Thursday, March 29, 2018

भेट

या वेळच्या भारतभेटीत जवळजवळ ३० वर्षांपूर्वी मनात कोरलेलं चित्र पुन्हा प्रत्यक्षात पाहायला मिळणार याबद्दलची उत्सुकता उत्कट होती. मनात कोरलेलं चित्र बदललेलं असणार हे ठाऊक असलं तरी जे जे आठवतंय ते तिथेच आहे हे पाहताना ते ’वय’ पुन्हा एकदा अनुभवल्यासारखं वाटतं किंबहुना त्यात डुबकीच मारली जाते. त्यावेळेला केलेल्या गोष्टी पुन्हा एकदा कराव्याशा वाटतात आणि लक्षात येतं किती मागे टाकून आलोय आपण हे सारं. असं व्हायला नको. मनाचं बालपण जपायला हवं!

भारत भेटीत हे बालपण पुन्हा आजूबाजूला बागडलं. निमित्त दोन. पूर्वीच्या शेजार्‍यांनी एकत्र भेटणं आणि शाळेचं स्नेहसंमेलन. कधी एकदा पालघरला पोचतोय असं झालं होतं . पोचल्यावर तिथेच जन्मापासून राहणार्‍यांना उतावीळपणे पुन्हा गावदर्शन घडवलं माहितगार आपणच असल्यागत. शाळा, पूर्वीचं घर या रस्त्यांवर काय काय आठवतं, कुठे, कसं जायचं त्याच्या खाणाखुणा सांगितल्या. या खाणाखुणा सांगताना, बघताना एकाचवेळी आनंद होत होता आणि सखेद आश्चर्यही वाटत होतं. झालेले बदल आणि पडझड पाहून!
आम्ही सरकारी क्वार्टर्समध्ये राहणारी सगळी मुलं एकत्र आलो. त्यावेळी कामं करणारे शिपाई, ड्रायव्हरही आवर्जून भेटायला आले सर्वांना. त्यावेळी प्रत्येकजण कसं होतं हे नव्याने उलगडलं. कोण कसं वागायचं, किती भांडायचो, होळीसाठी मालगाड्यातून येणारं गवत घेऊन यायचो, शेण गोळा करत फिरायचो, पाईपमध्ये स्वयंपाक करायचो, १० पैसे देऊन शाळेच्या वसतीगृहात दूरदर्शनवरचे चित्रपट पाहायला जायचो, जत्रेत धुमाकूळ घालायचो, क्रिकेट खेळायचो, टुरींग टॉकीजमध्ये सगळे एकत्र चित्रपट पाहायचो.....काय न काय!

२४ फेब्रुवारी संपूच नये असं वाटत असतानाच उजाडला २५ फेब्रुवारी. या दिवसाची किती आतुरतेने वाट पाहत होते. आर्यन शाळेचं १० वीच्या वर्गाचं गुरु - शिष्य संमेलन. माझ्या मित्र मैत्रीणींनी मनाचा मोठेपणा दाखवून चक्क मला ’पाहुणी’ केलं. कार्यक्रमाचे पैसे भरायला लागणार नाहीत इतकाच अर्थ काढून मी निश्चित्त झाले. प्रत्येकाने आता आपण काय करतो इतकं सांगितलं की झालं म्हटल्यावर तर आणखीनच सुखावले. फार काही बोलावं लागणार नाही याची खात्री झाली. पण शाळेतल्या सवंगड्यांचा भरवसा कुणी देऊ नये हेच खरं हे तिथे गेल्यावर कळलं. मी नुसतीच पाहुणी नव्हते तर प्रमुख पाहुणी होते. शिक्षकांसमोर प्रमुख पाहुणी होणं अवघड वाटलं पण विद्यार्थ्यांची प्रतिनिधी म्हणूण दीप प्रज्वलन केलं. ज्या शिक्षकांना कायम आमच्या उज्वल भवितव्याची चिंता असायची त्यांच्यासमोर आम्ही जवळजवळ ५० जण त्यांच्या कर्माचं फळ म्हणून उभेच ठाकलो. आपल्या विद्यार्थ्यांनी गेल्या ३० वर्षात काय दिवे लावले आहेत याबद्दल शिक्षकांना उत्सुकता होती आणि सुदैवाने आम्ही फार निराशा केली नसावी असं शिक्षकांच्या चेहर्‍यावरचा ओंसडून वाहणारा आनंद दाखवत होता. विद्यार्थी आणि शिक्षक सारेच भारावून गेले एकमेकांच्या भेटीने!

त्यावेळी मुलामुलींनी एकमेकांशी बोलणं फार प्रचलित नव्हतं पालघरमध्ये. त्यामुळे सारे नावापुरतेच वर्गमित्र होते. पण खरं तसं नसणार. बोलणं नसलं म्हणून काय झालं निरीक्षण असतंच ना:-). हे सार्‍यांच्याच एकमेकांशी बोलल्यावर लक्षात येत होतं. त्यावेळच्या पुसटशा ओळखीला जिव्हाळ्याचा रंग चढत होता. गप्पा, हसणं - खिदळणं, आठवणी यात ती सुरेल संध्याकाळ कधी संपली ते कळलंच नाही. परतीच्या वाटेवर मन प्रसन्न होतं, पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत होतं. ओंजळीत गोळा झालेल्या या क्षणांमध्ये अशीच भर पडू दे, पुन्हा पुन्हा अशा क्षणांची बरसात होऊ दे हीच इच्छा!

पालघरला जायचं त्यामुळे रत्नागिरी झालंच नाही. पण तरी रत्नागिरीच्या आम्ही पुण्यात भेटलो हे काय कमी!

पालघरला जाण्यापूर्वी झालेली कविता

आपण काळाची पानं पुसतोय
मनाचं यौवन जपतोय
अधीरतेचा लंबक हेलकावतोय
मनाचा मोरे थुई थुई नाचतोय!

मन आणि वय शोधतंय बालपण
आठवणींच्या अंगणात आनंदाचे क्षण
गुंफूया मनाच्या माळेत कण न कण
राहू दे बाजूला आता आपलं मोठेपण!

असेच भेटत जाऊ, मैत्र जपत राहू
बालपणाची झूल अंगावर लेऊ
वयाचा प्रवास उलटा करु
मैत्रीची ज्योत पेटती ठेवू!





No comments:

Post a Comment

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.