मोसम,
माझ्या वडिलांचं गाव. पण आपल्या मनातला प्रत्येक विचार म्हणजे ’मोसम’ च नाही का? त्याच विचारांची अनुभवांची ही शृखंला...कथा, कविता, अनुभव, लेख या माध्यमांतून.
दरवर्षी जानेवारी महिन्यात मुलं बदलली नाहीत तर जिथून आणली तिथे सोडायची हा माझा संकल्प असतो.
कचराकुंडी, रस्ता, जत्रा असा त्यांच्या जन्माचा उगम. सोडायचं तर नक्की कुठे त्यामुळे ती अजूनही इथेच. त्यांना नाही तर नवर्याला बदलावं, म्हणजे कुठेतरी सोडून यावं असं वाटतं पण त्याच्या आईने दिलेला माल परत घेतला जाणार नाही या बोलीवर पाठवलेलं त्यामुळे...नशिब एकेकाचं. दुसरं काय.
तरी बदला रे बदला हा धोशा लावावा लागतोच. ते म्हणताना इतके टॉमेटो चिरले की पुढच्यावेळी अशा भूमिका मुलांना आणि नवर्याला देऊन त्यांची भूमिका मी करणार आहे.
जोगळेकर कुटुंब घरातल्या घरात एकत्र आलं आणि त्यांनी ’गळ’ टाकला म्हणजे ’गळ’ करण्याचा घाट घातला. खरंतर तो घाट घातला मीच पण गळ लावून त्यात सगळ्यांना ओढलं. नेहमीप्रमाणेच मी काही काम करायला सांगितलं की जसे सगळ्यांच्या चेहर्यावरचे भाव बदलात तसंच झालं; विशेषत: नवर्याचं. त्याने तोच भाव ठेवून काम केलं आहे त्यामुळे अभिनय अगदी सहज आणि भूमिकेला साजेसा झाला आहे. लेकिने काय करेन ते एकाच ’शॉट’ मध्ये असंच आधी सांगितलं होतं त्यामुळे दिग्दर्शकाला कुणालाही ’वाकवण्याची’ संधीच मिळाली नाही. तरी मी सगळ्यांना म्हणत होते मानधन घ्या म्हणजे मुकाट माझं ऐकाल पण नाही; एका पैशाचीही अपेक्षा न बाळगता तिघांनी मला ’वाकवायची’ संधी सोडली नाही. तरी मी चिकाटीने हा ५ मिनिटांचा लघुपट केलाय. बघा आणि बेधडक मुलीला, नवर्याला नावं ठेवा. आता नेपोटीझमवाल्यांचं दु:ख कळलं. आमच्यासारख्यांचं फाफटीझम होतं घरातल्याच लोकांना काम दिलं (करायला लावलं) की.
गमतीचा भाग सोडला तर खरंच माझ्या लेकिने खूप मन लावून काम आणि चित्रिकरण केलं आहे आणि नवर्याने नेहमीप्रमाणे हं, हू, बरं, नक्की असं तो नेहमी करतो तसंच इथेही उत्तम केलं आहे. लेकाने त्याचा आवाज चार चार वेळा आठवण करुन दिल्यावर लगेच दिला. या सगळ्या घाटात आमच्या मित्रमैत्रिणींनी उत्साहाने विचारल्याक्षणी उपस्थिती लावली आहे आणि अभिजय काणेने उत्कृष्ट पार्श्वसंगीत दिलं आहे. बघा तर आमचा ’गळ’.
For my non Marathi Speaking friends: Mohana, Viren, Parnika and Rutvik have created a short film 'Lure' and it is with subtitles. Enjoy our family production.