Monday, November 5, 2018

दिवाळी आणि दिवाळी अंक


प्रत्येकाच्या मनात बालपणीची दिवाळी खोलवर रुजलेली असते. फराळ, फटाके, पहाटेच्या समयी पणत्यांचा मंद प्रकाश याबरोबरच मला आठवते ती दिवाळी अंकांची आतुरतेने केलेली प्रतीक्षा. दिवाळी अंक आमच्या नेहमीच्या वर्तमानपत्र विक्रेत्याला सांगून ठेवलेले असायचे किंवा दिवाळीच्या दिवशी फराळावर ताव मारून झाला की आम्ही वडिलांबरोबर अंक विकत आणायला जायचो. माहेर, आवाज, कथाश्री, अनुराधा असे काही अंक आठवतात. नंतर वाचनालयात जे मिळतील त्यावरही आम्ही तुटून पडायचो. त्यातल्याच दिवाळी अंकात कथा प्रसिद्ध होणं आणि त्यावेळच्या आमच्या आवडत्या लेखक - लेखिकांच्या पंक्तीत आपलंही काही असणं हा अनुभव अवर्णनीय आहे.

गेली काही वर्ष याचा अनुभव घेतेय. आणि यावर्षी तब्बल १२ दिवाळी अंकात माझ्या कथा आहेत. असं लिहिताना मनात येऊन गेलं, ’म्हणजे महिन्यात फक्त एकच कथा लिहून झाली?’ पण शब्दांचं, विषयांचं असंच आहे. एकदा आजूबाजूला घोटाळायला लागले की कागदावर स्थिरावेपर्यंत त्यांना धीर नसतो पण जवळपास यायचं नाही ठरवलं की फटकूनच वागतात, अस्वस्थ करत राहतात. चालायचंच. तर त्यापैकी काही छायाचित्र. आणि सर्व गोष्टींची अगदी थोडक्यात कल्पना. अंक मिळवून नक्की वाचा आणि अभिप्राय कळवा.

यावर्षी इतक्या अंकासाठी प्रथमच लिहून झालं आणि मेहता प्रकाशनाने माझा ’रिक्त’ कथासंग्रह प्रसिद्ध केला. त्यामुळे माझ्यासाठी हे वर्ष खूपच आनंदाचं ठरलं. तसंच तुमच्यासाठी उर्वरित हे आणि पुढील वर्ष आनंदाचं, इच्छापूर्तीचं जावो.

माझ्या कथा/लेख असलेले दिवाळी अंक
१. आवाज
२. श्री. व सौ.
३. सामना
४. प्रसाद
५. मेहता ग्रंथ जगत
६. कथाश्री
७. अनुराधा
८. कुबेर
९. अभिरुची
१०.माझा मराठीचा बोल
११. फ्रान्स महाराष्ट्र मंडळ
१२. बिगुल (लेख)

आवाज: आर्थर पार्क हा आमच्या गावातील भारतीय लोकांनी भरलेला भाग. तिथे काही वर्ष चोरांचा सुळसुळाट वाढलाय. अशीच एक नुकतीच झालेली चोरी आणि तिचा शोध घेणारा तरुण देखणा अमेरिकन पोलिस. तो पोलिस आणि भारतीय नागरिकांमुळे त्याच्या तपासकामात वाढलेला गोंधळ याची कथा - आर्थर पार्क

प्रसाद : न्यूयॉर्कमधील धडाडीचा तरुण वकील. वडिलांच्या पेशामुळे त्याच्याच वयाच्या मुलांकडून होणारी हेटाळणी आणि त्यामुळे वडिलांचीच आयुष्यभर लाज बाळगत आलेल्या आणि अचानक एका प्रसंगाने आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललेल्या परमजितची कथा - धुकं.

मेहता ग्रंथ जगत: दत्ता आणि मुक्ताच्या आयुष्यात सावत्र आई येते. मुक्ताच्या हृदयात ती सहज स्थान पटकावते. पण ’सावत्र’ या शब्दाच्या विळख्यात अडकलेला दत्ता तिला नाकारत राहतो. आणि अचानक कितीतरी वर्षांनी दत्ताच्या कृतीने तिघांचं अवकाश बदलतं. त्या घराची कथा - झाकोळ.

कथाश्री: सुलभा आणि अविनाशची एकुलतीएक मुलगी कांचन. एकेकाळी ज्या संकटातून अविनाशला जावं लागलं त्याच समस्येला कांचनलाही तोंड द्यावं लागतं. तोच प्रसंग तिच्यावर ओढवतो. हा प्रसंग तिला वडिलांबद्दल असलेल्या शंका, राग याबद्दल नकळत वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला भाग पडतो. कोणता हा प्रसंग आणि काय होतं पुढे? कथा - सुरुवात.

अनुराधा: दुकान, गिरण असं एक स्वप्न मनात बाळगत शिपायाचं काम करणारा त्रिंबककर, राजेश आणि धर्मेंद्र ही दोन टोकाचे स्वभाव असलेली त्याची मुलं. अचानक त्रिंबककरचं स्वप्न खरं होण्याची शक्यता निर्माण होते. पण... तो जो ’पण’ असतो त्यामुळे मुलगा, बायको एका बाजूला तर त्रिंबककर आणि त्याचा एक मुलगा दुसर्‍या बाजूला असं चित्र निर्माण होतं. होतं त्रिंबककरचं स्वप्न पुरं? की तो ’पण’ सर्वांनाच वेगळ्या दिशेला नेऊन सोडतो? कथा - दुकान, गिरण आणि...

बिगुल: कायद्याने अमेरिकेत समलिंगी विवाहाला मान्यता मिळालेली असली तरी यौवनावस्थेतील मुलांचं समलिंगत्व पालक स्वीकारत नाहीत. काय करतात ते यावर? त्यावर प्रकाश टाकणारा लेख. दुसरी बाजू.

श्री. व सौ. : वय नावाचं गौडबंगाल या अंकाच्या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित कथा. वय वाढणं कुणाला चुकलंय? पण या वाढत्या वयाबरोबर होणारी मानसिक, शारीरिक स्थित्यंतरही कधीकधी ढवळून काढणारी ठरतात. कुणी यातून मार्ग काढतं, कुणी नकारात्मकताच घट्ट धरून राहतात. त्यावर आधारित कथा - पर्याय.

कुबेर: वरुण आणि त्याच्या मैत्रिणीच्या एका कृत्यामुळे आत्मघाती कृत्याकडे वळलेला त्याचा मित्र. वरूणला त्याच्या वागणुकीबद्दल न मिळालेली शिक्षा यामुळे उसळलेला जनप्रक्षोभ. या सार्‍या घडामोडींचा, तरुणांच्या मानसिकतेचा अभ्यास करणारे आलोक रॉय. असं काय केलं वरुणने आणि त्याच्या मैत्रिणीने? कथा - प्रारंभ.

सामना: एकमेकांपासून दूर गेलेल्या, कधीही भेट न झालेल्या बहिणी. अचानक एकीला दुसरीची भेट घ्यायची इच्छा होते. पण बहीण कुठे असते हे देखील ठाऊक नाही. होते दोघींची भेट? दुसरीला असते बहिणीला भेटायची इच्छा? त्या दोघींची आणि त्या दोघींच्या कुटुंबाची ही कथा - प्रवेश











Thursday, October 4, 2018

अक्कलखाती गेलेले पैसे परत कसे मिळवायचे?

आता अक्कलखात्यात गेले हे समजलं हेच खूप झालं. परत कसले मिळवताय असं म्हणाल तुम्ही. पण मिळवायचेच आहेत. प्रश्न पैसे गेल्याचा नाही फसवणूक झाल्याचा आहे. तर झालं असं,

गेली दोन वर्ष लमार नावाचा इसम आमचं गवत कापायला येतो. महिन्याचे पैसे मी त्याला एकदम देते. हल्ली हल्ली गवत वाढलेलं नसतानाही तो कापत होता. गवत नसेलच तर कापणार कसं हा प्रश्न मला पडतो लमारला नाही. त्यादिवशी अचानक यंत्राचा आवाज आला आणि भूकंप झाल्यासारखी मी दार उघडून बाहेर धावले. माझा वेगच इतका होता की लमारच्या हातातलं यंत्र धाडकन थांबलंच. तरी मी त्याला पुन्हा थांबवलं,
"थांब, थांब. गवत वाढलेलं नाही." लमारने मला वेड लागल्यासारखं माझ्याकडे पाहिलं आणि एक कोबीच्या गड्ड्यासारखा वाढलेला गड्डा दाखवला."
"हे गवत नाही. रान आहे. " मीपण त्याला वेड लागलंय असा चेहरा करत सांगितलं. दोघं वेडे एकमेकांकडे पाहत राहिले काहीवेळ. तो काही बोलत नाही हे पाहून मीच म्हटलं,
"एका झुपक्यासाठी तू अख्खी माती कापणार? गवत नाहीच वाढलेलं तर मातीच कापू असं ठरवून येतोस की काय? काय बुवा ही माणसं! पैशासाठी कापा आम्हाला." मी मनात बोललेलं त्याला समजलं. तो म्हणाला,
"ठीक आहे. मी पुढच्या आठवड्यात येतो." तो गेला आणि लमारला कसं झापलं, थांबवलं हा माझा पराक्रम मी घरात जाहिर करुन टाकला, आता तुमच्यापर्यंत पण पोचवतेय. उकळायला बघतात नुसते. थांबवलं नाही तर फसलातच तुम्ही वगैरे स्वगतं घरात आठवडाभर चालली आणि नंतर सुरु झाली प्रतिक्षा. गवत वाढवाढ वाढलं पण लमारचा मुखचंद्रमा नाहीसा झाला तो झालाच. पुन्हा अवतरलाच नाही आमच्या अंगणात.

आता...?
त्याला भरपूर निरोप पाठवले. लेखी. म्हणजे SMS हो. मग फोन केले. लमार महाशय फोन उचलत नाहीत म्हटल्यावर नवर्‍याला गळ घातली. त्याने
"तू असे आधीच कसे पैसे दिलेस?" एवढा एक प्रश्न विचारुन दुर्लक्ष केलं. त्यावर मी चार वाक्य ऐकवायला गेले.
"प्रत्येकवेळेला ४० डॉलर्सचा चेक नाहीतर रोख देत बसायचं?. तसं केलं असतं तर एकदम का देत नाहीस म्हटलं असतंस." पुढची दोन पूर्ण व्हायच्या आत,
"लमारमुळे आणखी एक वादाला निमित्तच सापडलं तुम्हाला" असा शेरा मारुन मुलगी आपल्या खोलीत निघून गेली. मग लमारशी बोलण्याऐवजी नवर्‍याने त्याला SMS धाडून दिला. तो कसला उत्तर देतोय. असे १५ दिवस गेले मग अनोळखी फोन वापरुन फोन केला आणि नवर्‍याच्या हातात दिला. लमारने हा फोन ताबडतोब उचलला. कोण बोलतंय कळल्यावर तो कसा अपघातात जायबंदी झालाय. येतोच पुढच्या आठवड्यात असं सांगत त्याने माझ्या नवर्‍याची समजूत घातली. इतकी की काही मदत हवी आहे का असं माझा नवराच त्याला विचारायला लागला. मी आपली इकडे १२० डॉलर्सच्या खाणाखुणा करत. फोन ठेवल्यावर नवरा म्हणाला,
"अपघातात जायबंदी आहे. जाऊ दे. उपचाराला होतील त्याला पैसे ते. सोडून दे."
"लमारला सोड तू. आम्हाला देतोस का तू सहज सोडून.." वगैरे मला अर्थात काढणं भागच होतं. ते झाल्यावर मी समजूतीने म्हटलं,
"पण तो खरंच जायबंदी आहे का ते शोधून काढ आधी. त्याने मला फसवलंय. अनोळखी फोन कसा उचलला? सरळसरळ थापा मारतोय." तो थापा मारतोय की नाही यावर आम्ही घनघोर चर्चा केली. मग श्रमपरिहार म्हणून मस्त बाहेर जेऊन आलो.

पुन्हा लमारची प्रतिक्षा सुरु. काही दिवस वाट पाहून काल त्याला निरोप पाठवला.
"BBB कडे तक्रार करते तुझी. सोशल मिडीयावर वाभाडे काढते तुझे." आता हे वाभाडे नक्की कसे काढायचे? लमारला ओळखणारं आहे कोण इथे :-).

जाऊ दे झालं. इतकं लिहिल्यावर उगाचंच १२० डॉलर्स मिळाले असं वाटायला लागलंय. म्हणजे काय तुमच्यापैकी कुणीतरी काय केलं की अक्कलखात्यात गेलेले पैसे परत मिळवण्याची युक्ती सांगेलच. नाही का?