Friday, April 27, 2012

श्रद्धा


मध्यंतरी मैत्रीणीकडे वैभवलक्ष्मी व्रताच्या उद्यापनासाठी गेले होते. देवीचं महात्म्यं सांगताना कुणीतरी म्हणालं.
"सगळं नीट करावं लागतं नाहीतर प्रत्यय देतेच देवी."
"म्हणजे?"
 तिने आपल्या मैत्रीणी बाबत घडलेली घटना सांगितली. व्रताच्या दिवशी मैत्रीण अचानक आजारी पडली.  रुग्णालयात हलवावं लागलं. पोटदुखीने बेजार झाली होती. विचार केल्यावर लक्षात आलं की व्रताच्या दिवशी आंबट खाल्लं होतं.

 देवीचा महिमा म्हणून दिलेलं हे उदाहरण. हळदीकुंकु, पादुका आगमन, व्रतं, भोंडला असं परदेशात राहूनही करतात म्हणून कौतुक करायचं की माणसाच्या श्रद्धेचा, भक्तीचा अतिरेक कुठे पोचवणार याची चिंता करायची? असं काही ना काही मनात  घोळत राहिलं. त्या अस्वस्थतेतून जन्माला आलेली ही कविता.

माणूस

भग्न मंदिराच्या एकेक पायर्‍या
ती चढत होती
देवळातल्या देवीलाच जाब विचारायला
जात होती
चढताना तिला कळलंच नाही
तिची वाट बंद होत होती
पायरी पायरी ढासळत होती!

देवीने सुटकेचा श्वास सोडला
बाई गं, किती जणांचे प्रश्न सोडवू?
त्यापेक्षा दोघी एकदमच ब्रम्हदेवाकडे जाऊ!

रस्त्यावरुन,
एक भक्त विस्मयाने पहात होता,
 आपलं गार्‍हाणं कुठे घालावं हा मोठा पेच होता
समोर, देऊळ स्त्रीसह
जमीनदोस्त होत होतं
आणि त्याचं ’माणूसपणही’!
कोणतातरी देव शोधायचंच
काम महत्त्वाचं होतं
त्यापुढे त्या स्त्रीचं जीवन क्षुल्लक होतं
हेच तर त्या देवाचंही दु:ख होतं!



5 comments:

  1. छान कविता. तरुण पिढी जास्त श्रद्धाळू झाली आहे. देवदर्शनासाठी रांगेत ताटकळत तासन तास उभे रहातात तेव्हा सांगावं वाटतं की बाबांनो ज्यासाठी प्रार्थना करणार आहात ते काम देवदर्शना आधी होई,ल प्रयत्न केलात तर.

    ReplyDelete
  2. सुंदर कविता. आम्ही रहातो त्या भागातही या सर्वाचा सुकाळ आहे. शिकली सवरलेली माणसं किती भ्रामक समजुती बाळगून असतात याचा खेद वाटतो.

    ReplyDelete
  3. देवाचही दु:ख .. ही कल्पनाच आवडली ..

    ReplyDelete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.