Thursday, October 3, 2013

मी काय करु...


"अहो, मीनाचा फोन होता."
वर्तमानपत्रातलं डोकं बाहेर न काढता अण्णांनी हुंकार दिला.
"उन्हाळ्याच्या सुट्टीत बोलावते आहे." अण्णांनी फक्त वर्तमानपत्र थोडं बाजूला करत वत्सलाबाईंकडे नजर टाकली.
"नाही, म्हणजे मुलांना सुट्टी लागली आहे ना. त्याच्यांकडे लक्ष द्यायला कुणीतरी पाहिजे म्हणत होती."
"वत्सला, हे नवीन आहे का तुला? दरवर्षी जातोच की आपण तिकडे मुलावर लक्ष पाहिजे म्हणून. आणि तुम्ही दोघंही आहात इथे तर छोटीला पण काढते पाळणाघरातून म्हणाली असेल."
"काय करायचं मग? आता झेपत नाही ही उस्तवारी. म्हणजे सुरुवात प्रवासापासूनच होते. कल्पनेनंच नको वाटतं." दुखरे पाय चोळत त्या तिथेच टेकल्या.
"नाही जमणार सांग. तिकडे असतात चांगली पाळणाघरं आणि काय ते त्यांचे समरकॅम्प पण असतात त्यात घाल म्हणावं मोठ्याला."
"सांगितलं. खूप महाग पडतं म्हणे ते. भारतात पाठवून देते मुलांना. एखादी दिवसभराची बाई लाव, पैसे देईन म्हणते आहे."
"काय नालायक मुलं आहेत ही. पैसे फेकले आमच्या तोंडावर की झालं. त्याचं सगळं केलंच आपण. आता पार साता समुद्रापलिकडे जाऊन बसली आहेत. उन्हाळ्यात तिथे जाऊन त्यांच्या मुलांना सांभाळायचं.  इथे आम्हाला कोण सांभाळणार? झाली म्हणावं आमची देखील वयं आता.  दे तो फोन इकडे. मीच सांगतो तिला." वत्सलाबाई उठल्या नाहीत. म्हणता म्हणता एक घाव दोन तुकडे करतील. ते सांधायला पुन्हा सगळी मानसिक शक्ती घालवायची ती आपण.  अण्णांनीही परत वर्तमानपत्रात डोकं खुपसलं.  वत्सलाबाईंच्या मनाला थकव्याने एकदम वेढा घातला.

मीनाच्या वागण्याचं त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होतं. आता हे दरवर्षीचं झालं होतं. जून महिना जवळ आला की त्या अस्वस्थ व्हायच्या. मीनाचा फोन घेऊच नये असं होऊन जायचं. पण किती ठरवलं तरी सगळं त्याचक्रमाने घडायचं. अडीच तीन महिन्यांनी भारतात परत यायला निघताना प्रत्येकवेळी त्या तिथून येताना बजावून नाही का यायच्या,
’आता पुढच्या वेळेस तुझी तू सोय बघ गं बाई. नाही हो झेपत आम्हाला हा प्रवास, पुन्हा घरीही तशी दिवसभर उठबस होते ना, त्यांने अगदी थकून जायला होतं.’ त्यांना सगळी वाक्य जशीच्या तशी आठवली. पण दरवेळी उगाच मुलीचं मन कशाला दुखवा, नातवंडाचं मायेने कोण करणार म्हणून परदेशवारी व्हायचीच. पण हल्ली हल्ली मनात एक सल दाटून यायला लागला होता.  वाटायचं,  मायेने करतो आहोत त्याचा फायदा तर घेत नाही ना ही? जिथे तिथे हिशोबाने वागणं, त्यापुढे आमच्या त्रासाची, दुखण्याखुपण्याची पर्वा वाटत नाही की डोळ्यावर कातडंच ओढून बसली आहे?  एक वर्ष अण्णांचीच तब्ब्येत बरी नव्हती तेव्हा जमलं नाही जायला, तर मोठ्याला दिलं पाठवून इकडे. काय धावपळ उडाली. मीना म्हणते तशा बायका थोड्याच मिळतात आजकाल. मिळाल्या तरी त्यांची  तंत्र सांभाळावी लागतात. शेवटी नाशिकच्या लेकीला बोलवून घ्यायला लागलं. तिने केलं सगळं पण गरज पडली की तिचाच कसा उपयोग होतो ते सांगायला विसरली नाही.  दरवर्षी मीनाच्या मदतीला झेपत नसताना का धावता हा नेहमीचा प्रश्न विचारायलाही विसरली नाहीच.


मुली मोठ्या होत असताना दुसर्‍याचा विचार करायला शिका हे मनात रुजवायचं राहूनच गेलं का?  कधी कुठल्या कामाला हात लावू दिला नाही, अडचणी कळू दिल्या नाहीत ते अभ्यासात अडथळा नको म्हणून. पण त्यामुळेच सगळं  विनासायास मिळतं, आपल्या मनासारखंच झालं पाहिजे हीच सवय लागली. स्वत:पुरतं पाहिलं की संपलं असं वागणं, विशेषत: मीनाचं. काय चुकलं आपलं? मुलींनी स्वावलंबी बनावं एवढंच होतं मनात. पण ते करता करता रोवलं गेलेलं महत्वाकांक्षेचं रोपटं आडवं तिडवं फोफावलं. मीनाच्या धिटाईचं, हुशारीचं कौतुक करता करता ती म्हणेल ती पूर्व असंच होत गेलं.  त्याचा फायदा ती तिच्या नकळत घ्यायला शिकली असं तर झालं नाही ना? ती कर्तृत्ववान निघाली. इंजिनिअर होऊन स्वत:च्या हिमतीवर परदेशात शिक्षणासाठी गेली. पण हे एवढंच पुरे असतं? कर्तृत्ववान बनविता बनविता माणूस  घडवायचं राहूनच गेलं का?. कुणाची चुक? का घरोघरी हे असंच होतं? त्याचं त्यानाच ठरवता येईना.

"चहा करतोय मी माझ्यासाठी. तुला हवा आहे का?" अण्णांनी  विचारलं तशा त्या विचारांतून बाहेर आल्या.

>>>
"काय झालं? येते आहे का मग तुझी आई?" मयुरेशच्या प्रश्नावर मीना काहीच बोलली नाही.
"त्यांचं नक्की होत नसेल तर आईला पाहतो जमतंय का."
"आता तिला विचारलं आहे ना. तिचं कळू दे. मग बघू."
"पण हो, नाही काहीतरी म्हणाल्या असतील ना?"
"काही बोलली नाही. कंटाळते हल्ली ती दरवर्षीच्या प्रवासाला."
"तुझा पण अट्टाहास का तुझ्याच आईला बोलावण्याचा?"
"निश्चिंतं राहता येतं मग. तुझी आई आली की तिच्यावर जास्त ताण पडू नये याची काळजी घेण्याचाच ताण येतो माझ्या मनावर."
"हे अतिच तुझं.  बघ, तुझं तू ठरव. परत माझे आई, बाबाच करतात असं ऐकवू नकोस म्हणजे झालं." तिने नुसतीच मान उडवली. मयुरेशने आठवड्याचे कपडे यंत्रात धुवायला टाकले तसं भाजी चिरता चिरता तिचं मनंही एका लयीत मागे पुढे होत राहिलं.
खरं तर आईने मागच्या वेळेस बजावून सांगितलं होतं पुन्हा नाही यायला जमणार म्हणून. पण मग करायचं काय? आजी आजोबा आले की किती खुश असतात दोघं. आता आणखी थोडी वर्ष. मोठी झाली की रहातीलच एकटी. समर कॅम्प, पाळणाघर दोन्हीचा खर्च खूप.  पुन्हा पैशांनी प्रेम थोडंच मिळतं? आई आली की तिच्या हातचे चविष्ट पदार्थ पण मिळतात चाखायला. पण मागच्यावेळेला आईने एका मैत्रीणीकडेच बोलून दाखवलं, झेपत नाही असं सांग म्हणे आमच्या वतीने मीनाला. तिने तेव्हा मैत्रीणीलाच म्हटलं होतं,
’नको सांगू मला. मनाला लागून राहतं.’ मैत्रीण गप्प बसली. आईचा राग आला होता.  खरंच त्यांना इतकं नको वाटतं इकडे यायला? मुलांचं जबाबदारीने, प्रेमाने त्यांच्याइतकं कोण करणार? आणि दोन महिन्याचा तर प्रश्न. भारतात गेले की आरामच आराम. पोळ्या करायला, भाज्या चिरायला बाई आहे, दोघंच्या दोघं तर असतात.  इथे निदान आमचा सहवास मिळतो, अधूनमधून फिरवून आणतोच की दोघांना. बाहेर जातो जेवायला. तिकीटाचा खर्च तर मी करुच देत नाही  म्हणजे आई, बाबांची तयारी असते पण मी बोलावलं आहे तर मी थोडीच करु देईन. मीही नोकरी करते तर एवढं तर हक्काने करु शकतेच. मग तरीही आई, बाबा का नाही खुश? आईला मुळी कशात समाधानच नाही. आणि बाबा. ते म्हणजे एकदम रोखठोक.  चिडले की तोफ. स्पष्ट बोलून मोकळे.  मागे एकदा म्हणाले होतेच की भारतात त्यांचे मित्र त्यांना बेबीसीटर म्हणून चिडवतात. दुर्लक्ष करा म्हटलं तर म्हणाले, पण ते खरंच आहे ना?

 काय खरं, काय खोटं तेच समजेनासं झालं आहे.  आणि आता इतक्या उशीरा कुठे नावं नोंदवणार समरकॅम्पमध्ये, जागा शिल्लक नसणारच.  चिरलेली भाजी फोडणीला टाकत तिने कॅलेंडर पाहिलं. आई, अण्णाचं किती तारखेचं  आरक्षण करणं  सोयीचं पडेल याचा विचार करत मीनाने  त्यांचा नंबर फिरवायला सुरुवात केली.



23 comments:

  1. sundar lihila ahes.
    ek suchvavasa vatatay...tu tuzya blog cha mobile version pan chalu kar....mobile varun desktop site vachayla bhayankar tras hoto

    ReplyDelete
  2. Thank you Shriraj! pahate mobile version kase karayache te.

    ReplyDelete
    Replies
    1. dashboard var templates ya panavar tula mobile verions che option sapdel

      Delete
    2. kela moblie version option on. Thank you Shriraj!

      Delete
  3. apaplya parine dogheyhe sahich. Aai baba ani mulgi suddha.

    ReplyDelete
    Replies
    1. आरती- हो ना, तेच दाखविलं आहे म्हणजे दोघींनाही आपलं बरोबरच वाटतं. खरं बरोबर कोण ते प्रत्येक वाचकालाही वेगळंच वाटणार

      Delete
  4. Shabadachi etaki changali mandani aahe.....ki kharach man bharawun gele...Atishay Chan !

    ReplyDelete
  5. खरे तर दोन्ही बाजू तू मांडल्या आहेस पण तरीसुद्द्धा यावर उपाय काय ते समजत नाही , कारण अशी अनेक उदाहरणे आपल्या आजू बाजूला दिसतात दोघांचीही बाजू पटते पण तरीही असे वाटते कि नुसते तिकीट पाठवले तरी शेवटी आई वडिलांचे वय विचारात घेतले पाहिजे ,तू खूप सुंदर लिहिले आहेस त्यामुळे विचार करायला प्रवृत्त केलेस, keep it up

    ReplyDelete
  6. मोहना, आधुनिक कुटुंब व्यवस्था आणि नातेसंबंध यावर प्रकाश टाकणारी गोष्ट आहे ही.
    गोष्टीतली प्रत्येक व्यक्ती वरकरणी logical पण फक्त स्वत:पुरता विचार करणारी. एकमेकांची बाजू समजावून घेणे, सुसंवादाने, सामंजस्याने एकमेकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकमेकाला मदत करणे, सर्वांशी सलोख्याचे संबंध राखणे, सर्वांबद्दल कृतज्ञता वाटणे या कुटुंबासाठी आणि जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांचा अभाव या कुटुंबात दिसतो.

    सुसंवाद न साधता एक घाव दोन तुकडे करणारे मीनाचे वडिल, मीनाशी सुसंवाद साधता येत नाही म्हणून तिच्या मैत्रिणीकडून तिला निरोप पोहोचवणारी मीनाची आई, आई वडिलांना मदत करायला आल्यानंतर उपकारकर्त्याच्या उर्मट्पणात आई वडिलाना चार शब्द सुनावून जाणारी मीनाची बहिण, मीनाच्या नवऱ्याचा कोरडा सहभाग," काय म्हणतात तुझे आई वडिल ? नाहीतर माझ्या आई वडिलांना बोलावू का? नाहीतर म्हणशील फक्त तुझेच …. ".आणि मीना , थकलेल्या आई वडिलांचा विचार, सासरच्या माणसांशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा शहाणपणा, नवऱ्या बरोबरच्या सुसंवादातून मुलांवर सुसंस्कार करण्याचे सुयोग्य धोरण हे काहीच मन आणि बुध्दी पर्यंत पोहोचू शकणार नाही इतकी पैसे मिळवणे आणि पैसे जमवणे या चक्रात चक्रावलेली.
    मुलीना उच्च शिक्षण देण्याचे सर्व श्रम मीनाच्या आई वडिलांनी केले पण त्यांना सुसंस्कृत करायला आई वडिल कमी पडले का ?
    ही सर्व गोंधळलेली माणसे पुढच्या पिढीला सुसंस्काराचा कोणता वारसा देणार? दलाई लामा म्हणतात," while educating our children's brains we should not neglect to educate their hearts" . माणसा माणसातल्या बळकट संबंधांवरच समाजाचे आरोग्य अवलंबून असते.

    पैसा कशासाठी मिळवायचा ? तो साठवायचा तरी कशासाठी ? एकमेकांची सोय करण्यासाठी आणि एकमेकांना सुखी करण्यासाठी. धड पडे पर्यंतच्या या सर्व धडपडीत सुसंस्कारीत पुढची पिढी निर्माण झाली नाही तर मिळवलेल्या आणि साठवलेल्या संपत्तीने आयुष्याच्या सायंकाळी five star वृध्दाश्रमात एकाकी रहायचे का ?

    Every challenge has a solution. मला दलाई लामांचे उत्तर योग्य वाटते, " We all are selfish that is natural, but we need to be wisely selfish. We have to concern ourselves more with others well- being that is the way to be wisely selfish."

    तेव्हा wisely selfish व्हायचे असेल आणि वेळीच जागे होउन सुखी व्हायचे असेल तर एकमेका सहाय्य करू हाच सुपंथ. याची सुरवात कुटुम्बापासून करायला हवी.

    Thanks Mohana for such a thoughtful story.

    ReplyDelete
    Replies
    1. Geetatai,

      Khoop sunder vishleshan kele aahes mazya lekhache. Thank you!

      Delete
  7. नेहमीप्रमाणेच सुंदर लिहिलंय... सगळेच स्वत:च्याच दृष्टीने विचार करतात. समोरच्याच्या जागी स्वत:ला कल्पून विचार करणारे फार कमी लोक असतात... हे वाचून असं वाटलं की आपणही कधी दुसऱ्यांच्या बाजूनेही विचार करून बघायला हवा :)

    ReplyDelete
    Replies
    1. इंद्रधनू - Khoop divsani!. Chan vatale tuzi pratikriya aali mahnoon :-). Very true, आपणही कधी दुसऱ्यांच्या बाजूनेही विचार करून बघायला हवा :)

      Delete
  8. Chhaan, I've experienced many situations depicted in this article. There is no solution that is fair to everyone in my opinion. Thanks for writing. I read it in the bmm newsletter and immediately had to read it out loud to my wife.

    ReplyDelete
    Replies
    1. bkarle, Thank you very much for your response. Yes, it is true that their is no fair solution in these type of situations.

      Delete
  9. Mohaha, that was another nice article. Few of our family friends had a long and nice discussion on your topic of inviting parents during summer.

    ReplyDelete
  10. छान मांडलं आहेस मोहना... विचार करायला लावणारं!

    गीता दातार म्हणत आहेत, "मुलीना उच्च शिक्षण देण्याचे सर्व श्रम मीनाच्या आई वडिलांनी केले पण त्यांना सुसंस्कृत करायला आई वडिल कमी पडले का ?" हे मला पटलं नाही. हे खापर आई-वडिलांवरच का फोडायचं? सर्व घास त्यांनीच भरवायचे का? एका ठराविक पातळीपर्यंत त्यांनी दिलं, त्याच्या जोरावर आपण पुढे आपला विकास शकत नाही का? मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग सर्वंकष विचार करण्यासाठी करू शकत नाही का?
    तुझ्या कथेतली नायिका 'मीना' मला स्वार्थीच वाटते आहे. स्वतःची गरज भागवण्यासाठी आईवडिलांचा वापर करणारी, सासूची मिळू शकणारी मदत केवळ स्वतःला जमवून घ्यायला नको म्हणून नजरेआड करणारी.. असतात, अशी माणसं जगात असतात.

    ReplyDelete
  11. मंजूडी - धन्यवाद गं. सुसंस्कृतपणा अंगी आणण्यात आपणच कमी पडलो की काय हा प्रश्न खरं तर मीनाच्या आईलाही पडला आहे. होतं असं. जेव्हा आपलीच मुलं असं वागतात (आणि वास्तवात अशी खूप पाहिली आहेत मी इथे) माणूस त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत राहातो तेव्हा इतरांना, स्वत:ला वाटू शकतं तसं. मीना स्वार्थी आहेच पण मला वाटतं तिच्या आईचंही चुकतंय. नातवंडांच्या प्रेमाखातर शेवटी तीही जातेच ना? मुलीला शिकवायचं तर तिने मुलगी कशी वागते आहे आणि आम्ही तुम्हाला मोठं केलं आता तुमच्या मुलाचं तुम्हीच करायला हवं हे परखडपणे सांगायला नको का? पण असेही पालक भरपूर किंबहुना बहुतांशी. क्वचितच कुणीतरी मुलांना स्पष्ट सांगू शकणारे.

    ReplyDelete
  12. आईने 'यायला जमणार नाही' असे बजावून सांगितल्याचा उल्लेख आहे की गं कथेत... पण मुलांवरच्या, नातवंडावरच्या प्रेमाखातर 'जमतंय तेवढे दिवस करू' असं म्हणत धकवून नेणारे पालकही असतात. पण मग त्यांनी तक्रार करू नये. पण इतकं प्रॅक्टिकल वागता आलं तर काय पाहिजे अजून :-)

    एकूणात, आपण कसं वागू नये हे सुचवणारी कथा उतरली आहे ही..

    ReplyDelete
    Replies
    1. मला म्हणायचं होतं की आईने ’लेक्चर’ दिलं नाही :-) आणि ठाम राहिली नाही. पण एकंदर तेच आपण कसं वागू नये इतकं जरी यातून कळलं तरी खूप काही साध्य झालं :-).

      Delete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.