरीने त्या दोघी अमली पदार्थांच्या आहारी गेल्या.  त्यातच दोघींनी आपला जीव गमावला.  सुखासीन आयुष्य जगणार्‍या व्हिटेकर कुटुंबाचं आयुष्य लॉटरीच्या पैशांनी धुळीला मिळालं.

३१ मिलियन डॉलर्सची लॉटरी अब्राहमनी जिंकली. सुरुवातीची ३ वर्ष  सुखसमाधानातही गेली. पण अचानक एके दिवशी त्यांचा मृतदेह सापडला. त्यांचा खून करणार्‍या स्त्रीला अटक झाल्यावर अब्राहमनी लॉटरी जिंकल्यावर त्यांच्याशी मैत्री करुन जवळजवळ २ मिलियन डॉलर्सला त्यांना लुबाडल्याचं आणि नंतर मारल्याचं कबूल केलं. शिकागो येथील उरुज खानही  लॉटरी लागल्यानंतर महिन्याभरात मॄतावस्थेत सापडले. भारतातून आलेल्या खान कुटुंबाचं जीवन सुखी म्हणावं असंच. उरुजना असलेला लॉटरीचा नाद सोडल्यास. लॉटरी लागल्यावर मिळालेल्या पैशाचं काय करायचं याबद्दल त्यांच्या कुटुंबात वाद - विवाद होते आणि त्यातूनच त्यांना विष घालून मारण्यात आलं असावं अशी शंका असली तरी त्यांच्या मारेकर्‍याचा शोध अद्याप लागलेला नाही.

बिलींच्या आयुष्यानेही लॉटरीमुळे वेगळ्या मार्गावर वाटचाल सुरु केली. मोठ्या घरात राह्यला जायचं घरातल्या सर्वांचंच स्वप्न पूर्ण झालं. बायको, मुलांना नवीन गाड्या घेऊन देता आल्या. इतकंच नाही नातेवाइकांनाही त्यांनी खूश ठेवलं. कुणालाही मदतीची गरज असली की रोख पैसे देण्याची त्यांची तयारी असे. लवकरच त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येकालाच त्यांची गरज आहे आणि इतक्या सर्वांना एकट्याने पुरं पडणं निव्वळ अशक्य. पण ते जमेल तशी मदत करत राहिले. पत्नीबरोबर सतत दुसर्‍यांना अशी पैशाची मदत करण्याबद्दल त्यांचे वाद व्हायला लागले आणि अखेर लॉटरी जिंकल्यावर केवळ दीड वर्षात निर्माण झालेल्या ताण तणावांनी आपलं जीवन संपवून त्यांनी सगळ्याला पूर्ण विराम दिला.

अर्थात लॉटरीचा पैसा व्यवस्थित गुंतवून, आपला दिनक्रम व्यवस्थित सांभाळणारीही माणसं अनेक आहेत. एमा आणि ल्युक त्यातलेच एक. ल्यूक आणि एमा मॅकडोनल्ड मध्ये काम करता करता प्रेमात पडले पण स्वतंत्र घरासाठी दोघांचा एकत्रित पगारही पुरेसा नसल्याने पालकांच्या घरीच त्यांना राहावं लागत होतं. मिलियन डॉलर्सची लॉटरी लागल्यावर नोकरी सोडायची नाही हा निश्चय काही काळापुरता टिकला. पण मुलाबरोबर वेळ घालवण्याला दोघांनी प्राधान्य दिलं, त्याचबरोबर नोकरीचा राजीनामा. पण काही दिवसातच सहकारी, नोकरी यांच्या आठवणीने चैन पडेनासं झालं. ल्यूकने पुन्हा जुन्याच जागी नोकरीला सुरुवात केली. लॉटरी पैशावर मिळणारं व्याजंही त्या दोघांच्या पगारापेक्षा जास्त होतं पण दैनंदिन जीवन न बदलता लॉटरीच्या पैशाचा आनंद उपभोगणं दोघांना जास्त सुखावह वाटलं.

रॉबिनसनने लॉटरी जिंकल्यावर शाळेतील शिक्षकांमुळे प्रेरित होऊन मुलांसाठी कार्यशाळा उभी करण्यासाठी लॉटरीतील बरीचशी रक्कम देऊ केली. आज २० वर्षानंतर ती कार्यशाळा उत्तमरीत्या चालविली जात आहे. बर्‍याच जणांनी मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी पैसे गुंतवले तर काहीजणांनी आपल्याला लॉटरी लागली आहे हे काही महिने इतरांना कळू न देता पुढचे ताण टाळण्याचा प्रयत्न केला.  बहुतेकांनी सामाजिक जाणिवेने आपल्याला मिळालेल्या रकमेतील बरेच पैसे देणगी म्हणून देण्याला प्राधान्य दिलं.  थोडक्यात काही जण आधीही आनंदी होतेच. श्रीमंतही झाले. मनाने होतेच आता आर्थिक दृष्ट्याही.

खरंच पैशाने आयुष्यात आनंदाचा शिरकाव होतो का? यावर झालेल्या संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की पगारवाढ झाली की नक्कीच सुखात भर पडते पण एका विशिष्ट वाढीनंतर त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही. किंबहुना पैशाने सुख विकत घेता येत नाही ह्याचाच पैशाचा ओघ स्वत:कडे वळल्यावर बहुतेकांना शोध लागतो.

आणि तरीही आपण लॉटरी लागली तर... हे स्वप्न पाहणं विसरत नाही!

पूर्वप्रसिद्ध - लोकसत्ता - चतुरंग पुरवणी - http://www.loksatta.com/lekh-news/lottery-1192070/

Saturday, January 16, 2016

ग्लोबल कोकणी - अमेरिकन मंचावर...

(लोकमतच्या वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल कोकणी विशेषांकातील माझा लेख.)

"आय हॅव टू पिक अप द रोल." वाटेत घोकून घोकून पाठ केलेलं वाक्य म्हटलं आणि विक्रेतीच्या चेहर्‍यावरचे गोंधळलेले भाव बघून मी बावचळले.
"रोल?" तिने चमत्कारिक उच्चारात विचारलं.
"यस." मी तोंड वेडंवाकडं करत उच्चार केला. गोर्‍यांशी बोलताना तोंड थोडं वाकडं केलं की आपल्या फ्लाइंग राणीच्या वेगाला जरा खीळ बसते आणि आपण काय बोलतोय ते त्यांना समजतं असा एक फंडा कुठूनतरी माझ्या डोक्यात शिरला होता. तो वापरायची ही पहिली संधी. माझं तोंड बराचवेळ वाकडंच राहिलं पण तिला काही रोल म्हणजे काय ते समजेना. कुठून ही दुर्बुद्धी सुचली कोण जाणे.  या देशात पाऊल टाकलं आणि आठवड्याच्या आत रोल आणायला बाहेर. काय करणार? विमानतळापासून फोटो काढायला सुरुवात केली होती. विमानातल्या  संडासाचंही अप्रूप होतं २० वर्षापूर्वी. रोल पटकन संपलाच त्यामुळे. आता फोटो भारतात पाठवून देण्याची घाई. तरी नवरा म्हणत होता,
"जरा टी. व्ही. बघ थोडेदिवस. त्या टी. व्ही. तली माणसं जशी बोलतात ना तशीच बोलतात ही सगळी. त्यांचं कळायला लागलं तरी आपलं बोलणं त्यांना कळणं हे पण लढाईवर जाण्यासारखंच असतं. तेव्हा सबुर!" पण नवर्‍याचं न ऐकणं हा पत्निधर्म निभावत मी आखाड्यात उतरले. आता रोल, रोल करता करता नवराच काय, माझी  शाळाही आठवली. कणकवलीच्या एस. एम. ज्युनिअर महाविद्यालयात शुक्ल सर इंग्रजी बोला, इंग्रजी बोला म्हणून कानीकपाळी ओरडायचे तो सल्ला ऐकला नाही याचा पश्चाताप व्हायला लागला. अखेर माझ्या आणि विक्रेतीच्या मध्ये असलेल्या अभेद्य भितींतून म्हणजे काचेच्या लांबलचक टेबलावरुन बोट दाखवत, खाणाखुणा करत तिच्या पाठीमागे असलेल्या मोठ्या कपाटातल्या वरतून चौथ्या रांगेतल्या कप्प्यात असलेला कॅमेरा तिला दाखविण्यात मी यशस्वी झाले. मग तो कॅमेरा हातात धरुन, फोटो काढण्याची कृती करत, रोलची जागा दाखवण्याचा कार्यक्रम पार पडला. अखेर तिला मला काय हवंय ते समजलं आणि ती आनंदातियाशाने किंचाळली,
"यु मीन फिल्म?" आता मी गोंधळले. ही लोकं रोलला फिल्म म्हणतात? पण तोंड वाकडं करत बोलण्याची माझी खुमखुमी थंडावली होती. आता ती जे काही देईल ते रोल म्हणून वापरायला मी तयार होते. रोल घेऊन घरी आले आणि नवर्‍याला म्हटलं,
"शाळेत शिक्षकांचं ऐकायला हवं होतं रे."
"आम्ही ऐकायचो." त्याचा शांतपणा ढळला नाही.
"मी माझ्याबद्दल बोलतेय."
"बरं, बरं पण इतकं का भाग्यं उजळलं शिक्षकांचं?"
"हे बघ, तुला माहितीच आहे. माझं काही तुझ्यासारखं शिकण्याचं माध्यम इंग्रजी नव्हतं. मराठी माध्यमातून शिकलेली, कोकणात जन्मलेली, वाढलेली मी."
"तू पालघरला होतीस ना? ते कुठे कोकणात?"
"तू म्हणजे ना. काही वर्ष होतो रे पालघरला. पण जन्म कणकवलीचा, प्राथमिक शिक्षण देवरुखच्या भोंदे शाळेत, उच्चमाध्यमिक कणकवलीच्या एस. एम. हायस्कूलमधून आणि त्यानंतर कणकवली महाविद्यालयात.  महाविद्यालयीन आणि उच्चमहाविद्यालयीन रत्नागिरीला गोगटे जोगळेकर महाविद्यालयात. फक्त माध्यमिक शिक्षण पालघरच्या आर्यन एज्युकेशन मध्ये. म्हणजे अमेरिकेत यायच्या आधीचं आयुष्य जवळजवळ कोकणातच गेलं ना?"
"पण हे तू मला का ऐकवते आहेस?"
"कधी वाटलंच नव्हतं ना  परदेशात येईन म्हणून. इंग्रजी हीच बोलण्याची भाषा होऊन जाईल याची कल्पनाही केली नव्हती. तुझ्याबरोबर म्हणून या देशात पाऊल टाकलं पण तिकडे जशी माझी स्वत:ची ओळख होती आकाशवाणी, लेखन, अभिनय या माध्यमातून  तशीच इथेही ती व्हायला हवी असं वाटतं. पण सुरुवात उच्चारांपासून आणि इंग्रजी बोलण्याच्या आत्मविश्वासाच्या अभावापासून होतेय ना म्हणून वाटतंय ऐकायला हवं होतं शिक्षकांचं. आम्हाला इंग्रजीचे शिक्षक नेहमी म्हणायचे अभ्यासापुरतं इंग्रजी शिकू नका. ते वापरा, बोला. कुठेही तग धरता येईल त्यामुळे. आज ते पटलं."
"तुझ्या शिक्षकांना कळवून टाक हे. बरं वाटेल त्यांना. आणि इतकं काही कठीण नाही इंग्रजीची सवय करणं. जमेल तुला." त्याने विषय संपवला. माझ्या मनात मात्र बराचवेळ अमेरिकेला येईपर्यतचा काळ फेर धरत राहिला.

वेगवान आयुष्य मागे पडून अचानक शांतपणाने प्रवेश केला होता. नव्या देशाची, नवीन जगाची अपूर्वाई होती तशीच इथे कसं रुळणार याची धास्तीही. H4 वर आल्याने नोकरी करता येणार नव्हती, काही शिकायचं म्हटलं तर त्या त्या राज्यात किमान १ वर्ष राहिल्यानंतरच शिक्षणाचा खर्च कमी होऊ शकत होता. २ च वर्ष भारतीय कंपनीने पाठवलं होतं तर फारशी कशाची चिंता न करता हे नवं जग अनुभवावं असंही वाटत होतं. शेवटी सुरुवातीला तेच केलं. हातात लेखणी होती. रत्नागिरी आकाशवाणीसाठीचं लेखन, रत्नभूमीसाठी महाविद्यालयीन जीवनात चालवलेलं ’तरुणाई’ सदर, आमचं दिनांक साठी केलेलं लेखन आणि अधूनमधून सकाळ, रत्नागिरी टाईम्स, साप्ताहिक सकाळ, लोकसत्ता तसंच विविध मासिकांमधून लिहिलेले लेख, कविता, कथा या बळावर अमेरिकेतले अनुभव वेगवेगळ्या स्वरुपात कागदावर उतरायला लागले. १९९५ च्या काळात लेखन पोस्टाने किंवा तत्कालिक घडामोडींवरील लेख वर्तमानपत्रांना फॅक्सने पाठवणे हे दोनच मार्ग होते. लिहिण्यासारखं खूप होतं. त्यात दिवस पुरेनासे झाले. दरम्यान नवर्‍याच्या नोकरीमुळे भटकंतीही चालू होती. अमेरिकेतल्या राज्याराज्यामधलं जीवन म्हटलं तर एकसारखंच पण तरीही किती वेगळे पैलू असलेलं आहे ते जाणवायला लागलं. अमेरिकन मित्र, मैत्रीणींबरोबरच इतर देशातल्या लोकांशीही  मैत्री व्हायला लागली. भारतात महाराष्ट्रापुरतं मर्यादित असलेलं अनुभवविश्व व्यापक झालं. लेखनातून व्यक्त होत राहिलं. त्याचाच परिपाक म्हणजे,  उन्मेष प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला ’मेल्टिंग पॉट’ हा कथासंग्रह, ज्याला कोमसापचा उत्कृष्ट कथासंग्रहाचा पुरस्कार प्राप्त झाला. पाहता पाहता २ वर्षांची आणखी काही वर्ष झाली आणि अजून काही वर्ष इथेच राहायचं ठरल्यावर नोकरीचे आणि इथल्या प्रवाहात सामील होण्यासाठी  लागणार्‍या शिक्षणाचे वेध लागले. संगणकीय शिक्षणाला तेव्हाही तेवढंच महत्व होतं पण ते आवडेल की नाही याची खात्री नव्हती त्यामुळे आधी छोटे छोटे कोर्स करुन अंदाज घ्यायचं ठरवलं. वयाच्या ३० शी नंतर पुन्हा महाविद्यालयात पाऊल टाकायचं आणि तेही पूर्णपणे परक्या देशात या विचारानेच अस्वस्थपणा आला होता. अस्वस्थ मनाने वर्गात प्रवेश केला आणि क्षणात तो पळालाही. माझ्या आई - वडिलांच्या वयाचे विद्यार्थी पाहून मी अगदीच बालवयात महाविद्यालयात आल्याची खात्री झाली आणि एक वेगळाच आत्मविश्वास आला. नंतर वर्ग शिक्षक आणि विद्यार्थ्यांमुळे तो टिकलाही. इथल्या शिक्षणाचा ढाचा वेगळा आहे. प्रात्यक्षिकांवर जास्त भर असतो, पाठांतरापेक्षा विषय समजण्याला महत्त्व आणि शिस्तीपेक्षा मित्रत्वाचा मार्ग स्वीकारला जातो. एकमेकांच्या अडचणी ओळखून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासंदर्भात अजूनही एक आठवण मनात ताजी आहे.
मुलाला सांभाळणारी मुलगी त्या दिवशी येऊ शकली नाही तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून मुलगा माझ्याबरोबर आला तर चालेल का असं मी मिस्टर स्मिथना घाबरत घाबरत विचारलं. तात्काळ त्यांनी होकार भरला. मुलाला घेऊन वर्गात पाऊल ठेवलं आणि मिस्टर स्मिथनी माझ्याकडे हसून पाहिलं. तिथेच थांबायला लावलं.
"आज आपल्या वर्गात एक छोटा दोस्त आला आहे." पूर्ण वर्गाला मिस्टर स्मिथनी माझ्या मुलाची ओळख करुन दिली. ६ वर्षाच्या माझ्या मुलाने लाजत लाजत ’हाय’ केलं. वर्ग होता महाविद्यालयाचा आणि मुलं होती वय वर्ष ३० पासून ७५ च्या आसपास. तो दिवस त्याच्यासाठी आणि माझ्यासाठीही कायमचा स्मरणात राहिला

शिक्षण चालू असतानाच नोकरीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र आली.   मी शिकता शिकता बदली शिक्षकांची तात्पुरती नोकरी करायचं ठरवलं. त्या वेळेला शिक्षकांची आवश्यकता आहे असं सतत टी. व्ही. वर आवाहन असायचं. म्हटलं, जमलं तर करुन पाहू.   मुलगा म्हणाला,
"आई, तू  शिकवणार शाळेत जाऊन?"
"मग? शिकलेली आहे मी भारतात."
"पण तुला नाणी कुठे येतात ओळखता?"
"तुला कुणी सांगितलं?"
"मी क्वार्टर मागितलं की तू एकेक नाणं काढून त्याच्यावरचं चित्र बघतेस, चित्र कुणाचं ते कळत नाही तुला."
"हे बघ, गांधीजी असतात का त्या नाण्यावर? नाही ना? मग कसं ओळखणार रे?"
"पण मग कशाला बघतेस चित्र?"
"उद्योग नाही म्हणून. पुढे बोल."
"क्वार्टर म्हणून डाईम देतेस असं सांगत होतो."
"भारतातली नाणी आणून दे मला. बघ किती पटकन ओळखते ते. तू अभ्यासाला बस आता."
त्याला घालवला खरा, पण शिकवायला सुरुवात केल्यावर इथली शिक्षणपद्धती, शिकवण्यातील पद्धतशीरपणा, प्रयोग, वेगळेपणा याचा सुखद अनुभव घेतानाच काही गमतीदार प्रसंगही घडले.

शाळेचा पहिलाच दिवस. दुसरीचा वर्ग. मार्च महिन्यातला सेंट पॅट्रीक डे.
गोष्ट वाचून दाखवायची होती. तसं सुरळीत चाललं होतं. Leprechaun इथे गाडी अडली. उच्चार लेप्रचॉन की लेप्रचन? का काहीतरी वेगळाच. मी  एकदा हा एकदा तो, दोन्ही उच्चार करत गाडी हाकली. घरी येऊन म्हटलं आज लेपरचनची गोष्ट सांगितली. मुलाचं आपलं खुसखुस, खुसखुस.
"हसू नको. नीट सांग काय ते."
"लेप्रीकॉन आहे ते" वर म्हणाला,
"तू माझ्या वर्गावर येऊ नको. घरीच शिकव मला काय असेल ते."
त्याच्या नाही पण दुसर्‍या वर्गांवर जाण्याची माझी चिकाटी दांडगी. दुसर्‍या दिवशी गेले तर संगीताचा वर्ग.  मराठीतही संगीताचा गंध नसताना एकदम इंग्रजीत संगीत कसं शिकवायचं?
मी कार्यालयात गेले. माझे थरथरणारे हात, भेदरलेला आवाज याने काही फरक पडला नाही,
"आज वेळ मारून ने. उद्या कुणालातरी आणतो आम्ही."
उडालेच, बदली शिक्षकाचं माझं हे काम वेळ मारून नेणं होतं?  मेलं, घरी तसंच, इथेही तेच. कुणाला म्हणून किंमत नाही माझ्या कामाची... आलीया भोगासी!
त्यानंतर रोज रात्री इंग्लिश गाणी शिकण्याचा सपाटा लावला मी घरी कारण दुसर्‍या दिवशी आणखी कुणाला तरी न आणता वेळ मारुन न्यायला त्यांनी मलाच तिथे ठेवलं. शाळेने माझी सलग पंधरा दिवसासाठी संगीत शिक्षिका म्हणून नेमणूक करून टाकली. पोरं कितपत शिकली देवजाणे पण मला बरीच गाणी यायला लागली आणि नवरा, मुलगा दोघांना जी काही इतर गाणी येत तीही विसरले ते दोघं. नवरा तर म्हणाला,
"तसा मी बरा कमावतोय की, तुला खरंच गरज आहे का गाणीबिणी शिकवण्याची?" मी उत्तर न देता मोठ्याने गाणं म्हणत राहिले आणि आगळेवेगळे अनुभव घेत  ३ वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत राहिले.

दरम्यान हातात पदवी आली होती. जिथे शिकत होते तिथेच आधी इंटर्नशिप करुन वेब प्रोग्रॅमर म्हणून स्थिर झाले. महाविद्यालयात असलेले जवळजवळ १८० वेगवेगळे विभाग आणि त्यांची संकेतस्थळं तयार करणं, अद्ययावत ठेवणं हे आमच्या गटाचं काम. कार्यालयात सर्वांना नावानेच संबोधण्याच्या प्रथेमुळे आपसूकच जवळीक निर्माण होते.  एकमेकांना सांभाळून, अडीअडीचणी ओळखून मार्ग काढणं महत्वाचं मानलं जातं. कोणत्याही कामाचं व्यवस्थित नियोजन,  कागदावर सारा आराखडा करणं हे सुरुवातीला फार कंटाळवाणं वाटायचं पण त्याचमुळे ठरल्याप्रमाणे काम  पार पाडलं जातं आणि त्याचा दर्जाही उत्तम राखता येतो हे लक्षात आलं आणि तेच अंगवळणीही पडलं.

एकीकडे नोकरी बरोबरच लेखनही चालू असतानाच अभिनयाची मूळ आवड स्वस्थ बसू देत नव्हती. कणकवलीच्या नाथ पै एकांकिकांमधून आधी शालेय गटातून, नंतर बागेश्री संस्थेतून काम करुन मिळवलेली अभिनयाची बक्षिसं, रत्नागिरीच्या जिज्ञासा संस्थेतून गाजवलेल्या अनेक स्पर्धांच्या आठवणी स्वस्थ बसू देत नव्हत्या. त्यातूनच ’अभिव्यक्ती’ या नाट्यसंस्थेची निर्मिती झाली. दरवर्षी व्यावसायिक रंगमंच भाड्याने घेऊन दोन एकांकिकाचं सादरीकरण सुरु झालं. दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, काहीवेळा एकांकिका लेखन, जाहीरात, तिकीट विक्री अशा सगळ्या बाजू नवर्‍याच्या आणि माझ्या मुलांच्या मदतीने  तसंच येथील स्थानिक कलाकारांच्या मदतीने सांभाळत गेली ८ वर्ष दरवर्षी इथे एकांकिका सादर करतोय. त्याला मराठी प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद उत्साह वाढवणारा आहे.

मागे वळून पाहताना जाणवतं ते हेच की परक्या देशात १९९५ च्या आसपास मुळं रुजवणं सोपं नक्कीच नव्हतं. आतासारखी संपर्काची आधुनिक साधनं नव्हती. १५ दिवसांनी भारतात फोन व्हायचे. पत्र पाठवलं की ३ आठवडे आतुरतेने उत्तराची वाट पाहण्यात जायची. पण हा परका देश ’आपला’ कधी होऊन गेला तेच समजला नाही. भारतात कुणी अमेरिकेबद्दल ऐकीव माहितीवर तारे तोडले की तळमळीने आम्ही खर्‍या परिस्थितीची जाणीव करुन देतो आणि इकडे आमच्या सहकार्‍यांनी, अमेरिकेन मित्र, मैत्रिणींनी भारताबद्दल काही शेरे मारले की त्याच कळकळीने गैरसमज दूर करण्याच्या प्रयत्नाला लागतो. दोन्ही देश आमचेच. एक कर्मभूमी, दुसरी मातृभूमी!

Tuesday, January 5, 2016

पोस्ट

"बॅग भर." बहीणीने हुकुम सोडला.
"पोस्टात जायचं आहे ना? मग बॅग कशाला?" माझ्याकडे सहानुभूतिपूर्वक नजर टाकून दोघी बहिणी हसल्या,
"पोस्टाचा कारभार विसरलेली दिसतेयस. भर बॅग तू. कळेलच तुला"
"३ दिवसांचे कपडे टाक. फक्त बाहेरचे. आतले नको. बाकीचं मी बघते." बहिणाबाईंचा झपाटा पाहून मी बॅग भरली.
"चलाऽऽऽऽ" तिने आरोळी ठोकली. मी चाकाची बॅग, ती पत्र्याची बॅग आणि तिसरी एकावर एक भलेमोठे डबे रचलेला जेवणाचा डबा घेऊन बाहेर पडलो.

घराच्या बाहेर पाऊल टाकलं. बाहेर पडल्या पडल्या चार - दोन रिक्षा सामानाकडे वळून बघत बघत रिकाम्याच नाहीशा झाल्या. अखेर एक थांबला.
"ताई, येवढालं सामान आणि तुम्ही तिघी, कोनी बी थांबनार नाय."
"तुम्ही थांबलात ना."  रिक्शा भुर्कन निघायच्या आधी आम्ही सामानाला आत कोंबलं. एका बहिणीला त्या सामानावर बसलं. आणि मग आम्ही दोघी मांड्या घालून स्थानापन्न झालो. रिक्षावाला खदाखदा हसला.
"दात काढायला काय झालं?" बहिण करवादली.
"सेल्फी काढा आनि टाका  फेसबुकवर. लई भारी पिक्चर येईल."
ट्रंकेवर बसलेल्या बहिणीला सेल्फीची कल्पना एकदम आवडलीच. पण चालत्या देहाचा कोणताही भाग हलवता येणार नाही इतके घट्ट आम्ही बॅगांच्या आसपास अडकलो होतो.
"द्या मी काढतो."
"तुम्ही रिक्षा चालवा हो." तिघींमधली कुणीतरी एवढ्या जोरात खेकसली की त्याची रिक्शा हवेत उडाल्यासारखी एकदम पोस्टासमोरच थांबली.
आखडलेले हातपाय आधी बाहेर टाकत, आमची अंगंही बॅगासकट बाहेर पडली.

चाकवाली बॅग विमानतळावर चालवल्यासारखी मी खडे असलेल्या रस्त्यावर चालवली. त्यामुळे निर्माण झालेल्या एकदम भारी पार्श्वसंगीताच्या साथीने पत्र्याची बॅग सावरत आम्ही पोस्टात झोकदार ’’एंट्री’  घेतली. आणि रामा रामा.... पोस्टातली तोबा गर्दी पाहून एकदम विमानतळावर आल्यासारखं वाटलं.
"इथेही इतकी गर्दी?" माझ्या प्रश्नाला उत्तर न देता बहिण तरातरा पत्र्यांची बॅग घेऊन आत जायला निघाली.
"अगं, अगं..." करत आम्ही दोघी तिच्या मागे. गिर्‍हाईक आणि कर्मचार्‍यांच्या मधला अभेद्य दरवाजा तिने मोडला आणि पोस्टाच्या कर्मचार्‍यासमोर बॅग आपटली. त्या आवाजाचा  शून्य परिणाम म्हणून  कर्मचार्‍याची नजर संगणकावर खिळलेलीच राहिली. त्यामुळे संगणकात आहे तरी काय ही माझी उत्सुकता चाळवली. मी घाईघाईत चष्मा शोधून, डोळ्यावर चढवून त्याला काय दिसतंय ते मलाही दिसेल का म्हणून पाहायला लागले. एवढ्यात लक्षात आलं, काचेच्या पलिकडे उभी असलेली हजारो माणसं आमच्याकडे पाहत होती, आम्ही कर्मचार्‍याकडे आणि कर्मचारी संगणकाकडे. म्हणजे थेट कुणीच कुणाकडे पाहायचं नाही असा नियम आहे की काय पोस्टात?
"बॅग उघड." बहिण म्हणाली. नक्की कुणी बॅग उघडायची हे न कळल्याने मी म्हटलं,
"बॅग उघड." तेवढ्यात दुसरी बहिण पण तेच म्हणाली. कुणीच बॅग उघडेना तसा तो कर्मचारी ओरडला,
"बॅग उघडा." बहिण एकदम घाबरुन खाली बसली. तिने बॅग उघडली.
"विजेचं बील, पत्ता, पासपोर्ट, आधारकार्ड, पॅन कार्ड....." मोठी यादी सांगत होती, छोटी एकेक कागद पुढे करत होती. आता त्या बॅगेचं रहस्य उलगडलं. अर्ध्या तासाने संगणकातून डोकं बाजूला काढून आम्ही पत्र्याच्या ट्रंकेतून काढलेल्या कागदपत्रावर त्याने नजर टाकायला सुरुवात केली.
"साक्षीदार आणा."
"ही आहे ना." माझ्याकडे दोघींनी सराईतासारखं बोट दाखवलं.
"या नाही चालणार."
"का नाही चालणार?" मी बुचकळ्यात. तेवढ्यात बहिण म्हणाली,
"अहो, मागच्यावेळी नात्यातला साक्षीदार चालला की."
"आता नाही चालणार. तुम्ही बाहेर इतके उभे आहेत त्यातल्या आणा कुणाला तरी."
"आमच्या कुणी ओळखीचं नाही त्यात."
"चालतंय."
"चालतंय काय? आम्हाला नाही चालणार." तिघींपैकी कुणाचा तरी आवाज चढला.
"हे बघा, हे पण चालणार नाही." सप्पाट स्वर.
"काय चालणार नाही?" हळूहळू आमचे आवाज वेगवेगळ्या टिपेला पोचले.
"हेऽऽऽ" कागदाच्या चळतीतला  कुठलातरी कागद फलकावत कर्मचारी उत्तरला. दोन्ही बाजूने वणवा पेटल्यासारखंच झालं.  पोस्ट कर्मचारी आणि ३ गिर्‍हाइकं यांची तिथे जी काय जुगलबंदी सुरु झाली ती झाली. मला धड काहीच माहीत नाही त्यामुळे आपण फक्त २ बहिणींची बाजू घ्यायची या निकराने मीही पोस्ट लढवायला घेतलं.
"ओ, मी लिहिते हा प्येपरात. थांबा आता तुमच्याबद्दल लिहितेच." कर्मचार्‍याच्या चेहर्‍यावरची माशीही हलली नाही.
"पुरे तुझ्या त्या लिखाणाचं कौतुक. काहीतरी लिहशील आणि आपलं काम होणार असेल तर तेही व्हायचं नाही." बहिणीने हाताला धरुन मला मागे ओढत म्हटलं. पण कर्मचार्‍याच्या हातात कोलीत मिळालं होतं. त्याने असहकार पुकारायचं नेहमीचं धोरण तेवढ्याच उत्साहाने पुन्हा राबवलं.
"मी काही करु शकत नाही. तुम्ही पोस्टमास्तर कापश्यांना भेटा. ते म्हणतील तसं करु."
"भेटतोच. २ महिन्यापूर्वी हेच काम होतं तेव्हा ही कागदपत्र चालली. साक्षीदार म्हणून बहिणही चालली. तुम्ही ना गिर्‍हाईकाला अडवायचं कसं हेच बघता. हे आणा, ते आणा, ते नाही, हे चालायचं नाही.  आधीच नीट सांगा ना सगळं. आणि दर २ दिवसांनी नियम बदलतात कसे? अं कसे हो बदलतात तुमचे नियम? सांगा कशाला गुंतवायचे आम्ही पैसे तुमच्या पोस्टात? ..." कर्मचार्‍याने पुन्हा नजर संगणकावर खिळवली त्यामुळे पुढची वाक्य टाकायला आम्ही कापश्यांकडे पोचलो.

तीन बायका एकदम आत आल्याने हल्ला झाल्यासारखे आधी कापशे बावचळले. मग निर्विकार चेहर्‍याने त्यांनी आमच्याकडे पाहिलं. तो निर्विकारपणा शेवटपर्यंत तसाच राखलाही.  एव्हांना बाहेरची हजारो गिर्‍हाईकं आणि पोस्टातले कधीही न हसणारे कर्मचारी कामं टाकून शिनेमा बघायला मिळाल्याचा आनंद लुटायला लागले. आम्ही हातातले अनेक कागदपत्र नाचवित, कधीकधी त्यांच्यासमोरच्या टेबलावर ठेवत आम्हाला मॅच्युअर्ड झालेल्या विकासपत्राचे पैसे मिळायलाच हवेत ते पटवून दिलं. कापश्यांनी तितक्याच निर्विकारपणे ’त्या’ कर्मचार्‍याला बोलावलं,
"साहेब, मागच्यावेळेला आपण ॲडजेस्ट केलं ते करायलाच नको होतं..." ॲडजेस्ट हा शब्द ऐकला आणि आम्ही तिघी वेगवेगळ्या तर्‍हेने उखडलो.  मला नक्की काय चालू आहे ते कळत नसलं तरी आम्ही  भारत देशाचे प्रामाणिक सक्षम नागरिक (बहिणी) असल्याने कुणालाही काही ’ॲडजेस्ट’ करायला लावत नाही हे पक्कं ठाऊक होतं. मी बिनदिक्कत प्रामाणिक सक्षम नागरिकाची बाजू मांडली.
"आम्ही नव्हतं तुम्हाला ॲडजेस्ट करायला सांगितलं. हेच कागद आहेत असं तुम्हीच म्हणाला होतात."  याच अर्थी उरलेल्या दोघींनी तोंडसुख घेतलं तसं कर्मचारी त्याच्या साहेबांकडे मदतीच्या अपेक्षेने पाहत राहिला. कापशेंना एकदम पोस्टाचं कामकाज आमच्यामुळे कमीतकमी २ तास थांबल्याचं जाणवलं असावं. ते म्हणाले.
"लगेच करतो तुमचं काम" क्षणभर सन्नाटाच. भांडांयचे बरेच मुद्दे तसेच राहिले होते  आमचे. आणि मुख्य म्हणजे आम्हाला तिघींना एकमेकींशी न भांडता तिसर्‍याशी एकत्रित भांडता येतं याचाही साक्षात्कार झाला होता त्यामुळे इतक्यात भांडण संपून कसं चालेल?
"अहो असं काय? एकदम असं कसं काम होईल?" आम्ही तिघी काकुळतीलाच आलो.
"झालं ना. लगेच देतो तुमचा चेक. बाहेरुन घ्या." त्यांनी प्रकरण संपवलंच. चाकातली हवा गेल्यासारख्या आम्ही बाहेर आलो. भानावर आल्यावर, बघे आपापल्या कामाला लागण्याआधी आतल्या आणि बाहेरच्या बघ्यांकडून ५-५ रुपये करमणूक आकार मी वसूल करुन टाकला. बहिणीकडे  पैसे दिले,
"हे काय?"
"जाताना रिक्षाच्या भाड्याला होतील. कसली करमणूक झाली आज लोकांची.  त्यांनी पण हसत हसत दिले पैसे."  रिक्शाचे पैसे वाचल्याच्या आनंदात बहिण म्हणाली,
"तू राहा रांगेत उभी."
"बरं. पण तुम्ही दोघी काय करणार?" असं विचारेपर्यंत चाकाची बॅग उघडून त्यातली सतरंजी तिने अंथरलीही  कोपर्‍यात. दुसर्‍या बहिणीने डब्याची झाकणं उघडली. माझ्याकडे बघून दोघी म्हणाल्या.
"गेल्या दोन्ही वेळेला तू नव्हतीस. चार चार दिवस यावं लागत होतं. दिवसभर इथेच. त्यामुळे अशी व्यवस्था करावी लागते." हे त्या दोघी सांगतायत तेवढ्यात एका माणसाने घाईघाईने त्यांच्यासमोर थर्मास उघडला,
"घ्या आमचं आत्ताच झालंय. ताक आहे." पोस्टातल्या सुखदु:खाच्या गोष्टी करत मग तो तिथेच बसला.  आपापला नंबर ठेवून त्या दोघींभोवतीचं पोस्टातल्या गिर्‍हाइकांचं कोंडाळं बदलत होतं.

पुढच्याला लागणारा किमान अर्धा तास पाहिल्यावर माझा नंबर ठेवून मध्येच मीही जेवून आले. शेवटी अखेर पोस्ट ’सर’ झालं. काम झालंच च्या समाधानात मी विजेत्यासारखी  काचेच्या अलिकडे. पलिकडे कर्मचारी कसलेतरी आकडे लिहिण्यात मग्न.  त्यात उजवीकडची विकास पत्र आणि डावीकडची जेष्ठ नागरिक पाटी सतत डोळ्यासमोर.
"किती वेळ लागेल हो अजून?" कर्मचार्‍याने आठ्या घालून का होईना चक्क माझ्याकडे पाहिलं.
"हे बघा. इथे लिहिलं आहे विकास पत्र आणि इथे जेष्ठ नागरिक. विकास पत्राची वाट पाहत पाहत  जेष्ठ नागरिक व्हायची वेळ होईल. इतके तास उभी आहे मी इथे." हा असा विनोद पहिल्यांदाच ऐकल्यासारखा तो कर्मचारी जोरात हसला आणि धनादेश हातात येण्याआधीच मी पोस्टातला कर्मचारी हसला या धक्क्याने खाली कोसळले.