Friday, January 24, 2020

जपानला आमचं ’काबूकी’

जपानला ’पारंपरिक’ घरात राहू असं नवरा म्हणाला आणि माझ्या पोटात गोळा आला. कोकणातलं ’पारंपरिक’ घर आठवलं. शरीरधर्मासाठी रात्री अपरात्री जायची वेळ आली तर ’परसा’कडे जीव मुठीत धरून जाणं, कटकटी शरीररक्षक भावंडं सोबतीला नेणं, कंदिलाच्या उजेडात सावल्यांच्या खेळांनी जीव गेल्यागत होणं असं सगळं डोळ्यासमोर आलं.

जापनीज पारंपरिक घरात शिरलो आणि एवढंसं घर आमच्या चार देहांनी व्यापून टाकलं. बॅगा जमिनीवर इतस्त:त तोंडं उघडून विखुरल्या. इकडे तिकडे नजर टाकली आणि माळ्यावर जाण्यासाठी अरुंद जिना दिसला. मी वर जायचंच नाही असं ठरवून टाकलं पण इलाज नव्हता. झोपायची व्यवस्था वर होती.
"एवढ्याशा पायर्‍यांवर जपान्यांची पावलं मावतात कशी?" वर जाताजाता खाली गडगडणार नाही याची दक्षता घेत मी चढता चढता हवेत प्रश्न भिरकावला. माझ्या प्रश्नांना, ’वाट्टेल ते विचारत राहते’ म्हणून कुणी उत्तरंच देत नाही त्यामुळे प्रश्न हवेत विरतात. हाही विरला. तोल सावरत वर पोचले तितक्यात खाली काहीतरी गडबड उडाली. बापलेकात काहीतरी जोरदार चर्चा चालू होती. थोड्यावेळाने दोन्ही मुलं ’जॉगिंग’ ला बाहेर पडली. कपडे दोघांनी मोजके आणले होते पण धावायचे शूज हमवत आणायला दोघं विसरले नव्हते. माझं बरोबर उलट होतं. मुलांच्या नादिष्टपणाबद्दल मी ताशेरा झोडणार तेवढ्यात बेल वाजली आणि नंतर फक्त आय कॉल पोलिस, नो ओपन डोअर असं मोडकंतोडकं इंग्रजी कानावर यायला लागलं. क्रियापदं गाळली की भाषा समजायला सोपी असं आपल्याला वाटत असतं त्यामुळे नवरा इंग्रजीची मोडतोड करण्यात मग्न होता आणि बाहेरचा माणूस स्वत:ची भाषा सोडायला तयार नव्हता. मला खाली जावंसं वाटत होतं पण तो अरुंद जिना! उतरायला जायचं आणि बाहेरचा, दार फोडून आत येऊन मला खिंडीत गाठायचा त्यापेक्षा मी वरुनच आरडाओरडा करणं ’सेफ’ होतं. एकदम सगळे चित्रपटच डोळ्यासमोर यायला लागले आणि विविध मथळे. जपानमध्ये दोन अमेरिकन नागरिकांचा मृत्यू, दोन बेपत्ता, दोन ओलिस... काय न काय. आमचा काटा काढला की मुलं...?

"मी ९११ ला फोन करते." दाराबाहेरून जापनीज आणि दाराआडून इंग्रजी रंगलं होतं त्यात माझा मराठी सूर मिसळला. तेवढ्यात लक्षात आलं आपण जपानमध्ये आहोत. भारत जपानच्या जवळ . शाळेत असताना पाहिलेली वन शून्य शून्य मालिका आणि शिवाजी साटमच आठवायला लागले. भारत की अमेरिका? कोण येईल ताबडतोब? तोपर्यंत काय करायचं? लहानपणी माळ्यावर आडवं झोपून जिन्याच्या दांड्यांतून खाली पाहत बसायचो तसंच इथे अंग टाकलं आणि ’ऑखो देखा हाल’ पाहायला सुरुवात केली.
निघाला नवरा दरवाज्याच्या दिशेने, आता दार उघडणार, तो आत येणार...
"अरे दाराजवळ जाऊ नकोस त्याच्याकडे बंदूक असली तर?"
"ही काय अमेरिका आहे?" तेवढ्यातही नवर्‍याला बंदुकांचा वापर जास्त कुठे होतो ते लक्षात होतं.
"आहे कोण?"
"सिक्युरिटी गार्ड आहे म्हणतोय." जपानला आम्ही इतके महत्त्वाचे वाटतोय? पालथं पडल्यापडल्या मी मान अभिमानाने ताठ केली.
"उघड ना दार." बॉडी गार्ड वगैरेसारखे चित्रपट डोळ्यासमोर तरळले. उत्तर नाही. कॅमेर्‍यासमोर नवर्‍याला तो माणूस दिसत होता. बाहेरुन तो स्वत:चा बिल्ला दाखवत होता आणि आतून नवरा गुगल ट्रान्सलेटरगत बोलत होता. गुगलने भाषांतर केलं की समोरच्या चेहर्‍यावरचे जे भाव असतात ना ते बघण्यासारखे असतात, अगदी युरेका युरेकासारखे भासतात पण इथे भरवश्याच्या म्हशीला टोणगा म्हणतात तसं मानवी गुगलचं चालू होतं. अखेर नवर्‍याने दार उघडायचा निर्णय घेतला. मी खोलीचं दार शोधायला धावले.
"वरती का धावतेयस तू?" नवर्‍याला वरच्या धावपळीचा हेतू समजत नव्हता.
"दार सापडत नाही." तो काहीच बोलला नाही. जपान्यांच्या अद्ययावत तंत्रज्ञानाची चुणूक देशात प्रवेश केल्यावरच दिसली होती त्यामुळे कुठलं बटण दाबलं की काय सुरू होईल, काय पडेल आणि काय वर जाईल ही धास्ती होती. ज्याअर्थी दार भिंतीत नाही त्याअर्थी ते कुठूनतरी येत असणार... माझा अगदी साधा बेत होता. ’बाहेरचा माणूस आत आला की नवरा त्याच्या तावडीत सापडणार किंवा तो नवर्‍याच्या.’ (हे विधान तुम्ही कुठल्याही अर्थी घेऊ शकता) आपण वर दार लावायचं, चादरीच्या आत शिरून मुलांना फोन करायचा, ९११, १०० ला फोन करून त्यांच्यामार्फत जपानी तातडीची मदत मागवायची. हाय रे दैवा... दारच सापडत नव्हतं त्यामुळे चित्रपटातून जे पाहिलं ते करता येत नव्हतं. अशावेळेस जे होतं तेच झालं. नवर्‍याने दार उघडलं. दमदार पावलांनी कुणीतरी आत शिरलं. आता फक्त निरव शांतता आणि त्या दमदार पावलांचा आवाज. मी श्वास रोखून पालथी पडून खालचं दृश्य पाहत राहिले. ती दमदार पावलं नजरेच्या टप्प्यातून पटकन नाहीशी झाली त्यामुळे ’चेहरा’ दिसलाच नाही. खाली जाण्याचं धाडस नव्हतं. नवर्‍याचं काय होणार ते कळत नव्हतं. काही क्षण सुनसान शांतता, नंतर कुजबूज... झटापटीचे आवाज ऐकू येत नाहीत म्हटल्यावर मी माझा ’आवाज’ काढला.
"आहे तरी कोण? असा कसा आलाय तो घरात?"
"तो खरंच सिक्युरिटी गार्ड आहे आणि त्याच्या ऑफिसामध्ये घंटा वाजली."
"घंटा वाजली? आपण आल्यावर? कशी? त्याला विचार इथे कसं काही वाजलं नाही आणि तू त्याच्यापासून लांब राहा. अचानक हल्लाबिल्ला करेल."
"मी काही विचारणार नाही. माझ्या लक्षात आलं आहे काय झालंय ते."
"काय झालंय?"
"तो जावू दे मग सांगतो तुझ्या मुलांचे प्रताप."
"तू वेळोवेळी मुलांना असं टोलवू नकोस हा. कधी ती तुझी असतात कधी माझी. हे बरं आहे तुझं; सोयीप्रमाणे चालू ठेवतोस. आपल्या मुलांचे प्रताप म्हण."
"तू इथेही भांडायला आली आहेस का? प्रश्न मुलं कुणाची हा नाही प्रश्न त्यांच्या प्रतापाचा आहे." आता तो माणूस कोण यापेक्षा मुलांचे प्रताप काय असतील हा प्रश्न मोठा होता. मुलांचे प्रताप त्यांना दाखवल्यावर शांत बसणार्‍यातली आमची मुलं नाहीत. ती काही झालं तरी तुमचंच कसं चुकलं होतं आणि तुमच्यामुळेच आम्ही हे प्रताप केले असं पुराव्यानिशी सिद्ध करतात आणि पुढचं सहकार्य नाकारतात. जपान दौरा आताच सुरू झाला होता तो बापलेकाची वादावादी सुरू झाली की या घरातच संपण्याची लक्षणं मला दिसायला लागली होती. सगळा दौरा मुलाने आखला होता आम्ही फक्त त्याच्या मागून मागून फिरणार होतो त्यामुळे त्याने संप पुकारला की झालं.

तो माणूस गेला आणि दार वाजलं. मुलं आली होती...

"अरे काय गोंधळ घालून गेलास तू." नवरा पुत्ररत्नावर डाफरला पण रत्न थेट शौचालयात घुसलं.
"हे जपानी ग्रेटच आहेत." तो आतून ओरडला. सोबतीला वुईऽऽ आऽ ऊऽ undefined...आवाज.
"चित्कारू नकोस आतून. घाणेरडा. शौचालयात काय केलं जपान्यांनी ग्रेट व्हायला?" इथेही तो दाराच्या आत आम्ही दाराच्या बाहेर. ’दार’ सगळीकडे आहेच.
"अगं सगळं धुतलं जातंय आपोआप."
"ईऽऽ त्यात काय. भारतात असंच असतं. इको फ्रेंडली."
"भारतात एक दांडी पिचकारी सोडते इथे पिचकार्‍या येतायत. आई, पाणी पण गरम. तू पण बघ." ग्रेट जपान्यांनी शौचालय हा अत्यानंदाचा विषय केलेला दिसत होता.
"तू बाहेर येऊन तुझा ’ग्रेटपणा’ ऐक." जपान्यांच्या प्रचंड प्रभावाखाली शौचालय, आय मीन पुत्ररत्न बाहेर आलं.
"तुझ्यामुळे आज ’सिक्युरिटी गार्ड’ आला." तुझ्यामुळे आपल्या घराण्याला काळं फासलं गेल्याचा नवऱ्याचा आविर्भाव.
"हा बल्ब कशाला काढलास?" नवरा पुन्हा टांगल्या गेलेल्या बल्बकडे तावातावाने हातवारे करत विचारत होता.
"तुला दाखवायला."
"बल्ब काय बघायचा? मी तुला सांगत होतो तो बल्ब नाही."
"तेच. तो बल्बच आहे हे दाखवायला काढला." पुत्ररत्नाला गोंधळ काय झाला तेच समजत नव्हतं.
"गाढवा, त्यातच काहीतरी होतं मग. तो गार्ड सतराशेसाठ वेळा बल्ब हातात घेऊन मांत्रिकासारखं पुटपुटत होता. गडबडीने वर लावला त्याने परत."
"तो बल्ब नाही? जपानी ग्रेटच आहेत." रत्न उत्सुकतेने परत बल्बकडे गेलं. जीवाच्या कराराने नवर्‍याने त्याला थांबवलं.
तो बल्बच आहे हे मान्य केलं असतं तर तो वरच राहिला असता आणि पुढचं रामायण टळलं असतं असं दोन रत्नांनी आम्हाला पटवून दिलं आणि ’आमचं चुकलं’ असं म्हणून आम्ही पुढच्या ’काबूकी’ ला (नाट्याला) जन्माला घालायला निघालो. बाहेर पडण्याआधी शौचालयात जाऊन कमोडवर न बसता मी उभ्या उभ्या सगळी बटणं दाबून काय काय होतं ते पाहिलं. एका बटणाने एक धातूची नळी बाहेर आली. दुसऱ्याने धबधब्यासारखं सार्‍या बाजूंनी पाणी, तिसर्‍याने सीट गरम... स्वत:साठी यातलं काही वापरण्याचं धाडस नव्हतं कारण एकदा विमानात एक बाई बसली आणि तिने बटण दाबल्यावर तिचा पार्श्वभाग आत खेचला जाऊन ती अडकली (या घटनेत ’तो’ ही असू शकतो याची नोंद घ्या) हे ऐकलेलं मनावर इतकं ठसलं होतं की कशाला कुठे भलत्या ठिकाणी अडका. नवर्‍या मुलांबरोबर सतत अडकल्यागत होत असतं तेवढं पुरे असा सुज्ञ विचार मी केला.

जपानी ग्रेटच आहेत असं म्हणत मी ही शौचालयाबाहेर आले आणि आम्ही पॅलेसच्या दिशेने वळलो. पॅलेसशी पोचलो म्हणजे मला आणि नवर्‍याला वाटलं होतं की आपण महालापाशी आलोय. मुलाला तेवढ्यात ऑस्ट्रेलियातून जपान पाहायला आलेल्या त्याच्या मैत्रिणीच्या मैत्रिणी भेटायला आल्या. ’आई वडिलांपासून सुटका हवी असेल तर कॉफी प्यायला ये’ असा त्याला त्यांनी मेसेज केला होता. तो आम्हाला विनोद म्हणून दाखवून तो कॉफी प्यायला गेला. मुलगी गुगल पादाक्रांत करत होती. तिच्यामागे आम्ही. नवर्‍याने ’ नक्की कुठे आलोय ते कुणालातरी विचारू का?’ असा क्षीण स्वरात प्रश्न विचारला पण गुगल सोडून कुणाला विचारणं सभ्य माणसाचं लक्षण नसतं. मुलीने जोरात नकारार्थी मान हलवली.
आम्ही महालाच्या प्रवेशद्वाराशी पोचलो. महाल बघायची लांबलचक रांग बघून राजाचाच महाल तो, नक्कीच प्रेक्षणीय असणार याची खात्री पटली. चालायला लागलो.
"हे काय? बाहेरुन भिंती बघायला इतकं चालायचं? महाल कुठे आहे?" लोकं आपले चित्कार काढून फोटो काढत होते. कशाचे काढत होते काय माहीत. मी सुद्धा दोनचारवेळा फोनच्या कॅमेर्‍याचं बटण दाबलं. बटणं दाबण्याची सवयच झाली होती इकडे आल्यापासून.
"इथे राजा राहतो?" हळूहळू माझा संशय वाढत चालला होता कारण आजूबाजूला फक्त झाडं दिसत होती आणि माणसं. हीऽऽऽ गर्दी!
"मी म्हैसूरचे महाल बघितले आहेत. आपले राजे श्रीमंत होते. हे भिंतीच दाखवणार असतील तर मी नाही चालणार दोन दोन तास." मी संप पुकारला. जागोजागी त्यांचे कर्मचारी उभे होते त्यांना बाहेर पडायचं आहे म्हणून खाणाखुणा करून सांगायला लागले. मी थकले आहे हे दाखविण्यासाठी अभिनय कौशल्य पणाला लावून मान टाकली. कर्मचारी घाबरली. तिला वाटलं मी ’हे राम’ म्हणते की काय इथेच. तसं नाही हे हातवार्‍यांची झटापट झाल्यावर तिला कळलं.
जापनीज पंधरा वाक्य तिने म्हटल्यावर मराठीत ’बाहेर पडता येणार नाही’ हा अर्थ मला समजला.
"असं कसं बाहेर पडता येणार नाही. हे काय मला महालात नेऊन नजरकैदेत ठेवणार आहेत की काय?" मी नवर्‍याला चिडून विचारलं. त्याने खांदे उडवले. पुन्हा हसरा चेहरा करत मला बाहेर का पडायचं आहे त्याच्या खाणाखुणा मी सुरू केल्या. या वेळेला मी दाखविण्यासाठी उजव्या हाताने मी माझ्या छातीवर दोनदा थोपटलं, मग दमले आहे हे दाखवण्यासाठी गुडघ्यावर वाकत थोडंसं बसल्यासारखं केलं. माझी शारीरिक कसरत पाहून माझ्या मुलीने कधीच पळ काढला होता. नवरा मुकाट उभा होता. माझी कसरत समजून घ्यायला वॉकीटॉकी वरून बोलावून तिने कर्मचार्‍यांची पलटण हजर केली, जापनीजमध्ये माझ्या खाणाखुणांची चर्चा झाली. काहीतरी निष्कर्ष निघाला असावा. हातांचे पंजे उंचावत मला अख्ख्या पलटणीने थांबायला सांगितलं. इतके पंजे बघून तसंही घाबरून कुणीही थांबलंच असतं. पलटण ज्या दिशेने बघत होती त्या दिशेने पाहत आम्ही उभे होतो. त्यानंतर जे काही येताना दिसलं त्याने तोंडातून शब्द फुटेना. हसतमुख चेहर्‍याने जापनीज कर्मचारी एक व्हिल चेअर घेऊन माझ्या दिशेने येत होता. व्हीलचेअर नको मला फक्त बाहेरचा रस्ता दाखवा हे सांगणार कसं? तेच सांगताना ही व्हीलचेअर आली होती. यानंतर अॅऺब्युलंन्सच आणतील. तो नाद सोडून जपानी ग्रेटच आहेत आणि आपल्याला हे आधीच का सुचलं नाही असं म्हणत मी मला त्या व्हीलचेअरमध्ये कोंबलं. नवरोजी ती कशी चालवायची याचे धडे द्यायला सरसावले. पुढेमागे राजाच्या संग्रहात, ’मोहनाने वापरलेली व्हीलचेअर’ जमा होईल असा ऐवज असल्यागत मी तिची मजा लुटत महाल म्हणून जे काही बाहेरुन दिसत होतं ते पाहिलं. गर्दीत माझीच एक चारचाकी होती. लोक काही बघण्यासारखं नसतानाही थांबायचे मध्येच. खुर्चीतून उतरताना ’व्हीलचेअर’ महिम्यामुळे उगाचच उठता येत नाही, काहीतरी दुखतंय वगैरे भाव चेहर्‍यावर आपोआप यायला लागले होते. नवरा म्हणाला,
"तू धडधाकट आहेस. गैरसमजातून मिळाली आहे ही खुर्ची तुला."
"होतं असं कधीकधी. आता ती मी सोडणार नाही." महाराष्ट्रातलं राजकारण डोळ्यासमोर येऊन मी जाहीर केलं.

महालयात्रा संपली आणि आम्ही पाहिलेला तो ’महाल’, महाल नव्हताच हे समजलं. नुकताच तिथे राजाचा शपथविधी झाला होता ते ठिकाण होतं.
"तरी मी सांगत होते हे ’बार्न’ सारखं वाटतंय." अगदीच ’गोठा’ म्हणणं कठीण गेलं म्हणून मी ’बार्न’ उपाधी दिली. माझ्या तणतणीकडे दुर्लक्ष करत सगळ्यांनी आई व्हीलचेअरमध्ये कशी बसली यावरच दिलखुलास चर्चा केली आणि जपानी लोकांनी आता इंग्रजी शिकायचं मनावर घ्यायला हवं हे राजाला सांगायचा मी निर्धार केला.

आमच्या ’काबूकी’ त सिक्युरीटी गार्ड, व्हीलचेअरने आतापर्यंत भूमिका केल्या आता येणार होती थरारक चित्रपटात घडते तशी धावती ट्रेन थांबवण्याची एक घटना...


महालातून थेट फलाटावर. माझा रथ (व्हीलचेअर) तिथेच सोडावा लागला. आमची ट्रेन येईपर्यंत उभ्या असलेल्या ट्रेनकडे बघत होतो. जपान्यांनी शांतपणे आतल्यांना उतरू दिलं मग स्वत: एकामागोमाग एकच आत शिरले. कडक शिस्तीत. कुणी हे बाळकडू पाजलं? मास्तर की आई? दार बंद झालं, ट्रेन सुरू झाली आणि सुरू झाला थरार! काचेच्या खिडकीवर हाताचा पंजा आला, मागून तोंडावरचं फडकं (मास्क) नजरेत भरलं आणि शेवटी रडणार्‍या, ओरडणार्‍या मुलीचा चेहरा. काय चाललंय हे कळायच्या आत फलाटावर कुठुनशी एक मुलगी धावत आली आणि ’स्टॉप द ट्रेन’ असं जोरात किंचाळत, रडत ट्रेनच्या मागून पळायला लागली. कुणालाच काय गोंधळ आहे तो कळेना आणि ट्रेन कशी थांबवायची तेही. सगळे ’आ’ वासून उभे. धावणार्‍या मुलीने पळता पळता उडी मारून वाटेतल्या खांबावरचं बटण दाबलं. स्टेशनचा गजर वाजायला आणि लाल दिवे चमकायला लागले. ट्रेन हळूहळू थांबली. प्लॅटफॉर्म सोडून गेलेली ट्रेन मागे कशी आणणार हे कळेना. तणाव, उस्तुकता, धास्ती...! अमेरिकन मुलगी रडत रडत गार्डकडे गेली काहीतरी हातवारे झाले, ट्रेन पुढे गेली.
"पुढच्या स्टेशनवर उतरवतील. तिची बहीण असणार. चुकून चढली. व्हॉट धिस गर्ल डिड इज रॉग. " थरारनाट्यातल्या चुका मुलाला दिसत होत्या. सरकारी यंत्रणेचा अपव्यय, फोनचा उपयोग, जपानी शिस्तीला बाधा, उशीर झाला त्याबद्दल त्यांना माफी मागावी लागणार या काळजीने मुलगा त्रस्त आणि फलाटावर गाडी थांबवायचं बटण असतं या आनंदात मी मग्न. त्याची तणतण ऐकत अमेरिकन नागरिकांचा गोंधळ जपानी लोकांनी रांग न मोडताच ’आ’ वासून पाहिला होता त्यात मी पुन्हा सामील झाले.

आमची ट्रेन आली. बसल्याबसल्या टी. सी. दारात उभा राहिला. वाकला. बापरे, प्रवेश करताना विनम्र अभिवादन करायचं असतं की काय? तो वाकला म्हणून मीपण वाकायला उठले तर मुलीने हात धरून खाली ओढलं.
"तू काय वाकतेस?" ती बडबडणार तेवढ्यात चहावाली आली. वाकली. जपानी येताजाता नमस्काराला कंबरेत वाकतात हे ठाऊक होतं. मला काही प्रतिनमस्कार केल्याशिवाय चैन पडेना. मुलीने पकडायच्या आत मी उठून वाकले तशी चहावाली गडबडली. परत परत वाकायला लागली म्हणून मीही. नवरा पुटपुटला,
"आम्हाला चहा हवाय. बस आता." मी बसल्यावर चहावालीने दीर्घ श्वास घेतला आणि घाईघाईत तिची हातगाडी हाकत पळाली. नवरा तिच्यामागून चहा, चहा करत... जपानी नागरिकांचा अमेरिकन नागरिकांनी करमणूक करण्याचा विडाच उचलला होता. त्यांचा ’आ’ वासलेलाच!

जपानी लोक मदतीला अतिशय तत्पर. स्वर्गाचा रस्ता विचारला तर स्वर्ग दाखवायला ते जातीनिशी येतात. प्रश्न असतो कुठला रस्ता विचारतो आहोत ते त्यांना कळण्याचा. ते झालं की तुमचं काम फत्ते. नवर्‍याचा उत्साह दांडगा. त्याला जपान्यांच्या ’स्टाईल’ मध्ये बोलायला आवडायला लागलं होतं. मॅक्क - दोनाल्द, कित्ती - कॅत्त समजायला लागलं होतं. त्यांच्या पद्धतीचं नवर्‍याचं इंग्रजी सुरू झालं की मुलं माझ्याकडे कटाक्ष टाकायची. बाबाच्या गुगल क्षमतेवरच्या अविश्वासाला मुलाने "पॉवर स्ट्रगल" नाव दिलं. म्हणाला,
" मी गुगल केलंय. मुलांच्या हातात सत्ता जायला लागली की होतं असं." महालाच्या नुसत्या भिंती पाहून हा परिणाम. पूर्ण महाल पाहिला असता तर? अचानक मुलगा आग्रह करकरून नवर्‍याला ’विचारायला’ पाठवायला लागला. मी कटाक्ष टाकला तेव्हा म्हणाला,
"त्याला ’बिझी’ ठेवतोय." जपानी लोकांना नवर्‍याच्या तावडीत सोडून मुलं मोकाट.

सगळे देश मला रत्नागिरी आणि राजापूरसारखे वाटतात त्यातून जपान कसं सुटणार? हवाईला मला जिथेतिथे राजापूर दिसलं होतं. परुला कोकणातले गडगे आणि देवरुखची साडवली. नवर्‍याला ज्यात त्यात दिल्ली. आताही
"रत्नागिरीला आल्यासारखं वाटतंय." बांबू जंगलात आल्यावर मी म्हटलं.
"दिल्ली अगदी असंच."
"दिल्लीला बांबू?" विचारेपर्यंत मुलगा वैतागला,
"कोणत्याही देशात एकाच ठिकाणी तुम्हाला रत्नागिरी आणि दिल्ली कशी दिसते?" यावेळी मुलगा इतकं पुटपुटून थांबला नाही. जितक्यावेळा आम्ही मध्ये ’भारत’ आणू तितक्यावेळा तो आमच्याकडून एक डॉलर घ्यायला लागला. तसं त्याने ट्विटही केलं. आमच्याकडून मिळालेल्या पैशात ’सोलो’ जपान ट्रीप पुन्हा होईल म्हणाला.

तर असं हे आम्ही अनुभवलेलं जपान. बांबूच्या जंगलात पोचण्यासाठी प्रवाशांच्या अलोट गर्दीतून मार्ग काढावा लागला, एकदा मुलाला चकवून बसने जाण्याऐवजी टॅक्सी केली तर टॅक्सीवाल्यानेच ’बस’ ने जाणं कसं स्वस्त हे पटवून दिलं. तासभर उभं राहून बसचा प्रवास केला तेव्हा भारतातल्या एस. टी. त उभं असल्यासारखंच वाटलं. देवळात आम्ही लग्नांवर लग्न पाहिली. सुरुवातीला करवल्या आल्या म्हणून घाईघाईत फोटो काढले तर तितक्याच घाईत भटजीबुवा परत जाऊन दुसर्‍या जोडीला घेऊन येत राहिले. लग्न चालूच! नवर्‍याने जपानी पोषाख केलेल्या सुंदर्‍यांबरोबर कधी नव्हे ते उत्साहाने माझे फोटो काढले. मुलगा इथे चोर्‍या होत नाहीत म्हणाल्यावर स्टेशनवर ’आपण ह्यांना पाहिलंत’ का चे फोटो काढून आम्ही त्याला दाखवले. माऊंट फूजीचं दर्शन बुलेट ट्रेनमधूनच घेतलं पण तेही अप्रतिम वाटलं. अणूसंहारातही तग धरलेलं झाड पाहून गलबलून आलं, अजूनही जपून ठेवलेली भग्न इमारत पाहून अस्वस्थ व्हायला झालं.

दरवर्षी या आठ दिवसांची आम्ही सगळेच आतुरतेने वाट पाहत असतो. एकत्र फिरतो, भांडतो, रुसतो, एकमेकांची काळजी घेतो, मुलांच्या लहानपणच्या आठवणींना उजाळा देतो, मिठ्या मारतो आणि आठ दिवसांनी नित्यनेमाला सुरुवात होते ती पुढच्यावर्षी कुठला देश याचे मनसुबे रचत.

(मी विनोदी चष्म्यातून ’जपान’ तुमच्यासमोर मांडलं पण जपानी माणूस मला प्रचंड आवडला. भाषेची अडचण असूनही त्यांची मदत करण्याची तत्परता आपल्याला अवघडूनच टाकते इतक्या आपुलकीने ते मदत करतात. फसवणूक कुठेही होत नाही. एका टॅक्सीवाल्याने तर आम्हाला जास्त चालायला लागू नये म्हणून गल्लीबोळातून गाडी नेऊन ठिकाणाच्या अगदी जवळ नेऊन सोडलं.)


Monday, October 28, 2019

आंतरजालीय दिवाळी अंक - माझी कथा - संकोच

मराठी माणसाचा नादिष्टपणा काय करायला लावेल ते सांगता येत नाही. मामबोकरांच्या (माझा मराठीचा बोल)डोक्यात अंकाचं ’खूळ’ तीन वर्षापूर्वी आलं. पहिले दोन अंक ’आपले आपण’ सदरात मोडणारे होते. यावर्षी  ’आंतरजालीय अंक’ काढायचं ठरलं. 
अंक वाचनीय आहे. भारत आणि अमेरिकेतल्या लिहित्या हातांचं दर्जेदार साहित्य या अंकात आहे. तुम्हाला तिथली अक्षरं वेगळ्या दुनियेत घेऊन जातील याची खात्री वाटते. वाचा आणि प्रतिक्रिया नोंदवून आमचा उत्साह वाढवा. - https://www.mambodiwali.com

या अंकासाठी मदत करत असताना नकळत आठवण झाली ’अस्मिता’ त्रैमासिकाची. केरीमध्ये राहत असताना ’अस्मिता’ नावाचं त्रैमासिक आम्ही काढायचो. या उत्साहाच्या परिणीती म्हणजे, आज तिथल्या नगरवाचनायात शेकड्यांनी मराठी पुस्तक उपलब्ध आहेत. 
या अंकातील माझ्या कथेत लहान मुलीचं विश्व आहे. तिच्या नजरेतून तिला दिसणारे तिचे सावत्र वडील आहेत. दोघांच्या नात्यातला भावनिक गुंता हलक्याफुलक्या स्वरुपात सोडवला आहे. हा प्रवास सुखद वळणापाशी कसा पोचतो त्याची ही कथा... वाचताय ना? वाचून तिथे प्रतिसाद नोंदवायला विसरु नका: