Friday, February 24, 2012

क्षितीज - भाग 8

बसने जाणं जसं शुभमला आवडत होतं, तसचं कधी एकदा ड्रायव्हिंग शिकतो असंही झालं होतं. लवकरच दोन्ही गोष्टीतलं नावीन्य संपलं. सवय झाली. कधी गाडी, कधी ड्रायव्हिंग असं चालू झालं, त्यालाही आता वर्ष होवून गेलं. आज मात्र ड्रायव्हिंग शिकायलाच नको होतं असं वाटत होतं.

'कशाला शिकलो ड्रायव्हिंग असं झालय. हात मोडलेला, पाय मोडलेला अशा अवस्थेत किती दिवस घरी रहावं लागणार आहे  कुणास ठाऊक. मला एका हाताने टाईप करणंही कठीण जातय.' शुभमने नेहाला टेक्स्ट केलं. त्यानंतर मात्र त्याच्यात त्राणच राहिलं नाही. वीस वर्षापर्यंत मेंदू तातडीच्या प्रसंगात निर्णय घेण्याएवढा विकसित झालेला नसतो हे, आईने सांगितलेलं तज्ञाचं मत खरं असावं असं आज त्याला प्रथमच वाटत होतं. हायस्कुलमधलं हे शेवटचं वर्ष. दोन महिने उरलेले त्यानंतर कॉलेज. गॉश! परीक्षा, मार्कस्‌, कॉलेज प्रवेश.....  सगळं घरात बसून कसं पार पडणार? थकल्या मनाने त्याने खुर्चीवरच मान मागे  टेकवली पण दृष्टीसमोर चार दिवसापूर्वी घडलेला अपघातच येत राहिला.
अकरावीपर्यंत काही केल्या त्याला ड्रायव्हिंगची संधी घरातून मिळाली नव्हती. शाळेतच शिकून घेता येतं म्हणून तो गाडी दहावीतच शिकला. पण घरची गाडी मिनतवार्‍या करुनही मिळत नव्हती. अगदी क्वचित फार हट्ट केला की जवळच्या रस्त्यावर एक चक्कर टाकायला मिळे तेवढच. गाडी शिकल्यापासून इथे तिथे जायलाही त्याला गाडीशिवाय पर्याय नाही असच वाटायला लागलं  होतं. दरवेळेला कशाला आई-बाबाला आणणं पोचवणं याचा त्रास? दोघांना पटवायचा अयशस्वी प्रयत्नही केला शुभमने. शेजारचा सॅम काय टेचात स्पोर्ट कार चालवातो. त्याच्या नाकावर टिच्चून त्याला आपली गाडी भरधाव, खचकन ब्रेक दाबून, व्हि सिक्स इंजिनचा आवाज करत चालवायची होती. शेवटी बारावीत गेल्यावर आईच्या जुन्या गाडीवर समाधान मानावं लागलं.
वर्ष बरं गेलं, आणि चार दिवसापूर्वी, शनिवारी सकाळी तो मित्राकडे जायला म्हणून घराबाहेर पडला. फार लांबही नव्हतं घर. रोजचाच रस्ता. गाडीचा वेगही कमीच होता. शनिवारची सकाळ. त्यामुळे फारशा गाड्या नव्हत्याच रस्त्यावर. गाडीत लावलेल्या  रेडिओवरच्या गाण्यात शुभम रंगला होता. डावीकडे वळायचा सिग्नल अजून पिवळा होता. तो लाल व्हायच्या आधी आपण गाडी  वळवू असाच अंदाज बांधला शुभमने. थोडासा वेग वाढवत त्याने गाडी वळवली. आणि काय होतय ह्याची जाणीव होईपर्यंत  समोरुन आलेली गाडी त्याच्या गाडीच्या उजव्या बाजूवर आदळली. त्याचं अनुकरण करत मागून आलेली गाडीही धाडदिशी त्याच्या गाडीच्या मागच्या भागावर आदळली. सीटबेल्ट घातलेला असूनही शुभमच्या मानेला जोरदार हिसडा बसला. बाजूने आदळलेल्या गाडीमुळे खिडकीच्या फुटलेल्या काचाही उजव्या गालात रुतल्यासारख्या वाटल्या.  सगळ्या गाड्या कर्कश्य आवाज करत थांबल्या. त्याने हात हलवायचा प्रयत्न केला खरा. पण हात हलेना. पायातूनही प्रचंड कळा येत होत्या. मागून आपटलेल्या गाडीचा ड्रायव्हर तोपर्यंत मदतीसाठी धावला होताच. समोरुन आपटलेल्या गाडीतल्या माणसांनाही लागलं असावं. शुभमच्या डोक्यातलं विचारचक्रही  थांबलच. ऍम्ब्युलन्स, फायर ब्रिगेडचे आवाज कानात घुमायला लागले तेव्हां कुणीतरी सेलफोनवरुन ९११ ला कॉल केल्याचं त्याला  जाणवलं.  शुभमला अतीव वेदनेने गुंगीच आली. जाग आली ती हॉस्पिटलमध्येच. हातापायाला प्लॅस्टर आणि समोर बसलेले आई-बाबा.
"कसं वाटतय?" आईच्या आवाजातला हळुवारपणा जाणवून त्याला एकदम रडायलाच यायला लागलं. 
"बाकीच्या गाडीतली माणसं कशी आहेत?" मनातल्या मनात प्रार्थना करत त्याने प्रश्न केला. तरुण मुलांच्या निष्काळजीपणाने  हकनाक बळी गेलेल्या माणसांच्या किती कथा त्याने ऐकल्या होत्या. आपल्यामुळे कुणावर तशी वेळ येवू नये याचं भान त्याला तशाही अवस्थेत होतं. 
"सगळी ठीक आहेत. मागच्या गाडीतल्या माणसाला फार लागलेलं नाही. समोरुन जी गाडी आदळली त्यातल्या बाईंनाही सुदैवाने फारसं लागलेलं नाही. एक हात थोडासा सुजलाय तेवढच. पोलिसांना तुझ्याशी बोलायचं आहे. विमा कंपनीच्या माणसांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत. या गोष्टी लगेचच कराव्या लागतात. तेव्हां जे आठवत असेल ते आणि काय असेल ते खरं सांगून टाक."  बाबा आणि आईच्या आश्वासक वागण्याने त्याला डोक्यावरचं प्रचंड ओझं क्षणभराकरता का होईना उतरल्यासारखं वाटलं. पुढच्या  दोन दिवसात बर्‍याच गोष्टी घडल्या. पोलिसांचे अगणित प्रश्न, विमाकंपनीने झटकन वाढविलेला विमा, त्या दोन गाड्यातली माणसं  कोर्टात तर खेचणार नाहीत ना, ही भिती तर होतीच. या चार दिवसात त्यापैकी कुणाचा फोन आला नव्हता. पण बर्‍याचदा नंतर मान दुखतेय, पाठीला मुका मार बसला या कारणांनी पैसे काढण्याचा प्रयत्न करतात असं कालच त्याची भेटायला आलेली  मित्रमंडळी सांगत होती. आई किंवा बाबा काहीच कसं बोलले नाहीत? त्याला आश्चर्य वाटलं.
 दोन दिवसांनी घरी आल्यावर त्याच्या खोलीत दोघं येवून बसले होते. तेव्हां त्यांनी विचारलेले प्रश्न त्याच्या डोळ्यासमोर नाचले.
"तू सेलफोन वर नव्हतास ना बोलत?" आईने थेट मुद्यालाच हात घातला.
त्यालाही झाल्या प्रकारामुळे दोषी वाटत होतच. नेहमीचा आक्रमकपणा कुठेतरी लोपला होता. 
"नाही. मी गाडी चालवताना कधीच सेलफोन नाही गं वापरत. तुम्ही रोज बाहेर पडायच्या आधी आठवण करुन देताच की."
"तरी खात्री करुन घ्यायला हवीच. टेक्स्टिंग नव्हतं ना चाललेलं?" बाबाने पुढचा प्रश्न विचारला. त्याने नुसतीच नकारार्थी मान  हलवली.
"लाल सिग्नलवर डावीकडे वळवलीस गाडी?"
"नाही. पिवळ्यावर." हळुच तो उत्तरला.
"अरे पण किती वेळा सांगितलय की सिग्नल पिवळा होतय असं दिसलं की थांबायचं. भलतं धाडस करायचं नाही. अवघे काही  सेकंद नाहीतर मिनिटं वाचतात, पण ते वाचवायला जाताना काय घडू शकतं ते पाहतोयस ना?"
"आय ऍम रिअली सॉरी. चुकलं माझं" थोडावेळ तो गप्पच राहिला. विचारावं की नको या संभ्रमातच त्याने विचारलं.
"कुणी 'सू' (खटला) नाही ना करणार आपल्याला? माझे मित्र म्हणत होते की पैसे उकळायला पाहतात मानेचं, नाहीतर पाठीचं  दुखणं सुरु झालं म्हणून."
"अजूनतरी नाही. त्या समोरुन येणार्‍या गाडीतल्याच बाई सेलफोन वर बोलत होत्या बहुतेक. पण खटला होण्याची शक्यता नाकारता नाही येत.  ते बघू आपण नंतर. आत्तातरी तुझा अभ्यास, परीक्षा हे सगळं कसं पार पडणार हे पाहायला हवय." दोघांनीही त्याला धीर देत  म्हटलं. त्याला ड्रायव्हिंगबद्दल हजार सूचना करणारी, बडबडणारी आईही शांत होती. त्यामुळे तर शुभमला अधिकच दोषी वाटत होतं. चूक असून किंवा नसूनही वाढलेला विम्याचा हप्ता डोळ्यासमोर नाचत होता. त्याच्या लायसन्सवर आलेले पॉईंट्‌स्‌ अस्वस्थ  करत होते. त्यात आणखी हे कोर्ट प्रकरण नको उद्भवायला. या पेक्षा गाडी नसतोच शिकलो इतक्या लवकर तर? उगाचच त्याला  वाटत राहिलं. तो त्याच्या बाजूला निशब्द बसलेल्या आई बाबांकडे काही न बोलता पहात राहिला. हळूहळू औषधांचा प्रभाव शरिरावर जाणवायला लागला. डोळ्यावर झापडच आली त्याच्या. गाढ झोप लागली. कधीतरी आईने त्याच्या उशीच्या बाजूला चिठ्ठी ठेवली.

* * * * * * * * * * * * * * * * * * * *
पिल्या,

असा झोपून राहिलेला, थकलेला, वाद न घालणारा शुभम पाहणं फारसं सोपं नाही. मला तुझ्या चेहर्‍यावरुनच कळतय की तुला  फार अपराधी वाटतय. झालं ते झालं. आता त्याची चर्चा करण्यात, उगाळण्यात काय अर्थ आहे. थोडक्यात निभावलं यात समाधान  मानायचं. नववीतच सगळी मुलं शिकतात म्हणून तुलाही शिकायचं होतं ड्रायव्हिंग तेव्हां आम्ही मना केलं होतं ते याच कारणासाठी. टेक्स्टिंग, सेलफोनचा वापर आणि मद्यपान करुन केलेल्या ड्रायव्हिंगमुळे किती अपघात झालेले ऐकले आहेत. आणि आपण कितीही व्यवस्थित चालवली गाडी तरी बाकीचे कशी चालवतायत ते आपल्या हातात कुठे असतं? ह्याच मुळे फार सावध  रहावं लागतं गाडी चालवताना. तुझ्या शाळेतल्याच पाच मुलांची ती शोकांतिका आठवतेय ना? झाडावर आदळून गाडी उलटी पालटी  झाली. गेलीच ना सगळी मुलं त्यात? आजही त्या रस्त्यावरुन जातो आपण तेव्हां गवतावर रस्त्याच्या बाजूला त्यांच्या स्मृतीसाठी  लावलेल्या काठीवरचा फलक, नाहीतर क्रॉस असलेले दांडे, अधूनमधून तिथे दिसणारी ताजी फुलं पाहिली की तुला ती  मुलं आठवतात. मला ताजी फुलं तिथे ठेवणार्‍या त्यांच्या जिवलगांचं दुःख व्याकुळ करतं. सेलफोनचा वापर, मद्यपान ह्या गोष्टींवर नियंत्रण ठेवता येईल. पण तुम्हा मुलांचा मेंदू लहान वयामुळे तातडीच्या प्रसंगात निर्णय घेवून कृती करण्या एवढा विकसित झालेला  नसतो त्याचं काय करायचं रे? आणि हे अभ्यासाने सिद्ध झालेलं सत्य आहे. तुला घडलेला हा अपघात म्हणजे डोळे उघडणारा धडा असेल अशी अपेक्षा करु का? 

तुझी आई 

ता. क. : तु वाचतोस का रे माझी पत्रं? तुझ्या वागण्यातून वाचत असावास असं वाटतं तरी. म्हणजे बदलत चाललेला, समंजस असा काहीसा वाटतोस तू हल्ली. हे वाढत्या वयामुळे, माझ्या एकतर्फी पत्रलेखनांने की दोन्हीमुळे?
क्रमश:
पूर्वप्रसिद्धी ’व्हिवा’ लोकसत्ता: 

ओ ड्यूऽऽड लेखमालिका

2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. खुपच छान लिहिले आहे :-)
    माझ्या साईटचा पत्ता:
    १)संपुर्ण मराठी फेसबुक http://www.marathifanbook.com
    २)http://www.prashantredkarsobat.in

    ReplyDelete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.