Saturday, March 17, 2012

आस

कुणीतरी म्हणालं,
सांभाळ आता तुझ्या बाबाना
बाई गेल्यावर खचतो माणूस
माझं उदास हसु,
मनातला डोंब फूटून
तांडव घालायला लागलेले आसू
दडवले शब्दांच्या मखरात,
म्हटलं,
असं कसं होईल
त्याच्या मायेची पाखर
आणखी काही वर्ष तरी राहिल

ती गेली तेव्हाच मी का नाही गेलो
दचकून पाहिलं बाबाकडे
वाटलं,
घट्ट मारावी मिठी
आई गेली आत्ताच, तू नको जाऊ
शब्दाच्या आजूबाजूला
घुमायला लागलं पारव्यासारखं,
कुणाचंतरी  म्हणणं
बाई गेल्यावर खचतो माणूस....

खरचं का रे तसं झालं...
खचलास का रे बाबा तू?
केलास ना पुरा तुझाच ध्यास
ती गेली त्याच वाटेवर टाकलंस पाऊल
लेकींसाठी नाहीच ना अडला पाय

कधीतरी का होईना,
कुणाचंतरी म्हणणं खोटं का नाही ठरलं
आई गेल्यावर, बाबा तुला आमच्यासाठी रहायला
का नाही जमलं?


Tuesday, March 13, 2012

क्षितीज - भाग १०

 टेक्सास राज्यातल्या विद्यापीठाकडून त्याचा अर्ज स्विकारल्याचं पत्र आलं आणि त्याची धांदलच उडाली. आईचा थोडा हिरमोड  झाल्यासारखा झाला. जवळपासच्या विद्यापीठांमध्ये त्याने अर्ज केले होते तिथेच प्रवेश मिळाला असतातर जाणं येणं सोयीचं झालं असतं, असं तिला वाटत होतं. आता टेक्सास म्हणजे विमानप्रवासाशिवाय मार्गच नाही. त्याचाच दुसरा अर्थ सारख्या सारख्या भेटीही  नाहीत. पण नेहालाही तिथेच प्रवेश मिळाल्याचं समजल्यावर दोघांच्याही आईबाबांना फार बरं वाटलं. दोन्ही मुलांना आता एकटेपणा वाटणार नव्हता. किंबहुना एकमेकांच्या सहवासात आपली आठवण रहिली तरी खूप असही त्यांच्या मनात येवून गेलं.

एकेक करुन सगळं आवरलं आणि त्याला अगदी मनापासून वाटलं यावेळेस तरी आईला सांगायला हवं तिच्या पत्रांबद्दल. तो  धाडधाड जिने उतरत अर्ध्यावर आलादेखील तिला सांगायला. पण एकदम त्याने विचार बदलला. तशीच दमदार पावलं टाकत तो त्याच्या खोलीत शिरला. टेबलावर पडलेला कागद त्याने उचलला आणि कोर्‍या कागदावर शब्द उमटायला लागले.

’प्रिय आई  ......’


शुभम आज कॉलेजसाठी निघणार. खरं तर तिला खूप वाटत होतं त्याची तयारी करावी, बरोबर खायचे पदार्थ करुन द्यावेत.  त्याच्या आवडत्या चकल्या तिने आधीच केल्या होत्या. पण आणखी काय करायचं? स्वतःची तयारी तोच करत होता. लहान असताना छोट्या छोट्या गोष्टींसाठी तिच्यावर अवलंबून असणार्‍या शुभमने आधीच घोळ न घालण्याबद्दल बजावलं होतं. गेल्या आठवड्यात त्याला पत्र लिहायचं राहूनच गेलं. खरं तर तिला प्रचंड काळजी वाटायला लागली होती ती त्याच्या सेलफोनच्या वापराची. बातम्यांमध्ये हल्लीच तिने ऐकलं होतं की हे देखील एक व्यसनच आहे. आणि शेवटी आजार म्हणूनच त्याच्याकडे पहावं  लागणार अशी चिन्ह आहेत इतकी मुलं, मोठी माणसही सेल फोनचा वापर करतात. कधीही शुभमला पहा, कानात कायम हेडफोन नाहीतर फोनवर बोलणं चालू.  एकदोनदा तिने शुभमला सांगायचा प्रयत्न केलाही. पण त्याचं नेहमीसारखच.
"कुठे वापरतो मी इतका?"
"तास न तास गाणी ऐकत असतोस सेलफोनवर. नाही तर मग गाणी डाऊनलोड करणं चालू असतं कॉम्प्युटरवरुन. ते नाही तेव्हां मित्रमंडळींशी गप्पा."
"पण  अभ्यासात प्रथम श्रेणी आहे की कायम"
"अभ्यासाचा आणि एखाद्या गोष्टीचं व्यसन असण्याचा काय संबंध आहे, शुभम?"
"व्यसन कुठे?"
"नाहीतर काय? त्यादिवशी एकदिवस तुझा फोन मागितला वापरायला तर किती कटकट केलीस. मला लागतो, मी वापरतो, धावायला गेलं तर तुम्हाला फोन कसा करु? कुणाशीच गप्पा मारता येणार नाहीत. कारणच कारणं."
"हो पण त्याला व्यसन काय म्हणतेस? खरी तर कारणं आहेत सगळी."
तिने मग तो नाद सोडून दिला. शब्दा शब्दाचे खेळ करण्यापेक्षा त्याला पत्र लिहलेलं चांगलं. टेक्सास विद्यापीठाकडून प्रवेश मिळाल्याचं कळल्यानंतर घरात गडबडच उडाली. पत्र लिहायचा विचार बाजूला राहिला. शुभमने जेव्हा क्रिमिनल टेक्नॉलॉजीमध्ये (गुन्हा अन्वेषण तंत्रज्ञान) पदवी घ्यायचं ठरवलं तेव्हां ती नाराज झाली होती. शुभमचा मेडिकलचा ओढा कळल्यावर जेवढी ती खूष  होती तितकीच त्याच्या बदललेल्या बेताने ती निराश झाली. माहेरी, सासरी शुभम पहिला होणारा डॉक्टर याच कल्पनेत ती गेली तीन चार वर्ष रमली होती. पण हेही खरं होतं की शुभमच्या आवडीने त्याला काय करायचं ते त्याने ठरवावं याबद्दल पालक म्हणून दोघांची भूमिका ठाम होती. शेजारी आलेल्या नेथनच्या उदाहरणाने तो हेलावून गेलेला तिला जाणवलं होतच पण त्यासाठी तो  त्याचं क्षेत्रच बदलेल याची अपेक्षा नव्हती. पण एकदा ते स्विकारल्यानंतर दोघांनी त्याचं कौतुक केलं, पाठिंबा दिला.

तिला काय काय आठवत राहिलं. तो लहान होता तेव्हां त्याच्या शाळेच्या आंतरराष्ट्रिय सोहळ्यात तिने मागे लागून त्याला  घालायला लाववेला कुडता पायजमा. शाळेत पोचल्यावर रडून रडून त्याने तो बदलायला लावला तेव्हां झालेली तिची चिडचिड. रस्त्यावर दिसलेलं जंगली कासव. दोघांनी ते कासव  घरी आणलं. पण कायद्याने कासव घरात ठेवता येत नाही हे समजल्यावर त्याला जवळच्या तळ्यात परत सोडावं लागलं. हिरमुसल्या शुभमची समजूत घालण्याचा तिने केलेला आटापिटा, सायकलवरुन  पडल्यावर कपाळाला घालावे लागलेले टाके, शुभमचा गोल्डफिश गेल्यावर प्रथमच माणसंही मरतात ह्या सत्याला स्विकारताना  त्याला झालेला त्रास. कधी खोटं बोलल्याबद्दल, कधी दिलेल्या वेळेत घरी परत न आल्याबद्दल, वेळोवेळी त्याला मिळालेल्या शिक्षा,  आणि बाकिच्या मुलांप्रमाणे निन्टेंडो, गेमबॉय असले खेळ दिले नाहीत तेव्हां सगळ्यांना सगळं मिळतं, प्रत्येकाकडे ह्या गोष्टी असतात असं म्हणत त्याने केलेलं आकांडतांडव. तिला आत्ताही हसायला आलं. त्यावेळेस शांतपणे तिने  तू त्या सगळ्यांकडे  खेळायला जातोस तेव्हां वापरतोसच की त्या गोष्टी असं म्हटल्यावर 'दॅट्‌स्‌ नॉट फेअर' म्हणत दाणदाण पाय आपटत केलेला त्रागा...  त्यावेळेस  तू त्यांच्याकडेच जाऊन रहा, पहा ती लोकं दत्तक घेतात का, असं म्हटल्यावर तो गप्प झाला होता. कधीतरी शुभमने  स्वतःच अशा गोष्टी नव्हत्या म्हणून त्याला लागलेलं वाचनाचं वेड मान्य केलं तेव्हां तिला मनस्वी आनंद झाला होता. त्यानंतर  पुस्तकाचं जग हा मायलेकातला मोठा दुवा बनला. आत्ताही तिला खात्री होती की फोन करुन अगदी टेक्सासमधूनही तो त्याने  वाचलेल्या पुस्तकाबद्दल चर्चा करेल. पण आता त्याच्या भेटी सुट्टीतच. घर अगदी सुनंसुनं होवून जाणार तो गेल्यावर. कल्पनेनेच  आत्ताही ते भलं मोठं घर तिला अंगावर आल्यासारखं वाटायला लागलं. तिचे डोळे पाणावले. पाखरांना पंख फुटल्यावर ती उडणार हे  सत्य स्विकारणं भाग असलं तरी जीव कासावीस व्हायचा थोडाच थांबतोय?

आज पाच वाजताचं विमान होतं त्याचं. तयारी झाल्यावर तो गप्पा मारायला खालीच येवून बसला. त्याचा बाबा आणि तो बराच  वेळ टेक्सास बद्दलच बोलत बसले. शुभमचा उत्साह पाहिल्यावर तिने प्रयत्नपूर्वक आपली अस्वस्थता दूर सारली.
"तू बॅग नीट भरलीस ना?"
"अगं भरली गं."
"नंतर आठवतं तुला, हे राहिलं, ते राहिलं. यावेळेस परतही येता येणार नाही राहिलं म्हणून."
"घेईन मी तिकडे विकत."
"मग काय? बोलायलाच नको."
"सायकल नाही ना नेता येणार माझी?"
"नाही. आणि इतक्यात विकत पण घ्यायची नाही. कॅम्पसमधल्या कॅम्पसमध्ये कशाला लागेल?"
"बरं नाही घेणार मी विकत"  शुभमने फारसा वाद घातला नाही.
"रोज रात्री फोन करायचा." बाबाने असं म्हटल्यावर शुभमला हसायला आलं.
"पण तुम्ही तर म्हणता मी फार जास्त वापरतो फोन"
"कामासाठी वापरायला कुठे मना करतो आम्ही? आणि आम्हाला रोज रात्री फोन करायचा म्हणजे तुझ्या दृष्टीने कामच की."
"यु आर राईट." शुभमने असं म्हटल्यावर सगळ्यांनाच हसायला आलं.
आई-बाबाला घट्ट मिठी मारत त्याने दोघांचा निरोप घेतला. एअरपोर्टवर ती त्याला सोडायला जाणार नव्हती. दारापाशी उभं राहून हात हलवताना डोळ्यातलं पाणी बाहेर ओघळू नये म्हणून ती आटोकाट प्रयत्न करत होती. तितक्यात गाडीपाशी पोचलेला शुभम परत आला.
"तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं."
"आय लव्ह यू म्हणणार आहेस का इकडच्या पद्धतीने?" तिने कसनुसं हसत विचारलं.
"नाही, माझ्या खोलीत एक खोका आहे. तो जपून ठेव. मी नंतर कधीतरी तो नेणार आहे."
ती पुढे काहीतरी विचारणार तितक्यात  बाबाची जोरदार हाक आली.
"चल पळतो मी. बाय मॉम, आय लव्ह यू मॉम." तो हात हलवत निघून गेला.
दार बंद करत ती त्याच्या खोलीकडे वळली. पलंगा खाली  पडलेला खोका तिने अतीव उत्सुकतेने ओढला आणि तिला आनंदाश्रु आवरेनासे झाले. शुभमने लिहलेलं पत्र त्यावर चिकटवलेलं होतं. तिला लिहलेलं पत्र. उतावळेपणाने तिने पत्र  उघडलं.

* * * * * * * * * * * * * * * * * * * *
प्रिय आई,
मराठीत पत्र लिहतोय मी. खूप चुका असतील पण माझं मराठी पत्र पाहून तुला झालेला आनंद माझ्या  डोळ्यासमोर येतोय. मी कधीच तुला सांगितलं नाही पण तुझ्या प्रत्येक पत्राची मी फार आतुरतेने वाट पाहिली. नेहानेही. कधीतरी तू पत्र लिहायची नाहीस तेव्हां फार बेचैन व्हायला व्हायचं. एकदा तर मुद्दाम भांडण कर म्हणजे आई पत्र लिहेल असं नेहाने सुचवलं होतं. बाय द वे, बाबाकडून मला 'ता. क.', 'चि.', 'सौ.' अशा शब्दांचे अर्थ समजले. कुठलीही गोष्ट फार जास्त स्पष्ट करत राहतो तो, त्यामुळे समजलं नाही असं होतच नाही. तुझे शाळेतले दिवस तर फारच छान होते. तू लिहायला कशी लागलीस ते नंतर लिहलं नाहीस. पण मी बाबाला विचारलं. तो म्हणाला तुझा निबंध एकदा शाळेतल्या भिंतीवर लावला होता. वर्गात सरांनी वाचून  दाखवला आणि त्यांनी सांगितलं की इतकी वर्ष शिक्षक म्हणून काम केलं पण पहिल्यांदाच निबंधाला पैकीच्या पैकी गुण दिले. त्यानंतर मग तू लिहायला लागलीस. हाच प्रसंग लिहणार होतीस ना तू शिक्षकांमुळे विद्यार्थी कसे घडतात ते सांगताना? पण अशा  कितीतरी गोष्टी लिहशील म्हटलस आणि विसरलीस बहुधा. का मी विचारेन म्हणून वाट पहात होतीस? या गोष्टी विसरलीस की काय असं विचारावसं वाटायचं पण असही वाटायचं की पत्र वाचण्यात जी मजा आहे ती वेगळीच. एकदा का मी तुला विचारलं असतं की मग बाकिच्या पत्रांबद्दलही बोललो असतो आपण. मला नेमकं तेच नको होतं. तू लिहलेली सगळी पत्र मी या खोक्यात  जपून ठेवली आहेत. ती तशीच ठेव. मला ती माझ्या मुलांसाठी ठेवायची आहेत.... हं हं, हसू नकोस काय माझे बेत म्हणून. तुझ्या पत्रांमुळे माझ्यात किती बदल झालाय याची तुला कल्पनाही करता येणार नाही. प्लीज सगळी पत्रं जपून ठेव. कितीदातरी मी ती  परत परत वाचतो. आत्ताही मला ती घेवून जाता आली असती पण कधीतरी तुला कळायला हव्यात नं पत्रांबद्दल, माझ्या भावना.  पुढच्या वेळेस नेईन मी. प्रॉमिस कर की त्या पत्रांच्या गट्ठ्यात भर पडलेली असेल. नाहीतर असच का नाही करत? तू मला चक्क  पोस्टानेच का नाही  पत्र पाठवत? हसु आलं ना मी ई मेलच्या जमान्यात पोस्टाने पत्र पाठव म्हणतोय. अगं, मलाही तुम्ही जशी आतुरतेने पोस्टमनची वाट पहायचात तसं करुन बघायचं आहे. पाठवशील ना?
                                                                                                                                                                                      तुझा,
                                                                                                                                                                                           चि. शुभम

ता. क. : लव्ह यु मॉम. लव्ह यु मॉम, लव्ह यु मॉम .......... आय नो! बाबा म्हणेल, 'शुभम! असं लव्ह लव्ह व्यक्त करत नाही होत प्रेम; यु हॅव टू फीऽऽऽल द लव्ह'. पण तू म्हणतेस तसं रोज नाही तरी कधीतरी सांगितलं तर काय बिघडलं, इथल्या लोकांसारखं? खरं ना?
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
तिच्या हातातलं पत्र डोळ्यातल्या अश्रुंनी ओलचिंब झालं होतं. खोक्यातलं एकेक  पत्र काढत तिनेच लिहलेल्या त्या पत्रांवर ती मायेने अलगद हात फिरवत राहिली.



समाप्त

पूर्वप्रसिद्धी ’व्हिवा’ लोकसत्ता