"इऽऽऽयु..."
"काय गं काय झालं?" मॅच बघता बघता दर्शनाला काय झालं ते नीताला कळेना.
"फेसबुक स्टॅटस अपटेड करतेय गं."
इऽऽऽयु...हे काय स्टॅटस ते कोडं नीताला सुटलं नाही.
"अग बघ एक गेला." नीताने गुगली टाकली.
दर्शनाने घाईघाईत परत वॉलवर लिहलं.
"तू पोस्ट केलस? मी गंमत केली. कुणीही बाद झालेलं नाही."
दर्शना रागारागाने निताकडे पहात राहिली.
"अगं, मला बघायचं होतं दोन्ही, दोन्ही कसं जमतं तुला ते. बघायचं, वॉलवर पोस्ट करायचं, बघायचं,पोस्ट करायचं."
"तेवढ्यात ब्लॉग पण वाचते मी."
"काय आहे मॅचबद्दल?"
"निषेधाचे स्वर. सचिनने अंगाभोवती गुंडाळलेला भारताचा झेंडा, कुणीतरी झेंड्याला पुसलेलं नाक आणि घाम आणि मॅच संपल्यावर रस्त्यावर केलेला जल्लोष. उत्तरं आणि प्रत्युत्तरं. बरचं काही आहे." दर्शना म्हणाली.
किती बदललं होतं सारं. मॅच बघता बघता आम्ही लेखणी चालवत होतो, खात होतो, फेसबुक, ब्लॉगवर कोणी काय पोस्ट केलं आहे ते पहात होतो.
अगदी नकळत गुजरे हुए दिन.... आठवायला लागले. जेव्हा दिलीप वेंगसरकर, सुनील गावसकर, चेतन.... काय बरं आडनाव होतं? आठवत नाही. यांच्याबरोबर आम्ही खेळायचो ते दिवस, त्या स्मृती....म्हणजे ते खेळायचे तेव्हाच आम्हीही खेळायचो ते दिवस. हे सगळे बॉलला बॅटचा दणका दाखवयाला लागले की आम्ही शेजार पाजारची पोरं अंगणात उतरायचो. घाईघाईत दोन संघ तयार व्हायचे. तेरा मुलं. आठ मुलं, पाच मुली. मग इकडून तिकडून कोणी कोणाला तरी आणायचं. पोरं जमली की सगळी मुख्य सामुग्रीची जमवाजमव. म्हणजे फक्त बॅट आणि बॉल. ती एकत्र झाली की चौकार, षटकाराच्या रेषा आखल्या जायच्या, बदलायच्या. म्हणजे कुणी अडूनच बसलं की सोयीप्रमाणे. ज्याच्या घरुन बॉल आणलेला असेल तो पहिल्यांदा बॅटिंग करणार म्हणून हटून बसणार. मग करसन घावरीसारखा राजु, पराग नाहीतर विकास पँटच्या खिशाला हात घासत, बॉलला थुंकी पुसत चकाकी आणायला सज्ज. ते पाहिलं की मुलींचा इऽऽऽ असा चित्कार. त्याच्यांकडे तुच्छतेने पहात गोलंदाज उजवा हात गोल गोल फिरवत धावपट्टीवर विमान कसं हळूहळू वेग घेतं तसा वेग घेत धावत यायचा. तो आता न थांबता थेट स्टम्पवर जाऊन आदळणार असं वाटतय तोवर बॉल निसटायचा हातातून आणि सरळ कुणाचीही तमा न बाळगता बाजूच्या कुंपणावरुन उडी मारुन पळ काढायचा तो चित्रेबाईंच्या मागच्या अंगणात. तिथे गेलं तर त्या लगेच गणित शिकवायला सुरुवात करतील ही भिती. लपून छपून उडी मारुन आणायला लागायचा परत. चूकून एखादा बॉल पत्र्यावर आदळला की, धडाडधुम. हा मोठा आवाज.
"गाढवांनो, उन्हात कसले खेळता. चला घरात." त्या आवाजाने वैतागून आई नाहीतर शेजारच्या काकू डोकावायच्या. केवढा गुन्हा बॉलरचा. त्याच्याकडे रागारागाने बघत आम्ही येतो, येतो अशा माना डोलवायचो.
चेंडू, आला, आला आणि पायाला कुठेही लागला की,
"एल. बी. डब्ल्यू, एल. बी. डब्ल्यू." सगळे उड्या मारत पुढे धावलेच. एल. बी. डब्ल्यू च्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगवेगळ्या. मग खेळणारा ते नाकारणार. पंचाचा तर गोंधळच. पंच नेहमी कच्चं लिंबू. कच्चं लिंबू आपला हात वरही करायचा आणि लगेच खालीही. निर्धाराने त्याने बोट वर ठेवावं की कुणीतरी ते खाली ओढणार. मग आरडाओरडा, भांडणं. ज्यांची, ज्यांची बॅटिंग झाली असेल ते रागारागाने निघून जायचे. आपण आऊट की नाही ते नक्की होईपर्यंत बॅटमनपण तग धरायचा. आऊट झाला की तोही संतापाने बॅट फेकणार, तरातरा निघून जाणार. फिल्डिंग टाळायचा सोपा उपाय. उरलेले नाईलाजाने खेळ रेटायचे. बॉल स्टंम्पवर (पत्र्यावर) आदळला की दोन हात हवेत उडवत पंचाकडे जाऊन जितकं वाकता येईल तितकं वाकून हाऊज हाऊज, किंवा हाऊड, हाऊड असं काहीतरी म्हणत पंचाच्या मनावर आघात करायचो. ते हाऊ इज दॅट असतं हे खूप वर्षानी कळलं. या काही तासीय सामन्यात कधीतरी एखादा मध्येच आत गेलेला बातमी घेवून यायचा.
"अरे, गावसकर गेला." की बसले सगळे कपाळाला हात लावून खाली. तेवढ्यात जो आत गेला होता तो फिल्डींग सोडून आत गेलेला होता हे कुणाच्या तरी लक्षात यायचं. मग एकदम सगळे त्याच्यावर तुटून पडत. बॉल मारुन मारुन बुकलून काढायचं.
माझ्या हातात चेंडू आला की सगळे एकदम लांब लांब जावून उभे रहायचे. बहुधा माझ्या पी. टी. उषासारख्या वेगाला घाबरुन. मी तर पी. टी. उषा त्यामुळे थांबणं कठीणच. पांढर्या रेषेच्या पुढे जवळजवळ फलंदाजाच्या आसपास पोचायला व्हायचं. "फाऊल" ओरडलाच लंबू. पण तोपर्यंत मी टाकलेला चेंडू बॅटमनच्या विरुद्ध दिशेला बंदुकीच्या गोळीसारखा निघालेला असायचा. वाकडा तिकडा होत कुठे पडायचा देव जाणे. मग फिल्डरही आपण फिल्डींग कशी लांबवर शहाण्यासारखी लावली होती या आवेशात तो बॉल आणत. नंतर मग चौकार, षटकार तीस एक धावा होवून जात त्या बॅटमनच्या षटक संपेपर्यंत. त्यातच आमचीही चंगळ असे. त्याने मारलेल्या बॉलने चिंचा पडत काहीवेळेस. फिल्डर असलेल्या मुलींना कधीही कॅच घेता आली नाही पण चिंचा मात्र अलगद दोन्ही हाताच्या ओंजळीत पकडत. एकदा का चिंचा जमल्या की आमची फिल्डींग एका जागी राहून असायची. चिंचा खात, गप्पा मारत आम्ही जमेल तेव्हा, मनाला येईल तेव्हा बॉल अडवायचो. सगळे क्षेत्ररक्षक दातओठ खात बघायचे. आम्ही दुर्लक्ष करत खी, खी हसायचो.
बॉलिंग इतकी जमायची नाही पण माझी बॅटींग जबरदस्त. बॉल आला की बॅट हवेत फिरलीच. काहीवेळा बॉलसारखी बॅटच उडे. ती उडाली रे उडाली की पाठ फिरवून सगळे धावायला लागत. पार एका टोकाला पोचत. त्यामुळे वाचले सगळे, जखमी झालं नाही कुणी कधी. तशी आमची प्रथमोपचार आणि पाणी आणणारी माणसं पण होती. नेहमीच्या मॅचमध्ये राखीव खेळाडू हे घेवून येतात तसे आमचेही राखीव खेळाडू होते. राखीव राहिलं तर पुढच्या वेळेला दोनदा बॅटींग एवढ्यावर कुणी ना कुणी राखीव रहायला तयार व्हायचं. मग मध्येच कुणीतरी पाणी मागायचं. फिल्डींगचा कंटाळा आला की जखमी व्हायचं. तिथेच फतकल मारुन बसायचं. पाणी आणि प्रथेमोपचार म्हणून असलेलं एकमेव आयोडेक्स यायचं. पाणी पिता पिताच मुलीतली एखादी जोरात ’ओ’ म्हणायची. मग दुसरी समजल्यासारखी म्हणायची,
"तुला आई बोलावतेय." ती लगेच पळ काढायची. एकीकडे खेळ चालू असतानाच हळूहळू दोन्ही संघातल्या मुली बॅटींग झालेली असेल तर घरात गेलेल्या असायच्या. मग मुलांचा खेळ जोरात सुरु तो पार काळोख पडेपर्यंत. याच पद्धतीने कितीतरी वर्ष आम्ही क्रिकेट खेळलो. भारतीय संघाने आता कुणाला काढायला हवं यावर तावातावाने चर्चा केल्या. मग कधी कुणास ठाऊक पण हे सगळं मागे पडलं. मॅच बघण्याचा उत्साह टिकला पण खेळायचा कधीतरी संपून गेला. अमेरिकेत आल्यावर पुरुषांचे, मुलांचे संघ आहेत हे कळलं पण कधी बायकांनी पण खेळायला हवं अशी हुक्की आली नाही ती वर्ल्डकपमधला भारत पाकिस्तान आणि भारत श्रीलंका सामना पाहीपर्यंत. आता वाटायला लागलं आहे आपणही खेळावं पुन्हा. आहे कुणी तयार?
हो,मी तयार आहे,कधी सुरुवात करूया?- राधिका
ReplyDeleteराधिका आपलीही संडे टीम करुया?
ReplyDeleteA picturesque description indeed. Few things I had forgotten came alive. A sixer!!
ReplyDeleteजलद गोलंदाजी मस्त जमली. आवडली.
ReplyDeleteसुधीर कांदळकर (मनोगत संकेत स्थळावरुन).
बॉलला थुंकी पुसत चकाकी आणायला सज्ज. ते पाहिलं की मुलींचा इऽऽऽ असा चित्कार.
ReplyDeleteअगदी अगदी.
हाऊज हाऊज, किंवा हाऊड, हाऊड असं काहीतरी म्हणत पंचाच्या मनावर आघात करायचो.
हा हा तुमचे इंग्लिश तरी फार चांगले होते. आम्ही आउटस दॅट म्हणायचो.
धमाल आली. एकदम मस्त
हा हा..
ReplyDeleteआम्हाला 'हाउ इज दॅट' हे 'आ--वा---ज दे' असं ऐकू यायचं म्हणून मी पण तसंच म्हणायचे !! जुन्या आठवणी ताज्या झाल्या.