... तर ऑनिंग म्हणजे ताडपत्री. या ताडपत्रीची ही कहाणी! कशाला अशी कठीण, कठीण नावं देतात काय माहित. जिन्याच्या दांड्यांना बलुस्टर म्हणायचं. का? जाऊ दे, ताडपत्रीकडे वळू.
रोजच्यासारखं मी त्यादिवशीही २० मिनिटं सायकल चालवायला गेले. भारतात फिरायला बाहेर पडलं की शेजारीपाजारी भेटतात, आपण ख्यालीखुशाली विचारतो भेटणार्यांची आणि आजूबाजूच्यांचीही. कोणाच्या घरात काय चालू आहे याबद्दल बोलताना व्यायाम झाला कधी हेही कळत नाही. इथे रस्त्यावर माणसं दिसत नसली तरी चिटपाखरं दिसतात त्यामुळे चिटपाखरुही दिसत नाही असं म्हणता येणार नाही. कधी कासव हळूहळू रस्ता ओलांडत असतं, हरणं उड्या मारत पळतात. त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत, थांबून, थांबून मी शेजार्यांची अंगणं, फुलझाडं बघते. घराच्याबाहेर काही बदल झाला असेल तर तो टिपते. घरी आल्यावर आपल्या घराबाहेर काय करता येईल याबद्दल रोज एकेक भन्नाट कल्पना मांडते. कधी त्या माझ्या स्वत:च्या असतात, कधी शेजार्याच्या बघितलेल्या तर कधी ’हायब्रीड’! तर आजच्या सायकलस्वारीत मला अशीच दिमाखात ४ दांड्यावर उभी असलेली, घराच्या भिंतीला जोडलेली हिरव्या चट्ट्यापट्ट्यांची ताडपत्री दिसली. परत आल्याआल्या माझ्या भन्नाट कल्पनांना सोयीस्करपणे वार्यावर सोडणार्या नवर्याला आणि मुलांना ताडपत्रीचं महत्व पटवायला सुरुवात केली. ताडपत्री म्हणजे काय हे न कळल्यामुळे घरातून बाहेर पडा, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, सरळ, उजवीकडे अशा सहज समजणार्या पद्धतीने ताडपत्रीवाल्या शेजार्याचं घर कुठे आहे ते सांगून बघायला पाठवलं.
"ऑनिंग म्हणतात त्याला." खाऊ की गिळू नजरेने पोरांनी परत येऊन सांगितलं. गुगल केलं असतंत तरी समजलं असतं असं म्हटल्यावर डोळे गरागरा फिरवत दोघांनी बोंडकं परत कानात घातली आणि मी नवर्याला पटवायला बसले. नेहमीप्रमाणे आमचा शेजारचा परममित्र चक्कर मारायला आला आणि मुळात ’ऑनिंग’ हवंच कशाला असा मुद्दा त्याने उपस्थित केला. तो हाणून पाडायला मला तासभर लागला.
आता सुरु झाला ताडपत्रीचा शोध. Amazon वर ७०० - ८०० डॉलर्सला दिसणारी ताडपत्री दुकानदार दुप्पट भावाने विकत होते. दुकानही जवळपास नाही. मग नेहमीप्रमाणे आपणच मागवू आणि आपणच बसवू असं म्हणत आम्ही Amazon वरुन ताडपत्री मागवली. त्याच दरात आम्हाला पाहिजे त्यापेक्षा मोठी ताडपत्री मिळतेय म्हणून भलीमोठी मागवून टाकली. अख्खं घर ताडपत्रीनेच झाकायचं आहे की काय असं ती ताडपत्री आल्यावर वाटलं. आकार पाहून आम्ही तिला आडवं केलं. ती ६ महिने अख्खं गॅरेज अडवून पडून आडवीच. तिच्याकडे बघितलं की हे आपलं DIY नाही एवढं लक्षात यायचं पण कोणाचं ते कळायचं नाही.
ताडपत्री आपण लावू शकत नाही एवढंच आम्हाला ६ महिन्यात कळलं. ऑनिंग बसवणार्याचा शोध सुरु केला. दरम्यान शेजार्यापाजार्यांच्या चार शिड्याही आणून ठेवल्या. कशाला? पूर्वतयारी. मुलांच्या जागी शिड्या! ऑनिंगला शिड्यांच्या आधारावर उभं ठेवावं लागणार हे त्यांच्या उत्साहावरुन आम्हाला आधीच कळलं होतं.
दरम्यान ताडपत्री लावणारे अनेक आले आणि गेले. घराची भिंत फोडून त्यातून दिव्यांसाठी तार बाहेर काढायला कोणी तयारच होईना. एक महाभाग झाला शेवटी तयार. तासाला ७५ डॉलर्स घेईन म्हणाला. कोणाच्या तरी घोड्याने आता आम्हाला गंगेत न्हायचंच होतं. तो सामान आणायला दुकानात गेला. आम्ही घड्याळात वेळ लावून बसलो.
"अर्धा तास झाला. एवढं काय शोधतोय?" साडेपस्तीस डॉलर्स इथेच संपले. बघता बघता दीडशे डॉलर्स संपले आणि महाशय आले. बराच वेळ त्यांनी घराच्या भिंतीचं निरीक्षण केलं. आम्ही त्याचं. अखेर महाशय म्हणाले,
"आय बॉट रॉंग मटेरियल...अॲड आय डोंट नो हाऊ टू ड्रील!" मुलांनी असे तारे तोडले असते तर ढुंगणावर चार फटके देईन असं निदान म्हणता तरी आलं असतं. आता त्याला हे म्हणणार कसं आणि तेही इंग्रजीत त्यामुळे मी दात ओठ खात नवर्याकडे पाहिलं.
"तूच शोधलेला बंदा आहे." त्याने माझ्यावर आगपाखड केली.
"माझी निवड नेहमी अशीच चुकते." मी ड्रीलवाल्याकडे बघत म्हटलं तरी बोट नवर्याकडे होतं. नवर्याने त्याच्या हातातून घाईघाईने त्याने दुकानातून आणलेलं सामान घेतलं. पावती घेऊन दहावेळा त्याने दिलेलं आणि पावतीतलं सामान याचा हिशोब मांडला. त्यालाच परत देऊन यायला सांग असं तावातावाने मी म्हणणार होते पण लक्षात आलं त्यालाही हा माणून १ तास लावेल. जड अंतकरणाने दिडशे डॉलर्स त्याला दिले. पुन्हा ताडपत्री बसवणार्याच्या शोध सुरु!
नवरा म्हणाला,
"मीच भिंतीला भोक पाडून टाकतो. तो एक प्रश्न मिटला की होईल आपलं काम."
"तरी मी सांगत होतो ऑनिंगची गरजच नाही. सावली असते तुमच्याइथे संध्याकाळी." नवर्याचा मित्र आगीत तेल ओतणारा.
"मला सकाळी बसायचं असेल बाहेर निवांत तर तू येणार आहेस का छत्र धरायला?" त्याला आणि त्याच्यामागून नवर्याला चेव चढायच्या आधी मी तो बेत हाणून पाडला.
"आयला, तुम्हा बायकांच्या डोक्यात काहीही येतं आणि उगाच आम्हाला कामाला जुंपता." मित्र सहज हार मानणारा नव्हताच.
"तू लेका लग्न झालं नाही म्हणून बोलतोस बिनधास्त." नवर्याला त्याचा एकदम कळवळा आला.
"तेपण दुसर्याच्या बायकोला. स्वत:ची आली की बघ काय होतं." मी फणकारले. तो निरुत्तर झाला आणि खसकन नवर्याच्या हातातली हातोडी त्याने ओढली. माझ्या डोक्यातच हातोडी हाणतो की काय म्हणून मी नवर्याची ढाल पुढे केली; पटकन नवर्याच्या मागे लपले. खूनशी हसत नवर्याचा मित्र माकडासारखी उडी मारुन स्वयंपाकघराच्या ओट्यावर चढला आणि दाराच्यावर नवर्याने खुणा केलेल्या चौकोनावर हिच्या नाहीतर तिच्या डोक्यावर या आवेशात त्याने भिंतीवरच्या त्या चौकोनावर हातोडी हाणली! भिंतीला भोकाऐवजी भगदाड पडलं. भगदाड बुजवलं की भोक उरेल अशा विश्वासात दिमाखात दोघांनी काम सुरु केलं. ’मदतीला या’ ह्या दोघांच्या पुकार्याला मुलं काही दाद देईनात. त्यांना मुळी ऐकूच जात नव्हतं. फारच कटकट केल्यावर त्यांच्यावेळेची आम्हाला किंमत नाही, आधी विचारलं नाही, काम नक्की काय ते सागिंतलं नाही याची जाणीव करुन देतच मदत केली. मित्रही मार्गदर्शन करुन गेला. परत येईन तेव्हा ताडपत्री लागलेली दिसली पाहिजे असा त्याचा आविर्भाव होता.
मी आणि नवराही ताडपत्री आज बसवूच या थाटात कामाला लागलो. अधूममधून मुलं मदत करतोय असं दाखवल्यासारखं करत ये - जा करत होती. अखेर कानात बोळे कोंबलेल्या मुलांना हलायचं नाही असं सांगून शिड्यांच्या जागी उभं केलं. मुलांना आधार म्हणून शिडी लावावी असं वाटत होतं पण मुलं शिडीपेक्षाही स्थिर स्थितप्रज्ञासारखी एकेक दांडी धरुन उभी राहिली त्यामुळे तो बेत बारगळला. संध्याकाळी ऑनिंगच्याखाली चहाचे घुटके घेत बसलो आहोत असं डोळ्यासमोर दृश्य दिसायला लागलं आणि त्याच डोळ्यांसमोर ते कोसळलं, भंगलंच. पडलेल्या ताडपत्रीचा तंबू झाला. तंबूच्या आत नवर्याने अंग टाकून दिलं, मुलांनी पथार्या पसरल्या. माझ्या आधाराच्या काठ्या तंबूत वडीलांबरोबर लोळत पडलेल्या. उचललेला हात मी खाली केला आणि जितक्या जोरात आयओय करता येईल तितक्या जोरात करत उठताउठता ही ताडपत्री परत करुनच टाकायची असं ठरवून टाकलं.
"वर्ष झालं घेऊन. आता कोण घेणार परत?" नवर्याने कुरकुर केली.
"भिंतीला भगदाड पाडलंत, त्याचं भोक केलंत, आम्हाला कामाला लावलंत, लोकांकडच्या शिड्या आणल्यात. आता माघार?" मुलांचे चेहरे बोलले.
"परत करणार म्हणजे कसं? घालणार कोण खोक्यात? पोचवणार कसं Amazon कडे? त्याचाच दुप्पट खर्च. तरी मी..." नवर्याचा अतिशहाणा मित्र पुढे काय बोलणार ते माहित होतं त्यामुळे मीच Amazon ला फोन लावला.
"७०० डॉलर्सचं ऑनिंग परत करायला १२०० डॉलर्स जातील, उचलणार कोण ते धूड? घालणार कसं खोक्यात? गाडीत बसेल का?" नवर्यापेक्षा जास्त प्रश्न त्याच्या मित्राने उपस्थित केले.
"तू जा रे तुझ्या घरी." अशा हाताने खाणाखुणा करत मी Amazon शी बोलणी करायला सज्ज झाले. रंगवून, रंगवून सारी हकीकत त्यांना सांगितली. मरता मरता आम्ही कसे वाचलो ते ऐकवलं. बुवा पाघळला असं वाटलं पण नक्की कळत नव्हतं.
"गोरे लोक बरे असतात. उगाच जास्त प्रश्न विचारत नाहीत. ’सू’ करतो म्हणून धमकाव आणि पाठवायच्या खर्चाचंपण विचार." मित्र घरी न जाता नाटक सुरु असल्यासारखं ’प्रॉम्टींग’ करत म्हणाला.
"देसी आहे." मी हातवारे करत खाणाखुणांनी सांगितलं आणि एकदम परत धापकन आवाज झाला.
"काय झालं?" Amazon वाला बुवाच घाबरला. मित्राने उगाचच काहीतरी धापकन आपटलं होतं. त्याने फोन घेतला आणि सांगितलं.
"परत पडला त्यातला एक भाग. काही झालं तर Amazon जबाबदारी घेतं का?"
"असं करा, तुम्ही पाठवा परत." Amazon बुवा घाईघाईत म्हणाला.
"कोणीतरी न्यायला येईल ना? खोक्यात घालताना दुखापत..."
"आमचीच माणसं भरतील, नेतील आणि नेण्याचा खर्चही करतील." तिकडचा देसी amazon बुवा मित्राला पुढे बोलू न देण्याची संधी देत म्हणाला. फोन ठेवला आणि ताडपत्री गेल्यावर भिंतीतलं भोक भगदाड न होऊ देता कसं बुजवायचं यावर आमची चर्चा सुरु झाली. DIY!
पूर्वप्रसिद्धी - निनाद दिवाळी अंक २०२५


No comments:
Post a Comment
तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणार्याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.