मी गेली काही वर्ष जग सुखी व्हावं म्हणून एक प्रार्थना करते पण अचानक आधी आपणच सुखी व्हावं, जगाचं नंतर बघू असं मी ठरवलं. त्याकरता मला प्रार्थना बदलावी लागली. मी माझा स्वत:चा मंत्र निर्माण केला आणि तिथेच सगळा गोंधळ झाला. आधी मंत्र सांगते, मग गोंधळ. सोडून दे, सोडून दे स्वत:ला शांती दे हा तो मंत्र. आता गोंधळ.
आमच्या घरात प्रत्येकजण सदगुणाचे पुतळे आहेत, म्हणजे तसं प्रत्येकाला वाटतं. छोटा पुतळा इतके दिवस बाहेर होता त्यामुळे छोट्या पुतळीला सदगुणाचं प्रदर्शन करायला ’वाव’ मिळाला नव्हता. मार्चपासून कोविडमुळे छोटा पुतळा घरी आला आणि संगतीने छोटी पुतळी बिघडली. गोंधळ सुरु झाला. गोंधळाची कारणं दोनच. एकत्र बसून पाहिलेले सिनेमे आणि जेपर्डी (T.V. show). त्याआधी मी मुलांवर संस्कार झाले पाहिजेत म्हणून जेवायला एकत्रच बसलं पाहिजे असा हट्ट धरला होता. एकत्र बसायचं तर एक पक्की वेळ ठरायला हवी. आई वेळेत स्वयंपाक करेल का हा इतरांचा मुद्दा आणि स्वयंपाकांचं कंत्राट नक्की कुणाचं हा माझा आवेशपूर्ण प्रश्नात्मक मुद्दा. या दोन मुद्द्यावरुन गाडी पुढे सरकलीच नाही म्हणून ती गाडी मीच दुसर्या दिशेला वळवली. जेपर्डी आणि सिनेमे!
छोटा पुतळा एकदा ’ब्रेन गेम’ (T.V. show) मध्ये जाऊन आल्यापासून घरात फक्त त्यालाच ’ब्रेन’ असल्यासारखा वावरत असतो. तुला एकही उत्तर देता आलं नव्हतं. मित्रामुळे जिंकलात तुम्ही असं मी म्हटलं की त्याच्या बालपणातल्या आठवणींवर मीठ चोळू नये अशी नेत्रपल्लवी मोठा पुतळा करतो. मी त्याला जोराने ’काय?’ विचारते. तो परत नेत्रपल्लवी करतो. आमच्या ’पल्लव्या’ चालू असतानाच जेपर्डी सुरु झालेलं असतं. जेपर्डीच्या ॲलेक्सनी प्रश्न विचारला की उत्तरासाठी आम्ही ’ब्रेन गेम’ विजेत्याकडे बघायला लागतो. फुशारकीने तो उत्तर देतो. ते चुकलेलंच असतं. एखादं चुकून बरोबर आलं की ’ब्रेन’ असल्याचा पुरावा दिल्यासारखा तो आमच्याकडे बघायला लागतो. जेपर्डी संपल्यावर छोटा पुतळा जाहीर करुन टाकतो की आईला एकही उत्तर येत नाही म्हणून ती मध्येमध्ये बोलते त्यामुळे त्याला काही सुचत नाही. नाचता येईना अंगण वाकडं ते हे असं; असं मी म्हणते पण मला राग येतो तो; मला उत्तर येत नाही म्हणून मी मध्येमध्ये बोलतेय हे याला कसं कळलं याचा. मी माझ्या रागावर मंत्राने विजय मिळवते. सोडून दे, सोडून दे, स्वत:च्या मनाला शांती दे! मला पुटपुटणं जमत नाही म्हणून मोठ्याने!
आईला जेपर्डीमध्ये रस नाही म्हणून आपण एकत्र चित्रपट बघू असं छोटा पुतळा - पुतळी ठरवतात. मोठ्या पुतळीची बोलती बंद करण्याचा उपाय. चित्रपट चालू असतानाच पुढे काय याची मला फार उत्सुकता असते. पहिला प्रसंग आटपतोय तोच, ’आता काय होईल?’ हा प्रश्न ऐकला की, आम्ही दिग्दर्शक नाही, माहित नाही वगैरे उत्तरं येतात पण तोपर्यंत चित्रपटातली माणसं काय बोलत होती ते जातं. मग ’ते काय म्हणाले आत्ता?’ असा प्रश्न मला पडतो. तो मी फक्त मलाच पडू न देता इतरांनाही त्यात खेचते. एकीकडे चित्रपट चालूच राहतो. आई खूप बोलते हे सांगण्यासाठी छोटे पुतळा - पुतळी चर्चासत्रच आयोजित करतात. छोटी पुतळी, मला आईबरोबरच राहावं लागतं, ती म्हणेल ती पूर्वदिशा असते वगैरे म्हणत दर्दभरे नि:श्वास टाकायला लागते. छोटा पुतळा, आता फार दिवस राहिले नाहीत, कॉलेजसाठी तू लवकरच बाहेर पडशील असा दिलासा तिला देतो. मोठा पुतळा स्मितहास्य देऊन नक्की कुणाला पाठिंबा देतोय ते लपवतो. आता इतकं झाल्यावर मोठी पुतळी तिचा मंत्र मांजर नखं काढतात तसा बाहेर काढणारच ना.
सोडून दे, सोडून दे, स्वत:च्या मनाला शांती दे! ज्या टिपेला चर्चा त्या टिपेला मंत्र!
या मंत्राचा महिमा फक्त जेपर्डी आणि सिनेमापुरताच राहिलेला नाही. तो वाक्यावाक्याला वापरावा लागतो. मंत्रातला ’सो’ तिने सुरु केला की मोठी पुतळी शांत व्हायला लागते पण तो ’सो’ कानावर पडला तरी उरलेल्या पुतळ्यांचं मस्तक फिरायला लागलं आहे. त्यावर उपाय म्हणून घरातले सगळे सदगुणाचे पुतळे तोच मंत्र म्हणतात. जोरात! सगळ्यांच्या सुरात सूर म्हणून पुतळ्यांच्या घरातलं मांजर, त्सुनामीही वेगळा स्वर त्यात मिसळून द्यायला लागली आहे. शांती कुणाला मिळते हा प्रश्न तसाच!
Mast ahe. Halakfulak khuskhushit
ReplyDeleteछान.शैली आवडली.
ReplyDelete