Friday, March 23, 2012

काय म्हणायचं याला?

"गोष्ट वाचली तू लिहलेली" माझी  मैत्रीण म्हणाली.
"वाचलीस का?" माझा निरर्थक प्रश्न.
"तुला इतकं का वाटतंय, म्हणजे  तुझ्या आईचं वय अगदी चाळीस, पंचेचाळीस नव्हतं. एकोणसत्तर ना? "
 एकदम अस्वस्थपणा भरुन आला मनात.  उत्तर सुचेना म्हणून म्हटलं.
"मी लांब असते म्हणून वाटत असेल."  खरं तर म्हणावंस वाटत होतं. परदु:ख शीतलच असतं बाई, जोपर्यंत आपले आई वडिल जात नाहीत तोपर्यंत माणसाला नाही समजत त्यातली वेदना. हे असं काही म्हटलं तर तिला राग येईल, ती दुखावली जाईल म्हणून गप्प बसले.
ती माझ्या ’पूल’ कथेबद्दल (ब्लॉगवर आहे) बोलत होती.  आई गेल्यावर मनातल्या भावना कागदावर उतरलेली ती कथा आहे.

फेसबुकवर गप्पा चालल्या होत्या चुलत चुलत बहिणीबरोबर.
"मागच्यावेळसारखं, तू आलीस  की भेटायचं मनात होतं."
"हो ना." माझा त्रोटक प्रतिसाद.  भारतात होते तेव्हा फोन करायला जमलं नाही का? असं विचारावंसं वाटत होतं तेवढ्यात तिच म्हणाली,
"काकू गेल्यावर वेळच झाला नाही फोन करायला."
"मी, ताई (माझी बहिण) आम्ही वाट पाहिली तुझ्या फोनची."
"रात्री एक दोन वाजेपर्यंत अभ्यास, दिवसा नोकरी...." तिने ती कशी कार्यमग्न होती तेच सांगायला सुरुवात केली.
माणसं खरंच इतक्या व्यापात असतात की फेसबुकवर गप्पा मारु शकतात पण सात्वनाचे चार शब्द बोलायला वेळच्या वेळी त्यांना जमत नाही?.

"आता वडिलाचं काय करणार?"
वडिलाचं काय करणार? ती काय एखादी वस्तू आहे की इथे ठेवणार की तिथे ठेवणार?
"बघू." अजून विचार नाही केलेला.  त्यांना काय वाटतं हे महत्त्वाचं.
"एकटे कसे रहातील. तुम्ही घेऊन जा बहिणीपैकी कुणीतरी."
"हो, पण त्यांना काय वाटतं ते महत्त्वाचं ना." मग इथून पुढे त्याच अर्थी पण वेगवेगळे शब्द असलेल्या संभाषणाचं दळण.
 आई गेल्यावर पहिल्या दहा दिवसात हे असंच, खूप जणांबरोबर.

आई गेल्यावर सवाष्ण म्हणून आलेल्या बाईंचा वडिलांना फोन,
"तुम्ही घर विकता आहात असं कानावर आलं. विकणार असाल तर आम्हाला हवं आहे."
"पण आम्ही तर कोणाकडे बोललेलो नाही घर विकायचं आहे म्हणून." शांतपणे वडिल.
"नाही म्हणजे आम्हाला वाटलं, आता तुम्ही एकटे कसे रहाणार, मुलींकडे जाणार असाल...."
वडिल नुसतेच हसले. त्या बाईंनी पुन्हा खुंटा बळकट केला.
"पण विकणार असाल तेव्हा आम्हालाच सांगा पहिल्यांदा."
या बाईं आईसाठी आल्या तेवढ्यात किती निरिक्षण केलं असेल नाही? म्हणजे, मुलीच आहेत यांना, जातीलच इथून, घर विकतील वगैरे....
याला काय म्हणायचं? येतात का असे अनुभव तुम्हाला देखील? म्हणजे, माणसं नको त्या ठिकाणी नको ते बोलतात, नको तसं वागतात.....आणि आपण काही आक्षेपार्ह करतो आहोत हे त्यांच्या गावीदेखील नसतं. उत्तर द्यायला गेलं तर आम्ही तर प्रेमाने, चांगल्यासाठी.....इत्यादी ऐकावं लागतं. काय करायचं अशावेळेस?  मनुष्यस्वभाव, ज्याचं जळतं त्याला कळतं असं मनात म्हणत गप्प बसायचं?, की होता है  ऐसा....असं म्हणून सोडून द्यायचं?

11 comments:

  1. माणसं अशी का वागतात हे कोडंच आहे, पण आपणही वेळच्यावेळी त्यांना उत्तर देऊन मोकळं व्हायला हवं. म्हणजे पुन्हा पुन्हा तशी संधी मिळत नाही. माझे हे अनुभवाचे बोल आहेत.

    ReplyDelete
  2. सीमा धन्यवाद. खरं आहे तुमचं म्हणणं. नेमकं तेच जमत नाही आणि नंतर वेळ निघून गेली म्हणून राहून जातं.

    ReplyDelete
  3. माणसाचा स्वभाव... सोडून द्यायचं - ते मजेत असतात , आपण कशाला त्रास करून घ्यायचा? ही आपली माणसं नव्हेत इतकी खूणगाठ फक्‍त बांधायची मनात!

    ReplyDelete
  4. सविता, छान वाटलं तुमची प्रतिक्रिया पाहून. सोडून द्यायचं हे खरं पण माणसाचा स्वभाव इथेही नडतोच :-). सोडता येत नाही.

    ReplyDelete
  5. धन्यवाद सुदीप आणि ब्लॉगवर स्वागत!

    ReplyDelete
  6. खरंच अशी माणसं भेटतात ज्यांना "साधा कॉमन" सेन्स नसतो. मग आपलीच उगीच चिडचिड होते... आणि पुन्हा त्यांच्याशी बोलण्याची इच्छा होत नाही ते तर वेगळंच...

    ReplyDelete
  7. इंद्रधनु, अगदी खरं, पुन्हा अशी माणसं आपल्याच वाट्याला का हे प्रश्नचिन्ह सोबत रहातं ते वेगळंच :-)

    ReplyDelete
  8. this is the time to relise who is or isn't yours and declutter by just removing them from your 'friends list' of life. I am sorry you had to go through this. But people lack common sense and they just don't know when to say what. Seriously. I know it is not that they are hurting you, they are actually demeaning the value of the person they speak of (your parents) that bothers oneself. Tu traas nako karun gheus...it isn't worth it. Hugs.

    ReplyDelete
  9. वंदना, तुझ्या शब्दांनी खूप बरं वाटलं. कळतं गं की दुर्लक्ष करायला हवं आणि हे ही कि अशा लोकांना/मैत्रीणींना आपण दुसर्‍याच्या भावना दुखावतो आहोत याची जाणीवच नसते, पण आपण किती दुसर्‍याचा विचार करुन बोलतो, कुणी दुखावलं जाऊ नये याची काळजी घेतो, त्यामुळे हे असं कुणी वागलं की खटकत रहातं.

    ReplyDelete
  10. savedanashil lok kammi zalet asee waatatee..:( n maag tycha tras aplya sarkheya emotional lokana hoto.

    ReplyDelete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.