Friday, April 27, 2012

श्रद्धा


मध्यंतरी मैत्रीणीकडे वैभवलक्ष्मी व्रताच्या उद्यापनासाठी गेले होते. देवीचं महात्म्यं सांगताना कुणीतरी म्हणालं.
"सगळं नीट करावं लागतं नाहीतर प्रत्यय देतेच देवी."
"म्हणजे?"
 तिने आपल्या मैत्रीणी बाबत घडलेली घटना सांगितली. व्रताच्या दिवशी मैत्रीण अचानक आजारी पडली.  रुग्णालयात हलवावं लागलं. पोटदुखीने बेजार झाली होती. विचार केल्यावर लक्षात आलं की व्रताच्या दिवशी आंबट खाल्लं होतं.

 देवीचा महिमा म्हणून दिलेलं हे उदाहरण. हळदीकुंकु, पादुका आगमन, व्रतं, भोंडला असं परदेशात राहूनही करतात म्हणून कौतुक करायचं की माणसाच्या श्रद्धेचा, भक्तीचा अतिरेक कुठे पोचवणार याची चिंता करायची? असं काही ना काही मनात  घोळत राहिलं. त्या अस्वस्थतेतून जन्माला आलेली ही कविता.

माणूस

भग्न मंदिराच्या एकेक पायर्‍या
ती चढत होती
देवळातल्या देवीलाच जाब विचारायला
जात होती
चढताना तिला कळलंच नाही
तिची वाट बंद होत होती
पायरी पायरी ढासळत होती!

देवीने सुटकेचा श्वास सोडला
बाई गं, किती जणांचे प्रश्न सोडवू?
त्यापेक्षा दोघी एकदमच ब्रम्हदेवाकडे जाऊ!

रस्त्यावरुन,
एक भक्त विस्मयाने पहात होता,
 आपलं गार्‍हाणं कुठे घालावं हा मोठा पेच होता
समोर, देऊळ स्त्रीसह
जमीनदोस्त होत होतं
आणि त्याचं ’माणूसपणही’!
कोणतातरी देव शोधायचंच
काम महत्त्वाचं होतं
त्यापुढे त्या स्त्रीचं जीवन क्षुल्लक होतं
हेच तर त्या देवाचंही दु:ख होतं!



Friday, March 23, 2012

काय म्हणायचं याला?

"गोष्ट वाचली तू लिहलेली" माझी  मैत्रीण म्हणाली.
"वाचलीस का?" माझा निरर्थक प्रश्न.
"तुला इतकं का वाटतंय, म्हणजे  तुझ्या आईचं वय अगदी चाळीस, पंचेचाळीस नव्हतं. एकोणसत्तर ना? "
 एकदम अस्वस्थपणा भरुन आला मनात.  उत्तर सुचेना म्हणून म्हटलं.
"मी लांब असते म्हणून वाटत असेल."  खरं तर म्हणावंस वाटत होतं. परदु:ख शीतलच असतं बाई, जोपर्यंत आपले आई वडिल जात नाहीत तोपर्यंत माणसाला नाही समजत त्यातली वेदना. हे असं काही म्हटलं तर तिला राग येईल, ती दुखावली जाईल म्हणून गप्प बसले.
ती माझ्या ’पूल’ कथेबद्दल (ब्लॉगवर आहे) बोलत होती.  आई गेल्यावर मनातल्या भावना कागदावर उतरलेली ती कथा आहे.

फेसबुकवर गप्पा चालल्या होत्या चुलत चुलत बहिणीबरोबर.
"मागच्यावेळसारखं, तू आलीस  की भेटायचं मनात होतं."
"हो ना." माझा त्रोटक प्रतिसाद.  भारतात होते तेव्हा फोन करायला जमलं नाही का? असं विचारावंसं वाटत होतं तेवढ्यात तिच म्हणाली,
"काकू गेल्यावर वेळच झाला नाही फोन करायला."
"मी, ताई (माझी बहिण) आम्ही वाट पाहिली तुझ्या फोनची."
"रात्री एक दोन वाजेपर्यंत अभ्यास, दिवसा नोकरी...." तिने ती कशी कार्यमग्न होती तेच सांगायला सुरुवात केली.
माणसं खरंच इतक्या व्यापात असतात की फेसबुकवर गप्पा मारु शकतात पण सात्वनाचे चार शब्द बोलायला वेळच्या वेळी त्यांना जमत नाही?.

"आता वडिलाचं काय करणार?"
वडिलाचं काय करणार? ती काय एखादी वस्तू आहे की इथे ठेवणार की तिथे ठेवणार?
"बघू." अजून विचार नाही केलेला.  त्यांना काय वाटतं हे महत्त्वाचं.
"एकटे कसे रहातील. तुम्ही घेऊन जा बहिणीपैकी कुणीतरी."
"हो, पण त्यांना काय वाटतं ते महत्त्वाचं ना." मग इथून पुढे त्याच अर्थी पण वेगवेगळे शब्द असलेल्या संभाषणाचं दळण.
 आई गेल्यावर पहिल्या दहा दिवसात हे असंच, खूप जणांबरोबर.

आई गेल्यावर सवाष्ण म्हणून आलेल्या बाईंचा वडिलांना फोन,
"तुम्ही घर विकता आहात असं कानावर आलं. विकणार असाल तर आम्हाला हवं आहे."
"पण आम्ही तर कोणाकडे बोललेलो नाही घर विकायचं आहे म्हणून." शांतपणे वडिल.
"नाही म्हणजे आम्हाला वाटलं, आता तुम्ही एकटे कसे रहाणार, मुलींकडे जाणार असाल...."
वडिल नुसतेच हसले. त्या बाईंनी पुन्हा खुंटा बळकट केला.
"पण विकणार असाल तेव्हा आम्हालाच सांगा पहिल्यांदा."
या बाईं आईसाठी आल्या तेवढ्यात किती निरिक्षण केलं असेल नाही? म्हणजे, मुलीच आहेत यांना, जातीलच इथून, घर विकतील वगैरे....
याला काय म्हणायचं? येतात का असे अनुभव तुम्हाला देखील? म्हणजे, माणसं नको त्या ठिकाणी नको ते बोलतात, नको तसं वागतात.....आणि आपण काही आक्षेपार्ह करतो आहोत हे त्यांच्या गावीदेखील नसतं. उत्तर द्यायला गेलं तर आम्ही तर प्रेमाने, चांगल्यासाठी.....इत्यादी ऐकावं लागतं. काय करायचं अशावेळेस?  मनुष्यस्वभाव, ज्याचं जळतं त्याला कळतं असं मनात म्हणत गप्प बसायचं?, की होता है  ऐसा....असं म्हणून सोडून द्यायचं?