Thursday, July 25, 2024

बेघरांना हटवा

 आजच्या महाराष्ट्र टाईम्समध्ये आलेला लेख    

   

अमेरिकेतल्या काही राज्यात प्रशासन जिथे - जिथे बेघर लोकांच्या वस्त्या आहेत तिथे - तिथे कायदेशीर कारवाईचा फलक लावते आहे. पोलिस प्रत्यक्ष जाऊन बेघर लोकांना आपला मुक्काम तीन दिवसांच्या आत हलवण्याची सूचना करत आहेत. कारण? कारण आहे उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय. २८ जूनला उच्च न्यायालयाने बेघरांना रस्त्यावर थारा नाही, तसे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाईचे आदेश जारी केले आहेत. कारवाई म्हणजे काय तर त्यांना न परवडणारा दंड ठोठावला जाणे किंवा त्यांची एक महिन्यासाठी तुरुंगात रवानगी. हे कारवाई करण्याआधी बेघर नागरिकांना सूचना मिळते पण त्यांनी निवाराछ्त्राचा आसरा घेणं अपेक्षित आहे. कितीतरी बेघर लोक निवारा केंद्रात राहायला जाण्याऐवजी रस्त्यावर राहणं पसंत करतात. निवार्‍याला न जाण्याची अनेक थक्क करणारी कारणं आहेत त्यातलं मुख्य कारण आहे, प्रतिक्षा यादी. त्यामुळे आला आदेश, गेलं निवाराछात्रात असं होत नाही. राहायला जागा नाही म्हणून रस्त्यावर तंबू ठोकणार्‍या लोकांकडून दंड भरण्याची अपेक्षा करणं उचित आहे का? दंडांचे पैसे भरायला मुळात त्यांच्याकडे पैसे कसे असणार? असे असंख्य प्रश्न या निर्णयाने उभे केले आहेत. उद्यानात आणि रस्त्याच्याकडेला टाकलेले तंबू शहराच्या सौदर्याला, आरोग्य आणि सुरक्षिततेला हानीकारक आहेत. करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या सोयिसुविधांचा लाभ नागरिकांना घेता येत नाही, उद्यानं बेघर लोकांच्या वस्त्या झाल्यामुळे लोक उद्यानात फिरकत नाहीत.  त्यांना त्यांच्या सुरक्षिततेची खात्री अशा भागांमध्ये वाटत नाही अशी दुसरी बाजू उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य वाटणारे मांडतात तर काहीजणांच्या मते राहायला जागा नाही म्हणून शिक्षा सुनावणं हा त्या व्यक्तीच्या अस्तित्वावरच घाला घालणारा हा निर्णय आहे. जिथे बेघर लोकांची संख्या जास्त आहे अशा नऊ राज्यात या निर्णयाची अमंलबजावणी होईल. या निर्णयाबद्दल अर्थातच राज्याराज्यातल्या महापौरांच्या, सामान्यजनतेच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. मुळात हा खटला आहे तरी काय ज्यासाठी  प्रशासनाला उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले?


२०१८ साली ऑरेगन राज्यातील ग्रॅटपास शहरात सत्र न्यायालयात ऑरेगन कायदा केंद्राच्यावतीने बेघर लोकांसाठी खटला दाखल केला गेला. कायद्याने सार्वजनिक ठिकाणी झोपणे दंडनीय आहे पण शहर निवारा पुरवू शकत नसेल तर त्यांनी कुठे जायचं आणि घटनेनुसार असा नियम अवैध आहे असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. हा खटला होता ब्लेक या नागरिकाच्यावतीने. ग्रॅटपासमध्ये दहा वर्ष स्वत:चं घर नसल्याने, भाड्याने घर घेणं परवडत नसल्याने ब्लेक बेघर होता. अधूनमधून सरकारतर्फे चालवणार्‍या जाणार्‍या तात्पुरत्या निवार्‍याचा तो आधार घेत होता. तात्पुरतं निवारा केंद्र ही नोकरी असणार्‍या पण भाड्याचं घर न परवडणार्‍या किंवा बेरोजगार व्यक्तींना अल्पमुदतीने मिळू शकतं पण काही प्रमाणात भाडं तर द्यावं लागतंच तसंच दोन वर्षात स्वत:च्या पायावर उभं राहणं अपेक्षित असतं. ब्लेक या निवार्‍याचा आधार घेत होता पण तिथे तो टिकू शकला नाही. उद्यानं आणि रस्त्याच्याकडेला झोपण्यावरुन त्याला अनेकदा दंड ठोठावण्यात आला. ब्लेकसारखे त्या भागात जवळजवळ सहाशे निराधार नागरिक होते जे सरकारच्या कडक नियमात पोळून निघाले होते. साधारण चाळीसहजार वस्ती असलेल्या या गावात रात्री रस्त्यावर झोपलेल्या माणसाला चादर, उशी  वापरण्यावर बंदी घालण्यात आली आणि उलटसुलट मतप्रवाहांचं गावात वादळ उठलं . गावातील या सर्व निराधार व्यक्तींचा प्रतिनिधी म्हणून ब्लेकला निवडण्यात आलं. ब्लेकद्ववारा ऑरेगन कायदा केंद्र या संस्थेमार्फत  खटला दाखला करण्यात आला. २०२० साली ब्लेकचं निधन झालं आणि त्याच्याजागी ग्लोरिया जॉनसन आणि जॉन लोगन यांची बेघरांची प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. शासनातर्फे असलेल्या निवाराकेद्रांमध्ये समाधानकारक परिस्थिती आढळून न आल्यामुळे त्यावर लक्ष केंद्रित करावं, केंद्रांची संख्या वाढवावी तसंच बेघरांना शिक्षा ठोठावलं जाणारं कलम काढून टाकावं याला सत्र न्यायालयाने अखेर समंती दिली तरी हा खटला पुढे चालूच राहिला. ग्रॅटपास शहर प्रशासनाने उच्च न्यायालयाकडे धाव घेतली.


बेघरांचेही सामान्यत: दोन प्रकार असतात. निवारा केंद्रात राहणारे आणि निवारा केंद्र नाकारुन रस्त्यावर जीवन जगणारे. मुळात कितीतरीजण सर्वसामान्य जीवन जगणारी माणसं असतात पण घरभाडं परवडत नाही म्हणून त्यांच्यावर ही वेळ आलेली असते. नातेवाईकांची मदत मिळणं कठिण होतं कारण सर्वचजण साधारण त्याच आर्थिक स्तरातले असतात. काहीवेळा मादक पदार्थाच्या आहारी गेल्यामुळे घरात थारा मिळत नाही. सरकारच्या ताब्यात असलेल्या युवकांना सज्ञान झाल्यावर म्हणजे अठरा वर्षांनंतर निवारा केंद्रात राहता येत नाही त्यामुळे ही तरुण मुलं रस्त्यावर येतात आणि त्यानंतर सर्वसामान्यांसाठी असलेल्या निवारा केंद्रात जाण्याची त्यांची इच्छा उरलेली नसते. बर्‍याच निवारा केंद्रातून सकाळी बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी परत आल्यावर जागा असेलच असं याची शाश्वती  नसते. सेवाभावी संस्था अशी केंद्र चालवतात पण त्याठिकाणचे नियम बेघरांना जाचक वाटतात. धार्मिक पाया असणार्‍या काही केंद्रात तुम्ही पाऊल टाकलं की तीस दिवस इतरांच्या संपर्कात राहण्याची बंदी असते, रोज दोनवेळा चर्चमध्ये जाणं बंधनकारक असतं तसंच नोकरी असेल तर पगारातील दहा टक्के रक्कम ही केंद्र घेतात. कितीतरी केंद्रात ठराविक वेळेनंतर परत आलात तर प्रवेश नाकारला जातो. रात्री उशिरापर्यंत काम करणार्‍या लोकांना अशा केंद्रांचा निवारा घेता येत नाही.


संपन्न देशात गरीबी नसते असं आपण गृहीत धरतो पण अमेरिकेत ३३६,७५१,०६१ मिलियन लोकसंख्येपैंकी सध्या ६,५३,१०० इतकी रस्त्यावर तंबू ठोकून राहणार्‍यांची संख्या आहे.  गेल्या एका वर्षात १२ टक्क्यांनी बेघरांची संख्या वाढली आहे ती कोविड काळानंतर झालेल्या महागाईमुळे. २००७ नंतर प्रथमच ही संख्या इतकी वाढली. उच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय काही राज्यांपुरताच मर्यादित आहे तसंच त्या त्या राज्याला  निर्णयाची अमंलबजावणी किती कठोरपणे करायची याची मुभा आहे. नियमाची कठोरपणे अमंलबजावणी झाली तर बेघर लोक देशोधडीला लागतील, या गावातून त्या गावात भ्रमंती त्यांच्या वाट्याला येईल आणि काही हालचाल केली नाही तर उद्यान, रस्ते अशा सार्वजनिक जागांवर बेघरांनी आक्रमण केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्याच शहरातील उत्कृष्ट नियोजन करुन बांधलेल्या उद्यान, रस्त्यावर फिरकणं मुष्किल होईल. प्रश्न गुंतागुतींचा आहे. प्रशासनाने योग्य ते बदल करुन निवारा केंद्र पुरवणे हा मार्ग असला तरी बर्‍याच राज्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची तेवढी क्षमता नाही. आता ९ राज्य या निर्णयाची अमंलबजावणी करताना काय पावलं उचलतात हे पाहाणं हे महत्वाचं ठरेल. 


https://marathi.indiatimes.com/editorial/article/us-supreme-court-decision-on-homeless-special-report/articleshow/112005896.cms

Wednesday, July 24, 2024

वारीचं वेगळं स्वरूप


कोविड काळात जेव्हा सारं ठप्प झालं होतं तेव्हा प्राजक्ताला सुचलेल्या वारीच्या अभिनव कल्पनेचं स्वरूप आता व्यापक झालं आहे त्याबद्दल अटलांटाची प्राजक्ता पाडगावकर आणि शार्लटमध्ये होणाऱ्या वारीतील वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल सांगत आहेत अभिजीत आराध्ये.

Saturday, July 13, 2024

देशभक्तीची RD म्हणजे?

 


देशभक्तीची RD  म्हणजे? समाजमाध्यमातून फोफावलेल्या चळवळीमुळे एक संस्था उभी राहिली ती देशभक्तीच्या RD मुळेच. 


सांजसोबत ही निराधार वृद्धांना दर महिन्याला किराणामाल पुरविणारी संस्था. चिपळूणजवळच्या खेड्यात ही संस्था कार्यरत असली तरी मदतीची हाक येते शहरांतूनही, सुशिक्षित, सुविद्य घरांतूनही.


या हाकांना साद देतानाचे अनुभव सांगत आहे पराग वडके.

Wednesday, July 3, 2024

वेश्यांची सुटका करून मुख्य प्रवाहात आणणाऱ्या अजित कुलकर्णींशी चर्चा


वेश्यांची सुटका कशी केली जाते, त्यांच्या मुलांचं काय होतं, वेश्या म्हणजे सर्वात मोठं समाजमाध्यम?चर्चा अजित कुलकर्णींशी.

Saturday, June 29, 2024

पालकत्व दिव्यांग मुलीचं



दिव्यांग आरोहीच्या पालक राजेश्वरी किशोर सांगत आहेत त्यांचे अनुभव.

सुखाचे क्षण, अडीअडचणी, कटू गोड अनुभव त्याचबरोबर इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अजूनही दिव्यांगांबद्दल जागरुकतेची गरज का आहे याबद्दलही.

मुलाखतीच्या अखेरीस 'ससा आणि कासव' या भावा बहिणीच्या नात्याचा पदर उलगडणाऱ्या उताऱ्याचं‌ हृदयस्पर्शी कथन. 

नक्की पाहा, इतरांना पाठवा, वाहिनीचे सभासद व्हा.

Wednesday, June 26, 2024

अमेरिकन स्त्रीमन

 महाराष्ट्र टाईम्सच्या रविवारच्या विश्वभानमधील हा माझा दुसरा लेख.


"यू इंडियन विमेन ऑलवेज हॅव शोल्डर टू लिन ऑन..." माझ्याबरोबर काम करणारी टिना जेव्हा असं मला म्हणाली तेव्हा क्षणभर राग आला, हिचं काय जातंय असं म्हणायला, आम्हाला इथे आहे कोण नवर्‍याशिवाय हा विचार मनात डोकावला. तिचं बोलणं खटकलं पण नंतर माझं मलाच जाणवलं किती खरं होतं तिचं बोलणं. प्रत्येक गोष्टीत आपण नवर्‍यावर किती अवलंबून राहतो, सगळीकडे नवर्‍याला गृहीत धरतो हे  तीव्रतेने जाणवलं. मीच नाही तर माझ्या इतर मैत्रिणीही. कोणी गाडी चालवत नाही म्हणून जोडीदारावर अवलंबून, कोणाला इंग्रजी बोलायची सवय नाही म्हणून जिथे जायचं तिथे नवरा बरोबर पाहिजे,  बॅकेंच्या व्यवहारातलं, आंतरजालावरुन बिलं भरण्याच्या कामातलं कळत नाही म्हणून ते नवरा करेल हे गृहित धरणार्‍या स्त्रिया डोळ्यासमोर तरळून गेल्या. ती जे बोलली तोही प्रसंग असाच. झालं होतं असं, कामावर जाताना माझ्या गाडीचा टायर फुटला. तातडीची सेवा कोण पुरवणार? नवरा. मी आधी नवर्‍याला फोन केला. तो म्हणाला,

"मी कसा येऊ काम सोडून? तू AAA ला (American Automobile Association) फोन कर. अर्ध्या तासात येतील ते आणि देतील तुला टायर बदलून." मुकाट्याने टायरचा खडखडाट करत मी गाडी कामाच्या जागी नेली. AAA ला फोन करता करता नवर्‍याच्या नावाने टिनाकडे कुरकूर केली. तिला माझ्या कुरकूर करण्याचं तर आश्चर्य वाटलंच पण टायर बदलता येत नाही याचंही. AAA यायच्या आधीच तिने मला स्वत:हून टायर तर बदलून दिलाच पण तो कसा बदलायचा हे शिकवलंही. ही माझी अमेरिकेतल्या स्वतंत्र आणि स्वातंत्र्य उपभोगणार्‍या स्त्रीची पहिली ओळख. तोपर्यंत चेहरा रंगवून, उंच टाचांच्या चपला घालून ’टकटक’ करत चालणारी अत्याधुनिक स्त्री एवढंच माझं ज्ञान होतं इथल्या स्त्रीबद्दल. जसजशी मी टिनाच्या जास्त जवळ जात गेले, इतर स्त्रियांशी परिचय होत गेला तसंतसं  इथल्या कितीतरीजणींचं आयुष्य समजत गेलं. सर्वसाधारण आपला समज असतो की अमेरिकेत लोक शिकत नाहीत, हुशार नसतात पण ती हुशार नसतात म्हणून शिकत नाहीत असं नसतं तर शिक्षणाचा खर्च परवडत नाही हे बहुतेकवेळेला कारण असतं. शालेय शिक्षण सरकार मोफत पुरवत असलं तरी महाविद्यालयीन शिक्षणाचा भार सामान्यांच्या आवाक्यापलिकडचा असतो. टिनाचंही तेच. नोकरी करुन पैसे साठवून जेव्हा तिने पुढचं शिक्षण घेतलं तेव्हा तिची चाळीशी उलटून गेली होती, लग्न मोडलं होतं पण जिद्दीने शिक्षण पूर्ण करुन ती चांगल्या नोकरीला लागली. १२ वी नंतर नोकरीला सुरुवात आणि त्याकरता स्वतंत्र राहण्याची सवय, त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता अंगी येणं, कोणत्याही प्रसंगाला तोंड देता येण्याची तयारी असणं अशा गोष्टी आपसूकच तिच्या अंगी आल्या होत्या आणि माझ्यासारख्या आर्थिक स्वातंत्र्य असलं तरी एवढ्यातेवढ्या गोष्टींसाठी इतरांवर, विशेषत: जोडीदारावर अवलंबून असणार्‍या स्त्रिया तिने पाहिल्या असणार आणि त्यावरुन तिने ते विधान केलं असणार. ही माझ्या आयुष्यात आलेली आणि मनातल्या कल्पनांना छेद देणारी पहिली अमेरिकन स्त्री. 

आमच्या शेजारची मेरी केली, जिला आम्ही मेरीआजीच म्हणतो. तिनेही माझ्या मनातल्या अमेरिकन स्वातंत्र्य आणि त्या अनुषगांने येणार्‍या, मी कल्पना केलेल्या सार्‍या गोष्टींना अक्षरश: सुरुंग लावला. तिची ओळख झाल्यावर येताजाता चार गोष्टी बोलायला ती थांबायला लागली, सातासमुद्रापलिकडे असणार्‍या आईची मला आठवण येत असेल म्हणून अधूनमधून स्व:त केलेला एखादा पदार्थ आणायला लागली. आमच्या घरातल्या सर्वांचे वाढदिवस समजल्यावर प्रत्येकाच्या वाढदिवसाला मेरीआजीकडचा केक येणारच. तिच्या गृहिणीपणात ती मनापासून रमलेली होती तरी वागण्याबोलण्यातला ठामपणा तिचा आत्मविश्वास जाणवून द्यायचा. आमच्या मुलांसाठी ती आजी झाल्याचं आम्हाला अप्रुप होतं ते आश्चर्यात आणि कायमच्या कौतुकात बदललं जेव्हा तिच्या सुनेने अचानक जगाचा निरोप घेतला तेव्हा तिने उचललेल्या पावलाने. पासष्टी पार केलेल्या मेरीने जुळ्या नाती आणि नातू यांची जबाबदारी अंगावर घेतली. नुसती घेतलीच नाहीतर मुलांना शिस्त, प्रेम लावून त्यांचा अभ्यास घेणं, तिघांच्या वेगवेगळ्या  छंदवर्गांना न कंटाळता नेणं, आडनिड्या वयातल्या समस्या सोडवणं हे सारं पार पाडलं. तिची होणारी धावपळ, दगदग पाहून आम्ही चुकचुकायचो, तिला लागेल ती मदत करायची तयारी दर्शवायचो पण तीन मुलांना मोठं करणं हे एकमेव ध्येय तिने उराशी जपलं आणि यशस्वीरित्या पार पाडलं. अमेरिकन लोक स्वत:पलिकडे विचार करत नाहीत, नात्याशी त्यांची बांधिलकी नसते अशा ज्या काही भारतातून येताना समजूती होत्या त्या गळून पडणारी अशीच उदारहरणं सातत्याने आम्ही आजूबाजूला बघत आलो आणि आपण ऐकीव गोष्टींवर पूर्ण समाजाला एकाच पारड्यात तोलतो हे वारंवार जाणवत गेलं.

आमच्या मुलीच्या जन्माच्यावेळी भारतातून माझ्या आई - वडिलांना येणं शक्य झालं नाही तेव्हा आमच्या भारतीय मित्रमैत्रिणींबरोबर मेरीआजी आणि शेजारची टॅमी हार्वी या दोन्ही कुटुंबाने मदतीचा हात पुढे केला. इतकंच नाही तर  महिनाभर सराव करुन बारशाला कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या म्हणत दोन्हीकडच्या आजीआजोबांची भूमिका आनंदाने पार पाडली.

याचा अर्थ इथे सगळंच आलबेल आहे असा नक्कीच नाही. वर्णद्वेषाचा कितीतरीजणांना अनुभव येतो, कामाच्या ठिकाणी अतिशय वरच्या ठिकाणी पोचणं सोपं नसतं, काही साध्यासाध्या पण आपल्याला खटकणार्‍या गोष्टीही भरपूर आहेत. आपल्याकडे जसं डब्यातून कोणी काही दिलं तर आपणही त्यात काहीतरी भरुन पाठवतोच तशी या लोकांची पद्धत नाही. डबे रिकामेच परत येतात. दारात उभं राहून तासनतास गप्पा मारतील पण बोलतोच आहोत तर या की आत असं तोंडदेखलंही म्हणत नाहीत. अर्थात व्यवस्थित आमत्रंण देऊन बोलावतात किंवा त्यांना काही खाद्यपदार्थ द्यायचे तर देतात हा भाग आलाच.

या देशातली माणसं उमजत गेली तितकंच त्यांच्यातला उत्साह, वयाचा बागुलबुवा न करता कार्यरत राहणं, आवडीनिवडी जपणं यातून आम्हीही बरंच शिकलो. त्यामुळेच थोडसं स्थैर्य आल्यावर अभिनयाची मूळ आवड उफाळून आली.  कणकवलीच्या नाथ पै एकांकिकांमधून मिळवलेली अभिनयाची बक्षिसं, रत्नागिरीच्या जिज्ञासा संस्थेतून गाजवलेल्या स्पर्धांच्या आठवणी स्वस्थ बसू देत नव्हत्या. त्यातूनच ‘अभिव्यक्ती’ या नाट्यसंस्थेची निर्मिती झाली. २००८ सालापासून आम्ही इथल्या व्यावसायिक नाट्यगृहात दरवर्षी नाटक/एकांकिका करतो. मी लिहिलेल्या एकांकिकेचे प्रयोग इथे इतर राज्यातही लोकांनी केले आहेत. मराठी भाषेची आवड असल्यामुळे मी मराठी शिकवायला सुरुवात केली. वर्ग आंतरजालावर (online) असल्यामुळे गावातल्या मुलांसह, इतर राज्यातून आणि देशांतूनही मुलं माझ्याकडे मराठी शिकत आहेत. याबरोबरच वयाच्या एका टप्प्यावर कर्मभूमी आणि मातृभूमीचं देणं फेडण्याची भावना इथल्या संस्कृतीमुळे आमच्या मनात निर्माण झाली. इथे शाळेपासूनच मुलांमध्ये सामाजिक जाणीवा प्रगल्भ केल्या जातात. त्यातून इथली मुलं समाजकार्यात जोमाने काम करायला लागतात आणि बहुतांशी शिक्षण संपल्यावरही करत राहतात. मुलांचं पाहून आमच्यासारखे कितीतरीजण जितकं जमेल तशी आर्थिक, शारीरिक सेवा दोन्ही देशांसाठी द्यायचा प्रयत्न करतात.

१९९५ साली आम्ही अमेरिकेत आलो, तेव्हा हा देश आमच्यासाठी ‘परदेश’ होता. मुळं रुजवणं कठीण वाटत होतं, आत्तासारखी संपर्काची आधुनिक साधनं नव्हती. १५ दिवसांनी भारतात फोन व्हायचे. पत्र पाठवलं की उत्तराची आतुरतेनं वाट पाहण्यात ३ आठवडे जायचे पण हा परका देश ‘आपला’ कधी होऊन गेला, तेच समजलं नाही. आता परदेश हा शब्दप्रयोगच मला चुकीचा वाटतो. स्वत:चा देश, परदेश कसा असेल? त्यामुळेच मी भारताला मातृभूमी आणि अमेरिकेला कर्मभूमी असं मानते. भारतात कुणी अमेरिकेबद्दल ऐकीव माहितीवर तारे तोडले की आम्ही ख-या परिस्थितीची जाणीव तळमळीनं करून देतो आणि इकडे आमच्या सहकार्‍यांनी, अमेरिकेन मित्र-मैत्रिणींनी भारताबद्दल काही शेरे मारले की त्याच कळकळीनं गैरसमज दूर करण्याच्या प्रयत्नाला लागतो. दोन्ही देश आमचेच. एक कर्मभूमी, दुसरी मातृभूमी!

Wednesday, June 19, 2024

लोलक

महाराष्ट्र टाईम्सच्या आजच्या विश्वभान पुरवणीतील माझा

लेख.

लग्न ठरल्यावर ’काय बुवा आता एकदम अमेरिका’ असं जो तो ज्या अप्रुपाने म्हणायचा त्याचंच अमेरिकेपेक्षाही मला जास्त अप्रुप वाटायचं. लग्न ठरताना नवर्‍याच्या नोकरीमुळे अमेरिकेत जायला मिळेल हे कळलं तेव्हा मला भारत सोडायचा नाही हे मी ठामपणे सांगितलं होतं. दोन वर्षच जायचं आहे म्हटल्यावर अर्थातच अमेरिका बघायला मिळेल असं जो - तो म्हणायला लागला आणि अमेरिकेत जायचं नाही या एकाच कारणाकरता  हटून न बसता बघावी तरी ही अमेरिका असं मलाही वाटायला लागलं. लग्न झालं आणि वर्षभरातच नवर्‍याला कामानिमित्त अमेरिकेला जायची संधी चालून आली. अमेरिकेबद्दल  उत्सुकता होती तशीच छुपी भितीही. तिथे जाऊन करायचं काय,  निभाव कसा लागेल ही शंका अधूनमधून डोकं वर काढत होती. अमेरिकेबद्दल माहिती होती ती पुस्तकी, ऐकीव. शाळेतल्या भूगोलात शिकलेली माहिती आणि आपली माणसं आहेत भरपूर तिकडे हेही ऐकलेलं. एवढ्या तुटपुंज्या बळावर १९९५ साली २ वर्ष अमेरिकेत राहायचं म्हणून अमेरिकेला जाणार्‍या विमानात आम्ही बसलो.

नापा कौंटीतल्या सॅन्टारोझा नावाच्या गावात पाऊल ठेवलं तेव्हा कोकणातल्या एखाद्या निसर्गरम्य खेड्यात आल्यासारखं वाटलं पण जेमतेम ८ - १० भारतीय कुटुंबच गावात आहेत समजल्यावर कितीतरी प्रश्न मनात उभे राहिले. गजबजलेल्या गावातून, घरातून, मित्रमैत्रिणींच्या घोळक्यातून कोणीतरी शिक्षा दिल्यासारखं एका कोपर्‍यात मुकाट बस सांगितल्यासारखी अवस्था सुरुवातीला अनुभवली. कायद्यानुसार मला काम करता येणार नव्हतं हे इथे येताना ठाऊक होतं आणि दोनच वर्ष म्हणून त्याबद्दल काही वाटलं नसलं तरी इथे आल्यावर मात्र वेळ अंगावर यायला लागला. आठवड्यातून एकदा या ८-१० कुटुंबाच्या भेटींनी माणसांत मिसळण्याचं समाधान अपुरं वाटायला लागलं, संध्याकाळी मुलाला बाबागाडीत टाकून २-२ तास निर्मनुष्य रस्त्यावर फिरायला जाणं कंटाळवाणं व्हायला लागलं, घरी परत आलं की आई - वडील, भावंडांच्या, मित्रमैत्रिणींच्या आठवणींनी संध्याकाळ उदासवाण्या जायला लागल्या.  

भारतात मी अभिनय, लेखन यात मग्न असायचे, त्याबरोबर आकाशवाणीत हंगामी निवेदिका म्हणून काम करायचे. यातलं इथे फक्त लेखन शक्य होतं. मला दिसणारी अमेरिका कधी हलक्याफुलक्या लेखांतून तर कधी तात्कालिक प्रसंगांवरील लेखनातून मी मान्यवर वृत्तपत्र, मासिकं यातून लोकांपर्यंत पोचवत होते पण तरी चैन पडत नव्हतं. इथे राहायचं तर या समाजात आपण मिसळलं पाहिजे असं वाटायचं पण मार्ग सापडत नव्हता. मार्ग दाखवला रोजच्यारोज दारात फुकट येणार्‍या  वर्तमानपत्रातल्या जाहिरातींनी. त्यातूनच  सरकारतर्फे माफक दरात चालवल्या जाणार्‍या छंदवर्गाबद्दल कळलं.  जाजम विणण्याचा तो वर्ग म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या इंग्रजीची कसोटी होती. आम्हाला दोघींना एकमेकींच्या इंग्रजीचा एक शब्दही समजत नव्हता. ’I don't understand what you are saying' हेच दोन - तीन वेळा ऐकलं की समजत होतं पण आमची दोघींची चिकाटी दांडगी. वर्गात पूर्ण झालं नाही म्हणून मी तिच्या घरी जाऊन जाजम विणलं आणि जसंजसे उच्चार कळायला लागले तसंतसं अमेरिकन लोकांमध्ये मिसळण्याचं वेडच लागलं. त्यांच्या स्वभावाचे पैलू जाणून घ्यायला आवडायला लागलं.  

पाहता पाहता २ वर्ष उलटली. त्याचवेळी नव्या नोकरीच्या संधीही चालून येत होत्या. काय करावं समजत नव्हतं.  गावाकडून शहराकडे गेलेला माणूस जसा तिथंच गुंततो तसं होत असावं. आमचंही तेच झालं. मला नेहमी वाटतं की, हे सारे निर्णय त्या-त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे घेतले जातात. पैशाचा मोह सोडवत नाही, सोयीसुविधांची सवय होते, भारतात आर्थिक मदत करायची असते, बसत चाललेली घडी विस्कटणं नको वाटायला लागतं, मिळालेली संधी गमवायची नसते, हुशारीचं या देशात चीज होतं हा विश्वास वाढायला लागलेला असतो. प्रत्येकाची कारणं म्हटलं तर सारखीच किंवा म्हटलं तर खूप वेगळीही असतात. काहींना सासरच्या माणसांशी संबंध ठेवायचे नसतात तर काहींना अमेरिकेत राहतो म्हणजे स्वर्गाला हात पोचले असं वाटत असतं. आपण कल्पनाही करू शकत नाही इतकी अविश्वसनीय पण त्या- त्या कुटुंबाच्या दृष्टीनं सगळीच कारणं महत्त्वाची असतात आणि कशासाठी? पोटासाठी हे  मुख्य कारण तर असतंच असतं.

इथे राहण्याची जशी सवय होत गेली तशी नवर्‍याच्या नोकरीमुळे वेगवेगळ्या राज्यात फिरण्याचीही सवय झाली. हळूहळू भारतात महाराष्ट्रापुरतं मर्यादित असलेलं अनुभवविश्व व्यापक झालं. महाराष्ट्रातल्याच वेगवेगळ्या भागातल्या, भारतातल्या इतर राज्यातल्या लोकांशीही मैत्री व्हायला लागली. विचारातला संकुचितपणा कमी व्हायला लागला. देश आपला वाटायला लागला. इथल्या प्रवाहात सहभागी होण्यासाठी लागणा-या शिक्षणाचे वेध लागले. 

वयाच्या तिशीनंतर पुन्हा महाविद्यालयात पाऊल टाकायचं या विचारानंच बेचैन व्हायला झालं होतं. अस्वस्थ मनानं वर्गात प्रवेश केला आणि क्षणात तो पळालाही. माझ्या आई-वडिलांच्या वयाचे विद्यार्थी पाहून मी अगदीच बालवयात महाविद्यालयात आल्याची खात्री झाली आणि एक वेगळाच आत्मविश्वास आला. नंतर शिक्षक आणि विद्यार्थी यांमुळे तो टिकलाही. इथल्या शिक्षणाचा ढाचा वेगळा आहे. प्रात्यक्षिकांवर भर, विषय समजण्याला महत्त्व, शिस्तीपेक्षा मित्रत्व, अडचणींना उपयोगी पडण्याचा प्रयत्न अशा काही गोष्टी विशेष नमूद कराव्याशा वाटणार्‍या. अजूनही एक आठवण मनात ताजी आहे. मुलाला सांभाळणारी मुलगी येऊ शकली नाही तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून मुलगा माझ्याबरोबर आला तर चालेल का असं मी स्मिथना घाबरतच विचारलं.  त्यांनी तात्काळ होकार भरला. मुलाला घेऊन वर्गात पाऊल ठेवलं आणि  स्मिथनी प्रथम आज आपल्या वर्गात एक छोटा दोस्त आला आहे अशी मुलाची सर्वांना ओळख करुन दिली. ६ वर्षांच्या माझ्या मुलानं लाजतलाजत ‘हाय’ केलं. वर्ग होता महाविद्यालयाचा आणि मुलं होती वय वर्ष १८ ते ६५ च्या आसपास. तो दिवस त्याच्यासाठी आणि माझ्यासाठीही कायमचा स्मरणात राहिला.

शिक्षण चालू असतानाच नोकरीसाठी लागणारी कागदपत्रं आली. मी शिकताशिकता बदली शिक्षिकेची नोकरी करायचं ठरवलं. रितसर प्रक्षिक्षण घेऊन मी कामाला सुरुवात केली. तिथेही उच्चार ही अडचण होतीच. छोटी, छोटी मुलं गोष्ट ऐकताना एकदम चिडीचूप बसत याचं मला खूप आश्चर्य वाटायचं. इतकी आज्ञाधारक? पण लवकरच ते कोडं सुटलं. मी बोललेलं त्यांना काही कळतंच नव्हतं म्हणून ती मुकाट बसून राहायची. मग ओठांच्या हालचालींवरुन कसं समजतं हे मीच त्यांना शिकवल्यावर त्यांना माझं बोलणं समजायला लागलं. दुसरी अडचण म्हणजे मला सुरुवातीला सगळी मुलं सारखीच वाटायची.  एकदा खेळाच्या तासाहून परत येताना मी वेगळीच मुलं घेऊन आले. अर्थात मला कळलं नव्हतंच. मुलंच म्हणाली, ‘यु आर नॉट अवर टिचर.’ आता? त्यांची शिक्षिका शोधून ती मुलं तिच्या ताब्यात दिली आणि भांबावलेली माझी मुलं मी परत आणली. आता सारं गमतीचं वाटतं, पण तेव्हा गडबडून आणखी गोंधळ घातला जायचा.

आम्ही  इथं आलो त्या काळात भारतातून इथं येणा-यांची संख्या तुलनेनं कमी होती त्यामुळे स्थानिकांनाही आमच्यासारख्यांची सवय पटकन होत नव्हती.  आता इथं येणा-या तरुण मुलांना जागतिकीकरणामुळे अशा अडचणी येत नाहीत.  पिढीपिढीमध्ये पडलेला फरकही  ठळकपणे जाणवतो. काही ठरवून लवकरच परत जातात तर काही भारत सोडायचा या विचारानंच आलेले असतात. भारतातली तरुण पिढी  ‘जिप्सी’ होत चालली आहे असं वाटतं कारण यांच्यासाठी कोणता देश हे महत्त्वाचं राहिलेलं नाहीच. कर्तृत्वाला वाव मिळवण्याची,  कामाची, फिरण्याची, संधी त्यांना महत्त्वाची वाटते . पूर्वीच्या मानानं हे सहजसाध्यही आहे. याचं कारण तंत्रज्ञान, संपर्कात राहण्याची साधनं, बदललेला भारत, सुधारलेली आर्थिक स्थिती हे असावं आणि पालकांची बदललेली दृष्टीही. मला आठवतंय जेव्हा आमची मनःस्थिती दोलायमान होती, तेव्हा दोन्हीकडच्या पालकांनी आम्हाला ‘तुमच्या भवितव्याचा विचार करून निर्णय घ्या’ असा सल्ला दिला होता. इथं येणा-या तरुण मुलांचे पालक मात्र मुलांना परदेशातच राहा असा सल्ला देतात. परिस्थिती आणि कारणं अशीही बदलत जातात हे आजूबाजूची स्थित्यंतरं पाहताना, भूतकाळात डोकावताना जाणवतं.

मनुष्य जिथं जातो तिथं आवडीनिवडी जपत मुळं रुजवतो. आपलं असं काहीतरी टिकवण्याची धडपड करतो, नवीन गोष्टी स्वीकारतो. तरुण वयात आपण कुठं आहोत याला खरंच फार महत्त्व दिलं जात नाही आपल्याकडूनच. आमचंही तेच झालं. उत्साह होता, आव्हानं पेलण्याची ताकद होती, स्वत:ला सिद्ध करण्याची खुमखुमी होती. आपण कोणत्या देशात आहोत हे महत्त्वाचं नव्हतंच. जीवलगांची दोन वर्षांनी होणारी भेट त्या वेळेस पुरेशी वाटायची.  इथंच स्थायिक होण्याचा निर्णय घेताना नक्की काय विचार असावा ह्याचा विचार केला तर एकच एक मुद्दा निश्चितच सांगता येणार नाही.  पैसा आणि आराम ह्या दोन गोष्टींसाठी मायदेश सोडतात असं भारतात म्हटलं जातं पण तेही कारण नाही. खूप सा-या कारणांचा एकत्रित परिणाम म्हणजे हे स्थलांतर असं म्हणेन मी. हे सर्वांच्याच बाबतीत होत असावं. आम्ही भारत सोडताना तात्पुरताच सोडला होता मग तरीही आम्ही इथंच का राहिलो, या प्रश्नाचं एकच एक असं ठोस  उत्तर आम्हाला अजूनही सापडलेलं नाही असंच म्हणावं लागेल.

Tuesday, June 18, 2024

या संस्थेबद्दल इतरांना कळवा ही विनंती

 


घरातलं कोणी अत्यवस्थ असेल पण आपल्याला तिथे पोचणं, राहणं सहजशक्य नसेल तर पुण्यातील Being with you help foundation चं सहकार्य! या संस्थेची माहिती जास्तीतजास्त लोकांना कळावी यासाठी मदत करावी ही विनंती. त्यांचे स्वयंसेवक सेवा द्यायला उत्सुक आहेत पण लोकांना ही संस्था फारशी ठाऊक नाही. संस्था आणि संस्थेच्या उपक्रमांबद्दल सांगत आहेत माधवी ठाकूरदेसाई.



If someone in your home needs help but you're unable to be there in person, consider reaching out to the 'Being with You Help Foundation' in Pune. Sharing information about this organization with others could make a real difference. The volunteers are enthusiastic about assisting, but many people may not be aware of the organization yet. Madhavi Thakurdesai provides further  information and speaks about organization's other projects.

Friday, June 7, 2024

सांस्कृतिक राजदूत

भारताची सांस्कृतिक राजदूत म्हणून वर्षभरासाठी शार्लटमध्ये असलेली १७ वर्षीय गार्गी. इथल्या शाळेतले, अमेरिकन कुटुंबांचे बरे - वाईट अनुभव, सांस्कृतिक राजदूत म्हणून तिचं काम, राजदूत होण्याची निवड प्रक्रिया याबद्दल सांगत आहे. या गप्पांसह तिच्या नृत्यांची झलकही.







Saturday, June 1, 2024

SUBWAY काढायचं आहे?


https://youtu.be/lneFz6MPIkU


अमेरिकेत SUBWAY काढायचं असेल तर काय करावं लागतं हे सांगत आहे शार्लटची योगिनी कर्णिक. नोकरी ते SUBWAY हा योगिनीचा प्रवास वेगळं काही करु पाहणाऱ्या स्रियांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

 

मुलाखत नक्की पाहा. अभिवाचन, एकांकिका, मुलाखती अशा विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी अभिव्यक्तीचे सभासद व्हा.



Friday, March 22, 2024

अक्कलखात्यात गेलेले मिळवण्याची युक्ती

 मागे अक्कलखाती गेलेले पैसे कसे परत मिळवायचे ते तुम्हा सर्वांना विचारलं होतं तर खूपजणांनी आपलं अक्कलखातं कसं भरलंय तेच सांगितलं, कसे परत मिळवायचे ते कोणी सांगितलं नाही. हे का लिहितेय? मी परत टाकले का पैसे अक्कलखात्यात? तर हो पुन्हा एकदा मी अक्कल खात्यात पैसे जमा केले! थांबा, थांबा पुढचा चमत्कार वाचा. ते गेलेले पैसे मी परतही मिळवले. कसे? ऐका तर माझ्या अकलेची कथा जी कदाचित तुम्हालाही तुमची वापरायला प्रवृत्त करेल!

घरातली दोन्ही कार्टी आपापल्या मार्गाला लागल्याने आम्हा दोघांना अक्कल ’खात्यात’ आता फार जमा करावी लागत नाही. साठलेली अक्कल दोघंही अचानक वापरतो त्यामुळे एकमेकांची अक्कल काढण्यात बरा वेळ जातो. आधी नवरोजींच्या अक्कलखात्याबद्दल. त्यांच्या जखमेवर मीठ चोळलं की माझी जखम आपोआप बरी होते म्हणून.

एकाच विमानतळावर वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही बसलो होतो. नवर्‍याला जरा ढिल दिली की जे होतं तेच झालं. एका बाईने त्याला गाठलं. ती ’इंडियन ओरिजिन’ ची होती म्हणून नवरोजींना दया आली. तिने विमान चुकलं म्हणून ३० डॉलर्स मागितले, तिच्या केविलवाण्या विनवण्यांमुळे कळवळून आमच्या ’ह्या’ नी तिला ते दिले. दरम्यान दोन मुलांना, एका बायकोला ’मेसेज’ पाठवला, मी काय करु? आम्ही तिघांनी काही करु नकोस असं कळवलं. पण हाय रे दैवा.... तोपर्यत गेलेसुद्धा३० डॉलर्स. मला प्रश्न पडला की ३० डॉलर्समध्ये कोणत्या विमानात जागा देतात का टपावर बसवतात? विमानतळावरच्या ATM मधून बाईचा हात लागला तर पैसे बाहेर पडत नाहीत की काय? एरवी समोर उभी राहिले तरी मी दिसत नाही पण ’इंडियन ओरिजिन’ वगैरे वर्णन... मी माझे हे विचार मनातच आळवले तर  मुलगी म्हणाली, 

"आमच्या तर १० डॉलर्सचं कुपन वापरा म्हणून मागे लागतो." तिने कुठल्याशा गोष्टीवर कुपन वापरलं नाही म्हणून तिचा बाबा तिला तिथे परत पाठवत होता. तो बेत तिने हाणून पाडला तरी अजून निखारा विझला नव्हता.

"अगं पण तू गेली कुठे होतीस?"

"ते वेगळं पण १० डॉलर्स वाचवायला आटापिटा आणि कोण कुठल्या त्या बाईला ३० डॉलर्स?" तरुण मुलीचे हे म्हणताना काय हावभाव असतील त्याचा विचार करा. तेवढ्यात तरुण मुलाचा फोन आला,

"असा कसा हा फसतो? खायला गेलं की महाग, महाग म्हणून खाऊच देत नाही आणि इंडियन ओरिजिनला ३० डॉलर्स?"

"बघा, मी कशी राहते तुमच्या बाबाबरोबर. तुम्ही सुटलात तरी. आता काय १०, २०, ३० करत बसलायत. फसू दे फसतोय तर." प्रत्येकाचं दु:ख आपापल्यापरिने पर्वतमय होतं.

जेवढी शक्य होती तितकी अक्कल आम्ही त्या गरीब नवर्‍याची काढली.  आपापसात मात्र, मरु दे. ३० डॉलर्सच तर होते असंही म्हणायचो. काही महिने गेले, सारं कसं शांत, शांत झालं आणि माझ्यावर ती वेळ आली. अक्कल खातं समृद्ध करण्याची. 

माझ्या संपादक मित्राने (फेसबुकवर नाहीये त्यामुळे कोणत्याही संपादक मित्रमैत्रिणींनी घाबरु नये) whatsapp करुन त्याची दर्दभरी कहाणी कळवली.  

"एका रिसॉर्टचं काम करतोय. कितीही पैसे लावले तरी कमी पडतायत, बायकोला दिवस गेलेयत आणि तिला एकटीला सोडून तिकडे जावं लागतं. १ लाख मिळणार होते पण मिळाले नाहीत. माझ्याकडे अजिबात पैसे नाहीत आणि बायकोच्या हातात काही दिल्याशिवाय मला निघता येणार नाही. इतरांनी आधीच खूप मदत केली आहे त्यामुळे मी कोणाला विचारु शकत नाही. तू पैसे पाठवशील का, महिनाअखेरीला देईन." आकडा पाहिला. ३० डॉलर्स रुपयात केले तरी त्याच्या वरताण होता. कधी फसलं तर नवर्‍यापेक्षा कमी एवढातरी माझा हिशोब पक्का होता. विमानतळावरची ’इंडियन ओरिजिन’ आठवली पण हा तर माझ्या ओळखीचा होता. वेळेला उपयोगी नाही पडायचं तर कधी असं म्हणत रक्कम पाठवून दिली. 

दोन, चार, सहा महिन्यांनी आठवण करुन दिली आणि मग थेट मुंबईतच त्याला भेटले. त्यानिमित्ताने एक भारतवारी.

"पैसे घेऊन ये." मला हुकुम सोडल्यासारखं वाटत होतं. 

"हो आणतो." माझ्या डोळ्यासमोर माझ्याच पैशांचं डबोलं नाचायला लागलं. आतुरतेने मी संपादकाच्या वाटेकडे डोळे लावून चहा ढोसत बसले. तो आला, बसला, बोलला आणि निघून गेलाही.  

"तू पैसे आणायला गेलीस आणि तुझ्याच पैशानी त्याला खाऊपिऊ घातलंस?" मैत्रीण गडबडा लोळायची तेवढी बाकी होती. 

"नवर्‍याची अक्कल तू काढलीस तशी नवर्‍याने  काढली की नाही तुझी आणि मुलांनी?" नको तो प्रश्न आलाच.

"मोहिम फत्ते झाल्याशिवाय सांगणार नाहीये त्यांना." मी पुटपुटले.

"म्हणजे तुझ्या घरात कोणालाच तू सांगितलं नाहीयेस?" मी मान हलवली.

"ही फसवणूक आहे." मैत्रीण म्हणाली. तिला पुढे बोलू न देता मी म्हटलं,

"सांगणार आहे गं बये. आधी पैसे परत मिळवू. चल घरी जाऊ या त्याच्या."  

"पत्ता?"

"विचारते." पत्ता मिळाला की आपण जायचं, धरणं धरायचं, नाही ऐकलं तर पूर्वी भाऊ कसे छेड काढणार्‍या मुलांना तुडवायला जायचे तसं भावाला पाठवायचं असे सगळे बेत मी तिला ऐकवले. मैत्रीण गडबडा लोळत होती ती उठून बसली. 

"पत्ता?" भुवया उंचावत परत तिचं तेच. घाईघाईत माझं पुस्तक पाठवते असा गळ टाकला पण असल्या फुटकळ गोष्टींना दाद लागू देईल तर तो फसव्या कसला?

हात हलवत परतले भारतातून आणि लेखणी सरसावली. रोज उठून संपादकाला छळायचं असा डाव ठरवला.

"गुंडांना पाठवू का?" उत्तर नाही.

"तु्झ्या युट्युब वाहिनीवर शिवीगाळ करु का?" उत्तर नाही.

"बायकोशी बोलू तुझ्या?" उत्तर नाही.  बायकोला घाबरत नाहीस. तुझ्या पापाचा घडा भरला आता अशी गर्जना ठोकत मी त्याच्या वाहिनीवर धडकले पण काही वेडंवाकडं लिहायला होईचना. शरणागती पत्करणं एवढंच राहिलं होतं. नवर्‍यासमोर मानहानी! त्याच्यासमोर ततपप करत उभी राहिले आणि ’इंडियन ओरिजिनच’ दिसायला लागली. तो आणि मी एकमेकांकडे पाहायला लागलो, बोलायला जीभ उचलेना त्यामुळे डोळे भरुन पाहणं चालू होतं आणि माझी पेटली. नवर्‍याच्या डोळ्यांची जादू! मी पळालेच. तो अगं, अगं करतोय तोपर्यंत मी फोन घेतला आणि संपादक मित्राला कळवलं. लिहिण्यात पण आवेश दिसला असता तर त्याने पैसे घेऊन अमेरिका गाठली असती.

"तुझं युट्युब रिपोर्टच करते मी. थांबच तू." लिहिलं आणि ५ मिनिटं टवकारुन मी लिहिलेली वाक्य वाचली कधी जातात म्हणून बघत बसले. उत्तर नाही. हा बारही फुसका ठरला म्हणून परत नवर्‍याच्या डोळ्यात डोळा घातला आणि फोन वाजला. बॅंकेने कळवलं होतं.

"१५००० रुपये जमा!" 

१५००० रुपये जमा, जमा, जमा असं करत एवढा आरडाओरडा केला की नवरा गडबडून गेला.

"नुसते डोळ्यात डोळे घातलेस, उड्या मारतेस... आता नक्की काय झालं ते सांगणार आहेस का?"

"तुझे अक्कलखाती गेले ना ३० डॉलर्स?" मी आधी मीठ लावून टाकलं. त्याने फक्त डोळ्यात डोळा घातला.

"माझेपण गेले होते तुझ्यापेक्षा खूप जास्त. पण मी मिळवले. जमा, जमा, जमा." असं म्हणत आधी अक्कल गहाण टाकून पैसे कसे घालवले आणि मग अक्कल वापरुन ते परत कसे मिळवले ते सांगितलं. नवरा हसला आणि म्हणाला,

"पण व्याजाचं काय? ते गेलं की अक्कल खात्यात." 

जाऊ देत ना. एवढं काय त्यात? १०००० तर परत मिळवले ना. नवर्‍याने दिली नाही पण तुम्ही तरी द्याल ना शाबासकी?

आधीचं अक्कलखातं इथे - https://mohanaprabhudesai.blogspot.com/2018/10/blog-post.html

Tuesday, February 27, 2024

मराठी भाषा दिन

 "ही माझी अमेरिकन आई." माझ्या आईची मी शेजारच्या मेरीशी ओळख करुन दिली तेव्हा  प्रश्न पडला की आई आता हिच्याशी कसं बोलेल? इंग्रजी समजलं तरी बोलण्याची सवय नाही आणि प्रयत्न केला तरी तिचं बोलणं उच्चारामुळे मेरीला समजणार कसं? पण आई तिच्याशी मराठीतच बोलली. खूप बोलली. आमच्या मुलीच्या बारशाला फक्त कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या हे घोकून घोकून शिकलेल्या मेरीचं मराठीचं ज्ञान इतकंच. त्यामुळे आई बोलली त्यातलं मेरीला काय समजलं असेल अशा संभ्रमात मी असतानाच मेरी माझ्याकडे पाहून हसली. म्हणाली,

"युवर मॉम इज हॅपी दॅट आय ॲम हिअर फॉर यू.  ॲड शी इज नॉट वरीड अबाऊट यू नाऊ. इज दॅट राईट?" माझी आई जे काही बोलली त्याचं भाषांतर करायची आवश्यकताच भासली नाही. ४० शी पार केलेल्या मुलीची काळजी घ्यायला सांगणार्‍या आईकडे आणि ती घेण्याची हमी देणार्‍या मेरीकडे मी डोळ्यातले अश्रू आवरत पाहत राहिले. आईच्या आत्मविश्चासाचंही अमाप कौतुक वाटलं. तिला हिंदी, इंग्रजी समजत असलं, येत असलं तरी बोलायची सवय नव्हती पण त्यामुळे तिचं पार साता समुद्राकडे येऊनही अडलं नाही. या आधीही तसं ते कधीच कुठे अडलं नाही हे आधी कधी जाणवलं नव्हतं इतक्या प्रकर्षाने त्या क्षणी जाणवलं. तिला काय म्हणायचं ते ती व्यवस्थित मराठीतच बोलून समोरच्यापर्यंत पोचवायची आणि महत्त्वाचं म्हणजे त्याबद्दल कुठलाही न्यूनगंड न बाळगता.


आम्हा भावंडाचं लहानपण मात्र आम्हाला इंग्रजी माध्यमात घाला म्हणून  आई - वडिलांच्या मागे लागण्यात गेलं. वडिलांची नोकरी बदलीची. जिथे जाऊ तिथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतीलच असं नाही त्यामुळे ते शक्यच नव्हतं आणि असतं तरी त्यांनी घातलं असतं की नाही कुणास ठाऊक.  इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालं नाही याची खंत बाळगत आता चाळीशीच्या आसपास असणारी एक अख्खी पिढी मोठी झाली.  आपल्याला नाही जमलं ते पोटच्या गोळ्यांना करायला लावावं या अलिखित नियमाचं पालन करत मुलांना आवर्जून आम्ही इंग्रजी माध्यमात शिकवलं. घरी बोलतातच की मराठी निदान शाळेत तरी शिकू देत इंग्रजी,  स्पर्धेच्या जगात मागे पडायला नको, उत्कर्ष कसा होईल, मुलांना ’व्यवहाराची’ भाषा आलीच पाहिजे हाच ध्यास आमच्या पिढीने जोपासला. मराठीची कास मुलांच्या हाती लागू दिलीच नाही.  आमच्या सारखे पालक बरेच आहेत  हे कळलं तेव्हा वेळ टळून गेली होती.  इंग्रजी माध्यमात न शिकल्याने काही फरक पडत नाही हे कळायलाही खूप काळ गेला.  पण हे लक्षात येईपर्यंत तसं खूप नुकसान आमचं आम्ही केलंच भरीला आमच्या मुलांचंही.  आम्ही शिकलो, नोकर्‍यांना लागलो, मराठी तर येतच होतं पण इंग्रजीही उत्तम जमायला लागलं.  इतकंच नाही तर मराठी आणि इंग्रजी, दोन्ही साहित्याचा उत्तम आस्वादही आमची पिढी घेऊ शकते ह्या गोष्टीचं महत्त्व आता समजतंय.  इंग्रजी माध्यमांच्या मुलांची ओढ इंग्रजी साहित्याकडे झुकलेली दिसते. मराठी साहित्य वाचण्याकडे त्यांचा कल कमी आढळतो. पण आमच्यासारखे पालक मुलांना इंग्रजी माध्यमात घालून खूश होते. आता मुलांची उत्तम प्रगती होईल, आत्मविश्वासामुळे यशाचं शिखर गाठतील, आमच्यासारखी खंत बाळगावी लागणार नाही याच आनंदात आम्ही मशगूल होतो. ज्या पालकांना इंग्रजी येत नव्हतं  ते तर आपल्या मुलांचं इंग्रजी ऐकताना हुरळून जात होते. पण नुसती इंग्रजी  भाषा येऊन यशाचं शिखर गाठता येत नाही किंवा आयुष्य सार्थकी लागत नाही हे कळलंच नाही कुणाला. मुलांना इंग्रजीतूनच शिकवायचं ह्या विचारसरणीची चूक आधी घराघरांना भोवली मग समाजाला. घरी बोलतातच की मराठी असं म्हणताना, घरातही मराठी बोलताना इंग्रजी शब्दांमध्ये अधूनमधून चवीला काजू, बेदाणे असल्यासारखे मराठी शब्द यायला लागले.  घरोघरच्या ह्या चुकीची  फळं समाजाला भोगायला लागली. वास्तवाचं भान येईपर्यंत मराठी शाळा हळूहळू बंदही पडायला लागल्या. ज्या चालू आहेत त्यांची परिस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीत मुलांना मराठी शाळांमध्ये घालायचं म्हटलं तरी अवघड परिस्थिती झाली. त्यामुळे शिक्षणाचं माध्यम इंग्रजीच झालं.  मराठी बोलायचं तर इंग्रजीतून विचार करुन त्याचं भाषांतर व्हायला लागलं.  कुणाला जपून राहा असं सांगण्याऐवजी काळजी घे असं टेक केअरचं शब्दश: भाषांतर सर्रास वापरात आलं. मराठीचं स्वरुपच बदललं. राडा होईल घरी अशी वाक्य मालिकांमधून सर्रास ऐकायला लागली, जीव तळमळण्याऐवजी तडफडायला लागला. प्रसारमाध्यमांनी इंग्रजी मिश्रित मराठी आणि चुकीचं मराठी रुढ केलं. तेच दैनंदिन जीवनात वापरलंही जाऊ लागलं. भावना पोचल्याशी कारण, भाषेच्या शुद्धतेचं काय इतकं ही विचारसरणी बळावली. अखेर मराठीचा, मराठीचा योग्य वापर करण्याचा आग्रह धरणार्‍यांनी शरणागती पत्करली.  काळाबरोबर बदललेल्या मराठीशी जुळवून घ्यायला हवं असं म्हणत चुकीचं, इंग्रजी मिश्रित मराठी मनातल्या मनात सुधारुन घ्यायला ही माणसं शिकली.


आणि एक वेळ अशी आली की मराठी नष्टच होणार की काय अशी भिती मनात निर्माण व्हायला लागली, वाढली. इतकी वाढली की  ती मराठी ’दीन’ झाली.  दिवस साजर्‍या करण्याच्या आपण सुरु केलेल्या नवीन प्रथेत  एक दिवस ’मराठी’ ला मिळाला. राज्यसरकारही यासाठी पुढे सरसावलं आणि तो दिवस ठरला २७ फेब्रुवारी!  जागतिक मराठी भाषा दिन. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी  २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात यायला लागला. कोण हे कुसुमाग्रज आणि जयंती म्हणजे? असा  इंग्रजी माध्यमातल्या मुलांना प्रश्न पडला. तो सोडविण्याची जबाबदारी तर आता आपण उचलायलाच हवी. नाही का? इथे अमेरिकेत आमच्यासारखी अनेकजण आपली मातृभाषा मुलांना यावी, ती त्यांनी टिकवावी, वापरावी यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत.


 माझ्याकडे मराठी शिकायला येणार्‍या विद्यार्थ्यांना मराठी दिनाबद्दल सांगितलं तेव्हा असा दिवसही असतो याचंच नवल वाटलं मुलांना. कुसुमाग्रज ठाऊक नव्हते पण त्यांच्याबद्दल प्रचंड उत्सुकता मात्र होती. त्या उत्सुकतेमुळे माझ्या  आशा पल्लवित झाल्या आहेत.  मराठी भाषा दिन म्हणजे आपली भाषा समजणं, बोलता येणं इतका मर्यादित अर्थ नाहीच. नसावा. मुलांना कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख करुन द्यायची, त्यांचं साहित्य वाचून दाखवायचं असं ठरवून टाकलं. कदाचित यातून मराठी साहित्याबद्दल त्यांची उत्सुकता वाढेलही. आवड निर्माण होईल. व्यक्त होण्यासाठी मराठी लेखन प्रपंचही मांडतील कदाचित कुणी एखादं त्यातलं. होईल खरंच असं? की भ्रामक आशावाद?  आपल्याच हातून दुसरीकडे वळलेली ही वासरं  येतील पुन्हा कळपात? आमच्या पिढीने मुलांना जसं इंग्रजीकडे वळवलं तसंच पुन्हा मराठीकडे आणण्याचं कामंही आम्हीच करु शकतो हे नक्की. आपापल्या पिलांना मराठीच्या मार्गावर आणायचं घेईल कुणी मनावर? जमेल? नक्कीच. मनात आणलं तर होऊ शकतं हे आणि शेवटी कितीतरी गोष्टी आपल्याच हातात असतात. नाही का? 

Wednesday, February 21, 2024

पाश



मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा त्याच्या जोडीदारासह अनपेक्षित पाऊल उचलतो.‌ दोघांच्या वागण्याने घरादाराची फसवणूक होते, घरातल्यांना समाजाला तोंड कसं द्यायचं हा प्रश्न पडतो. प्रेमाचे पाश या कुटुंबाला बांधून ठेवतात की ते पाश गळ्याभोवती आवळले जातात?

Sunday, February 18, 2024

महाभारताचं उत्तररामायण


मोठ्या उत्साहाने महाभारताच्या तयारीला लागलेल्या दिग्दर्शिकेला पांडव, कौरव, कृष्ण, द्रौपदी हे सगळे कलाकार मिळ्णं आणि तेही हातीपायी धड वाटतं तितकं सोपं रहात नाही. हाती आलेल्या कलाकारांना घडविताना, त्यांच्याकडून अभिनय करुन घेताना तालमीमध्येच या महाभारताचं उत्तररामायण घडतं  एकांकिका - महाभारताचं उत्तररामायण.


 कलाकार : संदिप केसरकर, पूर्वा केसरकर, श्रीकुमार डोंगरे, हर्षद साखळकर, अपर्णा साखळकर, संजय भस्मे, ऋत्विक जोगळेकर, गौरी गंधे, श्रीनिवास जोशी, विद्याधर कुलकर्णी, विजय दरेकर. 

 निवेदन: प्रशांत पै, सुधांशु गंगातीरकर, मोहना आणि ऋत्विक जोगळेकर.

Thursday, February 15, 2024

पोस्ट

पोस्टाचा कारभार आता कदाचित बदलला असेल पण काही वर्षांपूर्वी रत्नागिरीच्या पोस्टात आलेला हा अनुभव हलक्याफुलक्या शब्दांत.


Thursday, February 8, 2024

शोध

 



सुयश आजोळी येतो ते  कोकणातल्या अंगावर काटा आणणार्‍या गोष्टींचा अनुभव घ्यायचाच हे ठरवून. आजोबांच्या तोंडून ऐकलेल्या कथांची सत्यता त्याला पडताळायची असते. होते का त्याची इच्छा पूर्ण? जाणवतं का त्याला अस्तित्त्व अदुश्य शक्तीचं? 


Suyyash goes to his hometown to experience the chilling stories his grandfather told him.  Was he able to sense the spirits he heard? The story of searching.


लघुकथा - शोध

लेखन - वाचन - मोहना प्रभुदेसाई जोगळेकर

मुखपृष्ठ - अवनी किरकिरे (१३ वर्ष)

Sunday, December 24, 2023

कोणी गोपाळ घ्या - अमेरिकन शेजारी

 

खूप वर्षांनी जुनी चित्रिकरणं बघत होते आणि अचानक हे सापडलं. पर्णिकाच्या बारश्याला भारतातून कोणी visa अडचणींमुळे येवू शकलं नाही तेव्हा अमेरिकत आमचे  आई - वडिल म्हणून कायम पाठीशी असलेले मेरी आणि डेव्हिड आणि आमचे मित्र जेरी आणि टॅमी हार्वी चौघांनी कोणी गोपाळ घ्या, कोणी गोविंद घ्या पाठ करुन, करुन म्हटलं. आत्ता पाहिल्यावर गंमत तर वाटतेच पण एक - एक वाक्याचा या चौघांनी दिवस - दिवस केलेला सराव आठवून आमचे इथले सगेसोयरे होण्याची त्यांची आपुलकी मन हेलावून टाकते.

Tuesday, December 19, 2023

हृदयरोगतज्ञ(Cardiologist)

 व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो तसंच जाणिवांबद्दल. जाणिवांचे आयामही देशानुरुप वेगवेगळे असतात. याबद्दल बोलत आहेत शार्लटचे हृदयरोगतज्ञ समीर चौधरी!  भारतीय आणि पाश्चात्यांचा आरोग्याबाबतचा दृष्टिकोन, आरोग्यशिबिरात येणारे अनुभव तसंच शरीर आणि आजारांना रोजच्या व्यवहारातली उदाहरणं‌ देत त्यांनी आपल्याशी साधलेला संवाद. नक्की पाहा/ऐका.


Monday, November 27, 2023

वेषांतर एकांकिका

या एकांकिकेचा प्रयोग वेगळ्या संचात रॅले नॉर्थ कॅरोलायना येथे झाला तर काही वर्षांपूर्वी शार्लट आणि क्लिव्हलंड ओहायो इथेही आम्ही ही एकांकिका केली. लवकरच आणखी एक संस्था ही एकांकिका करणार आहे. भारतातल्या संस्थेनेही ही एकांकिका स्पर्धेसाठी करुन पारितोषिक पटकावलं. नक्की पाहा आणि अभिप्राय नोंदवा. अभिव्यक्तीचे सभासद झाला नसाल तर एकांकिका, मुलाखती, अभिवाचन ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी नक्की व्हा. इतरांनाही सांगा.


झलक






Monday, October 16, 2023

एका लग्नाची गोष्ट

 

झाले बुवा एकदाचे लेकाचे दोनाचे चार हात. लेकाने आम्हाला जेव्हा फोनवर लाजत लाजत सांगितलं, 

"आई तू माझ्या मागे लागली होतीस ना लग्न कर म्हणून... ऐकलं आणि हृदय थबकलं, धडधडलं, काय-काय झालं. तोंडून शब्दच फुटेना.

तो म्हणाला,

"लग्न म्हटलं की इतकी का घाबरतेस? मी छान पाकिस्तानी मुस्लिम मुलीशी लग्न करणार आहे." आता हृदय नाही तर कमीत कमी फोन तरी खाली पडायला हवा होता पण सगळं जागच्याजागीच राहिलं. मला ऐकलेले किस्से मात्र आठवले. मुलगी कोण वगैरे न विचारता आधी मी त्याला म्हटलं.

"रात्रीचा घराबाहेर पडू नकोस. दार नीट लाव." मुलाला यात आई काहीतरी वेगळंच बोलतेय असंही वाटलं नाही इतकं ते त्याच्या सवयीचं होतं. तो घाबरला नाही म्हणून मीच घाबरत म्हटलं.

"अरे, त्या मुलीचे भाऊ येतील तुला मारायला नाहीतर तिचे वडील गुंड पाठवतील."

"आऽऽऽई" हा स्वर म्हणजे वादळापूर्वीची शांतता.

"बरं मग तिला पण तेच सांगू का? तुम्हीपण पर्णिकाला नाहीतर गुंडांना पाठवणार आहात का?"

"आम्ही आणि पर्णिका काय 'तसले' वाटलो  काय?" विचारलं आणि लक्षात आलं आपण त्या कोणा मुलीच्या घरच्यांना ’तसल्या’ त टाकलं. मग मी त्याचं एकदम अभिनंदनच केलं. शिकली आहे ना त्याची खात्री केली कारण आमच्यावेळी आई-वडील असंच म्हणायचे, कोणीही आणा पण शिक्षण झालेलं असलं पाहिजे. विचारता विचारता अजून एक लक्षात आलं.

"अरे, ते लोक जबरदस्तीने धर्म बदलतात. तू तुझा धर्म बदललास तर आम्हाला मेलास." हे जरा नाट्यमय झाल्यामुळे नाटकाची तालीम असल्यासारखा प्रॉम्प्टर (मराठी शब्द?) म्हणजे नवरा ओरडला. 

"कोणी कोणाला मेलेलं नाही. होऊन जाऊ दे." मग आम्ही मुलीला भेटायला रवानाच झालो. सहा तास गाडी चालवत पोचलो, भेटलो. भावी सासु म्हणून तिच्यावर प्रभाव टाकायला एका घोटाऐवजी दोन घोट अमृत घेतलं आणि ते जे चढलं आणि तरुणांना लाजवेल इतका तरुणपणा माझ्यात घुसला त्यावरुन आमच्या सुनबाई सासुबाईंचा धसकाच घेणार की काय असं मी सोडून उरलेल्या ३ जणांना वाटलं.

आता ही तशी गुप्त गोष्ट होती. लेक जोपर्यंत मेहविशला मागणी घालत नाही तोपर्यंत चुपचाप. दोन - तीन वर्षांनी झालं, करशील का लग्न?, हो करेन प्रकार आणि आम्ही उत्साहाने सार्‍या जगाला सांगितलं. इथून पुढे खरं नाट्य. ३ वर्षात न पडलेले सारे प्रश्न इतरांना पडले, त्यांचे प्रश्न रोज एक या धर्तीवर ऋत्विककडे पोचले.

"अरे, निकाह असा होतंच नाही. कबुल, कबुल, कबुल म्हटलंस की झालास तू मुसलमान." लेकही आता या सार्‍याला सरावला असावा.

"आमचा काझी मॉडर्न आहे." आता ही काय स्पर्धा होती का पण मी म्हटलं 

"आमचे गुरुजी आयआयटीत शिकलेले आहेत (कापसे गुरुजी, बरोबर ना?)

"म्हणजे?"

"काळजी करु नकोस. धर्मांची सरमिसळ होऊ देणार नाहीत दोघं. घेतील ते काळजी."

"आई, काळजी मी करत नाही. तुझे मित्रमैत्रिणी, नातेवाईक करतायत." भानावर आणायला पुत्र तयारीत.

"तुझ्या मुलांची नावं काय ठेवणार?" लेक प्रश्नपत्रिका सोडवायच्या तयारीतच.

"आम्हाला मुलं होतीलच हे तुम्हाला काय माहित?" 

"आगाऊ, असं उत्तर पोचवू का?"

"बरं, पुढचा प्रश्न. मुलांच्या धर्माचं काय?" 

"असा प्रश्न विचारतात लोक?" त्याला आश्चर्यच वाटत होतं पण मला ज्या प्रश्नाचं आश्चर्य वाटत होतं तो मी त्याला आधी सांगितला.

"अरे, मेहविशचं नाव बदलणार का असंही विचारतायत."  

"आई, असल्या भानगडीत पडू नकोस हा. तिच तुझं नाव बदलेल." लेकाने सासु - सूनेचे प्रेमळ संबंध कसे ताणले जातील ते डोळ्यासमोर आणलं.

"अरे माझं नावपण बदलू दिलं नव्हतं मी. तिचं बदलायचा विचार करणारी मी कोण?" हे मी माझं मलापण विचारलं. उत्तर मिळालं नाही. कोणाची नावं आडनावं आपण बदलायची नाहीत एवढंच कळलं.

आता माझी मुसलमान मैत्रीण सरसावली,

"कबुल, कबुल, कबुल शिवाय निकाह होतंच नाही आणि ते म्हटलं की धर्म बदललाच..." मला एकदम मुलगा नमाज पढतानाच दिसायला लागला. मग सरसावून आम्ही मुलांच्या ’मॉडर्न’ काझीची मुलाखत घेतली. सगळं आलबेल असल्याची खात्री केली. मुलांनीपण आमच्या गुरुजींची मुलाखत घेतली. सगळं आलबेल असल्याची मेहविशची खात्री झाली. तरीपण निकाहच्यावेळी दोनचार गुप्तहेर ठेवायचे आणि कबुल हा शब्द ऐकला की.... इथे गाडी अडली. काय करायचं ते ठाऊक नव्हतं पण वेळ पडली तर गुरुजी आहेतच असा ’फक्त’ बायका करतात तसा फार पुढचा विचार करुन टाकला. नवर्‍याने नेहमीप्रमाणे उगाच फालतू गोष्टीत वेळ घालवतेस सूर लावला. 

तर अशा अनेकांना पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं सोडवत, कोणी कोणाचे धर्म न बदलता, नाव - आडनाव न बदलता ऋत्विक जोगळेकर आणि मेहविश जमाल बोहल्यावर चढले. चढताना बुरखा आणि मुंडावळ्या विसरले. बुरखा कोणालातरी आठवला म्हणून काहीक्षण आला, मुंडावळ्या पिशवतच राहिल्या तरी दोघांचे चार हात झाले. त्याला देशाच्या कानाकोपर्‍यातून आमचे आणि मुलांचे मित्रमैत्रिणी हजर राहिले, भारतातले आमचे नातेवाईक अगत्याने आले आणि हे कार्य सफळ संपन्न झाले. 


Monday, September 18, 2023

बातमी गोळीबाराची


बातमी गोळीबाराची
चुकचुकून नित्यक्रमाला लागण्याची
खात्री असते हे आपल्यापासून दूर असण्याची!
पण कधीतरी वेळ येतेच
सरावलेल्या मनाचा तोल ढवळून निघण्याची!

घडत होतं सारं लेकिच्या विद्यालयात
उज्ज्वल भविष्याच्या प्रांगणात!
डोळ्यासमोर जीव उभे
भितीच्या छायेत हादरुन गेलेले!
प्रांगणात पडलेले, घायाळ झालेले
मनाच्या, शरिराच्या चिंध्या उडालेले!
मिटून घेतले डोळे, खुपसलं डोकं तळव्यात
पोटच्या गोळ्याला जणू धरुन बसले हातात!

बातमी आली,
सगळ्या मुलांना खोलीत सुरक्षित बंदिस्त केल्याची
लेकरांचा जीव खोलीत कोंडून ठेवलेला, भितीने गुदमरलेला
पालकांचा  श्वास अडकलेला, लेकरांच्या जीवात गुंतलेला!

कितीतरी घरात ही अशी परिस्थिती
बाहेर विद्यालयाच्या गर्दी पत्रकारांची, पोलिसांची!
चर्चा सगळीकडे ’ब्रेकिंग न्यूजची’!
अक्राळविक्राळ होतो पोटातला गोळा
जेव्हा बळी पडतो प्राध्यापक लेकिला माहित असलेला! 

एक शिरशिरी उभ्या अंगातून
लेकीच्या भावविश्वाचा तडा घ्यावा कसा सांधून!
सुकून जातो गळ्यातला आवंढा
तरी वाटतं रडावं ढसाढसा
सगळं काही आलबेल, कळायला लागतात दोन तास
एकच गेला जीव या विचाराचा होतो अतोनात त्रास!
आपण काळजीने त्रस्त
लेक ओठ मिटून घट्ट!
वाट पाहायची तिने मोकळं व्हायची
मनातल्या भावना व्यक्त करायची! 

आणि...

पुन्हा एकदा त्याच जात्यातून तसंच धान्य दळलं जातं
पुन्हा मुलं कोंडली जातात, श्वास अडकतात!
फक्त होत नाही जिवितहानी
तेच समाधान बाळगायचं मनी!
यावेळी मात्र लेक बोलते
म्हणते, रोज मरे त्याला कोण रडे!
पण भिती आम्हाला खरंच वाटते
सावध राहायचा क्षीण येतो
कशाला गं माणूस असं करतो!

तीन तासांच्या अंतरावर असलेल्या
लेकराला मारावी वाटते घट्ट मिठी!
कुशीत ठेवावं अलगद जपून
द्यावं आश्वासन सुरक्षिततेचं भविष्याचे पंख छाटून!

कळत नाही कशी करावी ही वृत्ती नष्ट

अन पसरतील पंख मुलं निर्धास्त - मुक्त!


(पर्णिकाच्या महाविद्यालयात २८ ऑगस्टला आणि नंतर १२ सप्टेंबरला गोळीबाराच्या घटना घडल्या. मुलं अशा घटनांना तोंड देताना सावरल्यासारखी वाटत असली तरी त्यांच्या मनावरचं भितीचं सावट पटकन नाहीसं होत नाही आणि भावनिकदृष्ट्या त्यांना जाणवलं नाही तरी परिणाम होत असतातच. पर्णिका आणि तिथे शिकणार्‍या सर्वच मुलांचा विचार मनात येऊन उमटलेले शब्द)


Monday, June 12, 2023

किरण

 किरण! मूळ दक्षिण आशियातील देशांतील पण सध्या नॉर्थ कॅरोलायना राज्यात वास्तव्य असलेल्या आणि घरगुतीहिंसाचाराला बळी पडलेल्या व्यक्तींना मदत करणारी ही संस्था. या संस्थेत शार्लटची जान्हवी कुलकर्णी ही तरुण मुलगी काम करते. तिच्याकडून ऐकू तिला हे काम करताना आलेले अनुभव आणि संस्थेबद्दल माहिती.


किरण संपर्क:

फोन:  ९१९८३१४२०३
इमेल: kiran@kiraninc.org
संकेतस्थळ: https://www.kiraninc.org/

Kiran means 'ray of light'. Kiran  aim to illuminate, guide and instill hope in the lives of South Asian domestic violence victims all across North Carolina.

Kiran Contact:
Phone:  (919) 831-4203
Email: kiran@kiraninc.org
Website: https://www.kiraninc.org/


Tuesday, April 25, 2023

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आणि माझी मुलाखत

 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात माझा साहित्यप्रवास या विषयावर आकाशवाणी रत्नागिरीने घेतलेली माझी मुलाखत. जिथे काम केलं तिथेच मुलाखत देण्याचा अनुभव रोमहर्षी होता. नक्की ऐका ही मुलाखत.

दुवा: https://youtu.be/li4oLY1XMHQ


Tuesday, January 17, 2023

अभिवाचन/दृश्यकथन - दरी

अमेरिकेत अकल्पनीय गुन्ह्याची शिक्षा भोगून पंकज भारतात मुलीला भेटायला परततो. पंकजने त्याने केलेल्या कृत्याने मुलीचा ताबा गमावला. इतक्या वर्षांनी ती त्याला भेटेल? माफ करेल? तिला सत्य माहित असेल? बापलेकीच्या नात्यात पडलेली दरी तशीच राहिल की दूर होईल? ऐका/पाहा दृश्यकथन दरी.
सत्यघटनेवर आधारित अकल्पित घटनेने दुरावलेल्या बापलेकीच्या नात्याचा गुंता!
कलाकार - राहुल जोग, Kashti Shaikh कश्ती शेख, Rajendra Zagade राजेन्द्र झगडे, Mohana Joglekarमोहना प्रभुदेसाई जोगळेकर. काव्यस्वर - Deepti Oak-Dua दीप्ती ओक

जाहिरात
      Youtube दुवा
                                                                       

Monday, October 24, 2022

लेखन फराळ

 यावर्षी दिवाळी अंकातील माझ्या लेखनाचा फराळ. एकूण १० दिवाळी अंकात कथा, लेख आहेत. यावर्षी मला विशेष आनंद होतो आहे तो बालकथांचा. मी लिहिलेल्या बालकथांना माझ्या मराठी शाळेच्या (Online) विद्यार्थ्यांनी छायाचित्र रेखाटली आहेत.  

यातील काही अंकांचे विनामूल्य वाचण्यासाठी दुवे:

Marathi Culture & Festivals -  

https://www.marathicultureandfestivals.com/

बृहनमहाराष्ट्र वृत्त: 

https://bmmonline.org/vrutta-archive/2022-2/

१  आमचं दिनांक: अंतर्दाह कथा - एका तरुण मुलीच्या मनातील वादळ आणि तिच्याबरोबरच त्या वादळात झोडपून, तावूनसुलावून सुखरुप बाहेर पडलेल्या सर्वांच्या मनाचा अंतर्दाह 

२. पुढारी (कोकण): अमेरिकेत कोकण - अमेरिका हा ’मेल्टींग पॉट’ आहे त्यात असणार्‍या कोकणाबद्दल लेख.

३.  बृहनमहाराष्ट्रवृत्त: रोख -  देश सोडलेली ती जेव्हा आजारी वडिलांना भेटायला जाते तेव्हा नजरा आणि बोलण्यातून तिच्या अंगावर आदळणारा हा ’रोख’.

४. अनुराधा: - चुकामूक - बर्‍याच वर्षांनी भारतात गेल्यावर अचानक बालमित्राला भेटायची संधी मिळते खरी पण त्यातून निर्माण झालेला गोंधळ म्हणजे ही कथा.

५. रंगदीप: डॉ. गंगाधर मद्दीवार आणि सुरेखा मद्दीवार यांचं भारत आणि अमेरिकेसाठी योगदान अमोल आहे. त्यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून झालेली त्यांच्या कार्याची ओळख म्हणजे हा लेख.

६.सामना: वादळ - एका तरुण मुलाला त्याच्या जन्माचं रहस्य कळल्यावर गुप्तहेर नेमलेल्या मुलाची आणि स्वत:च्या जन्माचं रहस्य शोधता, शोधता त्याच्या हाती लागलेल्या वेगळ्याच गुपिताची ही कथा ’वादळ’.

७.शब्दरुची: दीपस्तंभ -  कोणाकडून कोणता धडा आपण शिकू ते कधीच सांगता येत नाही तसंच कोण, कोणाकडून प्रेरणा घेईल हेही. स्वत: प्रेरणा घेऊन आपल्यासाठी प्रेरणादायी काही    व्यक्तीमत्वांच्या रंजक कहाण्या म्हणजे हा लेख.

८.  अभिरुची: थोबाडीत - घरातली लहान मुलं मोठ्या माणसांचं बोलणं ऐकतात आणि काय होतं त्यावरची ही चिमुकली कथा. चित्र - कौशल दलाल.

९.   प्रसाद: भगदाड - आता मुलंच ती. काय करतील ते सांगता येत नाही. त्यातलंच हे भगदाड. चित्र - अवनी किरकिरे.

१०. मराठी कल्चर आणि फेस्टीवल - बेअक्कल: आता लहान मुलंच ती. कधीकधी वागणारच ना मनाला येईल ते. लगेच काय आम्हाच्या अकलेचे तारे काढायचे. चित्र - तेजल हिंगे.



Friday, July 15, 2022

आजोबा जेव्हा नातीला...

 आजोबा जेव्हा नातीला कामालाच लावतात तेव्हा काय होतं...


कृपया आमच्या वाहिनीचे सभासदही व्हा.



Tuesday, May 31, 2022

ओला

 "५१ रुपये झाले" रिक्षावाला म्हणाला. मी ५५ दिले आणि पुढचा सगळा गोंधळ म्हणजे तो विचारणार सुटे आहेत का, मी एक रुपया शोधायला सुरुवात करणार, एक रुपया सोडून बाकी सगळं पर्समधून बाहेर येणार आणि रिक्षावाल्याला अखेर दिले किती आणि परत घेतले किती या हिशोबाने डोक्याचा भुगा होणार, दोन दिवसांनी आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला हे लक्षात येणार त्यापेक्षा अतिशय हुशारीने ४ रुपये सोडून दिलेले बरे. मी निघाले तेवढ्यात तो म्हणाला,

"हे घ्या." त्याने ५ रुपये परत दिले आणि आधी मी पुण्यातलीच रिक्षा आहे ना या नजरेने रिक्षाकडे आणि नंतर त्याच्याकडे पाहिलं.
"थांबा असेल माझ्याकडे १ रुपया." आता मात्र पर्स उलटी करुन रस्त्यावर आतला माल पडला तरी रुपया काढायचाच होता मला. मी पर्स उलटीपालटी करायला लागले.
"ताई, पर्स सांभाळा आणि ठेवा तो १ रुपया. कधीतरी गिर्हाईकाला खूष करु दे की. आम्ही नेहमीच १ रुपया ठेवतो आमच्याकडे गिर्हाईकाचा. आज रिक्षावाल्याचा १ रुपया तुम्ही ठेवा." अत्यंत नम्र स्वराने तो म्हणाला आणि पर्सच्या ऐवजी पुणं उलटंपालटं फिरायला लागलं माझ्या नजरेसमोर. मी जी पळत सुटले ती जुनेपाने कपडे घालून बाहेर जायच्या तयारीत बसलेल्या नवर्यापुढे उभी राहिले.
घरातल्या सर्वांसमोर १ रुपया नाचवला. नवर्याला म्हटलं,
"काय, काय ग्रह करुन देतोस तू माझे पण बदललंय बरं इकडे सगळं. तू आधी कपडे काढ." त्याने एकदम संकोचाने सर्वांकडे नजर टाकली.
"अरे तूच मला सांगतोस ना भारतात गेलं की मळखाऊ, जरा जुने कपडे घालायचे म्हणजे आपल्याकडे फार पैसा नाही असं वाटतं पण त्यामुळे माझे आणि तुझे कपडे नवरा - बायको असल्यासारखे वाटतच नाहीत. लाज आणतोस बुवा तू. यापुढे असले प्रकार करायची काहीही गरज नाही. घाल तू नवे कपडे आणि चल माझ्याबरोबर." आता मात्र मला पुणं चढलंच. इथे आल्याआल्या मी परदेशीच असल्यासारख्या सर्वांनी केलेल्या सूचना आणि नवर्याने ठामपणे केलेली विधानं किती ’ही’ म्हणजे अगदीच बिनबुडाची आहेत हे सिद्ध करायला सज्ज झाले. कालच एक गोंधळ करुन हसं करुन घेतलं होतं पण आता नाही. म्हणजे काल काय झालं होतं,
"अहो, मीटर टाका की." असं रिक्षात बसल्याबसल्या पढवलेल्या पोपटासारखं मी म्हटलं. मी इथे नविन आहे हे कळता कामा नये म्हणून मला दिलेली सूचना होती ती पण त्या सूचनेने घात केला. तो म्हणाला,
"ओला केलीये तुम्ही. आता परत मीटर टाकू? "
"अच्छा, अच्छा. असं असतं होय." मी काहीतरी पुटपुटून वेळ मारुन नेली होती पण आता नाही. आज पुण्याचं रम्य दर्शन मला झालं होतं आणि ते तसंच आहे हे मला सिद्ध करायचं होतं. ओलाला बोलावून घेतलं. ओलावाला आला. नवरा मुकाट्याने गाडीत बसला. तो तसाच असतो नेहमी. त्यात मलाही बजावलेलं असतं. प्रवासात अमेरिका हा शब्द येऊ द्यायचा नाही पण ते तसं कधीही होत नाही. होतं काय, मला बोलायचं असतं त्यातही नविन माणसांशी बोलायला मला आवडतं. शेजारी नवरा जुना असतो त्यामुळे चालकाशी बोलणं अपरिहार्य असतं आणि मग कुठेतरी ’अमेरिका’ येतेच. आज मात्र मी बिनदिक्कत सुरुवात केली. तेवढ्यात त्याने विचारलं,
"दांडेकर पुलावरुन घेऊ का राजाराम?" खरंतर दांडेकर काय नी राजाराम काय दोन्ही सारखेच बाहेरगावच्यांना. पूर्वीही घरुन कुणीतरी पढवून पाठवलेलं एक उत्तर देऊन मोकळं व्हायचो आणि गर्दीमुळे रिक्षावाल्याने दुसरीकडून नेतो म्हटलं की बरं - बरं करत मान डोलवायचो. घरी आलो की या गल्लीतून, त्या गल्लीतून सांगता आलं असतं हे ऐकावं लागणार याची खूणगाठ बांधायचो. आज मात्र मी ओलावाल्याला उत्साहाने सांगितलं.
"न्या हो तुम्ही कुठूनही. इथलं कुठे काय माहित आहे आम्हाला. पुलाखाली नेऊ नका म्हणजे झालं." तोही यावेळचं गिर्हाईक उगाच काहीतरी अंदाजे ठोकून आपल्याला फसवत नाही म्हणून खूष झाला. कुठून - कुठून नेत राहिला.
हळूहळू ओलावाल्याला अमेरिका चढली आणि मला भारत. दे दणादण आम्ही ज्या देशात राहतो त्याबद्दल तक्रारी सुरु केल्या, देश कसा बदलता येईल याबद्दल तावातावाने मतं मांडली, एकदोनदा त्याने गचकन गाडी थांबवून बाहेरच्याला शिवीगाळ केली त्यात मीही सामिल झाले, राजकारण्यांनी त्यांच्याबरोबर आपलंही जीवन भ्रष्ट केलंय याची उदाहरणं एकमेकांना दिली, युक्रेन - रशिया संबंधात भारत - अमेरिकेचं काय चुकतंय याची गहन चर्चा केली. त्याच्यादृष्टीने भारत आता अगदी रसातळाला गेला आहे आणि माझ्यादृष्टीने अमेरिका. प्रवास संपत आला. गुप्तहेर असल्यासारखं आपण कोणत्या देशाचे आहोत याचा सुगावा लागू न देण्याची पराकाष्ठा इतक्या वर्षात प्रथमच करावी लागली नाही म्हणून कधी नव्हे ते मृदू हसून मी नवर्याकडे पाहिलं. ओलावाल्याचा निरोप घेतला.
नवरा उतरला आणि म्हणाला,
"मला तुम्हाला दोघांनाही काहीतरी सांगायचंय." ओलावाल्याला माझ्याबरोबर आणखी कुणीतरी होतं ते एकदम लक्षात आलं. तेवढ्यात नवरोजी म्हणाले,
"तुम्ही भारत सोडायचा विचार करा आणि तू अमेरिका. दोन्ही देशांचं भलं होईल." ओलावाला जोरात हसला आणि नवरा माझ्याकडे रागारागाने बघत १५०० रुपयांचे एकदम १९०० कसे झाले म्हणून वाद घालायला लागला.