मध्यंतरी एक चित्र पाहिलं त्यावरुन एक कविता सुचली. कविता हा माझा प्रांत नाही पण कवी लोकांना म्हणे कविता होतात, तशी ती मी कवी नसूनही झाली :-) त्यामुळे कविवर्य प्रमोद जोशी, गुरु ठाकूर यांना पाठवून आधी ती कविता आहे ना याची खात्री केली, त्यांच्या काही सुचना प्रत्यक्षात आणल्या आणि खरंच एक कविता तयार झाली. गुरुने, वृत्ताचा नीट विचार कर सांगितलं. मी व्याकरणाचं पुस्तक उघडून बसले. कविता झाली ती अक्षरगणवृत्तात झाली आहे इतकं समजलं. आता कोणाचीही, कोणतीही कविता वाचताना मी अक्षरगणवृत्ताचे निकष लावूनच वाचते आणि ते अक्षरगणवृत्त नसेल तर ही कविताच नाही असं ठामपणे म्हणते इतकी प्रगती आहे...
कविता झाल्यावर याचं आता गाणं व्हायला हवं असं वाटलं. पदार्थ केला की खायलाच हवा या धर्तीवर. मी केलेला पदार्थ निदान मी एकटीतरी खाऊ शकते पण मी गायलेलं गाणं कोण ऐकणार त्यामुळे गायिकेचा शोध सुरु झाला आणि आमच्या शार्लटची गुणी गायिका अदितीच डोळ्यासमोर आली. तिने या कवितेला चालही लावली आणि कवितेतलं गांभीर्य सुरांमध्ये ओतलं. गौरी आपटेने गाण्याला मुद्राभिनयाने जिवंत केलं आहे आणि माझ्या शार्लटमधल्या मैत्रिणींनी तिला छान साथ दिली आहे. आजारी व्यक्तीला भेटायला गेलेल्या प्रसंगात या मैत्रिणींना काहीही बोला; तुमचे आवाज दाबून टाकणार आहे म्हटल्यावर चेहरे गंभीर ठेवून त्यांनी जो काही शब्दाविष्कार केला तो हसूनहसून पोट दुखेल असा होता. तो फक्त मला एकट्यालाच चित्रीकरण करताना अनुभवता आला.
... तर आम्ही सार्या शार्लटमधल्या मैत्रिणींनी एकत्र येऊन हे केलं आहे. पाहा आणि अभिप्रायही द्या.
No comments:
Post a Comment
तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणार्याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.