Tuesday, June 11, 2013

प्रश्न आणि प्रश्न!

"आता तू कधी येणार भारतात?" भारतात परत जाण्यासाठी निघताना बहिणीने विचारलं
"पाहू, तशी ओढ नाही राहिली आता. आई, भाऊच (वडिल) नाहीत ना." दोघींही एकमेकींच्या भावना समजल्यासारख्या गप्प झालो. उगीचच, आपण बहिणी आहोतच एकमेकींना असलं काही  ती म्हणाली नाही किंवा आता तुम्ही दोघी बहिणी आहात, तुमच्यासाठी येईन असं मी तोंडदेखलं म्हटलं नाही. आई वडिल गेले की इतकं पोरकेपण येतं हे ते गेल्यानंतरच कळावं यासारखं माणसाचं दुर्देव नाही हेच खरं.

बहीणीने विचारला तोच प्रश्न तसा खूप जणं फोनवर विचारतात, आम्ही आहोत ना चा दिलासा देतात. मावश्या, काका, मावस, आते भावडं सगळेच. आई वडिलांनी सगळी नाती जपली, त्याचांच वारसा आम्ही राखला याचा कोण अभिमान आम्हाला. आणि तरीही भारतात केव्हा येणार म्हटलं की ती दोघं नाहीत म्हणून जाऊच नये असं वाटतं तेव्हा दाटून येतो उदासपणा, नैराश्य.

भारताची वारी करुन एखादं वर्ष झालं की पुन्हा तिकडे जायचे वेध लागायचे यापूर्वी. शेवटी भारत मायभूमी आहे, सगळे तिकडेच तर आहेत, इतक्या वर्षानंतर सासर, माहेर असं वेगळं उरतच नाही. हे जे सगळं म्हटलेलं, वाटलेलं, अनुभवलेलं.... विरुन गेलं क्षणात? कुठे गेल्या या भावना का त्या खर्‍या नव्हत्याच? खरंच एखाद्या गोष्टीचं समीकरण बदलून जातं असं कायमचं?

प्रश्न आणि प्रश्न!

Tuesday, April 16, 2013

सांत्वन

मैत्रिणीची आई अचानक गेली.  शब्दांनी सांत्वन होत नाही,  जिवलग परत येत नाही हे खरं असलं तरी आठवणीने फोन केला की त्या व्यक्तीला बरं वाटतं या भावनेने तिला फोन केला. पुन्हा ती भारतात मी अमेरिकेत त्यामुळे इतक्या लांबून मुद्दाम फोन केला यानेच तिला गहिवरून आलं.  म्हटलं,
"अगं करायलाच हवा. किती हक्काने ये जा असायची आमची तुमच्या घरात. काकूंचा हसरा, शांत चेहरा, चविष्ट पदार्थ सगळं अजून ताजं आहे मनात. खूप माणसं जोडली तुझ्या आई बाबांनी. नातेवाइकाचंही येणं जाणं असायचं सारखं तुमच्याकडे. सगळे आले असतील ना?"
तिच्या स्वरात कडवटपणा आला.
"आले गं सगळे. पण कशासाठी हाच प्रश्न पडला."
"म्हणजे?" मला काय बोलावं कळेना.
"अगं कोकणात आले होते ना सगळे. कुणाला तयार सांदणं घ्यायची होती, कुणाला कुळथाचं पीठ,  भाजाणी, कुणीतरी कुणालातरी कितीतरी वर्षांनी भेटलं होतं त्यामुळे गप्पा झोडायच्या होत्या. तिथेच कुणालातरी शिवणाचे नमुने हवे होते. सगळं आमच्यासमोर. आईला जाऊन फक्त काही दिवस झालेले असताना. आम्हाला काय वाटेल हा विचार कुणाच्याच मनात डोकावला नसेल का गं?"

तिने मलाच प्रश्न विचारला. उत्तर नव्हतंच. फार विचार करू नकोस म्हटलं आणि फोन ठेवला. खूप रडले. कळत नव्हतं की मी कशासाठी रडते आहे. काकूंच्या जाण्याच्या दु:खाने, माणसातल्या हरवलेल्या संवेदनशीलतेच्या दर्शनाने की हे असंच चालायचं या कल्पनेने, मनाला आलेल्या हतबलतेने! 



माझ्या चविष्ट जगाला भेट द्यायला विसरु नका.