Friday, December 7, 2018

जॉर्डन, इस्त्राइल आणि आम्ही

देश, शहरं पायी धुंडाळले की चांगले समजतात हा कधीतरी पाजलेला ’डोस’ मुलांनी आता आम्हाला पाजायला सुरुवात केली आहे. ती चालतात, नवरा त्यांच्यामागोमाग त्यांना गाठत राहतो आणि मी सर्वांना गाठण्यासाठी शर्यतीत भाग घेतल्यासारखी धावते. त्यामुळे दोन - एक - एक अशा क्रमात आमची चांडाळचौकडी इस्त्राइल, जॉर्डन, तुर्कस्थानात नुकतीच फिरुन आली. धावताना मला प्रत्येकवेळी फेसबुकवर जी मित्रमंडळी 5 k, 10 k असे चढत्या भाजाणीसारखे आकडे फोटोसह टाकत असतात त्यांची आठवण येत होती. कशाला त्या शरिराला इतकं दमवतात असं पुटपुटत पण त्यांच्याकडूनच स्फुर्ती घेत मी मुलांना गाठण्यासाठी पळापळ चालूच ठेवली. तीन देश असे फिरलो (धावलो) आम्ही ८ दिवसात. नशीब, शार्लटहून तिथे पोचायला विमान होतं!

मे महिन्यात लेकाने म्हटलं,

"इस्राइलला जायचं का?"

"कशाला? मरायला?" मी भेदरून विचारलं. पुढची १० मिनिटं  ऐकीव माहितीवर विधानं करायची नाहीत असं ऐकवण्यात आलं. मध्येच मी, मी तुझी आई आहे की तू माझा बाबा असं विचारून त्याला गोंधळवलं. पण गाडी पुन्हा मुद्द्यावर आणण्यात तो पटाईत.  बसल्याबसल्या इस्राइलबद्दल इतकं ऐकलं की त्याला म्हटलं,

"आता कशाला जायला हवं तिकडे?" त्याने फोनच बंद केला. पण हुकुमाप्रमाणे मी ’चालायला आणि सायकल हाणायला’ सुरुवात केली. मे महिना ते सप्टेंबर रोज. ऑक्टोबर महिना थंडी, थंडी करत वाचवला.  ८ दिवस होणारी तंगडतोड झेपायला हवी म्हणून प्रवासाच्या ६ महिने आधी दरवर्षी हे चक्र सुरू.  करता करता १४ नोव्हेंबर येऊन ठेपला.

दिवस पहिला: वॉशिंग्टन डी. सी. ते इस्तांबूल थेट विमान होतं.  पुढच्या २ तासाच्या विमानासाठी १० तास थांबणार होतो. त्यापेक्षा गाडीने पोचलो असतो या माझ्या वक्तव्यावर घरातल्यांनी फक्त नेत्रकटाक्ष टाकला. मुलगा म्हणाला,

"आई, आपल्याला दुसर्‍या गावाला नाही दुसर्‍या देशात पोचायचंय." तर काय झालं असं सवयीने येणारं वाक्य गिळलं आणि इस्तांबूल पालथं घातलं. फिरता फिरता प्रवासी कुठले ते ओळखून त्यांच्या भाषेत पुकारा करत खायला बोलावण्याची इथल्या माणसांची कुशलता अचंबित करत होती. नमस्ते, नमस्ते झालं तसं आम्हीही खूष होऊन आत शिरलोच. दर पाच मिनिटांनी आतून  मातीचं छोटं भांडं,  ठेवणी घेऊन कुणीतरी येत होतं.  ज्वाळेवर वर - खाली करत हातातल्या हुंडीचं  झाकण अलगद फोडून छोट्या मातीच्या भांड्यात शिजवलेली गरम गरम  भाजी ताटात ओतत होते.  आम्हीही तेच मागवलं. चविष्ट भाजी होती.

दिवस दुसरा: इस्तांबूलहून जॉर्डनला (अमान)  पहाटे पोचलो. डोळ्यावरची झोप उडवली उबर चालकाने. रस्त्यावर शुकशुकाट असला तरी गाडी जबाबदारीने चालवतोय म्हणेपर्यंत चालवता, चालवता त्याने आपला फोन काढला, फोन मांडीवर ठेवून, त्यात डोकं खुपसून गाडी चालवायला लागला. ’रस्ता समोर आहे, डोकं वर कर’ हे ’गूगल’ करून त्याला सांगेपर्यंत तो दिवा हिरवा असतानाच थांबला. दुसर्‍या दिवशी आम्हालाच गाडी चालवायची होती. या देशात हिरव्यावर थांबायचं की काय अशा प्रश्नचिन्हांकित चेहर्‍याने एकमेकांकडे पाहत राहिलो. चालकाचा चेहरा वर होईपर्यंत दिवा हिरव्याचा पिवळा, लाल आणि परत हिरवा झाला. अचानक  आमचा चालकही जागा झाला. सुटलाच मग तो. त्याने आम्हाला घरापाशी आणल्यावर आम्ही सुटलो. पैसे दिल्यावर सुटे पैसे काही त्याने परत केले नाहीत त्यामुळे एरवी सढळ हस्ते ’टिप’ देणार्‍या मुलाचं अमेरिकनत्व जागं झालं. आता मी नाही देणार त्याला आणखी पैसे असं छातीठोकपणे मराठीत त्याने जाहीर केलं. आपली भाषा दुसर्‍याला कळत नसली की पटकन परक्या देशात ’हुशार’ व्हायला होतं.

 संध्याकाळी गावात चक्कर टाकली. रस्त्यावर स्त्रिया फारश्या दिसल्या नाहीत. तिथल्या किल्ल्याकडे जाताना भाषेचा गोंधळ होताच. पण पोचलो. भारतीय म्हटल्यावर तिथे काम करणारे खूश झाले. हिंदी सिनेमाचे संदर्भ देत राहिले. कुणीही कुठून विचारलं की नवर्‍याचं सुरू, "मुळचे  भारतीय आता अमेरिकेत..." अमेरिकेच्या ’गन’ संस्कृतीवर ताशेरे ऐकल्यावर आम्ही त्याचं ’अमेरिका’ बंद करून टाकायचा प्रयत्न केला. पण तो दोन्ही देशाचा अभिमानी नागरिक त्यामुळे जिकडे तिकडे भारत - अमेरिका चालूच राहिलं. झालं असं, किल्ल्यावरून मशिदीत गेलो. मशिदीत प्रवेश करण्यासाठी दुकानातून जावं लागतं.  तिथे मशिदीत जाण्यासाठी स्त्रियांसाठी असलेला अबया घालायला लावतात, दूध नसलेला तरीही चविष्ट चहा अतिशय आग्रहाने पाजतात.  वस्तू बघता बघता एका तलवारी समोर आलो. विक्रेते दोन तरुण मुलं होती. कुठून आलात विचारल्यावर  भारत - अमेरिका झाल्याझाल्या तो मुलगा म्हणाला,

"तुमच्या देशात आमच्या तलवारींचा चांगला ’बिझनेस’ होईल. नाहीतरी सर्रास बंदुका वापरता तुम्ही." त्यानंतर असेच काहीतरी विनोद केले त्याने. कर्मभूमीची ही प्रतिमा पचवणं कठीण गेलं. शेवटी अमेरिकेची ही गंभीर समस्या आहे हे सांगितल्यावर त्या मुलांनी विनोद थांबवले. पण  त्या मुलांच्या मनातल्या अमेरिकेच्या प्रतिमेचं दर्शन दु:खदायक होतं.

दिवस तिसरा: भाड्याची गाडी करून पेट्राच्या दिशेने प्रवास. चार तासांचा प्रवास आहे. डेड सी बघायचा असल्यामुळे गावातून गेलो. नाहीतर तीन तासात पोचता येतं. गावातून म्हणजे अक्षरश: गल्लीबोळातून. अमान सोडल्यावर नंतर तर वाळवंटच. पहाटेची वेळ असल्यामुळे आमची एकमेव गाडी रस्त्यावर. डेड सी खरंच ’डेड’ होत चालला आहे. मिठाच्या लाद्या तयार झाल्या आहेत. त्यावरून आरामात चालता येत होतं. मिठागरच झालं आहे.  डेड सी ने निराशा केली. जितकं वाचलं, ऐकलं होतं तेवढं विशेष काही वाटलं नाही. पेट्राची रात्र मात्र रंजक ठरली. ज्याचं घर होतं त्याचा मेव्हणा गप्पा मारायला आला. तो बेडूविन जमातीचा. त्याने उत्साहाने त्याच्या लग्नाची ’स्टोरी’ सांगितली. १६ व्या वर्षी त्याने वडिलांना लग्न करायचं आहे हे आपल्या मनाचं गुपित सांगितलं. त्याला आवडणार्‍या मुलीच्या घरी या मंडळींनी जाऊन मागणी घातली. मुलीला द्यायची रक्कम मोठी होती. वर्षभर मुलगा पैसे जमवत राहिला. जेव्हा जेव्हा मुलीला भेटावंसं वाटायचं तेव्हा तेव्हा दोन्ही घरातली माणसं एका खोलीत जमत. दोघांनी सर्वांच्यासमोरच बोलायचं. वर्षाने लग्न झालं. ’स्टोरी’ संपवत म्हणाला,

"आता लवकरच दुसरं लग्न करणार आहे."

त्याच्या पहिल्या लग्नाच्या ’स्टोरी’ त आम्ही इतके गुंतलो होतो की दुसर्‍या लग्नाचा विचार मानवेना. बोलणंच खुंटलं. तसं उठता उठता सकाळी नाश्ता करून द्यायचं कबूल करत तो गेला. ठरल्याप्रमाणे सकाळी ७ वाजता येऊन त्याने चविष्ट नाश्ता केला. शाकशुक नावाचा पदार्थ, ऑलिव्ह्ज, हमस आणि नान. नान सगळीकडे गार द्यायचे. सांगितल्यावर गरम करून दिलं. भारतीयांना चहा आवडतो म्हणून त्याने आमच्यावर बिनदूधाच्या चहाचा माराच केला. पण मन लावून खाऊ पिऊ घातलं.  नाश्त्याने तृप्त होऊन पेट्रा पाहायला बाहेर पडलो. बाहेर पडताना खिडकीतून पाहिलं तर सगळीकडे बैठे एकावर एक ठेवल्यासारखे ठोकळ्यासारखे दिसणारे डोंगर. छायाचित्र काढली पण प्रत्यक्ष दिसतात तसे फोटोत नाही येत.

दिवस चौथा: पेट्रा सुंदरच आहे. निवांत फिरायचं असेल तर हातात दोन - तीन दिवस हवेत . दगड कोरून बांधलेलं हे पुरातत्त्व वास्तुकलेचं उत्कृष्ट दर्शन आहे.  आम्ही एकच भाग केला. जाऊन येऊन तीन तासांच्यावर पायपीट. एवढं केलं तरी पूर्ण पेट्राच्या बांधणीची कल्पना येते. घोड्यावरून गुहेच्या दारापर्यंत जाता येतं. पुढे बग्गीतून. साधारण तासाभराने ट्रेझरीची इमारत लागते. त्या पुढे गाढवांची सत्ता. असं का या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळालं.  आतमध्ये एक दोन ठिकाणी खायची प्यायची व्यवस्था आहे. त्या मालकाशी गप्पा मारल्या. त्यावरून समजलं की  आताचं पेट्रा हे बेडूविन जमातीचं निवासस्थान. इथल्या गुहांमध्येच ते राहत. पेट्रा पर्यटनस्थळ करायचं ठरल्यानंतर या जमातीला उदरनिर्वाहाचं साधन म्हणून इथेच काम किंवा व्यवसाय करण्याची मुभा दिली गेली. राहण्यासाठी स्वतंत्र वस्ती उभारली गेली. यामुळेच जॉर्डन सरकारच्या हद्दीत घोडा आणि बग्गी तर पुढे गाढव असा नियम आहे. हे सांगतानाच त्याच्या गुहेत सलमानखानच्या चित्रपटाचं चित्रीकरण झालं, तो इथे राहायला होता वगैरे माहिती  त्याने दिली. आम्ही काही धन्य धन्य होऊन फोटो काढले नाहीत त्या जागेचे. कदाचित नाट्यकलावंत किंवा लेखकाचे पाय त्या जागेला लागले आहेत हे कळलं असतं तर काढले असते :-). गाढवावर बसा म्हणून कुणी मागे लागलं नाही पण घोडेवाल्यांनी मात्र पिच्छा पुरवला. आणि गिर्‍हाईक पकडण्यासाठी आपापसात हुज्जतही घातली.

दिवस पाचवा: पेट्रापासून  दोन तासाच्या अंतरावर वादीरम.  वाळवंटातल्या मोकळ्या रस्त्यावर गाडी चालवताना आपण चित्रपटात एकच गाडी वाळवंटातून बराचवेळ मार्गक्रमणा करताना बघतो तसंच वाटत होतं. गाडीसमोर एक उंटही डुलत डुलत आला. आमचं आश्चर्य ओसरुन फोटो काढायचं सुचेपर्यंत त्याने रस्ता ओलांडलाही. वादीरमचं सौंदर्य अविस्मरणीय आहे. नजर टाकू तिकडे लालसर रंगाची वाळू, वाळूचे डोंगर आणि प्रचंड मोठाल्या शिळा. सुरुवातीला उंटावरून सैर केली. आधी उंचाला उंट धप्पकन खाली बसला तरी तो उंचच होता. कसंबसं त्याच्या पाठीवर स्थानापन्न झाल्यावर असा काही उठला की तोल सावरता सावरता मुष्किल. मुलाचा उंट तर इतका खादाड की जरा काही त्याला  हिरवं दिसलं की थांबलाच. मुलगा आपल्यासारखाच आणखी एक प्राणीही आहे म्हणून खूष झाला. माझा आणि मुलीचा उंट एकामागोमाग होते. माझा उंट सारखा मुलीशी ’लगट’ करे. त्याची लगट आणि तो बाजूला व्हावा म्हणून माझा आरडाओरडा एकाचवेळी चालू होता. मुलगी उतरुन चालायला लागेल की काय असं वाटायला लागलं. त्यात कुठल्या भाषेत आरडाओरडा केला की उंटाला आणि त्याच्या माणसाला कळेल हा प्रश्न होताच. घाबरुन उंट पळत सुटला तर काय घ्या. शेवटी सहस्त्र खाणाखुणा आणि वेगवेगळ्या उच्चारात तेचतेच उंटवाल्याला न कळणारं बोलत राहिले. अखेर त्याचा बंदोबस्त झाला. त्याची दोरी अधिक गुंडाळली  आणि उंटाचं  तोंड मुलीच्या आसपास पोचेनासं झालं. उंटावरुन उतरल्यावर  जीपमध्ये. बर्‍याच ठिकाणी भल्या मोठ्या शिळा चढायच्या होत्या, अरुंद खडकांवर पाय टाकत डोंगरांचं टोक गाठायचं होतं. निमुळत्या फटींमधून देह आत सरकवायचे होते. बर्‍याच कसरती पार पाडल्या. रात्री मुक्कामासाठी तंबूत, तिथेच कापडी भोजनालयात वाळूत भट्टी पेटवून केलेल्या जेवणावर सर्वांनीच ताव मारला. जेवण, गप्पा आणि हुक्का. रात्री इतर काहीच उद्योग नसल्याने भोजनालयाचं विश्रांतीगृह झालं.  नॉर्वे, जपानहून आलेल्या लोकांशी गप्पा झाल्या. पण बरेचसे हुक्कातच गर्क होते. आम्ही आपले चहा रिचवत होतो.

दिवस सहावा: वादीरमहून इस्राइल. पुन्हा वाळवंटच. वाहतूक जवळवळ नाहीच. मी गाडी चालवायला लागल्यावर वाटेत लागणार्‍या लहान गावातल्या नजरा आश्चर्याच्या होत्या.  आकाबाला  गाडी परत केली. आकाबा मोठं शहर आहे. गाडी परत करून पायी समुद्रावर चक्कर मारून आलो. तिथून इजिप्त, सौदी आणि इस्राइल  असे समुद्रापलीकडे असलेले तीन देश दिसतात. ज्यांच्याकडून गाडी भाड्याने घेतली होती त्यांनी जॉर्डनच्या हद्दीशी सोडलं. जॉर्डनमधून इस्राइलमध्ये प्रवेश. इस्राइलमध्ये गेलात तर अरब राष्ट्रात प्रवेश नाही या अरब राष्ट्रांच्या खाक्याला प्रत्युत्तर म्हणून इस्राइल पासपोर्टवर  शिक्का न मारता एक कागद हातात ठेवतात.

दिवस सातवा: इस्राइलमध्ये तेलवीवला आलो. बाहेर पडल्यावर तिथली हसतमुख कर्मचारी मदतीला तत्पर होती. उबर न करता त्यांचं तिथलं अॲप डाऊनलोड करायला लावून तिने टॅक्सी बोलवायला लावली. टॅक्सीलासुद्धा तिने ती उभी होती तिथपर्यत यायला लावलं. ती आम्हाला तिथून हलूच देत नव्हती. सुरुवातीला मदतीचा प्रयत्न वाटला पण नंतर तेच वागणं खटकलं. शेवटपर्यंत कारण कळलं नाही पण सुरक्षितता हे कारण असावं.  तेलवीववरुन जेरुसलम. धार्मिक स्थळ.  भक्तांची गर्दी अतोनात तेवढीच बंदूकधारी सैनिकांचीही. रस्त्यावर, लोकल, मॉल सर्वत्र. २० - २५ वर्षाची सैन्यातील मुलं - मुली बंदूक (स्टेनगन्स) घेऊन वावरताना पाहिलं तेव्हा सुरुवातीला विचित्र दडपण आलं मनावर. उगाचच कुणी हल्ला तर करणार नाही ना अचानक या दृष्टिकोनातून माझीच टेहळणी सुरू झाली. पण काहीवेळातच बंदूकामध्ये वावरायची  ’सवय’ झाली.

’वेस्टर्न किंवा वेलिंग वॉल’ हे ज्यू लोकांचं प्रार्थनास्थळ आहे. स्त्रिया आणि पुरुषांसाठी दोन वेगवेगळे भाग आहेत. अंगभर कपडे असणं आवश्यक आहे. भिंतीवर डोकं टेकून लोक इथे रडतात ते रोमनांनी ’टेंपल’ उद्धस्त केल्याचा निषेध म्हणून. तसंच आपल्या इच्छा लिहिलेल्या चिठ्ठ्या भितींतल्या फटीत लोक ठेवतात. याच आवारात असलेलं ज्यू आणि मुस्लिम लोकांचं ’टेंपल माऊंट/डोम ऑफ रॉक’ बाहेरुनच बघता येतं मुस्लिमाखेरीज इतर धर्मीयांना आत प्रवेश नाही.  आम्ही सहज एका स्थानिक जोडप्याला आत जाण्यासाठी काय करावं लागेल विचारलं. दोघांमधला पुरुष आत जाता येणार नाही यावर ठाम होता तर स्त्री अशा निर्बंधांना काय अर्थ म्हणून त्याच्याशी वाद घालत होती. अर्थात नियमापुढे ती काय करणार? पण दोघांच्या मनोवृत्तीतला फरक पाहताना गंमत वाटली. हा सगळा भाग फिरून झाला की बाजारातच बाहेर पडायला होतं. तिथेही जागोजागी बंदूकधारी सैनिक.  जेरुसलमहून पॅलिस्टाईनची हद्द अवघी अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे.  पॅलिस्टिनियन सतत हद्दीवरून दगडफेक करत असतात असं ऐकलं. आम्ही सगळा धोका पत्करून जायचं ठरवलं. पॅलिस्टाईनियनना जेरुसलममध्ये सहजासहजी येता येत नाही. फक्त शुक्रवारी त्यांना जेरुसलममध्ये येता येतं. पण जेरुसलमहून तिकडे जाणार्‍या गाड्या सारख्या सुटत असतात. गाडी खचाखच भरलेली होती. रस्त्यावरही तोबा गर्दी वाहनांची. पुण्याची आठवण झाली. आम्हाला जेमतेम निम्मं अंतर जायलाच २ तास लागले. अजून दोन तास पोचायला लागतील असं बसमध्ये कुणीतरी सांगितलं. परत येताना ’तपासणी’ चक्र असणारच होतं. सगळा विचार करून आम्ही अर्ध्यावर उतरून हळहळत परत फिरलो.

दिवस आठवा: परतीचा. तेलवीव ते इस्तांबूल, इस्तांबूल ते वॉशिंग्टन डी. सी. डी. सी. ते शार्लट.

गाडी चालवताना आठ दिवस पुन्हा पुन्हा शब्दांतून रंगत होते. ठिकाणं, माणसं, खाणं... वेगवेगळे अनुभव पोतडीत जमा झाले. आमच्यासारख्या खादाडखाऊ लोकांची या देशात मजा आहे.  चिकन श्वॉरमा, बाकलावा, मलाबी, शाकशुक एक ना अनेक.  परत येताना पुढच्यावेळेला कोणत्या देशात जायचं  आणि काय खायचं याबद्दल चर्चा रंगली आणि  या प्रवासाची सांगता झाली.

























Tuesday, November 13, 2018

दुकान, गिरण आणि...

अनुराधा २०१८ दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध
काटकुळ्या शरीरयष्टीचा त्रिंबककर पिशवी हलवत बाजारातून साहेबांच्या घराकडे निघाला. रस्त्याच्या कडेने सवयीने अंग चोरत तो पावलं टाकत होता. चालता चालता ’थूऽऽऽ...’ विचित्र आवाज करत पान कोंबलेल्या तोंडानेच तो रस्त्याच्या बाजूला थुकला. त्याचे एक दोन थेंब फाटक्या विजारीवर उडाले. त्याला दु:ख झालं. घरी गेल्यावर कैदाशीण जिवंत ठेवणार नाही याची त्याला खात्री होती. थुकी लावून ते छोटे ठिपके त्याने घालवायचा प्रयत्न केला पण विजार आणखीनंच रंगली. काय करावं ते त्याला कळेना तितक्यात कुणीतरी त्याच्या पाठीवर जोरात थाप मारली. त्याचं बारकुळं शरीर हादरा बसल्यासारखं डळमळलं. कसाबसा त्याने तोल सांभाळला. पुढे आलेले दात दाखवत वर्दमशी तो दोन शब्द बोलला आणि मार्गाला लागला. साहेबांची बायको त्याच्या बायकोच्या वरताण होती. उशीर झाला भाज्या आणायला तर उशीराबरोबर तिने त्याचं अजागळासारखं राहणं, सतत पान खाणं, त्याच्यावर होणारा खर्च, आजार सगळी जंत्री लावली असती. आणि साहेबांची हरामखोर कार्टी आणि तिच्याबरोबरची  क्वार्टर्समधली माजोरडी पोरं; त्याला ठाऊक होतं त्याची पाठ फिरली की सगळीच त्याच्या दुडक्या चालीची खिल्ली उडवतात. त्याची मुलं असती तर तुडवून काढलं असतं त्याने. तो भराभर पाय उचलायला लागला.  साहेबांच्या घरी भाजीची पिशवी आपटली की घरी जाता येणार होतं. वाटेत एक दारुची बाटली ढोसली की झालं. भाजीच्या पैशातले तसे त्याने बरेच पैसे ढापले होते. त्या पैशातून पहिल्या धारेची घेता आली असती.  मळकट लेंग्याच्या खिशात हात घालून त्याने नोटा चाचपडल्या आणि बंगल्याच्या दिशेने तो चालत राहिला. बंगल्यावर पोचल्यावर साहेबांच्या बायकोने तोंड सोडलंच,
"त्रिंबककर, किती वेळा सांगितलं भाजी निवडून घ्यायची. कुसलेली आहे सगळी." त्रिंबककर रंगलेले दात दाखवून ओशाळवाणं हसत राहिला. खरं तर त्याला म्हणावंसं वाटत होतं, ’अगं बये, तू कर  बाजार इतकी मस्ती असेल अंगात तर. तुजा घोव सरकारचा नोकर, मी त्येचा. पन घरगड्यागत राबवते तू मला महामाये.’ पण नेहमीप्रमाणे त्रिंबककरने ते शब्द मनातल्या मनात गिळून टाकले. त्याचं सगळं लक्ष खिशातल्या नोटांकडे लागलं होतं. एकदा दारुची बाटली तोंडाला लागली की त्याचा जीव शांत होणार होता.

साहेबांच्या घरातून बाहेर पडायला सात वाजले. दिव्यांच्या अंधुक प्रकाशात रस्ता पिवळसर दिसत होता. नगरपरिषदेचा भोंगा वाजायला लागला तसा त्रिंबककर वैतागला. काय सारखा ठणाणा बोंबलतो हा भोंगा. तो मनातल्या मनात कुरकुरला. त्याने पुन्हा एकदा पैसे चाचपले.  साटम दिसल्या दिसल्या धूळ झटकत लेंग्याला हात पुसून तो पारावर साटम शेजारी बसला.
"बाटली आन्लीस का?" बसल्याबसल्या त्याने कुजबूजल्यासारखं विचारलं.
"आनली. तीस दे."
"इतकं न्हाईत." त्रिंबककरने दहाच्या दोन नोटा त्याच्या हातात कोंबल्या. साटमने त्रिंबककरला देण्याआधी बाटली तोंडाला लावली. पाव बाटली संपवल्यावर त्याने ती त्रिंबककरच्या हातात ठेवली. त्रिंबककर खिक्ककन हसला.
"दहा रुपयाची नरड्याखाली घातलीस नव्हं. तिच्यामारी." पण दारु प्यायला कुणीतरी बरोबर आहे यामुळे तो खूश होता. दोघं सुखदुखा:च्या गोष्टीत रंगून गेले. सायबाच्या घरात त्याच्या बायकोने सर्वांना कसं ताब्यात ठेवलंय हे सांगताना त्रिंबककरला हसू आवरत नव्हतं. साटमने सुद्धा बिगारीची कामं करणारी भिकू सातपुतीण कंत्राटादाराला ’लागू’ आहे याचे असंख्य पुरावे दिले. बायकांना वेळीच आवरलं नाही तर त्या मोकाट सुटतात यावर दोघांचं एकमत झालं. दोघंही आपल्या बायकांना आपण कसं त्याब्यात ठेवलं आहे याबद्दल बढाया मारत राहिले ते साटमची बायको तिथे येईपर्यत.
"मुडदा बसवला मेल्या तुजा. गिलायचं हाय का न्हाय? कोन आननार रं बाजार आजचा?..." पारावर बसलेल्या टोळक्याच्या नजरा त्या तिघांच्या दिशेने वळल्या. बायकोची टकळी थांबणार नाही हे ठाऊक असूनही साटम तसाच बसून राहिला. साटमच्या बायकोचं डोकं फिरलंच. तिने त्याच्या हातातली बाटली हिसकावली आणि तिथेच पारावर आपटली. साटम लगबगीने उठला. बाटलीतली दारु आधीच संपविल्याचा त्याला आनंद झाला. त्याच्या चेहर्‍यावरची सार्थकता त्रिंबककरने ओळखली. त्याने तोल सांभाळत उठलेल्या साटमकडे मिश्किल नजरेने पाहिलं. त्यांची नजरानजर साटमच्या बायकोने पकडलीच. तिने त्रिंबककरकडे जळजळीत कटाक्ष टाकला. त्रिंबककरने मान खाली घातली.
"चला..." ती साटमवर खेकसली. ती पुढे, आणि तिच्या मागे भेलकांडत जाणार्‍या साटमकडे पाहत पारावरच्या टोळक्याची  थोडावेळ करमणूक झाली. त्रिंबककरही पाय हलवत तिथेच बसून राहिला ते त्याचा मुलगा येईपर्यंत.
"बाबा, आई वाट बघतेय केव्हाची." स्वत:ला सावरत त्रिंबककर कसाबसा उठला. राजेश आला की त्रिंबककरला धास्तावल्यागत होई. मुलाची सरबत्ती सुरु होण्याआधीच ताठ उभं राहण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला,
"शान्यसारकं वागायचं. व्हय ना? आता वागनार हाय मी शान्यासारका."  तोल सावरत, दात दाखवत, लटपटत तो राजेशबरोबर चालायला लागला. "दारु पियाची नाय, व्यसन हाय ते. मानूस मरतं. आनि परमानिक आसलं की टाईम लागला तरी सगलं चांगलं व्हनारच. व्हय ना? माजी गिरन व्हनार, दुकान बी व्हनारच." त्रिंबककरचं बरळणं चालूच होतं. "बाला, ए बाला,  तुला तुजा मास्तर ना कायबी सिकवतो. फकस्त वंगालच व्हतं परमानिक मानसांचं."  चालता चालता राजेशच्या हातातला हात सोडवायचा त्रिंबककर प्रयत्न करत राहिला. पण राजेशची पकड घट्ट होती. चाळीपाशी आल्यावर राजेशनेच त्रिंबककरचा हात सोडला. रॉड्रीक्सच्या चाळीत कालवणाचा घमघमीत वास पसरला होता. त्याची भूक चाळवली. आत जाऊन त्याने फतकल मारली. बायकोने त्याच्यापुढे ताट आपटलंय हेही त्याच्या लक्षात आलं नाही.  तो बकाबका खात सुटला. आता यापुढे एकही घास खाता जाणार नाही हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याचं लक्ष सुका भात चिवडणार्‍या दोन्ही मुलांकडे आणि बायकोकडे गेलं. तो ओशाळला.
"तुमचं जालं नवतं व्हय." तो दात दाखवत हसत म्हणाला. त्रिंबककर कसाही हसला तरी ते केविलवाणंच वाटायचं.  धर्मेन्द्र त्या हसण्याने वैतागला.
"कदीच कसी आमची प्वाटं दिसत न्हाइत रं तुला?" केसाची झुलपं वाढवलेल्या धर्मेन्द्रकडे त्रिंबककर पाहत राहिला. ’आक्सी धरमिदंरवानी दिसतु लेकाचा.’ त्याला कौतुक वाटलं.  त्याच्या तरुणपणी टुरींग टॉकीजमध्ये जाऊन राजेश खन्ना आणि धर्मेन्द्रचे पिक्चर पाहायचा तो. एकदोन वेळा त्याने आपल्याला त्यांच्यासारखंच बनायचंय असं त्याच्या मित्रांना बोलूनही दाखवलं होतं. त्यावरुन कितीतरी दिवस त्याला सगळे चिडवायचेही. पण धर्मेन्द्र व्हायला नक्की काय करायचं ते ठाऊक नव्हतं त्यामुळे त्याने तो नाद सोडून दिला होता. मुलं  झाल्यावर मात्र त्याने राजेश आणि धर्मेन्द्र नावं ठेवली मुलांची.
"तू  धरमिंदरवानी दिसाया लागला रं." कौतुकाने तो म्हणाला.
"उगाच चढवू नका बाबा त्याला." राजेश वैतागला.
"तू गप रे. सालत जातो तर लइच सिकवायला जातो सारका." धर्मेन्द्र खेकसला. राजेशने दुर्लक्ष केलं.  त्रिंबककरच्या मनात काहीतरी घोळत असावं. तो धर्मेन्द्रला म्हणाला,
"तुजी साला न्हाय ना. मग उद्या सायबाकडं कामाला ये माज्याबरुबर. जादाचं काम हाये उद्याच्याला." धर्मेन्द्रने नकारार्थी मान हलवली.
"तू सालंत जातोस म्हनून इचारत नाइ मी. पण तू जमवसील का?" राजेशला नाही म्हणावंसं वाटत होतं. उत्तर न देताच तो पानावरुन उठला. त्रिबंककर त्याच्याकडे पाहत पुटपुटला.
"इचित्रच हाय हा पोरगा. सायबाकडं चल म्हटलं की टकुरं पिरल्यागत करतो." पिरताला राजेशच्या मागून उठून जावंसं वाटत होतं पण ताटातला उरला सुरला भातंही त्रिंबककरच्याच पोटात जाईल या काळजीने ती उठली नाही.

स्वयंपाकघरातल्या ट्रंकेवर बसून राजेश विचारात गढला. साहेबांच्या घरी कामाला जाणं म्हणजे संकट वाटायचं त्याला. बागेची, माळ्याची स्वच्छता, फांद्या कापायच्या असं काही ना काही काम असायचं. त्रिंबककरला मदत करायची त्याची तयारी होती पण साहेबांची मुलगी त्याच्याच वर्गात होती आणि साहेबांच्या बायकोचं अतिकौतुक त्याला अजीर्ण व्हायचं. राजेश परिस्थिती समजून घेऊन कामं करतो आणि आपल्या लेकीला कशाची किंमत नाही हे उगाळत राहणार हे ठरलेलं. दोघं कानकोंडे होऊन जात. पण बाबांना नाही म्हणणंही नको वाटत होतं. चार पैसे हातावर टेकवत होती साहेबांची बायको, झालंच तर आईसाठी एखादी जुनी साडी मिळेल हे  ठाऊक होतं राजेशला. हे सारं, तिचं उतू जाणारं कौतुक टाळायचं म्हणून नाकारायचं का आतापर्यंत दाखवला तसा कोडगेपणा दाखवायचा? काही झालं तरी त्याला आता लवकर  मोठं व्हायचं होतं. परिस्थितीपासून सुटका करुन घ्यायची होती. स्वत:ची, जमलं तर घरातल्या सगळ्यांची. नाहीतर फक्त त्याची आणि आईची तरी. दारुड्या बापाबद्दल त्याला आस्था नव्हती आणि मटक्याचा नाद लागलेल्या धर्मेन्द्रपुढे त्याने हात टेकले होते.  तो विचार करत बसून राहिला. तेवढ्यात धर्मेन्द्र समोर येऊन उभा राहिला.
"तू बस  बेवड्याबरोबर  फालतू कामं करत. दुकान आनि गिरन टाकायची हाय त्येला. पैका लागतो त्ये ठाव हाय ना? मी मटक्यात पैका मिळाला की चाललो मुंबयला. खरा धरमिंदर व्हतो की नाय बग."
"जा." रुक्ष स्वरात राजेश म्हणाला.
"राजेस, या सिक्सनाने तुजं काय बी भलं व्हनार न्हाय. दहावी पास ला कोन नाय इचारत."
"मी पुढे शिकणार आहे."
"पैका लागतो. हाय का तो आपल्याकडे. बगू. हात पुडं कर."
"नाही." धर्मेन्द्रने त्याचा हात ओढलाच. काही कळत नसतानाही राजेशच्या हातावरच्या रेषा निरखीत तो म्हणाला,
"वंगाल हाय तुजं नसीब. दरिद्री बापाच्या पोटी जलमलास आनि  इमलं बांदतोय सायेब व्हन्याचे."
"धर्म्या, तू जरा नीट बोल रे. पाचवीपर्यंत शिकलायस ना? काय ही भाषा."
"गप ए. उचकवू नको हा मला. मी कसाबी बोलन. तू न्हाय मला सिकवायचं.  समजलं ना." धर्मेन्द्रच्या मग्रुरीने राजेश वैतागला.
"पुरे मग. बोलूच नकोस काही. बाबांच्या पण डोक्यात असंच खूळ होतं नट व्हायचं. जे त्यांनी केलं तेच तू करु नकोस धर्म्या. डोळे उघड. कामाला लाग." धर्मेन्द्र खी खी करुन हसला. बाजूलाच भिंतीला टेकून त्यांचं संभाषण ऐकणार्‍या पिरताचं मस्तक फिरलं.
"टकूर्‍यात हानीन हा धर्म्या. राजेस सांगतोय ते घे मनावर. रस्त्यावर चल खडी टाकायला. मुकादमाशी बोलते मी. नट व्हायाचं म्हनं. तो येडा बग.  नट व्हनार व्हता. दारुड्या जाला आनि सगल्या आयुक्शाचा पिक्चर केला मुडद्यानं. आता गिरन खोलनार आनि दुकान चालवनार म्हनत गावभर फिरत असत्यो." पिरताची बडबड चालूच राहिली.  त्रिंबककर खोलीत डोकावला तसं दारुच्या भपकर्‍याने त्या एवढ्याशा खोलीला विळखा घातला. धर्मेन्द्रने नाकावर हात धरला. त्रिंबककरने त्याच्या नाकावरचा हात बाजूला ओढला.
"बापाला हिनवतोस? साल्या, एक दिवस तुजा बाप पैक्याची पोती आनल. माज नाय करायचा. समजलं काय? मा - ज करायचा नाय. दुकान जालं की सेट व्हसील तू. गिरनपन आसल." त्रिंबककरच्या तोंडातून शब्द धड बाहेर पडेनासे झाले तसं नाईलाज झाल्यागत तो आडवा झाला.  तिघंही त्या खोलीतून बाहेर पडले. बाहेरच्या खोलीत संतरजी घालून अंग टाकलेल्या तिघांना त्रिंबककरच्या घोरण्याच्या आवाजात कधीतरी झोप लागून गेली.

जड झालेलं डोकं कराकरा खाजवीत त्रिंबककर उठला. राखुंडीने दात चोळता चोळता त्याचं  विचारचक्र चालू झालं. वैतागला होता तो या आयुष्याला. कसलं सालं आयुष्य हे? नट होता आलं नाही. आता हे कुत्र्यासारखं जीणं. कशाला? कुठूनतरी पंचवीस हजाराची व्यवस्था व्हायला हवी. किराणामालाचं दुकान टाकायचं.  शेठसारखं बसायचं. मुलं आणि बायको पण दुकानातच काम करतील. बाजूला गिरण. बास. आता हेच करायचं. पैशाची व्यवस्था करायची आणि मग राजावाणी जगायचं. खळखळून चूळ भरताना मनातल्या या विचारांनी त्याला ताजतवानं केलं.
"चला." राजेश तयार होऊन उभा होता.
"कुटं?" त्रिंबककरने आश्चर्याने विचारलं.
"साहेबांकडे. काल म्हणाला होता ना तुम्ही." त्रिंबककर एकदम भानावर आला.
"हा. हा ते होय. सालंत न्हाय जायाचं का तुला?"
"काम झालं की तिकडूनच जाईन." काही न बोलता दोघं निघाले. वाटेत त्रिंबकरला राहवलं नाही. त्याने दुकान, गिरण सगळे बेत राजेशला पुन्हा सांगितले.
"आपन लइ गरीब मानसं पन सपान बगायला  पैका नाय पडत." केविलवाणं हसून त्याने पुस्ती जोडली. राजेशला गहिवरुन आलं.
"कधीतरी आपलं स्वप्न पूर्ण होईल. स्वप्नं पाहणं जसं आपल्या हातात असतं तसंच पूरं करणंही. नेकीने काम करत राहिलं की पाहिजे ते मिळतं बाबा. दारुचा नाद सोडा तुम्ही तरच या स्वप्नांना अर्थ आहे..." त्रिंबककरला राजेश काय बोलतोय ते पचवणं जड गेलं. पण नेहमीसारखंच काहीतरी भारी बोलला असणार पोरगा याची त्याला खात्री होती. त्याच्या दुडक्या चालीत उत्साह संचारला. दोघंही आपापल्या बेतांची मनात उजळणी करत साहेबांच्या घरी कामं करत राहिले. राजेशला साहेबांच्या मुलीची चाहूल लागली की थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं पण ती तिच्याच नादात होती. शाळेतही कधी तिने कुणाला सांगितलं नव्हतं तो त्यांच्या घरी कामाला येतो ते. आता फक्त तिच्या आईचं व्याख्यान नको अशी मनोमन प्रार्थना केली त्याने. पण वेळ आल्यावर निर्विकार मनाने सगळी बडबड त्याने कानाआड केली. शाळेत न जाता आईसाठी दिलेली साडी आणि पैसे घेऊन घराच्या दिशेने तो धावत सुटला. त्रिंबककर आनंदाने खुललेला राजेशचा चेहरा मनात साठवत कामाला लागला. दिवसभर कामाच्या नादातही किराणा मालाचं दुकान टाकायला पैसे कुठून आणायचे याचाच विचार चालू होता त्याच्या मनात.

संध्याकाळी पारावर बसलेल्या साटमलाही त्याने अनेकदा सांगितलेला बेत पुन्हा सांगितला. बराचवेळ मनातलं स्वप्न शब्दांनी तो स्वत:च्या, साटमच्या डोळ्यासमोर उभं करत राहिला.  साटमला आधीच चढली होती. आणखी रिचवत तो मान डोलवत राहिला. लांबून त्याला त्याची बायको दिसली तसा त्याने तिथून पळ काढला. त्रिंबककर बसून राहिला. काळोखात पार बुडून गेला तरी त्याला तिथून उठण्याची इच्छा होईना. पारावर कुणीच उरलं नव्हतं. तो रस्त्याकडे नजर लावून बसला. तुरळक गाड्यांची ये - जा आणि अधून मधून जाणवणारा पायरव. बाकी सारं शांत होतं.  पेंगुळलेला त्रिंबककर मध्येच रस्त्यावरुन जाणार्‍या गाडीच्या आवाजाने दचकत होता. शेवटी त्याने आपलं अंग पारावर टाकलं. पारंब्यांच्या काळोखात दिसणार्‍या विचित्र आकारांकडे तो कपाळावर हात टेकून पाहत राहिला. आपसूकच त्याचे डोळे मिटले. घाबरुन तो जागा झाला ते किंचाळीच्या आवाजाने. काहीतरी भयानक स्वप्न पडलं असं वाटलं त्याला. कसाबसा तो बसता झाला आणि रस्त्यापलिकडचं दॄश्य पाहून त्याचा बारकुंडा देह थरथरायला लागला. अंधारात चकाकणारा सुरा बघून त्याची घाबरगुंडी उडाली. ओरडावंसं वाटत होतं पण तोंडातून अवाज निघेना. सावंत असावा तो. झिंगलेल्या अवस्थेत आणि काळोखातही त्याने ओळखलं. त्रिंबककर मागच्यामागे  पळत सुटला. सावंतने कुणाला मारलं? सावंतचे उद्योग गावाला नवीन नव्हते. येताजाता शिवीगाळ, धमक्या, मारहाण असं कानावर यायचं त्याच्याबद्दल. तोच असणार.  पण किंचाळलं कोण ते त्रिंबककरला कळलं नव्हतं.  त्याला त्याची पर्वाही नव्हती. कसंही करुन त्याला स्वत:ला वाचवायचं होतं. सावंतने गाठलं तर? तो जीव खाऊन पळायला लागला. अचानक त्याचा तोल गेला. कुणीतरी ढकललं होतं त्याला . सावंत? पण मागे वळून बघण्याआधीच त्याची  दारुने पोखरलेली कुडी जमिनीवर आपटली. चेहरा दगडावरच आपटला नेमका. कपाळातून रक्ताचे ओघळ वाहायला लागले.  ओघळणार्‍या रक्ताचा स्पर्श जाणवायला लागला तसा त्रिबंककर घाबरला. आपण मेलो याची त्याला खात्रीच पटली. कुणाचातरी आवाज कानापाशी जाणवत होता. उत्तर देण्यासाठी तो  तोंड उघडू पाहत होता पण त्याच्या हालचाली मंदावल्या. हळूहळू सारं शांत झालं.

त्रिंबककरने डोळे उघडले तेव्हा घरात विचित्र शांतता होती.  आपण जिवंत आहोत हे त्याला जाणवलं तसा तो एकदम उठायला गेला. पिरताने त्याच्या खांद्यावर तिचा दणकट हात ठेवला. त्रिंबककरने तिच्याकडे केविलवाण्या नजरेने पाहिलं. बाजूला राजेश आणि धर्मेन्द्र. त्याला कळेना सगळी त्याच्याभोवती का जमा झाली आहेत. अंग ठेचकाळल्यासारखं दुखत होतं पण निकराने तो उठून बसला. तेवढ्यात राजेश आणि धर्मेन्द्र त्याच्यासमोर येऊन बसले.
"काल रातच्याला तू त्या सावंताला पायलंस का?" त्रिंबककरला काही आठवत नव्हतं. कपाळाला बांधलेल्या पांढर्‍या फडक्यावरुन त्याने हात फिरवला.
"लई दुखतंया. काय जालंय?"
"बेशुद्ध होऊन पडला व्हतास ."
"रात्र झाली तरी आला नाहीस म्हणून शोधत होतो. तेव्हा सापडलात. त्या खवळेच्या घराच्या बाजूला पडला होता. तसंच दवाखान्यात नेलं." राजेशने व्यवस्थित काय झालं ते सांगितलं.
"बाबा, तू त्या सावंताला पायलं का? पटकन सांग." धर्मेन्द्र घायकुतीला आला.
"बाबा, पटकन सांगा." राजेशचा आवाज ऐकून मात्र त्रिंबककर सुतासारखा सरळ झाला.
"हा, म्हनजी त्यो सावंतच व्हता असं वाटतंया."
"पन जालं काय? पलत व्हतास म्हनं." धर्मेन्द्र फिस्सकन हसला तसा त्रिंबककरला राग आला.
"मग काय मराया पायजे व्हतं की काय? त्यो मानूस हाय का मेला? सावंताचं काम ना हे? साला, त्येचं रगत तसलंच हाये. सगल्यांच्या जमिनी गिलनार. लई तरास हाय या मानसाचा. आता खूनखराबा बी सुरु केल्यान की काय?"
"खूनखराबा सोड. त्यो तुजं सपान पुरं करनार हाय." धर्मेन्द्रच्या आवाजातला उत्साह पाहून तो खोटं बोलत नाही याची खात्री पटली होती त्रिंबककरला.
"सपान? माजं? त्येला कसं माहित माजं सपान? आनी त्यो कसापायी पुरं करनार त्ये?" त्रिंबककरला काय चाललंय तेच कळत नव्हतं.
"तुजं त्वांड गप करायला तुजं सपान पुरं करत्यो म्हनाय लागलाय." धर्मेन्द्रच्या आवाजात उतावीळपणा होता.
"बाबा, तुमचं स्वप्न अख्ख्या गावाला ठाऊक आहे. येता जाता सांगता तुम्ही प्रत्येकाला." राजेश हसत म्हणाला. त्रिंबककर लाजलाच.
"पन..." राजेश आणि धर्मेन्द्र त्रिंबककरशी बोलत असतानाच सावंत आला. नुसताच बसून राहिला. उत्सुकतेने तिथे थांबलेले दोघं उठले शेवटी. पिरता चहाचं निमित्त करुन उठली. आता सावंतने तोंड उघडलं.
"पॉईटवर येतो मी डायरेक्ट. मी काय पवाराला दगाफटका केलेला नाही. धडा शिकवला. पायावर निभावलं. ऐकंना किती समजावून सांगितलं तरी. किती दिवस सांगतोय जमिन विक पण नाय. चांगला रेट देतोय. तरी बापजाद्याची जमीन नाही द्यायची म्हणून हटून बसलाय. आता बरा आहे. पण महिना जाईल चालायला लागेस्तो. तुला पाहिलं मी लेका. पळालास कशाला?" थोडावेळ त्रिंबककर काहीच बोलला नाही. वाट बघून सावंतने पुन्हा तोच प्रश्न विचारला.
"घाबरलो." चाचरत त्रिंबककर म्हणाला.
"मीच आलो मागून तुझ्या. पवारासारखा धडा तुला पण शिकायचा आहे का?" हळूहळू सावतंच्या आवाजात मग्रुरी डोकावायला लागली. पिरता कधी एकदा चहा घेऊन येईल असं झालं त्रिंबककरला.
"नशीब डोक्यावर निभावलं." त्रिंबककरला आता सारं स्पष्ट आठवलं. सावंतनेच ढकललं होतं तर. काही न बोलता दात दाखवत ओशाळं हसत तो सावंतकडे बघत राहिला.
"तर तो पवार जमिन देईलच आता. पण आखडू बेणं आहे. जोपर्यंत माझं काम होत नाही तोपर्यंत काय चान्स नाही घेणार मी.  तुझं स्वप्न पुरं करणार आहे मी."
"का?" पटकन त्रिंबककरच्या तोंडून गेलं.
"तोंड बंद ठेवायला. उद्या पंधरा हजार घेऊन जा. दुकान सुरु कर. गिरणीसाठी नंतर लागतील तसे देईन." तो पुढे काही बोलणार तेवढ्यात पिरता चहा घेऊन आली.
"तुजा पैका नको आमाला सावंता. या भानगडीत नाय पडनार आमी."
"वैनी, मोठी रक्कम आहे. पवार जाणार नाही पोलिसात याची खात्री आहे मला. तसा मला कसलाच धोका नाही तरी देतोय मी. विचार करा. त्रिंबककर संध्याकाळपर्यंत काय ते सांग. पैसा मिळाला की तोंड गप ठेवायचं." सावंत निघून गेला.

राजेश, धर्मेन्द्र परत आत येऊन बसले.
"पवारच्या जखमा गंभीर नाहीत. पण तुम्ही एकमेव साक्षीदार आहात. वेळ आलीच तर तोंड बंद ठेवण्यासाठीचा आकडा आहे हा." त्रिंबककरने चमकून राजेशकडे पाहिलं.
"तू पैका वाढवून माग. सावंत न्हाई म्हनायचा नाही. चान्स हाय हा चांगला बाबा.  सिरीमंत व्हता यिल आपल्याला. पंधरा हजारात दुकान नाय व्हनार" धर्मेन्द्र कुजबूजत बराचवेळ सांगत राहिला त्रिंबककरला. दोघांचं बोलणं राजेश शांतपणे ऐकत होता. त्यांचं बोलणं संपल्यावर त्रिंबककरने राजेशकडे पाहिलं.
"बाबा, असलं काही करायचं नाही." राजेशच्या आवाजात ठामपणा होता.
"घ्या वो बाबा तुमी. इतका पैका नायतर आपल्याला कोन देनार. काय करसील रं बाबानं पैका घेतला तर? " धर्मेन्द्रने गुरकावत राजेशला विचारलं.
"तू भरीला घालू नको बाबांना. आणि तसं केलंत बाबा तर तुमचा माझा संबंध संपला." त्रिंबककर राजेशकडे पाहत राहिला.
"आरं, आसं नको बोलू रं. इतका पैका हाडाची काडं केली तरी नाय गावायचा. लक्स्मी आली हाये दारात तर...."
"खोटं बोलायला इतका पैसा? जमिनीचे वाद आहेत त्या दोघांचे. पवारला कळलं की तो तुमचा जीव घेईल.  आणि दारु पिऊन कुठे बरळलात तर सावंत सोडणार नाही. एकदा अडकलात की पाय खोल रुतत जाईल. स्वप्न पुरं होणार नाहीच.  तुरुंगाची हवा खायला मिळेल. ते दोघं बाहेर आरामात वर तोंड करुन फिरत राहतील."
"पुडचं पुडं. आता ह्यो पैका दुकान सुरु कराय उपयोगी व्हईल. मी घेनारच हाय. इतका पैका मी कदी पायला नवता. आनि मिलायचा बी न्हाई." त्रिंबककर हटून बसला. धर्मेन्द्रचा त्याला पाठिंबा मिळत होता. शब्दाला शब्द वाढत गेला. कुणीच माघार घेईना. पिरता राजेशच्या बाजूने कचाकचा भांडत राहिली.  धर्मेन्द्र आणि त्रिंबककर एक झालेले. सगळे हमरातुमरीवर आले. रागाच्या भरात धर्मेन्द्रने राजेशला ढकललं. राजेशनेही तितक्याच जोरात त्याला ढकलंल. पिरताने पुढे होत दोघांनाही ढकलून दिलं. स्वत:ला सावरत राजेशने निर्वाणीचा इशारा दिला.
"बाबा, पुन्हा सांगतोय. मी निघून जाईन घरातून." राजेश जोरात ओरडला.
"जा." त्रिंबककर थरथरत म्हणाला. धर्मेन्द्रने राजेशला दाराबाहेर ढकललंच. राजेशच्या डोळ्यात आग पेटली. रक्त साकळल्या नजरेने तो  त्रिंबककरकडे पाहत राहिला. त्याला अडवू पाहणार्‍या पिरताला बाजूला करत राजेश घरातून बाहेर पडला. त्याच्यामागून पिरता धावली. धर्मेन्द्र आणि त्रिंबककरही  त्या दोघांच्या मागे धावले.

"कुटं जानार हायस? उगा आपलं मी निगून जाईन, निगून जाईन. कुटं जायाचं न्हाय..." त्रिंबककर त्याच्या पाठीमागून जात ओरडला. पण राजेश थांबला नाही. त्याची तरुण पावलं गावातल्या वाड्या ओलांडत राहिली. त्याच्या मागे धावून धाप लागलेला त्रिंबककर अखेर एका ठिकाणी थांबला. धर्मेन्द्र त्रिंबककरच्या बाजूला उभा होता. पिरता दोघांकडे बघत तिथेच उभी राहिली. दोघांच्या नावाने तिने तिथेच बोटं मोडायला सुरुवात केली. त्रिंबककर मात्र विचारात गढून गेला. राजेश गेलेल्या दिशेने पाहत. राजेश कुठे  जाईल? पिरता पण त्याच्यामागून गेली तर? ती जाणारच लेकाबरोबर. राजेशची शाळा?  येतील परत? कितीतरी वेळ तो तसाच उभा राहिला. मग त्याने ठरवलं,  नाही आले तर बोलवून आणू. तसंही दुकान आणि गिरण आयुष्य बदलून टाकेल. त्याच्या बदललेल्या राहणीमानाची खात्री पटली की येतील दोघं परत. तोपर्यंत धर्मेन्द्र असेल बरोबर. पण आता सावंतकडे जायचं. सावंतकडे गेलं नाही तर हातातोंडाशी आलेला घास जाईल. पिरताकडे  त्याने कटाक्ष टाकला, मागे राहिलेल्या घराच्या दिशेने त्याने नजर टाकली आणि राजेश गेला त्या फाट्याकडे बघत निश्चल नजरने तो बराचवेळ उभा राहिला.  अखेर निर्णयाचा खुंटा बळकट केल्यासारखी त्याने स्वत:ची पावलं सावंतच्या घराकडे वळवली. धर्मेन्द्रच्या चेहर्‍यावर आनंदाचं चांदणं पसरलं. लगबगीने त्रिंबककरच्या बाजूने तो चालायला लागला. दोघांच्या पाठमोर्‍या आकृत्यांकडे पिरता ताटकळल्यासारखी बघत राहिली आणि राजेश गेलेल्या पायवाटेवर तिने आपलं पाऊल टाकलं.






Thursday, November 8, 2018

बिगुल दिवाळी अंक - दुसरी बाजू.

बिगुल दिवाळी अंकातील लेख - दुसरी बाजू:  https://goo.gl/6MGwkT


लेखातील काही अंश:




Monday, November 5, 2018

दिवाळी आणि दिवाळी अंक


प्रत्येकाच्या मनात बालपणीची दिवाळी खोलवर रुजलेली असते. फराळ, फटाके, पहाटेच्या समयी पणत्यांचा मंद प्रकाश याबरोबरच मला आठवते ती दिवाळी अंकांची आतुरतेने केलेली प्रतीक्षा. दिवाळी अंक आमच्या नेहमीच्या वर्तमानपत्र विक्रेत्याला सांगून ठेवलेले असायचे किंवा दिवाळीच्या दिवशी फराळावर ताव मारून झाला की आम्ही वडिलांबरोबर अंक विकत आणायला जायचो. माहेर, आवाज, कथाश्री, अनुराधा असे काही अंक आठवतात. नंतर वाचनालयात जे मिळतील त्यावरही आम्ही तुटून पडायचो. त्यातल्याच दिवाळी अंकात कथा प्रसिद्ध होणं आणि त्यावेळच्या आमच्या आवडत्या लेखक - लेखिकांच्या पंक्तीत आपलंही काही असणं हा अनुभव अवर्णनीय आहे.

गेली काही वर्ष याचा अनुभव घेतेय. आणि यावर्षी तब्बल १२ दिवाळी अंकात माझ्या कथा आहेत. असं लिहिताना मनात येऊन गेलं, ’म्हणजे महिन्यात फक्त एकच कथा लिहून झाली?’ पण शब्दांचं, विषयांचं असंच आहे. एकदा आजूबाजूला घोटाळायला लागले की कागदावर स्थिरावेपर्यंत त्यांना धीर नसतो पण जवळपास यायचं नाही ठरवलं की फटकूनच वागतात, अस्वस्थ करत राहतात. चालायचंच. तर त्यापैकी काही छायाचित्र. आणि सर्व गोष्टींची अगदी थोडक्यात कल्पना. अंक मिळवून नक्की वाचा आणि अभिप्राय कळवा.

यावर्षी इतक्या अंकासाठी प्रथमच लिहून झालं आणि मेहता प्रकाशनाने माझा ’रिक्त’ कथासंग्रह प्रसिद्ध केला. त्यामुळे माझ्यासाठी हे वर्ष खूपच आनंदाचं ठरलं. तसंच तुमच्यासाठी उर्वरित हे आणि पुढील वर्ष आनंदाचं, इच्छापूर्तीचं जावो.

माझ्या कथा/लेख असलेले दिवाळी अंक
१. आवाज
२. श्री. व सौ.
३. सामना
४. प्रसाद
५. मेहता ग्रंथ जगत
६. कथाश्री
७. अनुराधा
८. कुबेर
९. अभिरुची
१०.माझा मराठीचा बोल
११. फ्रान्स महाराष्ट्र मंडळ
१२. बिगुल (लेख)

आवाज: आर्थर पार्क हा आमच्या गावातील भारतीय लोकांनी भरलेला भाग. तिथे काही वर्ष चोरांचा सुळसुळाट वाढलाय. अशीच एक नुकतीच झालेली चोरी आणि तिचा शोध घेणारा तरुण देखणा अमेरिकन पोलिस. तो पोलिस आणि भारतीय नागरिकांमुळे त्याच्या तपासकामात वाढलेला गोंधळ याची कथा - आर्थर पार्क

प्रसाद : न्यूयॉर्कमधील धडाडीचा तरुण वकील. वडिलांच्या पेशामुळे त्याच्याच वयाच्या मुलांकडून होणारी हेटाळणी आणि त्यामुळे वडिलांचीच आयुष्यभर लाज बाळगत आलेल्या आणि अचानक एका प्रसंगाने आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललेल्या परमजितची कथा - धुकं.

मेहता ग्रंथ जगत: दत्ता आणि मुक्ताच्या आयुष्यात सावत्र आई येते. मुक्ताच्या हृदयात ती सहज स्थान पटकावते. पण ’सावत्र’ या शब्दाच्या विळख्यात अडकलेला दत्ता तिला नाकारत राहतो. आणि अचानक कितीतरी वर्षांनी दत्ताच्या कृतीने तिघांचं अवकाश बदलतं. त्या घराची कथा - झाकोळ.

कथाश्री: सुलभा आणि अविनाशची एकुलतीएक मुलगी कांचन. एकेकाळी ज्या संकटातून अविनाशला जावं लागलं त्याच समस्येला कांचनलाही तोंड द्यावं लागतं. तोच प्रसंग तिच्यावर ओढवतो. हा प्रसंग तिला वडिलांबद्दल असलेल्या शंका, राग याबद्दल नकळत वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला भाग पडतो. कोणता हा प्रसंग आणि काय होतं पुढे? कथा - सुरुवात.

अनुराधा: दुकान, गिरण असं एक स्वप्न मनात बाळगत शिपायाचं काम करणारा त्रिंबककर, राजेश आणि धर्मेंद्र ही दोन टोकाचे स्वभाव असलेली त्याची मुलं. अचानक त्रिंबककरचं स्वप्न खरं होण्याची शक्यता निर्माण होते. पण... तो जो ’पण’ असतो त्यामुळे मुलगा, बायको एका बाजूला तर त्रिंबककर आणि त्याचा एक मुलगा दुसर्‍या बाजूला असं चित्र निर्माण होतं. होतं त्रिंबककरचं स्वप्न पुरं? की तो ’पण’ सर्वांनाच वेगळ्या दिशेला नेऊन सोडतो? कथा - दुकान, गिरण आणि...

बिगुल: कायद्याने अमेरिकेत समलिंगी विवाहाला मान्यता मिळालेली असली तरी यौवनावस्थेतील मुलांचं समलिंगत्व पालक स्वीकारत नाहीत. काय करतात ते यावर? त्यावर प्रकाश टाकणारा लेख. दुसरी बाजू.

श्री. व सौ. : वय नावाचं गौडबंगाल या अंकाच्या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित कथा. वय वाढणं कुणाला चुकलंय? पण या वाढत्या वयाबरोबर होणारी मानसिक, शारीरिक स्थित्यंतरही कधीकधी ढवळून काढणारी ठरतात. कुणी यातून मार्ग काढतं, कुणी नकारात्मकताच घट्ट धरून राहतात. त्यावर आधारित कथा - पर्याय.

कुबेर: वरुण आणि त्याच्या मैत्रिणीच्या एका कृत्यामुळे आत्मघाती कृत्याकडे वळलेला त्याचा मित्र. वरूणला त्याच्या वागणुकीबद्दल न मिळालेली शिक्षा यामुळे उसळलेला जनप्रक्षोभ. या सार्‍या घडामोडींचा, तरुणांच्या मानसिकतेचा अभ्यास करणारे आलोक रॉय. असं काय केलं वरुणने आणि त्याच्या मैत्रिणीने? कथा - प्रारंभ.

सामना: एकमेकांपासून दूर गेलेल्या, कधीही भेट न झालेल्या बहिणी. अचानक एकीला दुसरीची भेट घ्यायची इच्छा होते. पण बहीण कुठे असते हे देखील ठाऊक नाही. होते दोघींची भेट? दुसरीला असते बहिणीला भेटायची इच्छा? त्या दोघींची आणि त्या दोघींच्या कुटुंबाची ही कथा - प्रवेश











Thursday, October 4, 2018

अक्कलखाती गेलेले पैसे परत कसे मिळवायचे?

आता अक्कलखात्यात गेले हे समजलं हेच खूप झालं. परत कसले मिळवताय असं म्हणाल तुम्ही. पण मिळवायचेच आहेत. प्रश्न पैसे गेल्याचा नाही फसवणूक झाल्याचा आहे. तर झालं असं,

गेली दोन वर्ष लमार नावाचा इसम आमचं गवत कापायला येतो. महिन्याचे पैसे मी त्याला एकदम देते. हल्ली हल्ली गवत वाढलेलं नसतानाही तो कापत होता. गवत नसेलच तर कापणार कसं हा प्रश्न मला पडतो लमारला नाही. त्यादिवशी अचानक यंत्राचा आवाज आला आणि भूकंप झाल्यासारखी मी दार उघडून बाहेर धावले. माझा वेगच इतका होता की लमारच्या हातातलं यंत्र धाडकन थांबलंच. तरी मी त्याला पुन्हा थांबवलं,
"थांब, थांब. गवत वाढलेलं नाही." लमारने मला वेड लागल्यासारखं माझ्याकडे पाहिलं आणि एक कोबीच्या गड्ड्यासारखा वाढलेला गड्डा दाखवला."
"हे गवत नाही. रान आहे. " मीपण त्याला वेड लागलंय असा चेहरा करत सांगितलं. दोघं वेडे एकमेकांकडे पाहत राहिले काहीवेळ. तो काही बोलत नाही हे पाहून मीच म्हटलं,
"एका झुपक्यासाठी तू अख्खी माती कापणार? गवत नाहीच वाढलेलं तर मातीच कापू असं ठरवून येतोस की काय? काय बुवा ही माणसं! पैशासाठी कापा आम्हाला." मी मनात बोललेलं त्याला समजलं. तो म्हणाला,
"ठीक आहे. मी पुढच्या आठवड्यात येतो." तो गेला आणि लमारला कसं झापलं, थांबवलं हा माझा पराक्रम मी घरात जाहिर करुन टाकला, आता तुमच्यापर्यंत पण पोचवतेय. उकळायला बघतात नुसते. थांबवलं नाही तर फसलातच तुम्ही वगैरे स्वगतं घरात आठवडाभर चालली आणि नंतर सुरु झाली प्रतिक्षा. गवत वाढवाढ वाढलं पण लमारचा मुखचंद्रमा नाहीसा झाला तो झालाच. पुन्हा अवतरलाच नाही आमच्या अंगणात.

आता...?
त्याला भरपूर निरोप पाठवले. लेखी. म्हणजे SMS हो. मग फोन केले. लमार महाशय फोन उचलत नाहीत म्हटल्यावर नवर्‍याला गळ घातली. त्याने
"तू असे आधीच कसे पैसे दिलेस?" एवढा एक प्रश्न विचारुन दुर्लक्ष केलं. त्यावर मी चार वाक्य ऐकवायला गेले.
"प्रत्येकवेळेला ४० डॉलर्सचा चेक नाहीतर रोख देत बसायचं?. तसं केलं असतं तर एकदम का देत नाहीस म्हटलं असतंस." पुढची दोन पूर्ण व्हायच्या आत,
"लमारमुळे आणखी एक वादाला निमित्तच सापडलं तुम्हाला" असा शेरा मारुन मुलगी आपल्या खोलीत निघून गेली. मग लमारशी बोलण्याऐवजी नवर्‍याने त्याला SMS धाडून दिला. तो कसला उत्तर देतोय. असे १५ दिवस गेले मग अनोळखी फोन वापरुन फोन केला आणि नवर्‍याच्या हातात दिला. लमारने हा फोन ताबडतोब उचलला. कोण बोलतंय कळल्यावर तो कसा अपघातात जायबंदी झालाय. येतोच पुढच्या आठवड्यात असं सांगत त्याने माझ्या नवर्‍याची समजूत घातली. इतकी की काही मदत हवी आहे का असं माझा नवराच त्याला विचारायला लागला. मी आपली इकडे १२० डॉलर्सच्या खाणाखुणा करत. फोन ठेवल्यावर नवरा म्हणाला,
"अपघातात जायबंदी आहे. जाऊ दे. उपचाराला होतील त्याला पैसे ते. सोडून दे."
"लमारला सोड तू. आम्हाला देतोस का तू सहज सोडून.." वगैरे मला अर्थात काढणं भागच होतं. ते झाल्यावर मी समजूतीने म्हटलं,
"पण तो खरंच जायबंदी आहे का ते शोधून काढ आधी. त्याने मला फसवलंय. अनोळखी फोन कसा उचलला? सरळसरळ थापा मारतोय." तो थापा मारतोय की नाही यावर आम्ही घनघोर चर्चा केली. मग श्रमपरिहार म्हणून मस्त बाहेर जेऊन आलो.

पुन्हा लमारची प्रतिक्षा सुरु. काही दिवस वाट पाहून काल त्याला निरोप पाठवला.
"BBB कडे तक्रार करते तुझी. सोशल मिडीयावर वाभाडे काढते तुझे." आता हे वाभाडे नक्की कसे काढायचे? लमारला ओळखणारं आहे कोण इथे :-).

जाऊ दे झालं. इतकं लिहिल्यावर उगाचंच १२० डॉलर्स मिळाले असं वाटायला लागलंय. म्हणजे काय तुमच्यापैकी कुणीतरी काय केलं की अक्कलखात्यात गेलेले पैसे परत मिळवण्याची युक्ती सांगेलच. नाही का?

Monday, September 10, 2018

नवरा म्हणजे!

नवरा म्हणजे नवरा असतो
अं, हं, बरं एवढंच बोलतो
त्याचंही ’काम’ आम्ही करतो
तेव्हा ’किती बोलतेस’ म्हणतो!

नवरा म्हणजे नवरा असतो
यादीतलं सगळं बाजारातच राहतं
कुरकूर केली की वैतागतो
कशाची किंमत नाही म्हणून गुरगुरतो!

नवरा म्हणजे नवरा असतो
कामावरुन आला की टी.व्ही. चा भक्त होतो
बायकोने पावलावर पाऊल टाकलं की
पोटातल्या कावळ्यांसारखंच कावकाव करतो!

नवरा म्हणजे नवरा असतो
कामांच्या नावाने पंचवार्षिक योजना असतो
नोकरासारखं वागवता म्हणत राहतो
आणि राजाच्या थाटात आराम करतो!

नवरा म्हणजे नवरा असतो...

Thursday, August 30, 2018

आई म्हणजे...

उद्या शाळा सुरु होणार
सुट्टी आता संपणार!
सुटीत कळलं आई म्हणजे काय असते
मला चिकटलेली पाल भासते!
आई म्हणजे आई असते
कटकट तिची संपणारी नसते!
उशीरा उठलं की किती झोपतेस
जागलं की किती जागतेस!
फोनचा वापर कमी कर सांगते
सांगायला फक्त फोनमधून डोकं वर काढते!
सारखी काय चिडतेस, बसतेस का जरा शांत
हेही ती आवाज चढवून, वैतागूनच विचारते!
मदत केली तरी धड नाही करत म्हणून सगळं स्वत:च करते
आणि कार्टी मदत करत नाही म्हणून कुरकूरत राहते!
शाळेची मी अधिरतेने वाट पाहते
पण आता मला आई हवी असते!
ती माझी आई असते, तिच्याशिवाय पान कुठे हलते!
तिची कटकट हेच माझ्यावरचं प्रेम असते, ते फक्त मलाच कळते! 

- मोहना जोगळेकर

Wednesday, July 4, 2018

रिक्त

कर्मभूमीचा जन्मदिन आज साजरा होत असतानाच माझ्या जन्मभूमीत आज माझा कथासंग्रह ’रिक्त’ मेहता
प्रकाशनने प्रसिद्ध केला!

ऋत्विक आणि पर्णिका नऊ महिन्यात कबूल केल्याप्रमाणे या भूतलावर अवतरले. दिवसांच्या बाबतीत केलं दोघांनीही थोडं  मागे पुढे.  पहिल्यांदाच असं करत होते म्हणून केलं माफ!  पण पुस्तकाचा जन्म म्हणजे कायमचंच गर्भारपण की काय असं वाटायला लागलं होतं. गर्भारपण निभावणार्‍या प्रकाशकांना इतकी पुस्तकं जन्माला घालायची असतात की त्यामुळे वर्ष सहा महिने मागेपुढे होत असावेत.  पुस्तकाने ’मी येत आहे’ असं म्हटलं की मी देखील, आलं, आलं करत पुस्तकाचा एकेक अवयव, म्हणजे मुखपृष्ठ मग मलपृष्ठ असं जे माझ्यापर्यंत पोचत होतं  ते सर्वांना दाखवत होते. मुलांना नाच करता यायला लागला, ती गाणं म्हणायला शिकली की  कसं पाहुण्यांसमोर आपण करुन दाखवायला लावतो. तसं मी माझ्या मुख आणि मलपृष्ठाला सर्वांसमोर नाचवलं. करता करता चक्क  पाना आणि अक्षरांसकट माझं नविन बाळ भूतलावर अवतरलं आहे. तुमच्या सहकार्यानेच ते वाढेल. तेव्हा नक्की वाचा आणि मला कळवा पुस्तकाबद्दल तुमचं मत. 

Monday, April 30, 2018

जाहिरात

आगामी डंख नाटकाची जाहिरात. एका जाहिरातीत दिसेल आमच्या नेपथ्यकारांची कम्माल तर दुसर्‍या जाहिरातीत कलाकारांचा सराव. नक्की पाहा दोन्ही जाहिराती आणि शार्लट, नॉर्थकॅरोलायनाच्या (Charlotte, NC) आसपास राहत असाल तर नाटक पाहायला या ही आग्रहपूर्वक विनंती. --








अभिव्यक्ती संकेतस्थळ - https://marathiekankika.wordpress.com/  (आधीच्या निर्मितीची झलक पाहता येईल.)

Thursday, April 19, 2018

नाटक आणि नेपथ्य

"डंख" नाटक ही आमची दहाव्या वर्षाची निर्मिती असेल. गेले ३ महिने नेपथ्यावर अविरत काम चालू आहे ते
पाहताना नकळत मन पहिल्या निर्मितीकडे जातं. २००८ सालाकडे. त्यावर्षी २ एकांकिका केल्या. भिंत एकांकिकेला नेपथ्य काहीच नव्हतं. ३ कलाकार आणि मागे काळा पडदा तर महाभारतासाठी निव्वळ खुर्च्या. शाळेत असल्यापासून एकांकिका स्पर्धा हा जीवनाचा अविभाज्य भाग असल्यासारखंच होतं. कथेतील नाट्य प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी नेपथ्याची गरज असते असं कधी वाटलंच नव्हतं ते स्पर्धेतील कलाकारांच्या देहबोलीमुळे. भिंत दाखविण्यासाठी भिंत कधी उभारावी लागली नाही तेच दारं, खिडक्या किंवा इतर गोष्टींबद्दल. सर्वच कलाकार ते आपल्या अभिनयातून साकारायचे. तेच आम्ही पहिला प्रयोग करताना केलं. मिळालेला प्रतिसाद उत्तम होता पण तितकाच बुचकळ्यात टाकणाराही. कितीतरीजणांना एकांकिका म्हणजे सुरुवातीला एकपात्री असेल असं वाटलं होतं आणि नेपथ्य (सेट) नाही ही कल्पना पचवणंही जडच गेलं. लक्षात आलं की नाटक लोकांना परिचयाचं आहे पण एकांकिका या स्पर्धेपुरत्या मर्यादित असल्याने त्याबद्दल माहिती नसावी. मग आम्हीपण म्हटलं, त्यात काय  बांधू थोडी दारं, भिंती, खिडक्या...

पण इतकं सोपं  नव्हतं  हे प्रकरण. मुख्य प्रश्न त्या बांधायच्या कशा, कुणी आणि कधी? एकांकिकेचा सरावच आठवड्यातून एकदा मग नेपथ्याचं काम कधी करायचं? पुढचा अडथळा होता खर्च. एकांकिका/ नाटक करताना फायदा नाही झाला तरी चालेल पण तोटाही नको यावर मी ठाम तर विरेनचा तुला दारं, खिडक्या हव्या आहेत ना घे पाहिजे तितक्या....असा खाक्या.  कलाकार स्वत:चा वेळ देऊन उत्साहाने सहभागी होतात त्यामुळे  कलाकारांना  आणि त्यांच्या जोडीदाराला तिकिटाचा खर्च करायला लावायचा नाही, कार्यक्रम झाल्यावर बाहेर जेवण किंवा DVD द्यायला हवीच असं वाटायचं, कलाकारांच्या मेहनतीची जमेल तेवढी कदर करावी म्हणून. त्याचवेळेस नाट्यगृहही दोन दिवस ताब्यात हवं. एकाच दिवशी कलाकारांवर ताण पडू नये, प्रयोगाला सर्व ताजेतवाने रहावेत या इच्छेपायी. आदल्या दिवशी नेपथ्य उभारणी, ध्वनी - प्रकाशयोजना या तांत्रिक बाजू तपासण्यासाठी तर दुसरा दिवस प्रत्यक्ष प्रयोगाचा. पण नाट्यगृहाचा खर्चही दुप्पट. तिकिटाचे दरही सर्वांसाठी सारखेच ठेवायचे यावरही आम्ही ठाम होतो. त्यामुळे  ना नफा ना तोटा याचा ताळमेळ घालत नेपथ्यही आणायचं म्हणजे मोठी परिक्षाच. पण आमची मित्रमंडळी मदतीला धावून आली नेपथ्याची सुरुवात झाली ती अक्षरश: अर्ध्या भिंतीपासून.

PVC पाईप वापरण्याची कल्पना विजय दरेकरची तर भिंतीची मापं गाडीत बसतील अशी ठेवायचं सुचवलं चैतन्य पुराणिकने.  विरेनच्या मनातली कल्पना कागदावर उतरली आणि आमची मित्रमंडळी कामाला लागली. हळूहळू भिंती, दारं, खिडक्या, जाळीचा चित्रांकित पडदा, मोरी, तयार केलेली झाडं, हरिण, वेगळ्या पद्धतीचं प्रवेशद्ववार.... काय काय रंगमंचावर दिसायला लागलं. त्यामागे कल्पकता आणि अथक मेहनत आहे सुतारकामाची पार्श्वभूमी नसलेल्या सर्वांची, पूर्वी कधीही भिंती न रंगवलेल्यांची. हे करताना अर्थात चुकीच्या भिंती रंगल्या, पाईप तुटले, भिंती हलल्या, वाकड्या झाल्या, कलाकारांना काहीवेळेला जीव मुठीत धरुन रंगमंचावर वावरावं लागलं. पण प्रेक्षकांना सुंदर घरं दिसली. सारा अट्टाहास त्यासाठीच तो फळाला आला प्रत्येकवेळी. आता तर ही मंडळी खरंखुरं घरही बांधतील अशा तयारीत आहेत. यावेळच्या नाटकात आणखी ३ वेगळ्या गोष्टींची भर पडली आहे. काय भर आहे ती प्रत्यक्षातच पाहायला या.

’अभिव्यक्ती’ च्या नेपथ्याचं सारं श्रेय *केरीच्या विजय दरेकर, चैतन्य पुराणिक, अंजली आणि संजय भस्मे, वर्षा आणी नवदीप माळकर, रागिणी आणि विवेक वैद्य तर शार्लटच्या गौरव लोहार, बोस सुब्रमणी, चिराग दुआ, केदार हिंगे, अमोल आणि मेघना कुलकर्णी, अनिता आणि तन्वी जोगळेकर, संजीवनी कुलकर्णी, वेदिका आणि राजीव तोंडे यांना.*

या सर्वांमुळेच ’अभिव्यक्ती’ चं एकांकिका/नाटक म्हणजे उत्तम नेपथ्य ही ओळख आपण निर्माण करु शकलो. त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं. आभार मानणं औपचारिकपणाचं होईल तेव्हा या सर्वांची साथ अशीच कायम राहू दे एवढीच इच्छा.


आमच्या नाटक/ एकांकिकांची झलक पाहण्यासाठी अभिव्यक्ती

संकेतस्थळ  https://marathiekankika.wordpress.com/







Thursday, March 29, 2018

भेट

या वेळच्या भारतभेटीत जवळजवळ ३० वर्षांपूर्वी मनात कोरलेलं चित्र पुन्हा प्रत्यक्षात पाहायला मिळणार याबद्दलची उत्सुकता उत्कट होती. मनात कोरलेलं चित्र बदललेलं असणार हे ठाऊक असलं तरी जे जे आठवतंय ते तिथेच आहे हे पाहताना ते ’वय’ पुन्हा एकदा अनुभवल्यासारखं वाटतं किंबहुना त्यात डुबकीच मारली जाते. त्यावेळेला केलेल्या गोष्टी पुन्हा एकदा कराव्याशा वाटतात आणि लक्षात येतं किती मागे टाकून आलोय आपण हे सारं. असं व्हायला नको. मनाचं बालपण जपायला हवं!

भारत भेटीत हे बालपण पुन्हा आजूबाजूला बागडलं. निमित्त दोन. पूर्वीच्या शेजार्‍यांनी एकत्र भेटणं आणि शाळेचं स्नेहसंमेलन. कधी एकदा पालघरला पोचतोय असं झालं होतं . पोचल्यावर तिथेच जन्मापासून राहणार्‍यांना उतावीळपणे पुन्हा गावदर्शन घडवलं माहितगार आपणच असल्यागत. शाळा, पूर्वीचं घर या रस्त्यांवर काय काय आठवतं, कुठे, कसं जायचं त्याच्या खाणाखुणा सांगितल्या. या खाणाखुणा सांगताना, बघताना एकाचवेळी आनंद होत होता आणि सखेद आश्चर्यही वाटत होतं. झालेले बदल आणि पडझड पाहून!
आम्ही सरकारी क्वार्टर्समध्ये राहणारी सगळी मुलं एकत्र आलो. त्यावेळी कामं करणारे शिपाई, ड्रायव्हरही आवर्जून भेटायला आले सर्वांना. त्यावेळी प्रत्येकजण कसं होतं हे नव्याने उलगडलं. कोण कसं वागायचं, किती भांडायचो, होळीसाठी मालगाड्यातून येणारं गवत घेऊन यायचो, शेण गोळा करत फिरायचो, पाईपमध्ये स्वयंपाक करायचो, १० पैसे देऊन शाळेच्या वसतीगृहात दूरदर्शनवरचे चित्रपट पाहायला जायचो, जत्रेत धुमाकूळ घालायचो, क्रिकेट खेळायचो, टुरींग टॉकीजमध्ये सगळे एकत्र चित्रपट पाहायचो.....काय न काय!

२४ फेब्रुवारी संपूच नये असं वाटत असतानाच उजाडला २५ फेब्रुवारी. या दिवसाची किती आतुरतेने वाट पाहत होते. आर्यन शाळेचं १० वीच्या वर्गाचं गुरु - शिष्य संमेलन. माझ्या मित्र मैत्रीणींनी मनाचा मोठेपणा दाखवून चक्क मला ’पाहुणी’ केलं. कार्यक्रमाचे पैसे भरायला लागणार नाहीत इतकाच अर्थ काढून मी निश्चित्त झाले. प्रत्येकाने आता आपण काय करतो इतकं सांगितलं की झालं म्हटल्यावर तर आणखीनच सुखावले. फार काही बोलावं लागणार नाही याची खात्री झाली. पण शाळेतल्या सवंगड्यांचा भरवसा कुणी देऊ नये हेच खरं हे तिथे गेल्यावर कळलं. मी नुसतीच पाहुणी नव्हते तर प्रमुख पाहुणी होते. शिक्षकांसमोर प्रमुख पाहुणी होणं अवघड वाटलं पण विद्यार्थ्यांची प्रतिनिधी म्हणूण दीप प्रज्वलन केलं. ज्या शिक्षकांना कायम आमच्या उज्वल भवितव्याची चिंता असायची त्यांच्यासमोर आम्ही जवळजवळ ५० जण त्यांच्या कर्माचं फळ म्हणून उभेच ठाकलो. आपल्या विद्यार्थ्यांनी गेल्या ३० वर्षात काय दिवे लावले आहेत याबद्दल शिक्षकांना उत्सुकता होती आणि सुदैवाने आम्ही फार निराशा केली नसावी असं शिक्षकांच्या चेहर्‍यावरचा ओंसडून वाहणारा आनंद दाखवत होता. विद्यार्थी आणि शिक्षक सारेच भारावून गेले एकमेकांच्या भेटीने!

त्यावेळी मुलामुलींनी एकमेकांशी बोलणं फार प्रचलित नव्हतं पालघरमध्ये. त्यामुळे सारे नावापुरतेच वर्गमित्र होते. पण खरं तसं नसणार. बोलणं नसलं म्हणून काय झालं निरीक्षण असतंच ना:-). हे सार्‍यांच्याच एकमेकांशी बोलल्यावर लक्षात येत होतं. त्यावेळच्या पुसटशा ओळखीला जिव्हाळ्याचा रंग चढत होता. गप्पा, हसणं - खिदळणं, आठवणी यात ती सुरेल संध्याकाळ कधी संपली ते कळलंच नाही. परतीच्या वाटेवर मन प्रसन्न होतं, पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत होतं. ओंजळीत गोळा झालेल्या या क्षणांमध्ये अशीच भर पडू दे, पुन्हा पुन्हा अशा क्षणांची बरसात होऊ दे हीच इच्छा!

पालघरला जायचं त्यामुळे रत्नागिरी झालंच नाही. पण तरी रत्नागिरीच्या आम्ही पुण्यात भेटलो हे काय कमी!

पालघरला जाण्यापूर्वी झालेली कविता

आपण काळाची पानं पुसतोय
मनाचं यौवन जपतोय
अधीरतेचा लंबक हेलकावतोय
मनाचा मोरे थुई थुई नाचतोय!

मन आणि वय शोधतंय बालपण
आठवणींच्या अंगणात आनंदाचे क्षण
गुंफूया मनाच्या माळेत कण न कण
राहू दे बाजूला आता आपलं मोठेपण!

असेच भेटत जाऊ, मैत्र जपत राहू
बालपणाची झूल अंगावर लेऊ
वयाचा प्रवास उलटा करु
मैत्रीची ज्योत पेटती ठेवू!





Thursday, March 8, 2018

महिला दिन

"हा ॲडम समजतो कोण स्वत:ला? " मुलगी शिंग उगारुन  घरात शिरली. शाळेतून आली होती.
"कोण ॲडम? "
"अगं  इव्ह आणि ॲडम मधला. जगाच्या निर्मितीपासूनच जर असं असेल तर नो वंडर आई, नो वंडर... तमाम बायकांच्या अंतापर्यंत ही चळवळ चालूच राहणार की काय? " मी पाहतच राहिले. ही मुलगी एका क्षणात जगाची सुरुवात, अंत कुठे कुठे जाऊन पोचली होती. वर्षातला एक दिवस तुमच्या नावाने असला की हे असं होतं? तितक्यात ती म्हणाली,
"मला मुळी कळतच नाही इव्ह आणि ॲडम का नाही म्हणत. जिकडे तिकडे मुलगे आधी. तुम्ही सुद्धा घरात मुलगाच आणलात आधी. "
"अगं  तू काय बोलतेयस? घरात मुलगा आधी आणला? तो काय रस्त्यावर  ठेवलेला असतो? " म्हटलं आणि चपापले कारण दोन्ही मुलांना बरीच वर्ष आम्ही त्यांना रस्त्यावरून उचलून आणलंय असंच सांगितलं होतं. तेही अधूनमधून वाजलं की, मग  तुमचा माल परत करून टाका रस्त्याला. जातो आम्ही आता रस्त्यावर असं म्हणायला लागले होते. गाडी तिकडे वळायला नको होती. ती तशी वळली नाही कारण लेकीच्या मनात बरंच काही खदखदत होतं. तडतड लाह्या फुटल्याच तेवढ्यात,
"आणि ती मालिका, माइक ॲड मॉली. मॉली आणि माइक का नाही? " आधी मला वाटलं होतं शाळेतल्या ॲडममुळे काही बिनसलं होतं पण इथे सरळ सरळ महिला दिन चढलेला दिसत होता, आवेशपूर्ण उद्गार निघत होते.
"पण एकदम आज लक्षात आलं तुझ्या हे? "
"आज महिला दिन आहे ना? आहोत कुठे आपण आई, आहोत कुठे? "
"मी सोफ्यावर. तू दप्तर टाकून, चप्पल भिरकावून, कापलेले केस आणखी विस्कटल्यासारखे करत माझ्यासमोर उभी. "
"आईऽऽऽ"
"बरं, बरं. तू काय विचारलंस, आहोत कुठे आपण? हो नं?  आपण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहोत. आता तर झालं समाधान? "
"हेच, हेच चुकतं आई आपलं. इतकी वर्ष हेच चुकलं. " जन्मापासून पंधरा वर्ष. या पंधरा वर्षात झालेली तिची घुसमट बाहेर पडायला लागली. तरीदेखील तिच्या शब्दाने मी सुखावले. एरवी या घरात फक्त माझंच चुकतं पण इथे ती ’आपलं चुकलं’ म्हणाली होती. एकदम लोण्याचा गोळा झाले मी.
"खरं गं बाळे, कधी कधी होतं असं. चुकतं आपलं. "
"चुकतंच. तुझ्यासारख्या बायका हे असं बोलतात ना तिथूनच चुकेला सुरुवात होते. " घसरली गाडी पुन्हा.
"अगं बाई, काय केलं आम्ही बायकांनी? "
"केलं नाहीत तेच चुकलं. सारखं आपलं, आम्ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावतो. कशाला लावायचा तो त्यांच्या खांद्याला खांदा? पुरुषांच्या खांद्याला खांदा लावण्याची बिककूल गरज  नाही. "
"अगं काहीतरीच काय बोलतेयस? आम्ही बायका - बायका नाही हो तुलना करत एकमेकींची. आम्ही समोरच्यापेक्षा तसूभरही कमी नाही, असलोच तर जास्तच पण कमी नाही हे दाखवून द्यायचं तर पुरुषच नको का? पुरुषांशी स्पर्धा केली तरच आमचं समानत्व कळतं. बाईशी केली तर द्वेष करतो असं होतं ना. मग पुरुषच बरा नाही का? आता हेच बघ, आपण नाही का म्हणत आता स्त्रिया उच्चपदावर आहेत, आमची कार्यक्षेत्र रुंदावली, उंचावली आहेत. जे काही पुरुष करतात ते ते आम्हीही करू शकतो.  त्यानंतर मग उदाहरणंही देतो नेहमीची. मुळात महिला दिन साजरा करतो तेव्हा आपण पुरुषच आणत असतो की सारखा मध्येमध्ये. म्हणून मी म्हटलं की आपण पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन उभे आहोत. "
"आपली स्पर्धा ही आपल्याशीच असते आई. "
"खरंच? पण मग तू तर माझ्याशी वादविवाद स्पर्धेत भाग घेतल्यासारखी कचाकचा भांडत असतेस. स्वत:शीच कर ना स्पर्धा. "
"आईऽऽऽ"

तितक्यात पुत्ररत्नाचा नाट्यमय प्रवेश. हातात पुष्पगुच्छ. डोळे वटारुन पाहणार्‍या बहिणीकडे दुर्लक्ष करत पुष्पगुच्छ माझ्याहाती सुपूर्द.
"अरे, माझा वाढदिवस मागच्या आठवड्यात झाला. "
"हॅपी विमेन्स डे आई. तुम्हा सर्व महिलांना वर्षानुवर्ष असेच महिला दिन साजरे करता येवोत ही सदिच्छा.  तुला काय वाटतं ते सांग ना महिला दिनाबद्दल. आज मै तेरा इंटरव्ह्यू लेताच हू! "
"आता बोलताना तू ३ भाषा वापरल्यास. माझी मुलाखत तुला कोणत्या भाषेत पाहिजे? "
"बघ, हे तुझंच श्रेय आई. इतक्या भाषा तुझ्यामुळे शिकलो मी. " कसच, कसच म्हणत मी मुलाखत द्यायला सरसावले.
"विचार. "
"तुला एक महिला म्हणून महिला दिन कसा साजरा व्हावा असं वाटतं? "
"मुळात तो व्हावासा वाटतो का ते विचार ना. "
"मुलाखत कोण घेतंय? "
"बरं, बरं. मग घरी की बाहेर? कुठे कसा साजरा व्हायला हवा ते सांगू? "
"आधी घरी सांग मग बाहेर. "
"घराच्या बाबतीत महिलेच्या फार साध्या अपेक्षा असतात रे. तुमच्याच बाबतीत बोलायचं तर, तुम्ही दोघं बहीण भावंडांनी हमरीतुमरीवर न येता वागण्या, बोलण्यात आपण समान आहोत हे एकमेकांना दाखवावं. "
"पण आई, गर्ल्स आर मोअर पॉवरफुल. " माझ्या मुलाखतीत मुलगी मध्ये शिरली.
"सिद्ध कर. " आपल्या हातात खोटा का होईना माइक आहे हे बंधुराज विसरले आणि बहिणाबाईंचे केस ओढत तिचं विधान सिद्ध करायचं आवाहन केलं. महिला दिनच तो, असं काही अंगात संचारलं बहिणाबाईंच्या, की भाऊरायांचा धोबीपछाड. मी माझ्या होऊ घातलेल्या महिलेचं कर्तृत्व कौतुकाने पाहत राहिले. तिला कराटे शिकवल्याचं सार्थक घरातच होत होतं. मुलाने स्वत:ला सावरत पुन्हा माइक माझ्यासमोर धरला.
"हं, तर आपल्या घराबद्दल. घरात तसंही कुठलंही काम आपण मुलगा, मुलगी असा भेदभाव न करता आपल्यापैकी कुणीही करतं याचं श्रेय मी माझ्याकडे घेऊ इच्छिते. इथूनच सुरुवात होते एकमेकांना कमी न लेखण्याची. ती प्रथा मी निदान आपल्या घरात तरी सुरू करू शकले हे ही नसे थोडके. "
"यात मी थोडी दुरुस्ती करू इच्छितो. "
"मी पण. " इथे बहीण, भाऊ एकत्र येतात. दोघं एकदम,
"घरात आपल्यापैकी कुणीही काम करतं असं तू म्हटलंस त्याऐवजी ’तुम्ही’ सगळे करता असं पाहिजे होतं. "
"तो ही स्त्री शक्तीचा विजय समज. आता आपण आणखी विधायक कामाकडे वळू. "
"म्हणजे कुठे? "
"घर सोडून बाहेर. "
"बरं. "
"मला असं वाटतं महिला दिन हा रोजच असायला हवा. तसा करण्याचा आमचा प्रयत्न आहेच. पण वर्षातून एकदा तुम्ही फक्त काही स्त्रियांचा उदो उदो करता आणि त्यांच्या पावलांवर पाऊल टाकायला सांगता. इथेच आमचा गोंधळ होतो. म्हणजे आमची झुंज कुणाशी आहे ते कळेनासं होतं. तुझ्यासारख्या भावी पुरुषगिरीशी की या आधी होऊन गेलेल्या कर्तृत्ववान बायकांशी हे कळेनासं होतं. "
"मॅन,  व्हाय आर यू सो डिफिकल्ट? काय बोललीस ते कळलंच नाही. " तेवढ्यात मुलगी पुढे सरसावली. भावाच्या हातातला माइक ओढून करवादली.
"आला पुन्हा तुझा मॅन आधी. गॉऽऽऽड, हेल्प विमेन. " मी विधायक कामाकडे वळायच्या आधीच पुन्हा एकदा तुंबळ युद्ध  सुरु होण्याची ही लक्षणं होती. मी कुठल्याही ’दिना’ च्या दिवशी शेवट करते तोच करायचा निर्णय घेतला.

"असं करू या. आपण महिला दिन आज बाहेर खाऊनच साजरा करू या. " दोघांनी त्यांच्या भांडणातून माझ्याकडे नजर टाकली. मी काय म्हणाले ते त्यांच्या अचानक लक्षात आलं. खुशीने दोघांनी मान डोलवली. आणि कुठे जेवायला जायचं हे ठरवण्याचा ’महिला दिनी’  बहीणीचा हक्क आहे की भावाचा या बद्दल दोघांचा वाद सुरु झाला...

Wednesday, January 10, 2018

कांताबाईची करामत

ईशान आजारी पडला आणि कांताबाईचा जीव कासावीस झाला. तिने त्याच्याकडे जायचं निश्चित केलं आणि ईशानला आधीच लागणारी धाप आणखीनच वाढली.
"आई, हट्टीपणा करु नको. मी आता बरा आहे. तू एकटी कशी येणार?"
"मेल्या, इतं माजा जीव टांगनीला लागला आनि येऊ नगं म्हनतंस. लाजबिज हाय की नाय तुला. निगाले मी."
"निघाले काय? ते काय पुण्याची एस टी पकडून वडगाव बुद्रुक गाठायचं आहे का? काहीही." आजारपणामुळे ईशानच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती.  आता आई फोन ठेवणार नाही या कल्पनेनेच त्याच्या डोळ्यासमोर काळोख पसरला.
"करतो तुझ्या येण्याची व्यवस्था." आईचं बोलणं थांबवत त्याने फोन ठेवला तर बायको महिषासुरमर्दिनीसारखी समोर उभी. त्याने गपकन डोळे मिटले. या क्षणी  तोफेला तोंड द्यायची अजिबात इच्छा नव्हती त्याला. ईशानची आई अर्धशिक्षित पण कर्तुत्ववान, बायको तापट, मुलगा तारुण्यात पदार्पण केलेला आणि मुलगी अर्ध्या चड्डीत (त्याच्या आईच्या मते) वावरणारी. आई आली की काय गोंधळ उडेल ते दृश्य त्याच्या डोळ्यासमोर आलं. ईशानला त्याचे डोळे कायमचेच मिटल्यासारखे वाटले.

कुणाच्यातरी सोबतीने कांताबाईने सातासमुद्रापलीकडे झेप घेतली. निसर्गाच्या कुशीत लपलेल्या छोट्याशा गावात तिने पाऊल टाकलं  आणि हुरळलीच ती.
"आता काय मी परत न्हाई जात. हे आपल्या बुद्रुकवानीच हाय की. अंमल क्लीन हाये इतकंच. आनि पीपल कमी हायेत." वडगाव बुद्रुकला राहून जितकं इंग्रजी कानावर पडत होतं ते अमेरिकेत वापरायचंच असा कांताबाईचा पक्का निर्धार होता. ईशानला तिचं इंग्रजी बोलणं जाणवलं पण त्याच्या कानावर तप्त गोळा पडला तो तिच्या ’परत न्हाई जात’ ह्या वाक्याने. शानी, खरं तर तिचं नाव सानिका होतं पण ईशानची बायको झाल्यावर ती शानी झाली.  तर, शानीचा चेहरा संतापाने लालेलाल झाला. ऐश्वर्याला, ईशानच्या लेकीला आता ’फुल्ल’ कपड्यात वावरायला लागणार म्हणून दडपण आलं.  ईशानचा मुलगा मात्र नेहमीप्रमाणे खूश होता कारण तो स्वत:तच इतका गर्क होता की येऊ घातलेल्या संकटाची त्याला कल्पनाच नव्हती. कांताबाई धडाडीची. मनात आलं की धडकलीच ते करायला. त्यामुळेच तिच्या ’परत न्हाई जात’ या शब्दांनी ईशानचं धाबं दणाणलं.
"आई, गावातल्या शेताचं काय?" त्याने गुळमुळीत आवाजात विचारलं.
"त्येची चिंता तुला कस्यापाई?"  ईशानच्या सोफ्यावर मांडी घालून कांताबाईने तंबाखू खाण्यासाठी चंची उघडली.  शानीच्या नेत्रकटाक्षाकडे ईशानने दुर्लक्ष केलं.
"जीव ल्हान नगं करु. मी आलीच हाये तर जरा हितं बगून घेती कसी करत्यात श्येती ते. उपेग व्हईल त्येचा. आय बिजनेस वुमन्स." कांताबाईचं उसाचं शेत तर होतंच बरोबर भाज्या पिकवत होती ती मळ्यात, झालंच तर रोपं विकायची फुलझाडांची. अफाट ज्ञान होतं तिचं या विषयाचं."
"राहा गं तुला किती राहायचं ते." ईशान भावुक झाला. ईशानचे बाबा गेल्यावर कांताबाईनेच त्याला वाढवलं. ती म्हणते तशी खरंच ती ’बिझनेस वूमन’ होती. अभिमानाने ईशानचा ऊर भरुन आला. 

दुसर्‍या दिवशी सकाळी कांताबाई बाहेर पडली. गावासारखंच. भल्या पहाटे उठायचं आणि फिरायला बाहेर पडायचं. ईशानने निक्षून एकटं कुठे जायचं नाही सांगितलं होतं पण पहाटे पाच वाजता ढोरागत झोपलेली सगळी. तिने गुपचूप दार उघडलं. कुठे जायचं ते ठाऊक नव्हतं. पण जसं जाऊ तसं परत येऊ इतकी खूणगाठ मनाशी बांधत ती फिरत राहिली. प्रत्येकाच्या घरासमोरच्या बागेतल्या फुलझाडांच्या ती प्रेमातच पडत होती. मग हळूहळू तिला माणसंही दिसायला लागली. एकजात सगळी तांदळाच्या पिठासारखी पांढरी धोप. त्यांच्या रंगाचं तिला कौतुक वाटतंय तोपर्यंत रंग बदलला. काळी, पांढरी, तपकिरी... किती रंग ते माणसांचे. तिला अमेरिका एकदम फुलपाखरासारखी वाटायला लागली. तासभर छान गेला कांताबाईचा.

 कांताबाई घरी परत आली तरी घरातली अजून झोपलेलीच.
"च्या करती रं. उट. उसीरापावेतो स्लीप बरी नाय बाबांनो. उटा" ती जोरात म्हणाली. निदान शानी तरी उठेल म्हणून तिने थोडावेळ वाट पाहिली. पण सारं शांत होतं. चहा ठेवायला भांडं काढलं आणि ती अचंबित झाली.
"काय बाय तरी हे आक्रित. तिगासाठी च्या इतक्या मोट्या टोपात करायचा."  जाडजूड पातेल्याकडे ती कौतुकाने पाहत राहिली. ईशान आळस देत आला तशी तिने उत्साहाने चहा त्याच्यापुढे ठेवला.
"वाक करुन आली रं मी."
"वाक?" ईशानला आई काय म्हणतेय ते समजेना.
"अरं म्हंजी पिरायला जाऊन आले. वाकच म्हनत्यात ना तुज्या  विंग्रजीत?" ईशानच्या चेहर्‍यावर हसू उमटलं.
"ऐकून ऐकून यायला लागलंय  विग्रंजी. गावाकडं विंग्रजीची फॅसनच आलीये. सगली विंग्रजी बोलत्यात. मला बी येतं वाइच. आलेच हाये इतं तर बोलून बगीन म्हन्ती. कसं?" कांताबाई उत्साहाने म्हणाली.
"कुणाशी बोलणार आहेस तू इंग्रजीत?" ईशानने दचकून विचारलं.
"लई रंगीबेरंगी लोकं दिसली आज वाकला गेले व्हते तवा. उद्या बोलनार हाय मी तेंच्यासी."
"रंगीबेरंगी?" एव्हाना शानी पण संभाषणात समाविष्ट झाली.
"लई येगयेगल्या रंगाची बाई मानसं दिसली. पांढरी धोप, काली, तपकिरी म्हनून रंगीबेरंगी. आनि आज झाडं आनूया आपन. तुज्या बागत काई म्हंजी काई नाय." ईशानने मान डोलवली, शानीने नाराजीने उडवली पण कांताबाईची मागणी पुरी झाली नाही. तीन - चार दिवस वाट पाहून झाडं आली नाहीत. कार्यतत्पर कांताबाईनेच कामाला लागायचं ठरवलं. तरातरा चालत ती कोपर्‍यावरच्या घरात गेली. तिथे गेले दोन दिवस ती रस्त्यावर ठेवलेली झाडं पाहत होती. त्यातलं  एक झाड तिने उचललं. तेवढ्यात आतून कुणीतरी धावत आलं.
"एक्स्युज मी." कांताबाई त्याच्या आवाजाने धास्तावली. हातातलं झाड घट्ट पकडून  ती तशीच उभी राहिली.
"पुट इट डाऊन. दॅटस माईन. आय अॲम प्लॅनिग टू प्लॅन्ट इट टुडे."
"वाइच विग्लिस बाबा, वाइच विग्लिस. यू विग्लिस...लांब आनि विमानावानी फास्ट." तिने त्या माणसाला समजवायचा प्रयत्न केला. त्याने तिच्या हातातलं झाड घेतलं आणि हाताने, तोंडाने  तो ते झाड त्याचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत राहिला.
"रस्ता ना, झाड ऑन रस्ता म्हनून ते माय, माय." हाताने आधी कांताबाईने रस्ता दाखवला. मग त्याच्या हातातलं झाड घेऊन ती म्हणाली
"दिस... मी कॉल झाड." तिने ते झाड रस्त्यावर ठेवलं. मग ती पुन्हा म्हणाली.
"रस्ता, झाड. झाड ऑन रस्ता" तोंडाने एकच गोष्ट आळवत, उजव्या हाताने स्वत:च्या छातीवर थोपटत ती झाड ऑन रस्ता म्हनून माय, माय करत राहिली. वडगाव बुद्रुक मध्ये ऐकलेलं इंग्रजी कांताबाई नाट्यपूर्ण आविष्कारांसकट पणाला लावत होती. बराचवेळ झाड या हातातून त्या हातात जात राहिलं. अखेर चायनीज माणूस झाड छातीशी कवटाळत रस्त्याच्या कडेवर बसलाच. कांताबाई पण त्याच्या बाजूला बसली. आता झाडावरुन तिचं लक्ष त्याच्या डोळ्याकडे गेलं.
"यू स्वेटर विनते?" स्वेटर विणण्याच्या खाणाखुणा त्याला समजेनात तसं तिने त्याला उभं केलं. त्याच्या अंगावरच्या जॅकेटला ती हात लावत राहिली. तो मागे झाला तसं तिने जॅकेटला हात लावणं थांबवलं.
"आय नो हर्ट. जॅकेट आऊट" स्वत:चं  जॅकेट काढत असल्याचे हावभाव कांताबाईने केले. त्याने मुकाट्याने आपल्या अंगावरचं  जॅकेट काढलं. मग कांताबाईने थंडीने कुडकुडण्याचा आविर्भाव केला आणि पुन्हा त्याला जॅकेट चढवलं.
"ओ, यू मीन जॅकेट" जॉनने कोडं सोडवल्यासारखी आनंदाने उडी मारली.
"नो, नो" तिने पुढे होत त्या जॅकेटवरची वुल हाताने कुरवाळली.
"स्वेटर" तो आनंदाने किंचाळला. जॉनबुवाला अमेरिकेत आल्यापासून इतकं पेचात कुणी पाडलं नव्हतं. कांताबाईचा प्रत्येक शब्द म्हणजे कोडं होतं आणि ते कोडं सोडविण्याचा आनंद विलक्षण होता.
 "येस, येस" कांताबाईही त्याच्याइतक्याच आनंदाने चित्कारली. स्वत:ला इंग्रजी येतं आणि ते समोरच्याला समजतं हा द्विगुणित झालेला आनंद कांताबाईच्या किंचाळीत होता. जॉन थोडासा दचकला पण तेवढ्यात तिने डोळे मिचकावत, बारीक करत त्याच्या डोळ्यांना हात लावला.
"ओ, आय गॉट इट नाऊ. यू आर टॉकींग अबाऊट नेपाली गाय. नॉट मी. यू मस्ट हॅव सीन देम ऑन इंडियाज साईडवॉक, सेलिंग स्वेटर्स." कांताबाई जॉनचं बोलणं कानात प्राण आणून ऐकत होती. पण त्याचं इंग्रजी बुद्रुक शैलीतलं नव्हतं. तरीही समजल्यासारख्या माना हलवत जिवणी या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरवून ती प्रसन्नवदनाने त्याच्याकडे पाहत होती. पण गाय म्हटल्यावर तिला धक्का बसला.
"गाय? अमेरिका हाय बाबा ही. इतं गायी नाय उंडारत. यू चल बुद्रुक.  आय दाखव इंडियन गाय,  गायी, गायी... "  त्याच्या पाठीवर हात फिरवला तिने. ईशानशीच गप्पा मारतोय असं वाटत होतं कांताबाईला. जॉनपण खूश होता. दोघांनाही अर्थ कळत नसला तरी कानावर पडणार्‍या आवाजाचं अप्रूप होतं. इतक्या पहाटे कुणीतरी बोलायला सापडणं कठीणच होतं. त्यामुळे कोण काय बोलतंय समजलं नाही तरी एकमेकांच्या सोबतीने, आवाजाने दोघंही खूश होते.
"अमेरिका लई भारी. तुमच्याकडलं टोप बी मोटं आनि जड." कांताबाईने खाणाखुणा करत त्याला सांगितलं.
"यू लई बॉरी. लाईक माय मॉम." तो कौतुकाने तिच्याकडे पाहत होता. कांताबाईला चेव चढला. तिने झाडांबद्दल त्याला बरीच माहिती दिली. त्याला काही कळलं नाही तरी त्याने तिचा हात हातात घेतला. तिने पण त्याचा हात तिच्या हृदयावर ठेवला आणि तो तिथे आहे हे त्याला पटवलं.  घरी परत जाताना जॉनबाबाच्या हातात दोन झाडं आणि तिच्या हातात मावतील तितकी झाडं होती.

"अगं ही झाडं कुठून आणलीस?" ईशान तिच्याबरोबरचा माणूस पाहून चांगलाच घाबरला.
"आय अॲम जॉन. ऑल दिज प्लॅन्टस फॉर युवर मॉम."
" हा कोपर्‍यावरच्या घरात राहतो. त्येच्या घरासमोर रस्त्यावर पडलेली झाडं. मी उचलली..." पुढचं ईशानने ऐकलं नाही.
"आय अॲम व्हेरी सॉरी जॉन. शी डिडंट नो दॅट इट बिलॉग्ज टू यू."
"नो, नो दॅटस फाइन. इट इज अ गिफ्ट फ्रॉम मी टू यूवर मॉम." शानी सासूकडे पाहतच राहिली. इतकी वर्ष या देशात राहून तिला कुणी घरापर्यंत पोचवायला आलं नव्हतं. झाडाबिडाची तर गोष्टच सोडा.
"खूप महाग आहे हे झाड. १०० डॉलर्स तरी किंमत असेल एकेका झाडाची." ती ईशानच्या कानाशी पुटपुटली. शानीला आयुष्यात पहिल्यांदा सासू आपल्याकडे आल्याचा आनंद झाला.
"युवर मॉम इज सो स्वीट." स्वीट ऐकलं आणि कांताबाई  उत्साहाने उठली.
"शिरा, शिरा. मी शिरा. शिरा कुक." असं म्हणत जॉनच्या हाताला धरुन कांताबाईने त्याला घरात नेलं. ईशान, शानी मुकाट्याने त्या दोघांच्या मागे गेले. शानीने शिर्‍याचं सगळं साहित्य काढून दिलं. कांताबाईने एका बाजूला रवा भाजायला घेतला आणि जॉनला विचारलं.
"यू वडा?"
"वडा..." सगळेच गोंधळले.
"गोल, गोल...वडा गोल." शानीला पटकन कळलं.
"अहो, बटाटावडा म्हणतायत त्या." घरी आलेल्या पाहुण्याला शिरा आणि बटाटावडा खायला घालून कांताबाईने तृप्त केलं.  त्या दोन तासात शेजारी असूनही आतापर्यंत  जेवढ्या गप्पा झाल्या नसतील तेवढ्या ईशान, शानीने जॉनबरोबर आज पहिल्यांदा केल्या. कांताबाईला ’उद्या भेटू’ म्हणून घट्ट गळामिठी देत जॉन खूश होऊन परत गेला.

ईशानची मुलंही आजीचा करिश्मा पाहून खूश होती. ईशान - शानीच्या चेहर्‍यावर हास्य होतं. घरातलं वातावरण एकदम दिवाळीचं होऊन गेलं. दुपारी कांताबाईच्या हातच्या चविष्ट जेवणाची चव तोंडात रेंगाळत असतानाच दार वाजलं. ईशानने दार उघडलं.
"इज कांटाबाय होम?" स्वत:चं नाव ऐकल्यावर कांताबाईसकट सर्व बाहेर डोकावले.
"जॉन सेंट अस टू टेक हर अॲडव्हाईस अबाऊट प्लॅन्टस." दारासमोर गोळा झालेला घोळका आणि घोळक्याने कांताबाईला भेट म्हणून आणलेल्या झाडांकडे ईशानचं कुटुंब चकित होऊन पाहत राहिलं. कांताबाई पुढे झाली.
"ये ये...इन. आय बोलेन....माय नात - नातू हेल्प." आजीवर भाळलेली दोन्ही नातवंडं, तिच्या मराठीचं भाषांतर करणं जमणार नसलं तरी त्यात सामील झाली. सुहास्य मुद्रेने शानीने सारी झाडं स्वीकारली आणि अतिशय प्रेमाने सासुकडे पाहताना ’कांताबाईचा सल्ला’ नावाची ’कन्सल्टिंग फर्म’ उघडायचं स्वप्न तिच्या डोळ्यात तरळलं.