’अनुराधा’ दिवाळी अंकातील कथा संपादकांच्या परवानगीने इथे प्रसिद्ध करीत आहे. श्री. व सौ, कथाश्री, साहित्य सहयोग, प्रसाद, सामना या भारतातील तसंच अमेरिकेतील ज्योती, अभिरुची, बुकगंगा श्रवण दिवाळी अंक यात माझ्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. नक्की वाचा ही विनंती.
व्यंकट आणि लता दिङ्मूढ अवस्थेत बसून राहिले. वकिलांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा की नाही तेच त्यांना ठरवता येईना. दहा लाख डॉलर्स! मिळालेल्या पैशांचा आनंद मानायचा की भळभळणारी जखम पैशाच्या उबेखाली झाकून टाकायची? वकील निघून गेले तरी कितीतरी वेळ काही सुचत नव्हतं दोघांना.
"मिलियन डॉलर्स." व्यंकट खाली मान घालून पुटपुटला.
"काय करायचे रे हे पैसे घेऊन? काय करायचे ह्या पैशांचं? काही अर्थ आहे का यात? कशाला खटला भरला आपण? साध्य काय झालं? खरंच कुणी शिकलं धडा की आपल्या जखमेवर केलेली मलमपट्टी आणि त्यांच्या सुटकेचा मार्ग हा? अपार्टमेंटचं व्यवस्थापन ढिसाळ आहे, सिक्युरिटी कंपनीला धडा शिकवायला हवा असं वकिलांनी सांगितलं आणि आपणही लगेच तयार झालो. असं कुणी काही शिकत नाही. पुढचं सगळं टाळायचं म्हणून वकिलांची मध्यस्थी आणि हा पैसा. मला नकोय हा पैसा. मला नकोय. खरंच नको." लता धाय मोकलून रडायला लागली. व्यंकटने तिला घट्ट धरलं. एकमेकांच्या मिठीत दोघंही कितीतरी वेळ हमसाहमशी रडत राहिले. ते तीन दिवस आणि त्यानंतर वेगवेगळ्या अर्थी बदललेली सार्यांचीच आयुष्य. आजच्या ह्या बातमीने निकराने गाडून टाकलेल्या त्या तीन दिवसांच्या अक्राळविक्राळ आकृत्या त्यांच्यासमोर नाचायला लागल्या.
स्निग्धाच्या ओढीने लता घाईघाईने दार वाजवायला गेली आणि दार एकदम उघडलंच. मागोमाग आलेल्या व्यंकटकडे लताने आश्चर्याने पाहिलं.
"तू आईंना बजावून सांगितलं होतंस ना कुणीही आलं तरी दार उघडायचं नाही म्हणून?" लताच्या प्रश्नावर काही उत्तर न देता व्यंकटने दार लोटलं. शांतता. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घडत होतं. एरवी दार उघडायला हसतमुखाने आई समोर यायची. आईच्या कडेवरुन स्निग्धा त्या दोघांकडे झेप घ्यायची. आई गेली कुठे? व्यंकट आईला हाका मारतच आतल्या खोलीत जाण्यासाठी वळला आणि लताच्या किंचाळीने तसाच मागे फिरला. स्वयंपाकघरात थरथर कापत उभ्या असलेल्या लताला सावरत त्याने आत नजर टाकली आणि व्यंकटही थिजल्यासारखा उभा राहिला.
"९११" फिरव. ताबडतोब लता. आईचा श्वास चालू आहे अजून. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला तो जिवाच्या आकांताने हलवित राहिला. तिने डोळे उघडावे, त्याच्याकडे पाहावे यासाठी आटोकाट प्रयत्न करत राहिला. स्निग्धा घरात नाही हे देखील तो विसरला. आई, त्याची आई जिवंत आहे एवढी खात्री हवी होती त्याला. लताचे पाय जड झाल्यासारखे झाले. शरीराला, मनाला ढकलत तिने कसेबसे आकडे फिरवले. पलिकडच्या माणसाला काय झालंय ते कसंबसं सांगत स्निग्धाला हाका मारत या खोलीतून त्या खोलीत ती फिरत राहिली. शोधत राहिली. पलंगाखाली, दारामागे, कपाटांच्या आत जिथे जिथे स्निग्धा जाऊ शकते त्या त्या जागा ती पुन्हा पुन्हा पाहत होती. स्निग्धाला जोरजोरात हाका मारत होती. काही क्षणात इमारती बाहेर गाड्यांचे आवाज, भोंगे वाजायला लागले. रुग्णवाहिका आली. वैद्यकीय मदत तातडीने उपलब्ध झाली. व्यंकटच्या आईसमोर कोंडाळं झालं. जे काही तातडीचे उपचार करता येतील ते केले गेले पण रुग्णालयात हलवण्याअगोदरच व्यंकटच्या आईने अखेरचा श्वास घेतला. मृत्यू नैसर्गिक नव्हता त्यामुळे शवचिकित्सा होणार. व्यंकटच्या आईला त्याच रुग्णवाहिकेतून शवचिकित्सेसाठी नेलं लता, व्यंकटला आईच्या मृत्यूचा शोक करायलाही सवड नव्हती. दहा महिन्याची स्निग्धा घरातून नाहीशी झाली होती, व्यंकट, लता पोलिसांच्या प्रश्नांना सामोरं जात होते. त्यांच्याबद्दल माहिती विचारता विचारता त्या दोघांचा यात काही हात नाही ना याची चाचपणी झाल्यावर स्निग्धाच्या नाहीसं होण्याबद्दल, त्यांना कुणाचा संशय आहे याबाबत प्रश्न सुरु झाले. एकमेकांच्या आधाराने जमेल तशी उत्तरं देत होते दोघं. जे झालं ते इतकं अनपेक्षित होतं की दोघांनाही पटकन कोणतीही गोष्ट धड सांगता येत नव्हती. मनातले विचार बाजूला ठेवून तर्कसंगत उत्तरं देणं कठीण पडत होतं. दारात उभ्या राहिलेल्या रघू आणि कोमल ला पाहिलं आणि आपलं असं कुणीतरी सोबत आहे या विश्वासाने दोघांच्याही चेहर्यावर स्मितरेषा उमटली. पोलिसांच्या परवानगीने दोघं आत येऊन बसले. त्या दोघांनीही जी काही माहिती होती ती द्यायचा प्रयत्न केला. स्निग्धाचा शोध तातडीने घेतला जाईल याचं आश्वासन देत पोलिस निघून गेले. आणि अर्धवट राहिलेलं काम पुन्हा करायला उठल्यासारखं लता उठली. पुन्हा पुन्हा त्याच सगळ्या जागा ती शोधत राहिली. स्निग्धाला हाका मारत राहिली. व्यंकटला तिची अवस्था पाहवत नव्हती. हताश होऊन ती सोफ्यावर पायाची जुडी करुन बसली. आणि जोरजोरात रडायला लागली. व्यंकट तिला सावरायला पुढे झाला पण ओंजळीत तोंड लपवून लता रडत राहिली.
"व्यंकट तुझी आई गेली रे. कुणीतरी मारलं त्यांना. आपल्या मुलीला सांभाळण्यासाठी आल्या होत्या त्या. आता कसं तोंड दाखवायचं आपण तुझ्या बाबांना? तुझी आई गेली व्यंकट, तुझी आई गेली..." लताच्या बाजूला बसून व्यंकटने तिच्या खांद्याभोवती हात टाकले. लताने आपलं डोकं त्याच्या छातीवर टेकलं. दोघं रडत राहिले.
"लता आईला परत नाही आणत येणार. पण स्निग्धाला शोधायला हवं. ताबडतोब. तिला काही झालं तर मी नाही जिवंत राहू शकणार. लता आपण शोधू आपल्या पिल्लाला. चल ऊठ लता. रडत नको बसू. नाहीतर मीच पडतो बाहेर. काहीतरी करायला हवं लता. काहीतरी करायला हवं." लताचा हात धरुन त्याने तिला उठवलं. ती न बोलता त्याच्या मागून चालायला लागली. रघू आणि कोमलने त्यांना थांबवलं. आता इतक्या रात्री कुठे शोधणार होते ते स्निग्धाला. पण काहीतरी करायला हवं होतं. दहा महिन्यांची मुलगी आपली आपण बाहेर पडणं शक्य नाही. कुणी नेलं असेल तिला? का? रात्री कुठे शोधायचं? व्यंकटच्या आईचा देह कधी मिळेल ताब्यात? देहाचं पुढे काय? प्रश्न असंख्य होते आणि कुणालाच उत्तरं सापडत नव्हती. कशाचंच त्राण लता, व्यंकटमध्ये उरलं नव्हतं. रघूने पुढाकार घेतला. व्यंकटच्या ओळखीच्यांना तो कळवणार होता. भारतातल्या नातेवाईकांशी कोमल संपर्क साधणार होती. व्यंकटच्या आईचे अंत्यसंस्कार इथे की भारतात करायचे ते ठरवायचं होतं. अमेरिकेतच करायचे तर नक्की काय करायचं हे देखील शोधावं लागणार होतं. व्यंकटच्या ओळखीपैकी, नाहीतर आपल्या समाजाचं मंडळ करेल मदत असा विचार करत रघू आणि कोमल उठले. बाजूचंच घर होतं त्यांचं. ते दोघं काय करणार आहेत ते रघूने नीट समजावून सांगितलं. दोघांनी ऐकलं, त्यांच्या लक्षात आलंय याची खात्री करुन ते निघून गेले तसं व्यंकट आणि लता डोळ्यावर हात घेऊन आडवे पडून राहिले. कधीतरी थकव्याने दोघांचे डोळे मिटलेही. सकाळी जाग आली ती दारावर बसणार्या धक्क्यांनी.
रघू आणि कोमल चहा घेऊन आले होते. स्निग्धा नसताना आपल्याला झोप लागली तरी कशी या विचाराने व्यंकट, लताला अवघडल्यासारखं झालं पण रघू, कोमलचं लक्ष नव्हत. कोमलने चहा पुढे केला. दोघं पटकन तोंडावर पाणी मारुन आले. चहा पिऊन होईपर्यंत रघू अस्वस्थपणे हातातल्या कागदांशी चाळा करत राहिला.
"कसले कागद रे?" व्यंकटने चहा पिता पिता विचारलं.
" बाहेर होते दाराच्या."
"पाहू?" व्यंकटने हात पुढे केला पण रघूने ते कागद दिले नाहीत.
"चहा होऊ दे." व्यंकटने काही न बोलता मुकाट्याने चहा संपवला आणि रघूने कागद पुढे केले. व्यंकटच्या चेहर्यावरचा रंगच उडाला. लता काळजीने पुढे झाली.
"काय आहे?"
"स्निग्धाला कुणीतरी ओलीस ठेवलंय. ५०,००० डॉलर्स मागतोय. चिठ्ठी तुझा नावाने आहे." लताने कागद हिसकावलाच.
"काय म्हणतोय हा माणूस? संध्याकाळी मला एकटीला पैसे घेऊन बोलावतोय. पोलिसांना कळवलं तर स्निग्धा हाती लागणार नाही असं लिहिलंय यात." लता रडायलाच लागली.
"तू रडू नकोस गं." व्यंकट चिडून म्हणाला. त्याच्या मनावरचा ताण प्रचंड वाढला होता. लताने मान खाली घातली. दोघं अस्वस्थ, सैरभैर झाले. काय करायचं तेच कळेना. शेवटी रघूने म्हटलं.
"मी पोलिसांना फोन करतो." कोमलने दचकून पाहिलं.
"पोलिसांना कळवू नका म्हटलंय त्यात."
"असं करुन कसं चालेल?" रघू कोमलवर वैतागला.
"पोलिसांना कळवायचं नाही म्हटलं तरी ५०,००० डॉलर्स आणायचे कुठून? आणि मी लताला एकटं पाठवणार नाही. कुठे यायचं पैसे घेऊन तेही लिहिलेलं नाही." व्यंकटला परिस्थिती कशी हाताळायची तेच कळेनासं झालं होतं. रघू आणि व्यंकट पर्याय पडताळत राहिले.
"आपल्या मागे का हे सगळं? आपलं कुणाशी वैर नाही. श्रीमंत आहोत म्हणायचं तर तेही नाही. भाड्याच्या घरात राहतोय. सगळं विकलं तरी ५०,००० हजार डॉलर्स कसे उभे करणार? कोण असेल ह्या मागे? आणि आईंना का मारलं त्यांनी? " लताला तिच्या मनातल्या शंकाची उत्तर हवी होती. व्यंकटला तिच्या कोणत्याच प्रश्नांना उत्तर द्यायची इच्छा होत नव्हती.
"कुणीतरी भुरटा चोर असणार. आईंनी विरोध केला म्हणून भडकला असेल." रघूने अंदाज बांधला.
"भुरटा चोर खून करेल?" व्यंकटची विचारशक्ती गोठली होती. काहीतरी विचारायचं म्हणून त्याने विचारलं.
"त्याने स्वयंपाकघरातली सुरी वापरली याचा अर्थ त्याच्याकडे सुरी नव्हती."
"स्निग्धा?" लताच्या मनातला प्रश्न कोमलने विचारला.
"आईंना मारल्यावर स्निग्धा दिसली असणार."
"हं." लता विचार करत राहिली. एव्हाना बातमी सर्वत्र पसरली होती. ओळखीच्या लोकांची रीघ लागली. माध्यमांचे प्रतिनिधी संपर्क साधायचा प्रयत्न करत होते. भारतातले नातेवाईक काळजीत होते. व्यंकटच्या आईचा देह शवचिकित्सेनंतर कधी ताब्यात मिळणार ते कळत नव्हतं. ५०,००० डॉलर्स आजच्या आज उभे करायचे. कुणाकडे हे बोलायचं की नाही हेच दोघांना ठरवता येईना. दोघांना खाजगी बोलण्यासाठी जागाच नव्हती इतकी त्या छोट्याशा घरात गर्दी होती. वेळ टळायच्या आधी काहीतरी ठरवायला हवं होतं. अखेर व्यंकटने निर्णय घेतला. त्याने पोलिसांना सारं सांगून टाकायचा निर्णय घेतला.
पोलिस हातातलं पत्र पुन्हा पुन्हा पाहत होते. ५०,००० डॉलर्स घेऊन लताने कुठे यायचं ते लिहिलेलं नव्हतं त्यामुळे पैसे घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता. हाती लिहिलेलं पत्र असतं तर हस्ताक्षराचा शोध सुरु करता आला असता पण तेही शक्य नव्हतं. पोलिसांनी लता आणि व्यंकटला शांत राहण्याचा दिलेला सल्ला त्या दोघांना पटत नव्हता. त्या माणसाने पुन्हा संपर्क केला तरच काही प्रकाश पडण्याची शक्यता वाटत होती. तो दिवस वाट पाहण्यात गेला. लता आणि व्यंकटचा जीव घुसमटत होता. असहाय्यताने घेरलं होतं. पैशाची मागणी करुनही स्निग्धाला ओलीस ठेवणारा माणून संपर्क का साधत नाही ते कळत नव्हतं. पत्रामुळे तपासणीच्या चक्राची दिशाही बदलली. दोघांच्या परिचयातल्या व्यक्तींवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केलं. मुख्य कारण होतं त्या पत्रात असलेला लताचा उल्लेख. लतिकाला ’लता’ म्हणून ओळखणारी मोजकीच मंडळी होती. पोलिस निघून गेले.
"आपण इथून बाहेर पडू या थोडावेळ? माझा जीव घुसमटतोय व्यंकट."
"चल." व्यंकटने मुकाट्याने पायात चप्पल सरकवल्या. जिने उतरुन दोघं खाली आले. वाट फुटेल त्या दिशेने चालत राहिले. इमारतीच्या बाहेर पडले. डोळ्यातलं पाणी पुसत लता म्हणाली,
"तुझी आई गेली याचं दु:ख करायलाही सवड नाही रे आपल्याला. काय झालं असेल आपल्या पिलाचं? आपण पैसे दिले नाहीत म्हणून मारुन टाकलं नसेल ना त्या दुष्टाने?" व्यंकटने लताचा हात घट्ट पकडला.
"असं बोलू नकोस ना लता."
"किती वेळा पाहिलंय आपण बातम्यांमध्ये. मुलांना मारतातच रे. नाही कुणी जिवंत ठेवत."
"काय बोलतेस हे लता." व्यंकटने लताला जवळ घेतलं. त्याच्या शर्ट तिच्या अश्रूंनी चिंब भिजला. तिची समजूत घालता घालता तोही रडत राहिला. आजूबाजूला काळोखाचं साम्राज्य पसरलं होतं. आसपास चिटपाखरुही नव्हतं. त्या काळोखात व्यंकटने टाहो फोडला.
"माझी आई गमावली मी लता. आई गेली माझी. पुन्हा कधी दिसणार नाही ती. अमेरिकेत आणलं मी तिला म्हणून किती खूश होती आणि काय झालं हे. कुणी केलं." लताचा जीव गलबलला. ती थरथर कापायला लागली.
"व्यंकट माझा जीव घुसमटायला लागलाय. मला नाही जगता येणार स्निग्धाला काही झालं तर. वाचवा रे तिला, कुणीतरी वाचवा." लताने तिथेच फतकल मारली. व्यंकटला आता स्वत:चाच राग यायला लागला होता. कुठे शोधायचं स्निग्धाला? पोलिसांना फोन केला नसता तर त्या माणसाचा फोन आला असता? फोन केलेला कळलं असेल त्याला? त्याने खरंच स्निग्धाला मारलं असेल? रडत बसलेल्या लताला व्यंकटने हात धरुन उठवलं,
"लता, मला माफ कर गं. मी फोन करायला नको होता पोलिसांना. तूच सांग मी काय करु. तूच सांग." व्यंकटनेच धीर सोडलेला बघितल्यावर लताने स्वत:ला सावरायचा प्रयत्न केला. ती स्निग्धा मिळेल असं त्याला पुन्हा पुन्हा सांगत राहिली. त्याच्या आणि स्वत:च्या मनाची समजूत घालत राहिली. दोघंही पुन्हा घराच्या दिशेने चालायला लागले.
रघूच्या घराबाहेर गर्दी पाहून व्यंकटला आश्चर्यच वाटलं. गर्दीला बाजूला करत तो आत गेला. मागोमाग लता. पोलिस कोमल आणि रघूला प्रश्न विचारत होते.
व्यंकटच्या लक्षात आलं. पोलिसांनी आता त्यांच्या मित्रमैत्रिणींवर लक्ष केंद्रित केलं होतं. पोलिस कुणालाही सोडणार नाहीत. आधी आमच्यावर, आता मित्र मंडळीवर संशय मनातल्या मनात पुटपुटत तो पोलिस काय प्रश्न विचारतात ते ऐकत राहिला.
लता आणि व्यंकटशी त्यांची ओळख कशी झाली, किती दिवस ओळखतात असे प्रश्न चालू होते. व्यंकटच आता पोलिसांच्या त्याच त्याच प्रश्नांना कंटाळला होता. लता व्यंकटचा हात हातात धरुन रघूवरच्या प्रश्नांची सरबत्ती ऐकत होती. लताने त्याचा हात दाबला आणि तो दचकला. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिने कोमल काय म्हणतेय ते ऐकण्याची खूण केली.
"हो. त्या दिवशी व्यंकट आला नव्हता घरी दुपारी जेवायला."
"नेहमी येतात?"
"हो." कोमलच्या उत्तरावर रघूने तिला थांबवलं.
"काम जास्त असेल तर नाही येता येत."
"पण जेवायला येतोसच तू घरी."
"नाही. कधीकधी नाही जमत."
"रघू?" कोमलने रघूकडे आश्चर्याने पाहिलं. रघू उठलाच तिथून.
"मी आलोच." तो घाईघाईने दरवाज्याच्या दिशेने निघाला.
"असं नाही जाता येणार तुम्हाला. चौकशी संपलेली नाही."
"मला वेगळं काही सांगायचं नाही. कोमलने सांगितलं त्यापेक्षा वेगळं सांगण्यासारखं माझ्याकडे काही नाही."
"असं असेल तर तुम्हाला ठाण्यात यावं लागेल." तिथे असलेल्या पोलिसापैंकी वरिष्ठ म्हणाले आणि रघूचा तोल सुटला.
"हो. हो. मी मारलं व्यंकटच्या आईला. झालं समाधान? मी मारलं त्या दोघींना. पकडा मला. पकडा." वेड्यासारखा त्या लहानश्या खोलीत तिथल्या तिथे फिरत ओरडत राहिला.
"मी मारलं रे, मी मारलं तुझ्या आईला. स्निग्धाला सुद्धा. मला नव्हतं मारायचं दोघींना." रघू व्यंकट समोर उभा राहिला. व्यंकट दगडासारखा उभा होता. आपल्याला काय वाटतंय हेच त्याला कळेना. सार्या जाणिवा गोठून गेल्या होत्या. लताच्या डोळ्यापुढे काळोखी आली. कोमल धाय मोकलून रडायला लागली. पोलिसांनी व्यंकटसमोर माफी मागणार्या रघूला बाजूला घेतलं. त्याच्या हातात बेड्या ठोकल्या. आणि व्यंकट धावला. त्याने थाडथाड रघूच्या थोबाडीत मारल्या. आयुष्यात कधीही न दिलेल्या शिव्या त्याने रघूला घातल्या. शिव्या घालता घालता तो रघूला मारत राहिला. पोलिसांनाही बोटाच्या इशार्यावर थांबवलं त्याने आणि रघूला मारता मारता तो एकदम पाया पडला.
"रघू, तू खोटं बोलतोयस मित्रा. हो ना? स्निग्धा कुठे आहे ते दाखव रे मला. कृपा कर आणि मला स्निग्धा आणून दे परत. तू खरंच मारलंयस का रे स्निग्धाला? का रे तू असं केलंस. का? का? माझ्या आईला मारलंस, मुलीचा जीव घेतलास. आता मी कसा जगू? लताला काय सांगू. मित्र ना रे तू माझा...." व्यंकट बोलत राहिला. थिजलेल्या नजरेने रघू त्याच्याकडे पाहत राहिला. पोलिसांनी महत्प्रयासाने व्यंकटला बाजूला केलं. कोमल रघूच्या हातात बेड्या घालून नेणार्या पोलिसांच्या मागून धावली. व्यंकट आणि लता एकमेकांच्या आधाराने आपल्या घरात परत गेले.
"रघू? रघूने खरंच मारलं असेल?" लता उत्तर नसलेला प्रश्न व्यंकटला पुन्हा पुन्हा विचारत राहिली.
"मला माझी स्निग्धा आणून दे रे आताच्या आता." लता हट्टाला पेटली. पण तिची विनवणी व्यंकटपर्यंत पोचत नव्हती. व्यंकटच्या मनात विचारांचा, भावनांचा कल्लोळ माजला होता.
"स्निग्धा किती छान राहायची रे त्याच्याकडे. मित्र ना तो आपला. का केलं त्याने असं?" लताने व्यंकटकडे पाहत हताश स्वरात विचारलं.
"पण खरंच केलं असेल त्याने असं की काहीतरी गफलत होतेय?" मनात घोळत असलेला प्रश्न व्यंकटने जोरात विचारला आणि लता चमकली. हा विचार मनाला शिवलाच नव्हता. पण आता तिलाही वाटायला लागलं, स्निग्धाला नाही मारणार रघू. तो हे असं अघोरी कृत्य करणार नाही. दोघंही त्या दिशेने विचार करायला लागले.
"स्निग्धाला काही झालं नसेल. पोलिसांचा गोंधळ झाला असेल. शोधतील पोलिस तिला." दोघं एकमेकांना समजावत राहिले.
"स्निग्धाला कसं मारेल तो? मुलीसारखीच होती ती त्याला."
"रात्रंदिवस आपल्याबरोबर आहेत दोघं."
"रघूच तर सगळं करतोय."
"पण रघूने का घेतला आरोप स्वत:वर?" लताने विचारलं आणि दोघांनाही जाणवलं आपण स्वत:चं फसवं समाधान करतोय. स्निग्धाला त्याने मारलंय हे मन स्वीकारत नाही त्यामुळे तो निरपराधी आहे असं पटवतोय आपणच एकमेकांना. दोघांच्याही लक्षात आलं की रघूने त्या दोघांना एक क्षणही एकटं सोडलेलं नाही. पोलिसांच्या हालचाली, घडामोडी सारं काही इत्यंभूत माहिती आहे त्याला. दोघं मुक झाले. इतका मोठा विश्वासघात ज्याला मित्र म्हणवतो त्यानेच करावा हे पटवून घ्यायलाच जमत नव्हतं दोघांना. आतल्या आत दोघंही तुटून गेले. आणि व्यंकट ताडकन उठला. कोमलच्या दारावर रघूला तुडवून काढल्यासारख्या लाथा मारल्या त्याने. तांबारलेल्या डोळ्यांनी कोमलने दार उघडलं. व्यंकटच्या बाजूला येऊन उभ्या राहिलेल्या लतासमोर कोमल उभी राहिली.
"मला खरंच यातलं काही म्हणजे काही माहीत नाही. रघू जेवायला आला नाही हे खरं पण तो काम होतं म्हणून येऊ शकला नाही. मी बोलले होते त्याच्याशी. तो तिथेच होता. त्याचा नाही ह्यात हात. माझा तर कशाशी काहीही संबंध नाही." कोमलच्या रडण्या ओरडण्याने आजूबाजूची दारं उघडली गेली. व्यंकट आणि लता न बोलता पुन्हा घरात येऊन बसून राहिले. इतका मोठा घात रघूने का केला असेल? कसा ठेवायचा विश्वास कुणावर यापुढे? कोमल खरंच अंधारात असेल? स्निग्धा कुठे आहे? काय जाब देईल रघू पोलिसांना? कधी कळेल नक्की काय झालं आणि का? का? का केलं रघूने हे पाशवी कृत्य?
रघू पोलिसांसमोर बसला होता. त्याचा कबुलीजबाब समोरच्या यंत्रात बंदिस्त होणार होता. आता हा खेळ संपवायचा होता त्याला. काय ठरवलं आणि काय झालं, सगळं कबूल करुन त्याला स्वत:च्या डोक्यावरुन गेले ३ दिवस आलेलं प्रचंड दडपण उतरवायचं होतं. त्याने बोलायला सुरुवात केली.
"दुपारी मी व्यंकटच्या घरी गेलो. स्निग्धाच्या आजीने दार उघडलं. हातातली सुरी रोखून मी त्यांना मागे व्हायला सांगितलं. घाबरुन त्या स्वयंपाकघरात गेल्या. स्निग्धा सोफ्यावर होती. मी तिला उचलल्यावर आजी मध्ये आल्या. आजींना माझा कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही असं जीव तोडून सांगत होतो मी. मला फक्त स्निग्धा हवी होती. पण त्या मध्ये आल्या. ती माझ्या डाव्या हातात होती. मी आजींना उजव्या हाताने मागे करायला गेलो. स्निग्धा हातातून पडली. तिला सावरायला मी डाव्या बाजूला वाकलो त्यामुळे हातातली सुरी सपकन आजींच्या गळ्यावरुन फिरली. त्या खाली पडल्या. मी स्निग्धाला सावरलं. आजींची अवस्था पाहून मी घाबरलो तेवढ्यात स्निग्धा रडायला लागली. खिशातला रुमाल मी तिच्या तोंडात कोंबला. मी स्निग्धाला घेऊन आतल्या खोलीत गेलो. तिथली हाताला आली ती बॅग घेतली आणि त्यात स्निग्धाला ठेवलं. बॅग पूर्ण बंद केली नाही मी. मला स्निग्धाला मारायचं नव्हतं. मी तिथून बाहेर पडलो. आणि आमच्या इमारतीच्या आवारातल्या व्यायामशाळेत गेलो. तिथे कुणी नव्हतं. कधीच कुणी नसतं. बाजूची खोली रिकामी असते तिथली. तिला तिथे खोलीत बाकड्याखाली ठेवलं. बाहेर पडलो आणि स्निग्धासाठी दूध घेतलं. पुन्हा तिला ठेवलं होतं तिथे गेलो. पण स्निग्धाचा श्वास थांबला होता. स्निग्धा तिथेच आहे. कुणीतरी आणा रे तिला. कुणीतरी आणा. बघा रे ती जिवंत आहे का. बघा ना लगेच." रघूने श्वासही न घेता काय घडलं ते सांगितलं. गेल्या तीन दिवसातलं मनावरचं प्रचंड ओझं उतरलं होतं. आता त्याला कशाचंच काही वाटत नव्हतं. मान खाली घालून तो बसून राहिला. त्याचा कबुलीजबाब ध्वनिमुद्रित झाला होता. तेवढ्यात रघूने विनंती केली.
"माझ्या मित्राला निरोप द्यायचा आहे." पोलिस काही न बोलता त्याचं बोलणं ध्वनिमुद्रित करत राहिले.
"माझ्या हातून चूक घडली. मला कुणालाच मारायचं नव्हतं. मला हवे होते फक्त ५०,००० डॉलर्स. मित्रा, मला माफ कर. मी कर्जबाजारी आहे रे. जुगाराच्या व्यसनाने मी कर्जबाजारी झालोय. ते कर्ज फेडायचा हाच मार्ग दिसला मला. अचानक दिसला. तुम्ही दोघं कमावता. मुलीसाठी सहज द्याल ५०,००० असं वाटलं रे. फार विचारच केला नाही मी. स्निग्धासाठी तुम्ही काहीही कराल हे ठाऊक होतं मला. मला कुणालाच मारायचं नव्हतं. खरं सांगतो कुणालाच मारायचं नव्हतं. मला माफ कर व्यंकट आणि लता. मला माफ करा..."
नशीब