Saturday, March 26, 2016

जग

मुलाने कागद पुढे केला. चित्र विचित्र नावं पाहून मी बुचकळ्यात पडले.
"ही तुझ्या मित्रमैत्रींणीची नावं आहेत का?" कुठली अज्ञानी आई आपल्या पदरात पडली अशा नजरेने त्याने माझ्याकडे पाहिलं आणि काय नावं ही हल्लीच्या मुलांची अशा नजरेने मी त्याच्याकडे.
"जिबुटी, पापुआ न्यू गुनिआ,  नाउरु... अरे हे सगळे मित्र मैत्रीणी येणार आहेत का तुझ्याबरोबर जग प्रवासाला?" त्याचे गरागरा फिरणारे डोळे तो थांबवेना. त्यामुळे मी विषय विसरुन म्हटलं,
"थोबाडीत देईन आता असे डोळे फिरवलेस तर." त्याने डोळे फिरवणं थांबवलं आणि गुरगुरत विचारलं.
"तुम्ही तुमच्या आई - वडिलांवर भडकलात की डोळे फिरवत नव्हता?"
"पुटपुटायचो." लगेच नवर्‍याने  तोंड खुपसलं. ह्याला बाई एक वेळेवर खोटं म्हणून बोलता येत नाही. पटकन बाजू लढवत मी म्हटलं.
"आमची नव्हती हिंमत. आणि आम्ही फिरवले असते तर त्यांनी कायमचे ते फिरवूनच ठेवले असते." त्याला फार काही कळलं नसावं.
"मग काय करायचात?"
"आम्ही तुमच्यासारखे चक्रम नव्हतो. त्यामुळे तशी वेळच आली नाही कधी."
"आम्ही म्हणजे कोण?" तो गोंधळला.
"मी."
"मग तू तुला ’आम्ही’ का म्हणतेस?" तू तर सांगितलं होतंस राजे- महाराजे, पेशवे असं करायचे.
"माझ्या अख्ख्या पिढीची बाजू मांडताना मी स्वत:ला आदरार्थी संबोधते." पुन्हा एकदा त्याच्या सगळं डोक्यावरुन गेलं असावं. पण हल्ली तो फार वेळ जातो म्हणून प्रत्येक शब्दाचा अर्थ विचारत नाही. सारांश शोधून काढतो.
"हो का?" त्याच्या त्या हो का तून तो काहीही ऐकत नव्हता हे मला कळलं. पण आता मलाही त्या विचित्र नावांच्या मुलामुलींमध्ये रस जास्त होता. पोरगा नक्की कुणाबरोबर उंडारतो हे तर कळायला हवं ना."
"ते जाऊ दे. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस." मी विषय पुन्हा योग्यं ठीकाणी वळवला. काहीतरी गौप्यस्फोट करणार असल्यासारखं त्याने घरातल्या इन मिन तीन माणसांकडे पाहिलं आणि दवंडी पिटवल्यागत ओरडला,
"ती देशांऽऽऽऽची नावं आहेत." माझा चेहरा इमोजी मधल्यासारखा भयानक, आश्चर्यचकित वगैरे  झाला.  तेवढ्यात त्याने विचारलं.
"तुला जिओग्राफी विषय नव्हता का शाळेत?" मुलगी ओरडली.
"अरे, भूगोल म्हण. नाहीतर आईचं पुन्हा सुरु होईल." नुकतीच होळी झाली होती पण दोघांच्या मानगुटीला धरुन त्यांना रंगीत पाण्यात बुचकळून काढावसं वाटलं.
"भूगोल विषय नव्हता तुला?" त्याने बहिणीचं मुकाट ऐकलं.
"शिक्षक चांगले नव्हते आमचे."
"तू पुन्हा तुझ्या अख्ख्या पिढीबद्दल बोलतेयस का? " ऐकत होता म्हणजे कार्टा आधी.
"हो. हे बघ आम्हाला त्यांनी सांगितलेले देश आम्ही पाठ केले होते. भूगोलात पहिली येत होते मी शाळेत." दोन्ही मुलं पोट धरुन हसायला लागली. त्यात इतका वेळ बर्‍यापैंकी तटस्थाची भूमिका घेतलेला नवराही शिरला.
"आईचं ना नाचता येईना अंगण वाकडं झालंय." खाऊ का गिळू नजरेने मी मुलीकडे पाहिलं. ही एक  मराठीच्या वर्गात बसते आणि मी शिकवलेल्या म्हणी माझ्यावरच वापरते.
"आणि तरी ती तू केलेल्या पोळ्यांना भूगोल झालाय असं म्हणते." तिघांनी एकमेकांना उत्स्फुर्तपणे जोरदार टाळ्या  दिल्या.  मी मात्र तिघांकडे बघून डोळे गरागरा फिरवले.

Saturday, March 19, 2016

जाडी

शाळेच्या मित्रमैत्रींणींची whatsapp वर चर्चा रंगली होती. शाळेत असताना कोण कसं जाड होतं आता कश्या शेटाण्या झाल्या आहेत अशा अर्थी. यात एकमेकींची वजनावरुन खिल्ली उडविणार्‍या मुलीच जास्त होत्या. अर्थात शाळेत अमकी तमकी कशी धष्टपुष्ट होती असं म्हणणारे मुलगेही होते. मला मात्र राहून राहून ज्यांच्या वजनावरुन ह्या गप्पा चालल्या आहेत त्यांना काय वाटत असेल असं वाटत होतं. हे आत्ता घडलेलं ताजं उदाहरण. पण आजूबाजूला सतत तेच दिसतं आणि अस्वस्थ व्हायला होतं. मध्ये  एकदा रेल्वेत आमच्यासमोर एक जोडपं बसलं होतं. पती  पत्नीची चेष्टामस्करी करत होता. त्याच्या मुलांना तो म्हणाला,
"तुमची आई म्हशीसारखी सुटली आहे." मी चमकून पाहिलं. पण त्या पुरुषाची मुलं आणि बायको सर्वांनाच ह्या शेर्‍यामध्ये विनोद जाणवला. सगळेच हास्यात बुडाले होते.

आपल्याकडे जाडीवरुन विनोद सर्रास केले जातात आणि मला ते नेहमी खटकतात. कधी कधी वाटतं असं वाटणारी मीच एकटी आहे. पण अशा विनोदामुळे
⦁ ती व्यक्ती बारीक होण्याच्या प्रयत्नात असेल तर अशा वक्तव्यांनी निराश होईल किंवा
⦁तिची/त्याची अंगकाठीच तशी असेल. बारीक असण्यापेक्षाही आरोग्यं संपन्न असणं जास्त महत्वाचं नाही का?
⦁आणि मुख्य म्हणजे तिच्या किंवा त्याच्या बारीक असण्याची तुम्हाला का चिंता? पाहून घेतील ना त्यांचं ते. अशा क्रुर विनोदातून विरंगुळा शोधणारी माणसं  संवेदना शून्य वाटतात मला. तुम्हाला काय वाटतं की तुम्हीही त्याच जातीतले?

Sunday, February 28, 2016

सुपरबोल

(सुपरबोल. दरवर्षी हा खेळ खेळाइतकाच किंबहुना खेळापेक्षा इतर कारणांनीही गाजतो. गेल्या आठवड्यात रविवारी खेळला गेलेला सुपरबोलही याला अपवाद नाही. सुपरबोलचं हे ५० वं वर्ष. मध्यांतरातील कार्यक्रमासाठी गायलेली बियॉन्से या वेळेला वादाच्या भोवर्‍यात अडकली आहे.)

फूटबॉल या खेळाच्या विजेतेपदासाठी दरवर्षी होणारी चुरस म्हणजे सुपरबोल. राष्ट्रीय फूटबॉल संघटनेत (NFL) असलेले ३२ संघ दोन गटात विभागलेले आहेत. ते राष्ट्रीय  फूटबॉल संघ (NFC) आणि अमेरिकन फूटबॉल संघ (AFC) या नावाने ओळखले जातात. दरवर्षी सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात हे संघ सुपरबोलपर्यंत पोचण्यासाठी खेळतात. आणि फ्रेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी अंतिम फेरीपर्यंत पोचलेले दोन संघ विजेतेपदासाठी लढतात.  फेब्रुवारी महिन्याचा  पहिला रविवार ’सुपरबोल सन्डे’ म्हणूनच ओळखला जातो. या ७ फेब्रुवारीला लढत होती कॅरोलायना पॅंन्थर आणि डेनवर ब्रॉन्को या दोन संघामध्ये.

हा खेळ जितका खेळासाठी प्रसिद्ध आहे तितकाच अनेक कारणांसाठी. काहींना खेळाची आवड म्हणून तर काहीजण केवळ जाहिरातीसाठी सुपरबोल पाहतात. मध्यांतरात होणार्‍या कार्यक्रमाचं आकर्षण असणारा वर्गही खूप मोठा आहे. मायकल जॅक्सन, मॅडोना, व्हीटनी ह्युस्टन अशा एकाहून एक नामवंत कलाकारांनी या वेळेला आपले कार्यक्रम सादर केले आहेत.

या वेळेला होते ब्रुनो मार्स, कोल्डप्ले आणि पॉपसिंगर बियॉन्से. बियॉन्से आणि तिच्या सहकारी नर्तिकानी घातलेल्या पोशाखावरून, गाण्यातील शब्दांवरुन सध्या हवा तापलेली आहे. आफ्रिकन - अमेरिकन नागरिकांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लढ्यातील  एक चळवळ म्हणजे ब्लॅक पॅन्थर्स चळवळ. बियॉन्से आणि सहकारी नर्तिकांचा काळ्य़ा रंगाचा पेहराव आणि टोपी या दोन्ही गोष्टी त्या चळवळीतील कार्यकर्त्यांसारख्या होत्या,  नृत्यातून मालकम एक्स या मानवी हक्कासाठी जागरुक असलेल्या आफ्रिकन - अमेरिकन नेत्याबद्दलचा आदर साकारला, तसंच नृत्यातील  मुठी वळवून उंचावलेले हात म्हणजे ’ब्लॅक पॉवर सॅल्यूट’ ची आठवण करुन देण्याचा प्रयत्न होता. १९६८ च्या ऑलिम्पिकमध्ये पदक वितरणाच्या वेळेला  अमेरिकन राष्ट्रगीत सुरु झाल्यावर आफ्रिकन - अमेरिकन विजेत्यांनी मुठी उंचावल्या होत्या तशाच या नृत्यात वापरल्या गेल्या.  बियॉन्सेने सादर केलेल्या नृत्यानंतर चालू झालेल्या या चर्चेत भर पडली ती सुपरबोलच्या आधी म्हणजे शनिवारी बियॉन्सेने तिच्या चाहत्यांसाठी उपलब्ध करुन दिलेल्या  ’फॉरमेशन’  हे शीर्षक असलेल्या गाण्याने. या गाण्यातून  आफ्रिकन - अमेरिकन लोकांवर पोलिसांकडून केले जाणारे अत्याचार थांबवावे असं सुचविण्यात आलं आहे. ते दाखविताना एक छोटा मुलगा रस्त्यावर पोलिसांच्या समोर हाताने थांबण्याची खूण करत उभा आहे असं दाखविलं आहे आणि पोलिसांच्या मागे असलेल्या भिंतीवर ’स्टॉप शूटिंग अॲट अस’ हे वाक्य दिसतं. गाण्यात, पाण्यात बुडणार्‍या पोलिसांच्या गाडीवर बियॉन्से बसलेली दिसते.  या गाण्यातून बियॉन्सेने पोलिसांची प्रतिमा  धुळीला मिळवली असा तिच्यावर आरोप होत आहे. जे पोलिस तिला, जनतेला संरक्षण देतात त्यांची बदनामी अशारितीने करुन बियॉन्सेने काय साधलं असं लोकांना वाटतं.  वर्णभेदाविरुद्ध विरोध दर्शविण्याची सुपरबोल ही योग्यं जागा नाही या मताच्या लोकांनी राष्ट्रीय फूटबॉल संघटनेच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचं निश्चित केलं आहे.

या आधी सुपरबोलच्या इतिहासात गाजलेला प्रसंग म्हणजे  जॅनेट जॅकसन आणि जस्टीन टिंम्बरलेक यांच्या गाण्याच्या वेळेला घडलेली घटना. जस्टीन टिंम्बरलेकच्या हातून ’रॉक युवर बॉडी’ गाणं म्हणताना जॅनेटने घातलेलं जॅकेट चुकून ओढलं गेलं, फाटलं आणि त्यामुळे वक्षस्थळ उघडं पडलं. लाखो लोकांनी हा प्रसंग दूरदर्शनवर पाहिला. वार्डरोब मालफंक्शन म्हणून कुप्रसिद्ध झालेला हा किस्सा कितीतरी महिने वादळ उठवणारा ठरला किंबहुना सुपरबोल म्हटलं की प्रथम या प्रसंगाचीच आठवण आज १२ वर्ष होऊन गेली तरी लोकांच्या मनात ताजी होते. या प्रसंगाची परिणिती म्हणून कोणत्याही कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण बंदच झालं. असे अनपेक्षित लाजिरवाणे प्रसंग टाळण्यासाठी  थेट प्रक्षेपण म्हणून जे आपण पाहतो ते काही क्षणानंतर दाखविलेलं दृश्य असतं. हा प्रसंग ज्यांनी दूरदर्शनवर पाहिला नाही त्यापैकी एक होते जावेद करीम. २००४ साली तो प्रसंग पुन्हा पाहण्यासाठी काही मार्गच नव्हता. आणि नक्की काय घडलं याचं कुतूहल असलेल्या जावेद आणि त्यांचे मित्र स्टीव्ह आणि चॅड यांच्या मनात लोकं स्वत:च चित्रीकरण अपलोड करु शकतील असं संकेतस्थळ निर्माण करण्याची कल्पना आली. या कल्पनेचं मूर्त्य रुप म्हणजेच यु ट्युब. एकाच प्रसंगाने प्रसारमाध्यमामध्ये घडलेले हे २ मोठे बदल!

 सुपरबोल जसा अशा घटनांनी गाजतो तितकाच तो प्रसिद्ध आहे जाहिरातींमुळे. सुपरबोल प्रक्षेपणाच्या दरम्यान  जाहीरात झळकण्यासाठी कंपन्यांना ३० सेकंदांसाठी जवळजवळ ३० लाख डॉलर्स मोजावे लागतात. ’ क्रॅश द सुपरबोल’ अशी स्पर्धाही फ्रिटो ले ही चिप्स उत्पादक कंपनी घेते. २०१६ हे या स्पर्धेचं शेवटचं वर्ष होतं. डोरीटो चिप्सच्या जाहीरात स्पर्धेत हातात कॅमेरा आणि कल्पना असलेल्या कुणालाही भाग घेता येत होता. शेवटच्या वर्षात कंपनीने विजेत्याला हॉलिवूडमध्ये प्रवेश मिळवून देण्याचीही जबाबदारी उचलली आहे. २००६ पासून सुरु झालेल्या या स्पर्धेत २०१३ पासून जभभरातून  कुणीही भाग घेऊ शकत होतं.  आलेल्या जाहिरातीतील कमीत कमी १ जाहिरात या खेळादरम्यान दाखविण्य़ाची हमी कंपनीची. त्याव्यतिरिक्त युएसए टुडे च्या सर्वेक्षणात सर्वात जास्त गुण मिळालेल्या जाहिरातीला ४ लाख ते १० लाख डॉलर्सचं बक्षीसही कंपनीकडून मिळत होतं. या अखेरच्या वर्षी ४५०० स्पर्धकांनी यात भाग घेतला. त्यातील ५० स्पर्धकांनी उपांन्त्यपूर्व फेरी गाठली. उपांन्त्यफेरीतील ३ स्पर्धकांपैकी विजेती ठरली ती ’डोरीटोज डॉग्ज’ जाहीरात. ३ कुत्र्यांना डोरिटो चिप्स खायची इच्छा असते आणि ती ते कशी पुरी करतात ते विनोदीपद्धतीने दाखवलेली ही जाहिरात. अवघ्या १००० डॉलर्समध्ये पूर्ण झालेल्या जाहीरीतीने जेकब चेसला हॉलिवूड मध्ये प्रवेश तर मिळालाच पण त्याचबरोबर १० लाख डॉलर्सही.

युएसए टुडे च्या सर्वेक्षणानुसार व्यावसायिक जाहिरातींमध्ये या वर्षी हंडे कंपनीने बाजी मारली. गाडी आणि गाडीतील अत्याधुनिक यंत्रणेची जाहिरात करणार्‍या  जाहीरातीत मुलगी तिच्या मित्राबरोबर पहिल्यांदाच बाहेर जात आहे. वडील आग्रहाने नवीन हंडे गाडीची किल्ली मुलाच्या स्वाधीन करतात. गाडीमधील ’कार फाईंडर’ मुळे गाडी कुठे आहे ते वडिलांना कळत राहतं आणि त्या त्या ठिकाणी  ते पोचतात, दोघांना ’एकांत’ मिळूच देत नाहीत अशी ही जाहिरात. मुलगा कंटाळून थोड्याच वेळात मुलीला घरी सोडतो. आणि बाबा मुलीला विचारतात, ’मग काय केलं तुम्ही आज?’ आणि जाहिरातीचा शेवट होतो - ’बिकॉज डॅड गोट  डू व्हॉट डॅड गोट टू डू’ या वाक्याने. सुपरबोल मध्ये दाखविल्या गेलेल्या जाहिरातीत विनोद, प्राणी आणि सेलिब्रेटी ह्या ३ गोष्टींचा वापर प्रामुख्याने केलेला होता.

सुपरबोल म्हटलं की जाहिराती, वादग्रस्त घटना जितक्या महत्त्वाच्या तितकेच प्राणीही. दरवर्षी प्राणीही ही स्पर्धा कोण जिंकेल याचा अंदाज वर्तवायला पुढे सरसावतात. एका प्राणी संग्रहालयातील माकडांनी म्हणे त्यांच्यासमोर ठेवलेल्या चिठ्ठ्यांतून कॅरोलायना पॅन्थर लिहिलेला कागद उचलला तर दुसर्‍या प्राणिसंग्रहालयात कासवं संथगतीने मार्गक्रमणा करत ब्रान्को पर्यंत पोचली.  टेडी बेअर नावाच्या साळूचे  फेसबुकवर ४५००० चाहते आहेत तर यु ट्यूबवर २४००० अनुयायी. साळूचे आत्तापर्यंत ४ पैकी ३ अंदाज अचूक ठरले. यावेळीही डेनवर ब्रान्को जिंकतील हा साळूचा अंदाज खरा झाला.

या सगळ्यात सर्वसामान्यांनी तरी का बरं मागे राहावं? पैजा मारण्याची चढाओढ सुपरबोलच्या वेळी खेळात रंगत भरते. कुठला संघ जिंकेल यावरच पैजा मारण्याइतके लोक अल्पसंतुष्ट नाहीत. या वर्षी सुपरबोल होता कॅलिफोर्नियामध्ये. तिथे भूकंप होईल का, बियॉन्से कार्यक्रम सादर करेल तेव्हा कोणत्या रंगाच्या चपला घालेल, खेळ दूरदर्शनवर दाखविला जात असताना शहराला अभिमान असलेला असलेला गोल्डन गेट पूल कितीवेळा दाखवला जाईल, पेटन मॅनिंग निवृत्ती जाहीर करेल का, केली तर ते सांगताना त्याच्या डोळ्यात अश्रू तरळतील का असे  प्रश्न घेऊन एकापेक्षा एक पैजा मारल्या गेल्या. या पैजांमुळे काही काही वेळा कंटाळवाणा होऊ लागलेल्या खेळातही रंगत यायला लागते. तसंही कुणाच्या मनोरंजनाची काय साधनं असतील हे ज्याचं त्यानेच तर ठरवायचं.

आता राहता राहिले खेळाडू. कोणत्याही गोष्टीत यश मिळविण्यासाठी प्रत्येकाकडे ’लाभदायक’ म्हणून काहीतरी गोष्ट असतेच. दोन्ही संघातील खेळाडू याला अपवाद नाहीत. कुणी काळ्या रंगाचे बूट घालतं तर कुणी खेळताना च्युईंगम चघळतं, ते कडक राहिलं तर आपण जिंकणार अशी त्या खेळाडूला खात्री वाटते.

एक ना अनेक... सुपरबोल आणि त्याचे हे असे भन्नाट किस्से! आता काही काळ बियॉन्से प्रकरण चघळायचं आणि नंतर वाट पाहायची ती पुढच्या वर्षीच्या सुपरबोलची. का? अर्थात या सार्‍याच कारणांकरिता...

मोहना प्रुभुदेसाई - जोगळेकर
mohanajoglekar@gmail.com


Monday, February 15, 2016

यु ट्युब

आतापर्यंत आम्ही केलेल्या एकांकिकापैंकी काहींची छोटीशी झलक -  खेळ, महाभारताचे उत्तर - रामायण, भिंत, सांगायचं राहिलंच, वेषांतर, भेषांतर.














आणि इथे एकांकिकांची माहिती