Tuesday, December 11, 2012

लग्नाविना सहजीवन

भारताबाहेर राहणारी शनिवारी संध्याकाळी बर्‍यांचदा जेवायला एकत्र भेटतात तेव्हा हमखास कुणीना कुणी नुकतंच मायदेशातून परत आलेलं असतं. चर्चेचा ओघ, माघारी सोडून आलेला भारत आता किती बदलला आहे इकडे वळतो. तिथला चंगळवाद, वेष, मुलाचं वागणं आणि हल्ली हल्ली ’लिव इन रिलेशनशिप - लग्नाविना सहजीवन’. 

एकंदरीत आत्तापर्यंत होणार्‍या या चर्चांमधून हे जसं सुप्रीम कोर्टाने मान्य केलं आहे तसंच समाजमान्यही झालं आहे असं वाटत होतं, पण अगदीच कुणी कसं माहीत नाही आपल्याला असं सहजीवन असणारे असाही एक प्रश्न मनात डोकावायचा. 

काल दिवाळी २०१२ चा लोकसत्ता वाचला आणि मनात खूप शंका निर्माण झाल्या लग्नाविना राहणार्‍यांच्या मुलाखती वाचून. लेखात आधीच नमूद केलं आहे की अपरिहार्यता हे बहुतेकाचं कारण आहे लग्नाविना सहजीवनाचं. घटस्फोट घेतल्यानंतर पुन्हा त्या फंदात पडायला नको अशी माणसं ही व्यवस्था स्विकारतात किंवा मग पहिल्या लग्नापासून फारकत मिळत नसल्याने नाईलाजाने एकत्र रहाणारी. मुलाखतीतील बहुतांशी सर्वांची नावं बदलली आहेत, अशी जोडपी आपण विवाहीत आहोत असंच सांगतात असाही उल्लेख आहे. 

बहुतेक वेळा पाश्चात्यांचं अनुकरण म्हणूनही अशा रुजू पाहणार्‍या प्रथांवर खापर फोडलं जातं. पण अमेरिकेत तर लग्न करायचं की नाही हे ठरविण्यासाठी दोघं एकत्र रहात असतात आणि कधी ना कधी ती लग्न होतात, म्हणजे लग्नाशिवाय सहजीवन सुरु करायचं हा हेतू नसतोच. लग्नासाठी जोडीदार योग्यं आहे की नाही हे अजमावण्यासाठी हे सहजीवन सुरु होतं. या देशात जेव्हा घटस्फोटाचं प्रमाण वाढलं तेव्हा निर्माण झालेला हा पर्याय आहे. 

मग भारतातील लग्नाविना सहजीवनामागे अपरिहार्यता हेच कारण असेल तर तो लग्नसंस्थेला खरंच पर्याय आहे का?

12 comments:

 1. मी सुद्धा या विषयावर नाटक लिहिण्याच्या विचारात होतो, आहे.
  खरे तर लग्न हि एक समाजमान्य शारीरिक सोय आहे. त्यातून निर्माण
  होणाऱ्या नात्यांची गुंफण मानवी प्रवृत्तीला सुसंस्कुतपणाच्या वलयात
  जखडून ठेवण्यात यशस्वी होत होती. परंतु आज अशा कोणत्याही बंधनात
  अडकून पडण्याची मानसिकता उरलेली नाही. विलासी जीवन पूर्वी राजे
  महाराजे यांच्यापर्यंतच स्तिमित होत. आज विलासीपणाची जागा भोगाने
  बळकावली आहे. त्यामुळेच एकटी स्त्री दिवसेंदिवस असुरक्षित होऊ लागली आहे.
  अपरीहार्यपणे ती पुरुषाच्या सोबतीची अपेक्षा करते आणि शेवटचा पर्याय
  म्हणून अशा रिलेशन मध्ये अडकते. इथे मुलांची अपेक्षा जवळपास शून्य असते.
  फक्त आलेली वेळ मारून नेण्याचा केविलवाणा प्रयत्न असतो. भविष्याचा विचार
  जवळपास नसतोच. कदाचित भविष्यात अनुभविंकडून काही टर्म्स कंडीशन्स तयार होतील
  पण आजची स्तिथी विदारक आहे एवढे नक्की.

  ReplyDelete
 2. लग्न म्हणजे स्त्री पुरुष संबंधाला समाज आणि आप्तेष्ट यांनी दिलेली मान्यता. पण जसा मानव प्रगत होतोय तसा तो राहात असलेला समाजही प्रगत होतोय. होणारे बदल कालानुरूप कधी चांगले तर कधी वाईट ठरतात. साधारणपणे वीस वर्षांपूर्वी असलेलं लग्नसौस्थेच स्वरूप आजच्यापेक्षा वेगळ होतं. गेल्या दहा वर्षात भारतात घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे. दुक्खी सहजीवन जगण्यापेक्षा फारकत घेऊ असा उपाय होता तो. आज त्याच्या पुढची पायरी आहे. घटस्फोट घेऊन आयुष्य गुंतागुंतीचं करण्यापेक्षा सराव परीक्षेसारखं लाग्नाविनाच सहजीवन पर्याय म्हणून शोधलं जातंय. . एकत्र राहण्यातून प्रेम निर्माण होताच असं नाही. लग्न टिकण्यासाठी त्याची आवश्यकता असते. नाही आवडला एक साथीदार की शोधला दुसरा साथीदार अशी भूमिका योग्य नाही. नाहीतर अश्मयुगात राहणारा माणूस आणि आजचा माणूस यात फरक तो काय ? वैचारिक प्रगल्भता असली तर माणूस सकारात्मक भूमिका घेऊ शकतो. प्रगती बरोबर आज त्याची गरज आहे. माणसाच्या मूलभूत विचारांच्या फरक पडला की हळूहळू समज बदलायला लागतो. आपलाही बदलतो आहे. हे झालं तरुण पिढीचं !!
  मोहना, उतार वयात हा पर्याय स्वीकारणारे लोक आहेत. ते नक्कीच गरजे पोटी आहे. सहजीवन ही माणसाची गरज आहे. घरट्यातली पिल्लं उडून जातात. पंखात त्यांच्या बरोबर भरारी मारण्याचा बळ उरत नाही. कधीमधी त्यांची भेट होते. मग गरजेपोटी हा पर्याय स्वीकारला जातो. यात व्यवहाराचा भाग असा मोहना की आई वडिलांच्या पश्चात त्यांनी जोडलेल्या नाते संबंधातून कायदेशीर हक्काच्या अडचणी उभ्या राहतात. ते टाळावं म्हणून कदाचित आला असेल हा पर्याय.
  बघ ना समाजात कसे बदल होत आहेत. समाजाकडून स्त्री शिक्षणाला विरोध.... नंतर मान्यता, विधवा विवाहाला विरोध.... नंतर मान्यता, घटस्फोटाला विरोध ...... नंतर मान्यता. आज........लग्नाविना सहजीवन ???........??????
  घरी एका दिवाळी अंकात सतीश राजवाडे यांची मुलाखत आहे. एका लग्नाची दुसरी गोष्टं च्या निमित्ताने. आता ती नक्कीच वाचयला हवी !! कालाय तस्मै नमः

  ReplyDelete
 3. Shivkumar PathsarthyDecember 11, 2012 at 5:58 PM

  Tumhi je lihle te aahe.. Pann Bhartaat ataa khup lokk livein opt kartaat... Fakth divorcees navhe.. Mee khup lokaana olakhtoh jyane live in relatn madhe aahe... I feel we havnt attained the req maturity level yet to go for livein..

  ReplyDelete
 4. मुळात लग्नसंस्थेला एखादा पर्याय आहे का? असा विचार आपल्या मनात सहज येण्याजोगी लग्नसंस्था आपणा सर्वांच्या आयुष्यात का रुतून बसली आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. सहजीवन ही मनाची मनाने मनासाठी स्विकारलेली मानवी मनाची भावनिक अवस्था आहे आणि असते. तर लग्नसंस्था ही मानवी संस्कृतीने मानवी जीवन काही विशिष्ट मार्गाने सुरळीत आणि निरंतर चालू रहावे म्हणून निर्माण केलेली व्यवस्था आहे. अर्थातच लग्नसंस्थेला धर्म, नीतीमत्ता वगैरे कंगोरे आहेतच. पण लग्नसंस्था ही मानवी मनाची अवस्था नसून समाजाने निर्माण केलेली व्यवस्था आहे हे खरेच आहे. प्रश्न हा आहे की माणसाने मानवी मनाच्या संवेदना आणि भावनिक गरजांना अनुसरून सहजीवन जगायचं की लग्नसंस्था स्विकारून एका पर्यायी व्यवस्थेत जगायचं? काय करायचं? कोणता प्रर्याय स्विकारायचा हा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे. हा तसा वैश्विक प्रश्न आहे. त्याचा फक्त भारतातल्या समाजजीवनाशी संबंध जोडून विचार केला जावू नये असं मला वाटतं, कारण भारतात इतर देशांपेक्षा विवाहसंस्था तुलनेने जास्त मजबूत असली तरी विवाह न करता एकत्र राहणाऱ्यांची संख्या तशीही पुरातन काळापासून दुर्लक्ष करता येईल इतकी कमी नाहीच आहे. तसेच परदेशात पण घटस्फोट आणि लिव्ह इन रिलेशनशीपचं चलन तुलनेने जास्त असलं तरी विवाहसंस्थेवर अविश्वास दाखवणाऱ्यांची संख्या तशीही परिणामकारक वाटावी इतकी कमी आहे.

  ReplyDelete
 5. मी स्वतः ३ वर्ष माझ्या प्रेयसी सोबत लिव्हिंग रिलेशनशीप मध्ये होतो , पुढे आम्ही लग्न केले व आता तिच्या देशात जर्मनी मध्ये स्थायिक आहोत.
  हयात काहीच वावगे मला दिसत नाही. ह्यापेक्षा भारतात अजूनही ,
  भ्रूणहत्या , देवीला वाहने म्हणजे मुरळी करणे अश्या प्रथा आहेत.
  आणि स्त्री अजिबात असहाय्य नसते.
  निसर्गाचे नियम दोघांनाही लागू पडतात. गरज दोघांची असते. फक्त भारतात ती पुर्षाने बोलून दाखवली तर चालते मात्र स्त्रियांवर बंधने असतात

  ReplyDelete
  Replies
  1. निनाद धन्यवाद, लग्नाविना सहजीवनाचा अनुभव घेतलेलं कुणीतरी माझ्या ओळखीचं झालं :-). पण तुमची जोडीदार जर्मन आहे, जर्मंनीमध्ये अशा नात्याला समाजाची बंधनं नाहीत. प्रश्न आहे तो तुम्हाला काय अनुभव आला? मला तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावण्याचा अधिकार नाही पण तरीही प्रश्न पडतो की तुमच्या घरातल्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती? नंतर नातेवाईक आलेच किंवा त्यापेक्षाही तुमची मानसिकता काय होती? कारण आपण आपले आई वडिल, आजी आजोबा वगैरेना लग्न करुन राहतानाच पाहिलेलं आहे मग लग्नाची आवश्यकता तुम्हाला का वाटली नाही? हा तुमचा निर्णय होता की जोडीदाराचा...? समाज बाजूलाच ठेवू म्हटलं तरी पावलोपावली आपल्याला समाजाबरोबरच चालायचं असतं. तुम्ही ही तीन वर्ष जर्मनीत एकत्र राहिलात की भारतात? आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही लग्न केलंच की, म्हणजे मी म्हणते तसं (अमेरिकन करतात त्याप्रमाणे) एकमेकांना साथ देता येईल का हे अजमावण्यासाठीच हे एकत्र राहणं होतं का?

   Delete

 6. बहुतेक वेळा पाश्चात्यांचं अनुकरण म्हणूनही अशा रुजू पाहणार्‍या प्रथांवर खापर फोडलं जातं. पण अमेरिकेत तर लग्न करायचं की नाही हे ठरविण्यासाठी दोघं एकत्र रहात असतात आणि कधी ना कधी ती लग्न होतात, म्हणजे लग्नाशिवाय सहजीवन सुरु करायचं हा हेतू नसतोच. लग्नासाठी जोडीदार योग्यं आहे की नाही हे अजमावण्यासाठी हे सहजीवन सुरु होतं. या देशात जेव्हा घटस्फोटाचं प्रमाण वाढलं तेव्हा निर्माण झालेला हा पर्याय आहे.

  हो का? म्हणजे अमेरिकेत लिव्हइन करणाऱ्यांमध्ये विवाहसंस्थेवर विश्वास नसलेले, घटस्फोटानंतर नवा डाव मांडण्याची इच्छा नसलेले, घटस्फोटाच्या लांबलचक खटल्यात अडकलेले, समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता नसल्यामुळे अपरिहार्यपणे लग्न न करता एकत्र राहणारे- असे लोक नसतात का? सगळ्या अमेरिकनांचा विवाहसंस्थेवर गाढ विश्वास आहे का?

  ReplyDelete
  Replies
  1. Anonymous - तेच तर म्हणते आहे मी. अपरिहार्यता वेगळी आणि स्वखुषीने निर्णय घेणं वेगळं. तुम्ही जे म्हणता आहात ती अमेरिकनांची अपरिहार्यता आहे, पण जी यातून गेलेली नसतात ती एकत्र रहातात ते लग्नांचा का निर्णय घ्यायला ती व्यक्ती योग्यं आहे का हे अजमावण्यासाठी. आणि गे, लेसबिनयचा लढा तर सर्वज्ञात आहे पण तोही कायदेशीर मान्यता द्या, लग्नं करु द्या यासाठी आहे हे विसरुन चालणार नाही.
   भारतात एवढ्या खुल्या मनाने तरुण मुलं हा निर्णय घेतात का? आणि अपरिहार्य परिस्थितीतून तो निर्माण झालेला असेल तर हा पर्याय खरंच आहे का असा प्रश्न पडतो.

   Delete
 7. मोहना, हा विषय थोडा क्लिष्ट आहे. म्हणजे माझ्या पिढीनेही जे सहजगत्या स्विकारलं ते नात्याचं बंधन स्विकारायला माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी असलेली मंडळी तयार नाहीत. आधी कुणाबरोबर राहून मग ते नातं लग्नात रुपांतरीत होत असेल तर चांगलंच आणि नाही पटत आहे हे कळून वेगळं म्हणजे लग्नाशिवाय होणं हेही समझे पण दोन्हीमध्ये एक अ‍ॅडजस्टमेंट आहे हे त्यांना कळतंय का देव जाणे. म्हणजे हा नाही तर तो तो नाहीतर तो असं कितीवेळा करू शकणार आहोत हाही मुद्दा आहेच. म्हणजे लग्नात आता अडका की नंतर दोघांनाही थोडा समजूतदारपणा दाखवावाच लागतो तरच नातं टिकतं हे या पिढीच्या लक्षात आलं आणि मग त्यादृष्टीने मानसिक तयारी केली तर मग खरंच लिव्ह इनची गरज उरेल का? त्यापेक्षा लग्नाआधीचं कोर्टिंग जास्त महत्वाचं नं?

  ReplyDelete
  Replies
  1. अपर्णा,
   अगदी खरं, सुहासनी वरती हेच म्हटलं आहे, पुन्हा हा जोडीदार बदला, तो बदला अशा विचारांची मंडळी लग्नाने तरी स्थिर होणार का हा प्रश्न उरतोच. कारण ’तडजोड’. व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पना बदलत चालल्या आहेत, तडजोड न करता सगळं मिळू शकतं असा भ्रम आहे....अशी आणि कितीतरी कारणं आहेत.
   एकत्र राहणार्‍या पण लग्न करण्याचा विचारही न डोकावलेल्यांचे अनुभव ऐकायला/वाचायला मिळावेत या गोष्टींवर प्रकाश पडण्यासाठी म्हणजे तीही बाजू समजेल असं वाटतं.

   Delete
 8. अशा प्रकारचे विचार अमेरिकेसारख्या प्रगत देशात समाजमान्य आहेत आणि त्यामागची करणे पाहता ते कदाचित योग्य पण असेल. पण आपला समाज आणि संस्कृती पाहता ह्या प्रकारचे विचार रुजायला नक्कीच वेळ लागेल. हे योग्य की अयोग्य हे तर काळच ठरवेल पण बदलाची सुरुवात झाली आहे हे मात्र नक्की.

  ReplyDelete
  Replies
  1. प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभारी.
   विचार समाजमान्य आहेत की नाहीत हा निराळा मुद्दा. माझं म्हणणं, चुकीच्या समजूतींच्या आधारे भारतात अनुकरण होतं पाश्चात्यांच्या गोष्टींचं. आणि मग आधी म्हटल्याप्रमाणे भारतातील लग्नाविना सहजीवनामागे अपरिहार्यता हेच कारण असेल तर तो लग्नसंस्थेला खरंच पर्याय आहे का?

   Delete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.