Monday, September 27, 2021

अलास्काला जाऊ

खाण्यासाठी जगणारे आम्ही आणि जगण्यासाठी खाणारी आमची मुलं प्रवासाला निघाली की  घोळ व्हायला सुरुवात
होते. कधीकधी विमानंही त्यात सामील होतात. अॲकरेंजला जायला अटलांटा विमानतळावर वाट बघत बसलो आणि विमान कर्मचारी ओरडून, ओरडून विमानात कुणाला तरी शेंगदाण्यांचा त्रास होतो म्हणून चणेफुटाणे देणार नाही सांगायला लागली.

"हे काय, त्रास होत असेल त्यांना नका देऊ. आम्ही काय केलंय?" देणार नाही म्हटल्यावर एकदम हवंसं वाटायला लागतं.

"आई, तू इथेच खाऊन घे. विमानात चढलीस की खायला कधी मिळेल याचीच वाट बघत असतेस." लेकीने आयती संधी साधली आणि तिच्या कुसकटपणाकडे दुर्लक्ष करत मी विमानतळावर हादडून घेतलं. शेंगदाणे मिळणार नाहीत असं पुन्हा एकदा ऐकत विमानात जाऊन बसलो. उडायच्या आधी विमान चालायला लागलं आणि तोंड, नाक मुस्क्या बांधल्यासारखं झाकलेलं असलं तरी शेंगदाणे जळल्यासारखा वास यायला लागला. 

"काहीतरी जळतंय. तू हवाई सुंदरी  जीव कसा वाचवायचा सांगते ते ऐकतेस का?" लेकीच्या कानात कुजबूजले. कानातल्या बोळ्यांमुळे ते आत शिरलं नाही.

"विमान जळलं तरी कानात खुपसून गाणी ऐकत बसणार आहेस का?" दातओठ खात मी विचारलं. ती समोर बघत राहिली. आपत्कालीन सुटकेचा मार्ग शोधायचा की तसंच बसून राहायचं हे कळेना. 

"बाकी कुणाला कसा वास येत नाही?" मी  पुटपुटले. तेवढ्यात विमानात झालेल्या बिघाडाची घोषणा झाली. आता विमान जळलं तरी विमान जळतंय हा माझा अंदाज बरोबर ठरला यातच मी खूष होते.  लेकीनेही कानातले बोळे काढलेले बघितले आणि तिलाही मी माझा अंदाज कसा चुकत नाही ते ऐकवलं.  तासाभराने विमान उडालं.

हे विमान उडालं तरी भरवसा काय?  अॲकरेजला पोचेपर्यंत पोचलो तर पोचलो म्हणत अखेर आम्ही हवेत उडालो. तासाभरात ताणाचं प्रमाण इतकं वाढलं की प्रचंड भूक लागली. पोटपूजा होण्याची  नामोनिशाणी दिसेना. सात तासांच्या विमानात नुसते द्रव पदार्थ देऊन विमानवाले सकस आहाराचं महत्त्व पटवून देत होते. लेक फक्त पाणी पित होती आणि मी जितक्या फळांचे रस मिळतील तेवढे पित होते. खायला मिळणार नाही म्हटल्यावर पिण्याची इच्छा तीव्र! उतरलो की  कुठे खाता येईल याचे मनातल्या मनात मी बेत करुन टाकले. 

ॲकरेंजला लेक न्यायला आला तोच खुषीत.

"रात्रीच्या जेवणाचा प्रश्न मिटला. मी तुमच्यासाठी खायला करुन आणलंय. " 

"तू केलयंस?" या दोन शब्दांत तीव्र निराशा होती पण लेक स्वत:वर खूष होता. 

"हो. अलास्कात सगळं महाग असतं. बाहेर परवडणार नाही." आल्या विमानी परत जावं असं वाटायला लागलं. 

"बाहेरचं खायचं नाही मग काय मजा." मी फुरंगटले. मुलांनी सात्विक जीवनशैलीचे धडे दिले आणि मुकाट्याने हातात आलेलं घरगुती सॅडविच मी घशात घातलं. 

"बिंग बेंडला गेलो होतो तेव्हा दहा दिवस जे खाल्लं तेच परत?" आवंढा गिळत मी विचारलं.

"ते पिनट बटर होतं हे टोफरकी आहे." लेकाच्या नाकाला मिरच्या झोंबल्या.

"कसली फिरकी? काय तरी नावं पदार्थांची." मी टोफरकी तोंडात फिरवत पुढच्या दहा दिवसासाठी माझं तोंड तयार करत राहिले.

"अस्वलं असतात इकडे. फवारा घ्या. अस्वल आलंच समोर तर काय करायचं?" मी त्याला माकडचेष्टा करुन अस्वलाला पळवण्याचं प्रात्यक्षिक दाखवलं पण मुळात अस्वलांच्या जगात यायचंय कशाला असा कळीचा मुद्दाही उपस्थित केला.  अस्वल फवार्‍यासह आम्ही बाहेर पडलो आणि निसर्गात रममाण झालो. मुलाने सगळं ठरवलं होतं त्यामुळे सेंकदा सेंकदाला तो मस्त आहे ना असं विचारुन खात्री करत होता. अस्वल आगमनावर डोळा ठेवणं, लेकाने मस्त आहे का विचारण्याआधीच मस्त आहे म्हणणं यात इतकी तारांबळ उडाली. अलास्कात फक्त अस्वल नाहीतर मी फिरेन असं मी ठामपणे सांगितलं आणि तळ्याकाठी ठिय्या ठोकला. निसर्गसमाधी लावली. प्रत्येक दिवशी अस्वल दिसलं नाही की फवार्‍यासाठी खर्च केलेले ४० डॉलर्स अस्वलासारखे डोळ्यासमोर नाचायचे.

आम्ही प्रवासात भाड्याच्या गाडीने फिरतो आणि भाड्याच्या घरात तात्पुरते थांबतो. मुलं स्वयंपाकाचा ताबा घेतात आणि आठ - दहा दिवस सतत एकच पदार्थ खायला घालतात.  त्या एकाच पदार्थाला आम्ही रोजच्यारोज चविष्ट, मस्त, तू म्हणून इतके श्रम घेतलेस असंही म्हणतो. दर दोन दिवसांनी बाजाररहाट नावाचा एक कार्यक्रमही या प्रवासात असतो. जितकं अरबट चरबट दुकानात घेता येईल तेवढं मी घेते. फुकट गेलेली आई म्हणून मुलं नाकं मुरडतात आणि मुक्कामाला परत आलं की माझ्याआधी स्वत: सगळं फस्त करतात. 

"पुढच्यावेळी जरा चांगलं काहीतरी करा." टोफरकी तोंडात घोळवत मी पुटपुटले. होमर गावातून २ तासांच्या सफरीवर बोटीने जायचं होतं. धक्क्यावर भरपूर टपर्‍या आणि गंध दरवळत होते. आम्ही आपले टोफरकी खात बसलो होतो.

"आई, आपण खाण्यासाठी येत नाही फिरण्यासाठी येतो."  मुलं आलटून पालटून हे एक वाक्य फिरायला गेलो की कधीही ऐकवतात. 

"बरं, बरं आम्ही जरा बसतो इथे. तुम्ही या फिरुन बोटीची वेळ होईपर्यंत." मुलांची जोडी गेली आणि आम्ही नवरा - बायको ताडकन उठलो. आत्तापर्यंत  तो उगाचंच इकडे - तिकडे फिरत होता असं मुलांना वाटत होतं पण त्यांचा बाबा खाद्यपदार्थांची चाचपणी करुन आला होता.

"ती यायच्या आत उरकू." धक्क्यावरच्या सुग्रास पदार्थांच्या दिशेने आम्ही धाव घेतली,  ताव मारला. मुलं लांबून बघत असावीत. बाजूला येऊन उभी राहिली. 

"तुमच्यासाठीपण मागवलंय." मी साळसुदपणे म्हटलं.

"बिल." मुलाने  तरी आम्ही सांगत होतो नजरेने कागद फडफडावला. डोळे पांढरे व्हायची वेळ आली.

"तू किंमती बघितल्या नव्हत्यास?" अलास्कामध्ये प्रत्येक गोष्ट चौपट महाग असते. मुलांनी पढवलेली वाक्य म्हणत मी खाऊ की गिळू नजरेने  नवर्‍याकडे पाहिलं.

"तू खायला काय मिळतंय ते बघ, मुलांना पिटाळून गुपचूप खाऊ एवढंच म्हटलं होतंस." नवर्‍याने नेहमीप्रमाणे हात - पाय म्हणजे त्याचं जे काही या प्रकरणात अडकेल ते झटकलं.

"आता बोटीत काही मागवू नका." मुलाने त्याच्या मुलांना म्हणजे पालकांना सुनावलं. आम्ही माना डोलावून बोटीत खायला काय असेल याचा विचार करत राहिलो.

"कॅनाबिस कुठे मिळेल रे?" चमचमीत खाल्ल्याचे पैसे भरताना आमचे डोळे पांढरे झाले तसे कॅनाबिस विचारल्यावर मुलांचे डोळे विस्फारले.

"तुला गरज नाही. तू धुंदीतच असतेस नेहमी." नवर्‍याने त्याच्यामते सत्य सांगितलं आणि माझ्यामते नको तिथे नको ते बोलला. जागोजागी कॅनाबिसची छोटी छोटी दुकानं दिसायला लागली आणि मला प्रत्येकजण कॅनाबिस घेऊन गाडी चालवत असणार अशी शंका यायला लागली. आधीच अस्वल, मूस अशा प्राण्यांची धास्ती आता कॅनाबिस घेतलेल्या मनुष्यप्राण्यांचीही.  तेवढ्यात नवर्‍याने विचारलं.

"सारा पेलन कुठे राहते?" कॅनाबिसवरुन एकदम सारा पेलन!

"तिच्याकडे गेलं तर रशियाही दाखवेल ती आपल्याला." निवडणुकीच्या वेळी इतक्यावेळा ऐकलेलं होतं पेलनबाईंच्या अंगणात उभं राहिलं की रशिया दिसतं. आलोच आहोत तर बघावं.

"आपण फिरायला आलोय, सारा पेलनना बघायला नाही." सारा पेलनना भेटण्याचं नवर्‍याचं स्वप्न धुळीला मिळवलं. त्याने आपलं दु:ख निसर्गाच्या कुशीत लपवलं. निसर्ग हा असा असतो. कसंही करुन तो तुम्हाला आपलासा करतो. आजूबाजूचं जग विसरायला लावतो. आम्हीही कॅनाबिस न घेता धुंद झालो, रंगून गेलो!

 निसर्ग बोलला

 कवेत घे मजला!

 पृथ्वीसंगे प्रणय रंगला

 हिरवाईचा शेला खुलला!

 हिऱ्यानिळ्या जली डोंगर रमला

 हिम त्याच्या अंगी बागडला!

 भूलोकी सृष्टीचा देखावा सजला

 अलास्का स्वर्गीय गंधाने दरवळला!


(आम्ही अनुभवलं:

Matanuska Glacier guided tour, Exit pass glacier, Seward - Alaska Sea Life Museum, Kenaai Beach, Homer  - Rainbow Tour, Bishop Beach.

Alaska Wildlife Conservation Park, Denali NP.

निसर्गाच्या सानिध्यातून पुन्हा यावंसं वाटत नाही इतकं अलास्का सुंदर आहे. माणसांना माणसांची ओढ आहे. अगदी आपुलकीने स्थानिक गप्पा मारतात. राहण्याची ठिकाणंही रम्य होती. अलास्कामध्ये बहुतांश गोष्टी बाहेरुन येतात त्यामुळे सगळं  महाग आहे.)



2 comments:

  1. खूपच छान.फार मजा आली वाचताना

    ReplyDelete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.