Thursday, October 4, 2018

अक्कलखाती गेलेले पैसे परत कसे मिळवायचे?

आता अक्कलखात्यात गेले हे समजलं हेच खूप झालं. परत कसले मिळवताय असं म्हणाल तुम्ही. पण मिळवायचेच आहेत. प्रश्न पैसे गेल्याचा नाही फसवणूक झाल्याचा आहे. तर झालं असं,

गेली दोन वर्ष लमार नावाचा इसम आमचं गवत कापायला येतो. महिन्याचे पैसे मी त्याला एकदम देते. हल्ली हल्ली गवत वाढलेलं नसतानाही तो कापत होता. गवत नसेलच तर कापणार कसं हा प्रश्न मला पडतो लमारला नाही. त्यादिवशी अचानक यंत्राचा आवाज आला आणि भूकंप झाल्यासारखी मी दार उघडून बाहेर धावले. माझा वेगच इतका होता की लमारच्या हातातलं यंत्र धाडकन थांबलंच. तरी मी त्याला पुन्हा थांबवलं,
"थांब, थांब. गवत वाढलेलं नाही." लमारने मला वेड लागल्यासारखं माझ्याकडे पाहिलं आणि एक कोबीच्या गड्ड्यासारखा वाढलेला गड्डा दाखवला."
"हे गवत नाही. रान आहे. " मीपण त्याला वेड लागलंय असा चेहरा करत सांगितलं. दोघं वेडे एकमेकांकडे पाहत राहिले काहीवेळ. तो काही बोलत नाही हे पाहून मीच म्हटलं,
"एका झुपक्यासाठी तू अख्खी माती कापणार? गवत नाहीच वाढलेलं तर मातीच कापू असं ठरवून येतोस की काय? काय बुवा ही माणसं! पैशासाठी कापा आम्हाला." मी मनात बोललेलं त्याला समजलं. तो म्हणाला,
"ठीक आहे. मी पुढच्या आठवड्यात येतो." तो गेला आणि लमारला कसं झापलं, थांबवलं हा माझा पराक्रम मी घरात जाहिर करुन टाकला, आता तुमच्यापर्यंत पण पोचवतेय. उकळायला बघतात नुसते. थांबवलं नाही तर फसलातच तुम्ही वगैरे स्वगतं घरात आठवडाभर चालली आणि नंतर सुरु झाली प्रतिक्षा. गवत वाढवाढ वाढलं पण लमारचा मुखचंद्रमा नाहीसा झाला तो झालाच. पुन्हा अवतरलाच नाही आमच्या अंगणात.

आता...?
त्याला भरपूर निरोप पाठवले. लेखी. म्हणजे SMS हो. मग फोन केले. लमार महाशय फोन उचलत नाहीत म्हटल्यावर नवर्‍याला गळ घातली. त्याने
"तू असे आधीच कसे पैसे दिलेस?" एवढा एक प्रश्न विचारुन दुर्लक्ष केलं. त्यावर मी चार वाक्य ऐकवायला गेले.
"प्रत्येकवेळेला ४० डॉलर्सचा चेक नाहीतर रोख देत बसायचं?. तसं केलं असतं तर एकदम का देत नाहीस म्हटलं असतंस." पुढची दोन पूर्ण व्हायच्या आत,
"लमारमुळे आणखी एक वादाला निमित्तच सापडलं तुम्हाला" असा शेरा मारुन मुलगी आपल्या खोलीत निघून गेली. मग लमारशी बोलण्याऐवजी नवर्‍याने त्याला SMS धाडून दिला. तो कसला उत्तर देतोय. असे १५ दिवस गेले मग अनोळखी फोन वापरुन फोन केला आणि नवर्‍याच्या हातात दिला. लमारने हा फोन ताबडतोब उचलला. कोण बोलतंय कळल्यावर तो कसा अपघातात जायबंदी झालाय. येतोच पुढच्या आठवड्यात असं सांगत त्याने माझ्या नवर्‍याची समजूत घातली. इतकी की काही मदत हवी आहे का असं माझा नवराच त्याला विचारायला लागला. मी आपली इकडे १२० डॉलर्सच्या खाणाखुणा करत. फोन ठेवल्यावर नवरा म्हणाला,
"अपघातात जायबंदी आहे. जाऊ दे. उपचाराला होतील त्याला पैसे ते. सोडून दे."
"लमारला सोड तू. आम्हाला देतोस का तू सहज सोडून.." वगैरे मला अर्थात काढणं भागच होतं. ते झाल्यावर मी समजूतीने म्हटलं,
"पण तो खरंच जायबंदी आहे का ते शोधून काढ आधी. त्याने मला फसवलंय. अनोळखी फोन कसा उचलला? सरळसरळ थापा मारतोय." तो थापा मारतोय की नाही यावर आम्ही घनघोर चर्चा केली. मग श्रमपरिहार म्हणून मस्त बाहेर जेऊन आलो.

पुन्हा लमारची प्रतिक्षा सुरु. काही दिवस वाट पाहून काल त्याला निरोप पाठवला.
"BBB कडे तक्रार करते तुझी. सोशल मिडीयावर वाभाडे काढते तुझे." आता हे वाभाडे नक्की कसे काढायचे? लमारला ओळखणारं आहे कोण इथे :-).

जाऊ दे झालं. इतकं लिहिल्यावर उगाचंच १२० डॉलर्स मिळाले असं वाटायला लागलंय. म्हणजे काय तुमच्यापैकी कुणीतरी काय केलं की अक्कलखात्यात गेलेले पैसे परत मिळवण्याची युक्ती सांगेलच. नाही का?

2 comments:

  1. माझे खूप वेळा गेले आहेत, आणि आता युक्ती शोधण्यापेक्षा पैसे गेले हे मान्य करण्यातच शहाणपणा आहे हेही समजलंय :D

    ReplyDelete
    Replies
    1. मला कधी समजतं पाहू :-) तोपर्यंत समदु:खी आहेत यात समाधान मानायचं!

      Delete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.