Thursday, June 16, 2011

आपण ह्यांना पाहिलंत का?

रेडिओवरचं  सुमधुर संगीत एकदम थांबलं आणि तातडीचा संदेश त्यावर सुरु झाला. नकळतपणे मी गाडीचा वेग कमी केला. चक्रीवादळं, हिमवर्षाव अशा आकस्मिक संकटासाठी तातडीचा संदेश देणा‍र्‍या यंत्रणेचा वापर अमेरिकेत करतात (इर्मजन्सी अलर्ट सिस्टीम). दूरदर्शन, रेडिओ आणि आता सेल फोन  द्ववारे हा संदेश लोकांपर्यंत पोचतो.

याच यंत्रणेचा वापर २००३ पासून अमेरिकेने एक विशेष कारणासाठी सुरु केला. लहान मुलांचं अपहरण झाल्याची सूचना देण्यासाठी प्रथमच ही यंत्रणा राबवली गेली. आत्ताही बेपत्ता असलेल्या पाच वर्षाच्या मुलीसंदर्भात निवेदन होतं. मुलीचं वर्णन, संशयिताच्या गाडीचा नंबर ऐकत असतानाच रस्त्यावरच्या बिलबोर्डवरही (जाहीरातीचा बोर्ड) हीच माहिती झळकू लागली. ’अ‍ॅम्बर अलर्ट’! आत्तापर्यंत किती पटकन  असा  संदेश सर्वत्र प्रसारीत होतो याबद्दल दूरदर्शनवर ऐकलं होतं पण रस्त्यात, एकाचवेळी रेडिओवर ऐकायला आणि बिलबोर्डवर पहायला मिळण्याची ही पहिलीच वेळ. 

दुधाच्या खोक्यांवर, पोष्टाद्ववारे, स्थानिक जाहिरात पुस्तिका अशा विविध मार्गानी ही मुलं आपल्यासमोर येत राहातात. सर्व ठीकाणी हरवल्या दिवशीचा फोटो आणि वर्तमानकाळात ते मुल कसं दिसत असेल त्याचं रेखाचित्र असतं. आज बिलबोर्डवर अशी जाहिरात पाहिली आणि लहानपणी दूरदर्शनवर संध्याकाळी ’आपण ह्यांना पाहिलंत का?’ यातून हरवलेल्या व्यक्तिची माहिती दिली जात असे ती डोळ्यासमोर नाचली.

आपल्याकडेही आता अत्याधुनिक तंत्राचा वापर होत असेलच. पण सर्वसामान्यांच्या प्रयत्नातून सुरु झालेल्या अ‍ॅम्बर  अलर्ट ( AMBER = America's Missing: Broadcast Emergency Response) ची कहाणी ऐकून मन भारावून जातं. एका शोकांतिकेतून अद्यायावत तंत्रज्ञ्ज्ञानाचा वापर करुन सुरु झालेली ही स्तुत्य योजना.

पोलिसखात्याने सुरु केलेल्या या प्रयत्नाला प्रसारमाध्यमं, वहातुक यंत्रणा आणि वायरलेस कंपन्या साहाय्यं करतात. सामाजिक सेवा म्हणून वरिल यंत्रणा ही मदत पुरवितात. उद्देश अर्थातच हरवलेली मुलं ताबडतोब सुखरुप हाती लागावीत हा. अ‍ॅम्बर अलर्ट मुळे आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त मुलांना वाचविण्यात यश आलं आहे. काही वेळेला तर अ‍ॅम्बर अलर्ट ऐकून अपहरणकर्त्यानी मुलांना सोडून दिल्याची उदाहरणं आहेत. ज्या अ‍ॅम्बरमुळे ही यंत्रणा सुरु झाली ती शोकांतिका चौदा वर्षापूर्वीची.
टेक्सास राज्यात आर्लिग्टन गावी नऊ वर्षाची शाळकरी अ‍ॅम्बर आणि तिचा भाऊ आजी आजोबांच्या अंगणात सायकल चालवित होते. अ‍ॅम्बरचा भाऊ घरात आल्यावर आजीने त्याला अ‍ॅम्बरला बोलावून आण म्हणून परत पिटाळलं. तो आत  आला ते ती सापडत नाही असं सांगतच. आजी, आजोबा दोघंही हाका मारत अंगणात आले. तोपर्यंत पोलिसही तिथे पोचले होते. अ‍ॅम्बरच्या आजी आजोबांना पोलिसांना पाहून आश्चर्य वाटलं.

दरम्यान घडलं होतं ते असं. त्यांच्या शेजारी राहणार्‍या गृहस्थानी अ‍ॅम्बरची किंचाळी ऐकली आणि ते बाहेर आले. एका अनोळखी इसमाने अ‍ॅम्बरला सायकलवरुन ओढून ट्र्कच्या पुढच्या सीटवर ढकललेलं त्यांनी पाहिलं, पण डोळ्याचं पातं लवतय न लवतय तोच भरधाव वेगाने तो ट्रक निघूनही गेला. त्या गृहस्थांनी आधी पोलीसांना  फोन केला, त्या इसमाची, गाडीची माहिती दिली. पोलिस तातडीने घटनास्थळी पोचले. विलक्षण वेगाने सारं काही घडलं होतं.

योगायोगाने त्याचवेळेस स्थानिक दूरदर्शन वाहिनी हलाखीचे दिवस आलेल्या कुंटुंबावर कार्यक्रम करीत होती. नेमका अ‍ॅम्बर आणि तिच्या आईचा त्यात समावेश होता. अ‍ॅम्बरचं बालपण, भावांबरोबरचं खेळणं हे सगळं दूरदर्शनवर पाहाताना लोकांसाठी अ‍ॅम्बर एक फोटो न राहाता स्वत:च्या घरातली चिमुरडी बनली होती. दूरदर्शन, नभोवाणी माध्यमांनी अ‍ॅम्बरला पळवल्याची बातमी दिल्यावर चार दिवस पोलिसांच्याबरोबरीने सारं गाव तिच्या शोध मोहिमेत सामील झालं. दूरदर्शन वाहिनीनेही त्यांच्याकडील सर्व माहिती, चित्रफीत पोलिसांकडे सुपुर्त केली.  या शोध मोहिमेचा शेवट मात्र दु:खद झाला. चौथ्या दिवशी अ‍ॅम्बरचं प्रेत घरापासून चार मैलांवर गटाराच्या पाईपमध्ये सापडलं. अद्यापही तिचा हत्येकरी सापडलेला नाही.

या तपासकार्यात आघाडीवर असलेले अधिकारी याबद्दल आठवण सांगताना म्हणतात की संध्याकाळी घरी आलं की त्यांना त्यांच्या मुलीच्या 'सापडली का अ‍ॅम्बर?' या प्रश्नाला सामोरं जावं लागे.
अ‍ॅम्बरच्या जाण्याने पोलिसखातं कुठे कमी पडलं, केलेल्या प्रयत्नापेक्षा  आणखी काही करता आलं असतं का याबद्दल झालेल्या उहापोहातून लक्षात आलं की ज्या वेगाने अपहरणाची बातमी प्रसारमाध्यमांमुळे पसरली त्याचाच वापर करुन अनेक मुलाचं आयुष्य वाचवता येईल. याचाच परिपाक म्हणजे अ‍ॅम्बर अलर्ट!

अ‍ॅम्बरच्या नावाने पोस्टाने काढलेल्या स्टॅम्प समारंभासाठी तिची आई नोरिस उपस्थित राहिली. त्यावेळेस केलेल्या भाषणात त्या म्हणाल्या,
"अ‍ॅम्बर अलर्टमुळे जेव्हा जेव्हा मुल घरी सुखरुप पोचतं तेव्हा तेव्हा ती माझी अ‍ॅम्बर असती तर या विचाराने ऊर दडपून जातो, कासावीस होतो; पण अ‍ॅम्बरमुळे अश्य़ा कितीतर अ‍ॅम्बर त्यांच्या आई वडिलांना सुखरुप परत मिळतात या जाणीवेने माझं दु:ख दडपून टाकायला मी शिकले आहे."
दहा वर्ष झाली, वीस वर्ष झाली तरी आता ही वेदना कायमची सोबत राहाणार असं म्हणणार्‍या या आईच्या दु:खाने आपलंही मन हेलावतं.

"अ‍ॅम्बर मोठी होताना पाहण्याचं भाग्य माझ्या भाग्यात लिहलेलं नव्हतं पण खेळताना ती बर्‍यांचदा शिक्षिका होई, बाहुल्यांची आई बने त्यांची काळजी घेई तेच नाही का ती आताही करत?" पाणावलेल्या डोळ्यांनी तिची आई विचारते. अ‍ॅम्बर अलर्टमुळे परत आलेली मुलं म्हणजे अ‍ॅम्बरच्या बाहुल्याचं असं त्यांना वाटतं.

अ‍ॅम्बर अलर्टच्या यशामुळे बर्‍याच राज्यात अमेरिकेत वेगवेगळ्या नावांनी ही योजना राबविली जाते. प्रत्येक ठीकाणी या योजनेला दिलेलं नाव म्हणजे त्या त्या मुलाच्या दु:खद शेवटाचं स्मरणच. मॉरगन अलर्ट, लुई अलर्ट, मायली अलर्ट ही त्यातील काही नावं. फक्त अमेरिकाच नाही तर कॅनडा, जर्मनी, ग्रीस, नेदरलॅड या देशांनीही ही योजना स्वीकारली आहे.


आधुनिक तंत्रन्यानाचा फायदा या सेवेला चांगलाच होत आहे. अलिकडे सेल फोन कुठून केला याची माहिती देणं कंपन्याना सक्तीचं आहे त्यामुळे मॅसेच्युसेट्स राज्यातील एका मुलीचा शोध तत्काळ लावण्यात पोलिसांना यश आलं. अ‍ॅम्बर अलर्ट करुन पोलिस त्या मुलीला सतत फोन करत होते. जितक्या वेळा फोन त्या मुलीकडून उचलला गेला तितक्या वेळेस कंपनी साधारण कोणत्या ठिकाणाहून तो कार्यरत होता त्याचा मागोवा घेऊ शकली. पोलिसांनी गुगल सर्चचा वापर करुनही ठावठिकाण्याचा अंदाज घेतला आणि ताबडतोब त्या जागेला वेढा घातला. फार थोड्या वेळात मुलीला ताब्यात घेण्यात यश मिळालं. 

अशीच एक घटना ग्रीस मधल्या लहानश्या गावातील.
शेतात काम करता करता वडिलाचं लक्ष उडालं आणि आजूबाजूला खेळणारा मुलगा कधी नजरेआड झाला तेच कळलं नाही. बरीच शोधाशोध करुन शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्या देशात ते नुकतेच आलेले. मुलाला ग्रीक भाषेचा गंधही नव्हता, त्यामुळे परिस्थिती अधिक अवघड होती. अपघात किंवा अपहरण याच दोन शक्यता वाटत होत्या. जंग जंग पछाडूनही मुलगा सापडला नाही तेव्हा पोलिसांनी अ‍ॅम्बर अलर्टचा आधार घेतला. वाट चुकून तो मुलगा जवळच्याच समुद्रावर पोचला होता आणि परत यायचा मार्ग न सापडल्याने बावरलेल्या स्थितीत फिरत होता. तो मुलगा अ‍ॅम्बर अलर्टमुळे लोकांच्या लक्षात आला आणि घरी सुखरुप परतला.

अठरा वर्षाच्या आतील मुलांसाठी असलेली ही योजना म्हणजे अशा मुलांसाठी, त्यांच्या पालकांसाठी अ‍ॅम्बरने स्वत:चं आयुष्य गमावून एक प्रकारे दिलेलं संजीवनच नाही का?     

 

9 comments:

 1. या बद्द्ल माहितीच नव्हतं. खुप छान माहिती.

  ज्यांची लहान मुलं हरवत असतील त्यांना काय प्रचंड दु:खातुन जावं लागत असेल याची कल्पनाच करवत नाही. माझ्या मते ते जगातलं सगळ्यात मोठं दु:ख. अगदी मृत्युपेक्षाही मोठं

  ReplyDelete
 2. हॄदयस्पर्शी लेख! छान शैली!

  ReplyDelete
 3. छान माहीती व लेख.

  पालकांसाठी अ‍ॅम्बरने स्वत:चं आयुष्य गमावून एक प्रकारे दिलेलं संजीवनच नाही का?>>> खरच.

  ReplyDelete
 4. खूप चांगली माहिती दिलीत तुम्ही. भारतातही अशी काही व्यवस्था करता येईल का - इथ इतकी माणस 'हरवतात' - असा विचार मनात आला. हल्ली बरेच FM Radio channels आहेत ते मदत करू शकतील अशा प्रसंगात. काही वेळा - दंगली, नैसर्गिक आपत्ती अशा वेळी पोलिस कमिशनर SMS पाठवता लोकाना. मोबाईलचाही वापर करता येईल भारतात.

  ReplyDelete
 5. लेख मस्तच.

  पण ही सिस्टीम घातक आहे. निदान भारतात तरी. जागोजागी खांबोखांबी असा गवगवा झालेला पाहून त्या पोराला अपहरणकर्ते लगेच ठार करतील आणि नंतर त्यांच्याकडे खंडणी भरुन पोर वाचण्याची काही टक्के शक्यता असते तीही नष्ट होईल..

  ReplyDelete
 6. Can never forget the movie 'Amber Alert' as I saw it when my kids were of the same age as Amber and her brother.

  ReplyDelete
 7. lekhak pratyek ghatanekade dolas drishtine pahato ase aikle hote, u proved it

  ReplyDelete
 8. aativas - हो, पण भारतात किती यशस्वी होईल असं काही त्याची शंका वाटते. नचिकेतचा प्रतिसाद वाचल्यावर लक्षात येईल मी का असं म्हणते आहे ते.

  नचिकेत - अगदी खरं, इथेही एकदोन वेळा असं घडलं आहे पण यश मिळण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. पुन्हा तेच, लोकसंख्या, भ्रष्टाचार ही दोन मुख्यं कारणं. पर्णिका (माझी मुलगी) म्हणत होती असं पळवून नेलं तर लपता आणि लपवता येत असेल सहज भारतात कारण गर्दी खूप :-)

  ReplyDelete
 9. नचिकेत, मोसम, बरोबर आहे तुमच म्हणण - तुम्ही म्हणता ते डोक्यात आल नव्हत !!

  ReplyDelete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.