Monday, May 7, 2012

पेच

कार्यालयात कसलातरी उग्र दर्प पसरला होता. बरीचजणं काम सोडून त्याची चौकशी करण्याकरता इकडे तिकडे करत होती. सहा सात जण  घरुन काम करायची परवानगी मिळवण्यात यशस्वीही झाले. कार्यालय अर्थातच ओस पडलं. आम्ही आपले एकदोघं जण टकटक करत संगणक बडवत होतो.  एकदम माझ्या लक्षात आलं, कालच नव्याने रुजू झालेली श्रीदेवी कुठे दिसत नाही. हिला आधीच समजलं की काय आज घरुन काम करता येईल म्हणून. आम्ही जेमतेम तिघंजणं उरलो होतो. पोनीटेलला (पोनीटेल बांधतो म्हणून मी केलेलं त्याचं बारसं.) विचारलं,
"श्रीदेवी कुठे आहे?"
"सिरी इज नॉट कमिंग बॅक."
धक्काच बसला.
"का? कालच तर तिचा पहिला दिवस होता. "
"हो, पण नो कम्युनिकेशन स्किल्स म्हणून शी गॉट फायर्ड यस्टरडे." पोनीटेलला मला हे सांगताना जरा जड जात असावं. म्हणजे मी भारतीय, श्रीदेवी भारतीय.... नाही म्हटलं तरी  दडपण आलं असणार. मी घरी गेल्यावर झालेलं दिसतंय हे प्रकरण, मनाशी खुणगाठ बांधत म्हटलं,
"ती नुकतीच आली आहे भारतातून." काल कॅन्टीन दाखवायला नेलं होतं तेव्हा तिच्याकडून मिळालेल्या माहितीवर मी घोडं दामटवलं. खरं तर विचारायचं होतं. एका दिवसात कसं समजलं कम्युनिकेशन स्किल्स नाहीत ते? आणि मुलाखतीत नाही हे लक्षात आलं? पण हे विचारण्याचं धाडस माझ्यात नव्हतं.  माझं वक्तव्य वरपर्यंत पोचायला वेळ लागला नसता ना; म्हणूनच असले काही प्रश्न न विचारता मी आपलं ती नुकतीच आली आहे भारतातून हे विधान मांडलं.
"मल विशेष काही माहिती नाही. तू आपल्या बॉसला विचार. " पोनीटेलने संभाषण आवरतं घेतलं.

 एक रुखरुख, चुटपुट  लागून राहिली मनाला. केवढ्या उत्साहात होती श्रीदेवी. अमेरिकेतली पहिली नोकरी म्हणून खुष होती काल. अशी एका दिवसात ती संपलीही. खरं कारण होतं का, 'लॅक ऑफ कम्युनिकेशन स्किल', की चुकीच्या जागी चुकीच्या वेळी आल्यामुळे बळीचा बकरा... कुणास ठाऊक.

या गोष्टीला पाच सहा महिने झाले आणि  माझ्याबरोबर काम करत असलेल्या एकमेव दुसर्‍या भारतीय मैत्रीणीने नोकरी सोडली. कारण? ती ’बोलते’ ते कार्यालयात कुणाला कळत नाही.  तिची सहकारी  तिला याबाबतीत फार त्रास देत होती. अर्थात हे अनधिकृत. दुसरी नोकरी मिळाल्यावरच तिने ही सोडली आणि ’बेटर फ्युचर विथ बेटर मनी’ हे कारण देत तिने राम राम ठोकला. दक्षिण भारतीय आहे लक्ष्मी. तिने मला विचारलं,
"तू तर इथे बरीच वर्ष आहेस, तुझ्यावर नाही का अशी वेळ आली कधी?"
मी नुसतंच हसून सोडून दिलं. पण पट्ठी माघार घेणारी नव्हती.
"हसू नकोस."
"अगं पण ही अडचण तर प्रत्येक ठिकाणी येणार ना, कितीही प्रयत्न केला तरी थोडा फरक पडतोच हे गृहीत धरायला हवं. आणिउत्तर भारतीय लोकांप्रमाणे तोंड वेडीवाकडी करुन बोलणं मला नाही जमत. मग आगीतून पडून फुफाट्यात का पडा असा विचार करुन टिकले आहे मी इथे.  आणि तशी बरी आहेत की सगळी. खरं सांगू का मला तर या लोकांची दयाच येते, म्हणजे किती वेगवेगळ्या देशातून आलेल्या लोकांचं बोलणं समजून घ्यावं लागतं यांना. मग आपण पण नको का जरा सहनशीलता दाखवायला?"

माझं म्हणणं काही तिला पटलं नाही. स्वत:ला शहाणे समजातात हे ’गोरे’ हे तिचं म्हणणं तिच्या दृष्टीने तिने पुराव्यासहित शाबित केलं.
"हे बघ, सुझनने तिला काहीतरी जमत नव्हतं म्हणून हाक मारली. तिच्या खुराड्य़ात (क्युबिकल) गेले तर म्हणाली, डोंट वरी, आय वोंट अंडरस्टॅट."
"मग बोलावलं कशाला? तू विचारलं नाहीस का?"
"त्यावेळेस नाही, पण एस कसा लिहायचा, नी टी असा लिही असल्या फालतू गोष्टी शिकवायला लागली तेव्हा  धडा शिकवला तिला."
"काय केलंस म्हणजे?"
"तिला एकदा सांगितलं, इट इज बेटर इफ यु राईट टू..., आय डोंट अंडरस्टॅड व्हाट यू से."
"असं सांगितलस तू तिला? खरंच?."
"मग काय करु? कंटाळा आला. नोकरीच्या सुरुवातीलाच म्हणाली होती इट इज डिप्रेसिगं टू टिच यु."
"त्यांना आपली सवय होऊ द्यायला वेळ लागतो."
"गेली दोन वर्ष तेच तर करते आहे. मला तरी आपल्या रंगाचाच हा परिणाम वाटतो." तिला वर्णद्वेष वाटत होता, मला ज्याचा त्याचा स्वभावदोष.

 आश्चर्य वाटलं. आम्ही दोघी एकाच कार्यालयात, एका रेषेत आमची खुराडी आहेत. आम्ही सहाजणं वेबटीममधली आणि नंतर पुढचा प्रशासकीय  विभाग. ती पाच सहा जणं. त्यातच लक्ष्मी.

पहिल्या सहा खुराड्याचं तसं बरं होतं. म्हणजे मी एकच भारतीय, दोन वर्षापूर्वी लक्ष्मी येईपर्यंत.  श्रीदेवी आली कधी, गेली कधी तेच कळलं नव्हतं. आमचं एकत्रित काम करणं, हसणं खिदळणं व्यवस्थित चालू असतं. अधून मधून माझे उच्च्चार त्यांना कळत नाहीत. पण मलाही ही समस्या येतेच. खूपदा असं झालं की उगाचच समजल्यासारखं मी दाखवते, मान डोलवते. माझ्या सहकार्‍यांनी मात्र तसं कधी केलं नाही. ते पुन्हा पुन्हा विचारुन मला काय म्हणायचं आहे ते समजून घेतात. त्यामुळे आनंद तर वाटतोच पण  बोलायची भितीही वाटते, म्हणजे नाही कळलं तर परत परत विचारत रहाणार याची. अधूनमधून खिल्ली उडवतात माझ्या उच्चारांची म्हणा.  आत्तापर्यंत हे कधी खटकलं नव्हतं. पण लक्ष्मीकडून तिला आलेले अनुभव ऐकताना  माझा दृष्टीकोन हळुहळु बदलत गेला.

परवा असंच काहीतरी झालं. कुठल्या तरी शब्दाच्या उच्चारावरुन रोझी हसली. आधी दुर्लक्ष केलं, पोनीटेललाही एकदम हसायला आलं. लक्ष्मीचं काय झालं ते मनात खोलवर नकळत रुजलं असावं. एकदम डोळे भरुन आले. कुणाच्या लक्षात येऊ नये याचा आटोकाट प्रयत्न केला खरा पण तितक्यात तिथला माझा तिसरा सहकारीही काहीतरी बोलला आणि वाटलं, हे थांबायला हवं, त्यांना कळत नसेल तर मी काहीतरी बोलणं भाग आहे.
"यु  आर मीन...." रोझीकडे पहात मी  म्हटलं आणि ताडकन माझ्या खुराड्यात येऊन बसले. सगळ्यांचेच आवाज बंद झाले. बराच वेळ फक्त संगणकावर मारलेल्या बोटांचा टकटक आवाज येत होता. मी उठून मोकळा श्वास घ्यायला, खरं म्हणजे बाथरुममध्ये मुक्तपणे रडायला तिथून बाहेरच पडले.

परत आले तर रोझी खुराड्यात आली.
"मला माफ कर. गंमत करत होतो आम्ही."
"ठीक आहे." मी तुटक पणे उत्तरले.
"तुला इतकं का वाईट वाटलं? तुमची नावं आम्हाला घेता येत नाहीत तेव्हा तू नाही का चेष्टा करत आमची."
"अगं बाई, केव्हातरी चेष्टा करणं निराळं आणि मुद्दाम छेडत रहाणं वेगळं." पण मला हे बोलणं जमलं नाही.  डोळे पुन्हा भरुन आले. कसंबसं म्हटलं,
"रोझी, मी ठिक आहे. नंतर बोलू आपण." माझा एकंदर नूर पाहून ती तिथून गेली. मी मात्र विचारात पडले.

गेली कितीतरी वर्ष या लोकांबरोबर मी काम करते आहे. आत्तापर्यंत हे असे प्रसंग सर्वांवर येतच असणार म्हणून सोडून द्यायलाही शिकले होते. हे एकदम काय होतं आहे मला. श्रीदेवीला काढण्याचा, लक्ष्मीने नोकरीच सोडण्याच्या प्रसंगाने सगळं वाकडंच दिसायला लागलं आहे मला, की त्याच्यांमुळे डोळे उघडून बदललेला हा दृष्टीकोन? पडलेल्या या प्रश्नांची उत्तरं  हाती लागायच्या आधीच जाणवलं की चुकूनही कुणी माझ्या उच्चारांची टवाळकी करत नाही. खुष झाले. म्हटलं चला, माझ्या अश्रुंचा उपयोग झालेला दिसतोय. खरंही ठरलं ते.  निदान काही दिवस.

पण रोझी  तिच्यादृष्टीने मी तिचा सर्वांसमोर केलेला अपमान विसरली नव्हती. मी,  ’यु आर मीन टू मी’ म्हटलेलं तिला रुचलं नव्हतं. आता नवीनच सुरुवात झाली आहे. मी काहीही बोलले की,
"आय  अम सॉरी, व्हॉट डिड यु से?" मी निमुटपणे मला काय म्हणायचं आहे ते पुन्हा सांगते नाहीतर काही बोलायचं  असेल ते आधी IM करते आणि नंतरच तिच्या खुराड्यात प्रवेश करते. पण हे झालं कामाचं. साध्या गप्पा मारताना  असं कसं करणार?.

बघू आता कोण माघार घेतं, म्हणजे रोझी थांबवते का हा पोरखेळ याची वाट पहायची नाहीतर काही दुसरा मार्ग सुचतो का या पेचातून सुटण्याचा ते शोधायचं... तुमच्या शुभेच्छाच्या प्रतिक्षेत! दुसरं काय. :-).

Friday, April 27, 2012

श्रद्धा


मध्यंतरी मैत्रीणीकडे वैभवलक्ष्मी व्रताच्या उद्यापनासाठी गेले होते. देवीचं महात्म्यं सांगताना कुणीतरी म्हणालं.
"सगळं नीट करावं लागतं नाहीतर प्रत्यय देतेच देवी."
"म्हणजे?"
 तिने आपल्या मैत्रीणी बाबत घडलेली घटना सांगितली. व्रताच्या दिवशी मैत्रीण अचानक आजारी पडली.  रुग्णालयात हलवावं लागलं. पोटदुखीने बेजार झाली होती. विचार केल्यावर लक्षात आलं की व्रताच्या दिवशी आंबट खाल्लं होतं.

 देवीचा महिमा म्हणून दिलेलं हे उदाहरण. हळदीकुंकु, पादुका आगमन, व्रतं, भोंडला असं परदेशात राहूनही करतात म्हणून कौतुक करायचं की माणसाच्या श्रद्धेचा, भक्तीचा अतिरेक कुठे पोचवणार याची चिंता करायची? असं काही ना काही मनात  घोळत राहिलं. त्या अस्वस्थतेतून जन्माला आलेली ही कविता.

माणूस

भग्न मंदिराच्या एकेक पायर्‍या
ती चढत होती
देवळातल्या देवीलाच जाब विचारायला
जात होती
चढताना तिला कळलंच नाही
तिची वाट बंद होत होती
पायरी पायरी ढासळत होती!

देवीने सुटकेचा श्वास सोडला
बाई गं, किती जणांचे प्रश्न सोडवू?
त्यापेक्षा दोघी एकदमच ब्रम्हदेवाकडे जाऊ!

रस्त्यावरुन,
एक भक्त विस्मयाने पहात होता,
 आपलं गार्‍हाणं कुठे घालावं हा मोठा पेच होता
समोर, देऊळ स्त्रीसह
जमीनदोस्त होत होतं
आणि त्याचं ’माणूसपणही’!
कोणतातरी देव शोधायचंच
काम महत्त्वाचं होतं
त्यापुढे त्या स्त्रीचं जीवन क्षुल्लक होतं
हेच तर त्या देवाचंही दु:ख होतं!