Thursday, January 16, 2025

पोर्तोरिको

 आम्हाला एकदम ट्रम्प प्रचारभेत ऐकलेला floating island of garbage  बघायची इच्छा झाली. पोचलो उडत, उडत पोर्तोरिकोला. इथूनच सुरुवात झाली. लेक आमच्याकडून तिला पाहिजे तसा (बहुतेक पुएर्तोरिको) उच्चार घोटून घेत होती आणि आमची गाडी पोर्तोरिकोवर अडकलेली. शेवटी स्थलांतरित पालकांची अडचण समजल्यासारखं 'म्हणा काय हवं ते' अशी आम्हाला परवानगी मिळाली.

प्रवास म्हटलं की घरातला प्रत्येकजण वेगवेगळ्या परीने सज्ज होत असतो. लेकीला काळजी असते आम्ही तिला कुठेतरी लाज नक्कीच आणणार ह्याची. त्याचवेळी नवरा  सगळी काळजी सोडून द्यायच्या तयारीत असतो याची मला काळजी वाटायला लागलेली असते. घरात कमीत कमी बोलणाऱ्या नवऱ्याला प्रवासात कंठ फुटतो‌. बायको पोरं सोडून हा कंठ कुठेही फुटतो ‌त्यामुळे तो सोडून इतर सगळे काळजीत पडलेले असतात. ह्यावेळी त्याचा कंठ फुटला तो उबर चालकांशी बोलताना.

बसलो गाडीत की काढायचा प्रश्नसंच बाहेर हे त्याचं या प्रवासातलं बहुतेक ध्येय होतं. पोर्तोरिकाचा उच्चार, 'कचऱ्या' बद्दल मत काय, चांगलं खायला कुठे मिळेल आम्ही इकडे काय बघू आणि सगळं महाग सूर त्यामुळे   स्वस्त कुठे आणि काय मिळतं.‌ उत्तरं पण तितकीच रंजक मिळत होती. प्रत्येक उबर चालक आमचं मनोरंजन करत होता, ज्ञानात भर घालत होता. ही काही उत्तरं.

विधानसभेच्या आवारात ओबामानंतरच्या अध्यक्षांचे  पुतळे नाहीत यात काय ते समजा,  आमच्याकडे माहीमाही मासा जास्त आहे. कचऱ्यावरच जगतो तो. बघा कचऱ्याचा फायदा, आम्ही विनोद म्हणून ऐकलं आणि सोडून दिलं. तिकडे बोलले म्हणून सुटले... अशी उत्तरं floating island of garbage बद्दल मिळाली.

बऱ्याच चालकांना भारताबद्दल माहिती होती. एकाने तर सांगितलं bolt action, world war2 गेममधून भारताबद्दल माहिती समजली... तर एकाला भारतात फिरायला जायची इच्छा आहे पण बायकोचे स्वच्छतेबद्दलचे निकष कडक आहेत म्हणाला. आम्ही काही बोलायच्या आधीच त्याने सांगितलं हे माझं मत नाही. बायकोचं आहे.

नारळ भरपूर असूनही सरकारने नारळाचं तेल वापरण्यावर निर्बंध लादले आहेत. मक्याच्या तेलाचा वापर इथे जास्त दिसला. 

पोर्तोरिकोला अमेरिकेचा एक राज्य म्हणून मान्यता हवी आहे पण गेली सहा वर्षे प्रयत्न करूनही उपयोग झालेला नाही.

नवऱ्याचे प्रश्न इतके पाठ झाले की उबर दिसल्यावर आम्ही प्रत्येकवेळी आणखी एखादा प्रश्न त्याला सांगायचो. तेच तेच प्रश्न ऐकणार तरी कितीदा. नशीब एकच उबर चालक दोनदा नाही आला.

सगळे बघतात ती ठिकाणं बघायचीच पण लोक जिथे सहसा जात नाहीत तो भाग पण बघायचा असं दरवेळेला आम्ही करतो तेच यावेळीही केलं. लेकीने सगळं ठरवलं होतं. आम्ही गुणी विद्यार्थ्यांसारखं सूचना पाळत होतो; इतक्या की एकदा तर चुकीच्या ठिकाणी पोचून चुकीच्या रांगेत उभे राहिलो. तिथे टकाटक पोषाख करून आलेली माणसं संभ्रमित नजरेने आमच्याकडे बघायला लागली. ती आमच्याकडे बघतायत म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघायला लागलो मग आमच्या कपड्यांवरून आणि त्यांच्या कपड्यांवरून कुछ तो गडबड है हे लक्षात आलं तेवढ्यात कोणीतरी आमची चौकशी करायला आलंच लेकीने तिचं स्पॅनिश फाडत चुकीच्या रांगेत उभं राहिल्याची खात्री केली आणि मग आम्ही तिथून पळ काढला. बहुतेक कसल्यातरी प्रशिक्षणासाठीची रांग होती ती. अशा चुका झाल्या की लेक तिच्या भावानेही या चुका केल्या होत्या याची खात्री करून घेत होती. 

सॅनहुआनचा किल्ला आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे. तिथल्या रस्त्यावरून फिरताना नजरबंदी होणारी घरं पाहिली. तिथले काही रस्ते त्यासाठीच प्रसिद्ध आहेत. Airbnb त जाताना स्थानिक लोक जातात तसा मुद्दाम फेरीने प्रवास केला. कॅमुई गुहा (Camuy Caves) बंद होत्या म्हणून आडगावातल्या कुठल्यातरी गुहा बघायला गेलो. गुहेपर्यंत पोचायचं तर समुद्राच्या आजूबाजूला असलेल्या कातळावरूनच जायचं. चालताना थोडी पावलं टाकली की उजवीकडे,  डावीकडे, समोर भली मोठी भगदाडं बघितल्यानंतर चुकून पाय आत गेला की  अडकलो नाही तर सरळ समुद्रात या विचाराने मी एक खडक पकडून ठिय्या दिला. आजूबाजूचा समुद्र बघण्यातच वेळ घालवला. तसंही आत जाण सोपं नव्हतंच आणि आत गेल्यानंतर बाहेर येणं मुश्कीलीचं होतं. लेक आत गेली आणि अडकली. तिला वर येता येईना त्यामुळे त्या चिंचोळ्या खिंडीत तिच्या बरोबरीने बाकीचे अडकले. मग कोणाचा तरी मार्गदर्शक होता त्याने तिला कसं वर चढायचं ते सांगितलं आणि एकदम सगळी जनता गुहेबाहेर आली. अर्थात हे सगळं नंतर तिच्याकडून कळलं आणि तिथला एक माणूस कोणीतरी अडकलं, अडकलं अशी जाहिरात करत होता आणि आम्ही उत्साहाने ती आमचीच मुलगी, आमचीच मुलगी असं सांगायला लागलो. लेकीने आमचा हात ताबडतोब सोडला आणि सरळ आम्हाला जंगलातच नेलं. तिथेच सोडून देणार की काय...

एलयुन्के जंगल (El Yunque National Forest) ‍म्हणजे कोकणातल्या घाट्या‌. त्या शिताफीने चढलो. धबधबे बघितले, गार वाऱ्यात गरम गरम पदार्थ हादडले. आमच्या दृष्टीने कठीण, लेकिच्या दृष्टीने सोपे ट्रेक आम्ही करत होतो त्यामुळे ती  कठीणातला कठीण 'ट्रेक' करायला आम्हाला खुषीत सोडून पळाली.

त्यानंतर पुढचे दिवस डोंगरदऱ्यांमधल्या छोट्या छोट्या गावात  फिरलो. एका गावात चिंचा आंब्यानी लगडलेली झाडं बघितली आणि ड्रमवर ताल धरताना भारतातले म्हटल्यावर तबल्याची आठवण काढणारा वादक. त्यांच्या बहिणीने तेवढ्यात नवर्‍याला नृत्याचे धडे दिले.

 पोन्चे  नावाच्या गावात रस्त्यावर आपल्या वडापावसारख्या गाड्या होत्या आणि काहीतरी तळत होते. सहज  हे काय आहे विचारललं पण स्पॅनिश पदार्थाचं नाव काही केल्या समजेना. तिथे तेच खात  बसलेलं कुटुंब त्यांच्या हातातला तो पदार्थ घेऊन आले. आम्हाला चव घ्यायचा आग्रह केला. भरपूर गप्पा रंगल्या त्यांच्याबरोबर. त्यांच्यातल्या तरुण मुलाला इथे नोकरीची संधी नाही म्हणून अमेरिकेत यायचं आहे. ऐकताना वाटलं सगळीकडे तीच कहाणी. पोन्चेगाव नाताळच्या कार्यक्रमात दंग होतं.

एका अगदी डोंगराच्या कुशीतल्या गावात खायला थांबलो. छोटीशी सुबकशी जागा होती हसतमुख मालकच स्वतः सगळं करत होता. त्याही गावात नाताळची झलक पाहिली‌. 

कातळशिल्प असलेलं एक ठिकाण पाहीलं. आदिवासींच्या प्रार्थनेची जागा आणि त्यांनी सांकेतिक भाषेत लिहिलेले संदेश असलेले कातळ होते. तिथे पोचायची वाट आणि शांतता विलोभनीय होती. आमच्या व्यतिरिक्त तिथे कोणीच नव्हतं. 

समुद्रकिनारे, बेटं आणि निसर्गाच्या सान्निध्यात काही दिवस घालवायचे असतील तर पोर्तोरिको मस्त आहे. आम्ही नाताळ सुरू व्हायच्या आधी गेल्याने गर्दीही नव्हती.


तुमच्यासाठी छायाचित्रं आणि झलक.






















No comments:

Post a Comment

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.