Tuesday, December 2, 2014

लेकाच्या... ची कथा

फोन घणघणायला लागला. लेकाच्या फोनसाठी आम्ही विशिष्ट आवाज निवडला होता. खरं तर लगेच फोन उचलू म्हणून तसं केलं होतं. पण घरचाच तर आहे, करेल परत असं म्हणून कुणीच आजकाल ढिम्म हलत नव्हतं. आज मात्र मी तातडीने उचलला. घरातली बाकीची Thanksgiving च्या सुट्टीबद्दल परमेश्वराचे आभार मानत झोपा काढत होती. मला करण्यासारखं काही नसल्याने आलेला फोन तरी वेळेवर उचलावा म्हटलं.
"आई, अग तो मेला, तो मेला, म्हणजे मी मारलं त्याला ठार." चिरंजीव फोनवर आनंदातिशायाने किंचाळत होते. मेला या शब्दाने थिजल्यासारखं होऊन शब्दच फुटेना माझ्या तोंडून.
"आई..."
"अरे, काय केलंस तू? आणि खिदळतोस काय असा?" मी त्याच्यापेक्षा जोरात किंचाळले. तो आनंदाने, मी घाबरुन.
"आधी शांत हो आई, एकदम शांत. आता सांग. मी कोणत्या मोहिमेवर होतो सध्या?" क्षणभर काही आठवेना. म्हणजे, एखादा तास कसा बुडवायचा, सलग १५ तास झोपायचं, आई, बाबांना, शिक्षकांना शेंडी कशी लावायची, फुकट कुठे काय मिळतं त्याचा मागोवा घ्यायचा अशा महाविद्यालयीन मुलांच्या ज्या मोहिमा असतात त्यातलीच एखादी असणार हे नक्की. पण सध्याची कुठली? चुकीचं सांगितलं की एक व्याख्यान. भूमिका बदलल्या होत्या. पूर्वी मुकाटपणे तो आमचं ऐकायचा, आता आम्ही त्याचं.
"अगं उंदीराला पळता भुई थोडी करुन टाकणार नव्हतो का मी?" माझ्या डोक्यात एकदम उंदीर शिरला आणि त्याची Thanks Giving सुट्टीची मोहिम आठवली.

सुट्टीचा पहिला दिवस:
"आई, आज उंदीर दिसला. ईऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ."
"उंदराला कसला घाबरतोस?" त्याने सोयीस्करपणे विषय बदलला.
"टायलरमुळे झालंय. त्याचीच खोली घाण असते. कुठेही बसून खातो शहाणा. अन्न शोधत येतो मग उंदीर"
"चिरंजीव..." काहीही न बोलता त्याला मला काय म्हणायचं ते कळलं.
"तुझ्या हाताखाली १६ वर्ष राहिलो. काय बिशाद आहे माझी स्वच्छता न ठेवण्याची?" पुढे त्याचं हॅहॅहॅ करुन हसणं.
"चिरंजीव..." पुढचं कळल्यासारखं त्याने पुन्हा विषय थोपवला.
"बरं, बरं ते वेगळं. पण काल स्वयंपाकघराच्या मोरीत सगळं पाणी तुंबलं होतं. मी ते तसंच ठेवलं आणि टायलरला टेक्स्ट केलं. तर तो म्हणायला लागला. तू पालापाचोळा खातोस. पालकचं पान दिसतंय."
"मग?"
"मग काय? मी फक्त पालकचं पान काढलं तिथून. बाकी उरलेलं त्याने स्वच्छ करावं."
"पण तो बाजूच्याच खोलीत होता ना? मग बोलायचं त्याच्याशी."
"हॅ, काहीतरीच काय?"
"नाहीतर बाई किंवा बुवाच का नाही तुम्ही स्वच्छतेसाठी लावत?"
"अगं असं काय म्हणतेयस तू आई॓?" त्याला चांगलाच धक्का बसला.
"रोज एकमेकांना छळण्यापेक्षा ते बरं ना?"
"१६ वर्षात तू काय हे शिकवलं आहेस? आपली कामं आपण करावी असं सांगायचीस तू. आपण कधी बाई लावून घर स्वच्छ नाही केलं. तो घाण करणार आणि बाई मी लावू? काहीहीऽऽऽ."
"अरे..."
"मी नंतर बोलतो."

दिवस दुसरा:
"भारतात असतात का उंदीर?" सध्या उंदीर आमचे दिवस चांगलेच कुरतडत होता.
"असतात की."
"आजोबांकडे होते?"
"हो, दोन चार पाळले होते. मांजरासारखे बसलेले असायचे की."
"आई, तू पण ना. पण आई, आज फक्त मी, उंदीर आणि घर! कल्पनाच चित्तथरारक वाटतेय."
"टायलर?"
"तो गेलाय सुट्टीसाठी. मी शोधून काढलंय तो उंदीर कुठून येत असेल ते.  तो आत येवू नये म्हणून बेकींग सोडा, व्हिनेगरचं मिश्रण एकत्र करुन कापडाचा बोळा भिजवला आणि त्याच्या प्रवेशद्वाराशी खुपसलाय."
"अरे, वासाने मेला तर? कुबट वास येईल."
"नाही तो पळून जाईल. आणि मेला तर कॉलेजला कळवेन. ते करतात व्यवस्था पुढची."

दिवस तिसरा:
"तो मेला, मेला, मी मारला..." इथून पुढे वर लिहिलेलं सारं काही झालं. आता प्रत्यक्ष रणभूमीवर.
"अगं, घरी आलो तर वाट बघत असल्यासारखा दारात होता. याचा अर्थ ते भोक बुजवलं तेव्हा तो आतच होता. त्याला बाहेर पडताच आलं नाही."
"तुझी वाट बघत होता. नमस्कार, चमत्कार झाले की नाही?"
"झाले. मी जोरात किंचाळलो, तो घाबरुन लपून बसला. आम्ही एकमेकांशी असेच बोलतो."
"आला की नाही बाहेर?"
"टायलरच्या टॉवेलखाली लपला. तो पण हुशार. बाहेर आलं की आत्मबलिदान हे ठाऊक होतंच त्याला. १५ मिनिटं आम्ही तसेच एकमेकांच्या समोर. अगदी, मारेन किंवा मरेन असंच ठरवलं होतं मी पण."
"बापरे, पण उंदरानेच तुला मारलं असतं तर?" माझ्या विनोदाकडे, सांगितलेल्या कामाकडे दुर्लक्ष करतो त्याप्रमाणे करत तो म्हणाला.
"आईऽऽ ऐक पुढे. मी हातमोजे चढवले, बुरखा घातला. हातात झाडू होतीच."
"हे सगळं कशासाठी?"
"त्याला मारताना तो अंगावर चाल करुन आला तर? मला त्याचा स्पर्श नको व्हायला ना." उंदराबरोबरच्या लढाईची तयारी जय्यत होती.
"तो टायलरच्या टॉवेलच्या वासानेच अर्धमेला झाला बहुतेक. पडला एकदाचा बाहेर. हाणलं त्याला. पळाला. पुन्हा हाणलं. आणि मेला, मेला एकदाचा. अखेर मारलं मी त्याला." उंदराबरोबरची लढाई चिरंजीव जिंकले होते.
"तो धारातीर्थी पडलेला उंदीर कुठे आहे आता?"
"का? फोटो काढून पाठवू? मग तू फेसबुकवर टाकणार असशील."
"हॅ, काहीतरीच काय?" मी म्हणायचं म्हणून म्हटलं पण कल्पना काही वाईट नव्हती.
"त्याचे अंत्यसंस्कार करणार आहे मी."
"म्हणजे नक्की काय?"
"त्याला टायलरच्या टॉवेलमध्ये गुंडाळणार. पांढरं कापड मिळालंच ना अनायसे. नंतर बाहेर नेऊन कचर्‍याच्या पेटीत त्याला विसावा देणार. त्याचं अंतिम विसाव्याचं स्थान."
"शाब्बास चिरंजीव. असेच पराक्रम गाजवत रहा."
"चल, ३ दिवस झोपलो नव्हतो उंदराच्या भितीने. आता Thanksgiving च्या सुट्टीबद्दल परमेश्वराचे आभार मानतो आणि २ दिवसांनी उठतो." चिरंजीवानी फोन ठेवला. सुट्टीतल्या करमणुकीबद्दल मीही चिरंजीवाचे आभार मानले आणि दिनक्रमाला सुरुवात केली.

2 comments:

  1. मस्तच मोहना. खूपच हसायला आले आणि प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला.

    ReplyDelete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.