Friday, August 1, 2014

सीमारेषा

"साकेत तू काय घेणार? व्हिस्की, वाइन, बिअर..." परेशकाकाच्या प्रश्नावर साकेतने आईकडे पाहिलं. साकेतने
इथे सगळ्यांमध्ये नाही घेतली तर बरं असं वाटत असतानाच  आजूबाजूला हास्याचे फवारे उडाले. झालं, साकेतने हो म्हटलं तर नंतर त्याबद्दलच  चर्चा रंगणार, श्रावणीच्या मनात विचार तरळला. तितक्यात गिरीशच म्हणाला,
"घे रे बाबा तुला काय पाहिजे ते. माझ्याकडून हिरवा दिवा." साकेतने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं तसं स्पष्टीकरण देत गिरीश म्हणाला,
"म्हणजे ग्रीन सिग्नल रे." साकेत हसला.
"नको."
"आईला घाबरतोयस का?" परेशने श्रावणीकडे पहात विचारलं.
"मला कशाला घाबरेल तो? त्याच्या बाबानेच परवानगी दिली आहे ना." श्रावणी हसून म्हणाली आणि  वाइनचा ग्लास तिने तोंडाला लावला.
साकेतनेही अवघडत परेशकाकाने दिलेला ग्लास हातात घेतला.
"कॉलेजमध्ये पण घेतोस का?" रागिणी मावशीच्या प्रश्नाला साकेतने उत्तर देण्याआधीच ती म्हणाली,
"आम्ही दोन्ही मुलांना सांगितलं आहे. घ्यायची तर आमच्या समोर. कॉलेजमध्ये अजिबात नाही. जे काही कराल ते आम्हाला कळलं म्हणजे झालं." श्रावणीने साकेतकडे  कटाक्ष टाकला. पुसटसं हसू त्याच्या चेहर्‍यावर पसरल्यासारखं वाटलं तिला.  तिने रागिणीच्या बोलण्यावर मान डोलवली.

रागिणीचे शब्द श्रावणीच्या मनात घोळत होते. खरचं तिची मुलं फक्त त्यांच्या उपस्थितीतच घेत असतील? कॉलेजसाठी या मुलांना बाहेर रहावं लागतं. तिथे इतर मित्र मैत्रीणी बरोबर असताना मोह टाळता येत असतील? साकेत काय करत असेल? लगेच हा विषय नको म्हणून दोन तीन दिवस ती या विषयावर काही बोलली नाही. पण त्या दिवशी कॉलेजचाच विषय सुरु झाल्यावर तिने  संधी साधली.
"मुलं दारु, सिगरेट पितात/ओढतात का तिकडे? नाही म्हणजे आम्ही काही इथे शिकलेलो नाही. त्यामुळे वातावरणाची कल्पना नाही ना म्हणून विचारते आहे." साकेत  हसला.
"रागिणी मावशी जे बोलली त्यामुळे विचारते आहेस ना?"
"अगदी तसंच काही नाही."
"तसंच आहे आई. आणि तुला सांगतो आम्ही सगळी ’देसी’ मुलं पालकांना जे ऐकायला आवडेल तेच सांगत असतो."
"म्हणजे?"
"तुला खरंच वाटतं रागिणी मावशीच्या मुली कॉलेजमध्ये दारुला हातही लावत नसतील?"
"मला नाही माहित."
"एक तर मुलींनी दारु पिण्याचं प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे कॉलेजमध्ये. आणि आपण हात सुद्धा लावत नाही असं त्या सांगत असतील मावशीला तर ते साफ खोटं असणार. सगळी मुलं घेतातच गं कधी न कधी."
"तू?"
"हो घेतो. आणि हे लगेच कबूल करतो आहे कारण ते रेल्वे रुळ ओलांडायचं झाल्यापासून मी तुम्हाला जे खरं आहे तेच सांगतो हे विसरु नकोस तू." श्रावणीचं लक्ष  त्याच्या बोलण्यावरुन उडालं.  साकेतने तिचं मन एकदम भूतकाळात ढकललं. साकेत खेळायला जायचा मित्रांबरोबर. दुसरीत असेल. सात वाजता घरी परत यायचं आणि रेल्वे रुळ ओलांडून पलिकडच्या मैदानात जायचं नाही असं बजावलेलं होतं त्याला. एकदा सात वाजता तो आला नाही म्हणून ती बघायला गेली तर सगळी मुलं पलीकडच्या मैदानावर खेळायला गेलेली. श्रावणीला बघून तो बावचळला. राग आलेला असूनही तिने तो गिळला. गिरीश आला की मगच दोघं मिळून बोलू साकेतशी असं ठरवून ती  साकेतला घेऊन मुकाट्याने  घरी आली.  मुलांना आपणहून परवानगी दिली नाही तर ती लपूनछपून त्यांना पाहिजे ते करतातच, त्यासाठी खोटं बोलतात हे ह्या प्रसंगाने त्यांना दाखवून दिलं. दोघांनी झाल्या गोष्टीचा शांतपणे विचार करुन  दुसर्‍या दिवसापासून रुळ ओलांडून मैदानावर खेळायला जायची परवानगीही दिली. खोटं बोलायचं नाही. खरं सांग. चुकीचं वागला असलास तरी आम्ही तू असं का केलंस ते समजून घ्यायचा प्रयत्न करु याची त्याला खात्री दिली. तेव्हापासून साकेत मोकळेपणाने त्यांच्याशी सगळं बोलत होता.
"आई, लक्ष कुठे आहे तुझं." ती एकदम भानावर आली.
"बागेचा प्रसंग आठवत होते. जाऊ दे ते. पण रोज घेतोस का रे तू?"
"नाही गं. फक्त शुक्रवारी. ते सुद्धा एखाद्याच."
"सिगरेट?" न रहावून तिने विचारलं.
"अजिबात नाही."
श्रावणीची चुळबूळ, अस्वस्थपणा वाढला असावा.
"आई, मी प्रामाणिकपणे खरं तेच सांगतोय गं."
"अच्छा" म्हणून साकेतचं बोलणं ऐकत राहिली.

श्रावणीचे एक दोन दिवस अस्वस्थतेत गेले. आपले कॉलेजचे दिवस वेगळे होते. साकेतच्या बाबतीत  काळ आणि देश दोन्ही बदललेलं आहे त्यामुळे नसती भिती, अंदाज बांधण्यात काय अर्थ? आणि आता जिथे आपणही मित्र मैत्रिणींबरोबर  ड्रिंकची चव चाखतो तिथे मुलांना काही शिकवायला जाणं म्हणजे... पण कॉलेजमध्ये वय, संगत यामुळे कुठे थांबायचं हे कळलं नाही या मुलांना तर याचीच भिती वाटते आणि ती बोलून दाखवायलाच हवी असं तिला वाटत होतं. शेवटी तिने तो विषय काढलाच.
"आई,  आता इतकं बोलतोच आहोत आपण तर एक विचारु?"
"विचार ना, परवानगी कशाला हवी?"
"तुम्ही सगळे पालक ना असं करु नका, तसं करु नका चा सूर लावता नेहमी. मला एक समजत नाही की तुम्ही पालक दारु पिऊ नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका, लग्नाशिवाय शारीरिक संबंध येता कामा नयेत असा धोशा लावता पण मुलांना मोह टाळता आलाच नाही तर त्यांनी काय करायचं ते का सांगत नाही?"
"म्हणजे?"
"पिण्याचे परिणाम काय काय होऊ शकतात, एकावेळी कमीत कमी म्हणजे नक्की किती घ्यावी, सवयीचं व्यसनात रुपांतर कसं होऊ शकतं, ते झालं तर त्याचे शरीरावर होणारे परिणाम, किंवा गाडी चालवू नका, जो गाडी चालवणार असेल तो दारु पिणार नाही याची दक्षता घ्या, शारीरिक संबंधाबद्दल काळजी घेतली नाही तर काय होऊ शकतं, त्यातून निर्माण होणारे रोग अशा कितीतरी गोष्टी तुम्ही सांगत नाही. आम्हाला महाविद्यालयात ही माहिती देण्यासाठी खास तास आणि परीक्षा असते. पण पालकांनी पण बोलायला नको का हे आमच्याशी?"
श्रावणी ऐकत राहिली.  काय करायला नको ची यादी तयारच होती तिच्याकडे पण नाहीच आवरला मोह तर काय खबरदारी घ्यायला पाहिजे ते सांगावं की नाही याबद्दल मन:स्थिती द्विधा होती, आणि किती म्हटलं तरी काही गोष्टी नाही येत इतक्या स्पष्ट बोलता, पोटची मुलं असली तरी. बोलणारा आणि ऐकणारा दोघंही संकोचतातच. त्यामुळेच मनातलं शब्दांवाटे बाहेर येत नव्हतं हेच खरं. ती काहीच बोलली नाही तसं साकेतच म्हणाला,
"तू काळजी करु नकोस. मला हे असं करायला वेळच मिळत नाही."
"आणि कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जातो आपण हे लक्षात ठेवलं की झालं." तिच्या बोलण्यावर साकेत हसला.
"आई तुम्ही कधी कॉलेजमध्ये मजा केलीच नाहीत का?"
"केली ना. पण मजेच्या व्याख्या बदलत जातात स्थळकाळानुसार. पालकांची मानसिकताही बदलते. आणि तू म्हणालास त्याबद्दल विचार करत होते.  तू आत्ता सांगितलंस तसं करणं म्हणजे पालकांना, आपण अशी माहिती देऊन मुलांना उत्तेजन तर देत नाही ना असंही वाटतं."
"पण नुसतं दारु पिऊ नका, मादक पदार्थांच्या आहारी जाऊ नका, कुणाशी शारीरिक संबंध ठेवू नका असं सांगून तरी काय उपयोग? का ते माहीत असलं की मुलं जास्त विचार करतील ना या गोष्टी करताना?"

श्रावणी स्वत:चं  तरुणपण तपासत राहिली. मुलांबरोबर पालकत्वही काळानुसार बदलत चाललं आहे. आपल्या आई वडिलांनी शिस्त, संस्कार दिले. मनातलं त्याच्यांशी बोलू शकतो हा विश्वासही दिला तरी काही गोष्टी सांगायची, विचारायची लाजच वाटायची. ते जे मधलं अवघडलेपण आपण अनुभवलं ते आपल्या मुलांनी नको अनुभवायला असं श्रावणीला वाटत होतं, नाही म्हटलं तरी ते होणारच हे कळत असलं तरी. पण साकेतच्या बाबतीत त्याने स्वत:हून नाही सांगितलं तरी त्याबद्दल विचारलं की तो खरं तेच सांगेल ह्याची तिला खात्री होती. पण तरीही साकेतच्या आजच्या बोलण्यावरुन वाटत होतं की मुलांशी मित्रत्वाचं नातं राखणं आणि त्याचबरोबर पालक म्हणून त्यांनी आपला मान ठेवावा, आदर दाखवावा  असं वाटणं यातली सीमारेषा इतकी धूसर आहे की ती केव्हाही भंग पावेल. पण खरंच ही  सीमारेषा धूसर आहे की तिची व्याख्या  बदलणं, ती समाजमान्य होणं आवश्यक आहे? या प्रश्नाचं उत्तर ज्याचं त्यानं अनुभव घेतच सोडवायचं हेच अंतिम सत्य  असलं तरी श्रावणीचं मन त्या प्रश्नाचं उत्तर शोधत राहिलंच...


2 comments:

 1. खूप सुरेख लेख आहे. त्यातही यातला ' काय करू नये ते सांगणं ' आणि ' करावं लागलं तर काय काळजी घ्यावी हे सांगणं ' हा विचार अधिक महत्वाचा.

  अनेक मराठी ब्लॉगर प्रतिक्रियांची अपेक्षा करतात. पण का कुणास ठाऊक पण मराठी ब्लॉगर आणि रसिक वाचक प्रतिक्रिया देत नाहीत. अभावानच एखादी प्रतिक्रिया मिळते. कदाचित प्रतिक्रिया कशी द्यावी हे ब्लॉगर्स आणि वाचकांना माहित नसेल असं समजून मी काही दिवसांपूर्वीच प्रतिक्रिया कशी द्यावी हा लेखही लिहिला. पण परिस्थिती बदलत नाही. असो आपण चांगलं लिहिती रहावं हेच अधिक महत्वाचं.

  मी मात्रं दररोज पाच ब्लॉगला प्रतिक्रिया देत असतो. आवडले तर आवडले म्हणून आणि नाही आवडले तर नाही आवडले म्हणून. आपण हि हा परिपाठ सुरु करावा.

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद विजय. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ५ प्रतिक्रिया देणं ही कल्पना छान आहे. करेन मी नक्की. प्रतिक्रियांच्या बाबतीत हल्ली मला वाटतं आजकाल लिखाण गुगल, फेसबुक इथेही प्रसिद्ध होत असतं आणि तिथे प्रतिक्रिया मिळत रहातात.

   Delete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.