Saturday, August 16, 2025

प्रस्तर

कथा तसंच या कथेचं मी केलेलं अभवाचन दुवा. वाचा किंवा ऐका :-)


                                            ________________________________________

तापाने फणफणलेली शीला कसल्याशा आवाजाने झोपेत चाळवली. चाहूल घेत ती डोळे किलकिले करणार तेवढ्यात दार दाणदिशी भिंतीवर आपटत सॅम आत शिरला.

"खायला कर काहीतरी. मला भूक लागली आहे."

शीलाने कसेबसे डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेतला विखार तिचे शब्द गोठवून गेला.

"मॉम, गेट अप." त्याने तिचा हात ओढलाच. सणकन थोबाडीत ठेवून देण्याची उर्मी शीलाने पुढच्या रामायणाची आठवण येऊन टाळली. तिच्या डोळ्यात भिती तरंगली. मागचा पुढचा विचार न करता सर्व शक्तीनिशी उठत तिने चहा ठेवला.  तिची नजर शांतपणे ब्रेड ऑमलेट खाणार्‍या सॅमकडे वळली.

’क्षणात मनस्थिती इतकी बदलते? सोळा वर्षाच्या मुलाला रागावर नियंत्रण नाही ठेवता येत? आईच्या आजारापेक्षा खाणं महत्वाचं वाटतं? नालायक कार्टा, हलकट.’ स्वत:च्याच शब्दांची शीलाला लाज वाटली तरी मनातल्यामनात चार शिव्या दिल्या की बरं वाटतं हे तिने स्वत:शीच कबूल केलं.

"का उठले मी? घाबरुन?" आधीच्या प्रसगांची उजळणी करत शीलाने धागा जोडण्याचा प्रयत्न केला.

"मॉम, पैसे पाहिजेत मला. स्केटिंग शूज घ्यायचेयत." सॅमच्या स्वरातला उद्धट ठामपणा शीलाला झोंबला.

"नाहीयेत माझ्याकडे आत्ता इतके पैसे." तोपर्यंत सॅमने पायातले शूज भिरकावले.

"भिकारडे शूज. मी नाही घालणार." दार धाडदिशी आपटत अनवाणी पायाने सॅम बाहेर पडला. शीला अवाक होऊन तो गेला त्यादिशेने  पाहत राहिली. डोळ्याची पापणी लवतेय तोच पुन्हा दरवाजा खाडकन उघडत तो आत आला. शीलाचा डावा हात त्याने असा काही पिरगळला की ती वेदनेनं तळमळली. त्याक्षणी ती निकराने पैसे न देण्याच्या निर्णयावर ठाम राहिली होती.  ते धाडस आज तिची तापाने फणफणलेली कुडी दाखवू शकली नाही.

"चुकलं माझं. तोल गेला माझा. ताप कमी होतोय?" गोळी, पाण्याचा ग्लास तिच्यासमोर धरत त्याने विचारलं.

"सॅम, तुला उपचाराची गरज आहे. मानसोपचारतज्ञाची. " पाण्याच्या घोटाबरोबर गोळी घशात ढकलत तिने सॅमवर नजर रोखली.

"गप्प बस. मी कुकुलं बाळ नाही. समजलं ना." तिच्या हातातलं रिमोट हिसकावत त्याने  टी. व्ही. लावला. क्षणापूर्वी हातात पाण्याचा ग्लास घेऊन उभ्या असलेल्या आणि लगेचच तोल गेलेल्या मुलाकडे ती भ्रमनिरास झालेल्या नजरेने पाहात राहिली. सतत पोखरणार्‍या शंकेने तिला पुन्हा ग्रासलं.

"हा बापाच्या वळणावर तर नाही ना चालला?"

रॉन  निघून गेल्यानंतर वर्ष सुखाची गेली. सॅम तर अवघा सहा वर्षांचा होता.

ती खुर्चीवरुन उठली पण आता तिचं लक्ष समोर उभ्या ठाकलेल्या दहा वर्षांवरुन हटेना. रॉनची तिची सुरुवाती वर्ष तशी सुखाचीच म्हणायला हवीत. फिजी सोडलं तेव्हा ती दहा वषांची होती. पन्नास टक्के भारतीय वंशाची मुळं असणार्‍या फिजीमध्ये सरकारी नोकरदार भारतीय फिजीकरांनी नाकारले, उठाव केला आणि भारतात परतण्याऐवजी शीलाच्या उच्चपदस्थ वडिलांनी अमेरिका गाठली. ’इथे नसतो आलो तर?" विचारातल्या निरर्थकपणाने शिलाने विषादाने मान हलवली.

जर इथे नसतो आलो तर सॅम भेटला नसता. पुढचं रामायण टळलं असतं; पण या जर तरने आता काय फरक पडणार होता?

 टी. व्ही. मध्ये नजर खुपसलेल्या सॅमकडे तिचे डोळे वळले. एकीकडे काम करता - करता सॅमच्या वर्गशिक्षिकेशी झालेल्या बोलण्याकडे तिचं मन ओढलं.

"तुझा मुलगा हुशार आहे शीला पण काहीतरी चुकतंय. एकदम स्फोट झाल्यागत भडका उडतो त्याचा. खूप दिवस निरीक्षण करतोय आम्ही. खेळताना मुलं टाळतात त्याला. घाबरतात सगळी. एकटा पडून काही विचित्र घडायला नको म्हणून तुला बोलावलं मुद्दम."

शीलाने वेळ न घालवता मानसोपचारतज्ञ गाठला. काहीशा जबरदस्तीनेच सॅम तिच्याबरोबर आला. बाहेर बसल्याबसल्या बंद दाराआड शीला रॉनला पाहत होती. असाच रॉनचा स्वभाव. तिला  किरकोळ कारणावरुन त्याने एका विद्यार्थ्याच्या नाकावर बुक्का मारुन रकतबंबाळ केलं होतं ते आठवलं. हॉस्पिटल, कोर्टकचेरी यातून बाहेर पडताना त्यावेळेला शीला निम्मी झाली. सोबत रॉनची चिडचिड, उद्धटपणा.

शीलाने नकळत तसाच उसासा सोडला. डॉक्टरांनी आत बोलावलं तेव्हा ती भानावर आली.

"सॅमला वर्षभर इथे यावं लागेल. तो..." बर्‍याचवेळाने ती बाहेर आली तेव्हा वाट बघून कंटाळलेला सॉम घरी निघून गेला होता.

"सॅम, मानसोपचारतज्ञाकडे जाणं म्हणजे वैगुण्यच असलं पाहिजे असं नाही. तू चांगला मुलगा आहेस. आहे त्यातून अधिकाधिक निर्माण करायचा प्रयत्न आहे हा. " त्याच्या न सांगता निघून जाण्याचा उल्ल्खेही न करता तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. सॅमने त्यानंतरचे तीन दिवस न खातापिता मौनव्रत धरलं. त्याही परिस्थितीत त्याच्या रागाचे आपण बळी ठरलो नाही यातच शीलाने समाधान मानलं.

ह्या गोष्टीलाही दोन वर्ष झाली होती. सुरुवातीला ती आवर्जून सॅमबरोबर दवाखान्यात जात असे पण प्रत्येक भेटीत बराच वेळ जायला सुरुवात झाल्यावर तिच्या वेळचं गणित जमेना. डॉकटारांनी फोन केल्यावर सॅमने तिथे जाणंच बंद केल्याचं तिला कळलं.

"निर्लज्ज मुलगा आहेस" फोन दाणदिशी आपटला तिने.

"बापासारखाच मनस्ताप भोगायला लाव. दोघांनी मिळून जगणं कठीण केलंयत माझं. तो तसा, तू असा. डोक्यात राख घालून तूही तोंड काळं करायला हवं होतंस त्याच्याबरोबर. चीड येते मला तुझी, खरंच चीड येते." रागारागाने ती सॅमसमोर उभी राहिली आणि क्षणभर आपण काय बोलतोय तेच विसरली.

’केवढा उंचापुरा वाढलाय.’

कौतुकाने तिने मान वर करत त्याच्याकडे नजर टाकली. त्याचा शांत पण खिन्न चेहरा पाहाताना तिचं काळीज तुटलं. एकाएकी दोन्ही हात धरुन तिने त्याला गदागदा हलवलं.

"सॅम, उपयोग होतोय उपचारांचा. बघ, तुझ्या बापाचा उद्धार करुनही तू शांत आहेस. रागाचा स्फोट नाही होऊ दिलास. उपयोग होतोय रे, उपयोग होतोय." सॅमला मिठी मारत ती गदगदून रडायला लागली. अलगद तिची मिठी सोडवत सॅम बाजूला झाला.

त्या प्रसगानंतर ती थोडीफार निश्चिंत झाली. ’सॅम बदलतोय? कुणास ठाऊक. रॉन बदलला?" उत्तर मिळवताना ती दचकली. कॉलेजच्या कॅन्टीनमधली त्याची मूर्ती तिच्यासमोर तरळली. काहीतरी जोरजोरात वादावादी चालली होती. रॉनचा आवाज सर्वात चढा. एकदा दोनदा जोरात त्याने टेबलावर मूठ आपटली तेव्हा 

कोपर्‍यातल्या टेबलावर खात बसलेलेल्या शीलाचं लक्ष तिकडे गेलं.

शाळकरी मुलांसारखं भांडतायत. शीला स्वत:शीच हसली. जाताना पाहिलं न पाहिल्यासारखं करत रॉनने ’हाय’ केलं तेव्हा त्याच्या देखण्या रुपाने शीला हरखलीच. आताही रॉनचा स्पर्श हवाहवासा वाटला तिला. सोफ्याच्या कडेवर हात घट्ट दाबत तिने पुरुषी स्पर्शाला आसुसलेलं मन बाजूला सारलं. रॉनच्या आणि तिच्या भेटी वाढत गेल्या आणि फिलीपाईन्सहून अमेरिकेत आलेल्या रॉनने अमेरिकन रिवाजाने तिला मागणी घातली.

"लग्न करशील माझ्याशी?"

होकार दर्शवित ती त्याच्या कुशीत शिरली. कॅन्टीनम्ध्येच त्याच्या प्रेमात पडल्याचं गालाला खळ्या पाडत तिने कबूल केलं. रॉननेही सगळ्यागाठीभेटी सहजपणे घडवून आणल्या होत्या असं हसतहसत सांगितलं तेव्हा शीलाने त्याच्यावर चुंबनांचा वर्षाव केला.

दोघं संसारला लागण्याआधीच त्याच्या स्वभावाची चुणूक तिला जाणवली. बदलेल, आपण बदलू त्याचा स्वभाव. नाही तर करु थोडी तडजोड. तारुण्याचा जोष तिच्या आजूबाजूला घुटमळत होता. पण वर्षाच्या आत दोघं मेटाकुटीला आले. लग्न टिकवण्याची धडपड किती निष्फळ आहे हे तिला जाणवत होतं पण कुणाचाच आधार नसलेल्या शीलाला तुटकी काडीही मोडण्याचं धाडस झालं नाही. तिने रॉनच्या मागे मुलाचा आग्रह धरला. ते वर्ष बरं गेलं. नवीन जीव घरात येणार ह्या आनंदात दोघंही कडवटपणा विसरले.

सॅममध्ये शिलाने स्वत:ला पार अडकवलं. बघता बघता तो सहा वर्षांचा झाला पण बापलेकांचे संबंध यथातथाच होते. सॅम रॉनला भिऊनच असायचा. तिने दोघांचं जमावं, त्यांनी एकत्र खेळावं, रमावं याचा आटोकाट प्रयत्न केला. सॅमसमोर वाद टाळले तरी रॉनच्या रागाची झळ त्याला पोचत होतीच. वर्ष जातील तसा रॉनचा आक्रमकपणा वाढत होता. शेवटी तर त्याने कळस गाठला. सॅममध्ये ती गुंतलेली त्याला चालेनासं झालं. त्याच्या शारीरिक भुकेला पुरं पडणंही तिला अशक्य झालं.

त्या दिवची रात्र तिच्या डोळ्यापुढून सरेना.

"रॉन, नको ना. आज नको. सॅम आत्ताच झोपलाय." ती काकुळतीला येऊन विनवत होती. दोघांचे आवाज चढले तसा सॅम दारात येऊन उभा राहिला.

"मॉम, डॅड बास ना, बास..."

त्याचं रडणं, ओरडणं रॉनच्या मस्तकात गेलं. त्याने जोरात सॅमला दाराबाहेर ढकललं. सॅम तोल जाऊन पडला. कपडे सावरत शीला पुढे धावली. जीवाच्या आकांताने तिने रॉनच्या गालावर थप्पड मारली. क्षणभर रॉनलाही काय झालं ते समजलं नाही; पण दुसर्‍याक्षणी शीलाला त्याने लाथाबुक्क्यांनी तुडवलं. पुढे धावलेला सॅमही त्यातून सुटला नाही. हातात येईल तो शर्ट खसकन अंगावर चढवत रात्री एक वाजता घराबाहेर पडणार्‍या आपल्या नवर्‍याकडे सॅमला कुशीत घेत शीला अगतिकपणे पाहत राहिली.

त्यादिवसी प्रथमच तिला रॉनच्या आणि तिच्या आईवडिलांची चीड आली. सगळे बंध नाकारत ह्यांनी देश सोडला. प्रत्येकाचे एकुलते एक आम्ही. ना बहीण, ना भाऊ.  स्वत: सगळ्या पाशातून मुक्त झाले पण आम्ही मात्र एकटे पडतोय. हा देश परका म्हणून आणि आपल्या देशात कुणाशी संबंधच नाहीत म्हणून.

उमटलेल्या वळांवर हात फिरवत ती सॅमला थोपटत राहिली. त्यानंतर रॉन परतला नाही. ’येईल पुन्हा डोकं ताळ्यावर आलं की’ शीलाने स्वत:ला बजावलं. सॅम गप्प, गप्प होता. नेहमीप्रमाणे चार दिवसता रॉन आला नाही. तेव्हा कर्तव्य म्हणून तिने त्याच्या शाळेत फोन केला. आज येईल, उद्या येईल म्हणत महिना गेला आणि अखेर सॅमला समोर घेत तिने समजावलं. मिटलेले ओठ घट्ट दाबत सॅम शीलाकडे एकटक पाहात राहिला. रडावंसं वाटूनही ती रडली नाही. कुठे तरी सुटकेचा नि:श्वास सॅमला ऐकू न येण्याचा प्रार्थना मात्र करत राहिली.

दोघांचं जीवन सुरळीत सुरु झाल्यावर ती संथावली. सततचा तणाव, भांडणांना पूर्णविराम मिळाला या समाधानात सॅमभोवती तिच्या वेळेची वेणी गुंफली गेली आणि सॅमच्या स्वभावातला उग्रपणा तिला टोचायला लागला. स्वत:च्या मनाची अनेक वेळा तिने समजूत घातली. रॉनच्या जाण्याची जखम ताजी आहे, तसा लहानच आहे, हळूहळू येईल समज. एक ना अनेक. यातून ती बाहेर पडण्यापूर्वीच अचानक रॉनचे फोन येणं सुरु झालं. प्रत्येकवेळी फोन ठेवावासा वाटूनही तिने तसं केलं नाही पण दुखावलेल्या मनाने, अहंकाराने त्याचा ठावठिकाणाही विचारु दिला नाही, त्यानेही कधी आपणहून काही सांगितलं नाही. सॅमनं मात्र रॉनशी बोलायला ठामपणे नकार दिला. एकदोनदा बोलला तेव्हाही संभाषण एकतर्फीच झालं. शीलाही त्याला समजावण्याच्या भागगडीत पडली नाही. हळूहळू त्यांचे फोन कमी झाले. मग बंदच पडले. बरीच वर्ष रॉनचा उल्ल्खेखही त्या घरात झाला नाही.

पण अचानक रॉन दारात उभा रहिला. शीला गोंधळली. सॅम डोळे ताठ करुन बघत राहिला पण लगेचच जोरात आपटलेल्या दाराचा आवाज शीलाच्या कानात घुमला. द्विधा मन:स्थितीत ती तशीच उभी राहिली. 

’काय अवस्था झाली आहे देहाची” एकटक  ती रॉनला न्याहाळत राहिली.

"बोलणार नाहीस?"

’हा माणूस एवढा हळूवार होऊ शकतो?’ त्याच्या स्वराचं तिला आश्चर्यच वाटलं.

"सॅमच्या मनात किती राग धुमसतोय ते दिसतंय मला; पण आता फार थोडे दिवस उरले आहेत माझे"

"काय होतंय तुला?" विचारावं वाटूनही ती अस्वस्थ हालचाली करत राह्यली.

"चहा करतेस? भूकही लागली आहे."

रॉनचा तिला बोलतं करण्याचा प्रयत्न चालू होता. काही न बोलता ती चहाच्या निमित्तानं स्वयंपाकघरातच घुटमळत राहिली.

’कधी जाणार हा? का परत आला कायमचा?’ तिचं हृदय धडधडलं.

’नको, आता आणखी ताण मी नाही सहन करु शकत.’ उलटसुलट विचारांनी तिचं डोकं भणभणून गेलं.

गोड शिर्‍याची प्लेट तिने जरा जोरातच टेबलावर ठेवली.

"अजूनही लक्षात आहे तुझ्या मला काय आवडतं ते?" न ऐकल्यासारखं करत तिने ग्लासमध्ये पाणी ओतलं.

"मॉम लगेच इकडे ये. ताबडतोब." शीला सॅमच्या खोलीकडे धावली.

"त्या माणसाला घराबाहेर व्ह्ययला सांग. लगेच. आत्ताच्याआत्ता." तांबारलेल्या डोळ्यांनी सॅम शीलाकडे पाहत राहिला.

"त्याची अवस्था बघ तू. आणि तो माणूस तो माणूस काय करतोस? वडील आहेत तुझे ते."

"तू सांगतेयस हे? प्रथमच ऐकतोय मी वडील शब्द. नेहमी तुझा बाप, तुझा बाप असचं असायचं.

"गप्प बस. मी जायला सांगणारच आहे रॉनला; पण तो का आलाय ते तर कळू दे."

"गरज नाही. काय संबंध आहे आपला आता त्यांच्याशी? मीच सांगतो." सॅमला थोपवून ती बाहेर आली. रॉनच्या चेहर्‍याकडे पाहताच त्याने दोघांचं बोलणं ऐकलंय हे तिने ताडलं.

"तो तुझ्यासारखाच आहे. संतापी. उपचार चालू आहेत म्हणून बर्‍यापैंकी शांतपणे घेतलं तुझं आगमन."

"मी बदललोय. बघू नकोस असं. मला माहित आहे तुझा विश्वास बसणार नाही यावर. माझा तसा प्रयत्नही नाही. मला शेवटचे दिवस तुम्हा दोघांबरोबर या घरात काढायचे आहेत. सॅमला बोलव. मला बोलायचं आहे तुम्हा दोघांशी." तिने हाक मारायच्या आत सॅम शीलाच्या बाजूला येऊन बसला.

"त्यादिवशी मी रागाच्या भरात बाहेर पडलो त्याला दहा वर्ष होतील. नेहमीप्रमाणे राग शांत झाल्यवरही परत यावंसं वाटलं नाही. कुठेतरी स्वत:चा शोध घ्यावासा वाटला. सामान्य माण्सासारखा कधी तरी राग येणं आणि माझं वागणं यातला फरक पटत होता. तू फार भरडून निघत होतीस. सॅमला माझ्या रागाची झळ लागत होती, ते टाळायचं होतं."

काहीतरी विचारण्यासाठी मायलेकांनी एकदमच तोडं उघडलं पण दोघंही काही न बोलता रॉनकडे बघत राहिले.

"सॅमसाठी उपचार चालू आहेत हे चांगलं झालं. जे मला जमलं नाही ते तुला सुचलं. शेवटी हेही अनुवंशिकच म्हणायला हवं. मी थकलोय आता. बरेच दिवस सरकारी दवाखान्यात  राहिलो. तिथून पळून आलो इथे. रोगाने शरीर पोखंरलंय. जास्तीत जास्त सहा महिने. तू घालवणार नाहीस या विश्वासावर आलोय मी इथे पण सॅमचंही मत महत्वाचं आहे." सॅम हसला,

"माझं मत? या घराला माझंही मत महत्वाचं वाटतं? तर मग माफी मागा आमची. पायावर नाक घासून. आहे शक्य?" दाणकन सोफ्यावरची उशी आपटत सॅम उठला. शीला, रॉन एकमेकांची नजर उगाचच चुकवत राहिले. शेवटी शीलानेच संभाषण चालू ठेवलं.


"तुझं बोलणं कितीही मान्य केलं तरी काही प्रश्न उरतातच रॉन. तू का गेलास हे कधीच स्पष्ट झालं नाही. तीन चार वर्ष फोन केलेस पण तुला जाणवलं नाही की सॅमला तुझ्या प्रेमाची, आधाराची गरज असेल? मुलांना वडिलांच्या सहवासात आश्वासक वाटतं हे ठाऊक नाही तुला? तुला वाटलं म्हणून तू स्वत:चा शोध सुरु केलास, तुझी इच्छा म्हणून फोन करायला सुरुवात केलीस आणि तुला वाटलं म्हणून अचानक फोन करणंही बंद केलंस. त्यात आम्ही दोघं कुठे होतो रॉन?"

"वर्षभर मी हॉस्पिटलमध्ये होतो शीला."

"सहा वर्षांबद्दल म्हणतेय मी." काही न बोलता रॉनने बोटात बोटं गुंतवली.

"आता विषय वाढवणं निर्थक आहे रॉन. तू राहा इथे पण आपलं नातं नवराबायकोसारखं नसेल हे मान्य असेल तर... तू निघून गेलास तेव्हा शारीरिक भुकेला आसुसलेल्या लांडग्यापासून सुटका झाल्यागत वाटलं; पण नंतर तुझ्या आधाराची उणीवही भासली अनेकदा. सॅमच्या स्वभावातला विचित्रपणा जाणवला तेव्हा तुझ्या आश्वासक स्पर्शासाठी रात्र जागून काढली मी. अनेकदा शरीरानेही बंड पुकारलं पण तू समोर आल्यावर सगळ्या इच्छांची राख झाल्यासारखं वाटतंय."

"तू म्हणशील ते मान्य आहे. तुम्हा दोघांबरोबर राहायचं एवढीच इच्छा आहे माझी." रॉनने सोफ्यावर अंग टाकलं.

शीलाने चार दिवस मोकळे ठेवले. रॉनला डॉकटरांकडे नेणं, औषधं, नवीन कपड्यांची खरेदी या सगळ्याला वेळ पुरत नव्हता. बापलेकात फारसं संभाषण नाही हे तिला जाणवत होतं पण त्याबाबतीत काही करण्याचं त्राण तिच्यात नव्हतं आणि इच्छा तर अजिबातच नव्हती. शुल्लकशा कारणानेही सॅम संतापत होता. पुन्हा आपण या दुष्टचक्रात अडकत नाही ना या शंकेनं तिचा जीव त्रासला. हे असंच चालू राहणार असं वाटत असतानाच अचानक सॅमच्या निर्णयाने तिला काही तरी गमावल्यासार्खं तरीही मोकळं झाल्यागत झालं.

"मॉम, मला नोकरी मिळतेय. मुख्य म्हणजे स्टुडीओत बस्तान हलवतोय मी उद्याच."

स्वतंत्र राहण्याची अनिवार इच्छा आणि उतावळेपणा त्याच्या चेहर्‍यावरुन ओसंडत होता. बोलण्यासारखं काही नव्हतंच. तिने त्याला अलगद कुशीत  घेतलं.

सॅमला निरोप देत ती दारापाशीच घुटमळली.

सॅम सोळा वर्षांचा झाल्यापासून ती या क्षणाची वाट बघत होती; पण त्याचवेळेस रॉनच्या परतण्याची शक्यता जमेला धरणं मात्र राहून गेलं होतं.

रॉन नसता तर याक्षणापासून आयुष्य वेगळं असतं. मोकळं, तणावरहित. सॅमचं स्वाववलंबीपण सुखद वाटतंय तस रॉनचं आगमन का नाही स्वीकारु शकत मी? नाकारायचं तर ते तरी ठामपणे करायला हवं होतं. आता फक्त शेवट कधी होईल याची वाट पाहणं एवढंच उरलंय माझ्या हातात. मागे वळून रॉनकडे पाहताना तिचे डोळे भरुन आले.

बंद दारापलीकडे निघून गेलेल्या सॅमच्या आणि दाराअलिकडच्या रॉनच्या मधोमध उंबरठ्यावर अश्रू रोखत ती उभी राहिली... ठामपणे!


(मेल्टिंग पॉट या कोकण साहित्य परिषद उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कारप्राप्त कथासंग्रहातील कथा.)



No comments:

Post a Comment

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.