Monday, January 16, 2012

क्षितीज - भाग २

पत्र पलंगावर टाकून तो उठला. थोडावेळ ते त्याच्या मनात घोळत राहिलं पण संध्याकाळपर्यंत पत्राची पुसटशी आठवणही त्याच्या मनात राहिली नाही. नंतर सुट्टीचे दोन दिवस कसे गेले तेही समजलं नाही. सोमवारी शाळा सुटल्यावर घामाघूम होवून शुभम उभा होता बाबाची वाट पहात. चार मैल धावून  अंगातलं त्राण नाहीसं झालेलं. भरीला अचानक पडलेल्या थंडीमुळे डोकं दुखायला लागलं होतं.  इतक्यात रांगेत उभी असलेली टोयोटा त्याला दिसली. त्याने हात हलवला तसं बाबाने रांगेतून थोडीशी बाहेर काढत गाडी पुढे  आणली. गाडीत बसल्यावर एकदम त्याला  आईने लिहिलेलं पत्र आठवलं. पुन्हा वाचायचं ठरवलं होतं पण जमलंच नव्हतं. पाण्याची बाटली तोंडाला लावत शुभमने सकाळी बसमध्ये घाईघाईत खिशात ठेवलेला तो चुरगळलेला कागद काढला.
"आई किती छान लिहिते."
"काय लिहिलंय एवढं?" बाबाची उत्सुकता  चाळवली.
"पत्र!".
"कुणाला?"
 "मला."
"तुला आणि पत्र?" बाबाला आश्चर्यच वाटलं. त्याला वाटलं होतं काहीतरी छानसा सुविचार वगैरे असेल लिहिलेला. एकदम पत्र म्हणजे जरा नवलच.
"हो का, त्यात काय?"
"अरे घरातल्या घरात कशाला लिहायचं ते पत्र? बोलू शकते की ती."
"हो. पण आपण तिला बोलू देत नाही असं वाटतं तिला."
बाबा  हसायला लागला.  शुभम शांतच होता.
"मला दे ना वाचायला. कळू दे तरी काय लिहिलंय तिने लाडक्या लेकाला."
"गाडी चालवताना कसं वाचशील. आणि ते मला लिहिलंय."
"तर काय झालं? दे की. नाहीतर तू वाचून दाखव."
"देतो आणि मला नीट समजावून सांग तिला काय म्हणायचं आहे ते. एकदा वाचलंय मी पण कळलं नाही नीट."
त्याने नाईलाजानेच ते पत्र बाबाच्या हातात दिलं. आईला हे कळलं तर पुढचं पत्र तो बाबाला वाचायला देणार नव्हता.

घरी पोचल्या पोचल्या बॅकपॅक भिरकावत शुभम त्याच्या खोलीत धावला. हायस्कुलमध्ये आल्यापासून त्याचं क्षितिज विस्तारलं होतं.  आत्तापर्यंत  छोट्या मोठ्या स्पर्धांमध्ये तो भाग घेत होता. पण आता जे काही करायचं  ते महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने. नववी ते बारावी सगळ्या विषयात चांगले गुण तर पाहिजेतच पण वाचनालय, वृद्धाश्रम, अपंग मुलांना मदत अशा ठिकाणी कामं  केली की त्याचे गुण, स्पर्धांमधून मिळवलेली बक्षिसं, आणि पुढच्या वर्गातले विषय आधीच करण्याची धडपड. महाविद्यालयं प्रवेश  देताना या गोष्टी बघतात. अभ्यास एके अभ्यास करुन नाही चालत चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवायचा तर.  विचार मनात थैमान घालत होते. अंगावरचे कपडे पलंगावर भिरकावत त्याने लॅपटॉपचं बटन दाबलं. जी. मेल, फेस बुक, आय-एम, सुरु  केलं. शाळेच्या संकेतस्थळावर चाचणी परीक्षेचे गुण पहायचे होते, ट्रॅकमध्ये (धावण्याचा सराव) कुठल्या नंबरवर आहोत ते बघायचं होतं. तितक्यात आय-एम वर नेहाचे शब्द यायला लागले.
"हाय"
"हॅलोऽऽऽ, ब्रेकींग न्यूज.... माझ्या आईने पत्र लिहिलंय मला."
"अं...? का पण. एकाच घरात तर राहता ना? बोलत नाही का तुम्ही एकमेकांशी?"
"मी वाद घालतो, ऐकत नाही म्हणून लिहायचा मार्ग शोधलाय तिने"
" कशाबद्दल लिहिलंय?."
"तेच गं ते. तू सांगितलेलं, परागच्या ड्रग डीलींग बद्दल. आता मलाही वाटायला लागलंय सांगावं की काय त्याच्या घरी जाऊन."
"ओ. एम. जी. (ओ माय गॉड) आर यु गोईंग मॅड? तो आणि त्याचे ते ड्रग डीलर्स मारुन टाकतील तुला."
"हो, पण त्यांना कळायला तर हवं  आणि माझं नाव नको त्यात गुंतलं जायला."
" पण आपण हे कशाला बोलत बसलोय आय-एम वर. तू म्हणतोस माझ्याशी बोललं की डायरी लिहिल्यासारखं वाटतं. मग  सांग ना दिवसभरातल्या गोष्टी."
शुभम मग बराचवेळ त्या पत्राबद्दलच बोलत राहिला. आईने तिचं चुकलं हे कबूल केलं होतं त्या पत्रात, त्यातच तो खूष होता. नेहाही कुतूहलाने ऐकत होती.
"बरं आपल्याला पोस्टर करायचं आहे एकत्र. लक्षात आहे ना." आईच्या पत्रातून तो बाहेर आलाय असं वाटल्यावर तिने विचारलं.
"भिती वाटतेय घरात सांगायला. तू विचारलं आहेस आईला?"
"हो."
"मी विचारुन सांगतो."
"बरं, बाय."
"बाय."
शुभमला बरेच मित्र ऑनलाईन दिसत होते. पण अभ्यासाकडे वळायला  हवं  होतं.


क्रमश:
पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता-व्हिवा लेखमालिका: ओ ड्युऽऽड 







Tuesday, January 10, 2012

क्षितीज - भाग १

अमेरिकेतील  शालेय जीवनावर आधारित लेखमालिका मी लोकसत्ता - व्हिवासाठी लिहिली होती.  इथल्या शाळकरी मुलांचं जीवन वास्तवात बहुतांशी  कसं आहे हे मांडण्याचा प्रयत्न म्हणजे ही लेखमालिका. माझ्या नवीन मित्रमैत्रिणींसाठी.
                       *************************
परागला विचारु का नको अशा संभ्रमातच शुभम गाडीत बसला. इकडचं तिकडचं बोलणं झालं आणि एकदम शुभमने विचारलं.
"तू ड्रग डिलिंग करतोस?" त्याच्या दृष्टीने ही आजची ताजी खबर होती. परागचा चेहरा कावरा बावरा झाला. घाबरुन त्याने समोर  बघितलं. रेडिओच्या आवाजात बाबांनी काही ऐकलं असेल असं वाटत नव्हतं.
"स्टुपिड! तुला कुणी सांगितलं?" रुक्ष स्वरात त्याने विचारलं.
"नेवर माइंड" शुभमला त्याला कुणाकडून हे समजलं ते सांगायचं नव्हतं.
"मग मलाही तू उगाच काहीतरी विचारु नकोस." परागच्या घोगर्‍या पण ठाम आवाजाने शुभमच्या अंगावर काटा आला. तो गप्प  झाला. रेडिओचा आवाज गाडीत घुमत राहिला. दोघांच्या घरातलं कुणी ना कुणी, आळीपाळीने त्यांना एकत्र शाळेत आणायचं, सोडायचं. कधी खूप गप्पा नाही तर मग काहीच नाही. त्यामुळे त्या शांततेतही थोडं अवघडलेपण सोडलं तर फार वेगळं काही नव्हतं. परागच्या बाबांनी गाडी दारासमोर उभी केली. त्यांचे आभार मानून शुभम घरात शिरला. समजलेली बातमी घरात सांगायची की नाही हे त्याला ठरवता येईना. तरीही आत आल्या आल्या त्याच्या मनातला अस्वस्थपणा बाहेर पडलाच. आई लगेच म्हणाली,
 "आपण परागच्या घरी सांगितलेलं बरं."
"काय?"शुभमला कुठून या फंदात पडलो असं झालं.  बाबांनी समजल्यासारखं म्हटलं.
"केवढी घाई करतेस प्रतिक्रिया व्यक्त करायला? असं सांगून कसं चालेल लगेच. काही ठोस पुरावा आहे का आपल्याकडे, आणि  त्याचे आई वडील त्याला विचारणार, तो शुभमला जाब विचारेल, त्यातून नेहाही मधल्यामधे अडकेल, परागवर राग काढेल ती."
आई एकदम गप्प झाली.  शुभमच्या लगेचच  लक्षात आलं. बाबा तिला कधीही म्हणतो ना, फार घाई करतेस प्रतिक्रिया व्यक्त  करायला ते अजिबात आवडत नाही तिला. थोडावेळ तसाच गेला.
 "मी काय लगेच धावलेले नाही सांगायला. नुसतं माझं मत व्यक्त करतेय. आपल्याला माहीत असून त्याच्या पालकांना अंधारात  ठेवलं, तर त्या मुलाचं आयुष्य नाही का फुकट जाणार? पुन्हा तसं काही झालं तर आपण आधीच सांगायला पाहिजे होतं असं  वाटत राहणार."
त्या दोघांचं चांगलंच वाजणार हे लक्षात आलं शुभमच्या. ही घरातली खासियतच. एक सांगायला जायचं, तर दुसरंच सुरु होतं  आणि शेवट काहीतरी तिसराच.
कसं वागायचं घरात तेच त्याला कळेनासं झालं होतं. वाद रंगण्याची चिन्ह दिसतायत म्हटल्यावर शुभम सटकलाच तिथून.
सहावीत गेल्या गेल्याच त्याने ऐकलं होतं की माध्यमिक शाळांमध्ये बरीच मुलं ड्रग्ज घेतात, विकतात. घरात सतत तीच काळजी.  तशी शाळा चांगल्या वस्तीतली. पण बंदुका, शारीरिक संबंध आणि ड्रग्ज या तीन प्रश्नांनी सगळ्यावर मात केली होती. या गोष्टींशी  कुठली वस्ती, शाळा याचा काही संबंध नाही हे कुणाच्या का लक्षात येत नाही हेच त्याला समजत नव्हतं. एकदा याच  नावाजलेल्या शाळेतल्या बाथरुममध्ये दोन मुलांनी हात बॉम्ब फोडलाच की. थोडं घाबरायला झालं, पण तसं चित्तथरारकच होतं.  असलं धाडस काही सोपं नाही. पुन्हा पुढचे तास झालेच नाहीत.  पोलिसांनी ताबडतोब त्या दोन मुलांना ताब्यातही घेतलं. शाळेतून  प्रत्येक मुलाच्या घरी काय झालं ते सांगणारा फोनही गेला. तेवढी एकच घटना त्या तीन वर्षात. नेमकी ती मुलं वर्गातलीच  निघाली. मग काय, आईला  भारतीयांच्या पाटर्यांमध्ये, त्या 'डॅम बोअरिंग' लोकांना सांगायला एक किस्साच मिळाला होता वर्षभर.  कधी कधी तर तेच तेच विचारायची, तेव्हा वाटायचं माझी काळजी म्हणून विचारते की मैत्रिणींना सांगायला? पण अशा गोष्टी जे  करतात ते लपून छपूनच. सहजासहजी नाही कळत काही. ड्रग डिलिंगबद्दल गप्पा होतात पण कुणालाच ते कोण आणि कसं करतं  ते नव्हतं कळलं. आता हायस्कुलमध्ये आल्यावर खूप मुलांची नावं माहीत झाली आहेत. त्यात आईच्या मते चांगल्या वर्तणुकीची  असणारी 'देसी' नावंही काही कमी नाहीत. पण ते घरात सांगितलं की पहिला प्रश्न -
"तू नाही ना घेत?"
"बघ हं. आमचं असतं लक्ष. नाहीतर कानावर येतं इथून तिथून."
"अरे, तुम्ही मी स्वतःहून सांगायला पाहिजे अशी अपेक्षा करता आणि त्याचवेळी कानावर येईलच कुठूनतरी अशी का धमकी देता? मला असं काही व्यसन असेल तर मी कशाला नावं सांगितली असती?"
"आवाज नको वाढवू. समजलं आम्हाला"
संपला संवाद. कधी चुकूनसुद्धा आमचं चुकलं, यु आर राईट. असं  म्हणणार नाहीत.
लॅपटॉपवर शुभमची बोटं धडाधड पडत होती.  त्या तिघांचे संवाद आत्ताच समोर घडल्यासारखे त्याने शब्दांतून उभे केले. नेहाला एकदा दिवसभरात काय घडलं ते सांगितलं की त्याला वेगळी डायरी लिहायची गरजच उरत नव्हती. लॅपटॉपच्या पडद्यावर तो  नजर खिळवून होता. कधी एकदा नेहाची प्रतिक्रिया त्या छोट्याशा चौकोनी पडद्यावर वाचू असं झालं होतं.
"ओ माय गॉड! ड्यूड!.... दीज ग्रोन अप्स्‌ ! .... तू तरी कशाला सांगितलंस पण?"
"ए, तुला माहीत आहे ना मी सगळं सांगतो घरात. बाहेरुन गोष्टी कळल्या की वैतागतात दोघं. माझ्याकडूनच समजलं की रागवत नाहीत, समजून घेतात. तू मला आवडतेस ते स्पष्ट सांगितलं म्हणूनच बोलायला मिळतं आपल्याला हे विसरु नकोस."
"हो माझी आई सारखी सांगते. आम्ही विरोध करत नाही याचा अर्थ तुम्हाला उत्तेजन देतोय असाही नाही."
"किती वेळा तेच तेच सांगतात. डोकं उठवतात अगदी."
"जी २ जी (गॉट टू गो). उद्या बोलू आपण. काळजी करु नकोस. लव्ह यू."
शुभमला डोकं एकदम शांत झाल्यासारखं वाटलं नेहाच्या शब्दांनी. हवेत तरंगल्यासारखंही. 'लव्ह यू'  गुदगुल्या झाल्या सारखं  गालात हसत, पुटपुटतच त्याने पलंगावर अंग टाकलं. नेहाशी ऑनलाईन गप्पा हीच त्याची डायरी. मनातलं तिला कळलं की डायरी  लिहून झाल्यासारखा तो शांत व्हायचा.
शुभमला जाग आली ती एकदम दहा वाजता. घरात शांतताच होती. शनिवार. यापेक्षा जास्त वेळ लोळत काढला तर खालून आई  ओरडणार याची त्याला खात्री होती. आळसावत त्याने पांघरुण झटकलं. घडी करता करता झटकलेल्या पांघरुणातून पडलेल्या पाकिटाने तो आश्चर्यचकित झाला. इथे कुणी आणून ठेवलं आणि कुणासाठी?
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
प्रिय शुभम,
    आश्चर्य वाटलं ना पत्र पाहून? काल एकदम ताडकन तोडूनच टाकलंस तू. बाबाची आणि माझी वादावादी सुरु होणार हे लक्षात आलं  आणि वैतागलास ना? ठरवलं होतं तू शांत झाल्यावर तुझ्याशी बोलायचं. पण पुन्हा आपलेच वाद सुरु होतात. म्हटलं घरातल्या घरात अगदी छोटीशी चिठ्ठी लिहावी. काल खरंच भिती वाटली मला. ड्रग्ज, बंदुकांचा सर्रास वापर, टीन एज प्रेग्नंसी या इकडच्या शाळांमधल्या समस्या ठाऊक आहेत रे, पण पक्की खात्री असते ना की आपली 'देसी' मुलं यात अडकणारच नाहीत. शाळांमध्ये  तरुण मुलं बेछूट गोळीबार करतात, निष्पाप मुलं प्राणाला मुकतात, मुलांचा सुरक्षिततेवरचा विश्वास नष्ट होतो, आयुष्यभर अशा घटनेचे व्रण मनावर कोरलेले राहतात. आपल्या मुलांच्या शाळेत हे असलं काही होणार नाही यावर ठाम विश्वास असतो प्रत्येकाला.  पण तरीही असं कुठेही घडलेलं ऐकलं की पोटातला गोळा कितीतरी दिवस जात नाही. आपण इतक्या चांगल्या वस्तीत राहतो तरी  तुझ्याच वर्गातल्या त्या दोन मुलांनी शाळेतल्या संडासात प्रयोग म्हणून हातबॉम्ब फोडण्याचा प्रकार केला होता ना? त्यातच अचानक अगदी शेजारचाच मुलगा आणि तोही भारतीय; ड्रग डिलिंग करायला लागलाय हे समजतं तेव्हा नको का त्याच्या पालकांना जागृत करायला? परागची आई तर मला सारखी भेटते. मुलाबद्दल कौतुकाने काही सांगायला लागली की वाटतं सांगावं तिला, निदान काही  सूचित तरी करावं की आपण फार भ्रमात असतो आपल्याच मुलांबद्दल. पण नुसतं सांगायला हवं म्हटल्यावर आपल्या घरात  झालेला गोंधळ आठवतो. काय करायला हवं तेच कळेनासं झालंय. माझं चुकलंच. आधी तू काय बोलतोस ते पूर्ण ऐकायला पाहिजे  होतं. बघ मला एवढंच सागांयचं होतं. तुझ्याशी बोलल्यासारखंच वाटतंय. माझ्या मनातलं पूर्णपणे तुला समजलं त्याचं समाधानही. नाहीतर मध्ये मध्ये तू इतका बोलतोस ना. मी लिहिलंय ते पटतंय का ते नक्की सांग. --- तुझी आई
ता.क. एवढं सगळं असलं तरी हेवा वाटतो मला, तुला इथल्या शाळेत शिकायला मिळतं त्याचा. किती साधनं उपलब्ध आहेत  रे तुम्हाला शाळेतून. आणि भविष्यात काय करायचं त्याच्या मार्गदर्शनासाठी शाळाही किती तत्पर असतात. नकळत भारतात आम्ही शिकत होतो तेव्हाचं शिक्षण आणि इथल्या शिक्षण पद्धतीची तुलना सुरु होते, गळेकापू स्पर्धा, सतत बाकीच्या मुलांचे दिले जाणारे दाखले, हुशार, ढ, बर्‍यापैकी असं नावासमोर झालेलं शिक्कामोर्तब इत्यादी इत्यादी. तो एक वेगळाच विषय आहे. ए, पण आमच्याच एका शिक्षकांमुळे मी लागले लिहायला. ते नंतर सांगेन कधीतरी, एकदा तू पत्र वाचतो आहेस ही कल्पना आली की. नीट वाच हं मी काय लिहिलं आहे ते.
                                                                                                                               क्रमश:
पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता व्हिवा - 'ओ ड्युऽऽड’ ही लेखमालिका