Wednesday, March 7, 2012

क्षितीज - भाग 9

 शुभम खिन्न मनाने खिडकीतून मागच्या अंगणातलं ते झाडाजवळचं बाकडं न्याहाळत होता. अपघात झाल्यानंतर सहा महीने ते बाकडं त्याचा विसावा झाला होता. घरातल्यांचा राग आला, खूप थकवा आला, निराशा झाली की, आणि आनंद झाला तेव्हां देखील तिथेच तो बसायचा. दुसरीत असताना त्याने त्याच्या प्रिय माशाला, ’बेट्टा’ला, तो मेल्यानंतर  बाजूलाच पुरलं होतं.  शुभमने त्या ठिकाणी लावलेल्या रोपट्याचं मोठं झाड झालं होतं. आज त्याला एकीकडे कॉलेज जीवनाची उत्सुकता, काहीशी भिती, दडपण होतं आणि या घराचा आता निरोप घ्यावा लागणार म्हणून आलेली अस्वस्थता. शुभम शर्टांच्या घड्या करुन व्यवस्थित बॅगेत भरत होता. सगळं लहानपण या घरात गेलेलं. आणि आई-बाबा हा तर गृहित धरलेला त्याच्या आयुष्याचा भाग होता. तेच तर काळजी घ्यायचे त्याची. जमेल एकट्याने रहायला?

विचारांचं चक्र मनात गरगर फिरत होतं पण हात नकळत एकेक काम आटपत होते. कपडे भरता भरताच बाजूला पडलेला पुस्तकांचा ढीग त्याला खुणावत होता.  सगळी पुस्तक वाचनालयात आईलाच परत करावी लागणार. या पुस्तकांनी त्याला आईच्या खूप जवळ आणलं होतं. शाळेत  ऐकलेलं, शिक्षकांनी सांगितलेलं पुस्तक याबद्दल तो बोलला की आई आवर्जून ते पुस्तक वाचनालयातून आणायची. शुभमही झपाटल्यासारखा वाचायचा. अभ्यासाच्या व्यापात वेळ मिळाला नाही की कधी गाडीत, कधी जिन्यात असं करुन पुस्तक कधी संपायचं ते कळायचही नाही. आईलाही तो गोष्टीत खेचून घ्यायचा. तीही उत्साहाने ऐकायची, पुढे काय होत असेल त्याचा अंदाज  व्यक्त करायची. त्यामुळेच त्यालाही प्रत्येक पुस्तकं कधी वाचून संपवतोय असं व्हायचं. आता हे सगळं संपणार होतं. पुढच्या  आठवड्यात तो कॉलेजसाठी बाहेर पडणार होता. कुणाला सांगणार आता गोष्टी? नेहाला गोष्टींमध्ये  रस नव्हता. ती कवितात रमणारी. बाबाही 'बोअर नको करुस, पटकन संपव'  म्हणायचा. त्यातून आईने त्याला लिहलेली पत्र! आता लिहेल आई  पत्र? आत्तापर्यंत त्याने तिच्या पत्रांचा पुसटसा उल्लेखही कधी केला नव्हता. आईला गोष्ट सांगताना, गप्पा मारताना कितीतरी वेळा  त्याला तिला सांगावसं वाटायचं की तूही फार छान लिहतेस. तू का नाही अशा गोष्टी लिहीत? पण जणू तिची पत्र ही त्याची  खाजगी मालमत्ता होती. तोंडातून शब्दच फुटायचा नाही. कदाचित आईने विचारलं असतं तर तो बोललाही असता पण तिनेही कधी एका शब्दाने विचारलं नाही. त्याच्या घशात कड दाटून आले. आई, नेथन आणि रहस्यकथा यानीच तर डॉक्टर व्हायचा ध्यास  सोडून टाकावसा वाटला की काय? गेली चार वर्षं कार्यानुभव म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील वेगवेळ्या विभांगाचीच त्याने चाचपणी केली  होती. आणि प्रत्यक्षात त्यालाही शक्यता न वाटलेलं क्षेत्र त्याने निवडलं. सगळं तसं अचानकच बदललं होतं. गेल्या काही  आठवड्यातल्या घडामोडींची तो उजळणी करत राहिला.

हायस्कुलचं शेवटचं वर्ष. बारावी. शुभमने कितीतरी ठिकाणी कॉलेज प्रवेशाचे अर्ज भरायचे ठरवले होते. ज्या शाखांसाठी अर्ज कराल  त्याला अनुसरुन त्याच्याबरोबर लिहावे लागणारे निबंध. या निबंध लिहण्याच्या प्रकारातून बरीच मुलं लेखक होतील असच त्याला  वाटायला लागलं होतं. चार वर्षात त्याने दर मे महिन्याच्या सुट्टीत वेगवेळ्या क्षेत्रात काम करुन पाहिलं होतं. माध्यमिक शाळेत  असतानाच केलेला वैद्यकीय क्षेत्राची ओळख करुन देणारा पंधरा दिवसाचा कॅम्प त्याला आठवला. सगळ्या विभागांची तोंडओळख  तेव्हां झाली. त्यावेळेस मिळालेल्या कितीतरी गोष्टी त्याने अजून जपून ठेवल्या होत्या. कॅलक्युलेटर, कंम्पास पेटी, मॅग्नेटिक पॅड  ..... नववीत गेल्यावर हॉस्पिटलमध्ये घेतलेला कार्यानुभव. आत्ताआत्तापर्यंत होईन तर डॉक्टरच म्हणणार्‍या शुभमचं मत अचानक बदललं. त्याला क्रिमिनल जस्टीस टेक्नॉलॉजीने (गुन्हा अन्वेषण तंत्रज्ञान) वेड लावलं.
गेल्या वर्षी शेजारच्या घरात आलेला नेथन हेच  त्याचं मुख्य कारण होतं. नेथनला बाबा नव्हते. आई किरकोळ कामं करत चार मुलांचं कसंबसं भागवत होती. घर म्हणजे, हाऽ कचरा. भावंडांची खडाजंगी. एकदा चढे आवाज ऐकून कुणीतरी पोलिसांना बोलावलं आणि ती सगळी भावंडं विखुरली गेली. घराची विकट अवस्था आणि मुलांकडे दुर्लक्ष या कारणाने आईकडून चारी भावंडं सरकारने जबरदस्तीने ताब्यात घेतली. कायद्याने त्यांचा ताबा सरकारकडे होता. आता अशी मुलं स्विकारतील त्यांच्या घरी रहायचं. गेल्या  तीन वर्षात नेथन दोन तीन घरात राहून आता  शेजारच्या घरी आला होता. त्याची त्यांच्या भावडांबरोबर भेट दुर्मिळ झाली. आई कोर्टाच्या पायर्‍या झिजवून थकून गेली होती. दुखावलेला, संतप्त, बेफिकीर नेथन फुटबॉलसारखा वेगवेगळ्या घरात टोलावला जात होता. सतत बदलल्या जाणार्‍या  पालकांना स्विकारायचा अयशस्वी प्रयत्न करत होता. कधीतरी त्याच्याशी बोलण्याची वेळ यायची तेव्हां म्हणायचा,
"आम्ही कुणीच काही गुन्हा केला नव्हता. ना आईने, ना भावंडांनी. तरी ही वेळ का आली आमच्यावर? का, का असं झालं? मी  घरात मोठा पण मला काहीच करता आलं नाही" जेमतेम तेरा वर्षाचा नेथन स्वतःला मोठा समजत होता.  नेथनने बेसबॉल, बास्केटबॉल खेळायला यावं म्हणून शुभमने केलेल्या प्रयत्नांना त्याने दादच दिली नाही. त्याचं लहानपण त्याला सोडून गेलं होतं. मनात दडलेली भिती सतत फणा काढून उभी राही. या घरात त्याचं वागणं आवडलं नाही तर पुन्हा रवानगी दुसर्‍या घरी. शुभमला वाटायचं या यंत्रणेतच काहीतरी बदल करायला हवा. असं दुसर्‍यांच्या घरी जबरदस्तीने रहाण्याऐवजी त्याच मुलांच्या घरची  परिस्थिती बदलायचा का प्रयत्न करत नाहीत? मुलांना काय हवय, कुठे रहायचं ते का नाही विचारत? त्याचं मन, भावना नको का जाणून घ्यायला. ह्याचाच परिपाक म्हणून त्याने गुन्हा अन्वेषण मध्ये पदवी घ्यायचं ठरवलं. त्याने हा विचार नेहाला बोलून  दाखवला तेव्हां तिला धक्काच बसला.
"नेथनमुळे वाटतय तुला हे. पण खरच त्या विषयाची आवड आहे का ते कसं कळणार तुला आता. इट्‌स्‌ टू लेऽट टू ट्राय समथिंग लाईक धिस."
"आवड आहे की नाही हा प्रश्नच नाही. तू पहायला हवस नेथनला. किती एकलकोंडा झालाय तो. आमचे शेजारी अथक प्रयत्न  करतात त्याने सर्वांशी मिळून मिसळून वागावं, हसतमुख रहावं म्हणून. पण हा कायम निर्विकारच. कुठल्याही भावना चेहर्‍यावर येवूच देत नाही. त्यामुळे त्यानांही समजत नाही काय करावं. मग शेवटी त्यांनी त्याला परत पाठवलं तर? खूप भिती वाटते मला या विचाराने. नेथनला हे समजावून सांगितलं पण तो बदलतच नाही."
"अरे पण त्यासाठी तू तुझं वैद्यकीय शाखेचं स्वप्न सोडणार?"
"स्वप्न म्हणजे काय गं? इतर क्षेत्रं तशी फारशी माहित नसतात. आपणच डोक्यात घेवून बसतो काहीतरी. डॉक्टर, इंजिनिअर होणार म्हटलं की कोण कशाला नाही म्हणतय? त्यामुळे तेच मनात रहातं. पण लेट मी पुट धिस इन अनदर वर्डस्‌. नाऊ धिस  इज माय ड्रीम. आय वाँट टू मेक अ चेंज इन सिस्टिम अँड दीज किड्‌स्‌."
"एल ओ एल." नेहाने पटकन टाईप केलं.
"हसतेस काय, तुला नाहीच कळणार एखाद्या गोष्टीसाठी वेडं होणं म्हणजे काय."
"अरे तू दीज किड्‌स्‌ म्हटलस म्हणून हसतेय मी. तू काय असा मोठा माणूस झालायस का? आणि वेडं होणं म्हणजे काय ते  माझ्यापेक्षा कुणाला कळणार चागलं? झालेय की मी तुझ्यासाठी वेडी."
त्याने हसर्‍या चेहर्‍याचं चिन्ह (स्माईली फेस) पडद्यावर ओढलं.
"तू जर आता हे करायचं ठरवलयस तर मग माझं काय?"
"तुझं काय? तू जाऊ शकतेस की मेडिकलला."
"अरे हो, ते कळतय रे मला. पण मग आपली स्वप्नं? दोघांनी एकत्रच शिकायचं ठरवलं होतं ना?"
"अगं मी नुसतं म्हणतोय. अर्ज केले की ते स्विकारले गेले पाहिजेत ना."
"आणि तुझा सगळा कार्यानुभव आहे तो मेडिकलचा."
"हो, म्हणूनच थोडीशी धाकधुक वाटतेय. त्यामुळे मी मेडिकेलसाठीही अर्ज भरणार आहे. ते तर आपण एकत्रच भरु. म्हणजे माझं  नाही झालं क्रिमिनल जस्टीसचं तर निदान मेडिकलला एकत्र असू."
"आय होप सो. "
"आणि मी क्रिमिनलला आणि तू मेडिकलला असं असलं तरी कदाचित एकाच युनिव्हर्सिटीत मिळेलही प्रवेश. कॅम्पस असतील  वेगळे. पण मग भेटूच की आपण. आणि तू म्हणतेस तसं दगडी चौथर्‍यावर झाडांच्या सावलीत गप्पा मारु"
"खरच तसं झालं तर बरच. बेस्ट लक शुभम."
"बेस्ट लक टू यु टू नेहा."

त्यानंतर त्याने घरात सांगितलं होतं. आई-बाबा दोघांनाही थोडसं आश्चर्य वाटलं पण कुणीच नाकं मुरडली नाहीत. कदाचित नेथनचं  जितंजागतं उदाहरण समोर होतं म्हणून? त्याने त्यावर फारसा विचारच केला नाही. मेडिकललाच गेलं पाहिजे म्हणून मागे लागले  नाहीत हेच  खूप होतं. शाळेत म्हणतात की भारतीय मुलांचे आईवडीलच त्यांनी काय करायचं, व्हायचं ते ठरवतात. पण तो काय किंवा नेहा काय दोघांच्याही आईवडिलांनी त्यांना पुरेपुर स्वांतंत्र्य दिलं होतं.  स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही हे ही वारंवार बजावायला विसरले नव्हतेच म्हणा ते. आता फक्त वाट पहायची होती...



क्रमश:
पूर्वप्रसिद्धी ’व्हिवा’ लोकसत्ता


Friday, February 24, 2012

क्षितीज - भाग 8

बसने जाणं जसं शुभमला आवडत होतं, तसचं कधी एकदा ड्रायव्हिंग शिकतो असंही झालं होतं. लवकरच दोन्ही गोष्टीतलं नावीन्य संपलं. सवय झाली. कधी गाडी, कधी ड्रायव्हिंग असं चालू झालं, त्यालाही आता वर्ष होवून गेलं. आज मात्र ड्रायव्हिंग शिकायलाच नको होतं असं वाटत होतं.

'कशाला शिकलो ड्रायव्हिंग असं झालय. हात मोडलेला, पाय मोडलेला अशा अवस्थेत किती दिवस घरी रहावं लागणार आहे  कुणास ठाऊक. मला एका हाताने टाईप करणंही कठीण जातय.' शुभमने नेहाला टेक्स्ट केलं. त्यानंतर मात्र त्याच्यात त्राणच राहिलं नाही. वीस वर्षापर्यंत मेंदू तातडीच्या प्रसंगात निर्णय घेण्याएवढा विकसित झालेला नसतो हे, आईने सांगितलेलं तज्ञाचं मत खरं असावं असं आज त्याला प्रथमच वाटत होतं. हायस्कुलमधलं हे शेवटचं वर्ष. दोन महिने उरलेले त्यानंतर कॉलेज. गॉश! परीक्षा, मार्कस्‌, कॉलेज प्रवेश.....  सगळं घरात बसून कसं पार पडणार? थकल्या मनाने त्याने खुर्चीवरच मान मागे  टेकवली पण दृष्टीसमोर चार दिवसापूर्वी घडलेला अपघातच येत राहिला.
अकरावीपर्यंत काही केल्या त्याला ड्रायव्हिंगची संधी घरातून मिळाली नव्हती. शाळेतच शिकून घेता येतं म्हणून तो गाडी दहावीतच शिकला. पण घरची गाडी मिनतवार्‍या करुनही मिळत नव्हती. अगदी क्वचित फार हट्ट केला की जवळच्या रस्त्यावर एक चक्कर टाकायला मिळे तेवढच. गाडी शिकल्यापासून इथे तिथे जायलाही त्याला गाडीशिवाय पर्याय नाही असच वाटायला लागलं  होतं. दरवेळेला कशाला आई-बाबाला आणणं पोचवणं याचा त्रास? दोघांना पटवायचा अयशस्वी प्रयत्नही केला शुभमने. शेजारचा सॅम काय टेचात स्पोर्ट कार चालवातो. त्याच्या नाकावर टिच्चून त्याला आपली गाडी भरधाव, खचकन ब्रेक दाबून, व्हि सिक्स इंजिनचा आवाज करत चालवायची होती. शेवटी बारावीत गेल्यावर आईच्या जुन्या गाडीवर समाधान मानावं लागलं.
वर्ष बरं गेलं, आणि चार दिवसापूर्वी, शनिवारी सकाळी तो मित्राकडे जायला म्हणून घराबाहेर पडला. फार लांबही नव्हतं घर. रोजचाच रस्ता. गाडीचा वेगही कमीच होता. शनिवारची सकाळ. त्यामुळे फारशा गाड्या नव्हत्याच रस्त्यावर. गाडीत लावलेल्या  रेडिओवरच्या गाण्यात शुभम रंगला होता. डावीकडे वळायचा सिग्नल अजून पिवळा होता. तो लाल व्हायच्या आधी आपण गाडी  वळवू असाच अंदाज बांधला शुभमने. थोडासा वेग वाढवत त्याने गाडी वळवली. आणि काय होतय ह्याची जाणीव होईपर्यंत  समोरुन आलेली गाडी त्याच्या गाडीच्या उजव्या बाजूवर आदळली. त्याचं अनुकरण करत मागून आलेली गाडीही धाडदिशी त्याच्या गाडीच्या मागच्या भागावर आदळली. सीटबेल्ट घातलेला असूनही शुभमच्या मानेला जोरदार हिसडा बसला. बाजूने आदळलेल्या गाडीमुळे खिडकीच्या फुटलेल्या काचाही उजव्या गालात रुतल्यासारख्या वाटल्या.  सगळ्या गाड्या कर्कश्य आवाज करत थांबल्या. त्याने हात हलवायचा प्रयत्न केला खरा. पण हात हलेना. पायातूनही प्रचंड कळा येत होत्या. मागून आपटलेल्या गाडीचा ड्रायव्हर तोपर्यंत मदतीसाठी धावला होताच. समोरुन आपटलेल्या गाडीतल्या माणसांनाही लागलं असावं. शुभमच्या डोक्यातलं विचारचक्रही  थांबलच. ऍम्ब्युलन्स, फायर ब्रिगेडचे आवाज कानात घुमायला लागले तेव्हां कुणीतरी सेलफोनवरुन ९११ ला कॉल केल्याचं त्याला  जाणवलं.  शुभमला अतीव वेदनेने गुंगीच आली. जाग आली ती हॉस्पिटलमध्येच. हातापायाला प्लॅस्टर आणि समोर बसलेले आई-बाबा.
"कसं वाटतय?" आईच्या आवाजातला हळुवारपणा जाणवून त्याला एकदम रडायलाच यायला लागलं. 
"बाकीच्या गाडीतली माणसं कशी आहेत?" मनातल्या मनात प्रार्थना करत त्याने प्रश्न केला. तरुण मुलांच्या निष्काळजीपणाने  हकनाक बळी गेलेल्या माणसांच्या किती कथा त्याने ऐकल्या होत्या. आपल्यामुळे कुणावर तशी वेळ येवू नये याचं भान त्याला तशाही अवस्थेत होतं. 
"सगळी ठीक आहेत. मागच्या गाडीतल्या माणसाला फार लागलेलं नाही. समोरुन जी गाडी आदळली त्यातल्या बाईंनाही सुदैवाने फारसं लागलेलं नाही. एक हात थोडासा सुजलाय तेवढच. पोलिसांना तुझ्याशी बोलायचं आहे. विमा कंपनीच्या माणसांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत. या गोष्टी लगेचच कराव्या लागतात. तेव्हां जे आठवत असेल ते आणि काय असेल ते खरं सांगून टाक."  बाबा आणि आईच्या आश्वासक वागण्याने त्याला डोक्यावरचं प्रचंड ओझं क्षणभराकरता का होईना उतरल्यासारखं वाटलं. पुढच्या  दोन दिवसात बर्‍याच गोष्टी घडल्या. पोलिसांचे अगणित प्रश्न, विमाकंपनीने झटकन वाढविलेला विमा, त्या दोन गाड्यातली माणसं  कोर्टात तर खेचणार नाहीत ना, ही भिती तर होतीच. या चार दिवसात त्यापैकी कुणाचा फोन आला नव्हता. पण बर्‍याचदा नंतर मान दुखतेय, पाठीला मुका मार बसला या कारणांनी पैसे काढण्याचा प्रयत्न करतात असं कालच त्याची भेटायला आलेली  मित्रमंडळी सांगत होती. आई किंवा बाबा काहीच कसं बोलले नाहीत? त्याला आश्चर्य वाटलं.
 दोन दिवसांनी घरी आल्यावर त्याच्या खोलीत दोघं येवून बसले होते. तेव्हां त्यांनी विचारलेले प्रश्न त्याच्या डोळ्यासमोर नाचले.
"तू सेलफोन वर नव्हतास ना बोलत?" आईने थेट मुद्यालाच हात घातला.
त्यालाही झाल्या प्रकारामुळे दोषी वाटत होतच. नेहमीचा आक्रमकपणा कुठेतरी लोपला होता. 
"नाही. मी गाडी चालवताना कधीच सेलफोन नाही गं वापरत. तुम्ही रोज बाहेर पडायच्या आधी आठवण करुन देताच की."
"तरी खात्री करुन घ्यायला हवीच. टेक्स्टिंग नव्हतं ना चाललेलं?" बाबाने पुढचा प्रश्न विचारला. त्याने नुसतीच नकारार्थी मान  हलवली.
"लाल सिग्नलवर डावीकडे वळवलीस गाडी?"
"नाही. पिवळ्यावर." हळुच तो उत्तरला.
"अरे पण किती वेळा सांगितलय की सिग्नल पिवळा होतय असं दिसलं की थांबायचं. भलतं धाडस करायचं नाही. अवघे काही  सेकंद नाहीतर मिनिटं वाचतात, पण ते वाचवायला जाताना काय घडू शकतं ते पाहतोयस ना?"
"आय ऍम रिअली सॉरी. चुकलं माझं" थोडावेळ तो गप्पच राहिला. विचारावं की नको या संभ्रमातच त्याने विचारलं.
"कुणी 'सू' (खटला) नाही ना करणार आपल्याला? माझे मित्र म्हणत होते की पैसे उकळायला पाहतात मानेचं, नाहीतर पाठीचं  दुखणं सुरु झालं म्हणून."
"अजूनतरी नाही. त्या समोरुन येणार्‍या गाडीतल्याच बाई सेलफोन वर बोलत होत्या बहुतेक. पण खटला होण्याची शक्यता नाकारता नाही येत.  ते बघू आपण नंतर. आत्तातरी तुझा अभ्यास, परीक्षा हे सगळं कसं पार पडणार हे पाहायला हवय." दोघांनीही त्याला धीर देत  म्हटलं. त्याला ड्रायव्हिंगबद्दल हजार सूचना करणारी, बडबडणारी आईही शांत होती. त्यामुळे तर शुभमला अधिकच दोषी वाटत होतं. चूक असून किंवा नसूनही वाढलेला विम्याचा हप्ता डोळ्यासमोर नाचत होता. त्याच्या लायसन्सवर आलेले पॉईंट्‌स्‌ अस्वस्थ  करत होते. त्यात आणखी हे कोर्ट प्रकरण नको उद्भवायला. या पेक्षा गाडी नसतोच शिकलो इतक्या लवकर तर? उगाचच त्याला  वाटत राहिलं. तो त्याच्या बाजूला निशब्द बसलेल्या आई बाबांकडे काही न बोलता पहात राहिला. हळूहळू औषधांचा प्रभाव शरिरावर जाणवायला लागला. डोळ्यावर झापडच आली त्याच्या. गाढ झोप लागली. कधीतरी आईने त्याच्या उशीच्या बाजूला चिठ्ठी ठेवली.

* * * * * * * * * * * * * * * * * * * *
पिल्या,

असा झोपून राहिलेला, थकलेला, वाद न घालणारा शुभम पाहणं फारसं सोपं नाही. मला तुझ्या चेहर्‍यावरुनच कळतय की तुला  फार अपराधी वाटतय. झालं ते झालं. आता त्याची चर्चा करण्यात, उगाळण्यात काय अर्थ आहे. थोडक्यात निभावलं यात समाधान  मानायचं. नववीतच सगळी मुलं शिकतात म्हणून तुलाही शिकायचं होतं ड्रायव्हिंग तेव्हां आम्ही मना केलं होतं ते याच कारणासाठी. टेक्स्टिंग, सेलफोनचा वापर आणि मद्यपान करुन केलेल्या ड्रायव्हिंगमुळे किती अपघात झालेले ऐकले आहेत. आणि आपण कितीही व्यवस्थित चालवली गाडी तरी बाकीचे कशी चालवतायत ते आपल्या हातात कुठे असतं? ह्याच मुळे फार सावध  रहावं लागतं गाडी चालवताना. तुझ्या शाळेतल्याच पाच मुलांची ती शोकांतिका आठवतेय ना? झाडावर आदळून गाडी उलटी पालटी  झाली. गेलीच ना सगळी मुलं त्यात? आजही त्या रस्त्यावरुन जातो आपण तेव्हां गवतावर रस्त्याच्या बाजूला त्यांच्या स्मृतीसाठी  लावलेल्या काठीवरचा फलक, नाहीतर क्रॉस असलेले दांडे, अधूनमधून तिथे दिसणारी ताजी फुलं पाहिली की तुला ती  मुलं आठवतात. मला ताजी फुलं तिथे ठेवणार्‍या त्यांच्या जिवलगांचं दुःख व्याकुळ करतं. सेलफोनचा वापर, मद्यपान ह्या गोष्टींवर नियंत्रण ठेवता येईल. पण तुम्हा मुलांचा मेंदू लहान वयामुळे तातडीच्या प्रसंगात निर्णय घेवून कृती करण्या एवढा विकसित झालेला  नसतो त्याचं काय करायचं रे? आणि हे अभ्यासाने सिद्ध झालेलं सत्य आहे. तुला घडलेला हा अपघात म्हणजे डोळे उघडणारा धडा असेल अशी अपेक्षा करु का? 

तुझी आई 

ता. क. : तु वाचतोस का रे माझी पत्रं? तुझ्या वागण्यातून वाचत असावास असं वाटतं तरी. म्हणजे बदलत चाललेला, समंजस असा काहीसा वाटतोस तू हल्ली. हे वाढत्या वयामुळे, माझ्या एकतर्फी पत्रलेखनांने की दोन्हीमुळे?
क्रमश:
पूर्वप्रसिद्धी ’व्हिवा’ लोकसत्ता: 

ओ ड्यूऽऽड लेखमालिका