Tuesday, August 6, 2013

तळ्यात मळ्यात


(बृहनमहाराष्ट मंडळ वृत्तांतात (BMM Vrutta) माझ्या दरमहिन्याआड प्रसिद्ध होणार्‍या लेखातील १ ला 
लेख.)

भल्यामोठ्या बॅगा  पेलत, धापा टाकत तिसर्‍या मजल्यावरच्या दारासमोर दामले कुटुंब उभं होतं. इमारतीसाठी लिफ्ट  नाही याचा पुन्हा एकदा केतनला वैताग आला. पण आत्ता नानांना भेटायची आतुरता जास्त होती. केतनने अधीरतेने दरवाज्याची घंटा दोन तीन वेळा वाजवली.
"अरे आलो आलो लेकांनो. दम धरा जरा." नानांचा दमदार आवाज दाराच्या फटीतून बाहेर ऐकू आला तसा केतन खूश झाला.
"तीच ऐट आहे बघ बाबांच्या आवाजात. खणखणीत आवाज एकदम. वय फिरकलेलंच नाही त्यांच्या आजूबाजूला." मीराकडे पाहत केतन म्हणाला. मीरा नुसतीच हसली. तोपर्यंत नानांनी दार उघडलं होतं. केतन त्यांच्या मिठीत अलगद सामावला. मीरा आणि मुलं कौतुकाने ती भेट पाहत होते. आवाज खणखणीत असला तरी नानाचं थकलेपण मीराच्या नजरेतून सुटलं नाही. ती तिथेच नमस्कारासाठी वाकली. नाना एकदम खूश झाले,
"सुखी भव." मीराला मनापासून आशीर्वाद देत नातवंडांच्या पाठीवर त्यांनी कौतुकाची  थाप मारली.  अरे, आत तर या आधी असं म्हणत दारापासून नाना बाजूला झाले.

आत पाऊल टाकलेली  मीरा नुसतीच खोलीकडे पाहत राहिली. पसारा, नुसताच पसारा सर्वत्र. जागा मिळेल तिथे काही ना काही पडलेलं होतं.   गरम गरम चहाचा कप आयता मिळावा, थोडा वेळ निवांत पडावं असं तिला मनापासून वाटत होतं. केतनच्या हट्टाखातर  माहेरी, मुंबईत न थांबता मिळेल त्या विमानाने ती सगळी सुरतला पोचली होती. तिथून गाडीने नवसारी. समोरचा पसारा पाहून हे आवरल्याशिवाय विश्रांती घेणं आपल्याला जमणार नाही हे तिला ठाऊक होतं. टापटिपीचं विलक्षण वेड असलेल्या नानी गेल्यावर घराची झालेली अवस्था पाहून तिचा जीव गलबलला. तिच्या चेहर्‍यावरचे भाव निरखीत नाना म्हणालेच,
"मीरा बेटा, तू नको लक्ष देऊ पसार्‍याकडे. ब्रम्हचार्‍याची मठी अशीच असायची. त्यातून ताराबाईंना बोलावलं होतं साफसफाई करायला, पण अजून जमलेलं दिसत नाही त्यांना यायला. येतील. तुम्ही आधी बसा रे बाबांनो. मी चहा टाकतो फक्कडसा." नानांची लगबग पाहून केतन हसला.
"नाना, तुम्हीच बसा. आता सून आली आहे ना दिमतीला. तीच करेल  तुमच्यासाठी फक्कडसा चहा."
शहाणाच आहे, स्वत: करावा की इतकं आहे तर...मनातले विचार मनातच दाबून ती घाईघाईने चहा करायला वळली. डायनिंग टेबलावर टाचणी ठेवायला जागा नव्हती. एकीकडे टेबला आवारायला घेत तिने चहाचं आधण ठेवलं.
चहा पिता पिता सगळी नानांशी गप्पा मारायला बसली. नानींच्या आठवणीने गहिवरली. गेल्या वर्षी नानी अचानक गेल्या, त्यातून नाना, केतन अजूनही सावरले नव्हते. नानां आता एकटेच राहत होते. पंचाऐंशी ओलांडलेल्या नानाचं  आपल्याकडे येऊन न राहणं मुलांना नापसंत असलं तरी मीरा समजू शकत होती. जिथे सारं आयुष्य गेलं ते सोडून कुठे जायचं या वयात? आणि स्वत:चं घर तीच आपली हक्काची कुटी.

बापलेकाच्या गप्पा रंगल्या होत्या.  मुलंही संभाषणात सहभागी झाली.   प्रवासाची चौकशी झाली, कोण फोन करतं, कोण कोण भेटतं, लग्न, मुंजीत कुणाच्या भेटी झाल्या, नातेवाईक, शेजारी पाजारी सगळे कसे आहेत असे काही ना काही विषय निघत राहिले. गप्पांना अंत नाही असं वाटत असतानाच हळूहळू संभाषण मंदावलं. मुलं तिथून उठली. केतन संगणका समोर जाऊन बसला. मीरा आणि नानाच तिथे राहिले तसं मीराला राहवलं नाही.
"नाना, ठाऊक आहे तुम्ही नाहीच म्हणाल; पण चला नं आमच्याबरोबर. कबूल नाही केलंत तरी घराची दशा पाहून तुमचीही अवस्था कळते आहे मला."
"नको बेटा अशी गळ घालूस. ती असताना येत होतोच ना अधूनमधून. आता नवसारी सोडून कुठे जावंसं नाही वाटत. तू म्हणते आहेस यातच सारं काही आलं. आता काही जास्त दिवस उरलेले नाहीत माझे."
म्हणूनच...असं म्हणावंसं वाटलं तिला पण डोळ्याच्या कडेला जमू पाहणारे अश्रू लपवीत ती उठलीच,
"थोडावेळ पडते. ताराबाई नाही आल्या तर जेवणाचं बघावं लागेल नं...." असं काहीसं पुटपुटत.

पलंगावर पडल्यापडल्या ती विचारात गढून गेली. डोळा लागतो आहे असं वाटतानाच फोन वाजला तसं आपसूकच तिचं लक्ष त्या बोलण्याकडे वळलं.
नानांच्या लेकीचा फोन असावा,
"दादा कॉम्प्युटरवर करतोय काहीतरी. मीरा पडते म्हणाली जरा. मुलं? त्याचं फोनवर  काहीतरी चालू आहे." नणंदेने काय विचारलं त्याचा अंदाज तिला नानांच्या उत्तरावरून येत होता.
"नाही, नाही. झाल्या की गप्पा गोष्टी. पंधरा वीस मिनिटं. हो, मग प्रत्येकजण लागला आपापल्या उद्योगांना. मी? मी काय करणार? बसलो आहे नेहमीसारखा." नानांच्या आवाजात तक्रारीचा सूर मिसळला. मीराला उगाचच अपराधी वाटलं. जेमतेम अर्धा तास संमेलन भरल्यासारखा गोंधळ होता हॉलमध्ये. संभाषणातले विषयच संपल्यावर नुसतं समोरासमोर बसून करायचं काय? आल्याआल्या जो उत्साह असतो, भेटण्याची अनिवार ओढ असते त्याची पूर्तता झाली की काय उरलं? उरलेले दोन आठवडे आता तेच. चहा घेत, जेवताना थोडंफार काही बोलणं होणार, भेटायला येतील कुणी ना कुणी, थोडंफार फिरणं, खरेदी. ती तिच्या आई, बाबांकडे राहायला जाणार. एक दोन दिवस तिच्या माहेरी केतन येऊन राहणार. पुन्हा नवसारीत काही दिवस आणि मग संपला मुक्काम. केतनला नानांची ओढ आणि तिला माहेरची या एकाच कारणाने भारतभेट होते. इथे येऊन रोजची फक्त पाच दहा मिनिटं आपण एकमेकांशी बोलणार की संपलं. हे असं का व्हायला लागलं आहे? असं नव्हतं पूर्वी. किती पत्र लिहायची ती दोन्ही घरी. लिहिलेल्या पत्रांच्या उत्तराची दोघंही आतुरतेने वाट पाहायचे. केतन तर रोज संध्याकाळी मराठी गाण्याच्या कॅसेट लावून बसायचा, आठवणीत रमायचा. आलटून पालटून पंधरा दिवसांनी दोघांपैकी एकाच्या घरी फोन करून त्यांनाच एकमेकांना खुशाली कळवायला सांगायची. दोन अडीच वर्षांनी गेलं की मनात साचलेलं सारं उतू जायचं, आनंदाला उधाण यायचं. गप्पा,  तास न तास, दिवस दिवस रंगायच्या, शेजारी पाजार्‍यांबद्दलच्या उखाळ्यापाखाळ्या, नातेवाइकांची ख्याली खुशाली ऐकणं, भारतातल्या घडामोडी यात आला दिवस कसा संपायचा तेही कळायचं नाही. कधी संपलं हे सारं?

इंटरनेट आलं, इ मेलचा जमाना सुरू झाला, पण त्याचं सूत काही वृद्ध मंडळीशी जमत नव्हतं.  दोन्हीकडून फोन करणं सोपं, स्वस्त झालं तेव्हा समीकरणं बदलली. वरचे वर फोन व्हायला लागले. मग पत्र मागे पडली. फोनवर रोजची ख्यालीखुशाली, पाककृत्या, जेवणाचे बेत... सगळं बोलणं होऊन जाई.  स्काइप आलं तसं आयुष्याला नवीन वाटा फुटल्या,
"बरं झालं बाई, आपण दोन्हीकडे कॉम्प्युटर घेऊन देऊ,  आई, बाबां, नानांना पाहिल्याचं समाधान मिळेल." दोन्हीकडची म्हातारी माणसं आपल्याला हे नवीन तंत्र कसं जमेल या धाकधुकीत असतानाच कॉम्प्युटर थडकला देखील.  इमारतीतली उत्साही मुलं आजी आजोबांना मदत करायला सरसावली. हळूहळू ते तंत्रही साधलं आणि मग अमेरिका - भारत अंतराची दरी बुजून गेली.

पण  दीड दोन वर्षांनी इथे आल्यावर बोलायला, गप्पांचे फड जमायला काही उरलंच नाही. काय सांगू, काय नकोची असोशी राहिली नाही. सगळं फोन, स्काइपने आधीच पोचलेलं एकमेकांकडे. प्रत्यक्ष भेटीचा आनंद काही क्षण मग उरलेला वेळ नाना म्हणाले तसा. खरंच काय गमावलं आणि काय मिळवलं आहे आपण? नक्की कुठल्या गोष्टीत सुख जास्त होतं की ते मानण्यावर शेवटी? पत्र, अधूनमधून फोन आणि मग चातकासारखी वाट पाहत  दीड दोन वर्षांनी झालेली भेट,  गप्पांनी भरलेला, आठवणींनी भिजलेला प्रत्येक दिवस की रोजच्या घाईगडबडीत एक दोन मिनिटं ’आवाज’ ऐकायला म्हणून केलेला फोन, रविवारी कामं उरकता उरकता स्काइपवरचं दर्शन आणि मग ही अशी भेट.  नानांना, आई, बाबांना यातलं खरंच काय आवडत असेल? वाटत असेल त्यांना की चाललंय हेच ठीक, मुलाबाळांची खुशाली रोजच्या रोज कळते, दर आठवड्याला गावातच असल्यासारखं पाहायला मिळतं, गप्पा नाही रंगल्या इथे आल्यावर तरी आजूबाजूला असणारं त्याचं अस्तित्वच पुरेसं आहे की अधूनमधून केलेले फोन, भावनेने ओथंबलेली पत्र आणि भेटायला आले की सतत आजूबाजूला घुटमळणं, किती बोलू न काय करू असं होऊन जाणं. काय भावत असेल नक्की त्यांना? विचारावं...? नकोच.

मीरा विचारात गढून गेली. बराचवेळ. अचानक पर्याय सापडल्याच्या आनंदात ती उठली. नानांचा भरल्या घरातला एकटेपणा पुसून टाकायचं तिने मनाशी पक्कं केलं. पत्ते खेळायला सर्वांना बसवयाचंच असं ठरवून ती  उत्साहाने बाहेरच्या खोलीत डोकावली.

हा लेख लोकसत्तेच्या ’चतुरंग’ पुरवणीतही प्रसिद्ध झाला आहे. दुवा - http://www.loksatta.com/chaturang-news/story-of-nana-and-his-family-219898/





Saturday, August 3, 2013

पिंपळपान (फ्रेंडशिप डे निमित्त)

पाठीवरचं जड दप्तर, लाल रिबीनींनी घट्ट बांधलेल्या वेण्या  
रमत गमत शाळेला पोचणं
गप्पा, हसणं खिदळणं, वाद घालणं
कित्ती कित्ती गोष्टी आपण एकत्र केल्या
मग, कधी कधी
रुसवे, फुगवे, भांडणं, हेवा, कागाळ्या 
मी तुझ्याशी बोलत नाही म्हणता, म्हणता
कधी एकदा बोलतो
अबोल्याच्या दिवसात काय झालं ते सांगतो
असं होवून जाणं
असे ते दिवस!
पाहता पाहता भूतकाळात हरवले!
विस्मृतीच्या गर्तेत अडकले
फ्रेंडशीप डे ला आठवणी
काढण्यापुरते उरले!
पण तरीही पिंपळपानासारखे
मनाच्या पानात वर्षानुवर्ष जपले!

माझ्या पिंपळपानात दडलेल्या देवरुख, कणकवली, पालघर, रत्नागिरी.....सार्‍या मैत्रीणींना

हॅपी फ्रेंडशीप डे!