Friday, October 24, 2014

शोध

(’मायबोली’ च्या दिवाळी अंकासाठी लिहिलेली कथा )

बस सोल्ल्याच्या फाट्यावर थांबली. घाईघाईत सुयशने रहस्यकथेचं पुस्तक सॅकमध्ये ठेवलं. निखिल, त्याचा मामेभाऊ त्याला घ्यायला आला होता.
"आयला तू अगदी हीरोच दिसतोस."
"म्हणजे कसा?" सुयशने केसाची झुलपं उडवित विचारलं.
"ए, लगेच भाव खाऊ नकोस. चल आता."
"कसं जायचं?" सॅक पाठीवर अडकवून सुयश तयार होता.
"चालत. अर्ध्या तासात पोचू."
"ठीक आहे. चल ना मग." दोघं लांब लांब ढांगा टाकत चालायला लागले.
"मागच्यावेळेस आलो होतो तेव्हा चौथीत होतो. वेगळंच वाटतं आहे गाव आता."
"अरे गाव काय बदलणार. आता तू मोठा झालास त्यामुळे वाटत असेल तसं." निखिल हसत म्हणाला.
"तू कबूल केलं आहेस फोनवर. लक्षात आहे ना?" सुयशने खात्री करण्यासाठी विचारलं.
"आहे की. आता आहेस ना आठ दहा दिवस मग दाखवतोच."
"दाखव. उगाचच काहीही थापा मारत असतोस."
"पैज लावू या? मग चड्डी पिवळी करू नकोस." सुयश जोरात हसला.
"तू अगदी मामासारखा बोलतोस. घाणेरडा आहेस. पण खरंच  असलं काही नसतं यार." सुयशला निखिलचं म्हणणं पटतच नव्हतं.
"तुला पुरावाच पाहिजे ना? आज रात्री जागायची तयारी ठेव."
"चालेल. दाखवच तू मला." थोडावेळ दोघं न बोलता रस्ता तुडवत राहिले. तांबड्या मातीच्या त्या रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. एका बाजूला डोंगर दुसर्‍या बाजूला खळाळणारी तारी नदी.
"तुला ते सावे काका आठवतात का?"
"सावे काका? कोण हे?"
"आहेत. विसरलास तू. त्यांनी या रस्त्यावर मला ते, तसं दाखवलं होतं."
"ते, तसं?"
"भूत रे."
"रस्त्यावर भूत?"
"हो. म्हणाले पहायचं आहे ना. दाखवतोच. मग घाबरायचं नाही. घाबरलो होतो पण म्हटलं बघू तर."
"मग?"
"मग काय? अरे, दिवसा उजेडी एकदम अंधार झाला. डोळे ताणून ताणूनही काही दिसत नव्हतं. त्यातच कुणाच्या तरी किंकाळ्या, आरडाओरडा, कुणीतरी जोराजोराने हाका मारत होतं पण कुणाला ते काही केल्या कळत नव्हतं.  मागे पुढे नुसती माणसंच माणसं आहेत, घेराव घातलाय सगळ्यांनी असं वाटायला लागलं."
"खरंच? घाबरलास तू?"
"हो. सावेकाकापण दिसेनासे झाले. मग ओरडायला लागलो. बेंबीच्या देठापासून ओरडलो. तर एकदम प्रकाश. बाजूला काका. नुसतेच हसत होते. एकदम शांत."
"हीप्नोटाइज केलं असेल त्यांनी तुला."
"नाही. भूतच होती ती."
"अरे कसं शक्य आहे. कुणीही बनवतं तुला यार."
दोघांचा वाद रंगला तो घराजवळचा वहाळ  येईपर्यंत. पाण्याने पार तळ गाठला होता. दगडांवरून उड्या मारता मारता सुयशने जोरात विचारलं.
"आज रात्रीचं पक्कं ना?"
"एकदम. सगळीकडे निजानीज झाली तरी आपण बसून रहायचं पडवीत. रात्री बारानंतर बघच तू..."
"ठरलं तर." बोलता बोलता ते घरी पोचलेच.  दिवसभर मामा, मामीने सुयशचा ताबा घेतला. मामा सर्वांची ख्यालीखुशाली विचारत राहिला. मागच्या वेळेस तो आला तेव्हाच्या आठवणी रंगात आल्या. गोठ्यात बांधलेल्या गायी, परसातला भाजीपाला, मागचं भाताचं शेत इकडून तिकडे तो नुसता हुंदडत राहिला ते रात्रीचं जेवण होईपर्यंत.


"ए, बोअर झालो यार. किती वेळ बसायचं असं?" सुयशला कंटाळा यायला लागला, थोडीशी भितीही वाटायला लागली होती. आजूबाजूला गुडुप अंधार. कुठेतरी लांबवर एखादा मिणमिणता दिवा, मध्येच कुत्र्याचं केकाटणं,  अंगणात अचानक अवतरलेला सैरावरा धावणारा उंदीर, घरासमोर अक्राळविक्राळ फांद्या विस्तारुन उभी राहिलेली झाडं, रातकिड्यांची किरकिर...... त्या भयाण वातावरणात काही बोललं तरी आवाज उगाचच घोगरा व्हायला लागला.
"झोपा रे आता. किती वेळ बसणार आहात?" काळोखात माजघरात झोपलेल्या मामाचा आवाज एकदम घुमला. दोघंही दचकलेच. निखिलने बसल्या बसल्या मागे वळून पाहिलं.
"तुम्ही झोपा बाबा. आम्ही बसलोय इथे."
"दार घे ओढून पूर्ण."
निखिलने दार पूर्ण ओढलं. आता  दोघांनाही भिती वाटायला लागली.
"चल रे. आपण झोपू या." सुयश कुजबुजला.
"नको रे. आता दिसतीलच बघ दिवे." निखिल उठायला तयार नव्हता.  दोघांची नजर सारखी  दृष्टी पडेल तिथे दिसणार्‍या उंच, अक्राळ विक्राळ वाढलेल्या झाडांकडे जात होती, त्यातून  चेहर्‍यांचे चित्र विचित्र आकार, माणसांच्या आकृत्या असं काही बाही प्रकट व्हायला लागलं होतं.
"तो बघ, तो बघ. एक दिवा गेला." निखिल कुजबुजला. सुयशने मान उंच करून पहायचा प्रयत्न केला.
"काजवा असेल."
"अजून एक. आता आणखी दोन. बघ, बघ." निखिलने केलेल्या बोटाच्या दिशेने सुयश पहात राहिला. डोळे ताणून दूरवर दिसणार्‍या त्या ज्वाळांकडे पहाताना पलित्यांखाली माणूस दिसतंय का ते पहाण्याचा तो आटोकाट प्रयत्न करत होता. आपसूक तो निखिलच्या जवळ सरकला.
"काय रे? फाटली का?"
"छ्या, पण कुणी पलिते धरले आहेत ते का दिसत नाही?"
"कारण ते अंधातरी आहेत."
"कायतरी पचकू नकोस. कुणीतरी धरलेले आहेत."
"दिसतंय का कुणी?"
"काळोख आहे म्हणून दिसत नाही."
"रात्रीचे बारा वाजून गेले आहेत. इतक्या रात्री माणसं काय करणार तिकडे?"
"तिकडेच रहात असतील."
"बावळट आहेस. कुणी रहात नाही तिकडे. उद्या दिवसा जाऊ आपण. तूच बघ."
"ते पलिते असे नाच केल्यासारखे का फिरतायत?"
"कारण भुतं नाचतायत. च्यायला, सांगत होतो ना  तुला की बरोब्बर बारा वाजले की हे असं सुरु होतं. आता दोन मिनिटात नाहीसं होईल."
"चल, जाऊन बघू या?" सुयशला एकदम चेव चढला.
"पोचायला अर्धा तास लागेल. त्याआधी ते बंद होईल. गावातल्या लोकांनी पण जाऊन बघितलं आहे. तिथे जाऊन बसलं तर काय पण होत नाही. लांबूनच पहायला मिळतं. पण तुला ती जागाच बघायची तर उद्या चक्कर मारु." निखिल म्हणाला.
"नाही. उद्या रात्रीच जाऊ. बारा वाजता." सुयश उठलाच तिथून. कसलं भूत आणि कसलं काय. फालतूपणा. त्याचा या पलित्यांवर अजिबात विश्वास बसला नव्हता.

"अरे, दोघं नका जाऊ बाबा तिकडे रात्रीचे."
"मामा, तू पण ना. भूत बीत असलं काही नसतं. मला काय वाटतं माहितीये का?" सगळ्यांच्या माना नकारार्थी माना हलल्या.
"यू. एफ. ओ. असेल."
"युएफो?" मामा गोंधळला.
"उडत्या तबकड्या म्हणतोय तो." निखिलने स्पष्टीकरण दिलं.
"उडत्या तबकड्या? सोल्ल्यात?" मामाला हसू आवरेना.
"मामा हसणं थांबव ना. आज कळेलच रात्री मग बघ."
"बरं बरं, मी पण येईन तुमच्याबरोबर सोबतीला. पण आधीच सांगतो आपण तिथे गेलो की काहीही दिसत नाही." मामाने विषय संपवलाच.

"आयला, अख्खं कोकण भुताखेतांनीच भरलेलं आहे असं वाटायला लागलं आहे."  सुयश शंकराच्या मंदिरात एकटाच जाऊन आला. परत आल्याआल्या निखिलला काय सांगू आणि काय नको असं होऊन गेलं त्याला.
"काय झालं?"
"देवळाकडे जाताना वाटेत तो उभा देव लागतो बघ. तिथून पुढे गेलं की देऊळ..."
"लेका, उभा जन्म इथे गेलाय माझा आणि तो उभा देव कुठे, देऊळ कुठे सांगायला लागला आहेस." निखिलला सुयशच्या बोलण्याचा रोख समजेना.
"ऐक ना. देवळात जाता जाता उभ्या देवाशी थांबलो. तिथे वरच्या बाजूला दगडावर एक पोरगा बसला होता. त्याने लै भारी गोष्ट सांगितली. म्हणजे देवळाच्या पलीकडे नदी आहे. नदीच्या बाजूने रस्ता जातो.  आडवाट आहे आणि तसा शुकशुकाटच असतो कायम त्या वाटेवर.  तिथून गेलं तर एक बाई आणि मुलगी  हटकून थांबवतेच कुणालाही. पत्ता विचारते खालच्या वाडीतल्या देशमुखांचा. तो पोरगा भेटला ना त्याचा मुंबईचा पाहुणा गेला होता, खरं आहे का त्याची खात्री करायला.  आणि दिसली की ती बाई आणि मुलगी त्यालाही. त्याने पत्ता सांगितला. गप्पा पण मारल्या.  ती  भूतं  नव्हती, माणसंच होती याची खात्री पटली त्याला.  सायकलवर बसला आणि निघाला गडी. मागे वळून बघायचं नाही असं सांगितलेलं ना म्हणून मुद्दाम मागे वळून पाहिलं. रस्ता ओसाड. बाई नाही, मुलगी नाही. नजर पोचेल तिथपर्यंत चिटपाखरुही नव्हतं. घाबरला. तर्हाट मारली सायकल. घरी आला आणि चार दिवस ताप."
"सगळ्या वाडीला ठाऊक आहे ही गोष्ट." निखिल थंडपणे म्हणाला.
"चल ना आपण जाऊ."
"तिन्हीसांजेलाच जावं लागतं. पाठवणार नाही कुणी आपल्याला घरातून."
"आता ते पलिते तरी कुठे दिसले. काहीही नसतं बाबा असलं."
"तुला आधीच सांगितलं होतं तिथे गेलं तर काही दिसत नाही म्हणून."
"बरं ठीक आहे. तू त्या रस्त्यावर येणार की नाही ते सांग."
"बाबांना विचारावं लागेल."
"सगळीकडे मामा कशाला? तो पोरगा म्हणालाय मी येईन पाहिजे तर."
"अरे त्याचं नाव सांग आधी."
"विसरलो रे. आज तू पण चल ना देवळात. असला तिथे तर भेटेल."
"बरं बघू. पण तुला ते तसलं तर घरातही बघता येईल."
"म्हणजे?"
"महापुरुषाची चक्कर असते घरातून."
"महापुरुष?"
"घराण्याचा मूळ पुरुष असतो तो."
"अच्छा."
"अमावास्येच्या दिवशी येऊन जातो."
"दिसतो?"
"नाही. पण रात्री लावलेली दाराची कडी उघडलेली असते. आणि वरच्या माळ्यावर झोपलास ना तर रात्री कुणी तरी उठवतं गदगदा हलवून."
"काय खतरनाक गोष्टी सांगता राव तुम्ही." सुयशला गंमत वाटायला लागली होती.
"अजून सांगतो ना पुढे." निखिलला चेव चढला.
"नको." सुयशने उडवून लावलं.

नंतरचे दोन दिवस सुयशबरोबर जाणं निखिलला जमलंच नाही. नारळ सोलायचे होते, शेजारच्या वाडीत पोचवायचे होते. फणस झाडावरून उतरवायचे होते.  सुयशने त्याच्याबरोबर थोडावेळ राहिला पण शंकराच्या मंदिराने त्याला वेड लावलं होतं. जाता जाता तो पोरगा भेटायचाच. त्याच्याशी गप्पा मारायच्या. देवळात पोचलं की मस्त पुस्तक वाचत बसायचं.  तिथल्या नीरव शांततेत रहस्यकथेच्या पुस्तकातलं वातावरण जिवंत झाल्यासारखं वाटायचं. त्याचा मग तो नित्यक्रमच होऊन गेला. म्हणता म्हणता सुट्टी संपलीही.  घरातल्या सगळ्यांचा निरोप घेऊन तो निघाला. निखिल त्याच्याबरोबर राजापूरपर्यंत येणार होता. सुयशला गाडीत बसवून, राजापूरची कामं आटपून निखिल सोल्ल्याला परतणार होता. सुयश गाडीत चढला. खिडकीच्या गजांना धरुन  निखिल त्याच्याशी बोलत राहिला.
"आता पुढच्या मे महिन्यात ना?"
"बघू, पण तुम्ही मुंबईला दिवाळीत याल ना?"
"येऊ की."
"आणि पुढच्या वेळेस भुतं दाखवली नाहीस तर मान्य करावं लागणार आहे तुला असलं काही नसतं म्हणून कळलं ना?" सुयशने एक वर्ष  वाढवून दिलं होतं निखिलला. दरम्यान त्यालाही जरा या विषयावर संशोधन करायला अवधी मिळणार होता.
"नक्की यार. बघ पुढच्या वेळेस तुझा नक्की विश्वास बसणार."
"ते शंकराचं देऊळ मात्र भारी आहे एकदम. जाम आवडलंय मला. आणि तो पोरगा. कायम वाटेवर कुठेतरी भेटायचाच. आयला, अरे त्याचा निरोप घ्यायचा राहिलाच. तू सांग त्याला भेटला की."
"तू नाव कुठे सांगितलं आहेस त्याचं."
"अरे हो, सांगितलंच नाही ना मी नाव त्याचं. अव्या."
"अव्या? अरे पूर्ण नाव सांग ना."
"अविनाश रे. अविनाश  चव्हाण."
"अविनाश चव्हाण?" डोळे फाडून  निखिल सुयशकडे पहात राहिला.
"अरे असा काय पहातोस? काय झालं?" सुयशला निखिल त्याच्याकडे असा का बघतोय ते समजेना.
"तू काय म्हणालास? त्या मुलाचं नाव काय सांगितलस?"
"काय पहिल्यांदा हे नाव ऐकतोयस का? अविनाऽऽश." खिडकीच्या दांड्यावर धरलेला निखिलचा हात एकदम बाजूला झाला.  हातापायातलं त्राणच गेलं त्याच्या.
"अरे, काय झालं? तू असा भूत बघितल्यासारखा काय करतोयस? तेच नाव सांगितलं त्याने." निखिलचा चेहरा पांढराफटक का पडलाय तेच सुयशला कळत नव्हतं.
"निखिल अरे, काय झालं तुला? पटकन बोल रे. गाडी चालू होतेय. बोल ना. अरे, बोल पटकन..." सुयशचं बोलणं संपेपर्यत गाडी चालू झालीच. निखिल जीवाच्या आकांताने गाडीच्या मागून धावला. सुयश खिडकीतून वळून वळून मागे पहात होता.  चिरक्या आवाजात निखिल ओरडला,
"सुयश, अरे अविनाश चव्हाण गेल्या वर्षी साप चावून वारला. तू भूत पाहिलंस सुयश. तू भूत पाहिलंस........"

3 comments:

  1. मोहना, गोष्ट आवडली आणि तुझा आवाजही श्रवणीय आहे.

    ReplyDelete
  2. Interesting halloween treat for me Mohana.

    ReplyDelete
  3. mast aahe. aawadali

    ReplyDelete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.