चित्रपटाची सुरुवात होते ती माध्यमिक शाळेतला विद्यार्थी सायमन मधल्या सुट्टीनंतर इतर मुलांच्या आधी वर्गाच्या दिशेने जात आहे या दृश्याने. वर्गाचं दार उघडण्यापूर्वी त्याचं लक्ष दाराच्या आयताकृती काचेतून आत जातं आणि धक्कादायक दृश्यांने तो क्षणभर जागीच खिळतो. गळफास लावून आत्महत्या केलेली वर्गशिक्षिका. सायमन सुन्न मनाने भिंतीला पाठ टेकून उभा राहतो, घंटा वाजायला लागते तेव्हा सैरभैरपणे धावत सुटतो. कॅमेरा स्थिर असतो, आपण फक्त सायमनच्या पावलांचे आवाज ऐकत रहातो. त्यानंतर दिसतात ती मैदानातून परत आलेली मुलं, त्यांच्या शिक्षिका त्यांना वर्गात न जाण्याच्या देत असलेल्या सूचना आणि पुन्हा बाहेर जाणारी मुलं. ॲलिस मात्र या गोंधळातूनच हळूच दाराच्या फटीतून आत डोकावते. पुन्हा एकदा गळफास लावून घेतलेली शिक्षिका आपल्याला दिसते. लांबून. तिचा चेहरा पूर्ण चित्रपटात कधीही दाखवलेला नाही.
शाळा या दु:खद घटनेतून बाहेर येण्यासाठी मार्ग शोधत रहाते. भिंतीना नवा रंग दिला जातो. मुलांनी मोकळेपणे बोलावं म्हणून शाळेतर्फे मानसोपचारतज्ञाची नेमणूक होते. दरम्यान, आत्महत्या केलेल्या मार्टिनच्या जागी कुणाला नेमावं या पेचात असतानाच बशिर लझार वर्तमानपत्रात बातमी वाचून बदली शिक्षकाच्या जागेसाठी शाळेत येतात. शाळेत घडलेल्या आत्महत्येच्या प्रसंगानंतर काम करायला यायलाही कुणी धजावत नसतं त्यामुळे त्वरित, फारसा विचार न करता लझारची नेमणूक होते.
शिक्षक म्हणून शांत, प्रामाणिक असलेले लझार आणि ’त्या’ वर्गातल्या मुलांचे सूर मात्र जुळत नाहीत. फ्रेंच उच्चारातील फरकामुळे अडचणी येत रहातात. त्यातच शिक्षक, पालक सारेच झालेल्या घटनेबद्दल मौन बाळगून आहेत. वर्गातही याबाबत बोलू नये अशा लझारना सूचना आहेत. मुलाने केलेल्या खोडीबद्दल लझारनी मारलेल्या हलक्याश्या टपलीबद्दल त्यांना कोणत्याही कारणासाठी मुलांना स्पर्श न करण्याची ताकिद प्राचार्याकडून मिळते.
मार्टिनच्या आत्महत्येचा परिणाम प्रत्येकावर झालेला आहे. लझारना मुलांनी मन मोकळं करावं असं वाटतं. शेवटी या विषयाबद्दल ’ब्र’ ही न काढण्याची सूचना धुडकावून मुलांना बोलायला उद्युक्त करण्याचे प्रयत्न जारी राखतात, मात्र सहशिक्षिकेने सुचवूनही स्वत:च्या जीवनाबद्दल मौन बाळगतात.
वर्गातली सगळीच मुलं अस्वस्थ आहेत. सक्त ताकिद असूनही लझार मुलांना ’बोलतं’ करतात. मुलं म्हणतात,
"प्रत्येकाला वाटतं मार्टिनच्या आत्महत्येने आमच्या मनावर परिणाम झाला आहे पण खरं तर मोठ्यांच्या मनावरच तो तसा झाला आहे."
ॲलिसच्या भावना आपल्यालाही गलबलून टाकतात. हिंसा या विषयाबद्दल बोलताना अचानक ती म्हणते,
"ही तीच शाळा आहे की जिथे मिस मार्टिनने स्वत:ला गळफास लावून घेतला. कधी कधी वाटतं, मिस मार्टिननी त्यांच्या कृतीने चुकीचा संदेश का दिला आम्हाला? आम्ही चुक केली की शिक्षा मिळते तशी मला मिस मार्टिनला शिक्षा द्यावीशी वाटते चुकीची गोष्ट केल्याबद्दल. पण आता ती कशी देणार?" ती बोलत असताना सायमन अस्वस्थ होत जातो.
लझारना ॲलिसचे मनोगत पूर्ण शाळेत प्रसिद्ध करावंसं वाटतं, पण प्राचार्यांना मात्र ॲलिसच्या मनोगतात उद्धटपणाची झाक दिसते. मार्टिनचा अनादर वाटतो. लझार म्हणतात,
"कोणालाही जीवन संपवाव असं वाटतं यासारखी दु:खद घटना नाही आणि शिक्षकी पेशा असलेली व्यक्ती त्यासाठी शाळा निवडते ह्याबद्दल मनात विषाद दाटून येतो. शाळेत गळफास लावून मुलांच्या बाबतीत मिस मार्टिनने जे केलं तो अनादर आहे. मुलांच्या भावविश्वाचा केलेला अनादर."
सायमनचं वागणंही विचित्र होत चाललेलं आहे. त्याला शिक्षा करावी की नाही यावर शिक्षक, प्राचार्य कुणामध्येही एकमत नाही. लझार, मिस मार्टिनच्या कृतीमुळे सायमन अस्वस्थ आहे, त्याच्या मनावर या घटनेचा विपरीत परिणाम झाला आहे हे कळकळीने पटवून द्यायचा प्रयत्न करतात पण याबाबत कुणीही त्यांच्याशी सहमत नाही. काही काळाने सायमनच्या वागण्यातल्या विसंगतीचा उलगडा होतो तेव्हा मुलं किती पटकन स्वत:ला परिस्थितीबद्दल दोष देतात, जबाबदार धरतात ते पाहून हेलावून जायला होतं.
लझारना शेवटी ती शाळा सोडून जाण्यासाठी भाग पाडलं जातं. अगदी ताबडतोब. का...? मुलांचा निरोप घेण्याची त्यांची विनंती प्राचार्य नाईलाजाने मान्य करतात. काय होतं या शेवटच्या प्रसंगात? का आग्रह असतो लझार यांचा विद्यार्थ्यांचा निरोप घेण्याचा ...?
फिलीप फलारड्यू लिखित आणि दिग्दर्शित फ्रेंच भाषेतील हा चित्रपट आहे. युरोपमधील विनोदी कलाकार म्हणून ओळखल्या जाणार्या फेलाग या नटाने लझारची भूमिका केली आहे. तर सोफी नेलसी आणि एमलिन निरॉन या दोन मुलांनी ॲलिस आणि सायमनच्या भूमिका सुंदररित्या साकारल्या आहेत.
परकिय भाषेतील भाषांतरीत संवाद वाचताना चित्रपटातील दृश्य पुढे सरकून जातं म्हणून चित्रपट पहाण्याची उत्सुकता वाढावी इतपत ही कथेची ओळख.
(हा चित्रपट नेटफ्लिक्स वर आहे)