Tuesday, May 31, 2022

ओला

 "५१ रुपये झाले" रिक्षावाला म्हणाला. मी ५५ दिले आणि पुढचा सगळा गोंधळ म्हणजे तो विचारणार सुटे आहेत का, मी एक रुपया शोधायला सुरुवात करणार, एक रुपया सोडून बाकी सगळं पर्समधून बाहेर येणार आणि रिक्षावाल्याला अखेर दिले किती आणि परत घेतले किती या हिशोबाने डोक्याचा भुगा होणार, दोन दिवसांनी आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला हे लक्षात येणार त्यापेक्षा अतिशय हुशारीने ४ रुपये सोडून दिलेले बरे. मी निघाले तेवढ्यात तो म्हणाला,

"हे घ्या." त्याने ५ रुपये परत दिले आणि आधी मी पुण्यातलीच रिक्षा आहे ना या नजरेने रिक्षाकडे आणि नंतर त्याच्याकडे पाहिलं.
"थांबा असेल माझ्याकडे १ रुपया." आता मात्र पर्स उलटी करुन रस्त्यावर आतला माल पडला तरी रुपया काढायचाच होता मला. मी पर्स उलटीपालटी करायला लागले.
"ताई, पर्स सांभाळा आणि ठेवा तो १ रुपया. कधीतरी गिर्हाईकाला खूष करु दे की. आम्ही नेहमीच १ रुपया ठेवतो आमच्याकडे गिर्हाईकाचा. आज रिक्षावाल्याचा १ रुपया तुम्ही ठेवा." अत्यंत नम्र स्वराने तो म्हणाला आणि पर्सच्या ऐवजी पुणं उलटंपालटं फिरायला लागलं माझ्या नजरेसमोर. मी जी पळत सुटले ती जुनेपाने कपडे घालून बाहेर जायच्या तयारीत बसलेल्या नवर्यापुढे उभी राहिले.
घरातल्या सर्वांसमोर १ रुपया नाचवला. नवर्याला म्हटलं,
"काय, काय ग्रह करुन देतोस तू माझे पण बदललंय बरं इकडे सगळं. तू आधी कपडे काढ." त्याने एकदम संकोचाने सर्वांकडे नजर टाकली.
"अरे तूच मला सांगतोस ना भारतात गेलं की मळखाऊ, जरा जुने कपडे घालायचे म्हणजे आपल्याकडे फार पैसा नाही असं वाटतं पण त्यामुळे माझे आणि तुझे कपडे नवरा - बायको असल्यासारखे वाटतच नाहीत. लाज आणतोस बुवा तू. यापुढे असले प्रकार करायची काहीही गरज नाही. घाल तू नवे कपडे आणि चल माझ्याबरोबर." आता मात्र मला पुणं चढलंच. इथे आल्याआल्या मी परदेशीच असल्यासारख्या सर्वांनी केलेल्या सूचना आणि नवर्याने ठामपणे केलेली विधानं किती ’ही’ म्हणजे अगदीच बिनबुडाची आहेत हे सिद्ध करायला सज्ज झाले. कालच एक गोंधळ करुन हसं करुन घेतलं होतं पण आता नाही. म्हणजे काल काय झालं होतं,
"अहो, मीटर टाका की." असं रिक्षात बसल्याबसल्या पढवलेल्या पोपटासारखं मी म्हटलं. मी इथे नविन आहे हे कळता कामा नये म्हणून मला दिलेली सूचना होती ती पण त्या सूचनेने घात केला. तो म्हणाला,
"ओला केलीये तुम्ही. आता परत मीटर टाकू? "
"अच्छा, अच्छा. असं असतं होय." मी काहीतरी पुटपुटून वेळ मारुन नेली होती पण आता नाही. आज पुण्याचं रम्य दर्शन मला झालं होतं आणि ते तसंच आहे हे मला सिद्ध करायचं होतं. ओलाला बोलावून घेतलं. ओलावाला आला. नवरा मुकाट्याने गाडीत बसला. तो तसाच असतो नेहमी. त्यात मलाही बजावलेलं असतं. प्रवासात अमेरिका हा शब्द येऊ द्यायचा नाही पण ते तसं कधीही होत नाही. होतं काय, मला बोलायचं असतं त्यातही नविन माणसांशी बोलायला मला आवडतं. शेजारी नवरा जुना असतो त्यामुळे चालकाशी बोलणं अपरिहार्य असतं आणि मग कुठेतरी ’अमेरिका’ येतेच. आज मात्र मी बिनदिक्कत सुरुवात केली. तेवढ्यात त्याने विचारलं,
"दांडेकर पुलावरुन घेऊ का राजाराम?" खरंतर दांडेकर काय नी राजाराम काय दोन्ही सारखेच बाहेरगावच्यांना. पूर्वीही घरुन कुणीतरी पढवून पाठवलेलं एक उत्तर देऊन मोकळं व्हायचो आणि गर्दीमुळे रिक्षावाल्याने दुसरीकडून नेतो म्हटलं की बरं - बरं करत मान डोलवायचो. घरी आलो की या गल्लीतून, त्या गल्लीतून सांगता आलं असतं हे ऐकावं लागणार याची खूणगाठ बांधायचो. आज मात्र मी ओलावाल्याला उत्साहाने सांगितलं.
"न्या हो तुम्ही कुठूनही. इथलं कुठे काय माहित आहे आम्हाला. पुलाखाली नेऊ नका म्हणजे झालं." तोही यावेळचं गिर्हाईक उगाच काहीतरी अंदाजे ठोकून आपल्याला फसवत नाही म्हणून खूष झाला. कुठून - कुठून नेत राहिला.
हळूहळू ओलावाल्याला अमेरिका चढली आणि मला भारत. दे दणादण आम्ही ज्या देशात राहतो त्याबद्दल तक्रारी सुरु केल्या, देश कसा बदलता येईल याबद्दल तावातावाने मतं मांडली, एकदोनदा त्याने गचकन गाडी थांबवून बाहेरच्याला शिवीगाळ केली त्यात मीही सामिल झाले, राजकारण्यांनी त्यांच्याबरोबर आपलंही जीवन भ्रष्ट केलंय याची उदाहरणं एकमेकांना दिली, युक्रेन - रशिया संबंधात भारत - अमेरिकेचं काय चुकतंय याची गहन चर्चा केली. त्याच्यादृष्टीने भारत आता अगदी रसातळाला गेला आहे आणि माझ्यादृष्टीने अमेरिका. प्रवास संपत आला. गुप्तहेर असल्यासारखं आपण कोणत्या देशाचे आहोत याचा सुगावा लागू न देण्याची पराकाष्ठा इतक्या वर्षात प्रथमच करावी लागली नाही म्हणून कधी नव्हे ते मृदू हसून मी नवर्याकडे पाहिलं. ओलावाल्याचा निरोप घेतला.
नवरा उतरला आणि म्हणाला,
"मला तुम्हाला दोघांनाही काहीतरी सांगायचंय." ओलावाल्याला माझ्याबरोबर आणखी कुणीतरी होतं ते एकदम लक्षात आलं. तेवढ्यात नवरोजी म्हणाले,
"तुम्ही भारत सोडायचा विचार करा आणि तू अमेरिका. दोन्ही देशांचं भलं होईल." ओलावाला जोरात हसला आणि नवरा माझ्याकडे रागारागाने बघत १५०० रुपयांचे एकदम १९०० कसे झाले म्हणून वाद घालायला लागला.

4 comments:

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.