’जिज्ञासा थिएटर्स’ या रत्नागिरीतील संस्थेसाठी, दैनिक ’प्रहार’ साठी लिहलेले अनुभव. इथे फक्त मी काय केलं ते सांगण्याचं प्रयोजन नाही तर अभिनय, दिग्दर्शन करताना येणारे अनुभव हा महत्वाचा उद्देश आहे. हे अनुभव तुम्हालाही आवडतील ही अपेक्षा.
"अवं असं डोसक्यात राक घालून..." रंगीत तालमीचे संवाद सुरु होते. उत्साह, गडबड, हास्य विनोद असं वातावरण होतं. कलाकाराचे संवाद सुरु झाले की थोडीशी शांतता, कुजबुजते आवाज. आत्ताही प्रकाशव्यवस्थेसाठी एक दोन वाक्य प्रत्येक कलाकाराला म्हणायची होती. मी प्रकाशव्यवस्था करणार्या माझ्या नवर्याला, विरेनला हातवारे करुन सूचना देत होते. तितक्यात माझी तीन वर्षाची मुलगी मला येऊन फक्त बिलगली. बस, तेवढ्याने कलाकाराची तंद्री भंग पावली.
"आय कॅन्ट डू धिस...." रागाने लाल झाले ते. आजूबाजूला कुजबुजणारे, जोरजोरात सूचना देणारे सगळे आवाज बंद पडले. असह्य शांतता वातावरणात पसरली. काय करावं ते सुचेना. प्रसंगावधान राखून विरेनने दुसर्या कलाकाराला संवाद म्हणायची सूचना केली. तो कलाकारही शांत झाला. दुसर्या दिवशी प्रयोग, आदल्या दिवशी हा प्रकार. रात्रभर एकच प्रश्न मनाला छळत होता.
"कशाला पडतो या फंदात? फायदा तर काहीच नाही. वेळ आली तर आपलाच खिसा सैल सोडायचा, महिनेच्या महिने तन, मन, धन ओतायचं. आणि असा प्रसंग आला की मूग गिळून गप्प बसायचं. कशासाठी हे सगळं?"
दुसर्या दिवशी एकांकिका मस्त रंगल्या. पडद्यामागचे, पुढचे कलाकार असे पिझ्झा खायला बसलो आणि त्या क्षणाला पुढच्या वर्षीच्या एकांकिकेचे बेत सुरु झाले. झालं गेलं सारं विसरुन पुन्हा ताजेतवाने झालो ते पुढच्या एकांकिकेसाठी. इतकी असते ही नशा? कटु आठवणी पुसट होत पुन्हा पुन्हा त्याच मार्गाला नेणारी? नकळत मन मागे गेलं. नुसता अभिनय करण्याचं समाधान होतं त्या वेळेपर्यंत पोचलं, किंबहुना अभिनय म्हणजे काय हेही कळत नव्हतं तिथे जाऊन उभं राहिलं. पालक मुलांना वेगवेगळ्या छंद वर्गात घालून पूर्ण गुंतवून टाकत नसत. शाळेतर्फे भाग घ्यायचा, शिक्षक म्हणतील ते करायचं, त्यावेळची ही गोष्ट.
"ऊठ, ऊठ" रात्री कधीतरी स्टेजवर डुलकी काढत बसलेल्या मुलांमधून बाईंनी उठवलं. कुणीतरी कळ दिल्यासारखं धडपडत उठून मी, ’मी ही ही एकटीच नाचते...’ हे गाणं म्हणत नाच केला तो पहिलीत असताना. देवरुखच्या भोंदे शाळेच्या पडवीसमोर पुढे फळ्या वगैरे घालून वाढवलेलं स्टेज. शाळेतली कार्यक्रम करणारी मुलं मागे रांगेत बसलेली. सर्वच मुलं रात्र बरीच झाल्याने डुलक्या काढत होती . नाव पुकारलं की उठायचं, नाच, गाणं असं काहीतरी उरकायचं आणि परत मागे जाऊन बसायचं...
त्यानंतर आम्ही देवरुखहून वडिलांच्या बदलीमुळे पालघरला आलो. एक दिवस, मोगरे बाईंनी वर्गातल्या दोघा तिघांना शाळा सुटल्यावर भेटायला सांगितलं. तो दिवस आजही जसाच्या तसा लक्षात आहे. कोणी काय केलं आणि बाई किती ओरडणार हेच विचार मनात घोळवत ’त्या’ वर्गात पोचलो.
"शाळेचा रौप्यमहोत्सव आहे. तेव्हा दहा मिनिटांचा प्रवेश बसवणार आहोत." पालघर ठाणे जिल्ह्यात गुजरातच्या सीमेवर आहे पण, नाटकांचा प्रभाव अजिबात नाही; निदान तेव्हा तरी नव्हता. त्यामुळे बाई प्रवेश बसवणार म्हणजे नक्की काय करणार हे ही ठाऊक नव्हतं, अभिनय वगैरे गोष्टी फार दूरच्या. बाई काहीतरी करायला सांगताहेत ते करायचं इतकंच.
आज त्या प्रवेशातले आनंदीबाईचे फोटो पाहताना शाळेच्या मोठ्या मैदानावर उभारलेला रंगमंच, नऊवारी नेसलेली, नथ घातलेली आनंदीबाई, राघोबा, पेशवे इतकंच डोळ्यासमोर येतं आणि नंतर घरी, शाळेत झालेलं कौतुक. त्यानंतर एखाद्या वर्षाने शाळेत केलेला टिळकांवरचा प्रवेश. मला टिळक केलं होतं आणि खुर्चीवरून उठताना धोतर सुटल्याने टिळक खुर्चीवरच बसून राहिले इतकं आठवतं.
वडिलांची बदली कणकवलीला झाल्यावर चित्र पालटलं. कोकण भाग नाट्यप्रेमी. एस. एम. हायस्कूलच्या करंबेळकर बाई, लोखंडे आणि साळुंके सरांच्या तालमीत नाथ पै एकांकिकेसाठी शाळेतर्फे एकांकिका नेत त्यामध्ये भाग घेणं सुरु झालं; तेव्हा स्पर्धेत भाग घेणं, अभिनय करणं त्यासाठी मेहनत घेणं म्हणजे काय ते समजायला लागलं. पालघरला असं वातावरण कधीच पाहिलं नव्हतं त्यामुळे तर फार अप्रूप होतं या सार्या गोष्टींचं. बच्चू बर्वेची अफलातून दिवास्वप्ने, गजरा अशा एकांकिका त्या वेळेस स्पर्धेसाठी शाळेने केल्या. डिंसेबरच्या शेवटच्या आठवड्यात असणार्या या एकांकिका स्पर्धांवर स्पर्धकांनी आणि प्रेक्षकांनी असीम प्रेम केलं. जेव्हा जेव्हा अभिनयासाठी पारितोषिक मिळालं त्या वेळेस झालेला आनंद अवर्णनीय होताच, पण त्याचबरोबर शाळा सुटल्यावरच्या तालमी, शिक्षकवर्गाने केलेलं कौतुक हे फार मोलाचं होतं.
काही वेळेस आनंद आणि निराशेचा अनुभव एकाचवेळी पदरी येतो. अबोल झाली सतारमधील सविताच्या भूमिकेला नाथ पै एकांकिका स्पर्धेत मला पहिलं बक्षीस मिळालं, आनंद द्विगुणित झाला कारण स्त्री गटात दुसरं तिसरं पारितोषिक कुणालाही मिळालं नव्हतं. पण या आनंदाला गालबोट लागलं ते परिक्षकेच्या शब्दांनी. एकांकिका, सतारवादक रमेशला झालेल्या अपघातानंतर रुग्णालयात सविता त्याच्यावर होणार्या शस्त्रक्रियेची वाट पहात असताना घडते. अपघात झालेल्या रमेशची बायको इतकी नटून थटून, सुंदर साडी नेसून कशी असा प्रश्न परिक्षक बाईंना पडला आणि प्रेक्षागृहात हास्याची लकेर उमटली. दीपक परब एकांकिकेचे दिग्दर्शक. हा दिग्दर्शनाचा भाग आहे, मी वाईट वाटून घेऊ नये असं म्हणत त्यांनी माझी समजूत घातली. बहुधा परिकक्षकांबरोबरही ते बोलले असावेत. खरी हकिकत अशी होती की सविता रमेशच्या आवडीची साडी नेसून, नटून थटून तयार झालेली असते. तो रस्ता ओलांडून त्याच्या सतार वादनासंदर्भात आलेल्या बातमीसाठी वर्तमानपत्र आणायला जात असताना ती गॅलरीत उभी असते. रस्त्यापलीकडच्या दुकानात तो वर्तमानपत्र घेतो आणि ते फडकवत भान विसरून रस्ता ओलांडतो. अपघात होतो. आता अश्या वेळेस ती साडी न बदलता असेल तशीच रुग्णालयात पोचणार ना? याचा उल्लेख एकांकिकेत अर्थातच आहे. हा अनुभव माझ्या मनावर खोल रुतून राहिला आणि नकळत तो पुढे उपयोगी पडत राहिला.
एकांकिकेतल्या कामाचा आनंद घेत असतानाच अविनाश मसुरेकरांनी बसवलेल्या मंतरलेली चैत्रवेल नाटकात पन्नाशीच्या आसपासच्या स्त्रीची, अत्यंत करारी, काहीशी क्रुरपणाकडे वळणारी लीलाबाईंची भूमिका केली ती बहुधा अकरावीत असताना. प्रौढ बाईची रंगभूषा केल्यावर वेगळंच वाटायचं. या नाटकाचे खूप ठीकाणी प्रयोग झाले. बहुतेक ठिकाणी प्रयोगाला तुफान गर्दी असायची. गर्दीची नशा उतरली ती मसूर गावात. जेमतेम पाच पंचवीस लोकं भल्या मोठ्या नाट्यगृहात पाहिल्यावर नाटक कुणासाठी करायचं ह्या चिंतेने सार्यानाच घेरलं.
"भरपूर लोकं समोर आहेत असं समजून आपापली भूमिका करायची." स्वत:ची निराशा लपवीत दिग्दर्शकांनी कानपिचकी दिली आणि त्या पाच पंचवीस प्रेक्षकांसाठी प्रत्येक कलाकाराने जीव ओतून काम केलं. खरं तर अविनाशनी सांगितलं त्याची अंमलबजावणी केली.
अपंग मुलीला सांभाळण्याचं काम करण्यासाठी आलेल्या लिलाबाई त्या मुलीचा आत्यंतिक द्वेष करतात. लिलाबाईंच्या कोड्यात टाकणार्या वागण्याचं रहस्य उलगडतं ते शेवटी. त्यानंतर लिलाबाईंबद्दल कीव, सहानुभुती वाटायला लागते. पण तोपर्यंत प्रेक्षकांच्या मनातला राग पराकोटीला पोचत असे.
नाटक संपल्यावर मला कुणी ओळखतच नसे याचं थोडंसं दु:ख होई पण तो रंगभूषेचा प्रभाव होता, रंगभूषाकाराला मिळालेली ती दादच. लिलाबाई अशी ओळख करून दिल्यावर आधी आश्चर्य आणि नंतर लिलाबाईंवर दगड टाकावेत असं वाटत होतं शेवटपर्यंत अशा भावना प्रेक्षक व्यक्त करत. भूमिकेच्या पसंतीची ती वेगळीच पावती होती.
कणकवलीहून रत्नागिरीला आम्ही आलो त्या वर्षी जे. के. फाईल्सच्या ’वर्कर्स’ या सुहास भोळे लिखित आणि दिग्दर्शित एकांकिकेने नाथ पै स्पर्धेत बरीच बक्षिसं मिळवली होती. त्याचवेळेस मलाही अबोल झाली सतार एकांकिकेसाठी स्त्री कलाकारांमध्ये अभिनयाचं प्रथम पारितोषिक मिळालं. यामुळेच रत्नागिरीला आल्याआल्या सुहास भोळेंशी संपर्क साधता आला आणि फक्त दोन महिन्यात त्यांच्या पालखी एकांकिकेतून पुन्हा कणकवलीला स्पर्धेसाठी जाता आलं. नंतर त्यांच्या जिज्ञासा संस्थेतर्फे भिंत, दंगल अशा एकांकिका, प्रतिबिंब नाटक या सर्वाचे स्पर्धांसाठी आणि इतर ठिकाणी असंख्य प्रयोग केले. बक्षिसं मिळवली. मंतरलेले दिवस होते. दंगलची भूमिका तर आठ दिवसात सुहासनी बसवली होती. शिर्के हायस्कूल मध्ये केलेल्या तालमी, नाटक, एकांकिकेसाठी सर्व कलाकारांनी केलेला प्रवास. गप्पा, गोष्टी, रुसवे फुगवे....मनाच्या कोपर्यात दडलेल्या आठवणी उलगडताना हे सारं पुन्हा अनुभवल्यासारखं वाटतं. वटवट सावित्री, गाठ आहे माझ्याशी, माणूस नावाचं बेट, मोरुची मावशी अशी अनेक नाटकं, अविनाश फणसेकर, श्रीकांत पाटील अशा रत्नागिरीतील नामवंत दिग्दर्शकांबरोबर करता आली. फणसेकर सरांनी त्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या एकांकिकेला दिग्दर्शन करण्याचीही संधी दिली तो दिग्दर्शनाचा पहिला अनुभव.
तेव्हा कधी जाणवलं नव्हतं ते पार साता समुद्राकडे आल्यावर जाणवतं. इतकी वर्ष नुसतं अभिनय करण्याचं सुख पदरी पडलं असं नाही तर सर्वांशी झालेली कायमस्वरुपी मैत्री हा ठेवा मला मोलाचा वाटतो. यातल्या काही सहकलाकारांबरोबर आज इतक्या वर्षांनीही संपर्क आहे ही जाणीव सुखद आहे.
अमेरिकेत येऊन सतरा वर्ष झाली. सुरुवातीला छोट्य़ा गावात असताना कथाकथन, लेखन यावर अभिनयाची तहान भागवावी लागली. काही वर्षापासून आम्ही म्हणजे मी आणि माझा नवरा विरेन, ’अभिव्यक्ती’ या आमच्या संस्थेतर्फे व्यावसायिक पातळीवर एकांकिका करतो. भिंत, महाभारताचे उत्तर रामायण, खेळ, सांगायचं राहिलंच, वेषांतर, भेषांतर या एकांकिका आत्तापर्यंत आम्ही केल्या. अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, रंगभूषा, नाट्यमंदिर आरक्षण, ध्वनी, संगीत, जाहीरात, तिकीट विक्री अशा अगणित बाजू सांभाळणं पार पडलं ते इथल्या मित्र मैत्रिणींच्या मदतीने. हे करत असताना गाठीशी जमते अनुभवाची पुंजी. माणसांचे स्वभाव उलगडत जातात, आपण केलेल्या चुका लक्षात येतात. दिग्दर्शनाची तारेवरची कसरत करताना तर वर उल्लेख केलेल्या सार्या दिग्दर्शकांची कमाल वाटत राहते.
भारतात संस्था, कलाकार, प्रेक्षक यांची उणीव भासत नाही. परदेशात मोठी शहरं सोडल्यास साधारण १०० - १५० मराठी कुटुंब छोट्या गावांमध्ये असतात. केरीमध्येही तितकीच संख्या आहे. इथे काम करणार्यांचा दृष्टिकोन हौस म्हणून अभिनय करण्याचा असतो. पण तिकिटं लावून प्रयोग करायचं ठरवलं की काय पर्याय? त्यामुळे हौशी कलाकारांकडून व्यावसायिक पातळीची अपेक्षा केली की कुरकुर होत राहते. दिग्दर्शक या नात्याने समाधान होईपर्यंत तो तो प्रसंग झोप उडवून टाकतो.
विनोदी प्रसंगात वाहवत जाऊन आमच्या एका कलाकाराने रंगमंचावर स्त्री कलाकाराशी केलेल्या लगटीने आम्हाला शहाणं केलं. नट रंगभूमीवर गेला की दिग्दर्शकाच्या हातात काही उरत नाही याची विदीर्ण करणारी जाणीव अशा प्रसंगी होते. असं काही घडतं तेव्हा मनात विचार तरळून जातो. त्या वेळेस आमच्या दिग्दर्शकांनाही वेगवेगळ्या प्रसंगाना तोंड द्यावं लागलं असणारच. आशा निराशेचा लपंडाव, कटू गोड प्रसंग हे या खेळाचे अविभाज्य भाग. पण तरीही पुन्हा त्याच उत्साहाने पुढच्या डावाची तयारी सुरु होते. एकदा तोंडाला रंग लागला की....हेच खरं, नाही का?
एकांकिका झलक पहाण्याचा दुवा - http://marathiekankika.wordpress.com