Monday, October 13, 2014

चाळीशीतला साक्षात्कार :-)

चाळीशी उंबरठ्यावर (आहेत कुठे आता उंबरठे?) आली तेव्हा ’धडधड’ वाढली होती. तिथपर्यंत पोचणार्‍याला खरं तर स्वत:ला जाणीवच नसते पण आजूबाजूची तुम्हाला ते जाणवून देण्यात फार तत्पर असतात. पण आता कळतंय ही चाळीशी किती लाभदायक असते. खालील फायदे तुम्हीही घेतले असतील किंवा इतर फायदे असतील तर लिहायला विसरु नका. वाटचाल तिथपर्यंत व्हायची असेल तर फायद्याची नोंद घ्या 
• हल्ली अगदी विसरायलाच होतं बाई हा महामंत्र जपत कितीतरी कामं टाळता येतात.
• आज बाहेरच जायचं का जेवायला? जळ्ळी मेली ती चाळीशी, जीव अगदी नकोसा केलाय असं वारंवार म्हणता येतं.
• कोणता ना कोणता अवयव सतत दुखता ठेवून उंटावरुन शेळ्या हाकता येतात. सोफ्यावर बसल्या बसल्या घरातली सर्वजण मुकाट कामं करतायत (त्यांची कारणं वेगळी असतात) हे पहाण्यासाठी चाळीशीच गाठावी लागते.
• फडताळाचं (पॅन्ट्री) दार उघडलं की तिथपर्यंत का पोचलो ते आठवत नाही त्यामुळे आतल्या काहीतरी स्वादिष्ट वस्तूवर तिथेच ताव मारत आधीचं काम विसरुन जाता येतं.
• चिडचिड, थकवा, वैताग, सगळं पोरं आणि नवर्‍यावर काढून झालं की आरामात म्हणता येतं बहुतेक मेनोपॉज सुरु होण्याची लक्षणं. हे सगळं घरातली नेहमी, ’विनाकारण’ करत असते असं म्हणतात, त्याला काहीतरी ’नाव’ दिल्याचा आनंद उपभोगता येतो.
• टी. व्ही. चं रिमोट, बेकींग इन्स्ट्रक्शन, पदार्थांमधले घटक ज्या काही ’बारीक’ अक्षरात लिहलेल्या गोष्टी वाचून करायच्या असतात त्या बिनदिक्कत दुसर्‍यावर चष्मा सापडत नाही म्हणून घालता येतात.

आणि जेव्हा सर्व व्यवस्थित असतं तेव्हा, माझी चाळीशी झाली तरी करतेय, नाहीतर तुमचं साठीला आल्यासारखं सुरु असतं असं खिजवताही येतं...

6 comments:

  1. मस्त! कितीही प्रयत्न केला तरी वजन काही कमी होत नाही असे मनाचे समाधान करून घेता येते आणि अपराधीपणा कमी करता येतो,
    घरात काही कार्यक्रम असेल तर आजकाल फार tension येते असे म्हणून बरेचसे पदार्थ बाहेरून आणता येतात,
    अधून मधून जर जास्तच चिडचिड आणि दुसर्यांवर राग काढून मनातील खदखद बाहेर काढता येते .

    ReplyDelete
  2. चाळिशीचे एवढे फायदे असतील तर पन्राशीत धमाल. Positive Thinking. काहीतरी वेगळं. छान

    ReplyDelete
  3. yaatala kahich ghatadatana disat nahiye majhya babat, janmchya dakhlyavarchi taarik chukali ki kaay? :))

    ReplyDelete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.