"यू आर वेस्टिंग माय टाइम." बाटाच्या माणसाला मी फोनवर सुनावत होते. कालच्या दुकानदाराने मारलेल्या शेर्याचा बदला मी एकदम मालकावर उलटवत होते. तेवढ्यात बहिण कुजबूजली,
"तू इंग्रजीतून कशाला भांडतेयस? मराठीतून भांड." भांडण अमेरिकेत नाही भारतात हे माझ्याही एकदम लक्षात आलं.
"तुम्ही इंग्रजीत कशाला बोलताय हो. मराठीत बोला." बाटावाल्याला सुनावलं
"मॅम आप हिंदीमे बात कर सकते हो."
"मुझे इंग्रजीमेभी भांडना आता है लेकिन आपको कुछ अभिमान है की नही अपनी भाषा का?" भाषा प्रेम उफाळून आल्यामुळे मी भांडणाचा मुद्दा विसरले. बहिण परत कुजबुजली.
"भांडन करनेका है."
"झगडा." तत्पर नवर्याने बायकोची चूक सुधारली.
"तुम्ही गप्प बसा हो." बहिणी इतक्या जोरात म्हणाली (ओरडली लिहिलं तर ती मला ओरडेल) की बाटावालाच पलिकडे गपगार झाला.
"आप को नही. आप भांडो." मी त्याला जागं केलं.
"मॅम, मै आपके साथ झगडा नही कर रहा हूॅ. बस बता रहा हू के ये पॉसिबल नही है."
"यू आर बॉस मॅन. इफ यू वॉट टू मेक इट पॉसिबल यू विल." कुणाला बॉसबिस म्हटलं की काम होतं ही माझी अंधश्रद्धा मी पुन्हा कामाला लावली हिंदीच्या वाटेला न जाता.
"मॅम, आपको लग रहा है की आपका नुकसान हुआ है लेकिन..." त्यानेही त्याच्या अंधश्रद्धा पणाला लावायला घेतल्या. हे सगळं कशाबद्दल चाललंय? चप्पल! चपलेबद्दल चालू होतं हे!
एका सुप्रसिद्ध दुकानात माझ्यासाठी चपला आणायला घरातले ७ जण बाहेर पडलो. एकाच खेपेत बरीच कामं त्यामुळे एक जाईल तिथे सात असं सूत्र होतं ते. दुकानात शिरल्यावर आता आपल्यालाही चपला हव्यात असं दोघी बहिणींना वाटायला लागलं. चार बघे उरले, तीन ही चप्पल दाखवा, ती दाखवा करत पाय सरसावून बसल्या. अर्ध्या तासात पायांसमोर चपलांचा ढीग. सूत्रग्रस्त चारजण ’आटपा’ असा सूर आणि चेहरा करुन ताटकळत. शेवटी चपला फक्त मी घेतल्या. वरात दुकानातून इच्छीत स्थळी पोचली आणि लहान बहिणीला नको तेव्हा नको ते म्हणतात तशी online किंमत तपासायची हुक्की आली.
"ताई, मिंत्रावर ६०० रुपये किंमत कमी आहे."
"हे तू दुकानातच का नाही बघितलंस?" काकांनी एकदम मुद्द्याचाच प्रश्न विचारला. पॉईंटवाला मुद्दा.
"बेअक्कल कुठली." मोठी बहिण आणि मी मनातल्या मनात. मोठ्या बहिणीचं मन कसं कळलं? कळतं ते. अक्कलबिक्कल निघाली असेल तर अगदी लगेच.
"बघितलं होतं पण दिसलं नाही." लहान बहीणीला कुणाच्याच अकलेशी काहीही देणंघेणं नव्हतं. बेफीकिर स्वर एकदम. सगळी लहान भावंडं अशीच. आता पुढे काय याची सातजणात आणि जिथे गेलेलो तिथल्या चार म्हणजे ११ जणात होईपर्यंत दुकान बंद व्हायची वेळ आली. घरी जायची वेळ झाल्यामुळे नंतर परत मी एकटीने यावं असंही ठरलं पण मी माझी अक्कल वापरली.
"माझे रिक्षाचेच ३०० होतील परत यायचं तर." अक्कलपूर्ण निर्णय घेण्यात आला. फोन करुन, झाल्या प्रकाराबद्दल निषेध नोंदवून, ’आम्ही परत येतोय’ असं आम्ही दुकानदाराला धमकावलं.
हल्ला परतवायला दुकानदार आणि त्याचे साथीदार सज्ज होते. गेल्यागेल्या दुकानदार मधे आणि आजूबाजूला पाचजण. नशिब चप्पलफेक सुरु केली नाही. शस्त्रागार बाजूलाच होतं खरंतर पण त्यांचे एकूण ६ आणि आमचे ७ यामुळे बाचाबाचीवरच गाडी अडकली.
"अमेरिकेत कसं असतं सांग त्याला." मेव्हणे म्हणाले.
"नको. तिकडेच घ्या काय ते म्हणेल तो." मी तो बेत हाणून पाडला पण गिर्हाईक हा राजा असतो हे दुकानदाराच्या गळी उतरवायला घेतलं. तो, तुमचा आणि माझा वेळ फुकट घालवू नका यावर ठाम होता. तरी मी त्याला म्हटलं,
"अहो, मी सुटीसाठी आलेय इथे. वेळच वेळ आहे माझ्याकडे." पण काही फरक पडला नाही. Online दुकानात माल खराब, विकला न गेलेला असतो यावर तो ठाम होता. फक्त online च खरेदी करणार्या लहान बहिणीचा हा अपमानच होता,
"हे बघा, जे काही तुम्हाला माझ्या अंगावर दिसतंय ना ते सगळं online च घेतलेलं आहे." सगळ्या मुद्द्यांवर उहापोह झाला. शेवटी तो म्हणाला,
"तुम्ही तुमच्या बहिणीसारखं पुढच्यावेळपासून Onlie च घ्या."
"पुढच्यावेळी नाही. आत्ताच घेते. तुम्ही तुमचा माल परत घ्या नाहीतर ६०० द्या." पुन्हापुन्हा दोन्ही बाजूने तिच दळणं दळली गेली.
"गेला बाजार ३०० द्या. तुमचं ३०० चं नुकसान, माझं ३०० चं. गिर्हाईक राजा असला तरी तो उदार असतो." मी उदार होऊन चुचकारत म्हटलं पण राजा तोच होता. त्याचे साथीदार आमच्या बाजूला वळावेत म्हणून मी सारखं त्यांच्याकडेही बघत होते. त्यांना आमची बाजू पटत होती हे ते आम्हाला नजरेने सांगत होते पण राजाला घाबरले होते.
"तुम्ही तक्रार करा." राजाने चपलेचा खोका आम्हाला आदळल्यासारखा आदळला. आम्हाला असं काचेवर आदळलं असतं तर काच तुटली असती. वाचली काच. रागारागाने सगळे चुकीचे दूरध्वनी क्रमांक कागदावर लिहून राजाने चिटोरं हातात टेकवलं आणि बघतोच आता आम्हीही असं आव्हान स्विकारत आम्ही घरी आलो. बरोबर नंबर शोधले. हाच तो बाटावाला. त्याने अखेर प्रकरण थेट खर्या बाटांकडेच नेतो असं सांगितलं आणि आम्ही लहान बहिणीच्या मागे तक्रार करुन बघ म्हणून लागलो. तिचं काय झालं?.
बहिणी एकत्र जमल्या की होतं तेच. भान हरपलं. भान हरपून, गप्पा मारुन, खादाडी करुन झोपलो आणि रात्री दोन वाजता तिच्या फोनने पुन्हा आम्हाला जागं केलं. आम्ही तिच्यावर ओरडणार तर तिच ओरडायला लागली.
"ये क्या टाइम है फोन करनेका?" कोण हा अपरात्री बोलायला लागलाय म्हणून आम्हीही कान टवकारले.
"आप आ रहे हो ना?" त्या शांततेत तिकडचा आवाज आम्हालाही ऐकायला आला. एकदम नम्र आणि आर्जवी. हे काय आक्रित. हिचं कुठेतरी, काहीतरी... असा विचार मनात आला. दोघींच्याही. मोठ्या बहिणीच्या आणि माझ्या. तिच्या मनातला विचार कसा कळला? कळतं ते.
"कल की बस है दोपरहर की तो रात के 2 बजे से क्यू फोन कर रहे हो, ये क्या टाईम है फोन करने का?" अजूनही बहिणीचा आवाज तारसप्तकातच पण आम्ही हुशार. अक्कलवान. आम्हाला संभाषण नक्की कोणामध्ये आणि काय चालू आहे ते लगेच कळलं. तिला, त्याने सांगितल्यावर कळलं.
"मॅम आपकी बस रात को २ बजे की है. आ रहे हो ना? हम इंतजार कर रहे है." आवाज एकदम खाली आणत, दु:खी स्वरात तिने त्याला बॅग भरलेली नाही, इतक्या सत्वर येऊ शकत नाही असं सांगितलं आणि तिघीही पांघरुणातून बाहेर पडून मांडी घालून बसलो. नुकसानीचा आकडा मोजायला सुरुवात केली. १००० रुपये! तिला बरं वाटावं म्हणून AM आणि PM च्या गोंधळामुळे एक दिवस विमानतळावर उशीरा पोचलेल्या नातेवाईकाच्या चुकलेल्या विमानाची आणि लाखोत बुडालेल्या पैशांची कहाणी उगाळली; त्यापुढे १००० रुपये काहीच नाहीत असं सांगून अक्कलखाती जमा कर असाही उपदेश केला. तिच्या अकलेवरची चर्चा तिला नवी नसल्याने तिने आधी तिला अक्कल आहे आम्ही मात्र आमची नसलेली अक्कल जिकडे - तिकडे पाझळत असतो असं आम्हाला ठासून सांगितलं. तीन-चार उदाहरणं दिली. तक्रार करुन इतरांशी भांडण्याऐवजी अकलेवरुन भररात्री आमच्यातच भांडण रंगणार अशी लक्षणं निर्माण झाली. तेवढ्यात काका आणि बहिणीच्या नवर्याचा नाट्यमय प्रवेश झाला.
"आज बाटावाल्याशी भांडलात तसं या गाडीवाल्यांशी भांडा. AM/PM नीट लिहा म्हणावं. " एक किडा डोक्यात टाकून त्यांची पाठ फिरली आणि आमची नवी मोहिम सुरु झाली.