Wednesday, April 2, 2014

इच्छा

आज ’अगत्य’ बंगल्यात दादांची तिन्ही मुलं मुक्कामाला होती. किती वर्षांनी तिघं भावंडं एकत्र आली होती.
दादांना दर दिवाळीला वाटायचं, तिन्ही मुलं, सुना, जावई, नातवंडांनी घर भरून जावं. पण तसा योग कधी आलाच नव्हता. कुणा एकाची कायम अनुपस्थिती. प्रत्येकाची कारणंही पटण्यासारखी.  दादांना वाटायचं, लहानपणी थोडा धाक दाखवला की मुलं ऐकत तसं करुन सर्वांना एकत्र आणायला हवं. तो बेत पार पडलाच नाही कधी. आणि आज दादा गेल्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण होत होती. दादांच्या जाण्याने तिघं भावडं घरी आली होती, पण दादा नव्हते. विचारांच्या नादात  निलेशचा डोळा लागला तितक्यात दार वाजलं. आतल्या खोलीत पडलेल्या सगळ्या भावंडांनी एकमेकांकडे नजर टाकली.
"कुणीतरी आलं भेटायला."
"दुपारचे दोन वाजले आहेत. कधीही कसे येतात?"
"अरे, ’हाक’ मारायला येणारे काय वेळ ठरवून येणार का?"
"निलेश, तू जातोस बाहेर? आम्ही पडलो आहोत जरा म्हणून सांग. नको वाटतं आता तेच तेच बोलणं. तुझ्याशी निदान काहीतरी वेगळा विषय असेल त्यांना बोलायला."
"माझ्याशी काय बोलणार वेगळं?"
"अमेरिका."  सुनील खिजवल्यासारखं म्हणाला तसा निलेश वैतागला.
"दादा गेले म्हणून भेटायला येतायत लोकं. अमेरिकेबद्दल ऐकायला नाही."
"हो पण बघच तू आता, अमेरिकेचा विषय निघतो की नाही, मग आईला घेऊन जाणार का विचारतील, इथे एकट्याच राहणार का त्या, घर विकायचं आहे का... आपण अजून विचारही केलेला नाही ते सगळं विचारण्याचं काम हे ’हाक’ मारायला येणारे करतायत. सात आठ दिवस तेच तर चाललं आहे. काल तर आईला कुणीतरी दादांची आठवण येते का म्हणूनही विचारलेलं ऐकलं मी."
निलेश मुकाट्याने बैठकीच्या खोलीत आला. ठरल्याक्रमाने सुनील म्हणाला तसं पारही पडलं. निलेशचं डोकं भणभणायला लागलं, खरंच सांत्वन करायला येतात माणसं की स्वत:चं कुतूहल शमवायला?

"तुला यातलं काही हवं आहे का बघ." दादांचे कपडे, फोटो, बॅगा असं सगळं काढून बसलेल्या भावंडांकडे निलेश पाहत राहिला.
"हे नंतर नाही का करता येणार?"
"कधी करायचं? तू जाशील निघून. मग कोण आवरणार?  दादांच्या आजारपणात खूप रजा झाल्या आहेत. इतक्यात परत यायला नाही जमणार आमच्यापैंकी कुणाला."
"अरे, मग राहू दे की तसंच सगळं. जेव्हा केव्हा येऊ तेव्हा एकत्र भेटू आणि ठरवू शांतपणे." सुनील हसला.
"शांतपणे? अरे, दोन वर्षांनी तू येतोस इथे ते दोन तीन आठवड्यांसाठी. इतकं वर्ष झाली. शांतपणाने कधी राहिला आहेस? दादांना बघायला यायला जमलं नाही तुला. पैसे पाठवून दिले की संपलं का सगळं?"
"का? पैशाचा उपयोग नाही झाला? दादांना भेटायला यायची इच्छा मारून मी  पैसे पाठवले. इथे येण्याजाण्याचा खर्च करण्यापेक्षा  दादांच्या उपचारांवर झाला तर ते या आजारपणातून वाचतील, ते बरे झाले की सावकाशीने भेटेन असा विचार केला.  मी नुकताच येऊन गेलो होतो आणि लगेचच हे आजारपण आलं म्हणून तसं आपणच ठरवलं ना?  डायलिसिस, किडनी ट्रान्सप्लॅट.... सतत काहीतरी चालू होतं ते काय फक्त तुमच्या पैशांनी शक्य होतं का? तुमचा भार कमी व्हावा ही देखील इच्छा होती माझी. पैसे दिले नसते तर तिथूनही म्हटलं असतंत, अमेरिकेत राहूनही आई वडिलांसाठी खर्च करता येत नाही."
"असं म्हटलं आहे का कुणी तुला?" स्मिताचा आवाज चढला.
"म्हणायला कशाला हवं? आल्यापासून ऐकतो आहे ना, मी यवं केलं, मी त्यंव केलं, तू होतीस म्हणून बरं, तू किती केलंस रे दादाचं, किती दिवस चाललं आहे आजारपण, धावपळ सतत... थोपटा नुसती एकमेकांची पाठ, मुद्दाम जाणवून देताय ना, गरजेला मी इथे नव्हतो ते. पैशाचं सोंग आणता आलं असतं का, उपयोग झाला ना पाठवलेल्या पैशांचा? पण एकाने तरी म्हटलं का, तुला दादा भेटले नाहीत याचं वाईट वाटतं,  तू पाठवलेल्या पैशांमुळे खूप सोय झाली. म्हटलं का? मला काय दादांना भेटायची इच्छा नव्हती का? आणि दादा गेल्या गेल्या निघाले आता घर खाली करायला. आवराआवरी करतायत म्हणे. आई आहे अजून हे विसरू नका. आपण आपलं किती सामान आणून ठेवलं आहे इथे. दादा म्हणायचेच, ’गोडाउन’ केलं आहे तुम्हा मुलांनी घराचं. आपण इथे राहत नसूनही ठेवलं ना त्यांनी सामान जपून. मग काल दादा गेले नाहीत तर आज बसायलाच हवं का सगळं आवरायला? मी काय घेऊ आणि तू काय नेतोस..."
"आम्ही जे केलं ते पण बोलायचं नाही का? तू तुझ्या पैशाचा माज दाखवू नकोस हा निलेश." सुनील तणतणला.
"आणि तुला वाटतं तसं इथे काही माणसं पैशाला पासरी नाही पडलेली. आम्हीच येऊन जाऊन करत होतो दादाचं. हॉस्पिटलमध्ये नेणं, आणणं, रक्तदाते शोधणं एक ना अनेक. नुसतं पैशाने नाही भागत. वेळ द्यावा लागतो." स्मिता फणफणली.
"वेळ, वेळ, वेळ. इथेच राहत असतो तर मीही दिला असता माझा वेळ. कळलं ना? ते शक्य नव्हतं म्हणून आर्थिक भार उचलायचा प्रयत्न केला. आणि सारखं तुम्ही किती करत होता त्याचे गोडवे नका  गाऊ. दादा, आई पण राबले आहेत तुमच्यासाठी तेवढेच. आताआता पर्यंत. कधीही फोन करा. कुणाच्या तरी गरजेला आई तिकडे गेलेली. बाबा एकटे घर सांभाळायला. आणि इतकं करून शेवटी मलाच धडे देताय.  तुमचं पण ना त्या भेटायला येणार्‍या माणसांसारखं झालं आहे. ती निदान बाहेरची तरी, घरातल्याच माणसांची वागायची ही तर्‍हा. मग कशाला हसायचं इतरांना? अमेरिकेत गेलो ते नोकरीसाठी पण आता वाटतं बरंच झालं.  तुमच्यापासून सुटका तरी झाली."

"निलेश गप्प बस एकदम. सुनील, स्मिता तुम्ही दोघंही. एक शब्द बोलू नका. अरे, ह्यांना जाऊन पुरते दहा दिवसही झालेले नाहीत तेवढ्यात तुमचे वाद सुरू. निदान माझी तरी लाज ठेवा."  आईच्या उपस्थितीची जाणीव झाल्यासारखे तिघंही एकदम गप्प झाले.
"नातेवाईक, शेजारीपाजारी, तुम्ही मुलं...मला ठाऊक आहे प्रत्येकजण कर्तव्य, जबाबदारी म्हणून सारं करता आहात. पण कुणी माझ्या मनाचा विचार करतं आहे का? पस्तीस वर्षांचा संसार. त्यांच्या मरणाची चाहूल लागल्यावर मला काय वाटलं असेल  याचा विचार आला का रे कधी तुमच्या मनात? चेहर्‍यावर हसू ठेवून वावरायचं, यातूनही ते वाचतील असं स्वत:च्याच मनाला बजावत राहायचं, त्यांना उभारी द्यायची. खचून जायला झालं रे. आता सहप्रवास संपला आहे आणि मावळतीच्या रस्त्यावर मी एकटी उभी आहे या कल्पनेनंच उन्मळून पडल्यासारखं झालं आहे.  कटकटी, हेवेदावे, वाद... नको आहे हे मला काहीही आता.

वाटतं, आपण सर्वांनी एकत्र बसावं, ह्यांच्या आठवणी काढाव्यात, तुम्ही तिघं लहान असतानाच्या आठवणी जागवाव्यात. किती दंगा करायचात, धुडगूस असायचा नुसता घरात. दादा ओरडायचे पण त्या धुडगुसात सामीलही व्हायचे, तुमच्याबरोबर खेळायचे, पत्त्यांचे डाव, बॅडमिंटन, गप्पांचे अड्डे... हौशी होते तुमचे दादा. मनात आलं की निघायचो आपण भटकंतीला. निलेश, सुनील तुम्ही निमित्त काढून स्मिताला हैराण करायचात, चिडवायचात, एकटं पाडायचात. मग दादा तिचे मित्र बनायचे. तिच्या बाजूने तुमच्याशी भांडायचे. तुमच्या प्रत्येकाच्या मनात असतील ना रे अशा आठवणी? मला वाटलं होतं. कधी नव्हे ती माझी तिन्ही मुलं एकत्र आली आहेत. जुने दिवस आठवू, दादांच्या आठवणीत रमू. पण नाही, तुमचं सारं लक्ष काम संपवण्याकडे आणि एकमेकांची उणीदुणी काढण्याकडे. मला ठाऊक आहे, आता माझं काय हा ही विचार मनात घोळत असणार. तुमच्या दृष्टीने निर्णय लवकर घेणं भाग आहे कारण निलेशला  अमेरिकेत परतायचं आहे, स्मिता आणि सुनीलला  मुंबई गाठायची आहे. हा विषय काढणार असाल तर आत्ताच सांगते. माझी काळजी करू नका. मी या घरातच राहणार आहे झेपतं आहे तोपर्यंत. झेपेनासं झालं की मी स्वत:हून सांगेन.  एवढ्या मोठ्या घराची  माझ्याच्याने उस्तवार नाही होणार. विकलेलं बरं. छोटासा फ्लॅट घेईन इथेच. नाही नाही, त्यासाठी तुम्हाला काहीही करावं लागणार नाही. तुमचे दादा असतानाच आम्ही काही गोष्टी ठरवून टाकल्या होत्या. घर विकायचं तेही मी पाहीन. विकून येतील ते पैसे मी असेपर्यंत बँकेत राहतील, मला लागले, आजारपण आलं तर त्यासाठी वापरता येतील. उरले तर नंतर तुम्ही वाटण्या करालच. दादा गेल्यागेल्या जे सुरू झालं ते मी गेल्यागेल्या होईलच याची खात्री आहे मला."

एका दमात बोलल्यामुळे त्या थांबल्या. तिघांनाही शरमल्यासारखं झालं. बराचवेळ कुणीच काही बोललं नाही. पण प्रत्येकाच्या  मनात आता दादांच्या आठवणी पिंगा घालत होत्या. निलेश आईजवळ सरकला. हळूच तिच्या खांद्याभोवती हात घालून त्याने तिला जवळ ओढलं.
"आई, उद्या दहावा दिवस आहे. काका, मामा, मावश्या सगळी येतील. तेव्हा रात्री आपण हेच करू. दादांच्या सुखद आठवणी जागवू. चालेल?" डबडबलेल्या डोळ्यांनी स्मिता, सुनील, निलेश आईकडे पाहत होते. तिने पसंतीची मान डोलवली तशी दादांच्या नसण्याने प्रत्येकाचा जीव गलबलून गेला.

रात्री पलंगावर पडल्या पडल्या तिघांच्या मनात आठवणींची गर्दी झाली होती. निदान त्या क्षणी तरी जबाबदारी, कर्तव्य, वाटणी, आवराआवरी हे सारे शब्द बाजूला पडले होते. डोळे मिटून दादांची तिन्ही मुलं लहान होऊन त्यांच्या कुशीत शिरली होती. आणि झोपेचं खोबरं झालेली तिन्ही लेकरांची आई, पलंगावर बसून आपल्या लेकरांच्या चेहर्‍यावर पसरलेली निरागस झाक, निष्पाप हसू डोळे भरून मनात साठवत होती.


बृहनमहाराष्ट्र वृत्तच्या लेखमालेतील हा माझा ५ वा लेख.
वृत्त दुवा -  http://bmmonline.org/sites/default/files/BMM/BMM/BMM_Newsletter_April2014.pdf



Friday, March 21, 2014

मराठी एकांकिका - १२ एप्रिल २०१४

तुम्ही शारलट नॉर्थकॅरोलायना मध्ये रहात असाल तर आमच्या एकांकिका पहायला नक्की या!



अभिव्यक्ती प्रस्तुत मोहना आणि विरेन जोगळेकर निर्मित, दोन एकांकिका
 रहस्यमय ’खेळ’ आणि विनोदी ‘भारत, एक खोच‘,
तारीख: शनिवार – 12 एप्रिल 2014, वेळ: 3:30 pm
ठिकाण :Matthews Playhouse
100 McDowell St, Matthews, NC 28105

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्यायला विसरु नका