Friday, September 7, 2012

काही गोड तर काही कडू...

"आय   एम एक्स्ट्रिमली ऑफेंडेंड...." तलावाकाठचं घर बघायला आम्ही आत शिरलो आणि  विनसीने माझा दंड पकडला. माझी मान आश्चर्याने तिच्याकडे वळली. तिचा रागाने लालेलाल झालेला चेहरा, शरीराला सुटलेली सूक्ष्म थरथर... आपला गुन्हा काय हेच मला कळेना.
"तुझा मुलगा तुमच्या भाषेत बोलतोय."
’ऑ?’ तो केव्हा मराठी बोलत होता याच विचारात गुंतले क्षणभर. एकदम कोडं सुटलं. मी घाईघाईने म्हटलं,
"तसा काही हेतू नव्हता त्याचा किंवा आमचा कुणाचाच..." हळूहळू ती शांत झाली. विनसी आमची एजंट. घर विकत घ्यायचं ठरल्यावर तिच्याबरोबर फिरत होतो. परदेशात राहत असलो तरी आईशी बोलायचं ते मराठीतच हे ब्रीद वाक्य मुलांच्या मनावर पक्कं ठसलेलं आहे त्यामुळे पोरं मराठीत आणि तिला एकटं पडल्यासारखं वाटू नये म्हणून माझी उत्तरं इंग्लिशमध्ये अशी कसरत गाडीत झाली होतीच. पण अगदी थोडावेळ. म्हणजे सुरुवात व्हायची मराठीतून पण माझं इंग्लिश ऐकल्यावर उरलेलं सारं मुलं इंग्लिशमध्ये बोलायची. पण जे काही बोलणं मराठीत झालं त्याचं पर्यवसान असं होईल याची शंकाही आली नाही. विनसी माझ्यावर उखडलेली मुलाने पाहिलं. आता तो संतापला मनातून. पण आजीच्या वयाच्या माणसाला काही बोलायचं नाही एवढं तारतम्य त्याच्याकडे होतं. मुलीला काय झालं ते कळण्याएवढी ती मोठी नाही. ती तितक्यात काहीतरी मला सांगत आली, मराठीत. काय करावं ते सुचेना, मराठीतूनच तू इंग्लिश बोल हे त्या वेळेला कसं सांगणार? मी घाईघाईत तिला म्हटलं.
"शी डज नॉट लाइक इफ यू स्पीक इन इंग्लिश." मुलीने समजल्यासारखी भाषा बदलली. पुढे तिने दाखवलेली घरं यात्रिकपणेच पाहिली. घर शोधण्याचा उत्साह एकदम बारगळला.
नंतर तिचं क्षमा मागणारं इ मेल आलं. पण त्याला काय अर्थ?

एकीकडे मुलांनी आपली भाषा विसरू नये म्हणून प्रयत्न करायचा, आणि त्याचवेळेस ’फक्त घरी बोला हं मराठी आमच्याशी, बाहेर असलो की आमच्याशी इंग्लिशच बोलायचं’ असं सांगायचं म्हणजे इफ एल्स करून कार्यालयातली प्रोग्रॅमिंगची भाषा वापरल्यासारखंच की. मुलांचा संगणक केल्यासारखं. पुन्हा त्यातून त्यांना इंग्लिशमध्येच बोला म्हटलं की लगेच ती पण अस्त्र घेऊन तयार असतात,
"तूच तर सांगतेस आमच्याशी मराठीतच बोलायचं."
"अरे पण..." स्पष्टीकरण देतानाच वाटत राहतं  कळ दाबली की मराठी किंवा इंग्लिश अशी खेळण्यासारखी अवस्था तर करून टाकत नाही ना आपण त्यांची?.
मुलगा तर अशा वयात,
"हॅ, आता तर मुद्दामच मराठी बोलू आपण तिच्यासमोर. आणि तुम्ही पण ऐकून काय घेता?  ’फायर’ करा ना तिला." इथे अमेरिकन बाणा असतो त्याचा.
"स्पॅनिश बोलणार्‍या लोकांबरोबर काय केलं असतं तिने?  सांगितलं असतं का असं त्यांना?."
"घरं विकायची तर फ्रेंडलीपणा असायला नको का?"
"तिच्या जागी तुम्ही असतात तर तिने नसतं का तुम्हाला ’फायर’ केलं?’

एक ना अनेक मतं. आम्हाला वाटत राहतं, तिला जे सांगायचं ते  सौम्य शब्दात सगीतला असतं तर? तुम्ही घराबद्दल बोलत असाल तर इंग्लिशमध्येच बोला, म्हणजे मलाही समजेल काय मतं आहेत तुमची... असं काहीतरी. तिच्या वयाकडे, मेहनतीकडे पाहून आमचा काही जीव धजावत नाही तिला काही बोलण्याचा किंवा ’फायर’ करण्याचा.  मनातल्या मनात निषेध करत माझं तिच्याबरोबर घर बघणं चालूच राहतं.... आणि अचानक एक दिवस तिचं ईमेल येतं.
"मी सेवानिवृत्त होणार आहे लवकरच. त्याआधी तुम्हाला माझ्या बदली दुसरी एजंट देते. आणि एक लक्षात ठेवा. तुम्ही कस्टमर आहात. आवडली नाही एजंट तर यू कॅन फायर हर.... विनसी"

गेले तीन आठवडे माझा सतरा वर्षाचा मुलगा भारतात आहे. खूप फिरतोय, अंजिठा, वेरूळ, रायगड, बंगळूर, कितीतरी ठिकाणं आणि प्रत्येक ठीकाणच्या नातेवाईकांना भेटतोय. त्याचं कौतुक  होतंय तसंच त्याच्या मराठी बोलण्याचंही. विनसीची समस्या सोडवता आली नाही खरी, पण जेव्हा मराठीच्या कौतुकाची पावती मिळते तेव्हा बरं वाटतं, असं मनात म्हणत मी आपलं नुकतंच माझ्या मावसभावाचं इंग्लिशमधून आलेलं पत्र पुन्हा पुन्हा वाचत राहते.
You should be proud of your boy. Even I am unable to speak Marathi without using english words, however he spoke purely in marathi.Great, hats off to you.

याचसाठी केला होता अट्टाहास, त्याची काही गोड फळे तर काही कडू, एकाच नाण्याच्या दोन बाजू....


12 comments:

  1. Very well written. That is what we face here everyday.

    ReplyDelete
  2. ata marathitun lihu ka ingrajeetun ha prashna padla ahe ....jokes apart...ha prashna pratyekala kevha na kevha tari padtoch...pan shevti aple je ahe te aplech rahanar ahe ani pudhchya pidhila te shikavne hi apli jabadari ahe...tula alele email yachi sakshe ahe!
    Well written piece indeed!

    ReplyDelete
  3. खूप सुंदर लिहिलंय, आणि घरच्यांचं कौतुक बाहेरच्यांच्या रागापेक्षा जास्तच मोलाचं वाटलं असेल ना तुम्हाला... :)

    ReplyDelete
    Replies
    1. इंद्रधनु, धन्यवाद. अगदी खरं, शेवटी घरच्यांच्या कौतुकाचं महत्त्व जास्त त्यातून ते फक्त वर्षा दोन वर्षांनी भेटतात त्यामुळे तर अधिकच. माझा मुलगा चार वर्षानी भारतात गेला. तो एक वर्षाचा असल्यापासून आम्ही इथे आहोत त्यामुळे तर सर्वांना त्याच्या मराठी बोलण्याचं फार कौतुक वाटतं.

      Delete
  4. चांगलीच समस्या आहे की ही! सर्व बाजू बघता एकंदरीत गोचीच आहे.

    ReplyDelete
  5. गुरुदत्त,
    अगदी खरं, गोचीच आहे ही!

    ReplyDelete
  6. मस्त आहे पोस्ट..वाचायची राहिलीच होती...मुलांचं मराठी टिकवायचं कसं याविषयी आणखी लिही नं? माझ्यासारख्यांना उपयोगी पडेल. (अवांतर - माझ्याकडे सध्या वय वर्षे साडे चार आणि पावणे दोन बोबलं बोबलं मिंग्लिश बोलत असतात गं )

    ReplyDelete
    Replies
    1. तुझी प्रतिक्रिया पाहून छान वाटलं अपर्णा, मराठी कसं टिकवायचं? सोप्पं आहे, चिकाटीने ’मराठी....मराठी’ चा धोशा चालू ठेवायचा. कंटाळून बोलतात :-). विनोदाचा भाग सोड. चिकाटी हाच शब्द आहे. इथे मुलांना मराठी समजतं पण बोलता येत नाही अशी बहुतांशी समस्या असते. आम्ही मुलं काही बोलली इंग्लिशमध्ये की ’काय, काय’ असं फक्त विचारतो. तो डाव आता ती आमच्यावरच उलटवतात हा भाग वेगळा. पण मराठीची पाळं खोलवर रुजली असावीत कारण या वर्षीपासून (गेल्या महिन्यापासून) ऋत्विक शिकागोला आहे कॉलेजसाठी, त्याला आत्तापासून त्याचं मराठी टिकेल ना अशी काळजी लागली आहे.
      ऋत्विक भारतात जाऊन आल्यावर आम्ही आमचीच परिक्षा घेतली नुकतीच. पोटापाण्यासाठी बाहेर इंग्लिश बोलावं लागतं, आपोआप तेच घरातही शिरतं. किती इंग्लिश शब्द पेरत असतो बोलताना आपण. त्यामुळे सध्या पूर्ण मराठीची मोहीम आहे घरात :-).
      तुझी सध्या एकदम पिल्लंच आहेत त्यामुळे प्रयोगांना खूप वेळ आहे तुला!

      Delete
  7. आपण ह्या लेखातून परदेशस्थ भारतीयांना ज्या काही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी एक समस्या अगदी चांगल्या पद्धतीने मांडली आहे.

    माझाही असेच अनुभव आहेत. पहिल्यांदाच जेव्हा मी अपार्टमेंट बघण्यासाठी गेलो होतो, तेव्हा बरोबरच्या मित्रांशी सगळ मराठी किंवा हिंदीतच बोलत होतो अमेरिकन घरामालाकासमोर. त्यावेळेस तिकडे आमच्याबरोबर आलेल्या एका सिनियर मित्राने मला हळूच सांगितले ..."ह्या लोकांसमोर इंग्लिशमध्येच बोला...नाहीतर ह्यांना आपण त्यांच्याबद्दलच काहीतरी बोलतोय असं वाटत".

    पण आपणच सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण परदेशातही आपली मातृभाषा जपून ठेवतोय हे जाणवत, त्यावेळेस कायमच अभिमान वाटतो!

    ReplyDelete
    Replies
    1. Vicks हो ना. अगदी खरं आणि इथेच वाढूनही मुलंसुद्धा मराठी बोलत राहिली तर आनंद अधिक वाढतो, नाही का?

      Delete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.