ही कथा मी मुग्धा गोडबोलेंच्या वाचनव्रत उपक्रमात वाचली आहे. इथे वाचा किंवा तिथे ऐका. अभिप्रायही नक्की द्या.
"केवढं बदललं आहे नाही सर्व? बावीस वर्षांनी चाललोय आपण त्यामुळे वाटतंय मला, की खरंच बदललंय सगळं?"
रतन मनापासून हसली.
"अगं तू नाहीस का या बावीस वर्षात बदललीस? मग आम्हीही बदललो तर नवल का वाटतंय तुला?"
"खरं आहे तुझं." शमिकानं विषयच थांबवला. आपण उगाचच धाडस करतोय का सांगोल्याला जायचं हे तिचं तिलाही ठरवता येईना. ती ऑस्ट्रेलियाहून तीन आठवड्यांसाठी सोलापूरला येते काय आणि अचानक बाजारात रतनची गाठ पडते काय, सगळीच अपूर्वाई.
रतननेच तिला ओळखलं. बघता बघता आठवतील त्या मैत्रिणींना फोन करुन रात्र जागवायला त्या एकत्र जमल्याही. सगळ्यांच्या आयुष्यांची बेरीज वजाबाकी झाली. तिच्या ऑस्ट्रेलियन दिनक्रमाबद्दल तर सर्वांनाच कोण उत्सुकता. त्यांच्या कंपूतली परदेशात स्थायिक झालेली ती एकटीच. नकळत गप्पांचा ओघ तिच्याभोवती केंद्रित झाला. पण नोकरीच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात गेलेल्या शमिकाकडे सांगण्यासारखं फारसं काही नव्हतं. बोलण्याच्या ओघात सांगोल्याचा विषय आला तेव्हा मात्र शमिकाला उत्साहाचं भरतं आलं. शाळेतली आणि कॉलेजमधली काही वर्षे रतन आणि ती सांगोल्याला एकत्र होत्या. एकदम दोघींनी सांगोल्याला जायचं ठरवूनही टाकलं. हॉटेलमध्ये उतरायचं की एखाद्या मैत्रिणीकडे ते मात्र ठरता ठरेना. शेवटी दोघींचीही चांगली मैत्रीण असलेल्या नीनाकडे उतरायचं पक्कं झालं. दोन दिवसात त्या निघाल्याही. कधी एकदा सांगोला गाठतोय असं होऊन गेलं तिला. बावीस वर्षांनी ती पुन्हा त्या गावाला चालली होती. अस्वस्थ, अस्थिर, उत्सुक!
गाडी कुरकूर करत थांबली ती विचारांची साखळी खेचत. नीनाचे विचार डोकावायला लागले मनात. अबोल, तशी अलिप्तच राहणारी नीना धर्माच्या बाहेर लग्न करण्याचं धाडस करेल अशी पुसट शंकासुद्धा तिच्या मनात कधी डोकावली नव्हती. नीनानं लग्न केलं तेव्हा ती ऑस्ट्रेलियात होती. तिच्या आईनं ही बातमी सांगितल्यावर शमिकाला धक्काच बसला होता. मनात येऊनही नीनाला पत्र पाठवणं, फोन करणं राहूनच गेलं होतं. आता मात्र मधली सगळी वर्ष पुसून काढायची होती. कसं असेल तिचं घर, नवरा, घरातली मंडळी? मनात विचार फुगडी घालत होते; पण नजर गाडीतल्या त्या बायकांवर खिळली होती. अचानक, या क्षणी रेल्वेतून उतरावं, सांगोल्याला जाऊच नये असं फार तीव्रतेने वाटलं तिला. त्याच तंद्रीत तिने तोंड उघडं टाकून घोरत पडलेल्या रतनला हलवलं. ती गडबडून उठली.
"परत जाऊया सोलापूरला रतन."
"तुला वेड तर नाही ना लागलं? नीना न्यायला येणार आहे स्टेशनवर." झोपमोड झालेली रतन भडकलीच.
"घर मोठं आहे म्हणत होती. तू गेली आहेस कधी?" तिच्या मनात दडून राहिलेल्या शंकांना अचानक तिने वाट मोकळी करून दिली, तरीही शमिकाला स्वच्छता, बाथरूम, घरातली माणसं याबद्दल फटकन विचारता येईना.
"नाही पण एकदम तिच्या घराबद्दल का उत्सुकता वाटतेय तुला?"
"भेटतेस सगळ्यांना?" रतनचा प्रश्न न ऐकल्यागत शमिकाने विचारलं.
"नाही गं. कामासाठी येते ना. ठरवते दरवेळेस पण नाही होत भेटणं कुणाला. आपल्या वर्गातली मुलं दिसतात बर्यांचदा, पण मुली तर लग्नं होऊन बाहेरगावीच असणार."
ती गप्प झाली. रतननेही पुन्हा डोळे मिटून घेतले. सांगोल्याला जायचा उत्साह नष्ट होतो आहे असं वाटत होतं. तेवढ्यात रेल्वेचा वेग कमी होत फलाट दिसायलाही लागला.
"ती बघ नीना!" रतन एकदम ओरडली. अंगात वीज संचारल्यागत आता तिनेही खिडकीतून डोकावायचा प्रयत्न केला.
तरीही गाडी थांबल्यावर ती तशी सावकाशच उतरली. पुढे झेपावत रतनने नीनाच्या मुलीला कौतुकाने जवळ घेतलं. शमिका मात्र अवघडून उभी होती.
"शिष्ट कुठली." तिचा हात आनंदाने हातात घेत नीना पुटपुटली.
"चल गं, काहीतरीच काय बोलतेस? मी आहे तशीच आहे."
"म्हणजे शिष्ट म्हणायचं आहे तिला." रतनही नीनाच्या बोलण्यात सामील झाली.
रिक्शात बसल्याबसल्या बाहेर डोकावत कॉलेजच्या दिवसातल्या खुणा तपासणं सुरू झालं तिचं.
"शमे, तू प्रयत्नसुद्धा नको करू काही आठवण्याचा, सांगोला फार बदललंय."
"माझ्या सगळं लक्षात आहे. पाच वर्ष काढली आहेत ना. काय धम्माल करायचो आपण."
जुन्या आठवणीत घर कधी आलं तेही तिला कळलं नाही. रतनने उत्साहाने घरातल्या प्रत्येकाची ओळख करून घेतली. गरम वाफाळलेला चहा घेत शमिका अवघडल्यासारखी बसली, गर्दीत श्वास कोंडल्यासारखी. छोटं घर आणि भरपूर माणसं हे समीकरण ती कधीच विसरली होती. रतन गप्पामध्ये रमलेली बघितल्यावर ती उठली.
स्वयंपाकघरात दाराला टेकून बराच वेळ ती नीनाच्या हालचाली निरखत राहिली.
"कोण मुलं आहेत गं इथे आपल्या वर्गातली?"
"खूप आहेत."
"नावं सांग ना. भेटेन तरी कुणाला ना कुणाला."
"उद्या जा सावकाश. आज गप्पा मारू रात्रभर तिघींजणी."
नीनाने म्हटल्याप्रमाणे खरंच रात्रभर तिघींच्या गप्पा रंगल्या. रतनने नीनाच्या लग्नाबद्दल विचारलंच.
"तू धाडसी नीना. नोकरीसुद्धा नव्हती ना शशांकला तुम्ही लग्न केलंत तेव्हा?"
क्षणभर नीना गप्प राहिली. शमिकाला राहवलं नाही.
"आम्ही सहज विचारतोय गं. तुझ्या मनात नसेल तर राहू दे."
"नाही, तसं नाही. पंधरा वर्ष होऊन गेली. इतक्या वर्षांनंतर लग्नानंतर पहिल्यांदाच हा विषय निघतोय. त्यामुळे जरा अडखळल्यासारखं झालं." ती पुढे बोलत राहिली.
"तुला माहीत आहे ना सांगोल्याला मी बहिणीकडे राहायचे. इतकी कटकट, सूचना, त्यातून विरंगुळा म्हणजे शशांकची मैत्री. त्या मैत्रीवरूनही संशय घ्यायला लागली बहीण. गावालाच पाठवून दिलं परत. कोंडल्यासारखं झालं होतं आयुष्य. एक दिवस शशांक गाडी घेऊन आला आणि मागचा पुढचा विचार न करता आले मी निघून." बराचवेळ नीना तिच्या बदललेल्या आयुष्याबद्दल बोलत राहिली.
"पण माहेरी जातेस ना आता?" शमिकाने विचारलं.
"नाही. ते दु:ख मात्र आता शेवटपर्यंत राहणार."
नीनाचे डोळे तुडुंब भरून आले. रतनने पुढे होऊन पटकन नीनाला कुशीत घेतलं. हुंदक्यांनी गदगदलेल्या नीनाकडे शमिका भरलेल्या डोळ्यांनी पाहत राहिली.
"तुझी आई हल्लीच गेली ना? तेव्हाही नाही गेलीस?
"कोणी कळवलंच नाही गं मला. कळलं तेव्हा फार उशीर झाला होता." थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही."
"तू केदारच्या घरी जाणार असशील ना?" अचानक नीनाने शमिकाला विचारलं.
"अर्थात. भावासारखाच होता तो मला."
"बघवत नाही त्याचा भितींवर लावलेला फोटो."
"आपल्यात तुमची दोघांची मैत्री जास्त."
"काय हुकूमशाही चालायची तुझ्यावर केदारची. आठवतंय? रक्षाबंधनाच्या दिवशी राखी घेऊन आला होता स्वत:च. आम्ही होतो ना तिथेच." शमिकाला तो प्रसंग आताच घडतोय असंच वाटत होतं.
तिच्या घरी त्या सर्वजणी जमल्या होत्या. तावातावाने, एखाद्याला मित्र तर मित्र म्हणा ना, भाऊ मानायची कसली नाटकं वगैरे बोलणं चाललं होतं. अशा वादविवादात शमिकाचा नेहमीचा पुढाकार. तेवढ्यात केदार टपकला तो राखी घेऊनच. शमिकाच्या पुढ्यात त्याने राखी धरल्यावर सगळ्या हसायला लागल्या.
"शमिका, केदार तुझा मित्र आहे ना? मग राखी नको बांधू." तिच्यावर हल्लाच चढवला प्रत्येकीने. शमिका गांगरली, केदारला आपलं म्हणणं पटवून द्यायचा प्रयत्न करत राहीली. शेवटी केदारच्या हट्टापुढे तिने हात टेकले. तो खर्या अर्थी तिचा भाऊ झाला. ती एकाएकी उदास झाली.
सांगोला सोडून दोन वर्ष झाली असतील तेव्हा. अधूममधून तो सोलापूरला आला की भेट होत होती. एकमेकांना पत्र तर सारखी पाठवत होते दोघं. आणि अचानक त्या बातमीने सारं बदललं. मित्रांबरोबर फिरायला गेलेला केदार परत आलाच नव्हता. पडला कड्यावरुन पाय घसरुन. तिला समजल्यावर मिळेल ती गाडी पकडून ती धावली होती सांगोल्याला. तुषारच्या, केदारच्या भावाच्या खांद्यावर मान टाकत तिने दु:खाला वाट मोकळी करून दिली. त्यानंतर या गावात ती परतली नव्हती. पण केदारच्या घराचा तीही एक भाग बनून गेली होती हे तिला कधीच विसरता आलं नाही. अधूनमधून पत्र लिहीत राहिली. ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर हळूहळू सगळं मागे पडत गेलं.
"तुषारला बोलले आहे मी तू येणार आहेस ते." तिच्या मनातलं ओळखल्यासारखं नीना म्हणाली.
"कधी येणार आहे तो? नाही तर मीच सकाळी जाऊन भेटून येईन."
"रात्रीच चक्कर टाकेन म्हणाला होता. नऊ वाजलेयत. येईल कदाचित अजूनही."
तिचे कान तुषारच्या पायरवाची चाहूल घेत राहिले. तुषार आलाच नाही. केदार असता तर झालं असतं असं? केदारबरोबरच्या गप्पा, एकत्र केलेला अभ्यास, सहली, रुसवेफुगवे सगळं आजूबाजूला ठाशीवपणे उभं राहिलं. एकमेकांची घरं तर अगदी जवळ. सारखं भेटणं चालू असायचं. केदारची शांत स्वभावाची आई फार आवडायची तिला. त्याही मुलीसारखं कौतुक करायच्या. तिची आई फिरतीच्या निमित्तानं वरचेवर बाहेर, वडील तर तिला आठवतही नव्हते. सहाजिकच केदारचं घर म्हणजे विसावा होता तिच्यासाठी. आज तुषार आला नाही म्हटल्यावर क्षणभर तिला केदारच्या मैत्रीत ती उगाचच घरादाराला तर गुंतवत नव्हती ना असा प्रश्न पडला. एक माणूस जीवनाचा खेळ अर्ध्यावर सोडून गेला तर सगळी नातीच बदलावीत?
सकाळी भराभर सगळं आटपून दाराच्या चौकटीत ती उभी राहिली. जुन्या दिवसांचा लवलेश शोधूनही सापडत नव्हता. ती तशीच नजर लावून उभी राहिली. बराचवेळ. भरभर चालत येणारी चाल ओळखीची वाटल्यावर ती टक लावून पाहत राहिली. केदार? छातीत धस्स झालं. कितीदा तरी कुठून तरी अचानक तो समोर उभा ठाकेल असं वाटायचं तिला. इतक्या वर्षात तो या जगात नाही हे सत्य तिने स्वीकारलं होतंच कुठे?
"रात्रीच यायचं होतं पण आलोच अकरा वाजता. तरी निघालो. आई म्हणाली, उद्या सकाळी जा लवकर. कशी आहेस? चल आता आमच्याकडे." घाईघाईत खुलासा करणार्या तुषारकडे ती पाहत राहिली. बावीस वर्षात कुणामध्ये काहीच कसा फरक नाही पडला? नीना, रतन आणि आता तुषार. सगळी आहेत तशीच वाटतात. तुषारकडे बघता बघता ती रतन आणि नीनाला विसरलीच. कुणालाही काहीही न सांगता पटकन इथून तुषारबरोबर निघावं असं तीव्रतेने वाटलं तिला. कधी एकदा केदारच्या घरी पोचतोय असं झालं होतं का? तिने स्वत:लाच प्रश्न केला. नीना म्हणत होती तो भितींवर टांगलेला त्याचा फोटो पाहायला की केदारची मैत्री ती विसरू शकलेली नाही हे दाखवायचा वेडा प्रयत्न करायला? केदारचं घर कर्त्या सवरत्या मुलाला मुकलं होतं तसं तिने नव्हता का तिचा परममित्र गमावला? त्या घराचं दु:ख सर्वांनी गृहीत धरलं; पण तिच्या चिघळत्या जखमेवर कोण मारणार फुंकर? केदार गेल्याचं कळल्यावर फार एकटं पडल्यासारखं वाटायचं तिला बरेच दिवस. दोन दिवस पत्रांचा गठ्ठा उलगडून बसली होती ती.
’तुझं आणि माझं नातं काय आहे कुणास ठाऊक; पण मागच्या जन्मात बहीण असावीस बहुधा माझी तू... काय दादागिरी करतेस गं, तुझ्याशी गप्पा मारताना मी स्वत:शीच बोलतो असं वाटतं मला. तू माझ्या आयुष्यात आलीस ती मैत्रीण म्हणून. हळूहळू भाऊ, बहीण अशी सगळी नाती मला तुझ्यातच सापडली.’ पत्र वाचताना ती हमसून हमसून रडली होती.
तुषारला पाहिल्यावर मनातल्या विचारांबरोबर कुठल्या कुठे भरकटली ती. नीनाच्या घरातल्या माणसांबरोबर तुषार इकडचं तिकडचं बोलत होता. हरवल्या नजरेने तुषारकडे बघताना तिला ओरडून सांगावंसं वाटत होतं. अरे, मी सुद्धा तुमच्या घरातलीच आहे. सगळे बारीकसारीक, छोटे मोठे प्रश्न ठाऊक आहेत मला तुमच्या घरातले. पण मनातले तरंग बाहेर उमटू न देण्याची खबरदारी घेत शमिका तुषार बरोबर निघाली.
"तू चांगलं केलंस शमिका. बाहेर पडलीस या खुराड्यातून. ऑस्ट्रेलिया काय म्हणतंय? किती वर्ष झाली गं तुला तिकडे जाऊन? मी पाठवलं होतं तुला एक पत्र. नंतर राहिलंच."
घडाघडा बोलणारा तुषार तिला वेगळाच वाटत होता. तिच्या डोळ्यांसमोर केदारच्या घरी आलं की भेटणारा तुषार आला. अलिप्त, तुटक. आज मात्र भडभडून बोलत होता. केदारसारखा!
तिला एकदम जवळचा वाटला तो. घरी पोचल्यावर चप्पल काढतानाच ती काहीतरी शोधत राहिली. कुणाच्या लक्षात येणार नाही याची काळजी घेत केदारच्या फोटोकडे तिने पाहून घेतलं. छातीत एक सूक्ष्म कळ उठली. तिला किती तरी बोलायचं होतं केदारबद्दल. पण मन अस्वस्थ झालं होतं. केदार असताना त्या घराची लेकच असल्यासारखी वावरलेली ती आज गोंधळून उभी होती. अंतर राखून केदारच्या आईशी ती बोलत राहिली. आठवणींची उजळणी झाली. कोण कोण भेटतं, सगळीजणं कशी आहेत असं वरवरचं बोलणं चाललं होतं. क्षणभर तिला वाटून गेलं की नाही म्हटलं तरी जखमेवर खपली धरली आहे. आज आपण येऊन ती खसकन ओढल्यासारखं तर नाही ना होत? काळ काही कुणासाठी थांबत नाही. त्याच्याबद्दलच्या आठवणी त्याच होत्या पण तो गेल्यानंतर दोन तपांचा कालावधी गेला होता. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. तिला मात्र केदारच्या आठवणींनी घेरून टाकलं होतं. ती आडून आडून पुन्हा पुन्हा तेच बोलत राहिली. अचानक कुठेतरी एकदम संभाषणाला खीळ बसल्यासारखं वाटलं तिला. नाक्यावर गेलेला तुषार परत आल्यावर मात्र ती सैलावली.
"चल, अख्खा गाव परत एकदा बघ. मगच कळेल तुला सांगोला किती बदललंय." त्याच्या आपुलकीने ती सुखावली. तुषारचं हे रूप तिला नवीन होतं. त्याने म्हटल्याप्रमाणे खरंच सगळं सांगोला पालथं घालून झालं. तिच्या जुन्या घरावरून चक्कर मारून झाली. खरं तर आत जाऊन डोकावायचं होतं, पण तसं तुषारला सांगणं तिला जमलं नाही. केदारने न सांगताच ओळखलं असतं माझ्या मनातलं. ती स्वत:शीच पुटपुटली. जरा अतीच होतेय ही तुलना असं तिचं तिलाच वाटून गेलं. तुषार काही तिचा मित्र नव्हता तरी तो भावाची जागा भरून काढण्याचा प्रयत्न नव्हता का करत? त्यांच्या मैत्रीचा साक्षीदार असल्यासारखा प्रत्येक ठिकाणी केदारची जागा घेत होता. त्याच्यासारखेच प्रश्न, त्याच्याचसारखं तिच्या मनातलं ओळखून एकेका ठिकाणी तिला नेणं. आणि तरीही केदार असता तर... असा आपण विचार करतोय आहोत या जाणिवेने ती ओशाळली, पण न राहवून म्हणालीच,
"तू बदललास तुषार."
पुन्हा तो हसला
"त्या वेळेस माझा कंपू वेगळाच होता. मला कल्पना आहे तुला आश्चर्य वाटत असेल मी इतका रस घेऊन तुला नेतोय सगळीकडे, पण हल्ली हल्ली जाणवायला लागलंय की केदारच्या मित्रमैत्रिणींत मी सहज सामावून जातो. तीच जवळची वाटतात मला."
शमिका त्याच्याकडे बघत राहिली. त्या वेळेस केदारचा मोठा भाऊ म्हणून केवढं आकर्षण होतं सगळ्यांना. तो मात्र त्याच्याच
तोर्यात! तुटक, अलिप्त. त्यांच्या घरी गेलं की कितीदा तरी तो बोलायचाही नाही. आज त्याच्याकडून हे ऐकणं कठीण जात होतंच, पण त्यापेक्षाही ते स्वीकारणं फारच अवघड होतं. तिला वाटलं ओरडून सांगावं त्याला की नको प्रयत्न करू तू केदारची जागा घेण्याचा. तू तसाच राहा. आपल्याच धुंदीत, रुबाबात! प्रत्यक्षात मात्र ती बोलून गेली,
"केदारच बरोबर आहे असं वाटतंय मला आज."
तुषार एकदम गप्प झाला. तिच्या मनाला वाटणारं विचित्र अवघडलेपण तिला अधिकच घेरुन गेलं.
रात्री आग्रह करूनही ती थांबली नाही. तिला सोडायला आलेल्या तुषारशीही तिला फार बोलावंसं नव्हतंच वाटत. नीनाकडे तिला सोडल्यावर ’उद्या स्टेशनवर येत’ म्हणून त्याने तिचा निरोप घेतला. रात्र जागवून रतन आणि नीना गप्पा मारत राहिल्या. तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत राहिल्या; पण झोप येते आहे म्हणत तिने बोलणं टाळलं. स्वत:च्या मनालाच विळखा घातल्यासारखी मुक होऊन गेली.
सकाळी तुषार तसा लवकरच आला. नीनाचा निरोप घेऊन रतन आणि तुषारबरोबर ती स्टेशनवर पोचली.
"आता केव्हा येणार तू? केदार असता तर खूश झाला असता." तुषारच्या डोळ्यात पाणी तरळल्यासारखं वाटलं तिला.
"तुषार, केदार व्हायचा नको रे प्रयत्न करू. तू आहेस तसाच राहा." त्याचे दोन्ही हात हातात घेऊन सांगावंसं वाटत होतं, पण ती फक्त पाणावल्या डोळ्यांनी पाहत राहिली.
"येईन रे, नक्की येईन भारतात आले की...." पुढे काही बोलण्याआधीच रेल्वे आली. गाडीने वेग घेतला तशी ती हात हालवत राहिली. गजातून जाईल तेवढं डोकं बाहेर काढून ती तुषारला डोळे भरून साठवून घेत होती. केदारला तर काळाने हिरावून नेलं होतं, पण केदारने जाताजाता तुषारलाही बरोबर नेलं होतं. बावीस वर्ष, एकदा तरी सांगोल्याला जायला हवं म्हणणारी शमिका आता पुन्हा कधीही इथे येणार नव्हती.