Saturday, July 11, 2020

आत्मसन्मानाची लढाई - सकाळ - सप्तरंग पुरवणी

कृष्णवर्णीय फ्लॉईडच्या पोलिसांकडून झालेल्या निर्घृण हत्येनंतर वर्णद्वेषविरोधी  निदर्शनांनी अमेरिका पेटून उठली. विशेषत: इथे वाढलेल्या स्थलांतरितांच्या मुलांनी, दुसर्‍या पिढीने पालकांना त्यांच्या तटस्थ भूमिकेचा विचार करायला भाग पाडलं आहे. स्थलांतरितांची ही दुसरी पिढी (आमची मुलं) कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही त्यांच्या कृष्णवर्णीय मित्रमंडळीना पाठिंबा देण्यासाठी  निदर्शनात भाग घेत आहेत, कृष्णवर्णीय संस्थांना मदत करत आहेत आणि त्याचवेळी पालकांना जाहिर पत्र लिहून, त्यांच्या भूमिकेला विरोध करत  याविषयावर बोलायला, विचार करायला उद्युक्त करत आहेत. त्याच विषयावरचा  लेख आहे.
                                                        

’स्पिरिट रॉक’ या शब्दातच त्याचा अर्थही सामावला आहे. ’ब्लॅक लाइव्ज मॅटर’ चळवळीला पाठिंबा दर्शविण्यासाठी माझ्या मुलीच्या शाळेत काही मुलांनी शाळेतल्या या दगडावर सुंदर संदेश लिहिले. जितक्या तळमळीने मुलांनी हे संदेश लिहिले तितक्याच पटकन त्यावर फुल्या मारून त्या संदेशाला, चळवळीला विरोध दर्शविण्याचीही खुमखुमीही कुणीतरी दाखवली. ’ब्लॅक’ खोडून तिथे ’ब्लु’ लिहिलं गेलं. प्राचार्यांनी या घटनेवर कडक टीका केली. मुलांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला. यानंतर मात्र वेगळंच घडलं. ज्या प्राचार्यांनी तीव्र शब्दात मुलांना समज दिली त्यांनाच ’वर्णद्वेषी’ विधानं केल्याबद्दल निलंबित करण्यात आलं. पालक म्हणून आम्हाला अर्थातच धक्का बसला. मनात वादळ उठलं. आपल्या मुलांना ज्या शाळेत पाठवतो तिथले प्राचार्यच वर्णद्वेषी आहेत या वस्तुस्थितीने मन धास्तावलं. इतक्या वेळा कारणाकारणाने ऐकलेली प्राचार्यांची भाषणं आठवत राहिली, त्यांचे विचार आपल्याला परिचित आहेत हा भ्रमच होता की काय अशी शंका यायला लागली. त्यातही प्राचार्य निर्दोष आहेत असं सांगणारा एक गटही त्यांच्या बाजूने घोषणा देत उभा राहिला आणि त्याचवेळी निदर्शनं करणारा!

कृष्णवर्णीय फ्लॉईड पोलिसांच्या निघृणपणामुळे मृत्युमुखी पडला आणि अमेरिकेत वर्णद्वेषाविरोधी निदर्शनांचा उद्रेक उसळला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही संसर्गाचा विचारही न करता लोक रस्त्यावर उतरले यावरूनच त्याच्या तीव्रतेची जाणीव होत राहते. गावागावात या घटनेचे पडसाद उमटणं साहजिकच होतं. फक्त त्याच्या स्वरूपाची कल्पना कुणालाच नव्हती. भारतीय पालक नेहमीच अशाबाबतीत मुलांना सबुरीचा सल्ला देतात, स्वत: तटस्थ राहतात पण यावेळी स्थलांतरीतांच्या तरुण मुलांनी पालकांना नवी दृष्टी दिली. पालकांना त्यांच्या भूमिकेचा विचार करायला भाग पाडलं.

काही दिवसांपूर्वीच माझ्या मुलाने वर्णद्वेषाला बळी पडलेला कृष्णवर्णीय फ्लॉईड आणि सुरू झालेली चळवळ याबाबत त्याच्या ऑफिसच्या CEO शी थेट संपर्क साधला होता. कंपनीने काहीच भूमिका घेतली नाही, कर्मचार्‍यांना कंपनी वर्णद्वेषाला थारा देत नाही अशी खात्री देणारा संदेश पाठवला नाही याची नाराजी कंपनीतील कृष्णवर्णीयामध्ये तसंच इतरांमध्येही आहे हे नजरेला आणून दिलं. कंपनीने आपली चूक कबूल करत सर्वांशी बोलायची तयारी दाखवली. online meeting मध्ये सर्वांनीच आपल्या भावना व्यक्त केल्या. CEO नी आधी याबाबत काही न केल्याबद्दल माफी मागितली आणि नंतर अतिशय भावुक ईमेल पाठवण्यात पुढाकार घेतला. तरुण मुलांना इथल्या प्रश्नांबद्दल किती आत्मीयता आहे याचं प्रत्यय देणारं हे उदाहरण.

फक्त भारतीयच नाही तर एकूणच स्थलांतरित पालकांची इथे जन्मलेली, वाढलेली मुलं त्यांच्या आई - वडिलांच्या भूमिकांची अक्षरश: चिरफाड करतायत. वॉशिंग्टन डी. सी. मधल्या निदर्शनात माझ्या मुलाने आणि त्याच्या मित्रमैत्रिणींनी भाग घ्यायचं ठरवलं तेव्हा आम्हाला पालक म्हणून चिंता होती कोरोना विषाणूच्या संसर्गाची पण फ्लॉईडच्या मृत्यूने तरुण पिढीच्या मनातलं वादळ, व्यवस्थेबद्दलचा प्रक्षोभ रस्त्यावर आला आहे. या देशाचे नागरिक असूनही तटस्थ भूमिका घेणारे स्थलांतरित, त्यामुळे मुलांशी होणारे वादविवाद यातून सर्वांनाच आपापल्या मानसिकतेचा सखोल विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. जे होतंय ते पाहताना, ऐकताना जितकी काळजी वाटते तितकाच तरुण पिढीच्या संवेदनशीलतेचा अभिमान!

या चळवळीत इथली दुसरी पिढी सक्रिय झाल्यामुळे नकळत लक्षात येत राहतं की सर्वांच्याच मनात हा वर्णभेद नाही म्हटलं तरी आहेच. नेटफ्लिक्सने खास यूट्यूबवर प्रसिद्ध केलेल्या भागात हसन मिनाजचं प्रभावी भाषण नक्कीच विचार करायला लावणारं आहे. तो म्हणतो, ’फिरताना, धावताना, झोपलेले असताना, दार उघडताना सतत मृत्यूची भिती कृष्णवर्णीयांना भेडसावत असते. एशियन्सना प्रसिद्ध कृष्णवर्णीयांचा प्रचंड अभिमान आहे पण कृष्णवर्णीयांशी तुमची मैत्री नसते. घरात कुणी सावळ्या रंगाचं असेल तर तुम्ही त्यांना अगदी सहज कल्लू म्हणता, दाक्षिणात्य लोकांचा उल्लेख ’कल्लू’ करता.’ बहुतांशी घरात, प्रत्येक व्यक्तीला आहे तसं स्वीकारायला पाहिजे असे धडे देतानाच कधीतरी पालकांनी मुलांना कृष्णवर्णीयांपासून सावध राहण्याचाही इशारा दिलेला असतो. पालकांच्या दुहेरी भूमिकेला मुलं आव्हान द्यायला लागली आहेत. त्यांचा ढोंगीपणा त्यांच्या लक्षात आणून द्यायला लागली आहेत. फ्लॉईडच्या मृत्यूनंतर त्याचे तीव्र पडसाद अनेकांच्या घरातून उमटतायत, लेखणीतून व्यक्त होतायत.

फ्लॉईडच्या मृत्यूआधी, 2016 साली फॅलॉन्डो कॅस्टिओच्या बाबतीत घडलेल्या अशाच घटनेने ही युवा पिढी प्रचंड अस्वस्थ होती ती पालकांच्या वागण्यातून नकळत दिसणार्‍या वर्णद्वेषाने, त्यांच्या तटस्थ भूमिकेमुळे. मुलांना या विषयावर पालकांशी बोलणं अवघड जात होतं, वाद होत होते त्यामुळे पालकांशी संवाद कसा साधावा हे कळत नव्हतं त्यातूनच पत्रांची कल्पना जन्माला आली आणि Letters For Black Lives Project ही कल्पना रुजली. सुरुवातीला फक्त एशियन अमेरिकन्स मुलांचा समावेश असलेल्या या पत्रांमध्ये आता आफ्रिका, युरोप, कॅनडातील तरुणांचाही समावेश आहे. अनेक भाषांमध्ये या पत्रांचा अनुवाद झाला आहे. 2016 नंतर पुन्हा एकदा या पत्रांना उजाळा दिला जात आहे. त्यावेळच्याच कळकळीने मुलं पालकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. या सार्‍या पत्रांचा सारांश असा आहे.

प्रिय, काका, काकू, मावशी, आत्या,
तुम्हाला कदाचित कृष्णवर्णीय मित्रमैत्रिणी नसतील, तुमचे सहकारी कृष्णवर्णीय नसतील पण आमचा जन्म इथेच झालेला आहे, आमचे अनेक मित्रमैत्रिणी, सहकारी कृष्णवर्णीय आहेत आणि या देशात त्यांना जी वागणूक मिळत आहे ते पाहून आम्हाला खूप भिती वाटते आणि त्यांची अतिशय काळजी वाटते. पोलिसांच्या हातून जेव्हा जेव्हा कृष्णवर्णीय व्यक्ती मारली जाते तेव्हा नकळत तुम्ही त्या व्यक्तीलाच दोषी ठरवता. यात तुमचा दोष नाही कारण माध्यमातून कृष्णवर्णीयांची हीच प्रतिमा आहे. चोर, गुन्हेगार! ’आम्ही या देशात आलो ते स्थलांतरित म्हणूनच आणि स्थिरावलोही; मग कृष्णवर्णीयांना हे का जमत नाही?’ हा प्रश्न कधी तुम्ही विचारला आहे तर कधी न बोलूनही तुमच्या कृतीतून हे व्यक्त होतं. म्हणूनच आज आम्हाला, इथे जन्मलेल्या, वाढलेल्या मुलांना काय वाटतं ते तुम्हाला सांगायचं आहे.
’आम्ही घरातून बाहेर पडतो तेव्हा निश्चिंत असतो, मनात फार धाकधूक नसते, पोलिस अडवतील, घरी परत येऊ की नाही अशी शंका नसते पण आमच्या कृष्णवर्णीय मित्रमैत्रिणींच्या बाबतीत तसं होत नाही. बहुतेकांचे पूर्वज गुलाम होते आणि अजूनही तशीच वागणूक त्यांना मिळते, बदल झाला आहे तो स्वरूपात. घर बांधण्यासाठी कर्ज मिळत नाही, मतदानाचा हक्क नाकारला जातो, शिक्षणापासून वंचित राखलं जातं. कृष्णवर्णीय या व्यवस्थेचे अद्यापही गुलामच आहेत. तुम्ही या देशात आलात, स्थिरावलात. कितीतरी वेळा या व्यवस्थेचा तुम्हालाही त्रास झालेला आहे. गरिबी, आतंकवाद, रोगराई, गुन्हेगारी अशा कितीतरी गोष्टींसाठी या ना त्या कारणाने तुम्हालाही दोषी ठरवलं गेलं. तुम्ही हे पचवलंत ते आमच्या उज्ज्वल भवितव्याच्या अपेक्षेने. आता आम्हाला तुमची साथ हवी आहे, तुमच्या हातात हात घालून आम्हाला कृष्णवर्णीयांचा लढा पुढे न्यायचा आहे. आपण सारेच या देशात सुखाने राहू. जसा तुमच्या मनात कृष्णवर्णीयांबद्दल ग्रह असतो तसाच इतरांच्या मनात तुमच्या - आमच्याबद्दल हे तुमच्या कसं लक्षात येत नाही? माध्यमं तुमच्या उच्चारांची नक्कल करतात, आम्हाला शाळेत चिडवलं जातं, विमानतळांवर अडवलं जातं. कृष्णवर्णीय समजून भारतीय लोकांना झालेला त्रास तुम्ही बघितला आहेच. सुरेशभाई पटेलांना कृष्णवर्णीय समजून पोलिसांनी केलेली मारहाण कोण विसरेल? झाली का कारवाई पोलिसांवर याबाबत? या अशा घटना कृष्णवर्णीयांना रोजच्याच झाल्या आहेत तरी तुम्ही तटस्थ का? कदाचित आपल्यावरही ही वेळ येईल हे का विसरता? याला खीळ घालायची असेल तर आता या अल्पसंख्याकांच्या लढ्यात तुम्हीही सहभागी व्हायला हवं.

कितीतरी घरांमधून या पत्रांनी, तरुण मुलांनी पालकांचे डोळे उघडले, दृष्टिकोन बदलला. क्विनटेरोने जेव्हा फेसबुकवरून आपल्या मित्रमंडळींना निदर्शनासाठी आवाहन केलं तेव्हा, ’All lives matter' असं सांगत तिच्या आई - वडिलांनी तिला मूर्खात काढलं. विरोध केला. वीस डॉलर्सच्या नोटेवरून एका माणसाच्या मानेवर 8 मिनिटं पोलिस गुडघा टेकून बसू शकतो यामागे असलेली पार्श्वभूमी तिच्या पालकांना समजून घ्यायची नव्हती, समजत नव्हती. मोर्च्यासाठी तिने घेतलेल्या पुढाकाराला पालकांनी विरोध केल्यावरही तिने मागे न हटण्याचा निर्धार केला. नाईलाजाने तिच्या संरक्षणासाठी म्हणून तिची आईही अखेर मोर्चात सामील झाली. कृष्णवर्णीयांची भाषणं ऐकताना त्यांची वेदना तिच्या काळजाला भिडली. तिसर्‍या दिवशी तर क्विनटेरोचे वडीलही त्या दोघींबरोबर गेले आणि शेवटच्या दिवशी तिच्या आईने कृषवर्णीयांसमोर स्वत:हून भाषण केलं. स्वत:मध्ये झालेला बदल, एक आई म्हणून आपले कसे डोळे उघडले गेले हे सांगताना ती गहिवरली, ऐकणार्‍यांनाही अश्रू आवरणं कठीण गेलं.

वॅग आणि झॅगने निदर्शनात सामील व्हायचं आहे असं सांगितलं तेव्हा चायनाहून स्थलांतरित झालेल्या बार्टेकने तीव्र शब्दांत मुलांची कानउघडणी केली. मुलांनी त्यांचा निर्धार स्पष्ट केल्यावर तर बार्टेकने घर सोडून जाण्याचीच धमकी दिली. मुलं तरीही गेलीच. बार्टेकच्या अंगाचा तिळपापड झाला पण तिथे पोलिसांनी सुरू केलेल्या अश्रूधुराच्या बातम्या यायला लागल्यावर बार्टेक मुलांना परत आणण्यासाठी धावला. इतकंच नाही तर बार्टेकने मुलांकडून कृष्णवर्णीयांचा लढा, त्यांची भूमिका समजून घेतली.

इथे जन्मलेल्या, वाढलेल्या मुलांनी इथल्या समस्यांबद्दल आपल्या पालकांनी पावलं उचलावी, ठाम भूमिका घ्यावी याचा आग्रह कृतीतून दाखवायला सुरुवात केली आहे. पालकांनी मुलांना समजून घेऊन त्यांना साथ द्यायला हवी नाहीतर मुलं एकट्याने लढा द्यायला तयार आहेतच पण मुलांना जसं आपल्या आई - वडिलांना आपला अभिमान वाटावा ही आस असते तसंच आपल्यालाही मुलांच्या नजरेतला आपल्याबद्दलचा आदर भावतोच हे विसरून चालणार नाही.

 



No comments:

Post a Comment

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.