Thursday, February 14, 2013

वयाची ऐशीतैशी...

मंडळाचा कार्यक्रम छान रंगला. आलेल्या पाहुण्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी तरुण कार्यकत्याने मीनलच्या नावाचा पुकारा केला,
"आता मी मीनलताईंना विनंती करतो...."
मीनलच्या आजूबाजू्ला असलेल्या आम्ही मीनलताई म्हटल्यावर फिस्सऽऽऽ करुन हसलो. ती पण पदर फलकावित, ताईऽऽ काय..., किती स्वत:ला लहान समजायचं ते असं काहीसं पुटपुटत पुष्पगुच्छ देण्यासाठी गेली.
मीनल परत येऊन बसल्यावर ताई, माई, अक्का असे विनोद करुन झाले. आणि मग मनात तेच घोळत राहिलं.

घरी आल्याआल्या मेकअप पुसला. चेहरा खसखसा धुवून न्याहाळते आहे तोच लेक डोकावली.
"किती निरीक्षण करते आहेस स्वत:चं."
"अगं पिल्लूऽऽऽ..."
"इऽऽऽऽऽऽऽऽ, पिल्लू काय गं, मी काय आता लहान आहे का?"  पिल्लूला पंख कधी फुटतील याची घाई.
"अगं केस पांढरे झाले आहेत का काय ते पाहते आहे."
" ग्रेसफुली एजिंग आई, ग्रेसफुली एजिंग. पांढरे केस चांगले दिसतात, कशाला ते रंग बिंग लावायचे?."
"ए, ते  ग्रेसफुली एजिंग नट्यानांच शोभतं हं. म्हणजे सगळे उपाय करायचे, उपाशी तपाशी राहून शरीर थकवायचं पण तरी वय वाढणं काही थांबवता येत नाही की असं म्हणायचं.  वा  रे वा (इथे मी मुलीला ओरडते तशी त्या अदृश्य अनामिक नटीला ओरडले). आणि केस पांढरे होण्याचा आणि वयाचा काही संबंध नसतो." आपल्या दु:खावर आपणच  मलमपट्टी केलेली बरी.

"बरं, तुला इमेल आलं आहे बघ. ’पंखा’ आहे तुझा. लिहलय, मला ’अहो, जाहो’ नका म्हणू, मी तुमच्यापेक्षा लहान आहे." दु:खावर मीठ चोळणार्‍या त्या वाक्याने मी मुलीला, माझं इ मेल तू कशाला वाचतेस हे ही विचारायला विसरले.
"ह्यांना कसं काय कळतं कोण जाणे, मी मोठी आणि त्या लहानच असणार ते." लेक ढिम्म उभी बघून मला चेव चढला. " आमचं मेलं सगळं जगासमोर मांडलेलं. तरी बरं, संकेतस्थळांवर फोटो पाळण्यात असतानाचे टाकले आहेत. उभं राहून फोटो काढायचा तर एक पाय पुढे धरुन तो काहीसा वाकवून, मग पोट आत घेऊनच उभी राहते. या कसरती कमी म्हणून की काय चीजऽऽऽ म्हणताना नुकत्याच दि्सायला सुरुवात झालेल्या डोळ्याच्या बाजूच्या  एक दोन (?) सुरकुत्या दिसणार नाहीत असं हसायचं. इतकं करुन्ही  कशा या बायका माझं वय काढतात, स्वत:ला लहान समजतात?"  एखादी शोकांतिका समोर घडत असल्यासारखा चेहरा झाला असावा माझा.
"अगं आई तू लिहतेस ना, त्यातून कळतं तुझं वय. म्हणजे मुलांच्या वयाचे उल्लेख असतात ना त्यावरुन."
मोट्ठा शोध लागला असं वाटलं, चला यापुढे लेखनातून मुलं वगैरे बाद एकदम. खूप आनंद झाला समस्या शोधून उपाय केल्याचा म्हणजे  ’सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही......’  संपल्यासारखं वाटलं. पण काही क्षणच. प्रश्न पडला, मग मी लिहू तरी काय? माझी ही इतकी ’गुणी’ मुलंच तर सातत्याने विषय पुरवत असतात भलतंसलतं वागून माझ्या लेखनाला. माझ्या विनोदाचं मर्मस्थानच नष्ट केल्यासारखं होईल अशाने. तितक्यात लहान मुलाची समजूत घातल्यासारखी मुलगी म्हणाली.
"पण खरं तर तू आहेस त्यापेक्षा पाच वर्षानी लहान दिसतेस ते त्यांना कसं माहित असणार ना? ते वाचक आहेत प्रेक्षक नव्हेत."
"खरंच? म्हणजे काय वय वाटत असेल गं माझं?" उत्तर काय येतं याची धाकधूक होती परिक्षेला बसल्यासारखी.  पण त्यातून तरुन निघाल्याचा आनंद वाढवतील ती आपली मुलं कसली.  गणिताची बोंब असल्यासारखा लेकीचा हिशोब चुकला. माझ्या वयातली पाच वर्ष कमी होण्याऐवजी दहा वाढली. माझ्या एकाचवेळी पडलेल्या, लटकलेल्या, रागावून लाल झालेल्या चेहर्‍याकडे पाहून धोक्याचा इशारा तिने अलगद झेलला. विषयाचं तोंड दुसरीकडे फिरवण्याचा चतुरपणा ती वडिलांकडून शिकली आहेच.

"आई, तुझं बाई काही समजत नाही.  इकडे सर्वांनी तुला अगं तुगं करावं असं वाटतं, पण आपण मागच्यावेळी पुण्यात दुकानात गेलो होतो....."
ती काय विचारणार ते लगेच कळलं. पोरगासा दुकानदार.

"इकडे ये." हातातली थप्पी दाखवत तो म्हणाला. नुकत्याच मिसरुड फुटलेल्या मुलाकडून,  ए......ऐकल्यावर  मस्तक फिरलंच.
"मी काही शाळकरी पोरगी नाही. तुम्ही अगं तुगं का करताय?" फुत्कारत प्रश्न टाकला. तो हसला.
"नाही, जीन्समध्ये असलं कुणी की अहो, जाहो नाही करायचं असं बाबांनी बजावलं आहे." कुठे गेला तो तुझा बाबा हा प्रश्न  मी न विचारताही त्याने  जोखला.
"बाबा संध्याकाळी येतात दुकानात."
भरपूर कपडे पाहायचे पण घ्यायचं काहीच नाही. मी मनोमन बदला घ्यायचा ठरवलं आणि तस्संच केलंदेखील.
दोन पौंड वजन कमी केल्यासारखा आनंद झाला बदला घेतल्यावर. त्या आनंदात तरळत नवथर उत्साहात दुकानाच्या पायर्‍या उतरले. आत्ताही चेहर्‍यावर तसे भाव आले असावेत.
"आई...." मुलीने लक्ष वेधलं.
"अगं ते वेगळं. म्हणजे बघ कंडक्टर, रोजच्या कामवाल्या आजी, भाजीवाली सगळे कितीही मोठे असले तरी त्यांनी आपल्याला अगं तुगं करुन कसं चालेल?"
"असंही असतं? आमच्या इंग्लिशमध्ये सगळ्यांसाठी सारखाच नियम असतो."
"हं... ते वेगळं." उत्तर न सुचून पुन्हा ते वेगळं चा सूर पकडला मी.

सध्या माझी मोहीम सगळ्या ब्लॉग ना भेटी द्यायच्या, खालच्या कॉमेंट्स वाचायच्या आणि खुषीने उड्या मारायच्या अशी आहे. म्हणजे प्रत्येकजण या अनुभवातून कधीना कधी जातोच तर हे समाधान त्या खुषीच्या उड्यांमागे.
काही ब्लॉगर्सची आधीच विनंती असते ’अगं/ अरे’ म्हणायची, नाहीतर काही ठीकाणी
मला कृपया ’अहो’ म्हणू नका,  ’सर काहीतरीच वाटतं बुवा’ अशी आर्जवे,
त्याला छोट्यांनी
’नाही तुम्ही मोठे आहात/मोठ्या आहात, मी लहान आहे’  ची जोडलेली पुष्टी. मग ब्लॉगर्सचा प्रश्न
’तुला कसं कळल’
’पोस्ट वाचून.....’ वाचकाचं उत्तर.

रोज भेटणारी कितीतरी माणसं, त्यांनी आपल्याला ’अगं तुगं, अरे’ केलेलं चालत नाही आपल्याला, पण ब्लॉगवरच्या कधीही न पाहिलेल्या मंडळीना मात्र आपला आग्रह किंवा अधूनमधून भेटणार्‍या मैत्रीणींच्या मैत्रीणींनी ही आपल्याला अगं तुगं करावं ही अपेक्षा.... एकूणच लहानांना मोठं व्हायचा ध्यास, मोठ्यांना लहान म्हणवून घ्यायचा सोस आणि लहानांना आपण कित्ती ’ज्युनिअर’ हे ’सिनियर्स’ ना ठणकावून सांगायची घाई..........कीती ही गुंतागुत?

14 comments:

  1. एकंदरितच काय माणसाला जे जेंव्हा मिळते, तेंव्हा ते सोडून दुसरेच काही हवेसे वाटू लागते बघ!, लहानपणी मोठे, मोठेपणी तरुण दिसण्याची धडपड.....यात देखील एक मजा आहे.

    ReplyDelete
  2. अनघा,
    हो ना, खरं आहे. जे नाही ते मिळवण्याची धडपड मजेशीरच आहे. पण त्या धडपडीतून जेव्हा माणूस दुसर्‍यावर काही ठसवायला जातो स्वसमाधानासाठी तेव्हा त्याचं स्वरुप बदलतं. म्हणजे बघ, माझ्याच काही मैत्रीणी आहेत. सगळ्या एकत्र भेटलो की त्यातल्या एक दोन जणी सगळ्यात त्याच कशा ज्युनिअर आहेत ते बाकीच्यांना तुम्ही आमच्यापेक्षा मोठ्या आहात हे सांगून सांगून ठसवत रहातात. बाकीच्या मग मनोमन वैतागतात. त्यांना ती आपल्या वाढत्या वयाची जाणीव करुन देणं आहे असं वाटत रहातं.

    ReplyDelete
  3. हाहा! मस्त हसले बघ.

    जे जेव्हां असते ते सोडून नेहमीच पळते हवे असण्याची मनाची फार जुनी खोड आहे गं आणि समोरच्याचे वय आडपडद्याने काढायचीही खोड खास मुरलेली! नको मनाला लावून घेऊस. :):)

    ReplyDelete
    Replies
    1. हा हा हा! मी पण हसले जोरात तुझं उत्तर वाचून, एवढं सगळं लिहून झाल्यावर मनावर नको घेऊ सांगते आहेस:-), छान. तू आडपडद्याने वय काढायची सवय म्हटल्यावर पास आऊट केव्हा झालात विचारतात ते आठवलं आणि मुलांच्या वयावरुन आपली वयं 'जोखतात' ते.

      Delete
  4. " अगं, घी देखा हैं बडगा नही... " त्यांना फक्त आजचेच दिसतेय.... पण पुढे काय येतेय हे कळतेय नं आपल्याला... काय? डोळ्यात मिश्किल हसायचे मस्त अशावेळी... :)

    ReplyDelete
  5. मी नुकतंच कॉलेज संपवून ऑफिस जॉईन केलं होतं. आमच्या हापिसात एक consultant येतात, ज्ञानाने तर त्यांना 'sir" म्हणणंच योग्य होतं आणि त्यांचं वय तर ७० च्या पुढे असेल, पण तेसुद्धा कधी आमचं मराठीत informal बोलणं चालू असलं की मला अहो, जाहो करत. मी त्यांना सांगून पाहिलं अहो जाहो म्हणू नका म्हणून, पण त्यांनी उत्तर दिलं, "नाही, ते संस्कार आहेत". त्यामुळे कोणी कोणालाही अहो, जाहो वेगवेगळ्या कारणांनी म्हणत असेल. "लहान आहे" सांगताना सुद्धा आपल्यापेक्षा मोठ्यांना अहो, जाहो म्हणावं ही पद्धत हेच असणार फक्त, पण त्यामुळे समोरच्याला वयाची जाणीव होऊन तो दुखावला जाइल असा विचार नाही आला कधी, फक्त मान आणि आदर म्हणून "अहो जाहो" .... शेवटी जे आत्ता स्वत:ला लहान म्हणत आहेत त्यांनाही जायचंच आहे या सगळ्यातून..... :) :)

    ReplyDelete
    Replies
    1. इंद्रधनु, लेखात प्रत्येकाची मानसिकता विनोदी पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केला आहे. तू लिहलं आहेस ते खरंच आहे. आपल्या संस्कारांप्रमाणे/संस्कृतीप्रमाणे चिमुरडी मुलं सोडली तर लहान असो किंवा मोठं, अनोळखी लोकांना अगं तुगं करत नाहीत. पण ही सारी गुंतागुंत ग्लोबलायझेशनचा परिणाम असावा. आम्ही एकांकिका करतो त्यात साधारण ६० च्या आसपास काम करणारे आहेत, आता काका म्हणायचं की नाही हा प्रश्न आला कारण इकडे सगळीच एकमेकांना अगं तुगं करतात. मग त्यानांच विचारायचं ठरवलं. विचारल्यावर ते म्हणाले की मला काकाच म्हणा. हे असं असतं काहीना वयाचा मान राखावा असं वाटतं, काहींना ती मधली फट नकोशी वाटते.

      Delete
    2. समोरच्यालाच विचारायचं हा पर्याय छान आहे... :)
      आणि वर सांगायचं राहून गेलं की, प्रत्येकाची मानसिकता छान दाखवली आहे लेखात...

      Delete
  6. मी "अहो" म्हणायचं आहे की "अगं" म्हणायचं आहे?
    जाम गोंधळ झाला आता हे वाचून :-)
    (बाय द वे, आपल्याला कोण काय संबोधतं, त्यावरून समोरच्या व्यक्तीचं वय आपल्यालाही कळतं बरं का :-))

    ReplyDelete
    Replies
    1. हा हा सविता, आता मला काय म्हणायचं हे जर मी सांगितलं तर माझं वय कळेल ना. आणि त्यासाठी आधी तुला/तुम्हाला वय सांगावं लागेल.
      :-).

      Delete
  7. very apt description of 40+women :-).

    ReplyDelete
  8. Hello there
    tumchya blogwar 1st visit aahe mazi. but ya post aaadhiche other posts read karnyaagoder tumhala answer dyavese vatle. Parastreela mata-bhagini mannyache aaple sanskar aahet. are-ture ladieskadun zale ki mug aamhihi aag-kaaag karu shaktu ase nahi vatat tumhala.
    By the way mulila PILLU mhanane ekdam awadle buva.
    Manish
    Manisha4444@gmail.com

    ReplyDelete
    Replies
    1. मनिष,
      ब्लॉगला भेट दिल्याचा आनंद वाटला. तुम्ही म्हणता आहात ते आणि मी लिहलं आहे ते दोन वेगळे विषय आहेत. अनोळखी व्यक्तीला स्त्रीने अरे तुरे केलं तर समोरुन तसा प्रतिसाद येणार हे गृहीत धरायला हवं.
      मी लिहलं आहे ते दैनदिन जीवनात लहान मोठ्यांना आपण कसे लहान आहोत ते ठसवत असतात, मोठे लहान दिसण्याच्या प्रयत्नात आणि सगळ्यांनी आपल्याला एकेरी नावाने संबोधावं या इच्छेत....पण तेही स्थळ आणि माणसांनुसार कसं बदलतं ह्याबद्दल.
      एकूणच बदलत्या काळानुसार, जागतिकीकरणांमुळे रुढ संकेत आता फारसे पाळले जात नाहीत. त्यातून निर्माण झालेला हा गोंधळ आहे.

      मुलीला पिल्लू म्हणणं....सगळे आई बाबा किती वेगवेगळ्या नावांनी मुलांना हाका मारत असतील नाही? मी तर मुलीला कधीकधी दगडू, टपरु असं काहीही म्हणते (ती आठ वर्षाची आहे). जवळपास नसली तरी कुठूनतरी ’ओ’ येतं तेव्हा गमंत वाटते की कुठलंही नाव घेतलं तरी तिच्यासाठी आहे हे कसं कळत असेल तिला? घरात तिचा भाऊ असतानाही :-).

      Delete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.