Friday, March 22, 2013

दिवस

"आज आपण रेस्टॉरंट ’डे’ करुया?" माझ्या प्रश्नावर आणि थंड गॅसकडे नजर टाकत घरात वेगवेगळ्या प्रत्तिक्रिया उमटल्या,
मुलगी आनंदाने चित्कारली. मुलाने स्मार्ट फोनवर सगळ्यात महागडं रेस्टॉरंट शोधायला सुरुवात केली. नवरा निर्विकार नजरेने पहात राहिला. नजर निर्विकार असली तरी मन नसतं. त्यामुळे त्या नजरेतला छुपा भाव मला कळलाच.
’कमाल आहे, सरळ सांगावं ना जेवण केलेलं नाही. हे ’डे’ वाढवण्याचं काय खुळ, एकदा सुरु झाला म्हणजे दर आठवड्याला हा ’रेस्टॉरंट डे’ असेल. आधीच भारंभार दिवस लक्षात ठेवावे लागतात.’ त्याच्या मनातले भाव समजल्यासारखं म्हटलं, अरे आज ना ... मासिकाच्या संपादकाचं पत्र आलं आहे,
’दर महिन्याला कोणतातरी ’दिवस’ येतो. तर पुढच्या वर्षीसाठी वेगवेगळ्या ’दिवसां’ वर लिहाल का? असं विचारलं आहे.’
"मग? तू आधीच लिहून ठेवले होतेस ना सगळ्या दिवसांवर लेख?"
"हो, पण मला एन. पी. आर. मुळे एक नवीन दिवस कळला आहे."
बापरे हा शब्द तोंडातून बाहेर न काढण्याचा शहाणपणा त्याच्याकडे आहेच, तो नुसतं,
"अच्छा" म्हणाला. तेवढ्या बळावर मी तो दिवस कोणता ते सांगून टाकलं.
"अरे आज कवी दिवस आहे. म्हटलं कवी दिवस आणि रेस्टॉरंट डे एकत्र करु. म्हणजे माझी कविता वाचून दाखवता येईल, तुम्हाला खाण्याचा आनंद, मला श्रोते मिळाल्याचा. नंतर त्यावर लिहिताही येईल."
"आई, मरु दे आज नकोच रेस्टॉरंट." मुलीने एकदम माघारच घेतली.
"पिझ्झा मागवतो मी. आम्ही दोघं राहू घरी. भांडणार नाही. तू आणि बाबा जा रेस्टॉरंटमध्ये. बाबाला निवांत ऐकता येईल कविता तुझी." पोटाची व्यवस्था करत सुपुत्राने पळ काढला. नवर्‍याचा चेहरा पहाण्यासारखा झाला. त्याने सोफ्यावर बसकण मारली आणि बोटाने आकडेमोडच सुरु केली एकदम.
’मदर्स डे, फादर्स डे, महिला डे, शिक्षक डे, व्हॅलेनटाईन डे, आता हा कवी डे...’ त्याची बोटं अपुरी पडली तर? मुलीने आपलीही बोटं लागलीच तर असावीत म्हणून त्याच्यासमोर धरुन ठेवली. त्या धक्क्यातून तो सावरला थोड्यावेळाने. पण कोडं पडल्यासारखा म्हणाला,
"हा असा एकेकच दिवस का साजरा करतात या प्रत्येक नावाने. त्यादिवशी जे प्रेम, आदर, कौतुक सगळं व्यक्त करतो आपण त्या त्या ’दिवस’ असलेल्या व्यक्तीचं ते रोज  आपल्या वागण्यात दिसलं तर काय बहार येईल ना? म्हणजे मग ही भानगडच उरणार नाही."

"भानगड म्हणजे काय रे? आणि बहार म्हणजे?" मुद्दा सोडून दुसरंच काहीतरी उकरण्यात दोन्ही पोरं वस्ताद. मी मात्र रेस्टॉरंट मध्ये वाचायची कविता पुन्हा एकदा डोळ्याखालून घातली. रेस्टॉरंट डे नाही झाला तरी घरातल्या घरात कवी डे तरी...

7 comments:

  1. हाहा .. काय झालं मग पुढे; ते रहस्य गुलदस्तातचं ठेवलंत की :-)

    मलाही या 'दिवसांच्या' दिखाऊपणाचा वैताग येतो!

    ReplyDelete
  2. सविता धन्यवाद. आणि हे ’दिवस’ प्रकरण वाढतच चाललं आहे :-).

    ReplyDelete
  3. Amachya kade restaurant mhanala ki - kuthe jayacha hey nakki karestovar mazha 4 vela swampak zhalela asto:) ani mag agadi kautukane mhantat loka , restaurant kashala tu itaka chan kartes kids too chime in - we only like what mamma makes !!

    ReplyDelete
    Replies
    1. वृंदा ’डे’ होतो तर घरी :-).

      Delete
  4. jyanchyakade vachalyala kavita nasel tyanche kay? apart from jokes once in a month should b restaurant day and its a good addition to 'days' list

    ReplyDelete
  5. हापिसात "डे"ज निभावणं हा एक त्रासदायक प्रकार आहे माझ्यासाठी... मुळात आज संध्याकाळी मला बजावून सांगितलं अमका डे आहे तरी माझ्या ते दुसऱ्या दिवसापर्यंत लक्षातच रहात नाही... मात्र तुमची कविता इथे वाचायला मिळेल अशी आशा आहे :)

    ReplyDelete
  6. रेस्टॉरंट डे वाचून मला माझ्या मामाच्या गावातील 'चूलबंद' दिवसाची आठवण झाली. चूलबंद दिलस म्हणजे गावजेवणाचा कार्यक्रम. कोणाकडे लग्न वगैरे साजरे होत असेल तर त्या दिवशी चूलबंदची आमंत्रण दिली जातात. म्हणजे सगळ्यांनी लग्नाघरी जेवायला जायचं.स्वत:ची ताटवाटी घेऊन.मेन्यू-गुळाचा शिरा, भात, तुरीच्या डाळीचं फिकं वरण,एखादी भाजी, बस्स!पाळी, चपाती, भाकरी वगैरे भानगड नाही. गाव चिंचोली, ता.यावल, जिल्हा जळगाव. अशा ह्या चूलबंद दिवसाला युनोच्या यादीत स्थान मिळणार असेल तर मला आनंदच होईल!मग त्याला रेस्टॉरंट डे म्हणा किंवा आणखी अन्य काही नाव द्या!

    ReplyDelete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.