Tuesday, November 13, 2018

दुकान, गिरण आणि...

अनुराधा २०१८ दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध
काटकुळ्या शरीरयष्टीचा त्रिंबककर पिशवी हलवत बाजारातून साहेबांच्या घराकडे निघाला. रस्त्याच्या कडेने सवयीने अंग चोरत तो पावलं टाकत होता. चालता चालता ’थूऽऽऽ...’ विचित्र आवाज करत पान कोंबलेल्या तोंडानेच तो रस्त्याच्या बाजूला थुकला. त्याचे एक दोन थेंब फाटक्या विजारीवर उडाले. त्याला दु:ख झालं. घरी गेल्यावर कैदाशीण जिवंत ठेवणार नाही याची त्याला खात्री होती. थुकी लावून ते छोटे ठिपके त्याने घालवायचा प्रयत्न केला पण विजार आणखीनंच रंगली. काय करावं ते त्याला कळेना तितक्यात कुणीतरी त्याच्या पाठीवर जोरात थाप मारली. त्याचं बारकुळं शरीर हादरा बसल्यासारखं डळमळलं. कसाबसा त्याने तोल सांभाळला. पुढे आलेले दात दाखवत वर्दमशी तो दोन शब्द बोलला आणि मार्गाला लागला. साहेबांची बायको त्याच्या बायकोच्या वरताण होती. उशीर झाला भाज्या आणायला तर उशीराबरोबर तिने त्याचं अजागळासारखं राहणं, सतत पान खाणं, त्याच्यावर होणारा खर्च, आजार सगळी जंत्री लावली असती. आणि साहेबांची हरामखोर कार्टी आणि तिच्याबरोबरची  क्वार्टर्समधली माजोरडी पोरं; त्याला ठाऊक होतं त्याची पाठ फिरली की सगळीच त्याच्या दुडक्या चालीची खिल्ली उडवतात. त्याची मुलं असती तर तुडवून काढलं असतं त्याने. तो भराभर पाय उचलायला लागला.  साहेबांच्या घरी भाजीची पिशवी आपटली की घरी जाता येणार होतं. वाटेत एक दारुची बाटली ढोसली की झालं. भाजीच्या पैशातले तसे त्याने बरेच पैसे ढापले होते. त्या पैशातून पहिल्या धारेची घेता आली असती.  मळकट लेंग्याच्या खिशात हात घालून त्याने नोटा चाचपडल्या आणि बंगल्याच्या दिशेने तो चालत राहिला. बंगल्यावर पोचल्यावर साहेबांच्या बायकोने तोंड सोडलंच,
"त्रिंबककर, किती वेळा सांगितलं भाजी निवडून घ्यायची. कुसलेली आहे सगळी." त्रिंबककर रंगलेले दात दाखवून ओशाळवाणं हसत राहिला. खरं तर त्याला म्हणावंसं वाटत होतं, ’अगं बये, तू कर  बाजार इतकी मस्ती असेल अंगात तर. तुजा घोव सरकारचा नोकर, मी त्येचा. पन घरगड्यागत राबवते तू मला महामाये.’ पण नेहमीप्रमाणे त्रिंबककरने ते शब्द मनातल्या मनात गिळून टाकले. त्याचं सगळं लक्ष खिशातल्या नोटांकडे लागलं होतं. एकदा दारुची बाटली तोंडाला लागली की त्याचा जीव शांत होणार होता.

साहेबांच्या घरातून बाहेर पडायला सात वाजले. दिव्यांच्या अंधुक प्रकाशात रस्ता पिवळसर दिसत होता. नगरपरिषदेचा भोंगा वाजायला लागला तसा त्रिंबककर वैतागला. काय सारखा ठणाणा बोंबलतो हा भोंगा. तो मनातल्या मनात कुरकुरला. त्याने पुन्हा एकदा पैसे चाचपले.  साटम दिसल्या दिसल्या धूळ झटकत लेंग्याला हात पुसून तो पारावर साटम शेजारी बसला.
"बाटली आन्लीस का?" बसल्याबसल्या त्याने कुजबूजल्यासारखं विचारलं.
"आनली. तीस दे."
"इतकं न्हाईत." त्रिंबककरने दहाच्या दोन नोटा त्याच्या हातात कोंबल्या. साटमने त्रिंबककरला देण्याआधी बाटली तोंडाला लावली. पाव बाटली संपवल्यावर त्याने ती त्रिंबककरच्या हातात ठेवली. त्रिंबककर खिक्ककन हसला.
"दहा रुपयाची नरड्याखाली घातलीस नव्हं. तिच्यामारी." पण दारु प्यायला कुणीतरी बरोबर आहे यामुळे तो खूश होता. दोघं सुखदुखा:च्या गोष्टीत रंगून गेले. सायबाच्या घरात त्याच्या बायकोने सर्वांना कसं ताब्यात ठेवलंय हे सांगताना त्रिंबककरला हसू आवरत नव्हतं. साटमने सुद्धा बिगारीची कामं करणारी भिकू सातपुतीण कंत्राटादाराला ’लागू’ आहे याचे असंख्य पुरावे दिले. बायकांना वेळीच आवरलं नाही तर त्या मोकाट सुटतात यावर दोघांचं एकमत झालं. दोघंही आपल्या बायकांना आपण कसं त्याब्यात ठेवलं आहे याबद्दल बढाया मारत राहिले ते साटमची बायको तिथे येईपर्यत.
"मुडदा बसवला मेल्या तुजा. गिलायचं हाय का न्हाय? कोन आननार रं बाजार आजचा?..." पारावर बसलेल्या टोळक्याच्या नजरा त्या तिघांच्या दिशेने वळल्या. बायकोची टकळी थांबणार नाही हे ठाऊक असूनही साटम तसाच बसून राहिला. साटमच्या बायकोचं डोकं फिरलंच. तिने त्याच्या हातातली बाटली हिसकावली आणि तिथेच पारावर आपटली. साटम लगबगीने उठला. बाटलीतली दारु आधीच संपविल्याचा त्याला आनंद झाला. त्याच्या चेहर्‍यावरची सार्थकता त्रिंबककरने ओळखली. त्याने तोल सांभाळत उठलेल्या साटमकडे मिश्किल नजरेने पाहिलं. त्यांची नजरानजर साटमच्या बायकोने पकडलीच. तिने त्रिंबककरकडे जळजळीत कटाक्ष टाकला. त्रिंबककरने मान खाली घातली.
"चला..." ती साटमवर खेकसली. ती पुढे, आणि तिच्या मागे भेलकांडत जाणार्‍या साटमकडे पाहत पारावरच्या टोळक्याची  थोडावेळ करमणूक झाली. त्रिंबककरही पाय हलवत तिथेच बसून राहिला ते त्याचा मुलगा येईपर्यंत.
"बाबा, आई वाट बघतेय केव्हाची." स्वत:ला सावरत त्रिंबककर कसाबसा उठला. राजेश आला की त्रिंबककरला धास्तावल्यागत होई. मुलाची सरबत्ती सुरु होण्याआधीच ताठ उभं राहण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला,
"शान्यसारकं वागायचं. व्हय ना? आता वागनार हाय मी शान्यासारका."  तोल सावरत, दात दाखवत, लटपटत तो राजेशबरोबर चालायला लागला. "दारु पियाची नाय, व्यसन हाय ते. मानूस मरतं. आनि परमानिक आसलं की टाईम लागला तरी सगलं चांगलं व्हनारच. व्हय ना? माजी गिरन व्हनार, दुकान बी व्हनारच." त्रिंबककरचं बरळणं चालूच होतं. "बाला, ए बाला,  तुला तुजा मास्तर ना कायबी सिकवतो. फकस्त वंगालच व्हतं परमानिक मानसांचं."  चालता चालता राजेशच्या हातातला हात सोडवायचा त्रिंबककर प्रयत्न करत राहिला. पण राजेशची पकड घट्ट होती. चाळीपाशी आल्यावर राजेशनेच त्रिंबककरचा हात सोडला. रॉड्रीक्सच्या चाळीत कालवणाचा घमघमीत वास पसरला होता. त्याची भूक चाळवली. आत जाऊन त्याने फतकल मारली. बायकोने त्याच्यापुढे ताट आपटलंय हेही त्याच्या लक्षात आलं नाही.  तो बकाबका खात सुटला. आता यापुढे एकही घास खाता जाणार नाही हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याचं लक्ष सुका भात चिवडणार्‍या दोन्ही मुलांकडे आणि बायकोकडे गेलं. तो ओशाळला.
"तुमचं जालं नवतं व्हय." तो दात दाखवत हसत म्हणाला. त्रिंबककर कसाही हसला तरी ते केविलवाणंच वाटायचं.  धर्मेन्द्र त्या हसण्याने वैतागला.
"कदीच कसी आमची प्वाटं दिसत न्हाइत रं तुला?" केसाची झुलपं वाढवलेल्या धर्मेन्द्रकडे त्रिंबककर पाहत राहिला. ’आक्सी धरमिदंरवानी दिसतु लेकाचा.’ त्याला कौतुक वाटलं.  त्याच्या तरुणपणी टुरींग टॉकीजमध्ये जाऊन राजेश खन्ना आणि धर्मेन्द्रचे पिक्चर पाहायचा तो. एकदोन वेळा त्याने आपल्याला त्यांच्यासारखंच बनायचंय असं त्याच्या मित्रांना बोलूनही दाखवलं होतं. त्यावरुन कितीतरी दिवस त्याला सगळे चिडवायचेही. पण धर्मेन्द्र व्हायला नक्की काय करायचं ते ठाऊक नव्हतं त्यामुळे त्याने तो नाद सोडून दिला होता. मुलं  झाल्यावर मात्र त्याने राजेश आणि धर्मेन्द्र नावं ठेवली मुलांची.
"तू  धरमिंदरवानी दिसाया लागला रं." कौतुकाने तो म्हणाला.
"उगाच चढवू नका बाबा त्याला." राजेश वैतागला.
"तू गप रे. सालत जातो तर लइच सिकवायला जातो सारका." धर्मेन्द्र खेकसला. राजेशने दुर्लक्ष केलं.  त्रिंबककरच्या मनात काहीतरी घोळत असावं. तो धर्मेन्द्रला म्हणाला,
"तुजी साला न्हाय ना. मग उद्या सायबाकडं कामाला ये माज्याबरुबर. जादाचं काम हाये उद्याच्याला." धर्मेन्द्रने नकारार्थी मान हलवली.
"तू सालंत जातोस म्हनून इचारत नाइ मी. पण तू जमवसील का?" राजेशला नाही म्हणावंसं वाटत होतं. उत्तर न देताच तो पानावरुन उठला. त्रिबंककर त्याच्याकडे पाहत पुटपुटला.
"इचित्रच हाय हा पोरगा. सायबाकडं चल म्हटलं की टकुरं पिरल्यागत करतो." पिरताला राजेशच्या मागून उठून जावंसं वाटत होतं पण ताटातला उरला सुरला भातंही त्रिंबककरच्याच पोटात जाईल या काळजीने ती उठली नाही.

स्वयंपाकघरातल्या ट्रंकेवर बसून राजेश विचारात गढला. साहेबांच्या घरी कामाला जाणं म्हणजे संकट वाटायचं त्याला. बागेची, माळ्याची स्वच्छता, फांद्या कापायच्या असं काही ना काही काम असायचं. त्रिंबककरला मदत करायची त्याची तयारी होती पण साहेबांची मुलगी त्याच्याच वर्गात होती आणि साहेबांच्या बायकोचं अतिकौतुक त्याला अजीर्ण व्हायचं. राजेश परिस्थिती समजून घेऊन कामं करतो आणि आपल्या लेकीला कशाची किंमत नाही हे उगाळत राहणार हे ठरलेलं. दोघं कानकोंडे होऊन जात. पण बाबांना नाही म्हणणंही नको वाटत होतं. चार पैसे हातावर टेकवत होती साहेबांची बायको, झालंच तर आईसाठी एखादी जुनी साडी मिळेल हे  ठाऊक होतं राजेशला. हे सारं, तिचं उतू जाणारं कौतुक टाळायचं म्हणून नाकारायचं का आतापर्यंत दाखवला तसा कोडगेपणा दाखवायचा? काही झालं तरी त्याला आता लवकर  मोठं व्हायचं होतं. परिस्थितीपासून सुटका करुन घ्यायची होती. स्वत:ची, जमलं तर घरातल्या सगळ्यांची. नाहीतर फक्त त्याची आणि आईची तरी. दारुड्या बापाबद्दल त्याला आस्था नव्हती आणि मटक्याचा नाद लागलेल्या धर्मेन्द्रपुढे त्याने हात टेकले होते.  तो विचार करत बसून राहिला. तेवढ्यात धर्मेन्द्र समोर येऊन उभा राहिला.
"तू बस  बेवड्याबरोबर  फालतू कामं करत. दुकान आनि गिरन टाकायची हाय त्येला. पैका लागतो त्ये ठाव हाय ना? मी मटक्यात पैका मिळाला की चाललो मुंबयला. खरा धरमिंदर व्हतो की नाय बग."
"जा." रुक्ष स्वरात राजेश म्हणाला.
"राजेस, या सिक्सनाने तुजं काय बी भलं व्हनार न्हाय. दहावी पास ला कोन नाय इचारत."
"मी पुढे शिकणार आहे."
"पैका लागतो. हाय का तो आपल्याकडे. बगू. हात पुडं कर."
"नाही." धर्मेन्द्रने त्याचा हात ओढलाच. काही कळत नसतानाही राजेशच्या हातावरच्या रेषा निरखीत तो म्हणाला,
"वंगाल हाय तुजं नसीब. दरिद्री बापाच्या पोटी जलमलास आनि  इमलं बांदतोय सायेब व्हन्याचे."
"धर्म्या, तू जरा नीट बोल रे. पाचवीपर्यंत शिकलायस ना? काय ही भाषा."
"गप ए. उचकवू नको हा मला. मी कसाबी बोलन. तू न्हाय मला सिकवायचं.  समजलं ना." धर्मेन्द्रच्या मग्रुरीने राजेश वैतागला.
"पुरे मग. बोलूच नकोस काही. बाबांच्या पण डोक्यात असंच खूळ होतं नट व्हायचं. जे त्यांनी केलं तेच तू करु नकोस धर्म्या. डोळे उघड. कामाला लाग." धर्मेन्द्र खी खी करुन हसला. बाजूलाच भिंतीला टेकून त्यांचं संभाषण ऐकणार्‍या पिरताचं मस्तक फिरलं.
"टकूर्‍यात हानीन हा धर्म्या. राजेस सांगतोय ते घे मनावर. रस्त्यावर चल खडी टाकायला. मुकादमाशी बोलते मी. नट व्हायाचं म्हनं. तो येडा बग.  नट व्हनार व्हता. दारुड्या जाला आनि सगल्या आयुक्शाचा पिक्चर केला मुडद्यानं. आता गिरन खोलनार आनि दुकान चालवनार म्हनत गावभर फिरत असत्यो." पिरताची बडबड चालूच राहिली.  त्रिंबककर खोलीत डोकावला तसं दारुच्या भपकर्‍याने त्या एवढ्याशा खोलीला विळखा घातला. धर्मेन्द्रने नाकावर हात धरला. त्रिंबककरने त्याच्या नाकावरचा हात बाजूला ओढला.
"बापाला हिनवतोस? साल्या, एक दिवस तुजा बाप पैक्याची पोती आनल. माज नाय करायचा. समजलं काय? मा - ज करायचा नाय. दुकान जालं की सेट व्हसील तू. गिरनपन आसल." त्रिंबककरच्या तोंडातून शब्द धड बाहेर पडेनासे झाले तसं नाईलाज झाल्यागत तो आडवा झाला.  तिघंही त्या खोलीतून बाहेर पडले. बाहेरच्या खोलीत संतरजी घालून अंग टाकलेल्या तिघांना त्रिंबककरच्या घोरण्याच्या आवाजात कधीतरी झोप लागून गेली.

जड झालेलं डोकं कराकरा खाजवीत त्रिंबककर उठला. राखुंडीने दात चोळता चोळता त्याचं  विचारचक्र चालू झालं. वैतागला होता तो या आयुष्याला. कसलं सालं आयुष्य हे? नट होता आलं नाही. आता हे कुत्र्यासारखं जीणं. कशाला? कुठूनतरी पंचवीस हजाराची व्यवस्था व्हायला हवी. किराणामालाचं दुकान टाकायचं.  शेठसारखं बसायचं. मुलं आणि बायको पण दुकानातच काम करतील. बाजूला गिरण. बास. आता हेच करायचं. पैशाची व्यवस्था करायची आणि मग राजावाणी जगायचं. खळखळून चूळ भरताना मनातल्या या विचारांनी त्याला ताजतवानं केलं.
"चला." राजेश तयार होऊन उभा होता.
"कुटं?" त्रिंबककरने आश्चर्याने विचारलं.
"साहेबांकडे. काल म्हणाला होता ना तुम्ही." त्रिंबककर एकदम भानावर आला.
"हा. हा ते होय. सालंत न्हाय जायाचं का तुला?"
"काम झालं की तिकडूनच जाईन." काही न बोलता दोघं निघाले. वाटेत त्रिंबकरला राहवलं नाही. त्याने दुकान, गिरण सगळे बेत राजेशला पुन्हा सांगितले.
"आपन लइ गरीब मानसं पन सपान बगायला  पैका नाय पडत." केविलवाणं हसून त्याने पुस्ती जोडली. राजेशला गहिवरुन आलं.
"कधीतरी आपलं स्वप्न पूर्ण होईल. स्वप्नं पाहणं जसं आपल्या हातात असतं तसंच पूरं करणंही. नेकीने काम करत राहिलं की पाहिजे ते मिळतं बाबा. दारुचा नाद सोडा तुम्ही तरच या स्वप्नांना अर्थ आहे..." त्रिंबककरला राजेश काय बोलतोय ते पचवणं जड गेलं. पण नेहमीसारखंच काहीतरी भारी बोलला असणार पोरगा याची त्याला खात्री होती. त्याच्या दुडक्या चालीत उत्साह संचारला. दोघंही आपापल्या बेतांची मनात उजळणी करत साहेबांच्या घरी कामं करत राहिले. राजेशला साहेबांच्या मुलीची चाहूल लागली की थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं पण ती तिच्याच नादात होती. शाळेतही कधी तिने कुणाला सांगितलं नव्हतं तो त्यांच्या घरी कामाला येतो ते. आता फक्त तिच्या आईचं व्याख्यान नको अशी मनोमन प्रार्थना केली त्याने. पण वेळ आल्यावर निर्विकार मनाने सगळी बडबड त्याने कानाआड केली. शाळेत न जाता आईसाठी दिलेली साडी आणि पैसे घेऊन घराच्या दिशेने तो धावत सुटला. त्रिंबककर आनंदाने खुललेला राजेशचा चेहरा मनात साठवत कामाला लागला. दिवसभर कामाच्या नादातही किराणा मालाचं दुकान टाकायला पैसे कुठून आणायचे याचाच विचार चालू होता त्याच्या मनात.

संध्याकाळी पारावर बसलेल्या साटमलाही त्याने अनेकदा सांगितलेला बेत पुन्हा सांगितला. बराचवेळ मनातलं स्वप्न शब्दांनी तो स्वत:च्या, साटमच्या डोळ्यासमोर उभं करत राहिला.  साटमला आधीच चढली होती. आणखी रिचवत तो मान डोलवत राहिला. लांबून त्याला त्याची बायको दिसली तसा त्याने तिथून पळ काढला. त्रिंबककर बसून राहिला. काळोखात पार बुडून गेला तरी त्याला तिथून उठण्याची इच्छा होईना. पारावर कुणीच उरलं नव्हतं. तो रस्त्याकडे नजर लावून बसला. तुरळक गाड्यांची ये - जा आणि अधून मधून जाणवणारा पायरव. बाकी सारं शांत होतं.  पेंगुळलेला त्रिंबककर मध्येच रस्त्यावरुन जाणार्‍या गाडीच्या आवाजाने दचकत होता. शेवटी त्याने आपलं अंग पारावर टाकलं. पारंब्यांच्या काळोखात दिसणार्‍या विचित्र आकारांकडे तो कपाळावर हात टेकून पाहत राहिला. आपसूकच त्याचे डोळे मिटले. घाबरुन तो जागा झाला ते किंचाळीच्या आवाजाने. काहीतरी भयानक स्वप्न पडलं असं वाटलं त्याला. कसाबसा तो बसता झाला आणि रस्त्यापलिकडचं दॄश्य पाहून त्याचा बारकुंडा देह थरथरायला लागला. अंधारात चकाकणारा सुरा बघून त्याची घाबरगुंडी उडाली. ओरडावंसं वाटत होतं पण तोंडातून अवाज निघेना. सावंत असावा तो. झिंगलेल्या अवस्थेत आणि काळोखातही त्याने ओळखलं. त्रिंबककर मागच्यामागे  पळत सुटला. सावंतने कुणाला मारलं? सावंतचे उद्योग गावाला नवीन नव्हते. येताजाता शिवीगाळ, धमक्या, मारहाण असं कानावर यायचं त्याच्याबद्दल. तोच असणार.  पण किंचाळलं कोण ते त्रिंबककरला कळलं नव्हतं.  त्याला त्याची पर्वाही नव्हती. कसंही करुन त्याला स्वत:ला वाचवायचं होतं. सावंतने गाठलं तर? तो जीव खाऊन पळायला लागला. अचानक त्याचा तोल गेला. कुणीतरी ढकललं होतं त्याला . सावंत? पण मागे वळून बघण्याआधीच त्याची  दारुने पोखरलेली कुडी जमिनीवर आपटली. चेहरा दगडावरच आपटला नेमका. कपाळातून रक्ताचे ओघळ वाहायला लागले.  ओघळणार्‍या रक्ताचा स्पर्श जाणवायला लागला तसा त्रिबंककर घाबरला. आपण मेलो याची त्याला खात्रीच पटली. कुणाचातरी आवाज कानापाशी जाणवत होता. उत्तर देण्यासाठी तो  तोंड उघडू पाहत होता पण त्याच्या हालचाली मंदावल्या. हळूहळू सारं शांत झालं.

त्रिंबककरने डोळे उघडले तेव्हा घरात विचित्र शांतता होती.  आपण जिवंत आहोत हे त्याला जाणवलं तसा तो एकदम उठायला गेला. पिरताने त्याच्या खांद्यावर तिचा दणकट हात ठेवला. त्रिंबककरने तिच्याकडे केविलवाण्या नजरेने पाहिलं. बाजूला राजेश आणि धर्मेन्द्र. त्याला कळेना सगळी त्याच्याभोवती का जमा झाली आहेत. अंग ठेचकाळल्यासारखं दुखत होतं पण निकराने तो उठून बसला. तेवढ्यात राजेश आणि धर्मेन्द्र त्याच्यासमोर येऊन बसले.
"काल रातच्याला तू त्या सावंताला पायलंस का?" त्रिंबककरला काही आठवत नव्हतं. कपाळाला बांधलेल्या पांढर्‍या फडक्यावरुन त्याने हात फिरवला.
"लई दुखतंया. काय जालंय?"
"बेशुद्ध होऊन पडला व्हतास ."
"रात्र झाली तरी आला नाहीस म्हणून शोधत होतो. तेव्हा सापडलात. त्या खवळेच्या घराच्या बाजूला पडला होता. तसंच दवाखान्यात नेलं." राजेशने व्यवस्थित काय झालं ते सांगितलं.
"बाबा, तू त्या सावंताला पायलं का? पटकन सांग." धर्मेन्द्र घायकुतीला आला.
"बाबा, पटकन सांगा." राजेशचा आवाज ऐकून मात्र त्रिंबककर सुतासारखा सरळ झाला.
"हा, म्हनजी त्यो सावंतच व्हता असं वाटतंया."
"पन जालं काय? पलत व्हतास म्हनं." धर्मेन्द्र फिस्सकन हसला तसा त्रिंबककरला राग आला.
"मग काय मराया पायजे व्हतं की काय? त्यो मानूस हाय का मेला? सावंताचं काम ना हे? साला, त्येचं रगत तसलंच हाये. सगल्यांच्या जमिनी गिलनार. लई तरास हाय या मानसाचा. आता खूनखराबा बी सुरु केल्यान की काय?"
"खूनखराबा सोड. त्यो तुजं सपान पुरं करनार हाय." धर्मेन्द्रच्या आवाजातला उत्साह पाहून तो खोटं बोलत नाही याची खात्री पटली होती त्रिंबककरला.
"सपान? माजं? त्येला कसं माहित माजं सपान? आनी त्यो कसापायी पुरं करनार त्ये?" त्रिंबककरला काय चाललंय तेच कळत नव्हतं.
"तुजं त्वांड गप करायला तुजं सपान पुरं करत्यो म्हनाय लागलाय." धर्मेन्द्रच्या आवाजात उतावीळपणा होता.
"बाबा, तुमचं स्वप्न अख्ख्या गावाला ठाऊक आहे. येता जाता सांगता तुम्ही प्रत्येकाला." राजेश हसत म्हणाला. त्रिंबककर लाजलाच.
"पन..." राजेश आणि धर्मेन्द्र त्रिंबककरशी बोलत असतानाच सावंत आला. नुसताच बसून राहिला. उत्सुकतेने तिथे थांबलेले दोघं उठले शेवटी. पिरता चहाचं निमित्त करुन उठली. आता सावंतने तोंड उघडलं.
"पॉईटवर येतो मी डायरेक्ट. मी काय पवाराला दगाफटका केलेला नाही. धडा शिकवला. पायावर निभावलं. ऐकंना किती समजावून सांगितलं तरी. किती दिवस सांगतोय जमिन विक पण नाय. चांगला रेट देतोय. तरी बापजाद्याची जमीन नाही द्यायची म्हणून हटून बसलाय. आता बरा आहे. पण महिना जाईल चालायला लागेस्तो. तुला पाहिलं मी लेका. पळालास कशाला?" थोडावेळ त्रिंबककर काहीच बोलला नाही. वाट बघून सावंतने पुन्हा तोच प्रश्न विचारला.
"घाबरलो." चाचरत त्रिंबककर म्हणाला.
"मीच आलो मागून तुझ्या. पवारासारखा धडा तुला पण शिकायचा आहे का?" हळूहळू सावतंच्या आवाजात मग्रुरी डोकावायला लागली. पिरता कधी एकदा चहा घेऊन येईल असं झालं त्रिंबककरला.
"नशीब डोक्यावर निभावलं." त्रिंबककरला आता सारं स्पष्ट आठवलं. सावंतनेच ढकललं होतं तर. काही न बोलता दात दाखवत ओशाळं हसत तो सावंतकडे बघत राहिला.
"तर तो पवार जमिन देईलच आता. पण आखडू बेणं आहे. जोपर्यंत माझं काम होत नाही तोपर्यंत काय चान्स नाही घेणार मी.  तुझं स्वप्न पुरं करणार आहे मी."
"का?" पटकन त्रिंबककरच्या तोंडून गेलं.
"तोंड बंद ठेवायला. उद्या पंधरा हजार घेऊन जा. दुकान सुरु कर. गिरणीसाठी नंतर लागतील तसे देईन." तो पुढे काही बोलणार तेवढ्यात पिरता चहा घेऊन आली.
"तुजा पैका नको आमाला सावंता. या भानगडीत नाय पडनार आमी."
"वैनी, मोठी रक्कम आहे. पवार जाणार नाही पोलिसात याची खात्री आहे मला. तसा मला कसलाच धोका नाही तरी देतोय मी. विचार करा. त्रिंबककर संध्याकाळपर्यंत काय ते सांग. पैसा मिळाला की तोंड गप ठेवायचं." सावंत निघून गेला.

राजेश, धर्मेन्द्र परत आत येऊन बसले.
"पवारच्या जखमा गंभीर नाहीत. पण तुम्ही एकमेव साक्षीदार आहात. वेळ आलीच तर तोंड बंद ठेवण्यासाठीचा आकडा आहे हा." त्रिंबककरने चमकून राजेशकडे पाहिलं.
"तू पैका वाढवून माग. सावंत न्हाई म्हनायचा नाही. चान्स हाय हा चांगला बाबा.  सिरीमंत व्हता यिल आपल्याला. पंधरा हजारात दुकान नाय व्हनार" धर्मेन्द्र कुजबूजत बराचवेळ सांगत राहिला त्रिंबककरला. दोघांचं बोलणं राजेश शांतपणे ऐकत होता. त्यांचं बोलणं संपल्यावर त्रिंबककरने राजेशकडे पाहिलं.
"बाबा, असलं काही करायचं नाही." राजेशच्या आवाजात ठामपणा होता.
"घ्या वो बाबा तुमी. इतका पैका नायतर आपल्याला कोन देनार. काय करसील रं बाबानं पैका घेतला तर? " धर्मेन्द्रने गुरकावत राजेशला विचारलं.
"तू भरीला घालू नको बाबांना. आणि तसं केलंत बाबा तर तुमचा माझा संबंध संपला." त्रिंबककर राजेशकडे पाहत राहिला.
"आरं, आसं नको बोलू रं. इतका पैका हाडाची काडं केली तरी नाय गावायचा. लक्स्मी आली हाये दारात तर...."
"खोटं बोलायला इतका पैसा? जमिनीचे वाद आहेत त्या दोघांचे. पवारला कळलं की तो तुमचा जीव घेईल.  आणि दारु पिऊन कुठे बरळलात तर सावंत सोडणार नाही. एकदा अडकलात की पाय खोल रुतत जाईल. स्वप्न पुरं होणार नाहीच.  तुरुंगाची हवा खायला मिळेल. ते दोघं बाहेर आरामात वर तोंड करुन फिरत राहतील."
"पुडचं पुडं. आता ह्यो पैका दुकान सुरु कराय उपयोगी व्हईल. मी घेनारच हाय. इतका पैका मी कदी पायला नवता. आनि मिलायचा बी न्हाई." त्रिंबककर हटून बसला. धर्मेन्द्रचा त्याला पाठिंबा मिळत होता. शब्दाला शब्द वाढत गेला. कुणीच माघार घेईना. पिरता राजेशच्या बाजूने कचाकचा भांडत राहिली.  धर्मेन्द्र आणि त्रिंबककर एक झालेले. सगळे हमरातुमरीवर आले. रागाच्या भरात धर्मेन्द्रने राजेशला ढकललं. राजेशनेही तितक्याच जोरात त्याला ढकलंल. पिरताने पुढे होत दोघांनाही ढकलून दिलं. स्वत:ला सावरत राजेशने निर्वाणीचा इशारा दिला.
"बाबा, पुन्हा सांगतोय. मी निघून जाईन घरातून." राजेश जोरात ओरडला.
"जा." त्रिंबककर थरथरत म्हणाला. धर्मेन्द्रने राजेशला दाराबाहेर ढकललंच. राजेशच्या डोळ्यात आग पेटली. रक्त साकळल्या नजरेने तो  त्रिंबककरकडे पाहत राहिला. त्याला अडवू पाहणार्‍या पिरताला बाजूला करत राजेश घरातून बाहेर पडला. त्याच्यामागून पिरता धावली. धर्मेन्द्र आणि त्रिंबककरही  त्या दोघांच्या मागे धावले.

"कुटं जानार हायस? उगा आपलं मी निगून जाईन, निगून जाईन. कुटं जायाचं न्हाय..." त्रिंबककर त्याच्या पाठीमागून जात ओरडला. पण राजेश थांबला नाही. त्याची तरुण पावलं गावातल्या वाड्या ओलांडत राहिली. त्याच्या मागे धावून धाप लागलेला त्रिंबककर अखेर एका ठिकाणी थांबला. धर्मेन्द्र त्रिंबककरच्या बाजूला उभा होता. पिरता दोघांकडे बघत तिथेच उभी राहिली. दोघांच्या नावाने तिने तिथेच बोटं मोडायला सुरुवात केली. त्रिंबककर मात्र विचारात गढून गेला. राजेश गेलेल्या दिशेने पाहत. राजेश कुठे  जाईल? पिरता पण त्याच्यामागून गेली तर? ती जाणारच लेकाबरोबर. राजेशची शाळा?  येतील परत? कितीतरी वेळ तो तसाच उभा राहिला. मग त्याने ठरवलं,  नाही आले तर बोलवून आणू. तसंही दुकान आणि गिरण आयुष्य बदलून टाकेल. त्याच्या बदललेल्या राहणीमानाची खात्री पटली की येतील दोघं परत. तोपर्यंत धर्मेन्द्र असेल बरोबर. पण आता सावंतकडे जायचं. सावंतकडे गेलं नाही तर हातातोंडाशी आलेला घास जाईल. पिरताकडे  त्याने कटाक्ष टाकला, मागे राहिलेल्या घराच्या दिशेने त्याने नजर टाकली आणि राजेश गेला त्या फाट्याकडे बघत निश्चल नजरने तो बराचवेळ उभा राहिला.  अखेर निर्णयाचा खुंटा बळकट केल्यासारखी त्याने स्वत:ची पावलं सावंतच्या घराकडे वळवली. धर्मेन्द्रच्या चेहर्‍यावर आनंदाचं चांदणं पसरलं. लगबगीने त्रिंबककरच्या बाजूने तो चालायला लागला. दोघांच्या पाठमोर्‍या आकृत्यांकडे पिरता ताटकळल्यासारखी बघत राहिली आणि राजेश गेलेल्या पायवाटेवर तिने आपलं पाऊल टाकलं.


4 comments:

 1. छान कथा आहे, आवडली

  ReplyDelete
 2. चांगली आहे गोष्ट. गरिबांमधल्या दोन प्रवृत्तींचा संघर्ष मांडणारी. लौकिकार्थाने शेवट नाही कथेचा. पण दोन्ही प्रवृत्ती आपापल्या मार्गाने रवाना होतात,

  ReplyDelete
  Replies
  1. तुमची प्रतिक्रिया अतिशय आवडली. कथेत मी काय दाखवण्याचा प्रयत्न केलाय हे तुमच्या शब्दांनी प्रभावीपणे मांडलं. मन:पूर्वक धन्यवाद.

   Delete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.