Friday, April 25, 2025

वाट


एखाद्या घटनेमुळे कितीजणांचं आयुष्य एका क्षणात वेगळ्या वाटेवर जाऊन गोठतं याचा मागोवा घेणारी कथा - वाट


कथासंग्रह - रिक्त

प्रकाशक - मेहता प्रकाशन.

लेखन आणि अभिवाचन - मोहना प्रभुदेसाई जोगळेकर

Wednesday, April 16, 2025

आशा

मध्यंतरी एक चित्र पाहिलं त्यावरुन एक कविता सुचली. कविता हा माझा प्रांत नाही पण कवी लोकांना म्हणे कविता होतात, तशी ती मी कवी नसूनही झाली :-) त्यामुळे कविवर्य प्रमोद जोशी, गुरु ठाकूर यांना पाठवून आधी ती कविता आहे ना याची खात्री केली, त्यांच्या काही सुचना प्रत्यक्षात आणल्या आणि खरंच एक कविता तयार झाली. गुरुने, वृत्ताचा नीट विचार कर सांगितलं. मी व्याकरणाचं पुस्तक उघडून बसले.  कविता झाली ती अक्षरगणवृत्तात झाली आहे इतकं समजलं. आता कोणाचीही, कोणतीही कविता वाचताना मी अक्षरगणवृत्ताचे निकष लावूनच वाचते आणि ते अक्षरगणवृत्त नसेल तर ही कविताच नाही असं ठामपणे म्हणते इतकी प्रगती आहे...

कविता झाल्यावर याचं आता गाणं व्हायला हवं असं वाटलं. पदार्थ केला की खायलाच हवा या धर्तीवर. मी केलेला पदार्थ निदान मी एकटीतरी खाऊ शकते पण मी गायलेलं गाणं कोण ऐकणार त्यामुळे गायिकेचा शोध सुरु झाला आणि आमच्या शार्लटची गुणी गायिका अदितीच डोळ्यासमोर आली. तिने या कवितेला चालही लावली आणि कवितेतलं गांभीर्य सुरांमध्ये ओतलं. गौरी आपटेने गाण्याला मुद्राभिनयाने जिवंत केलं आहे आणि माझ्या शार्लटमधल्या मैत्रिणींनी तिला छान साथ दिली आहे. आजारी व्यक्तीला भेटायला गेलेल्या प्रसंगात या मैत्रिणींना काहीही बोला; तुमचे आवाज दाबून टाकणार आहे म्हटल्यावर चेहरे गंभीर ठेवून त्यांनी जो काही शब्दाविष्कार केला तो हसूनहसून पोट दुखेल असा होता. तो फक्त मला एकट्यालाच चित्रीकरण करताना अनुभवता आला. 

... तर आम्ही सार्‍या शार्लटमधल्या मैत्रिणींनी एकत्र येऊन हे केलं आहे. पाहा आणि अभिप्रायही द्या. 

दिसे लगबग,
लख्ख प्रकाशाची 
अंतरात घुमे 
गाज अंधाराची!

आनंदाचे बीज,
मला सापडेना!
कशा पाणी घालू,
काही समजेना!

देहाचे दुखणे,
सहजची दिसे!
भोवताल जमे,
काळजीने बसे!

सैरभैर मन,
शोधती आधार
होऊ बरे असा
विश्वासच दाट!



Tuesday, April 1, 2025

अमेरिकेतील भारतीय रिक्त का संपृक्त ?


आशुतोष जावडेकर हे नाव‌ लेखक, कवी, संगीतकार म्हणून सुपरिचित आहे. त्यांनी माझ्या 'रिक्त' कथासंग्रहाचं केलेलं रसग्रहण तसंच कथांमागची लेखक म्हणून माझी भूमिका. 

लेखिका म्हणून माझ्या मुलाखती झाल्या आहेत पण प्रथमच माझ्या पुस्तकाबद्दल स्वतंत्रपणे भाग झाला आहे आणि तोही अशा दर्दी, सुप्रसिद्ध व्यक्तीकडून. 

 आशुतोष यांचं मनोगत:

"अमेरिकेतील भारतीय रिक्त का संपृक्त ?" - या आणि स्थलांतराच्या अनुषंगाने मागोमाग येणाऱ्या अनेक प्रश्नांचा, भावभावनांचा वेध घेणारा कथासंग्रह अमेरिकास्थित लेखिका मोहना प्रभुदेसाई - जोगळेकर यांनी लिहिलेला आहे. 'बुक ब्रो' चा हा ८७ वा एपिसोड त्यांच्या 'रिक्त' या कथासंग्रहावर आहे. 

अमेरिकेतून लेखिकेने मांडलेले मनोगत आणि भारतातून लेखक, समीक्षक डॉ. आशुतोष जावडेकर यांनी त्या मनोगताला मांडलेली पूरक निरीक्षणे असे या 'बुक ब्रो' च्या एपिसोडचे आगळे वैशिष्ट्य आहे. 

जरूर बघा, शेअर करा, कॉमेंट करा. बुक ब्रो चे आधीचे सगळे भाग बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती.