Monday, October 9, 2017

बत्तिशी!

Marathi Culture And Festivals च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला माझा विनोदी लेख.

भल्या पहाटे कळा सुरु झाल्या. सुमुखी दाते आय ओय करत कुशीवर वळली. नवर्‍याला गदगदा हलवलं तर तो तिच्याहून जोरात ओरडत एकदम दारच उघडायला निघाला. त्याचं हे नेहमीचंच. आधी दाराकडे धावणार काही झालं तरी. पळपुटा कुठला. सुमुखी ’झोप तू’ असं फणकार्‍याने पुटपुटली आणि आय, ओय जोरात आळवत दुसर्‍या खोलीत डोकावली. चिरंजीव आडवे पडलेले. ते ढिम्म हलले नाहीत. सुमुखी तिसर्‍या खोलीत गेली. पलंग रिकामा. पळाली की काय? कुणाबरोबर? कशी? कधी? आता सुमुखी दोन वेगवेगळ्या कारणांसाठी ओरडायला लागली. पलंगाच्या पलीकडच्या बाजूला पडलेली तिची तरुण कन्यका उठून शांतपणे पलंगावर झोपली. जग इकडचं तिकडे झालं तरी या घरातलं कुणी स्वत:ची झोपमोड होऊ देणार नाही याची सुमुखीला खात्री पटली आणि इलाज नाही म्हणून आपोआप किंचित बरंही वाटायला लागलं. दातदुखी विसरुन ती पुन्हा आडवी झाली.

रात्री सुमुखीने उठवलेलंही कुणाला आठवत नव्हतं त्यामुळे तिला काय झालं होतं हे विचारणं दूरच. पण उठल्या उठल्या सुमुखीने आंतरजालावरच्या माहितीच्या पुरात उडी मारली. तिने दातदुखीची लक्षणं शोधली. त्यातली ’गंभीर’ लक्षणांची यादी आपलीच असं तिला वाटायला लागलं. लक्षणं म्हटलं की परिणाम आलेच. वेळीच उपाय केले नाहीत तर दाताबरोबर आपणही ’राम’ म्हणू शकतो हे लक्षात आल्याआल्या सुमुखीने वही पुढे ओढली. पोटदुखीने बेजार झाल्यावर लिहिलेला मागच्यावेळच्या  इच्छापत्राचा कागद तिने फाडला. नवीन  लिहायला घेतलं. गेल्यावेळेस  आधीच पोट दुखत असताना नवर्‍याने केलेल्या स्वयंपाकामुळे तिचं पोट अधिकच बिघडलं होतं. तातडीने रुग्णालयात दाखल व्हावं लागलं होतं. नवरा तुरुंगात जाऊ नये म्हणून तिने त्याला जेवण करता येत नाही त्यामुळे अपचन झालं असं रुग्णालयात सांगितलं. पण अन्नात विष घालून सुमुखीला मृत्यूच्या सापळ्यात अडकविण्याचा त्याचा बेत तिच्याहून अधिक चांगला कुणाच्या लक्षात येणार?  सुमुखीने बदला म्हणून त्या वेळेस नवर्‍याला इच्छापत्रातूनच काढून टाकलं. प्रत्येकाच्या वागण्यानुसार ती त्यांना इच्छापत्रात घालत होती, काढत होती.  तेवढ्यात तिथे आलेल्या नवर्‍यालाही तिने सुचवलं,
"तुझं एकच एक आहे इच्छापत्र. परिस्थितीप्रमाणे बदलायला हवं."
"तुझे बदल चालू असतात तेवढे पुरे. त्यासाठीच वही दिली आहे. कर तू  बदल. शेवटच्या क्षणाला जो कागद असेल ते तुझं इच्छापत्र. स्वाक्षरी करायला मात्र विसरु नकोस." नेहमीप्रमाणे आताही नवर्‍याने सांगितलं. साश्रू नयनाने तिने मुलांना बोलावून घेतलं.
"आज लिहिलंय हं पुन्हा. काय हवं - नको, कमी -जास्त करायचं आहे ते बघा."
"आई, तू एकदाच जा ना." मुलगी म्हणाली आणि दचकली. सुमुखीचा श्वास अडकला.
"अगं, मला घालवतेस की काय? काय ही आजकालची मुलंऽऽऽऽ"
"मुलं? तू काही झालं की मला पण ओवतेस त्यात." मुलाने कुरकूर केली तशी विषयाची गाडी तिच्या लेकीने मूळपदावर आणली.
"या वर्षातलं चौथं इच्छापत्र. ते घालवायचंय. तुला नाही. एकच करुन ठेव नं बाबासारखं." सुमुखीने घाईघाईत हातात धरलेला कागद फाडला.
"अगं, फाडू नकोस. वाचतो आम्ही. दे." मुलाने कागद घेतला.
"नको. विचार बदललाय माझा. परत करते इच्छापत्र." सुमुखीने पुन्हा लिहायला सुरुवात केली. ‍ संतापाच्या भरात तिने पुन्हा नवर्‍याला इच्छापत्रात भरलं. घे नतद्रष्ट कार्ट्यांचा ताबा. समजू दे तुलाही. त्या नादात तिच्या दाताचं दुखणंही बाजूला पडलं.

दोनच दिवसात गालावर हात ठेवून मलूल चेहर्‍याने सुमुखी दंतवैद्यासमोर होती. जिवणी ताणून वैद्यबुवांना हसताना पाहिल्यावर आलेला राग आवरत तिने दात दाखविण्यासाठी तोंडाचा ’आ’ वासला.
"काढावा लागेल." तोंडाचा वासलेला ’आ’ सुमुखीला बंदही करता येईना. कपड्यांना उडू नये म्हणून चिमटे लावतात तसं इथे तिचं तोंड बंद होऊ नये म्हणून लावलेला.  त्या ही स्थितीत तिला हसायला यायला लागलं.  लहानपणापासून आतापर्यंत तिने तोंड बंद करावं म्हणून ओरडणं किंवा  काकुळतीला येऊन केलेली विनवणीच ऐकली होती सर्वांची. इथे मात्र तोंड बंद करु नये म्हणून दंतवैद्यांचा  खटाटोप. काढावा लागेल म्हटल्याक्षणी तिने हाताने खाणाखुणा करुन त्यांना थांबवण्याचा आटापिटा केला.
"थांबा, थांबा." बोलण्याचा प्रयत्न करत सुमुखीने हाताने खाणाखुणा सुरु केल्यावर ते थांबले. गालात अडकवलेला चिमटा काढून त्यांनी  प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.
"दात काढून काय करायचं?" सुमुखीने भेदरल्यासारखं विचारलं. या अर्धवट वयात दात काढणार.  ना धड तरुण, ना धड म्हातारी. एक जरी दात गेला तरी भगदाड. चांगलं दिसायचं तर कायम हसायचं हे तत्त्व सुमुखी अक्षरश: रोज राबवत होती.  चिडली तरी हसतच चिडायचं कारण सतत चांगलं दिसायचं हे धोरण. आणि ही काय अवदसा सुचली इथे या दंतवैद्यजींना. काढून टाकायचा म्हणे. आणि करायचं काय?
"हा काढून टाकायचा आणि दुसरा घालायचा."  सुमुखीला तिचा दात काढणार दंतवैद्याचेच दात उपटून परत त्याच्याच घशात घालावे असं वाटायला लागलं. पण तेवढ्यात सिनेमात पाहिलेले चंदेरी, सोनेरी दातांचे नट आठवायला लागले.
"सोन्याचा दात." क्षणभर तिला मोह झाला. त्या निमित्ताने सोनं घेऊन होईल आणि ते सतत जवळ राहील.
"एक - दोन ठिकाणी चौकशी करते अजून आणि मग तुम्हाला सांगते दात काढायचा की नाही ते" सुमुखी  तिथून बाहेर पडली आणि घरी येऊन तिने सर्वांवर दात काढले.

"ही साखळी तुझ्यामुळे सुरु झाली." सुमुखीने नेहमीप्रमाणे नवर्‍यावर सार्‍या जगाचा राग काढला.
"अच्छा." त्या ’अच्छा’ मध्ये काय नवीन सांगते आहेस असं होतं. जे काही वाईट होतं त्याला तोच जबाबदार असतो तिच्यामते हे त्याला पक्कं ठाऊक आहे. उद्या जग बुडालं तरी तू नळ चालू ठेवलास म्हणून जगबुडी झाली म्हणायला सुमुखी कमी करणार नाही याची त्याला खात्री होती. पण वादाला कुठे तोंड फोडायचं म्हणून त्याने अच्छा वरच विषय संपवला. पण सुमुखीने विषयाला तोंड फोडलंच.
"आठवतंय ना, इथे आलो तेव्हा अक्कलदाढ यायला लागली होती. दंतवैद्य आणि तू संगनमताने सगळ्या दाढा काढून टाकण्याचा कट रचलात." तो प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहत राहिला.
"१९९५ सालची गोष्ट आहे ही."
"२०१७ साली पण जशीच्या तशी सांगते आहेस." त्याने तिच्या स्मरणशक्तीला दाद दिली. तिकडे दुर्लक्ष करत सुमुखी म्हणाली.
"चार, चार दाढा काढल्या एकाच दिवशी. माझं तोंड आता काही दिवस बंद म्हणून तू खूश. दोन महिन्याची कमाई एका दिवसात म्हणून वैद्यबुवा खूश."
"नाही काढणार म्हणायचंस. सोप्या गोष्टी उगाच अवघड कशाला करायच्या." सुमुखीचा नवरा तिच्याकडे न बघता म्हणाला.
"अक्कल नव्हती ना." नवर्‍याच्या मिष्किल चेहर्‍याकडे लक्ष जाताच आपण घोडचूक केली हे तिच्या लक्षात आलं.
"याचाच अर्थ अक्कलदाढ काढल्यामुळे काही फरक पडला नाही." तो हसून म्हणाला.
"त्यामुळे आली अक्कल. आता काय करु ते सांग."
"तू ठरव बाई. १९९५ ते २०१७ ऐकतोच आहे मी. त्यात भर नको." सुमुखीने फणकार्‍याने आपल्या दाताचं आपणच काय ते बघू असं ठरवलं आणि  मोहीम हाती घेतली.

नवीन दंतवैद्याने आधीच्या दंतवैद्याने सुचवलेला दात काढावा लागेल हे तर सांगितलंच वर अजून आजूबाजूचे दोन चार दात खराब झाल्याचं तिच्या निदर्शनास आणून दिलं. सगळ्या खर्चाचा विचार करता भारतात जाऊन दात उपटून यावेत की काय असंही तिला वाटून गेलं पण व्यावहारिक दृष्ट्या ते शक्य नव्हतं. मग हे सगळं जितक्या लांबणीवर टाकता येईल तितकं कसं टाकायचं याचं तिने नियोजन केलं. गूगल करुन वेगवेगळे उपाय सुरु केले. सुमुखी रोज लसूण खायला लागली. ॲपल सायडर व्हिनेगर प्यायला लागली. बेकिंग सोडा दातावर चोळायला लागली. लवंगा गालात ठेवायला लागली. नवरा म्हणाला,
"असले अघोरी उपाय करण्यापेक्षा एकदाच काय तो उपटून टाक ना."
"तुझं बोलणं अघोरी आहे. माझे उपाय नाहीत." सुमुखीने नवर्‍याची सूचना फेटाळत पुढची पायरी गाठली.
 कायप्पावरुन तिच्या शाळेतले मित्र, जे आता दंतवैद्य झाले आहेत त्यांना सल्ला विचारला. मध्या म्हणालाच,
"तेव्हा घासू म्हणून चिडवायचा तुम्ही सार्‍या आठवतंय का? आणि आता एकदम माझा सल्ला? मी घासू होतो, हुशार नव्हतो, आहे ना लक्षात." मध्याच्या दातांची नक्षी करावी असं वाटलं तरी आता काम होणं महत्त्वाचं होतं. सुमुखीने दंतपंक्ती दाखवत मधाळ शब्द त्याच्याकडे रवाना केले.
"ए, त्याचा राग काढून अजून दात पडण्याचं काहीतरी सुचवू नकोस हं." त्या शब्दांबरोबर माफ कर, हास्य इत्यादी इमोजी टाकले. सुमुखीचा मित्र पाघळला.
"३००० हजार डॉलर्स घालून दात काढण्यापेक्षा आपोआप पडेल तोपर्यंत थांब. मग पुढचं पुढे." ही कल्पना सुमुखीला एकदम पटली. तोपर्यंत तिने तशी इतर माहिती काढली होतीच. आता औषधाच्या मागे लागायचं होतं. विमाकंपन्या आणि वैद्य संगनमताने औषधं सहजासहजी हाती लागू देत नाहीत. मग सहजासहजी न मिळणारी औषधं मिळवायची कशी? ज्ञानाच्या सागरात सुमुखीने पुन्हा उडी मारली. नाना कॢप्त्या वाचून तिला डॉक्टर आणि विमा कंपन्यांना फसवणार्‍या मनुष्य समूहाचं कौतुकच कौतुक वाटलं. त्यातला एक पर्याय तिने धडक योजनेसारखा राबवला. ती थेट ’पेटको’ नावाच्या पशुपक्ष्यांच्या दुकानात पोचली.
"हे औषध पाहिजे होतं." तिने लिहून नेलेला कागद पुढे केला.
"काय झालंय माशाला?" औषधाचं नाव पाहत तिथल्या मदतनिसाने विचारलं.
"माशाला? माझ्याकडे नाही मासा."
"मग हे औषध?" मदतनीस गोंधळला.
"अरे हो, आहे, आहे मासा. माझं लक्ष नव्हतं. माफ करा हं. म्हणजे मी माझ्या दाताचाच..." सुमुखीने मानेला, केसांना आकर्षक झटका देत दात विचारातून उडवला आणि म्हटलं.
"म्हणजे माझ्या माशाचाच विचार करत होते. त्याचा दात दुखतोय हो खूप. आय ॲम व्हेरी अटॅच्ड टू हिम. एकुलता एक आहे ना."
"हाऊ स्वीऽऽऽट. आय हॅव बेटा टू." तो मदतनीस स्वत:च्या बेटा माशाबद्दल बोलायला लागला. ती संधी साधत सुमुखी म्हणाली,
" हे औषध ना गूगलवर सापडलं मला. आहे का बघा ना तुमच्याकडे."
"कुठला दात दुखतोय?" 
"डावा, खालचा. " नकळत तिने दुखर्‍या दातावर हात धरला.
"तुम्ही माश्याच्या दाताबद्दल बोलताय की तुमच्या?" सुमुखीच्या आकर्षक अदांकडे दुर्लक्ष केलं त्याने.
"दोघांच्या."
"पण दोघांनी एकच औषध घेऊन नाही चालणार."
"तुम्ही माशाचं द्या. मी ते माणसाला द्यायचं की नाही ते बघते." तिथे काही ते औषध सापडलं नाही म्हणजे त्या विक्रेत्याने तिला ते मुद्दाम दिलं नाही याबद्दल सुमुखीच्या मनात तिळमात्रही शंका नव्हती. त्याच्या कुळाचा उद्धार मनातल्या मनात करत ती पुन्हा घरी आली.

घरी येऊन तिने पुन्हा पुन्हा दात हलवून पाहिला. मध्याने म्हटल्याप्रमाणे पडण्याची चिन्ह नव्हती. काय करावं ते समजत नव्हतं. पण दाताचा काय तो सोक्षमोक्ष लागल्याशिवाय सुमुखीला चैन पडत नव्हतं. विचाराच्या नादात ती जिन्याच्या पायर्‍या चढली आणि सुमुखीचा पाय घसरला. दुखावलेला पाय हळुवार हाताने कुरवाळत असतानाच तिला तो सुजल्यासारखा वाटायला लागला. चालायचा प्रयत्न करतानाच आपल्याला चालता येत नाही हे जाणवलं.
"ओय, ओय, ओय..." ती जोरात ओरडली. घरात कुणीच नव्हतं त्यामुळे कुणी आलं नाही. आणि असते तरी आले असते का प्रश्न तिने स्वत:लाच विचारला. उत्तर मिळेना. तिने बाजूला पडलेला फोन उचलला आणि माहितीच्या सागरात परत एक डुबकी मारली. मुरगळलेल्या पायाचं पुढे काय होईल हे तिला पाहायचं होतं. त्यामुळे तिच्या दाताचंही दु:ख बाजूला पडलं. आता पाय महत्त्वाचा होता. चौतीस दातातला एखादा गेला तर ठीक पण दोनातला एक पायच गेला तर? ताबडतोब इच्छापत्रात बदल करायला पाहिजेत. लंगडत ती तिच्या खोलीत पोचली आणि वहीतला आधीचा कागद फाडत, पाय चेपत तिने तिचं इच्छापत्र बदलायला सुरुवात केली. -- मोहना


No comments:

Post a Comment

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.