Tuesday, November 11, 2014

पाश


(मी जवळून अनुभवलेल्या सत्यघटनेवर आधारित कथा . ही कथा मायबोलीच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे.)

"पैकं भरून टाका सायबांचं."

दरडावलेला आवाज ऐकून शरद सावध झाला.
"कोण बोलतंय? आणि हळू बोला. ओरडू नका."

"आमदार निवासात वस्तीला व्हता नवं तुजा भाव. त्यो पैका भरून टाक पटकिनी आसं म्हनतोय मी."

"एकेरीवर येऊ नका आणि आधी कोण बोलताय ते सांगा. माझा भाऊ आमदार निवासात राहत नाही."

"राहात व्हऽऽऽता. तुज्याकडं जो आकडा येईल त्यवडा पैका भरून टाकायचा. 'माजा काई संबंद न्हाई' आसं म्हनायचं नाय. कललं? कललं का नाय तुला मी काय बोलून राह्यलो त्ये?"

"हे बघा, मी पोलिसांकडे तक्रार नोंदवतो तुमची. बसा मग खडी फोडत, म्हणजे समजेल."

"तू माला धमकी द्याया लागला व्हय? आँ? मला धमकी देतो काय? गपगुमान सांगितलं त्ये कर. आन् हा, तुज्या पोराबालांना जपून रहाया सांग. नाय म्हंजी कदी कुनाला अपघात व्हायाचा येकादा. आता येल काय सांगून येतीया व्हय?"

शरदनं फोन आपटला आणि संतापानं तो तिथल्या तिथे येरझारा घालत राहिला. काही सुचेना तसं बाजूला पडलेलं वर्तमानपत्र त्यानं पुढ्यात ओढलं. डोळे अक्षरांवरून फिरत होते पण मनात धमकीचे शब्द घुमत होते, दादाबद्दल विचार येत होते. दादानं लावला असेल का कुणाला तरी हा फोन करायला? दादाची इतकी दुर्दशा खरंच कशी झाली आणि कधी? घरातल्याच माणसांना छळून, त्रास देऊन हा काय साध्य करतो आहे?

त्याच्याचमुळं अकाली प्रौढत्व आलं माथी. कायमचं. मोठ्या मुलाच्या ज्या काही जबाबदार्‍या दादानं निभावायच्या त्या येऊन पडल्या अंगावर. काही आपसूक, काही स्वत:हून ओढवून घेतलेल्या. आणि आतातर अगदी दादाचीसुद्धा. नातं नाकारलं तरी ते बंध तोडता येत नव्हते. त्याची कर्मं निस्तरतानाही काचलेला दोर पूर्ण तुटू नये असंच वाटत राहिलं कायम. उसवलेले धागे जोडणं चालूच राहिलं. पाश नाकारताच आले नाहीत. पण आज दादानं टोक गाठलं. नाही जमणार आता. दादाच्या वागण्याचे रागलोभ वाटण्यापलीकडे त्याचं वागणं जात चाललं आहे. याच मुलाचं घराण्याचा कुलदीपक म्हणून काय कौतुक व्हायचं. त्यात तो परदेशी गेलेला पहिलाच मुलगा तळेकरांच्या घरातला. त्या काळी, जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी.

धोपेश्वरची घाटी चढून येणार्‍या दादाकडे अंगणात उभं राहून घरातली सगळी मुलं उत्सुकतेनं पाहत होती. घाटी चढून आलं की जेमतेम आठ-दहा घरांची वाडी. शेजारीपाजारी सगळे तळेकरच. असं ना तसं काहीतरी प्रत्येकाशी नातं एकमेकांचं. सगळ्यांच्याच घरांमधून उत्सुक नजरा बाहेर खिळल्या होत्या. पांढरंशुभ्र धोतर नेसून आप्पा व्हरांड्यात लाकडी दांड्याला धरून उभे होते. सुनेची आणि लेकाची वाट पाहणार्‍या आप्पांच्या चेहर्‍यावर प्रसन्न हसू होतं. माई हातात मीठमोहर्‍या घेऊन उभी होती. वैजू नवीन फ्रॉक घालून मिरवीत होती. दादा आणि वहिनीची पुसटशी आकृती लांबवरून दिसली. मुलं पायर्‍या उतरून अंगणात नाचायला लागली, दादाच्या नावानं त्यांनी आरोळ्या ठोकायला सुरुवात केली. "अरे, दम धरा रे पोरांनो", असं दटावणीच्या स्वरात पुटपुटत आप्पा पुढे झाले. कपाळावर आडवा हात धरून डोळ्यावर येणारं ऊन लपवीत घाटीच्या दिशेने पाहत राहिले. दादावहिनी गड्याच्या मागून धापा टाकत चढ चढत होते. गड्याच्या डोक्यावर दोन-तीन बॅगा एकावर एक चढवलेल्या आणि दोन हातात दोन पिशव्या अडकवलेल्या. सामानाकडे पाहायचं की दादा आणि वहिनीकडे तेच मुलांना समजेनासं झालं होतं. बरीच वर्षं परदेशात राहिलं की रंग गोरा होतो असं सगळ्यांनी ऐकलं होतं. सहा वर्षांनी दोघं भारतात येत होते. दादावहिनीला भेटायला, पहायला सगळेच उतावळे झाले होते.

दोघं अगदी दाराशी येईपर्यंत उत्सुक डोळे त्यांच्यावर रोखले होते. वैजू उगाचच लाजत वहिनीच्या बाजूला जाऊन उभी राहिली. रमाकांत मोठाले डोळे करून दादाकडे पाहत होता. माईने मीठमोहर्‍या ओवाळून टाकल्यावर दोघं आत आली. हातपाय धुऊन त्यांचा चहा होईपर्यंत दोघांच्या हालचालींचा वेध घेत सगळी कसंबसं इकडेतिकडे करत राहिली. चहाचे कप खाली ठेवल्या ठेवल्या दोघांभोवती घर जमा झालं.

वहिनी बॅगा उघडून आणलेल्या भेटवस्तू ज्याच्या त्याच्या हाती सोपवत होती. वैजू तिच्यासाठी आणलेले सुंदर फ्रॉक पाहून हरखली. रमाकांत, शरदसाठी शर्ट आणि घरासाठी रेडिओ. माई, आप्पा रेडिओ लावून बसले. नवीन कपडे घालून सगळी मुलंही त्याभोवती कोंडाळं करून बसली. थोड्याच दिवसांत नव्याची नवलाई संपली पण रेडिओची मात्र सर्वांना इतकी सवय झाली की सकाळच्या बातम्या, संध्याकाळचे कार्यक्रम, रात्रीच्या श्रुतिका, भाषणं - काही ना काही ऐकायला सगळेजण रेडिओभोवती रोज कोंडाळं करून बसायला लागले. दादा आणि वहिनी धोपेश्वरला असेपर्यंत कॅनडाबद्दल किती आणि काय ऐकू असं होऊन गेलं होतं सार्‍यांना. तिकडच्या हिमवृष्टीबद्दल तर कोण कुतूहल होतं सगळ्यांच्याच मनात. दादावहिनींनी कॅमेर्‍यात बंदिस्त केलेले क्षण पाहताना सगळे रंगून गेले. कॅनडाचं चित्र प्रत्येकानं दादावहिनीकडून ऐकलेल्या वर्णनांनी आपापल्या मन:पटलावर रेखाटलं, कायमचं बंदिस्त केलं.

दादा परत आला होता तो कायमचा. पुन्हा कॅनडात न जाण्याचं ठरवून. आता तो कोल्हापूरला स्थायिक होणार होता. आल्या आल्या त्यानं रमाकांत, वैजू, शरद यांच्याबद्दलचे बेत ठरवायला सुरुवात केली. शरद शिक्षणासाठी रत्नागिरीला होताच. वैजूचं लग्न आणि रमाकांतचा महाविद्यालयीन खर्च दादा करणार होता. माईआप्पांनी धोपेश्वर सोडावं, कोल्हापूरला यावं असा आग्रहच त्यानं धरला, तो मात्र आप्पांनी पूर्ण केला नाही. ते दोघं धोपेश्वरलाच राहिले.

दोन-तीन वर्ष भर्रकन गेली. शरद शिक्षण संपवून कमवायला लागला. चिपळूणला स्थायिक झाला. वैजूचं लग्न झालं, रमाकांतचं शिक्षण पूर्ण होऊन तोही नोकरीला लागला. माईआप्पा खूश होते. अधूनमधून दादाकडे, शरदकडे जाऊन रहात होते. या सगळ्याला खीळ बसली ती वैजूच्या आलेल्या पत्रानं.

आप्पांचा त्या पत्रावर काही केल्या विश्वास बसेना. येऊन जाऊन तर होते सारेजण दादाकडे. मग कधी शंका कशी आली नाही? आणि आता आतातर दादा आला होता कॅनडाहून. तो इथे स्थिर झाला, भावंडांनाही त्यानंच मार्गी लावलं, आता प्रपंचातून मुक्त व्हायचं असे मनसुबे रचत असताना हे काय अचानक? परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा ते सुचेना तसं माई, आप्पा पत्र घेऊन चिपळूणला आले. आजही ते पत्र शरदला जसंच्या तसं आठवत होतं.


ती. आप्पा आणि माई,
शि. सा. न. वि. वि.
माझं पत्र पाहून आश्चर्य वाटेल. कितीतरी दिवस येऊन जायचा विचार करते आहे पण जमलं नाही. या वेळेला पत्र लिहिणं अवघड वाटतं आहे. तुमच्या मनाला त्रास होईल असं काही लिहू नये असं वाटतंय पण इलाज नाही. दादाबद्दल लिहायचं आहे. कशी सुरुवात करू आणि काय लिहू तेच समजत नाही. वहिनीनं मला चांगलंच तोंडघशी पाडलंय.

मध्यंतरी दुकान अगदीच चालेनासं झालं होतं. पुढे काय ह्या चिंतेत असतानाच हे कोल्हापूरला कामाकरता गेले होते, तेव्हा दादाची भेट झाली. बोलण्याबोलण्यातून आमच्या परिस्थितीचा अंदाज आला दादाला. दादानं मदतीचं आश्वासन दिलं. मध्ये एकदा तो ओणीला येऊन गेला. वहिनीदेखील आली होती. सकाळी येऊन संध्याकाळी परत गेले दोघं. वहिनी निघताना म्हणाली की मी जर माझे सोन्याचे दागिने दिले तर ती तीन महिन्यात दुप्पट करून देईल. मला आश्चर्यच वाटलं पण तिनं मला अगदी सविस्तर पटवून दिलं. ती हे कसं करणार आहे त्याबद्दल सांगून उदाहरणं दिली. विचार करून मी आधी एक सुंकलं होतं ना माझं शाळेत असल्यापासूनचं, ते दिलं. म्हटल्याप्रमाणे दुप्पट सोनं मला तिनं अगदी महिन्याभरातच दिलं. तीच आली होती घेऊन. मी तिलाच ते सोनं विकून पैसे घेतले. खूप आनंद झाला. दुकानाला मदत झाली ना! जाताना मी तिला माझे लग्नातले दागिने दिले. जवळजवळ सात तोळे सोनं. चौदा तोळे सोनं मिळेल ते आधीसारखंच वहिनीलाच विकायचं, त्या पैशामुळे दुकान फार पटकन उभं राहील पुन्हा, असा विचार केला.

आज या गोष्टीला सहा महिने होऊन गेले. मी तिला पत्रं पाठवून थकले. प्रत्येक पत्राचं उत्तर येतं लगेच. त्यात असतात भरघोस आश्वासनं, माझ्याबद्दलची चिंता, वहिनी मला कशी मदत करतेय त्याबद्दलची खात्री. माझ्या मनात भीतीनं घर केलं आहे. ह्यांना मी हे अजून सांगितलेलं नाही. आप्पा, हे लिहितानाच माझ्या डोळ्यांसमोर तुमचा चेहरा येतोय. मी ह्यांना का नाही सांगितलं हा प्रश्न पडलाय ना तुम्हाला? वहिनीनं चार-चार वेळा बजावून सांगितलं होतं की तिने हा व्यवसाय नव्यानेच सुरू केला आहे, नवखी आहे ती यामध्ये, त्यामुळे लगेच कुठे बोलू नये मी. 'काम झाल्याशिवाय कुणाकडेही, अगदी ह्याच्यांकडे देखील बोलू नकोस' असं पुन्हा पुन्हा तिने सांगितलं त्यामुळे मी गप्प राहिले. आता मी काय करू? सगळे मार्ग संपल्यासारखे वाटतायत. वहिनीला मी हेदेखील लिहिलं होतं की दुपटीचं वगैरे जाऊ देत. तू मला फक्त माझे दागिने परत कर. आता जानेवारी जवळ आला आहे. संक्रांतीला अंगावर दागिने दिसले नाहीत तर ह्यांच्या लक्षात येणारच. काय उत्तर देऊ मी? दादालासुद्धा लिहिलं मी पत्र. तो म्हणतो तुझी वहिनी शब्द पाळेल. एवढंच दरवेळेस. मला सांगा नं काय करू मी?

तुमची,
सौ. वैजू.

पत्र वाचून शरदलाही आश्चर्य वाटलं, धक्का बसला. आप्पांशी बोलून त्यानं लगेच हालचाली करायला सुरुवात केली. रमाकांतला पत्र पाठवून कोल्हापूरला यायला सांगितलं. शरद आणि रमाकांत एकदमच कोल्हापूरला जाऊन पोचले. वैजूही ओणीहून कोल्हापूरला आली. सर्वांना अचानक पाहून दादावहिनीला आश्चर्य वाटलं पण खूप आनंदही झाला. काय करू नं काय नको असं होऊन गेलं. त्यांच्या आनंदात तिघांना सहभागी होणं जमत नव्हतं आणि दागिन्यांचा विषय काढणं अवघड वाटत होतं.

शेवटी दोन-तीन दिवस गेल्यावर दुपारची जेवणं झाली आणि रमाकांतनं विषय काढला.

"दादा, आम्ही खरंतर एका कामासाठी आलो आहोत तुझ्याकडे."
"अरे, मग इतका वेळ वाट कशाला पाहिली? आल्या आल्या सांगायचं ना."
"वहिनीनं वैजूला तिचे दागिने दुप्पट करायचं वचन दिलं होतं."
"बरोबर. ती करणारच आहे ते. काय गं?"
"हो, म्हणजे आज करतेच मी ते काम." वहिनीनं हसून उत्तर दिलं.
"नक्की काय करणार आहेस तू वहिनी? असे दागिने दुप्पट वगैरे नाही करता येत."
"येतात. कॅनडात होतो आम्ही तेव्हापासून एका माणसाला ओळखत होतो. तोही इथे आला आहे कायमचा. मी माझेही दागिने घेतले आहेत ना दुप्पट करून त्याच्याकडून."
"आम्ही दोघं येतो बरोबर. त्या माणसाची भेट घडवून दे." रमाकांत म्हणाला.
"मी जाऊन येते आज आणि कधी भेटायला येऊ ते विचारते. वेळ ठरवून गेलेलं बरं."
"फोन कर ना. दोन-दोन खेपा कशाला? नाहीतर एकत्रच जाऊ आपण." शरदला वहिनीचा उत्साह पाहून चीड येत होती.
"नाही, मला त्या बाजूला मैत्रिणीकडे जायचं आहे. आधी विचारून ठेवते तो माणूस घरी कधी असेल ते आणि मग जाऊ एकदम."
सगळे गप्प राहिले. वैजूनं मात्र वहिनीबरोबर जायचा हेका धरला पण नाना कारणं देत तिलाही थोपवलं वहिनीनं.

वहिनी आणि दादा एकदमच बाहेर पडले. वैजू, रमाकांत, शरद दिवसभर त्यांची वाट पाहत घरात बसून. कंटाळलेल्या, वैतागलेल्या शरदनं वैजूवर आगपाखड केली.
"तू काय अक्कल गहाण टाकली होतीस का दागिने देताना? असे दुप्पट होऊन मिळाले खरंच तर सगळ्या जगानं हेच नसतं का केलं?"
"चुकलं माझं. पण गरज आहे रे पैशांची आम्हाला. वहिनी, दादा मला फसवतील अशी पुसटशी शंकादेखील आली नाही."
"मुळात या दोघाचं हे काय चालू आहे? दागिने दुप्पट करून वहिनीला काय मिळत असेल? पैसे? किती? आणि करायचा काय असा मिळवलेला पैसा? इतकी वर्ष कॅनडात होते तर आर्थिक परिस्थिती व्यवस्थित असणारच ना?" रमाकांतला दादा आणि वहिनी असं का करत आहेत तेच कळत नव्हतं.

"त्यांनाच विचारायला हवं. दोघांनींही काढता पाय घेतलेला दिसतोय. संध्याकाळ व्हायची वेळ आली. आपण बसू भजन करत." शरदला दादाची भयंकर चीड येत होती.

दार वाजलं तसं वैजू उठली. दोघं आले असावेत परत असंच वाटलं तिघांना.
"तळेकर पाहिजे होते." दारात अपरिचित गृहस्थ उभे होते. बरोबर एक स्त्री. बायको असावी.

"ते नाहीत घरी. काही काम होतं?" शरद पुढे झाला.
"तुम्ही कोण?"
"मी भाऊ त्यांचा. कोण आलं होतं म्हणून सांगू दादाला?"
"आम्ही आत आलो तर चालेल का? तुमच्याशी बोललं तर..."
"या ना." शरद बाजूला झाला तसं ते जोडपं आत आलं. अस्वस्थ हालचाली करत उभं राहिलं. रमाकांतने दोघांना बसायचा आग्रह केला.
"सांग आता त्यांना, काय झालं ते. म्हणजे आम्ही काही तुमच्या भावाची तक्रार करत आहोत असं नाही पण..." ते गृहस्थ खुर्चीवर बसत म्हणाले.
"माझा स्वेटर, जॅकेट, पर्स बनविण्याचा व्यवसाय आहे. तळेकर वहिनी म्हणाल्या, तिकडे कॅनडात याला खूप भाव मिळेल. २०,००० रुपयांचा माल तयार करून मागितला. १०,००० रुपये दिले. उरलेले पंधरा दिवसांत देते असं सांगून सगळा माल घेऊन गेल्या. पैसे अजून आलेच नाहीत. चांगल्या ओळखीच्या म्हणून मी असा माल दिला. नाहीतर चुकूनसुद्धा पैसे मिळाल्याशिवाय मी काही हातात ठेवत नाही. फसवलं हो चांगलंच."
"इतक्या चकरा मारल्या हिने. दारच उघडत नाहीत. रोज रडत घरी येते. सुरुवातीलाच मला विचारलं असतं तर ओळख पाळख बाजूला ठेव म्हटलं असतं. कंटाळून शेवटी मी आलो आज. तुम्ही नसता तर सरळ पोलिसचौकीत जाणार होतो."
शरदनं त्यांचं नाव, फोन नंबर लिहून घेतला. दादाला निरोप देण्याचं आश्वासन दिलं तसं ते दोघं निघून गेले.

"चला, वैजू तू एकटीच नाहीस अडकलेली यात समाधान मान आता. आहेत तुझ्यासारखी मूर्ख माणसं." रमाकांत म्हणाला तशी वैजू चिडली.
"रम्या, तू जास्त शहाणपणा करू नकोस. मी चुकले हे मान्य केलंय ना. आता काही मदत करता येते ते पाहणार आहेस की मला मूर्ख ठरवण्यात आनंद मानणार आहेस तू?"
"हे दोघं कॅनडाला जाऊन हेच कौशल्य शिकून आले की काय?" शरदच्या प्रश्नावर रमाकांत हसला.
"स्मगलिंग तर नसतील ना करत? त्यात कुठेतरी फसले असतील. आता सगळं निस्तरायला पैसे पाहिजेत. मग घाला टोप्या अशा ज्याला त्याला."
"काय असेल ते असेल. पण सख्ख्या बहिणीला असं लुबाडायचं? वहिनीतर इतकी प्रेमळ. दादापेक्षा ती जवळची वाटायची. कधी शंका पण आली नाही ती फसवेल अशी." वैजूला आता रडायलाच यायला लागलं होतं.
"बोलून पाहू दादा आणि वहिनीशी दोघं एकत्र असताना. त्यांना पैशाची मदत हवी असेल तर ती करू. पण थांबवा म्हणावं हे आता. आज ते जोडपं आलं. अजून कुणाला फसवलं असेल तर? तळेकरांच्या नावाला चांगलंच काळं फासणार हा दादा." शरदचा संताप संताप होत होता.

संध्याकाळी काळोख पडता पडता दोघं घरी आले. शरद वाटच पाहत होता.
"दादा, अरे काय हे. सकाळी बाहेर पडलेला तू. आत्ता परत येताय दोघं. काय दागिने घडवून आणलेत की काय?"
"हे बघ शरद, चिडू नकोस तू. उद्यापर्यंत वैजूचे दागिने देतो परत. मग तर झालं?"
"अरे, आज आणणार होतास ना? आता उद्यावर गेलं. कोणाकोणाच्या तोंडाला अशी पानं पुसली आहेस रे?"
"कुणाच्याही नाही. असे भलते सलते आरोप करू नकोस."
"एक जोडपं येऊन गेलं मगाशी. त्यांनी जे सांगितलं त्यावरून तरी तसंच वाटलं."
"कोण आलं होतं?" वहिनीच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह होतं.
"वैजूसारखं आणखी कुणीतरी. फसलेलं तुझ्या गोड बोलण्याला."
"शरद, आम्ही कुणालाही फसवलेलं नाही. देणार आहोत वैजूचे दागिने." वहिनीनं शरदच्या कडवट स्वराकडे दुर्लक्ष करत म्हटलं.
"कधी? किती दिवसांनी? वैजूला पैशाची नड आहे हे माहीत असूनही दागिने घेतलेत. आणि दादा, तू पण वहिनीला सामील आहेस का?"
"सामील? आम्ही काही कुणाला फसवण्याचा घाट घातलेला नाही. उद्या वैजूचे दागिने करू परत." दादानं शांतपणे सांगितलं.
"आणि त्या जोडप्याचे पैसे?"
"त्यांची काळजी तुला कशाला? बोलेन मी त्याच्यांशी आणि देईन त्यांचे पैसे त्यांना. खरंच दुप्पट दागिने दिसले की स्वत:चे घेऊन येऊ नका म्हणजे झालं."
"काय वेड लागलेलं नाही आम्हाला. वैजूचे दागिने परत मिळेपर्यंत आम्ही रहातो इथेच." रमाकांत ठामपणे म्हणाला. वहिनी एकदम रडायलाच लागली.
"तू कशाला रडतेस वहिनी? आम्ही राहू नये इथे असं वाटतंय का?" रमाकांतला वहिनीच्या अचानक हुंदके देऊन रडण्याचं कारणच समजेना.
"रहा रे. घरचीच तर आहात सगळी. पण आपलीच माणसं आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत याचं वाईट वाटलं. घरातलेच असं वागतात मग बाहेरच्यांनी टोकलं तर काय नवल. एक हे तेवढे माझ्या बाजूनं ठाम उभे आहेत." डोळ्याला पदर लावत वहिनी पुन्हा रडायला लागली तसा शरदचा तोल ढळला.

"दादा तुझ्या बाजूनं उभा आहे की तुला सामील ते कळायचं आहे वहिनी. आणि स्वत:च्या नणंदेला लुबाडलंस तेव्हा विसर पडला का तुला आपल्या माणसांचा? कमाल आहे, गेली सहा वर्ष घरात, नातेवाइकांमध्ये कोण कौतुक चालायचं तुमच्या परदेशी असण्याचं. आमच्या दृष्टीनं तुम्ही दोघं हीरो होता आणि परत आल्यापासून काय चालवलंय हे तुम्ही? तळेकरांच्या नावाला काळिमा नाही फासलात म्हणजे मिळवली."

"शरऽऽऽद!" दादा जोरात ओरडला तसा शरद एकदम गप्प झाला.
"काळिमा फासला म्हणे! काळिमा फासायला तळेकरांच्या घरातल्यांनी काय अटकेपार झेंडे फडकवले आहेत?"
"नाही, अटकेपार झेंडे नाही लावलेले पण अब्रूचे धिंडवडे निघतील असंही कुणी वागलेलं नाही आत्तापर्यंत. ते तू करणार असं दिसत आहेच. नाहीतर वहिनी."
"गप्प बस रे. मोठी वहिनी आहे ती तुमची! आणि काय सारखं तिला बोलताय दोघं? वैजूचे दागिने आहेत ना, मग त्या दोघी बघतील काय ते. मोठा भाऊ, वहिनी म्हणून आदर दाखवायचा सोडून बोलताय आपलं तोंडाला येईल ते." दादा तडतड करत तिथून उठला.

चार दिवस राहूनही दागिने परत मिळाले नाहीत. शरद, रमाकांतचा वहिनी आणि दादाच्या साळसूदपणामुळे अंगाचा तिळपापड होत होता, वैजूच्या मुळूमुळू रडण्याचा वैताग यायला लागला होता. शेवटी तिघं आपापल्या मुक्कामी रवाना झाले. शरद मात्र चिपळूणला न जाता धोपेश्वरला गेला. जे काही कोल्हापूरला घडलं ते त्यानं माईआप्पांच्या कानावर घातलं. कितीतरी वेळ शरद काय सांगतो आहे त्यावर आप्पांचा विश्वास बसेना. ते निराश झाले. हताश होत रेडिओवर चालू असलेलं मंद संगीत बटण पिरगाळीत त्यांनी खाडकन बंद केलं.

"मसणात घाला ह्या दादाने आणलेल्या गोष्टी. फॉरेनात जाऊन हेच शिकून येतात की काय? माझ्या हयातीत आपल्या घरातलं आजपर्यंत कुणीही असं वागलेलं नाही. शरद, आता सगळा भरवसा तुझ्यावर. तूच सांग काय करायचं? नाहीतर असं करू. जमिनीचा एक तुकडा विकून टाकतो. वैजूकडे जाऊन परिस्थितीबद्दल स्पष्ट बोलतो. जावईबापूंची मी वैजूच्या वतीनं माफी मागतो. तिच्या स्त्रीधनाचे पैसे देऊ आपण जावईबापूंना. उपयोगही होईल दुकानासाठी. बाकी उरतील ते दादाकडे देऊ."

बोलता बोलता आप्पा थांबले. क्षणभर विचार करून म्हणाले, "नको, त्याच्या हातात नको द्यायला पैसा. त्याच्याबरोबर जाऊ प्रत्येकाच्या घरी. झाल्या प्रकाराची माफी मागू आणि देणं देऊन टाकू. पण लोकांचे शिव्याशाप नको रे आपल्याला. इतकी वर्ष सचोटीने काढली. दादानं धुळीला नको मिळवायला आपलं नाव."

"अहो, आपण दोघं जाऊ या का कोल्हापूरला? काहीतरी अडचणीत सापडले असणार दोघं. तुम्ही धीर द्या. आधार देऊ याची खात्री द्या. मग बोलतील पोरं, मोकळी होतील."

माईच्या बोलण्यावर शरदनं मान डोलावली.
"पहा प्रयत्न करून. आम्ही हरलो. काही नाकारतही नाही आणि परतही देत नाही. तुमच्याशी बोलतील कदाचित मोकळेपणानं." कोल्हापूरला कधी जायचं ते ठरवून शरद चिपळूणला गेला.

ठरल्याप्रमाणे चार दिवसांनी माईआप्पांना घेऊन तो कोल्हापूरला पोचला. दादा हरखलाच दोघांना पाहून. बरोबर शरदला पाहिल्यावर मात्र त्याला कल्पना आली. पण तसं जाणवू न देता त्यानं तिघांचं स्वागत केलं. माईआप्पा अवघडून बसले.

"माई, तुमच्याच घरी आला आहात. आता एक-दोन महिने मस्त आराम करा. आप्पा, तुमच्यासाठी ढीगभर पुस्तकं आहेत वाचायला. वेळ कसा जाईल ते समजणार नाही. रंकाळा आपल्या घराच्या अगदी जवळ आहे. आजच घेऊन जाईन म्हणजे रोजच्या रोज चक्कर मारायला जाता येईल तुमचं तुम्हाला." दादानं हक्कानं सांगितलं. पुन्हा तेच. दोघं इतकी लाघवीपणाने बोलत होती की विषय कसा काढावा तेच माईआप्पांना कळेना.

चहाचा घोट घेत शेवटी आप्पा म्हणाले, "बाबा रे, आम्ही विश्रांतीसाठी नाही आलेलो. तुमचं दोघांचं जे काही चाललं आहे ते ऐकून राहावलं नाही म्हणून आलो. काय ऐकतोय मी दादा तुम्हा दोघांबद्दल? हे बघ, कशात काही अडकला असशील तर सांग लगेच. मी येण्यापूर्वी जमीन विकण्यासाठी गिर्‍हाइक पाहून आलेलो आहे. किती पैसे देणं आहेस?"

"शरदनं चांगलं काम केलेलं दिसतंय. काय रे, इथून गेलास ते धोपेश्वर गाठलंस ना? कशातही अडकलेलो नाही आम्ही. सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही काळजी करू नका. वैजूला तिचे दागिने लवकरच देऊ कबूल केल्याप्रमाणे." पुन्हा पुन्हा वहिनी आणि दादानं आश्वासन दिलं. शेवटी माईआप्पांनी विश्वास टाकला आणि काही दिवस कोल्हापूरला विश्रांतीसाठी रहाण्याचंही ठरवलं. शरद चिपळूणला परत आला.

ती माईआप्पांची शेवटची खेप बहुधा कोल्हापूरची. त्यानंतर दादा आणि वहिनीनं कोल्हापूरच सोडलं. माईला दादाचा ठावठिकाणा शोधून काढायचा ध्यास लागलेला. आल्यागेल्याला ती दादाबद्दल विचारत राही. धोपेश्वरला आलेल्या देणेकर्‍यांच्या तगाद्यांनी आप्पा खचले, अचानक दहा वर्षांनी म्हातारे दिसायला लागले, एकेकाची देणी फेडत राहिले. शरद आणि रमाकांत आपल्या परीने त्यांना कधी विरोध करत राहिले, तर कधी न रहावून मदत.

त्या दिवशी गणपतीच्या निमित्तानं सारे जमले होते. पाच दिवस म्हटलं तर कसे गेले हेही समजलं नाही. आरास रचण्याची गडबड, बेंबीच्या देठापासून ओरडून आरत्या म्हणण्याचा खटाटोप, संध्याकाळी चहा पिऊन झाल्यावर रवळनाथाच्या दर्शनाला जाणं, पडवीत पत्त्यांचा अड्डा जमवणं असं सगळं चालू असलं तरी प्रत्येकाच्या मनात विचारांची खळबळ होती. विसर्जन झालं, जेवणं आटोपली आणि सुपारी कातरत आप्पा अंगणातल्या बाजेवर पायाची घडी घालून बसले. एकेक करून सगळीच आजूबाजूला येऊन बसली. माईंनी दुधाचा कप आप्पांच्या समोर धरला.

"घर अगदी भरून गेल्यासारखं झालं हो आज. छान वाटलं. दादा आला असता तर जिवाला शांतता लाभती." बाजूच्या पायरीवर टेकत माई म्हणाल्या.

"आम्ही सर्व आहोत त्यात आनंद मान ना माई." वैजू म्हणाली तसं आप्पांनी चमकून तिच्याकडे पाहिलं.

"नाहीतर काय? त्या दादाला नाही कुणाची फिकीर आणि हिचा आपला सतत दादाच्या नावाचा जप. आप्पा, अनायसे माईनेच विषय काढला आहे दादाचा तर माझ्या मनातलं बोलतेच आता." वैजूचा स्वर, आवेश पाहून ती आता आणखी काय सांगणार या शंकेनं आप्पांचा जीव धास्तावला. सगळेचजण शांत झाले.
"आप्पा, दादा तुमचा मुलगा आहे, त्यासाठी तुमचा जीव तुटणार हे ओघानं आलंच पण जमिनीचा एक तुकडा विकू म्हणता म्हणता फक्त एक तुकडाच तुमच्यासाठी शिल्लक राहिला असं होऊन जाईल. मी माझ्या दागिन्यांवर कधीच पाणी सोडलंय. माझ्या घरच्यांचीही तुम्ही काळजी करू नका. घेतले का ह्यांनी पैसे तुम्ही घेऊन आलात तेव्हा? पण आता हे अपराधीपण सोडा. त्या दोघांच्या वागण्याला स्वत:ला जबाबदार धरू नका. दादावहिनीने काहीही संबंध ठेवलेला नाही आपल्याशी तर का तुम्ही त्यांची देणी फेडताय? आधी वाईट वाटायचं पण तुम्ही असे परिस्थितीला शरण जाताय ते बघून राग येतो आता मला. काढून टाका ना आपल्या आयुष्यातून दादाला आता. खूप झालं. भोगला एवढा त्रास पुरे झाला." वैजू काकुळतीने विनवीत होती. गणपतीच्या निमित्तानं सारी भावंडं जमली होती ती ह्या विषयाचा सोक्षमोक्ष लावायचा ठरवूनच.

"आपलेच दात आपलेच ओठ, पोरी. तुझ्या घरचे मोठ्या मनाचे. पण बाकीच्यांचे तळतळाट आपल्या घराण्याला नकोत म्हणून करतोय हे सारं."
"कशाला पण? सगळीकडे तुमचं किंवा आमचं नाव-पत्ता देणार हा दादा पण त्याचा ठावठिकाणा कळू देतोय का? आणि आपल्या परीनं आपण केले प्रयत्न. आता बास." शरद न रहावून बोलला.
"मध्ये दोघं माझ्याकडे रहायला आली होती." रमाकांतच्या बोलण्यावर सगळ्यांनीच चमकून त्याच्याकडे पाहिलं.
"हो, खरं सांगतोय. मलाही दया आली. रहायला जागा नाही. रेल्वेस्टेशनवर झोपतो रात्री असं वहिनी डोळ्यात पाणी आणून सांगत होती. रहावलं नाही मला."
"अरे, मग आहेत कुठे आता? घेऊन यायचंस ना दोघांना." माईच्या स्वरातला ओलावा जाणवला तसा वैजूचा राग उफाळून आला.
"हेच. आपलं हळवेपण घात करतं आहे आपला आणि त्यांचाही. आता इतकं बोलले मी, एवढं ऐकते आहेस आणि तरी निघालीस लगेच धोपेश्वरला बोलवायला. तू सुद्धा कमाल केलीस रमाकांत. कशाला ठेवून घेतलंस?"
"अगं, सख्खा भाऊ आहे तो आपला. वहिनीनं खूप लाड केले आहेत आपले आपण लहान असताना. ते सगळं आठवलं म्हणून एक-दोन दिवस रहा म्हटलं पण त्याआधी शरदशी बोललो."
"हो. मी पण म्हटलं राहू दे. पण तिथेही पुन्हा रंग दाखवलेच त्यांनी आपले."
"काय केलं?" आप्पांच्या आवाजाला कंप सुटला.
"रमाकांतच्याच घरातलं सामान चोरीला जायला लागलं."
"हद्द झाली दादापुढे. हे आपलंच रक्त आहे ना हो?" आप्पांच्या आवाजातली असहायता शरदचं काळीज चिरून गेली.
"रमाकांतनं मग त्यांना तिथून जायला भाग पाडलं." शरदनं पटकन म्हटलं.
"आता कुठे आहेत?" माईने विचारलं आणि रमाकांत चिडला.
"कमाल आहे माई तुझी. तोंडाला काळं फासलं आपल्या. आपण सारेच निस्तरतो आहोत त्यांचे उद्योग. आप्पांवर तर कफल्लक व्हायची वेळ आणली आहे त्यानं आणि तरी माई, तुला ते कुठे आहेत ह्याची चिंता पडली आहे?"

"ओरडू नकोस रे असा. आत्ता वैजूनं फटकारलं. आता तू. चुकलंच माझं. पोटचा गोळा आहे रे बाबांनो शेवटी. येते माया आड. विचार करत रहाते, बाबा काय चुकलं आमचं? पाठवायला नको होतं की काय परदेशात? आणि काही चुकलं असेल तर मग तुम्ही सगळी कशी व्यवस्थित आहात? कितीतरी वेळा वाटतं, की तो गुंतला ह्यात त्याच्या बायकोमुळे. पण मग हा गप्प का रहातो ते समजत नाही. कुठल्या जन्माचं पाप भोगतो आहोत आम्ही कोण जाणे. अब्रूनं राहिलो आतापर्यंत आणि आता काय वेळ आणली आहे या मुलानं. पण नाळ नाही रे तुटत. काळजी वाटते, प्रश्न पडतात. पुन्हा हे विचारायची भीती. चिडता ना तुम्ही सगळेच. तुम्हाला आमच्या पोटातलं ओठावर आणलं त्याचा इतका त्रास होत असेल तर आता नाही हो नाव काढायची दादाचं." माईनं एकदम पड खाल्ल्यावर कुणाला काय बोलावं ते सुचेना. पण रमाकांतनंच सूत्रं हातात घेतली.

"खरंच आता सोडा त्याचं नाव. तुम्हालाच त्रास होतो. मानसिक, आर्थिक दोन्ही बाजूंनी. आणि वहिनीला एकटीला का दोष देता? आपला तो बाब्या असं नका करू. यामध्ये दोघांचाही तितकाच हात आहे. जे काही चाललं आहे त्यावरून आपलंच नाणं खणखणीत असल्याचा दावा करण्यात काही अर्थ नाही. आपल्याला माहीत होता तो हा दादा नाही. किती खेपा मारल्या, दोघांना बोलतं करायचा प्रयत्न केला. वहिनीच्या माहेरच्यांनी पण काय कमी प्रयत्न केले का? पण दोघंही दाद देत नाहीत. एखाद्याला चिखलात रुतायचंच असेल तर नाही गं बाहेर काढता येत माई. आपलाच पाय त्यांच्याबरोबर खोलात जातो, चिखल अंगावर उडायला लागतो..."

रमाकांतचं बोलणं तोडत आप्पा म्हणाले, "मी बोलत नाही म्हणून चिडता. ती बोलते म्हणूनही तिच्यावर चिडता. काय असं वागता रे आमच्याशी? आता एकदा आमची दोघांची बाजू सांगूनच टाकतो. दादाबद्दल सांगता, तक्रारी करता तेव्हा अपराधी वाटतं, त्रास होतो. वाटतं, आपल्या ह्या दिवट्यामुळं बाकीच्या मुलांना का हा त्रास, व्याप? भाऊ झाला म्हणून तुम्ही किती आपलं नुकसान करून घ्यायचं? आता खरंच कंटाळा आला आहे या परिस्थितीचा. रात्ररात्र डोळा लागत नाही. विचार पाठ सोडत नाहीत. रक्तातूनच आलं आहे की काय हे असं वागणं या शंकेनं आपल्या घरात कुणी असं पूर्वी वागलं होतं का याची मन सतत चाचपणी करत रहातं. बाहेर तोंड दाखवायची तर सोयच राहिलेली नाही. कुठेही गेलं की दादाची चौकशी असतेच नातेवाइकांच्या घोळक्यात. आपल्या अगदी जवळच्या नातेवाइकांना तो कुठल्याशा देवळापाशी भेटायला बोलावतो आणि ते जातात. बरं त्यांना दोष काय देणार? त्यांना काही ह्या गोष्टींची झळ लागलेली नाही. त्यानं बोलावलं, भेटावंसं वाटलं म्हणून गेलो भेटायला म्हणतील. खाजवून खरूज काढल्यासारखं करतात रे. फाजील उत्सुकता दिसते बोलण्यातून, डोकावते डोळ्यांतून. आव मात्र असतो काळजीचा. थकलो आता. तुम्हीच सांगा काय करायचं ते." आप्पा बोलायचं थांबले. शरद आणि रमाकांतनं एकमेकांकडे नजर टाकली.

"मी आणि रमाकांतनं खूप विचार केलाय याबाबतीत. असं वाटतंय की वर्तमानपत्रात देऊन टाकायचं, आमचा ह्या व्यक्तीशी काही संबंध नाही म्हणून."
"अरे, काहीतरीच काय. नको रे इतकं टोक गाठायला." वैजूलाच रहावलं नाही.
"मग रहा तसेच. ज्यालात्याला त्या नालायकाचा पुळका. अरे, बघायला या. माझं घर अक्षरश: धुऊन काढलं आहे दोघांनी. आता माझा जम बसला आहे तर लग्न कर म्हणून मागे लागली होतीस ना माई? तुमच्या मोठ्या चिरंजीवांनी सगळं घर खाली केलं आहे. आता पुन्हा जमवाजमव करेपर्यंत कुठला करतो आहे लग्नाचा विचार. एक दिवस जरा बाहेर गेलो तर ट्रक आणून सगळं सामान न्यावं ह्या दोघांनी? सख्ख्या भावाला लुबाडतात, तुझं वाटोळं केलं, आप्पांवर या वयात कफल्लक व्हायची वेळ आली, नातेवाइकांमध्ये, ओळखीपाळखीच्या लोकांमध्ये मान खाली घालावी लागते विषय निघाला की. कुणी नवीन माणूस समोर आलं की भीती वाटते, दादा याचं काही देणं तर लागत नाही ना अशी शंका येते. आणि तू म्हणते आहेस टोक गाठायला नको. ठरवा मग तुम्ही काय करायचं ते नाहीतर बसा देणी फेडत, नशिबाला बोल लावत." रमाकांतचा स्वर टिपेला पोचला.

वाद, चर्चा, चिडचीड होऊन शेवटी रमाकांतनं दादाशी तळेकरांच्या घरातील कोणत्याही व्यक्तीचा काही संबंध नाही, असं निवेदन वर्तमानपत्रात दिलं. त्यादिवशी धोपेश्वरच्या तळेकरांच्या घरात सुतक असल्यासारखं वातावरण होतं. शरदला याची कल्पना असल्यामुळे तो मुद्दाम दोन-तीन दिवस रहायला आला होता. ते वर्तमानपत्र हातात घेऊन रडणार्‍या माईची समजूत घालणं कठीण झालं त्याला.

"माई, आपण सर्वांनी एकत्र मिळून घेतलेला हा निर्णय आहे."
"हो, मला मेलीला मत आहे कुठं! तुम्ही बोलायचं, मी मान डोलवायची. पण असं निवेदन देऊन संबंध संपत नाही पोरांनो. खरं सांगा, संपतो असा संबंध?"
आप्पांनी बायकोकडे नजर टाकली.
"कायदेशीरदृष्ट्या संपतो. त्याच्या कुठल्याही वागण्याला, फसवणुकीला आपण जबाबदार नाही. जमिनीच्या व्यवहाराला त्याच्या स्वाक्षरीची गरज नाही, आपलं जे काही आहे त्यातला वाटा त्याला मिळणार नाही."
"जीव गुंतला आहे त्याचा संबंध कसा संपवायचा?" डोळ्यात येणारे अश्रू लपवीत माईंनी विचारलं.
"आपला जीव गेला की." कठोर स्वरात आप्पा उत्तरले.
"अहो, असं काय बोलता?"

"खरं तेच सांगतो आहे माई. थोडीथोडकी नाही, जवळजवळ पंधरा वर्ष तरी झाली असतील दादाशी संबंध तुटून. जो येतो तो त्याची देणी फेडण्यापुरता. आता एक लक्षात ठेवा. त्याचं नांवही काढू नका. एकदातरी आला का आपल्याला भेटायला तो? दुखलंखुपलं विचारायला? कुणीतरी सांगतं आपल्याला, दादरला दिसला होता, पुण्यात आला होता. इकडे जाऊन भेटून आलो त्याला. आता इतक्या ठिकाणी हा जातो मग आपल्याला भेटावं असं वाटू नये त्याला एकदाही? आता तर घरात फोनही आलाय. फोन करावासा नाही वाटला. आता आपण पिकली पानं याची जाणीव असेलच ना त्यालाही. तोच पोचला आता पन्नाशीला."

"घाबरत असेल हो शरदला, रमाकांतला. वैजूला तोंड दाखवायची लाज वाटत असेल."
"वैजूला फसवलं तेव्हा घाबरला नाही तो? आणि आपल्याला भेटायला आला तर काय आपण लगेच सर्वांना बोलावून घेणार आहोत? म्हणावं तर पोलीसही त्याच्या मागावर नाहीत. संबंध संपले हेच अंतिम सत्य आहे. दोघं कुठेतरी आहेत, आपले आपण जगतायत यावर आता समाधान माना. आणि एक करा. येताजाता मुलांसमोर दादाची चौकशी करू नका. रागावतात मुलं. त्यांना वाटतं, ती इतकं करतात आपल्यासाठी, दादाच्या गुन्ह्यांवरही सतत पांघरूण घालतात आणि आपण मात्र त्याचीच आठवण काढत रहातो."

धमकीचा फोन आल्यापासून हातात धरलेल्या वर्तमानपत्रातली अक्षरं पुसट होत हे सारे प्रसंग ठळकपणे चित्रित होत होते शरदच्या मनात. आप्पांनी दादाचं नाव आता या घरात पुन्हा काढायचं नाही असं माईला बजावून सांगितलं त्यानंतर काही दिवसांनी दोघंही त्याच्याकडे चिपळूणला कायमचे वास्तव्याला आले. आणि खरंच निश्चय केल्यासारखं दोघांनी पुन्हा दादाच्या नावाचा उल्लेखही केला नाही. या ना त्या मार्गानं रमाकांतनं पोचवलेल्या निरोपामुळे एकदा अखेर आप्पांशी बोलायला म्हणून दादाचा फोन आला. आप्पा, माईंशी निदान एकदा तरी त्यानं बोलावं म्हणून चालवलेली धडपड होती ती भावंडांची. पण आप्पांनी त्याच्याशी बोलायलाच नकार दिला. माईची इच्छा असावी पण आप्पांना घाबरुन तिनं नाही म्हटलं असावं असंच वाटलं होतं तेव्हा सर्वांना. आप्पा गेल्यानंतर किती वेळा सगळ्यांनी तिला दादाला शोधायचा प्रयत्न करायचा का विचारलं होतं. पण त्यालाही तिनं ठाम नकार दिला. माईच्या शेवटच्या क्षणी घरातल्या प्रत्येकाला वाटत होतं ती दादाची चौकशी करेल, म्हणजे तशी तिनं ती करावी अशी प्रत्येकाचीच अपेक्षा होती. पण तिनं मौनव्रत धारण केलं. का केलं असेल तिनं असं? जात्या जिवाला एक तपाहून अधिक काळ नजरेलाही न पडलेल्या मुलाची चिंता असणारच. बाकी मुलांचं जीवन फुललं, बहरलं आणि एकाचं अकाली भरकटलं त्याचाच विचार तिच्या मनी अखंड राहिला हे नक्की. मग का नाही तिनं ते व्यक्त केलं? केवळ इतर मुलांचा धाक? त्यांना दुखवू नये ही इच्छा? की आयुष्याच्या अशा पायरीवर ती उभी होती जिथे आता फक्त मृत्यू समीप होता, पैलतीर डोळ्यांना खुणावत होता? त्यापुढे इतरांचं अस्तित्व पुसट होत गेलं असावं? हा प्रश्न आता अनुत्तरीतच रहाणार हे नक्की असलं तरी शरदचं हृदय अधूनमधून कासावीस करून टाकी.

आणि आज हे नव्यानं सुरु झालेलं धमकीचं सत्र. कधी नव्हे तो एक हताशपणा शरदला वेढून गेला. आप्पा म्हणाले होते, दादाशी काही संबंध राहिला नाही निवेदन दिल्यानंतर आपल्या बाजूनं. पण हे झालं आपलं. त्याच्या बाजूनं काय? त्याच्या दृष्टीनं आपण सर्व भावंडंच आहोत अजून. त्याच्या स्वार्थासाठी का होईना तो अप्रत्यक्षरीत्या आपल्याला घट्ट धरुन आहेच. पन्नाशी पार केली तरी याचे उद्योग निस्तरायचं नशीबातून सुटत नाही. आता आणखी किती दिवस, वर्षं हे असंच चालू रहाणार या विचारानं शरदच्या कपाळावरच्या आठ्या गडद झाल्या.

पुन्हा फोन वाजला तसा तिरमिरीत शरद उठला. पलीकडच्या माणसाला बोलायची संधीही न देता ओरडला.
"बंद करा धमक्यांचे फोन करणं. किती पैसे दिले आहेत तुम्हाला त्या तळेकरांनी आमची झोप उडवण्यासाठी?"
"अरे शरद, मी रमाकांत बोलतोय."
"तू आहेस होय. मला वाटलं..."
त्याचं वाक्य तोडत रमाकांत म्हणाला, "धमकीचा फोन. हो ना?"
"तुला कसं कळलं? का तुला पण आला होता?"
"म्हणूनच तुला केला लगेच. कुणीतरी गावठी भाषेत बोलत होतं. आमदार निवासाचे पैसे भरा, भावाला सांगा मुलाबाळांची काळजी घ्या. रस्त्यात एखादा अपघात... असं काही बाही बोलत होता तो माणूस."
"कळलं. मी बोलतो तुझ्याशी नंतर. ही कधीची उभी आहे. माझा चढलेला आवाज ऐकून घाबरली असेल."
"बरं ठेवतो मी. पण मुलांशी बोलून घे. समजावून सांग त्यांना." रमाकांतने फोन ठेवला.

"रमाकांत होता. त्या आधी धमकीचे फोन. दादानं आता मात्र टोक गाठलं आहे. मुलांना अपघात होऊ शकतो अशी गर्भित धमकी देतोय. स्वत:चं धाडस नाही. भाडोत्री गुंडांचा पर्याय वापरतोय मूर्ख." शैलाकडे बघत शरदनं काय घडतंय ते सांगून टाकलं. शैला घाबरुन बसलीच बाजूच्या दिवाणावर.

"तुम्ही पैसे भरून टाका. उगाच नसती डोकेदुखी नको."

"किती वेळा भरू पैसे? आणि हे काय शेवटचं आहे का? तो किंवा मी गेलो की मगच संपणार हे सगळं असं दिसतंय. या ना त्या मार्गानं दादाचे उद्योग निस्तारतो आहोत आपण सगळेच. कितीतरी वर्षं. त्याच्या काळजीनं खंगून आप्पामाई गेले, आम्ही भावंडही असेच भरडत रहाणार त्याची किंवा आमची अखेर होईपर्यंत. थकत चालले आहेत आता देह आणि मनही. पण ही दादाची थेरं काही बंद होत नाहीत."

"अपघाताची धमकी, मुलांना काही होईल हे पहिल्यांदाच आहे. ती दोघं कोणत्या थराला जाऊ शकतील याची निशाणीच म्हणायला हवी ना ही?"
"अशा धमक्यांना आपण भीक घातली तर हे दुष्टचक्र कधी संपणारच नाही. काहीतरी करायला हवं आता निर्वाणीचं."
"अहो, तरुण मुलं आहेत आपली. दादाला धडा शिकवायला जाल आणि एक म्हणता एक होऊन जायचं. आणि हे बघा, मी सांगून ठेवते तुम्हाला एकदाच आणि शेवटचं. या तुमच्या भानगडीतून माझ्या मुलांना काही झालं तर कुणालाच माफ करणार नाही मी. कळलं ना?" शैला एकदम रडकुंडीला आली.
"अगं, मला तरी आवडेल का आपल्या मुलांना काही झालं तर? पोकळ धमक्या आहेत एवढंच म्हणायचं होतं मला."
"आणि त्या तशा नसतील तर?" शरद एकदम गप्प झाला. असा विचारच डोकावला नव्हता मनात. शैलाच्या शब्दांनी शरदच्या अंगावर काटा आला.
"परत फोन येऊ दे. विचारतोच त्याला कोण पैसे देतं आहे फोन करून धमक्या देण्यासाठी. आणि हा दादा... समोर तर येऊ दे कधी. नाहीसाच करून टाकेन." शरदचे डोळे संतापानं रक्त साकळल्यासारखे लाल झाले. दोघं एकमेकांकडे बघत विचारात गुंतून गेले. बराचवेळ. आणि अचानक शरदनं दचकून फोनकडे पाहिलं. फोन पुन्हा एकदा वाजत होता…

9 comments:

 1. I read all the story and feel sad, but very nice description and love to read till end. Very well written, all description is so well that all characters feel alive.

  ReplyDelete
 2. खूप छान मांडली आहेस गोष्ट. दुष्ट चक्रात अडकलेल्या कुटुंबाची ही गोष्ट. मन सुन्न झाले.

  ReplyDelete
 3. Replies
  1. मुक्तांगण, धन्यवाद. कथा इथेच संपते किंवा ती आहे तशीच पुढे चालू रहाते. दादा, वहिनी सर्वांना फसवित रहातात आणि घरातले त्यांचे उद्योग निस्तारण्यात.

   Delete
  2. पण ते असं का करतात ह्याला काहीच उत्तर नाही. त्यांच्या मागेही काहीतरी करणे असतील कि, आणि एरवी प्रत्यक्षात माहिती नसलीत तरी निदान कथा लिहितांना त्यात मांडायला हवी होती असं मला वाटतंय

   Delete
  3. इतरांच्या बोलण्यातून शक्यता दर्शविल्या आहेत पण खरी कारणं कधीकधी खरंच कळत नाहीत त्यामुळे कथेतही ती मांडलेली नाहीत.

   Delete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.