Saturday, August 1, 2015

व्यक्तिचित्रे

बृहनमहाराष्ट्र वृत्तासाठी लिहीत असलेल्या लेखमालिकेतील हा माझा शेवटचा लेख.

अत्यानुधिक तंत्रज्ञानामुळे संवाद साधणं सोपं आता सहज सोपं होऊन गेलं आहे. परदेशात जाणं, ताबडतोब तिथे रुळणं ही नवलाईची गोष्ट राहिलेली नाही. पण हे झालं हल्ली हल्लीच्या काळात. ज्यांना इथे येऊन दशकं उलटली आहेत त्यांच्यासाठी मधल्या काळातील ही स्थित्यंतरं अचंबित करणारी आहेत. तरीदेखील असं वाटतं की ही प्रगती घडत असताना अनुभवाचं, प्रश्नाचं स्वरुप बदलत गेलं तरी मानवी मन मात्र तेच राहिलं. कधी अनाकलनीय तर  काहीवेळा ठोकताळे मांडता येणारं. प्रत्येकाचे अनुभव आणि प्रश्न वेगळे तसे ते अनुभवण्याचे, प्रश्न सोडवण्याचे मार्गही विविध. या सार्‍याचा वेध घेण्याचा प्रयत्न मी या लेखमालिकेतून केला.

मी अमेरिकेत आले तो काळ आणि आताचा काळ यात खूप फरक आहे. १९९५ च्या दरम्यान भारतात  संपर्क साधण्याचे मार्ग म्हणजे फक्त पत्र आणि फोन. साधारण त्या काळात जे इथे आले त्यांना नक्की आठवत असेल, फोन करायचा तर  MCI किंवा AT&T  हेच दोन पर्याय बहुतांशी उपलब्ध होते. दर मिनिटाला आपण ७५ सेंट खर्च करतोय याचं भान ठेवायला लागायचं. पत्र पाठवलं की पोचायला तीन आठवडे, उत्तर यायला तीन आठवडे. आपल्याकडून भारतातून आलेल्या पत्राला अगदी एक दोन दिवसात उत्तर लिहिलं गेलं तरी तिकडून तसं होईलच याची खात्री नसे. मायदेश सोडून आलेले आपण भावनिक गुंतवणुकीत अधिक गुंतलेले. तिकडे त्यांच्या दैनंदिन जीवनात फारसा फरक पडलेला नसायचा. मला आठवतंय, सासर - माहेरच्या सख्ख्या नातेवाइकांव्यतिरिक्त, मावश्या, मामा, मैत्रिणी झाडून सार्‍यांना तेव्हा मी पत्र लिहीत असे. मग  प्रतिसादाबद्दल आशा - निराशेचा खेळ चालू राही.  हळूहळू इ मेलचा जमाना आला. पण घरातल्या वयस्कर मंडळीना इ मेल कसं वापरायचं कुठे ठाऊक होतं? ते पत्राकडे डोळे लावून बसलेले असत. फोनचे दर स्वस्त झाल्यावर मग मात्र फोन मुळे हळूहळू पत्र लेखन कमी आणि  नंतर जवळजवळ  बंदच झालं. फोननंतर आता स्काइप, फेसटाइम, व्हॉट्सअॲप, गूगल टॉक....अशा अत्यानुधिक तंत्रांनी मात्र क्रांतीच केली. या सार्‍यामुळे आपल्या आयुष्यात झालेल्या बदलांचा मागोवा म्हणजेच ही लेखमालिका होती.

तळ्यात मळ्यात: आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपण संवाद तर हरवून बसलेलो नाही ना ही जी शंका प्रत्येकाच्या मनात डोकावते त्यावरुन ’तळ्यात मळ्यात’ ची कल्पना सुचली.  दामले कुटुंबांवरचा हा लेख. केतन, मीरा आणि मुलं नानांच्या, केतनच्या वडिलांच्या घरी येतात. आईच्या निधनानंतर आग्रह करुनही अमेरिकेत न आलेल्या वडिलांना भेटायला केतन वर्षभराने भारतात येतो.  केतनच्या मनात नानांना भेटायची अनिवार ओढ  आहे. नानाही त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले.. घरी आल्या या सार्‍याचं प्रतिबिंब प्रत्येकाच्या वागण्यात उमटतं. पण थोड्याच वेळात केतन आणि मुलं आपापले लॅपटॉप, फोन घेऊन बसतात. नानांचा नाराजीचा सूर जाणवतो आणि मीराला त्यांच्या मनातला एकटेपणा तीव्रपणे बोचतो. संपर्कात रहाण्याच्या आधुनिक साधनांबद्दल आनंद मानायचा की प्रत्यक्ष भेटीतली मजा त्यामुळे पटकन संपुष्टात येते याचं दु:ख हा प्रश्न मीराला छळत रहातो आणि निदान त्या क्षणीतरी नानांचा एकटेपणा घालवायचा मार्ग तिला सापडतो. असा या लेखाचा विषय होता. माझी खात्री आहे की अनेकांनी अंशतः तरी हे अनुभवलेलं असणारच. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: ऑगस्ट २०१३)
मी काय करु?: अर्थाजन आलं की बचतही आलीच. पण याचा कधीकधी अतिरेक होतो आणि आपलेच जीवलग त्यात पोळले जातात हे लक्षातही येत नाही. यावरुनच हा लेख सुचला.
नोकरी करणारी मीना, आपल्या आई वडिलांना दर वर्षी मुलांना सुट्ट्या लागल्या की अमेरिकेत बोलवून घेते. डे केअर, आफ्टर स्कूल हे पर्याय असतानाही पैसे वाचवण्याच्या नादात, आईला आता झेपत नाही, तिची इच्छाही नाही हे जाणवूनही आजी आजोबांचा सहवास मुलांना मिळावा हे निमित्त पुढे करते. लेखातील, मीरा,  तिचे आई - बाबा, मीराचा नवरा, या सार्‍यांनाच प्राप्त परिस्थितीबद्दल पडलेला प्रश्न म्हणजेच, ’मी काय करु?’ (बृहनमहाराष्ट्र वृत्त:  ऑक्टोंबर २०१३)

कृतज्ञ: वर्षानुवर्ष परदेशात राहूनही आपल्या मनाचं पारडं मायभूमीकडे जास्त झुकलेलं असतं. कर्मभूमीचं काय? हे अनेकदा मनात येतं. त्याच विषयावरचा हा लेख.
समाजसेविका असलेल्या इराला अनिकेत जेव्हा भारतातल्या संस्थेला मोठी देणगी द्यायची इच्छा व्यक्त करतो तेव्हा सखेद आश्चर्य वाटतं. मातृभूमीच्या ऋणात रहायला हवंच पण कर्मभूमी विसरु नये हे अनिकेतला पटवून ती द्यायचा प्रयत्न करते.  इरा हे पटवून देते तेव्हा जे जग आपल्या समोर उभं करते ते मला महत्त्वाचं वाटलं. इथेही सारं काही आलबेल नाही आणि आपण ते बदलायला हातभार लाऊ शकतो ह्याचाच दाखला म्हणजे तिचं या क्षेत्रातील काम. हा लेख शारलटमध्ये गेली कितीतरी वर्ष समाजसेवा करणार्‍या मैत्रिणीच्या अनुभवावरून लिहिला. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: डिसेंबर २०१३)

बोनसाय: महत्त्वाकांक्षी स्त्री आता नवलाची बाब राहिलेली नाही. एकमेकांच्या सहाय्याने आपली महत्त्वाकांक्षा उत्तम रितीने जोपासणारे पती - पत्नीही आता अगदी सहज दिसून येतात. पण तडजोडीची तयारी दोन्ही बाजूने नसते तेव्हा  परिस्थितीच्या चक्रात भरडल्या जाणार्‍या मुलांवर जो परिणाम होतो तो या लेखाचा विषय.
डिपेंडंट व्हिसावर आलेली स्वाती स्वत:च्या शिक्षणाला अमेरिकेत वाव दिसत नाही म्हटल्यावर केदारची इच्छा नसताना मुलाला, मंदारला घेऊन  भारतात ’ट्रायल’ म्हणून  परत जायचा निर्णय घेते. सततच्या वाद - विवाद आणि चर्चेतून ती स्वत:च्या निर्णयावर ठाम रहाते. केदार मात्र अनेक कारणांसाठी अमेरिकेतच रहातो. तो भारतात येण्याची आतुरतेने  वाट पहाणार्‍या  मंदारच्या मनावर, वागणुकीवर होणारा परिणाम म्हणजेच ’बोनसाय’  लेख. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: फेब्रुवारी २०१४)

इच्छा: मृत्युची सावली पडलेल्या घरातलं शोकदायक वातावरण आणि भेटायला येणार्‍यांचं वागणं याचा होणारा मनस्ताप आपण ऐकलेला, अनुभवलेला असतो. पण घरातलेही काही जीवलगाच्या जाण्याचं दु:ख विसरतात तेव्हाची घरातल्या प्रत्येकाची मानसिक स्थिती दर्शविणारा लेख.
निलेश हा परदेशी रहाणारा आई - दादांचा मुलगा. स्मिता, सुनिल ही त्याची भारतातली भावंडं. अमेरिकेतून दादांच्या निधनानंतर दिवसांसाठी आलेला मुलगा आणि त्याची भारतातील भावंडं यांच्यामध्ये होणारे वाद, दोषारोप, उणीदुणी काढणं पाहून अखेर मुलांची आई फक्त एकच मागणं मुलांकडे मागते. तोच लेख ’इच्छा’. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: एप्रिल २०१४)

रिंगण: आयुष्यात असे काही क्षण येतात की आपण रिंगणात अडकून पडलो आहोत असं वाटायला लागतं. तशाच एका प्रसंगातून जाताना या लेखातील रमाकांतच्या शोधयात्रेच्या प्रवासाचा वेध म्हणजे हा लेख.
भारतात कायमसाठी परत चाललेला संतोष रमाकांतना भेटायला येतो आणि ३० वर्षाहून अधिक काळ इथे राहिलेल्या रमाकांतचं मन आपल्या अमेरिकेत येण्याच्या निर्णयामागची कारणं शोधायला लागतं. आई - वडिलांची इच्छा? समाजात प्राप्त होणारी प्रतिष्ठा? की स्वत:चाच निर्णय या प्रश्नांचा गुंता सोडवणार्‍या मनाचा शोध म्हणजे म्हणजे ’रिंगण’. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: जून २०१४)

सीमारेषा: परदेशात मूल वाढवताना कधी ना कधी, मायदेशीच असतो तर हा प्रश्न आणि तिथलं आणि इथलं ही  तुलना कधी उघड उघड तर कधी मनातल्या मनात केली जातेच. गिरीश, श्रावणी त्यांच्या मुलांच्या बाबतीत अशा एका प्रसंगाला सामोरे जातात आणि जर इथे राहिलो नसतो तर, भारतात असतो तर ह्या जर- तर ने श्रावणी  अस्वस्थ होते पण त्यांचा तरुण मुलगा, साकेतच त्यांची अस्वस्थता घालवायला मदत करतो. दोन पिढ्या आणि त्यांची मानसिकता आणि वेगवेगळ्या देशात मूल वाढवणं यावरचा  लेख म्हणजे ’सीमारेषा’. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: ऑगस्ट २०१४)

दोन ध्रुवांवर - परदेशात गृहीणी असणं कधीकधी किती अवघड होऊन जातं यावर प्रकाश टाकणारा हा लेख.
नोकरी न करणारी सीमा आणि सतत कामाच्या व्यापात अडकलेला निलेश यांच्या संसाराची कथा म्हणजे दोन ध्रुवांवर. परिस्थितीला दोष देता देता, निलेशला दोषी मानणारी, त्याने परिस्थितीतून काढलेल्या मार्गांचा अवलंब करायला नकार देणारी सीमा आणि सीमाला आनंदी ठेवण्यासाठी धडपडणारा पण चुकत जाणारा निलेश. कोंडीत सापडल्यासारखं आयुष्य जगताना त्यांनी स्वत:साठी निर्माण केलेलं स्थान म्हणजेच, ’दोन ध्रुवावर’ हा लेख.  (बृहनमहाराष्ट्र वृत्त: ऑक्टोबर २०१४)

मंडळोमंडळी: भारताच्या बाहेर पडलं की मराठी माणूस एकत्र येतो आणि मंडळाची स्थापना होतेच. या मंडळांवरचा हा लेख. गावोगावी असणार्‍या महाराष्ट्र मंडळात सामील होण्याची प्रत्येक मराठी माणसाची कारणं वेगळी असतात. कधी मुलांसाठी, कधी ओळखी व्हाव्यात म्हणून तर कधी मुलांना, स्वत:ला व्यासपीठ मिळावं या हेतूने मंडळाचं सभासदत्व घेतलं जातं. पण मंडळाचा कारभार आणि लोकांची मानसिकता सर्वत्र सारखीच. राधा नावाच्या एका लहानग्या मुलीच्या, तसंच नाटकवेड्या नरेन आणि मंडळाच्या कार्यकारीणीच्या नजरेतून मंडळांच्या मानसिकतेचा वेध घेणारा लेख ’मंडळोमंडळी’.  (बृहनमहाराष्ट्र वृत्त: डिसेंबर २०१४)

अळवावरचे थेंब: हातातून निसटून गेलेले क्षण अळवावरच्या पाण्यासारखे घरंगळून गेलेले असतात. तसंच आयुष्यातल्या घटनांचंही. त्याच कल्पनेवरचा हा लेख.
प्रणिता आणि तिच्या दोन मुली, तितिशा आणि दिशा.   स्पर्धेच्या युगात त्यांनी मागे पडू नये म्हणून घाण्याला जुंपल्यागत सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीत त्यांना अडकवून टाकलेल्या आई - बाबांना या मुलींनी घातलेलं साकडं म्हणजे ’अळवावरचे थेंब’ हा लेख.
(बृहनमहाराष्ट्र वृत्त: फेब्रुवारी २०१५)

धागे: परदेशात रहाताना मायभूमीतील आपल्या जीवलगांशी मुलांची जवळीक रहावी यासाठी आपण अतोनात प्रयत्न करत असतो. आशा - निराशेच्या या खेळात कधीतरी दिसणार्‍या प्रकाशाच्या तिरीपिने हरखून जायला कसं होतं यावरचा हा लेख.
 भारतातल्या नातेवाइकांपासून मुलगा अलिप्त असतो याचा सल बाळगणारे केतकी - सारंग.  नीलला त्यांच्याबद्दल ओढ वाटावी यासाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करणारी केतकी. अखेर नील महाविद्यालयीन शिक्षणासाठी बाहेरगावी गेल्यावर सगळे मार्ग खुंटल्यासारखे वाटत असतानाच नील अचानक एक सुखद धक्का देतो त्याची कथा सांगणारा लेख म्हणजे, ’धागे’.
(बृहनमहाराष्ट्र वृत्त: एप्रिल २०१५)

No comments:

Post a Comment

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.